व्यवस्थापनाची मूलतत्त्वे/ महाव्यवस्थापकाची यशोगाथा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
template error: please do not remove empty parameters (see the style guide and template documentation).

प्रकरण २१

महाव्यवस्थापकाची यशोगाथा
जुन्या जमान्यात बहुतेक नोक-यांच्या अर्जाची सुरुवात साधारणपणे अशी असायची :
 "आम्हांला समजते की आपल्या दयावंत नियंत्रणाखाली एक नोकरदाराची जागा भरावयाची आहे. सदरहू जागेसाठी मी अर्ज करू इच्छितो... या जागेसाठी माझी निवड झाली तर मी खात्रीपूर्वक सांगतो की मी माझ्या सर्व वरिष्ठांचे पूर्ण समाधान करीन आणि त्यासाठी माझ्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करीन..."
 जर एखाद्याची जागेसाठी निवड झाली तर कामगार खरोखरच योग्य ते काम करतो, त्याला कायम करण्यात येईस्तोवर. त्यानंतर त्याच्याकडून अपेक्षित काम मिळविणे ही समस्या होते. काहीजण प्रयत्नांची शिकस्त करून सर्वोत्तम कामगिरी बजावीत राहतील, पण पुष्कळजण तसे करणार नाहीत.याला कारण काय?

 या समस्येचं उत्तर पिटर डूकरसारख्या व्यवस्थापन गुरूने नव्हे तर आचार्य विनोबा भावे यांच्यासारख्या तत्त्वज्ञाने दिले आहे. ते म्हणतात की या जगात चार प्रकारची माणसे आहेत : सुस्त, व्यस्त, त्रस्त आणि मस्त!

सुस्तावलेली मंडळी

जी सुस्त मंडळी जी असते त्यांचे घोषवाक्य असतं : ‘कामात दिरंगाई करा.' कमीतकमी काम करून ते स्वत:ची सुटका करून घेतात. त्यांच्याकडून काम करवून घेण्यासाठी 'पाठपुरावा' करावा लागतो. भारतात, सर्वाधिक वेळखाऊ काम जर असेल तर ते म्हणजे पाठपुरावा करणे. असा पाठपुरावा करावा लागतो अशा मंडळीत हाताखाली काम करणारेच नव्हे तर बरोबरीने काम करणारे सहकारी (काही वेळा वरिष्ठ अधिकारी मंडळीसुद्धा) यांचा समावेश करावा लागेल.

 साधारणत: जेव्हा तुम्ही एखाद्याला एखादे काम 'तातडीने' करायला सांगता तेव्हा प्रतिसाद असतो : “उद्या, पुढल्या सोमवारी,. पुढल्या आठवड्यात किंवा पुढल्या महिन्यात! आजचा दिवस तर जवळपास संपलाच आहे!! सर्वात लौकरचा दिवस

म्हणाल तर तो उद्याचाच; पुढला सोमवार अधिक व्यवहार्य ठरेल; पुढला महिना म्हणाल तर आरामदायक ठरेल आणि पुढल्या महिन्यासारखं दुसरं काहीच नाही!!!" आणि जरी त्याने पुढल्या बुधवारी म्हटलं, तरीही पुढल्या बुधवारी काम होऊन तयार असतं म्हणाल? जर तुम्ही बुधवारी जाऊन त्याच्याकडे कामाची मागणी केलीत तर तो म्हणेल, “तुम्ही मला सोमवारी भेटलात तेव्हा काहीच म्हणाला नाहीत; तुम्ही काल मला भेटलात तेव्हाही आठवण केली नाहीत. तुम्ही पाठपुरावा केला नाही."

 हे सर्व असे आहे; याला कारण म्हणजे आपल्याभोवतीची बरीच माणसे ही सुस्त असतात!


बोगस बँडवाले

सुस्त मंडळींच्या अगदी उलट असणारी मंडळी म्हणजे 'व्यस्त' मंडळी. कामात अतिव्यग्र! हातात खूपशी कागदपत्रे घेऊन ते कार्यालयाच्या कॉरिडॉरमधून घाईघाईन फिरत असतात. क्वचितच ते तुम्हांला त्यांच्या खुर्चीत आढळले तर ते फोनवर बोलण्यात गुंतलेले असतात आणि चर्चा करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. त्यांच्याकडे पाठविलेल्या कोणत्याही कागदपत्राविषयी काहीही प्रतिसाद मिळत नाही. ते फारच कामात गुंतलेले असतात. पण दिवसअखेर त्यांनी काय साध्य केलं हे जर तुम्ही तपासलंत तर त्यांची कार्यसिद्धी जवळपास शून्य असल्याचं तुम्हांला आढळेल. ही मंडळी म्हणजे ‘बोगस बँडवाले' असतात!

 एका कंपनीत महाव्यवस्थापक पदावर असलेल्या माझ्या एका मित्राने त्याच्या मुलीच्या लग्नासाठी बँडची व्यवस्था करण्यासाठी स्थानिक बँडमास्तरना बोलाविले. त्याने त्या बँडमास्तरला विचारलं, “तुम्ही किती बँडवाले आणाल?"

 "वीस." बँडमास्तरने उत्तर दिलं.

 यावर माझा मित्र म्हणाला, “आमच्या उपमहाव्यवस्थापकाच्या मुलीच गेल्या महिन्यात लग्न झालं त्यावेळी त्यांच्या बँडमध्ये वीस बँडवाले होते. मी तर महाव्यवस्थापक आहे. मला तर निदान तीस जण तरी बँडवाले हवेतच."

 “ठीक आहे साहेब," तो बँडमास्तर म्हणाला, “मी तीस बँडवाले घेऊन येईन."

