विज्ञान-प्रणीत समाजरचना/आधिभौतिक शास्त्रांचे अधिकार
Appearance
गेल्या पाचसहा शतकांत, व विशेषतः गेल्या पन्नाससाठ वर्षांत युरोपमध्ये विज्ञानाची अगदी अपरिमित वाढ झाली आहे. रसायन, पदार्थविज्ञान, जीवनशास्त्र, राजकारण अर्थशास्त्र मानसशास्त्र या विज्ञानाच्या एकेक शाखामध्येच इतके संशोधन व अभ्यास झाला आहे की, एकेका शाखेच्या अभ्यासासही मानवांचे संबंध आयुष्य पुरणार नाही. अगदी आरंभी जड व अचेतन अशा वस्तूंचाच या शास्त्रांत अभ्यास होत असे पुढे वनस्पती व पशू यांच्या अभ्यासासही सुरुवात होऊन आता विज्ञान हे मानवाबद्दलही काही नियम सांगू लागले आहे. हजार-दोन हजार वर्षापूर्वीची कोणच्याही संस्कृतीची स्थिती पाहिली तर, त्या संस्कृतीच्या बहुतेक सर्व ज्ञानाचा समावेश धर्मग्रंथातच असे असे दिसून येईल. जगदुत्पति कशी झाली, मूलतत्त्वे काय होती, याचा विचार सांख्यकारिका, मनुस्मृती या धर्मग्रंथांप्रमाणेच बायबलातही केलेला आढळतो. पृथ्वीचा आकार, तिची गती, सूर्य, ग्रहमाला, व आकाशातील इतर गोल या संबंधीची माहितीही धर्मग्रंथांतच असे. राजाची कर्तव्ये काय, कायदे कसे असावे हे राजकारणातले प्रश्न, कोणी कोणते धंदे करावे, पैशाची वाटणी कशी करावी इ. अर्थ शास्त्रातले प्रश्न, कोणत्या प्रकारच्या स्त्री-पुरुषांची संतती काय प्रकारची होईल, संकरज प्रजेच्या अंगी काय गुण दिसतील इ. जीवनशास्त्रातले प्रश्न याचाही विचार धर्मग्रंथांत आपणास केलेला दिसतो. सारांश, तत्त्वज्ञान निती व आचार हे जे तीन विषय आज आपण धर्माच्या कक्षेतले म्हणून मानतो, त्याखेरीज भूगोल खगोल, राजकारण, अर्थशास्त्र या विज्ञानाच्या ज्या अनेक शाखा त्यांचाही धर्मग्रंथांत समावेश होत असे आणि असे होणे अगदी स्वाभाविक होते. विज्ञानाच्या या शाखांची स्वतंत्र शास्त्रे म्हणून गणना करण्याइतकी वाढ झालेलीच नव्हती. आपल्याकडे ती वाढ पुढे फारशी झालीच नाही. यूरोपात ती झाल्याबरोबर. त्या शास्त्रांच्या शाखा निराळ्या होऊ लागल्या.
