व्यवस्थापनाची मूलतत्त्वे/निगम-नियोजन

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

प्रकरण १२

निगम-नियोजन

निगमांचा (कॉर्पोरेशन्स) इतिहास हा राष्ट्रांच्या इतिहासाइतकाच थरारक असू शकतो. त्यात थक्क करणारे धक्कादायक चढउतार, देदीप्यमान यश आणि भीषण विनाश असतात.

 गेल्या पिढीतील भारतीय उद्योगाचा विचार करा. मार्टिन बर्न, जेसॉप, इ. सारख्या बड्या उद्योगांनी धूळ चाखली, तर दोन पिढ्या अगोदर पूर्णपणे अज्ञात असलेले लार्सन अॅण्ड टुब्रोसारखे निगम काही लाखांच्या उलाढालीवरून हजारो कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचले आहेत. रिलायन्स टेक्सटाइल्ससारख्या कंपन्या ज्या काही दशकापूर्वी अस्तित्वातही नव्हत्या त्या जणू एका रात्रीत वर झेपावल्या आहेत आणि सिंथेटिक्स अॅण्ड केमिकल्स किंवा पॉलिस्टील्स सारख्या खूप आशा दाखविणाच्या होतकरू कंपन्या मरगळून पडल्या आहेत. आणि तरीही, या सगळ्या उलथापालथीमध्ये, हिंदुस्थान लीव्हरसारखी कंपनी विकासवाढीचा उच्च आलेख टिकविण्यात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. सबबी नेहमीच उपलब्ध असतात. ज्यांना सरकारी धोरणांवर ठपका ठेवायचा आहे किंवा श्रेय द्यायचं आहे, कामगारसंघर्षावर टीका करायची आहे, मूलभूत सोयींच्या अभावाला दोष द्यायचा आहे, ते तसे कधीही, नेहमी करू शकतात. नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला कळतं की प्रत्येक बाबींतला निर्णायक घटक आहे तो म्हणजे निगम नियोजन (धोरण-आखणी) प्रक्रिया.

 नियोजनाविषयीचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा भारतीय व्यवस्थापकांमध्ये काहीसा नकारात्मक आहे. त्यांना वाटतं की 'भारताच्या संदर्भात' दीर्घकालीन नियोजन अवास्तव आहे. पुढल्या क्षणी वीजपुरवठा अखंड राहील की खंडित होईल, कामगार काम सुरू ठेवतील की नाही किंवा सरकारी धोरण उद्योगविस्तार करू देईल की नाही त्याची आपल्याला खात्री नसते. तरीही काही व्यवस्थापकांनी या अशा अनिश्चिततेच्या परिस्थितीतही त्यांच्या यशाचे सुनियोजन करून त्याची अंमलबजावणीही केली आहे.

 काही व्यवस्थापकांची तक्रार असते की भविष्याची चिंता करायलाही वेळ नाही इतके ते कामात गुंतलेले असतात. आजच्या कामाच्या गरजा कशाबशा भागवायला ते समर्थ होत आहेत. त्यामुळे उद्यासाठी, भविष्यासाठी नियोजन करायला त्यांना वेळ

हवा आहे. उत्पन्न काहीही असो, चाणाक्ष व्यक्ती सगळी कमाई एकाचवेळी खर्च करीत नाही, भविष्यकालीन गरजांसाठी तो त्यातला थोडासा तरी भाग गुंतवितो. याचप्रमाणे व्यवस्थापकाने त्याचा सगळा वेळ आजच्याच समस्यांसाठी खर्च न करता त्यातला थोडासा तरी वेळ भविष्यकाळाविषयी विचार करण्यासाठी आणि त्याच्याशी जमवून घेण्यासाठीची धोरणे ठरविण्यासाठी गुंतवायलाच हवा. खरं तर, निगम नियोजन म्हणजे अचूकपणे भविष्य वर्तविणे नव्हे; उद्याच्या अपेक्षित संधी आणि समस्यांचा मुकाबला करण्यासाठी आज उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा वापर करणे होय.

 या प्रक्रियेला निगम नियोजन, दीर्घकालीन नियोजन, डावपेचांविषयीचे नियोजन आणि भविष्यकालीन नियोजन अशी विविध नावे दिली आहेत. मात्र ही नियोजन प्रक्रिया वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्याहून वेगळी आहे. वार्षिक अंदाजपत्रक आवश्यकरीत्या बारा महिन्यांपुरतेच असते. निगम नियोजन पुढील तीन ते दहा वर्षांच्या कालावधीपुरता असते आणि हा कालावधी त्या त्या उद्योगावर अवलंबून असतो.