 लग्नाच्या दिवशी झकपक गणवेश घातलेले आणि हातात विविध वाद्ये घेतलेल्या तीस बँडवाल्यांच्या प्रत्येकी एका रांगेत दहा अशी मिरवणूक निघाली. जेव्हा मी त्यांना बारकाईने पाहिलं तेव्हा मला आढळलं की दोन बाजूच्या बँडवाल्यांच्या रांगाच तेवढ्या वाद्ये वाजवीत होत्या–बँडवाल्यांची मधली रांग केवळ झटपट चालत, जोमदार हावभाव करीत होती–ते वाद्ये वाजवीतच नव्हते. ते बोगस बँडवाले होते!
बालविधवा

तिसरा गट असतो तो म्हणजे 'त्रस्त' मंडळींचा - म्हणजे गांजलेली मंडळी. तुम्ही त्यांच्याकडे एखादे काम करवून घेण्यासाठी गेलात तर त्यांचा तात्काळ प्रतिसाद असतो : “या इथे काम करणारा मी एकटाच आहे काय? जेव्हा कधी काही काम निघते तेव्हा ते मीच करायचं! मीच! विशेष लाभ, बढत्या, परदेशी टूर सगळं चमचे लोकांना मिळणार!! आणि काम करायला फक्त मी. मी आणि मीच!!!"
 अशा मंडळींच्या टेबलावर कामाच्या कागदपत्रांचा ढीग असतो. पण कामे करण्याऐवजी ते कामाविषयी सतत तक्रार करीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून कामे करवून घेणे फार अवघड असते.

 या लोकांची एकत्र येऊन 'बालविधवेची' भूमिका बजावण्याची एक प्रवृत्ती असते.

 माझ्या लहानपणी मला आठवतं, प्रत्येक उच्च जातीतील हिंदू कुटुंबात एकतरी बालविधवा असायची. संध्याकाळी यातील अनेक बालविधवा जवळपासच्या देवळात जमून त्यांच्या नातेवाइकांना, जगाला आणि स्वत:च्या दैवाला - या क्रमाने शिव्याशाप द्यायच्या. याची कारणे सहजस्पष्ट होती : कष्टाची कामे, उरलंसुरलं अन्न, वाईट वागणूक आणि भवितव्यात अंधार! गेल्या एका पिढीतच या सगळ्या बालविधवा नाहीशा झाल्या. पण त्यांची जागा आता व्यवस्थापकांनी घेतलीय. ते कामाच्या वेळी किंवा बाहेर एकत्र जमून त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांना, हाताखालील काम करणा-यांना, बरोबरीच्या माणसांना (तेथे हजर नसलेल्या), कामगार नेत्यांना, कामगार संघटनांना आणि त्यांच्या स्वत:च्या दैवाला - याच क्रमाने नाही; पण शिव्याशाप देतात.

 स्वत:चं नीतिधैर्य खचविण्याबरोबरच ही 'बालविधवा' कामगार मंडळी त्यांच्या संपर्कात येणा-याचेही नीतिधैर्य रखनी करतात - विशेषतः लवकर उसळी मारण्याची जोमाची भावना असलेल्या नव्याने भरती झालेल्या मंडळींचे नीतिधैर्य खच्ची करतात. हे बालविधवा छाप लोक हेतुतः त्या नव्याने भरती झालेल्यांचं नीतिधैर्य त्यांच्या नेहमीच्या नमुनेदार संवादाने खच्ची करतात.

बालविधवा
तुझं शिक्षण कुठपर्यंत झालंय?
:
नव्याने भरती झालेला
मी बी.टेक. आहे.
:
बालविधवा
बी.टेक! कुठून झालास?
:
नव्याने भरती झालेला
आय.आय.टी.तून.
:
बालविधवा
तू आय.आय.टी.तून बी.टेक. झालायस हे मला सांगू नकोस. मग इथं कशाला झक मारतोयस? तुला
:

यापेक्षा चांगली नोकरी नाही मिळू शकली? इथे

यायचं दुर्दैव वाट्याला आलं आमच्या; आणि दोस्त,

बघ इथे सडतोय आम्ही!"

 अशामुळे नव्या भरती झालेल्याचं नीतिधैर्य झटकन खचतं.


मस्त

बहुतेक संघटना काही ना काही कामगिरी करीत राहतात कारण त्यांच्याकडे ‘मस्त'-म्हणजे धुंदावलेले - या चौथ्या गटातील काही लोक असतात. ही मंडळी त्यांच्यावर सोपविलेल्या कामाने आणि जबाबदारीने नशा चढल्यागत धुंद होते. एक कवी म्हणतो त्याप्रमाणे :

किसीको नशा है जहाँमें खुशी का,
किसीको नशा है गमे जिंदगी का
किसीको मिले है छलाकते पियाले
किसीको नजर से पिलायी गयी है।

  (काही लोक आनंदाने धुंदावतात - काही दु:खाने; काहींना दारूच्या पेल्यातून नशा धुंदी चढते तर काही नजरेला नजर भिडताच धुंद होतात.)


 हे धुंदावलेले व्यवस्थापक फारच संसर्गजन्य असतात आणि इतरांनाही त्यांची धुंदी धुंद करते. संत कबीराच्या शब्दात :-


लाली मेरे लाल की जीत देखू तीत लाल,
लाली देखन मैं गयी, मैं भी हो गयी लाल

 (माझ्या प्राणप्रियाच्या ओसंडणाच्या उत्साही आनंदाने तुम्ही पाहाल तेथे ओसंडून वहाणारा उत्साही आनंद निर्माण केला आहे - मी तो ओसंडून वाहणारा आनंदोत्साह पाहायला गेले आणि बघ, मीसुद्धा उत्साहित झाले.)

 असे कर्मचारी सर्व स्तरावर असतात. अशी धुंदी-नशा चढलेले व्यवस्थापक धुंदावलेली हाताखालील माणसे निर्माण करतात. मी या सर्वोच्च, महत्तम व्यवस्थापकांना ‘दीपशिखा' व्यवस्थापक असे म्हणतो.
दीपशिखा व्यवस्थापक

‘दीपशिखा' शब्द कालिदासाच्या एका उपमेतून आला आहे. कालिदास त्याच्या उपमांसाठी प्रसिद्ध होता. त्याने ‘उपमा-कालिदासस्य' या शब्दप्रयोगाला जन्म दिला. एका विशिष्ट उपमेने त्याला ‘दीपशिखा कालिदास' असे टोपणनाव दिले गेले आहे. ही उपमा त्याने ‘रघुवंश'मध्ये इंदमतीच्या स्वयंवराचे वर्णन करण्यासाठी वापरली आहे. राजकुमारी इंदुमती स्वयंवरात तिचा पती निवडीत होती. अनेक राजे बसले होते आणि हातात वरमाला घेऊन ती फिरत होती. कालिदास म्हणतो, “अंधाच्या रात्री एखादी ज्योत फिरावी तशी ती फिरत होती. इंदमती जेव्हा एखाद्या राजाकडे यायची तेव्हा तो उजळून निघायचा; आणि ती जेव्हा त्याच्या समोरून दूर जायची तेव्हा तो अंधारून जायचा!"