पण वाढ पुरी न झाल्यामुळे असो की, अन्य काही कारणांमुळे असो, विज्ञानाचा समावेश धर्मग्रंथात झाला या गोष्टीचे अत्यंत भयंकर परिणाम जगाला भोगावे लागले यात शंका नाही. विज्ञानाची वाढ होऊ लागली, तेव्हा धर्मग्रंथात त्या त्या विषयात जे सिद्धांत सांगितलेले होते, ते चुकीचे ठरू लागले. व धर्मग्रंथांतले शब्द हे परमेश्वराचे शब्द अशी धर्माधिकाऱ्यांची समजूत असल्यामुळे तो शब्द चुकीचा ठरणे म्हणजे आपल्या पायाखालची जमीनच जाण्यासारखे आहे, असे त्यांना वाटू लागले. व युरोपात त्या वेळी धर्मगुरूंच्या हाती कर्तुमकर्तुम् सत्ता असल्यामुळे नवीन ज्ञान सांगणाऱ्यांचा त्यांनी अनन्वित छळ सुरू केला. बायबलाहून भिन्न मत सांगितल्याबद्दल हॅपाशिया नावाच्या मुलीला दहाबारा धर्मगुरूंनी तुकडे तुकडे करून मारली. पृथ्वीप्रमाणेच आकाशात आणखी गोल आहेत, असे म्हटल्याबद्दल ब्रूनोला जिवंत जाळून मारले. पृथ्वी गोल असून सूर्य हा ग्रहमालेचा केंद्र आहे असे सांगितल्याबद्दल गॅलिलिओचा भयंकर छळ केला व इन्क्विझिशन् नावांची कोर्टे स्थापन करून बायबलविरोधी ज्ञान पसरविण्याच्या आरोपावरून १४८१ ते १८०८ या काळात सुमारे ३ लक्ष ४० हजार लोकांना ठार मारले. ज्ञानाचा नायनाट करण्यासाठी येशूच्या शांतताप्रिय धर्माने मानवांचा जेवढा भयंकर संहार केला तितका जगात कोणीही केला नसेल. पण या भयंकर छळाला न जुमानता एक पाय सतत अग्नीमध्ये ठेवून शास्त्रज्ञांनी आपले संशोधनाचे व ज्ञानप्रसाराचे काम अविछिन्न चालू ठेवले. व त्यांच्या त्या उग्र तपश्चर्येमुळेच युरोपमध्ये विज्ञानाची मधुर फळे आज चाखावयास मिळत आहेत.
विज्ञानाच्या विलक्षण प्रगतीमुळे पूर्वीच्या बरोबर उलट स्थिती आता येणार असा रंग दिसू लागला आहे. विज्ञानाच्या शाखा मागे धर्मग्रंथांनी व्यापल्या होत्या. तेथे आता विज्ञान हेच तत्त्वज्ञान, नीती व आचार या धर्मशास्त्राच्या शाखा व्यापू पहात आहे. जीवनशास्त्रातल्या उत्क्रांतिवादासारख्या सिद्धांतांनी नीतीच्या जुन्या कल्पना ढासळून पडल्या व नीती हे सामाजिक नियमांचे शास्त्र आहे, यात धर्माचा काही संबंध नाही. असे लोक म्हणू लागले. मानसशास्त्रातल्या संशोधनामुळे आत्म्याच्या स्वरूपाबद्दल व पुढेपुढे अस्तित्वाबद्दलही संशय निर्माण होऊन तत्त्वज्ञानाचाही प्रांत विज्ञानाने आपल्या कबजात घेतला. व आत्मा, देव वगैरे सर्व मिथ्या असून मानवाच्या देहाचे व मनाचेही सर्व व्यापार जडसृष्टीच्या नियमांनी बद्ध आहेत, असे सांगणारे शास्त्रज्ञ पुढे येऊ लागले व त्यामुळे सर्व समाजात मोठी खळबळ उडून गेली.
जडसृष्टी सोडून अत्यंत सूक्ष्म असे मन व आत्मा यांच्यासंबंधातही विज्ञान बोलू लागल्यामुळे सामान्य जनतेपर्यंत त्याचे धक्के पोचू लागले. स्त्री- पुरुषसंबंध, आहारविहार यांच्या बाबतीत धर्म व विज्ञान यांच्या आज्ञांमध्ये पावलोपावली खटका उडूं लागला. व यापैकी कुणाचे ऐकावे, हा लोकांपुढे मोठाच प्रश्न येऊन पडला. कांही अगदी जुन्या मताचे धर्मनिष्ठ लोक आहेत. त्यांच्या मते विज्ञान हे घातक असून शाळांतील मुलांना ते शिकविणे बंद केले पाहिजे असे त्या पंथाचे पंडित अमेरिकेत सांगू लागले आहेत. दुसऱ्या काही पडितांच्या मते विज्ञानाचा प्रसार होण्यास हरकत नाही, पण विज्ञानाने धर्माच्या राखीव क्षेत्रात ढवळाढवळ करता कामा नये. ऑसबॉर्न, मॅकलिकन् वगैरे प्रोफेसरांचा तिसरा पक्ष आहे त्यांच्या मते धर्मशास्त्र व विज्ञान यांच्यात मुळी विरोधच नाही. धर्माने सांगितलेल्या म्हणजे बायबलात लिहिलेल्या गोष्टी विज्ञानाच्या पायावरच उभारलेल्या आहेत व त्यांचा वरवर दिसणारा अर्थ जरी विज्ञानाशी विसंगत दिसत असला तरी तो खरा अर्थ नव्हे, असे सांगून ते बायबलचा नवा अर्थ बसवू पाहातात. या गटात ऑलिव्हर लॉज् सारखे जगविख्यात शास्त्रज्ञही आहेत. चवथा पक्ष अगदी मूलभेदक आहे. तडजोड, समन्वय इत्यादी प्रकार त्यास मुळीच मान्य नसून धर्माचे युग संपले, आता विज्ञानाचे युग सुरू झाले असे त्या पक्षाचे लोक म्हणतात. जोसेफ् मॅक्केब, बर्ट्रांड रसेल वगैरे लोक या मताचे आहेत.