तर्कशास्त्र व अंतर्ज्ञान यांची भूमिका

यश तसेच अपयशातील निगम नियोजन धोरणाचे विश्लेषण केले तर आपल्याला त्यात मजेशीर वाटतील असा तर्कशास्त्र आणि अंतर्ज्ञान यांचा आंतरखेळ जाणवेल. साधारणपणे, 'व्यावसायिक' व्यवस्थापक हे तर्कशास्त्राच्या बळावर विश्वास ठेवतात. त्यांचे शिक्षण आणि प्रशिक्षण हे तर्काधिष्ठित असते. त्यांचा यावर विश्वास बसविलेला असतो की पुरेशी माहिती मिळवून आणि तर्कशुद्ध विश्लेषण करून उत्तम निर्णय आणि यश मिळविता येते. कनिष्ठ आणि मध्यम पातळीवर काम करतानाचा त्यांचा वैयक्तिक अनुभव हा विश्वास दृढ करतो. यातील बहुतेक मंडळी जेथे निगम नियोजनासाठी जबाबदार असावे लागते अशा वरिष्ठ आणि उच्च व्यवस्थापन पातळीला गेल्यावरही तर्कशास्त्रावरील त्यांची संपूर्ण श्रद्धा सोडायला तयार नसतात.

 निगम नियोजनात तर्कशास्त्र आणि अंतर्ज्ञान या दोहोंचा समावेश होतो - वाहतूक सेवेसाठी विमाने घेणाऱ्या विमान कंपनीचे उदाहरण घ्या.

 विमानांच्या निवडीतील घटक म्हणजे :

 १. वाहतूकवाढ

 २. इंधनाची किंमत - विशेषकरून इंधनाच्या किंमतीतील अपेक्षित वाढ.

 चालू गरजांनुसार मोजक्या विमानांपर्यंत निवड कमी करणे शक्य आहे. मात्र, त्यानंतरची निवड ही वाहतूक क्षमतेच्या आगामी वर्षांतील वापरावर (हवाई

वाहतुकीतील अपेक्षित वाढीवर आधारित) आणि इंधनाच्या किंमतीवर अवलंबून असते. या दोन्ही घटकांविषयी अनुमान काढणे आवश्यक आहे—अंतर्ज्ञानाच्या मदतीने. याप्रकारे, अंतिम निर्णय हा तर्कशास्त्रापेक्षा अंतर्ज्ञानावरच जास्त आधारित असतो.
 उपक्रमशील व्यवस्थापकांना याची जाणीव असते आणि अंतर्ज्ञानाचा उपयोग करून डावपेचात्मक निर्णय घेणे सोपे असल्याचे त्यांना आढळते. मात्र, त्यांतील काही मंडळी हा धडा एवढा काही मनाला लावून घेतात की ते चालू निर्णय क्षेत्रात तर्कशास्त्राने अधिक विश्वसनीय उत्तरे सापडू शकत असतानाही अंतर्ज्ञानाने निर्णय घेतात.
 तर्कशास्त्र आणि अंतर्ज्ञानाच्या विभिन्न वापराने आपल्याला निगम नियोजनाचे विविध मार्ग सापडू शकतात.

निगम नियोजन चौकट

अ) ही निगम नियोजनाची चौकट तर्कशास्त्र आणि अंतर्ज्ञान यांच्या विविध जोड्या दर्शवितात :


तर्कशास्त्र

 अ(१,१) धोरण : या परिस्थितीत व्यवस्थापनाकडे कोणतेही निगम नियोजन धोरण असत नाही आणि ते तर्कशास्त्र किंवा अंतर्ज्ञानाचा उपयोग करीत नाही. दीर्घकालीन निगम नियोजनाचा पूर्णतः अभाव असतो आणि जरी निगम नियोजनाचा प्रयत्न झाला तरीही तो केवळ आकडेमोडीचा प्रयत्न ठरतो आणि त्यावर कुणीही विश्वास ठेवीत नाही. संघटनेची वाटचाल दैनंदिन चालत राहाते आणि बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काहीही प्रयास केले नसल्याने संघटना आजारी पडते. सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील बहुतेक आजारी कारखाने या (१,१) धोरणाचे बळी असतात.