 तो म्हणतो, :

संचारिणी दीपशिखेव रात्रौ
यम् यम् व्यातियाय पतिंवरा सा
नरेंद्रमार्गाट्ट इव प्रमेदे
विवर्णभावम् स स भूमिपालः

 काही व्यवस्थापक तसे असतात. ते जेथे कोठे जातात, तेथील परिस्थिती उजळून टाकतात - ते फार मोठे काम करतात. अशीच व्यवस्थापक मंडळी कोणत्याही परिस्थितीत ठेवली तरीही उत्कृष्ट कामगिरी करायला कसे काय समर्थ होतात हे शोधण्याचा मी प्रयत्न करीत आलो आहे. हे तीन गोष्टी निर्माण करीत असल्याचे मला आढळले आहे :

 ० जीवितकार्याविषयीची जाणीव,

 ० कृतीविषयीची जाणीव,

 ० निष्ठेविषयीची जाणीव.


जीवितकार्याविषयीची जाणीव
आता आपण जीवितकार्याविषयीच्या जाणिवेकडे पाहू या. तुम्ही मिशनरी हा शब्द एकला आहे - आपण आजूबाजूला असणारे मिशनरी पाहिले असतील. ते येथे कशासाठी येतात? ते बेल्जियम, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड, अमेरिका - हजारो मैलांवरून येतात! त्यांची एक विचित्र कल्पना असते-त्यांना एका नव्या देवाची विक्री करायची असते. ते म्हणतात की येथील सर्वसामान्य मंडळी चुकीच्या देवाची पूजा करतात-

आमच्याकडे योग्य, राखण करणारा देव आहे. मला हे फारच विचित्र वाटतं-कारण नवा देव पाहिजे अशी एकही व्यक्ती मला आजवर कधीही आढळलेली नाही. ज्यांना नवी स्कूटर, नवी कार, नवा फ्रीज, नवा व्हीसीआर, नवा टीव्ही हवा आहे अशी माणसे मला भेटली आहेत - पण 'माझा देव जुना झाला आहे, मला एक नवा देव पाहिजे!' असे सांगणारी एकही व्यक्ती मला कधीही भेटलेली नाही. लोक त्यांच्याकडे जो कोणी देव आहे त्यावर समाधानी असतात. म्हणून कुणी नवा देव विकू पाहतो ही कल्पनाच मला विचित्र वाटते. भारतात बहुसंख्य लोक हे हिंदू आहेत आणि नव्याने देऊ केलेला देव ख्रिस्ती आहे. त्यामुळे लोकांना साधारणपणे किंचितसा वैरभाव वाटावा. काही माणसांमध्ये वैरभाव असतो - पण बहुतेकांना या मिशनच्यांविषयी आदर असतो. जेव्हा मी त्यांना तुम्ही मिशनच्यांचा आदर का करता असे विचारतो, तेव्हा ते म्हणतात, “त्यांच्यामध्ये समर्पणाची भावना असते!"
 विशेष बाब म्हणजे, समर्पणाची भावना काही त्या मिशनच्यांपुरतीच मर्यादित राहत नाही. तिची पाळंमुळं इतकी खोलवर जातात की ती संघटनेचे स्वरूपच बदलून टाकतात.
 इंग्रजी माध्यमात ज्याचा मुलगा शिकत आहे अशा माझ्या एका मित्राने मला सांगितलं, “मला त्याला कॉन्व्हेंटच्या शाळेत घालायचंय." मी विचारलं, "का?” “तेथील शिक्षण अधिक उत्तम असतं." त्याने उत्तर दिले. आता याचा विचार करा. कॉन्व्हेंटच्या शाळेत कितीसे मिशनरी असतात? तीन-चार किंवा पाच. उरलेला बहुतेक शिक्षकवर्ग आणि कर्मचारीवर्ग हा मिशन-यापैकी नसतो-बहुतेक हिंदू असतात. मात्र, काही समर्पण खालच्या स्तरांवर जाऊन शैक्षणिक प्रक्रिया जास्त चांगली होत असल्याचे मिशन-याच्या प्रभावामुळे वाटत. त्याचप्रमाणे तुम्ही एखादे मिशनचे इस्पितळ घ्या. समजा, तुमची जवळच कुणीतरी प्रिय व्यक्ती आजारी आहे आणि तुम्हांला निवड करायचीय - सरकारी इस्पितळ किंवा मिशनचे इस्पितळ. जर ती आजारी व्यक्ती सासू असेल तर सरकारी इस्पितळ; नाहीतर मिशनचे इस्पितळ! का? कारण पुन्हा येथे एक भावना असते की तेथील उपचार जरा अधिक चांगला असेल. मिशनच्या इस्पितळात कितीसे मिशनरी असतात? तीन, चार, पाच! उरलेले सगळे डॉक्टर, परिचारिका वॉर्डबॉय ही मंडळी हिंदू असतात. मात्र, मिशन इस्पितळात काम करणा-या वॉर्डबॉयमध्ये सरकारी इस्पितळातील वॉर्डबॉयचे काम करणाच्या भावापेक्षा जर अधिक समर्पणभावना असते. खालच्या स्तरापर्यंत समर्पणभावना झिरपणे हे फार महत्त्वाचे असते. आपण काहीतरी महान काम करीत आहोत अशी एक जाणीव त्या संघटनेत निर्माण होते. प्रत्येकाला त्याच्या नोकरीत महानपणा, गौरव हवा असतो. केवळ पगार, इतर भत्ते, सुखसुविधा मिळविणे हे कधीही पुरेसे नसते-त्याबरोबरच तेजोवलय, गौरव-महानपणा हवा असतो - ‘मी काहीतरी महान काम करणार आहे!' ही भावना हवी असते. जिथवर लोकांना ते काहीतरी महत्त्वाचे आणि महान असे काहीतरी करीत आहेत असे वाटते, तोवर त्यांना ‘जीवितकार्याविषयी जाणीव' मिळते.

