Jump to content

वेंकटेशप्रार्थना

विकिस्रोत कडून

श्रीशेषाद्रिनिवासा ! वेंकटनाथा ! तुला असो नमन. बहु भक्तांचें झालें मुदित, तव पदांबुजीं वसोन, मन. १ नमितों त्वच्चरण, सदा दासांच्या पावतात नवसा जे. श्रीगोविंदा ! यांचा महिमा विश्वांत नित्य नव साजे. २ भक्त चतुर्विधहि तुझे सुकृती श्रीवेंकटेश्वरा ! धन्य. संसारांत श्रमति, भ्रमति, प्राणी अभक्त जे अन्य. ३ प्रभु ! तूं करिसी, मानुनि नत शूद्रहि विप्रसा, दया त्रात्या ! श्रीशा ! न घडेचि तुझी, जो कोणी विप्रसाद, यात्रा त्या. ४ मात्रा भवरोगाची घडली ज्या माधवा ! तुझी यात्रा पात्रा पुण्ययशाच्या तीर्थें सत्तीर्थ म्हणति त्या गात्रा. ५ यश संपादिति, तुज जे भक्त वहाताति कानगी, ते तें, जें मेळविति ज्ञानें अर्पुनि मुख, चित्त, कान, गीतेतें. ६ धर्मार्थकाममोक्षप्रद होय तव प्रसाद जगदाद्या ! सत्य, मनोहर ‘ अन्या मात्रा ’ म्हणती सुबुद्धि ‘ न गदा द्या. ’ ७ तो धन्य, अन्य न तसा प्राणी, श्रीपादरेणु जो पावे; जेणें विधिनें लिहिले भाळीं दुर्वर्ण सर्व लोपावे. ८ चिंतिति चित्तीं तुझिया जे भावें नित्य पादराजीवां, वरिती, स्वयंवरवधू तेंवि, तयां मुक्ति सादरा जीवां. ९ तापत्रयार्त होवुनि, गेला तुज शरण भक्त जो भावें, श्रीशा ! स्वसमचि केला तो; यश विश्वीं तुझेंचि शोभावें. १० तूं जागरूक असतां, संसारभयें कशास कांपावें ? नारायणा म्हणावें, इतरा वर्णुनि यशास कां, पावें ? ११ साधु म्हणति, ‘ रे ! जन हो ! मागें, न करूनि पाठ वाद, सरा. जा कीं शेषनगींचा श्रीपतिभक्तांत आठवा दसरा. ’ १२ ‘ अजि ’ म्हणति, म्हणत होते जन ज्या देवा ! रमानिवासा ! रे ! हें किति ? सुर वदति ‘ अजितदासा सेवा, रमा, निवा सारे. ’ १३ पाहे तुझा रथोत्सव जो, सादर रथगुणासि आकर्षी, नाकीं तद्यश गातो त्याच्या पूर्वजसभेंत नाकर्षी. १४ वानरहि तव रथोत्सव सादर अवलोकितात; बहुधा, तो वेष तसा घेउनि, सुरपति येतो; या सुखेंचि बहु धातो. १५ तुज निर्निमेष होवुनि, सादर जोडूनि हस्त, जो पाहे, त्वद्रूपचि तो होतो, फ़ळ कोणा दर्शनीं असें आहे ? १६ देवा ! तव प्रसादांतिल मार्गप्राप्त सीत जो खातो, कवि म्हणति, ‘ ज्वलनासीं स्पष्ट, न होवूनि भीत, जोखा तो. ’ १७ त्वच्चरण त्यजुनि, मन श्रीशा ! विषयीं कधीं न रातो बा ! यमशक्रपूज्य तो, ज्या द्वारीं तुझिया बसे नरा तोबा. १८ अर्पिति नैवेद्य तुज प्रेमभरें चिंच, तिखट, तेलगट; सत्तेनें वैकुंठीं शिरति, द्वारीं करूनि ते लगट. १९ अवगाहिली जनें ज्या जगदीशा ! स्वामि ! पूर्वपुष्करिणी, श्री त्यासि वश सदाही, जेंवि महामात्रपतिस दुष्करिणी. २० क्षिति उद्धरूनि, धरिली करुणा बरवि प्रजासमुद्धारा. पुण्य यश तुझें, पावति, गावुनि वरविप्र ज्यास, मुद्धारा. २१ आज्ञापुनि गरुडातें, वैकुंठींचा गिरींद्र हा देवा ! क्रीडाया आणविला, म्हणसी, ‘ या साधुहो ! निवा सेवा. ’ २२ शेषाद्रि तीन गांवें उंच, बहु विचित्र, लांब हा तीस; जेथें सज्जन म्हणती, ‘ गे मुक्ते ! थांब, कां बहातीस ? ’ २३ होतोसि वेंकटेशा ! पत्रें, पुष्पें, फ़ळें, जळें