 (ब) (१,९) धोरण : अंतर्ज्ञानावर फार मोठ्या प्रमाणावर आधारलेल्या या धोरणाने एकतर देदीप्यमान यश मिळते किंवा दारुण अपयश पदरात पडते. पहिल्या पिढीतील बरेचसे उद्योजक त्यांना त्यांच्या अंतर्ज्ञानाने आजवरचे यश मिळवून दिल्याने या धोरणाचा उपयोग करतात. उद्योग जेव्हा लहान असतो तेव्हा हे धोरण अपरिहार्य ठरते. कारण उद्योगाकडे माहिती मिळवायचे आणि त्याचे विश्लेषण करायचेही सामर्थ्य नसते. मात्र, उद्योगाचा विकास झाल्यानंतरही - म्हणजे माहिती मिळविणे आणि त्याच्या विश्लेषणासाठी तज्ज्ञांची मदत घेणे परवडणारे असूनही त्याचं धोरण हे अंतर्ज्ञानावर आधारित राहतं. काही वेळा माहिती मिळवून त्याचे विश्लेषण करण्यावर खर्च केला जातो पण प्रत्यक्षात निर्णय घेताना मात्र त्याचा विचार केला जात नाही.

 (क) (९,१) धोरण : हे बहुतांशी तर्काधिष्ठित धोरण असते. जोखीम पत्करायला नकार देते. गुंतवणुकीबाबतच्या निर्णयांविषयी व्यवस्थापन अगदी शेवटच्या क्षणी माघार घेते. तर्कशास्त्र केवळ एकट्याने उत्तर देऊ शकत नाही आणि व्यवस्थापन अंतर्ज्ञानाचा उपयोग करायला तयार नसते. त्यामुळे वित्त-गुंतवणूक आणि जोखमीविषयीची सुधारित अनुमाने यांच्या मदतीने अधिकाधिक विश्लेषण केले जाते. हे केले जाते ते व्यवस्थापनाच्या झेप घेण्याच्या, उडी घेण्याच्या असमर्थतेनंतर पांघरूण घालण्यासाठी. अशा रीतीने विश्लेषण-विश्लेषण करता पक्षघात होतो.

 (ड) (५,५) धोरण : हे तडजोडीचे धोरण असते. यात व्यवस्थापन मोठी गुंतवणूक करून कमी जोखमीच्या, मध्यम विकासवाढ देणा-या, कमी गुंतवणुकीला चिकटून राहते; पण यात व्यवस्थापन महत्त्वाच्या सर्व संधी गमावून बसते. कंपनी तिच्या उद्योगक्षेत्राच्या विकासवाढीच्या दराइतक्या किंवा त्याहून कमी दराने वाढत राहते आणि हळूहळू बाजारपेठेतील स्थान गमाविते.

 (इ) (९,९) धोरण : हे उच्च तर्कशास्त्र, उच्च अंतर्ज्ञान असे धोरण आहे. विविध प्रकारच्या विभिन्न प्रकल्पांच्या कल्पना लढविण्यासाठी अंतर्ज्ञानाचा उपयोग केला जातो. उपलब्ध संधी आणि संभाव्य धोके समजण्यासाठी सर्व संभाव्य व्यवस्थापन तंत्रांचा वापर करून ह्या कल्पित प्रकल्पांचे तर्काधिष्ठित विश्लेषण केले जाते. मनोवेधक वाटलेल्या प्रकल्पांची निवड या प्रक्रियेने मर्यादित होते. त्यानंतर, सतत मुख्य

प्रकल्पांची धाडसी निवड करण्यात अंतर्ज्ञान पुन्हा एक भूमिका बजावते आणि यातून उच्च विकासवाढीच्या दराची निष्पत्ती होते.