 कोणतीही विख्यात औषध कंपनी घ्या. जर तुम्ही त्यांच्या उत्पादन विभागात गेलात तर तुम्हांला तेथे तुमच्या स्वयंपाकघरात असते त्यापेक्षा अधिक स्वच्छता दिसेल. ही स्वच्छता कोण ठेवतो, व्यवस्थापक नव्हे; तर झाडूवाला. तुम्ही सरकारी कार्यालयात जा, मुतारी कोठे आहे हे विचारण्याची तुम्हांला गरज नसते. भारतातील सर्व झाडूवाले एकाच समाजातून आलेत. त्यामुळे दोन झाडूवाले भाऊ किंवा शेजारी असू शकतील. मग ते दोन वेगळ्या प्रकारे काम का करतात?

 जेव्हा औषध कंपनीत झाडूवाला पहिल्यांदा कामावर येतो तेव्हा त्याचा वरिष्ठ अधिकारी त्याला बोलावून म्हणतो, “तुझी नोकरी फार महत्त्वाची आहे! जीवन आणि मृत्यूमधील फरक धुळीच्या, घाणीच्या एका कणासारखा असतो. उत्पादन विभागात किचित देखील धूळ, घाण असली तर ती अटळपणे सिरप, गोळ्या, कॅप्सुल, इंजेक्शने यांमध्ये जाईल आणि कुणाचा तरी मृत्यू होईल. अशा घाणीचा-धुळीचा एकही कण राहणार नाही हे पाहणं हे तुझं काम आहे." झाडूवाला विचार करतो, “माझं काम महत्त्वाचे आहे!" तो कारखान्यात येताच अॅप्रन चढवितो, हातमोजे घालतो, टोपी घालतो आणि प्रत्येक गोष्ट स्वच्छ ठेवू लागतो. सरकारी झाडूवाल्याचं काय होतं? तो नोकरीवर आल्याच्या पहिल्याच दिवशी त्याचा वरिष्ठ अधिकारी त्याला म्हणतो, "तुझी नोकरी ही चतुर्थ श्रेणीतील 'ड' गटाची आहे. आमच्याकडील सर्वात कमी महत्त्वाचे काम तुझे आहे." तो झाडूवाला म्हणतो, “माझे काम काही महत्त्वाचे नाही. मग मी ते करावं तरी का?"

 प्रत्येकाला अशी जाणीव करून दिली पाहिजे की त्याची नोकरी महत्त्वाची-काहीतरी महान आशयाची आहे! आफ्रिकेत भेटलेल्या एका जोमदार अशा युनिलिव्हर कंपनीच्या सेल्समनची मला आठवण होते. मी त्याला विचारलं, “तू काय करतोयस येथे?" तो म्हणाला, “साबण विकतोय." मी त्याला विचारलं, “तू साबण विकत असशील तर मग एवढा उडतोस कशासाठी?" तो म्हणाला, “साबण म्हणजे काय हे माहीत आहे तुम्हांला?" "नक्कीच साबण म्हणजे काय हे माहीत आहे मला." मी म्हणालो, "मी कित्येक वर्षे साबण वापरलेला आहे." तो म्हणाला, “तसं नव्हे. तुम्हाला खरोखरीच साबण म्हणजे काय हे माहीत नाही. साबणाचा दरडोई खप हा संस्कृतीचा निर्देशांक आहे! मी केवळ साबणच विकत नाही तर मी संस्कृती

विकतोय!" त्याचा खरंच यावर विश्वास होता. प्रत्येकाला तो काहीतरी महान काम करतो आहे असे वाटले पाहिजे.
 डॉ. कुरियन यांना विचारण्यात आलं होतं - “इतर सहकारी डेअरी अपयशी झाल्या असताना अमूल डेअरी एवढी यशस्वी का झालीय? शेवटी, प्रत्येक डेअरी दुधाचाच तर व्यवहार करते." यावर डॉ. कुरियन म्हणाले, “नाही. अमूल म्हणजे दूध नाही, चीज, चॉकोलेट किंवा लोणी नव्हे. अमूल आर्थिक-सामाजिक प्रयोग आहे. आम्ही काहीतरी महान काम करीत आहोत - आणंद हा जिल्हा संपूर्णपणे नव्या स्वरूपात घडविला जात आहे. जीवित कार्यावरील गाढ विश्वासामुळे असे लोक यशस्वी ठरतात." प्रत्येकाला स्वत:भोवती एक प्रकाशवलय-तेजोवलय हवे असते आणि ते प्राप्त करण्याचा मार्ग असतो जीवितकार्याविषयीची जाणीव.


कृतीची जाणीव

दुसरी बाब म्हणजे ‘कृतीची जाणीव' असणे. मला याच्या अगदी विरुद्धची, उलट असलेली बाब - ‘कृतिशून्यतेची जाणीव' म्हणजे काय हे स्पष्ट करावे लागेल. जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या एका मित्राला भेटण्यासाठी एका सरकारी कार्यालयात गेलो तेव्हा त्याच्या टेबलावर ‘अर्जट', 'खूप अर्जंट', 'तातडीचे', ‘खूपच तातडीचे' असे लेबल लिहिलेल्या फाईली पाहिल्या. मी म्हणालो, “माफ कर! मी चुकीच्या वेळी आलोय. मी तुला कधीतरी दुस-या वेळी भेटेन." तो म्हणाला, “का बुवा? बसरे, एक कप चहा घे." मी म्हणालो, “पण तू तर खूप कामात आहेस!" “हे कुणी सांगितलं तुला?" त्याने विचारलं. मी म्हणालो, “ ‘अर्जट', 'खूप अर्जंट', ‘तातडीचे', ‘खूप तातडीचे' असे या फायलींवर लिहिले आहे." तो म्हणाला की ही फक्त लेबलं आहेत! या फायली इथे गेल्या तीन आठवड्यापासून आहेत, त्याची एवढी काय चिंता करतोयस तू?" एक घोषवाक्य आहे ते म्हणजे :


आज करे सो कल कर, कल करे सो परसों।
जल्दी जल्दी क्या पडी है, अब जीना है बरसों।

 (आज करता येईल ते उद्या कर; उद्या करता येईल ते परवा कर; काय घाई आहे? आपण खूप जगणार आहोत!)