तुष्ट. त्वद्भक्त जसा होतो, नच तैसा वत्स सुरभिचा, पुष्ट. २४ बसलासि विधिप्रार्थित जीवोद्धाराथ शेषनगराजीं. अमृतेंचि त्वन्नामें, बाधों देती हरासि न गरा जीं. २५ कोणी जन वेंकोवा, कोणी तिमया, असेंहि जे म्हणती, गंगाप्रमुखें तीर्थें करिति तयांकारणें बहु प्रणती. २६ कोणी कान्हकन्हय्या, कोणी रनछोडराय या नावें आळवुनि, भक्त तरती, श्रीविष्णो ! तुज कसेंहि वानावें. २७ वससी प्रकट प्रभु तूं श्रीभूयुक्त स्वयें जया स्थानीं ज्ञानीं ‘ वैकुंठचि तें ’ म्हणती, धरिती सदैवहि ध्यानीं. २८ तारिसि भवांत त्यांतें, लागति जे जीव काय कासेला. पांघुरविसी दयेचा दीनांला अभयदायका ! सेला. २९ म्हणतो प्राकृतहि पिता ‘ दुर्बळ बाळ न रडो, न भेंको, बा ! ’ द्रवसिल न कसा दीनीं तूं विश्वजनक दयालु वेंकोबा ? ३० म्हणसी तूं वेंकोबा ! ‘टेंको बाळक तसा मला जीव . ’ यापरिच दीनबंधो ! बंधुहि, करिते न साम, लाजीव. ३१ नि:शंक चतुर्वर्गप्राप्त्यर्थ जनें तुलाचि नवसावें. त्यजुनि त्वच्चरणाश्रय, वा ! कल्पद्रुमवनींहि न वसावें. ३२ तव यात्रानामाहीं भव्य असें कलियुगीं, न यज्ञाहीं. जीं अन्य साधनें तें नमुनि बसविलीं य्गीं नयज्ञाहीं. ३३ त्वां कृतयुगचि यशांच्या केलें हें पापयुग वितानाहीं. तूं साहुकार, दुसरा पटु, देता, वित्त उगविता, नाहीं. ३४ शरणागतांसि म्हणती निववुनि तुझियाचि पादुका, ‘ नाचा ’. सर्वत्र तुझींच तदपि महिमा नि:सीम या दुकानाचा. ३५ सर्वत्र व्याप तुझा, आळस करिसी न घेवदेवातें. धनदीं जें काय असे भांडवल तुझेंचि देवदेवा ! तें. ३६ तुज किमपि अर्पितो जो वेंकोबा ! तो न जरि तुला धुंडी, होय अनंतगुणें त्या परलोकीं सिद्ध दर्शनी हुंडी. ३७ श्रीकांता ! बैरागी जो हत्तीराम, तो तुवां महित स्वसमचि केला, अक्षक्रीडाहि करूनियां तयासहित. ३८ जो लंघित बहुयोजन भोजन शेषाख्यपर्वता पावे, तरतो नर तो, न रतो अन्यत्र, तदन्य सर्व तापावे. ३९ करितो यात्राचि तुझी जो जन, बा धातया ! उपरतो न; पाहे भाग्यचि, लाहे भोजन, बाधा तयाउपर तो न. ४० लक्ष्मीकांता ! क्षांता, शांता, दांता जना जसी मुक्ती, यात्राकरा तसीच स्पष्टा सत्या तुझीच हे उक्ती. ४१ वदलासि, ‘ न मे भक्त: प्रनश्यति ’ असें स्वयेंचि तूं देवा ! तारिसि दीनासि; तुझी देताहे भुक्ति-मुक्ति ही सेवा. ४२ करिसी तूं पापक्षय; बा ! पक्षयशस्कर त्वदन्य नसे; भुक्तिहि मुक्तिहि देसी; त्या तुज विसरतिल सुज्ञ भक्त कसे ? ४३ त्वद्भक्त शूर आढ्याहि, अतिदाता तो कविहि, तया त्रास कल्पांत न दे देवा ! मानिसि तूं तोक विहितयात्रास. ४४ करुणा तुझी मुकुंदा ! जेंवि सकामीं तसीच निष्कामीं; त्वच्चरणभुक्तमाल्याचि मिरविन हर्षें, तसा न निष्का मीं. ४५ श्रीचरणरेणु देवा ! दे, वात्सल्येंकरूनि अर्चीन; चर्चीन खललाटीं; यापरि अघभस्म अरिल अर्ची न. ४६ दे मज मनोहरांतिल कण; संरक्षिल भवार्णवीं कण तो, अम्रुतलव खल्प म्हणुनि, वदन न वासील काय जो कणतो ? ४७ त्वद्भक्ताच्या भक्तें कीं देवुनि भेटि तरि मला जावें, म्यां पूजनाद्यशक्तें नमन करायासि परि न लाजावें. ४८ तव