 निगम नियोजनाची ही चौकट आपल्याला खाजगी क्षेत्रातील हिंदुस्थान लिव्हर आणि लार्सन अॅण्ड टुब्रो किंवा सार्वजनिक क्षेत्रातील एन.टी.पी.सी. किंवा ‘भेल'सारख्या (९,९) धोरण असणा-या म्हणजे उच्च तर्कशास्त्र आणि उच्च अंतर्ज्ञान–उद्योगांच्या यशाच्या अंतरंगाचे यथार्थ दर्शन घडविते. अगदी एकाच व्यवस्थापन गटातील टेल्को कंपनीने (९,९) धोरणाद्वारे टिस्को या (५,५) धोरणाला चिकटलेल्या कंपनीला मागे टाकले. (१,९) हे धोरण अंगीकारणाच्या रिलायन्स टेक्सटाइल्स कंपनीचे भव्यदिव्य स्पृहणीय यश आणि सिंथेटिक्स अॅण्ड केमिकल्स कंपनीचे दारुण अपयश आपण समजू शकतो. आजारी उद्योगाच्या बाबतीत आपणाला (१,१) धोरणाद्वारे नकारात्मक कामगिरी दिसते. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या (९,१) धोरण अंगीकारण्यानेच-म्हणजे उच्च तर्कशास्त्र आणि कमी अंतर्ज्ञान-त्यांच्या पूर्ण संभाव्य विकासाला पोचलेल्या नाहीत.

निगम नियोजनाची प्रक्रिया

निगम नियोजनाचे धोरण निश्चित केल्यानंतर व्यवस्थापकाला निगम नियोजनाच्या प्रक्रियेनुसार जावे लागते. पहिली पायरी म्हणजे 'साकसंधो' विश्लेषण करणे - म्हणजे, सामर्थ्य, कमजोरी, संधी आणि धोके यांचे विश्लेषण. एखाद्या संघटनेसाठी तिचे वित्तीय आणि मनुष्यबळ - म्हणजे पैशाची आणि तंत्रकुशल कामगारांची उपलब्धता हे सामर्थ्य असू शकते. यामुळे कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या भांडवलप्रधान उद्योगात विस्तार किंवा विविधीकरण करू शकते.

 इतर वरकडखर्च आणि कामगारवेतन ही बाब कमजोरीची असू शकते - म्हणजेच कंपनीने कामगारप्रधान तंत्रज्ञानापासून दूर राहायला हवे. अशा कंपनीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता (आधुनिक तंत्रज्ञानात शिरकाव करायची संधी) ही मोठी संधी असू शकते आणि तीव्र स्वरूपाच्या किंमतीविषयीची स्पर्धा हा धोका असू शकतो.

 निगम नियोजन प्रक्रियेतील दुसरी पायरी म्हणजे पर्यायी धोरणे ओळखून त्यांचे मूल्यमापन करणे–जेणेकरून सामर्थ्य आणि संधींचा उपयोग करता येईल आणि कमजोरी आणि धोक्यांचा मुकाबला करता येईल. काही नमुनेदार धोरणे उपलब्ध आहेत ती अशी :

 १. उत्पादनांचे परिष्करण,

 २. नव्या तंत्रज्ञानांमध्ये विविधीकरण करणे,

 ३. स्थळांचे विविधीकरण करणे,

 ४. क्षमता वाढविण्यासाठी विस्तार करणे,

 ५. बाजारपेठ वाढविण्यासाठी विस्तार करणे.

 निगम नियोजनातील तिसरी पायरी म्हणजे अंमलबजावणीची योजना आखणे. अंमलबजावणीसाठी अग्रक्रम धोरणे निवडली जातात. शेवटी, पुढील काळासाठी नियोजन करणे म्हणजे उद्यासाठी आजची साधनसंपत्ती घेऊन काम करणे. विक्रीविभाग, आस्थापना-विभाग, वित्त-विभाग, उत्पादन-विभाग, सामग्री-विभाग यांसारख्या अत्यावश्यक क्षेत्रांसाठी कृतीयोजना तयार करायला हव्यात आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या जबाबदारीची वाटणी करायला हवी.

 निगम नियोजनातील चौथी आणि शेवटची पायरी म्हणजे कामगिरीवर लक्ष ठेवणे आणि आढावा घेऊन अद्ययावत करणे. यामध्ये प्रत्येक योजनेचा ठराविक काळाने आढावा आणि अगदी अलीकडच्या ताज्या माहितीनुसार योजनेमध्ये फेरबदल करणे यांचा अंतर्भाव होतो.

 प्रत्यक्ष निगम नियोजनात व्यवस्थापकाला काही अडचणींना तोंड द्यावे लागते :

 १. वातावरण, परिस्थिती अपेक्षा केल्यापेक्षा वेगळी असू शकते : अंदाज बांधणी हे काही अचूक विज्ञान नाही आणि अशा वर्तविलेल्या अंदाजांवर आधारित योजना अयशस्वी होण्याची शक्यता असते. सरकारी कारवाई, अर्थव्यवस्थेतील मंदी, कामगार संघटनेची विपरीत कारवाई, मोठ्या स्पर्धेमुळे अचानक किंमती कमी होणे यांसारख्या अनपेक्षित घटना घडू शकतात - या अनिश्चित बाबींमुळे नियोजन करणे अवघड होते.