 त्या काळी मी बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होतो. अर्जंट' म्हणून ठळक अक्षरात लिहिलेले कागदपत्र आठवड्यात मला एकादवेळा मिळायचे. मला ‘अत्यंत अर्जट'

असं लिहिलेलं कागदपत्र कधीच मिळाले नाहीत. 'अत्यंत' हा शब्द लिहायची गरजच नसायची. एखादे ‘अर्जंट' लिहिलेले कागदपत्र मिळताच मी ते काम संपविल्याखेरीज उठत नसे आणि जर ते काम जमत नसेल तर मला ते कागदपत्र ज्या व्यक्तीने पाठविले असतील त्या व्यक्तीची भेट घेऊन ते काम का होऊ शकत नाही ते सांगायचो. तातडीने काम करायची जाणीव वा कृतीची जाणीव हे फार महत्त्वाचे आहे.

 सरकारी कार्यालय किंवा सार्वजनिक उद्योगात लोक नेहमी असं गृहीत धरतात की कृतीची जाणीव ही शक्य होणारी बाब नाही. काही वर्षांपूर्वी, मी धनबाद येथल्या एका सार्वजनिक उद्योगातील कंपनीत गेलो होतो. मी हावडाहून कल्का मेलने गेलो आणि मध्यरात्री धनबाद स्टेशनवर पोहोचलो. कंपनीकडून माझ्यासाठी गाडी येईल अशी माझी अपेक्षा होती. पण गाडी वगैरे काहीही नव्हती! स्टेशनबाहेर पाच-सहा मोटारगाड्या होत्या. रात्री धनबाद स्टेशनमध्ये खूप गाड्या येतात. मी विचार केला की त्या मोटारगाड्यांतील एक गाडी कंपनीची असेल - ड्रायव्हर झोपला असेल. मी एका ड्रायव्हरला जागे करून तो कंपनीचा ड्रायव्हर आहे का ते विचारलं. बिहारमध्ये, जेव्हा तुम्ही चुकीच्या ड्रायव्हरला अवेळी जागे करता तेव्हा तो तुमच्या पूर्वजांचा उद्धार करतो. असे काही अनुभव आल्यावर मी नाद सोडला. कंपनीच्या गेस्ट हाऊसकडे जायला एक टॅक्सी केली. सार्वजनिक उद्योग क्षेत्रात गेस्ट हाऊस ही फार गमतीची व्यवस्था असते. त्यांचं एकच असे गेस्ट हाऊस नसते - तर नेहमीचे गेस्ट हाऊस असते, व्हीआयपी गेस्ट हाऊस असते (महत्त्वाच्या व्यक्तींसाठी), व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस (अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी) असते. मला माझं गेस्ट हाऊस सापडेस्तोवर पहाटेचे दोन वाजले होते. मी तडक झोपायला गेलो. आठ वाजता प्रशिक्षण व्यवस्थापक भेटायला आला. तो म्हणाला, “मला अत्यंत वाईट वाटतंय. जो ड्रायव्हर स्टेशनला जाणार होता तो गेलाच नाही." मी विचारलं, “मग याबाबतीत काय करणार आहात तुम्ही?" “काय करू शकतो मी? सार्वजनिक क्षेत्र ना! तेही बिहारमध्ये!!! काहीच करू शकत नाही." मी म्हणालो, “कृपा करून त्या ड्रायव्हरला बोलवा." तो म्हणाला, “तुम्ही त्या ड्रायव्हरला काय सांगू शकणार? तुम्ही कंपनीतले अधिकारीही नाही आहात..." मी म्हणालो, “कृपया बोलवा त्याला." तो ड्रायव्हर आला. मी त्याला विचारलं, “नाव काय तुमचं?" तो म्हणाला, “तिवारी." मी म्हणालो, "तिवारीजी, मी काल मध्यरात्री धनबादला तुमचा पाहुणा म्हणून आलो आणि दोन वाजेपर्यंत मी धनबादमध्ये भटकत राहिलो! तुमच्या पाहुण्यांना तुम्ही अशी वागणूक देता?" तो म्हणाला, “साब, ये फिरसे नही होगा." दोन महिन्यानंतर मी पुन्हा तेथे गेलो - तो ड्रायव्हर हातात फलक घेऊन स्टेशनवर उभा होता. कृतीची जाणीव निर्माण करण्यासाठी नोकरीवरून निलंबित करण्याची धमकी देण्याची किंवा

‘कारणे दाखवा' नोटीस देण्याची गरज नसते. जेथे त्याच्या मनाला लागेल, अशा त्याच्या मर्मावर बोट ठेवल्यास पुरते.