उत्सव अनुभविला, भक्तें, करुणा करूनि, सांगावा. आंगा वायु तयाचा लागावा; म्यां न तोहि कां गावा ? ४९ श्रीरमणा ! वेंकोबा ! करुणावरुणालया ! नता पावें. म्यां दीनें संसारीं जन्मुनि, पावुनि भया न तापावें. ५० स्पर्शमणि जडहि देवा ! स्पर्शुनि करितो सुवर्ण लोहाचें. मग चिन्मय गुरू तूं कां भस्म न करिसील दासमोहाचें ? ५१ देवा ! वेंकटराया ! वारावी त्वां दुरत्यया माया ! बा ! माया दीनावरि सांग कराया स्वयें स्वनामा या. ५२ हे दरवरचक्रगदापद्मधरा ! शक्रनील ! घननीला ! मननीं लाव मज; गमे प्राणाधिक जडहि बाळ जननीला. ५३ सुत होवुनि उद्धरिला; मानी जो खळ न वेन वेदास. नामें अजामिळहि; कीं तुज आवडती नवे नवे दास. ५४ जीव अविद्यामोहित, न पहासी यांत सदय तूं दोष, उद्धरिसि; स्वल्पहि गुण घेवुनि, देसी प्रभूत्तमा ! तोष. ५५ गुणलवही पर्वतसा मानिसि, अपराधपर्वतहि लवसा, लक्षाचें कार्य करिसि, मानूनि शताचियाहि बहु नवसा. ५६ उद्धरिले, उद्धरिसी, उद्धरिशिल दीन; तूं दयालु बरा, स्तवितो, हा दास; तुजचि पाहे सर्वत्र; म्हण न या लुबरा. ५७ ज्या दीनोद्धारकथा गात असे सर्वकाळ सत्सद या, इछिल काय पराची तृप्त्यर्थी कामधेनुवत्स दया ? ५८ शरणागतरक्षण हें व्रतचि तुझें, भक्तसुरनगा ! तिमया ! तुज तेंवि विश्वकर्म्या, कीं कुशल म्हणोनि कवि न गाति मया. ५९ आलासि दीन रक्षित, म्हणुनचि तुज दीनबंधु वदतात. देतोसि आपुलें तूं भक्ता, पुत्रासि जेंवि पद तात. ६० लाविति तुजहूनि इतर ते उद्धारा न हात पाप्याला. परि बहु पुण्य यश मिळे देवा ! ज्या शुक महातपा प्याला. ६१ देवा ! रमानिवासा ! गडबडती ते न, जे सविश्वास गानें, पानें, मानें, त्वद्यश तारील कां न विश्वास ? ६२ अभिधान शुक्रासि तुझें पढवुनियां, मोक्ष पिंगळा लाहे. दुरितानळौषधाचे गिरि किति तव नामविंगळाला हे ? ६३ बा ! तूं शरण्य़, शरणागत मीं; तूं दीनबंधु, मीं दीन. तूं माय बाप, देवा ! मीं जड शिशु समुचितक्रियाहीन. ६४ भवपूरीं रक्ष मला, अक्षम लागावयास तीरा मीं उद्धरितां, पुण्य यश स्थापी बा ! गावया सती रामीं. ६५ पापच्छेदक म्हणुनि; ख्याता तव वेंकटेश हे आह्रा. श्रीचरणांस म्हणावें कीं, भक्तांस प्रसन्न हूं या व्हा. ६६ ‘ हा जन अयोग्य ’ ऐसें न म्हणावें त्वां अगा ! रमानिलया ! म्हणसिल मम, तरि, समुचित जो गुणगण, तो अगार मानिल या. ६७ जे तव भक्त ख्यात, त्वत्करुणेनेंचि धन्य ते लोकीं. तोकीं श्रीशा ! प्रकटे, जो पितृपुण्यप्रसादगुण तो कीं. ६८ श्रीकांता ! भक्तधना ! जड, धिक्कृतिपात्र, पाप रासभ जो, तो भुक्तिमुक्तिदा त्यजु तुज न, धरुनि बा ! त्रपा परास भजो. ६९ भ्रष्टा अजामिळ, गजवर पशु, बाळ ध्रुवहि, पिंगळा गणिका, हें किति ? शिळेसि तारी श्रीशा ! तव पादधूळिची कणिका. ७० घन जेंवि मयूराचें, देवुनि तूं प्रेम सुरस दासाचें ! मन निवविसि लक्ष्मीशा ! यश गाती भूमिसुर सदा साचें. ७१ श्रीवेंकटेशचरणीं रामसुतें या समर्पिल्या आर्या; कार्या प्रभुभक्तांच्या साधितिल, जशा धरेंदिरा भार्या. ७२


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.