 २. अंतर्गत विरोध : औपचारिक स्वरूपाच्या नियोजन व्यवस्थेच्या प्रारंभातून नियोजनाला विरोध करण्याकडे झुकणाच्या कलुषित कल्पना उदयाला येतात आणि त्या परिणामकारक नियोजनाला बाधा आणू शकतात. मोठ्या संघटनांमध्य, जुन्या कार्यपद्धती, जुनी साधने आणि पद्धती एवढ्या खोलवर रुजलेल्या असतात की त्या बदलणे अवघड असते. कंपनी जितकी मोठी होत जाते, तितकी समस्याही मोठी होत जाते.

 ३. नियोजन हे खर्चिक असते आणि त्यासाठी दुर्मिळ बुद्धिवंतांची गरज अस मध्यम आकारमानाच्या कंपनीच्याही निगम नियोजनासाठी मोठे प्रयास कराव लागतात. अनेक व्यवस्थापकांचा पुष्कळ वेळ खर्च होतो आणि विशेष कामासाठी आणि माहितीसाठी मोठा खर्च येतो. नियोजन हे खर्चिक, महागडे असल्याने व्यवस्थापकाने सतत खर्च-लाभाचा मापदंड नियोजनाच्या संपूर्ण प्रक्रियेत वापरायलाच हवा.

 ४. नियोजन हे कठोर मेहनतीचे काम आहे. नियोजनासाठी उच्च दर्जाची कल्पनाशक्ती, चिकित्सकवृत्ती, सृजनशीलता आणि उच्च मनोध्येय लागते-कृतीयोजना निवडून त्याच्याशी सामीलीकरणाच्या भावनेने स्वत:ला जोडण्यासाठी. प्रथम दर्जाच्या नियोजनासाठी आवश्यक असलेले बुद्धिवंत पुरेसे उपलब्ध नसतात म्हणून व्यवस्थापकाने त्याचे स्वत:चे नियोजन-सामर्थ्य सुधारण्याचे मार्ग सतत शोधायलाच हवेत.
 ५. प्रचलित संकट : निगम नियोजनाची रचना ही कंपनीला अचानक उद्भवलेल्या सध्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केलेली नसते. जर एखादी कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर असेल तर नियोजनावर खर्च केला जाणारा वेळ सध्याच्या अल्पकालीन संकटावर मात करण्यासाठी खर्च करायला हवा. मात्र, कंपनीने त्या संकटावर मात केल्यावर निगम नियोजनाने असेच संकट भविष्यात उद्भवू नये म्हणून काळजी घेण्यास सुरुवात करायला हवी.

निष्कर्ष

संघटनेच्या दीर्घकालीन यशासाठी निगम नियोजनाची संकल्पना अत्यावश्यक व महत्त्वपूर्ण आहे.
 नियोजनाच्या ह्या प्रक्रियेत ‘साकसंधो विश्लेषण-म्हणजे सामर्थ्य, कमजोरी, संधी आणि धोके याचे विश्लेषण असते.
 हे विश्लेषण संधी आणि सामर्थ्याचा उपयोग करण्यासाठी आणि कमजोरी व धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी मार्गदर्शन करते. विश्लेषण आणि मूल्यमापन केलेल्या धोरणांपैकी, अग्रक्रमाची धोरणे तर्कशास्त्र आणि अंतर्ज्ञान वापरून अंमलबजावणीची योजना तयार करण्यासाठी निवडली जातात.
 या तपशीलवार असलेल्या योजनेवर लक्ष ठेवावे लागते आणि निगम नियोजनाचं वास्तवात रूपांतर करण्यासाठी ठराविक काळानंतर ते अद्ययावत करावे लागते.
 निगम नियोजन प्रक्रियेत काही स्वत:च्या अडचणी असतात. परंतु नियोजन प्रक्रिया यशस्वी होण्याकरिता व्यवस्थापकाला त्यावर मात करावी लागते. अखेरीस जेव्हा काम करणे अवघड होते तेव्हा अवघड गोष्टीच काम करू लागतात तेव्हा तो अवघडपणाच सुलभ वाटू लागतो.

* * *