 काही वर्षांपूर्वी व्यवस्थापनावर अति सोपे केलेले एक पुस्तक प्रसिद्ध झाले होते-एक मिनीट व्यवस्थापक (वन-मिनीट मॅनेजर)-त्या पुस्तकाने अर्थपूर्ण परंतु मजेशीर संदेश दिले होते. त्यानुसार, “एका मिनिटाच्या व्यवस्थापकाने एका मिनिटात कामाचा उद्देश समजावयास हवा. जर त्याच्या हाताखालच्या माणसाने ते काम व्यवस्थितपणे केले तर त्याला त्याने एका मिनिटात शाबासकी द्यायला हवी आणि व्यवस्थितपणे केलं नाही तर एका मिनिटात बजावून सांगायला हवे." व्यवस्थापक सर्वसाधारणपणे काय करतात ते आपण पाहू या. ब-याच वेळा व्यवस्थापक हाताखालील व्यक्तीला एकाच वेळी अनेक कामे देतो. एका हाताखालील व्यक्तीला पाच कामे देण्यात आली असतील, तर संध्याकाळी ती व्यक्ती येऊन म्हणते, “मी चार कामे पूर्ण केली आहेत - केवळ एकच उरलंय." यावर तो व्यवस्थापक काय म्हणतो? “ओह नो! ते पाचव काम तर आजच पूर्ण व्हायला हवं होतं. ती दुसरी चार कामे उद्या करता आली असती!" हे खरं तर त्या व्यवस्थापकाने त्या हाताखालच्या व्यक्तीला सकाळी सांगायला हवं होतं. ब-याच वेळा व्यवस्थापक इतक्या शब्दांत काम समजावून सांगतो की ती हाताखालील व्यक्ती पुरती गोंधळते. ‘एक मिनीट व्यवस्थापक' यात म्हटल्याप्रमाणे एकावेळी एकच काम द्यावे, तुमच्या हाताखालील व्यक्ती ते चांगल्या रीतीने करण्याची खूप शक्यता असते. जर त्याने ते काम व्यवस्थित रीतीने केले, तर त्याची एका मिनिटापुरती प्रशंसा करावी. प्रशंसा करायला व्यवस्थापक नेहमी विसरतात. काही वेळा त्यांना वाटतं की काम करण्यासाठी तर हाताखालच्या मंडळीला पगार मिळतो - मग प्रशंसा वगैरे कशासाठी? कधीकधी तर त्याला वाटतं की त्याने प्रशंसा केली तर हाताखालची व्यक्ती पगारवाढ किंवा बढतीची मागणी करील. त्यामुळे प्रशंसा करणे तो टाळतो. मात्र, जेव्हा बजावून सांगायची वेळ येते तेव्हा मात्र तो बरंच काही सुनावतो. मागे एकदा मी माझ्या बायकोला घरगड्याला बजावून सांगताना ऐकलं. त्याने काहीतरी चूक केली होती. ती म्हणाली, “तु आजच नाहीस; तर काल, गेल्या आठवड्यात तीनदा, गेल्या महिन्यात पाच वेळा ही चूक केली आहेस!" तो कामावर आल्याच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच तिने त्याला त्याच्या चुकांची भली मोठी यादी ऐकविली. शेवटी ती म्हणाली, “तुझी नाही - ही माझीच चूक! तुला ओळखून असताना मी तुला हे काम द्यायलाच नको होतं!" अशा बजावून सांगण्यान काय होतं हे तुम्ही पाहू शकता - असं एक लांबलचक बजावून सांगणं की, 'तू केलंस तेच केवळ चुकीचे नाही, तू स्वत:च चुकीचा माणूस आहेस.' मग या व्यक्तीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता फार कमी असते.

 जर आपल्याला 'कृतीची जाणीव' निर्माण करायची असेल तर आपल्याला एक मिनिटाचं काम, एक मिनिटाची प्रशंसा, एक मिनिटाचं बजावून सांगणं वापरायला हवं. सैन्यामध्ये हे घडताना मी पाहतो. जेव्हा एखादा सैनिक एखादे चांगले काम करतो, त्याचा कमांडर फक्त 'गुड शो' एवढे दोनच स्तुतिपर शब्द उच्चारतो, आणि काम चांगलं केलं नाही तर, 'बँड शो' एवढंच म्हणतो आणि जेव्हा तो ‘गुड शो' असं म्हणतो तेव्हा तो सैनिक थेट सप्तस्वर्गात असतो आणि जेव्हा तो 'बॅड शो' असं म्हणतो तेव्हा तो सैनिक त्या रात्री झोपत नाही!


निष्ठेची जाणीव

मात्र, सर्वात महत्त्वाची जाणीव म्हणजे ‘निष्ठेची जाणीव'. निष्ठा म्हणजे काय? अलीकडे एकदा मी एका टायपिस्टला सायक्लोस्टाइलिंग मशीन चालविताना पाहिलं. मी त्याला विचारलं, “तू येथे टायपिस्ट आहेस ना? तू हे सायक्लोस्टाइलिंग मशीन का चालवतोयस?" तो म्हणाला, “मी सायक्लोस्टाइलिंगसाठी या स्टेन्सील तयार केल्यात. आज सकाळी आमच्या सायक्लोस्टाइलिंग मशीन चालविणा-याचे वडील मरण पावले; त्यामुळे तो घरी गेला आहे. तो कधी येईल - दोन दिवसांनी, सात दिवसांनी की दहा दिवसांनी ते मला माहीत नाही. मी माझ्या वरिष्ठ अधिका-याकडे जाऊन त्याला ही परिस्थिती सांगितली. तो म्हणाला, “तुम्ही ती मशीन चालवून पाहायचा प्रयत्न कराल?" मी म्हणालो, “तुझ्या वरिष्ठ अधिका-याने तुला मशीन चालवायला सांगितले म्हणून तू मशीन का चालवतोयस? तू एक टायपिस्ट आहेस, तू का म्हणून हे मशीन चालवायला हवं?" तो म्हणाला, “या वरिष्ठ अधिका-याला मी 'नाही' म्हणू शकत नाही."

 मला खात्री वाटते की जर तुम्ही तुमच्या कारकिर्दीचे सिंहावलोकन केले तर तुम्हांला असं आढळून येईल की तुमचा असा एकतरी वरिष्ठ अधिकारी होता ज्याला तुम्ही 'नाही' म्हणू शकत नव्हता. असे का? हीच तर निष्ठेची जाणीव आहे. आपण ही जाणीव कशी मिळवू शकतो? मी असा एक वरिष्ठ अधिकारी पाहिला की ज्याने हाताखालच्या मंडळींची मोठी निष्ठा मिळविली आहे. मी त्याला विचारलं, “तुम्हांला एवढी निष्ठा कशी काय मिळते?" तो म्हणाला, “तुम्हांला प्राथमिक शाळेतील बालगाणी आठवतात?" मी म्हणालो, “हो, काही आठवतात." “तुम्हांला ‘मेरी हँड ए लिटल लॅम्ब' (मेरीकडे होते एक इवलेसे कोकरू) आठवतं?" त्याने विचारले.

 मी म्हणालो, “हो." त्याने विचारले, “ते कडवं काय होतं?"

 मी म्हणालो, “शेवटचं कडवं होतं,
‘कोकरू मेरीवर का करते प्रेम ।
विचारलं एका उत्सुक मुलाने ।
कारण मेरी करते त्यावर प्रेम ।
उत्तर दिले त्या शिक्षकाने ।

 "तेच ते." तो म्हणाला, “तुम्ही निष्ठा दाखवा. तुम्हांला उलटपक्षी निष्ठा मिळते."

 ‘निष्ठा देणे' यातून काय म्हणायचंय त्याला? मला २० वर्षांपूर्वीचा माझा एक अनुभव आठवतो. मी पहिल्यांदा विक्रम साराभाई अवकाश केंद्रात गेलो होतो. डॉ. वसंतराव गोवारीकर संचालक होते. मी तेथे पाहिलं की अवकाशशास्त्रज्ञ रोज (शनिवार-रविवारीही) सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत काम करताहेत. मला नेहमी जाचक प्रश्न विचारायला नेहमी आवडतं. मी त्यांना विचारलं, “तुम्ही रविवारी सुद्धा का काम करता? तुम्ही तर सरकारी नोकर. तुम्हांला रविवारी काम करायची गरज नाही." ते म्हणाले, “आमच्यापुढे दुसरा पर्याय नाही - आमचा वरिष्ठ अधिकारी कडक माणूस आहे." मी म्हणालो, “तो काय करू शकतो? तुम्हांला रविवारी काम न केल्याबद्दल कामावरून काढू शकतो?" (यांतील अनेक शास्त्रज्ञांकडे अमेरिकेतून नोक-यांसाठी आमंत्रणपत्रे होती - कोणत्याही दिवशी दहा पट पगारावर रूजू व्हा म्हणून सांगणारी) मी विचारलं, “तुम्ही कसली काळजी करताय?"ते म्हणाले, "तुम्हांला नाही समजणार ते!" त्यापैकी एकजण म्हणाला, “चार महिन्यांपूर्वी संचालकांनी आम्हांला एके रविवारी बोलावून काम द्यायला सुरुवात केली. मी म्हणालो, “सर, गेल्या चार महिन्यांपासून आम्ही आठवड्याचा प्रत्येक दिवस काम करीत आलो आहोत. आम्हांला कधीच ‘रजा' मिळालेली नाही. आज मी माझ्या मुलांना सहा वाजता कार्टून फिल्म पाहायला न्यायचं कबूल केलंय.' (व्हिडीओ येण्यापूर्वीचा तो काळ होता. तुम्हांला मुलांना चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात न्यावे लागे.) संचालक म्हणाले, 'ठीक आहे! पावणे सहापर्यंत काम संपवायला तुला कुणी अडविलंय - चित्रपट तर सहा वाजता आहे.' आता यावर तुम्ही काय वादविवाद करू शकणार?" त्याने काम सुरू केलं, काम संपविलं आणि घड्याळात पाहिलं - आठ वाजलेहेत! तो घराकडे धावला, दरवाजा उघडताच त्याने पाहिलं की त्याची बायको काहीतरी विणत बसली होती; मुलं कुठे आहेत असा प्रश्न विचारणं अशक्यच, बॉम्बचा फ्युज उडविण्यासारखंच आहे ते! बायकोने त्याच्याकडे पाहून विचारले,

"तुम्हांला भूक लागलीय?" काय बोलावं हे त्याला कळेना. 'हो' किंवा 'नाही' या दोनपैकी कुठच्याही उत्तराने त्याची पंचाईत होणार होती. ती म्हणाली, “तुम्हाला भूक लागली असेल तर लगेच जेवण वाढते मी. पण तुम्ही थांबू शकाल तर मुलांबरोबर जेवू

शकाल." यावर त्याने विचारलं, “मुलं कुठायत?" ती म्हणाली, “तुम्हांला माहीत नाही? तुमचे संचालक आले आणि त्यांनी सहा वाजता मुलांना कार्टून शो पाहायला नेलं." याला म्हणतात निष्ठा. संचालकांनी त्या शास्त्रज्ञाकडे पाहिलं. पावणेसहा होताहेत तरीही तो काम करतोय - तो काही आता घरी जाणार नाही. त्याने स्वत:शी म्हटलं, “या माणसाने त्याच्या मुलांना सहा वाजता कार्टूनशोला न्यायचं कबूल केलंय ना, ठीक आहे, मुलांना सहा वाजता कार्टून शो पाहायला मिळेल." तो त्याची गाडी काढतो, मुलांना घेऊन कार्टून शोला जातो. या संचालकाला प्रत्येकाच्या मुलांना कार्टून शोला न्यावे लागणार नाही. एकदा का निष्ठा स्थापन झाली की मग नाव होतं, इतरांमध्ये माहिती पसरते.

 दुस-याच्या मुलांना कार्टून शोला नेणं किंवा यासारखं काही करणं हे काही असाधारण काम नाही. वरिष्ठ अधिकारी हाताखालच्या व्यक्तीला बोलावून म्हणतो, "मी जरा एका कामात गुंतलोय. तू जर मोकळा असशील तर जरा हे एवढं काम करशील माझ्यासाठी?" नक्कीच, ती हाताखालची व्यक्ती मोकळा वेळ काढील. हे बरोबरीने काम करणारा सहकारीही करील. जर त्याला फोन करून सांगितलं, "कृपया एवढं करशील माझ्यासाठी?" नेहमीच देवाणघेवाण हा प्रकार असतो. पण हाताखालची व्यक्ती त्याच्या वरिष्ठ अधिका-याला विचारू शकत नाही, “तुम्हांला मोकळा वेळ आहे? एवढं जरा कराल माझ्यासाठी?" येथे वरिष्ठ अधिका-याने पुढाकार घ्यायला हवा. जर वरिष्ठ अधिकारी पुढाकार घ्यायला तयार असेल तर निष्ठेची स्थापना होते. खरं तर माझ्या अनुभवावरून मी असं म्हणेन : जर तुम्ही तुमच्या वरिष्ठासाठी काही केलंत, तर तो दस-या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत विसरण्याची शक्यता असते; पण जर तुम्ही तुमच्या हाताखाली काम करणा-या व्यक्तीसाठी काही केलंत तर तो ते कित्येक वर्षे स्मरणात ठेवायची शक्यता असते.

 माझा एक वैयक्तिक अनुभव आहे. जेव्हा मी कलकत्त्याला होतो तेव्हा माझ्या हाताखाली काम करणारा एकजण मुंबईहन लग्न करून कलकत्त्याला आला. एका

सहा वाजता मला त्याचा फोन आला की त्याच्या घरी घरफोडी झालीय. कुणीतरी कुलूप तोडून आत प्रवेश करून टंक उघडून त्यातील हजारो रुपयाचे दागिने लंपास केले. तो म्हणाला की त्याने पोलिसांना फोन केला होता; पण काहीच हालचाल नाहा; बहुधा हे तो तेथला स्थानिक नसल्याने असं घडलं असावं. खरं तर मी स्वतः तथला स्थानिक नव्हतो. पण माझा घरमालक बंगाली होता आणि आमच्या भागात त्याचं खूप वजन होतं. मी त्याच्याकडे जाऊन त्याला कारमध्ये कोंबून पोलीसस्टेशनात गेलो. पोलीस सबइन्स्पेक्टरला घेऊन तेथून माझ्या हाताखाली काम करणाऱ्या त्या गृहस्थाच्या घरी गेलो. आमच्या पाठोपाठ पोलिसांची जीप येत होती. आम्ही तेथे

पोहोचल्यावर पोलिसांनी काही हातांचे ठसे घेतले. मी लवकरच ही घटना विसरून गेलो - कारण ते दागिने शेवटी सापडलेच नाहीत. कित्येक वर्षांनंतर, जेव्हा मी आणि माझ्या हाताखाली काम करणारा तो गृहस्थ निरनिराळ्या कंपनीसाठी काम करीत होतो तेव्हा कुणीतरी येऊन मला म्हटलं, “मी पूर्वी तुमच्या हाताखाली काम करणा-या माणसाला भेटलो होतो. तो म्हणाला की तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलंय.” मी म्हणालो, “मी त्याच्यासाठी खूप काही केलंय? मला नाही आठवत.” तो म्हणाला, "त्याच्या घरी घरफोडी होऊन दागिने चोरीला गेले होते तेव्हा." यानंतर माझ्या लक्षात आलं. जरी त्या माणसाला दागिने मिळाले नसले तरीही मी त्याच्यासाठी काहीतरी केलं. तो लग्न करून आला होता. चोरीला गेलेले दागिने त्याच्या बायकोचे होते; त्याचे नव्हते. बायको नवच्याकडे पाहाते : तो पोलिसांना फोन करतो - काहीच घडत नाही. ती मनात म्हणते - काय नवरा आहे हा माझा! आणि नंतर तो नवरा त्याच्या वरिष्ठ अधिका-याला फोन करतो आणि दहा मिनिटांत तो वरिष्ठ अधिकारी पोलिसांना घेऊन येतो. ती म्हणते, “छान! माझा नवरा कुणीतरी आहे!" मी त्याला त्याचे दागिने परत दिले नाहीत; पण त्याची इभ्रत राखली आणि हे फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे दहा वर्षांनंतरही तो माझी आठवण काढतो. याप्रकारे निष्ठा प्राप्त होते.
 जर तुम्ही ही जीवितकार्याची जाणीव, कृतीची जाणीव, निष्ठेची जाणीव मिळवू शकलात तर यश आपोआप मिळतं. उर्दूमध्ये एक शेर आहे.


संभल कर पाँव रखते है
कमर बल खा ही जाती है
आँखे जब चार होती है
मुहब्बत होही जाती है
नजाकत नाजनीनों के
बनानेसे नहीं बनती
खुदा जब हुस्न देता है}
नजाकत आही जाती है।
(ती पाऊल टाकते मोठ्या काळजीपूर्वक,
पण तिची अरुंद कंबर लचकते आपणहून,
जेव्हा नजर भिडते नजरेला
प्रेम उगवतं आपणहून.
नाजूकपणा नाही निर्माण केला जात
नाजूक असलेल्यांकडून

व्यवस्थापनाची मूलतत्त्वे

शरू रांगणेकर

शरू रांगणेकर हे 'इन द वण्डरलॅण्ड ऑफ इंडियन मॅनेजर्स' या सुप्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचे लेखक. 'इन द वल्र्ड ऑफ कॉर्पोरेट मॅनेजर्स' या आणखी एका पुस्तकात त्यांनी भारतातील व्यवस्थापकीय परिस्थितीचे उत्कृष्ट विश्लेषण सादर केले आहे. त्याच पुस्तकाचा हा मराठी अनुवाद.
 हे पुस्तक सर्व स्तरांवरील व्यवस्थापकांसाठी आहे—व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थीपासून ते व्यवस्थापकीय संचालकांपर्यंत! नेहमीच्या व्यवस्थापकीय समस्यांवरील उपाय यात दिले आहेत आणि विविध प्रकारच्या परिस्थितीची चिकित्सा करून त्यांच्याशी सामना करण्याचे मार्ग थोडक्यात सुचविले आहेत. लेखकाची हलकीफुलकी लेखनशैली, त्याचा मिस्किल विनोद आणि आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे... या सर्वांनी या पुस्तकाचे मोल वृद्धिंगत केलेले आहे.
 शरू रांगणेकर हे व्यवस्थापन व्यवसायातील त्यांच्या योगदानासाठी नावाजलेले आहेत. शिक्षण आणि प्रशिक्षणासाठीही ते प्रख्यात आहेत. मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनिअर आणि अमेरिकन युनिव्हर्सिटीमधून एमबीए या पदव्या घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील पिट्सबर्ग येथील कार्नेगी- मेलन विद्यापीठात संशोधनकार्य केले.
 इंग्लंडमधील आयसीआय या कंपनीमध्ये त्यांनी त्यांचे व्यवस्थापकीय प्रशिक्षण घेतले; तर अमेरिकेतील आयबीएम आणि युनियन कार्बाइड या कंपन्यांमध्ये कॉम्प्युटरचे प्रशिक्षण घेतले. इबकॉन, आयसीआय, युनियन कार्बाइड या कंपन्यांमध्ये त्यांनी उच्च पदावर काम केल्यानंतर ते सर्ल (इंडिया)मध्ये कार्यकारी संचालक झाले. एकंदर २८ वर्ष व्यवस्थापन क्षेत्रात काढल्यानंतर त्यांनी व्यवस्थापन शिक्षण आणि प्रशिक्षणाला वाहून घेण्यासाठी मुदतपूर्व निवृत्ती पत्करली.
 शरू रांगणेकर हे व्यवस्थापनावरील प्रसिद्ध व्याख्याते, प्रशिक्षक आणि लेखक आहेत. त्यांच्या व्यवस्थापन शास्त्रावरील ध्वनिफिती आणि चित्रफिती हजाराहून अधिक संघटनांमध्ये वापरल्या जातात.किंमत १५0 रुपये


रांगणेकर असोशिएटस्

३१, नीलांबर, ३७ जी. देशमुख मार्ग

मुंबई ४०० ०२६