आपल्याकडे हे चारी पक्ष थोड्याफार प्रमाणात सर्वत्र दिसून येतात. पण विज्ञानाच्या क्षेत्रात स्वतंत्र शोध व विचार करणारे पंडितच आपल्याकडे फार थोडे असल्यामुळे, जुनी धर्मश्रद्धा व कर्मठपणा जरी सपाट्याने ढासळत असला तरी पूर्ण जडवादी असे लोक आपल्याकडे फार थोडे आहेत. ख्रिस्ती धर्माचे व सायन्सचे जरी वैर असले तरी आमच्या वेदान्ताचे व सायन्सचे मुळीच वैर नाही. उलट भौतिकशास्त्रांना मागे टाकून वेदांत पुढे गेला आहे असे मानणारेच लोक सुशिक्षितात पुष्कळ आहेत व आपले सर्व व्यवहार. मोक्षधर्मशास्त्राचे ध्येय पुढे ठेवूनच झाले पाहिजेत असे मत त्यांच्यात रूढ आहे.
आज आपल्या समाजांतील या सुशिक्षित लोकांपुढे अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. जातिभेद मोडावे की नाही, एकपत्नी, बहुपत्नी यापैकी कोणचा प्रकार स्वीकारावा, संततिनियमन करावे की नाही, समाजात कोणता धंदा कोणी करावा याला काही नियम असावे की काय, गाय हा उपयुक्त पशु समजावा, का तिच्या ठायी देवत्व पाहावे, सुशिक्षितांनी स्नानसंध्या सोडून दिली आहे तिचा जीर्णोद्धार करणे कितपत आवश्यक आहे, कुटुंबसंस्था टिकवावी की मोडावी, व्यभिचारात मागले लोक म्हणत होते तसे खरोखरीच काही भयंकर आहे काय; हे व या तऱ्हेचे प्रश्न सुशिक्षित मनाला केव्हा ना केव्हा तरी भंडावून सोडतात. भंडावून सोडण्याचे विशेष कारण असे की सर्व तऱ्हेची बंधने झुगारून देऊन युरोपीय तरुण तरुणी बेहोष उन्मादाने स्वैर-संचार करीत आहेत व जीवन हे आनंदाचे धाम करून सोडीत आहेत तरी, त्यांच्या पराक्रमांत तिळभरही उणेपणा येत नाही मग ही नीतिबंधने पाळून त्यांच्या तुलनेने अगदी सुतक्यासारखे वाटणारे जीवन आम्ही का कंठावे असे वाटू लागते व त्यामुळे वरील प्रश्नांची उत्तरे धर्मशास्त्राकडून मागवावी. का विज्ञान सांगेल त्याप्रमाणे वागावे, असा प्रश्न विचारी मनापुढे येऊन पडतो. याच प्रश्नाचा विचार प्रस्तुत निबंधांत करावयाचा आहे.
धर्मशास्त्र व आधिभौतिक शास्त्रे यांपैकी कोणाचा सल्ला आपण घ्यावा हे निश्चित करावयाचे असेल तर या दोघांची सल्ला देण्याच्या बाबतीतली लायकी नालायकी आपण प्रथम तपासून पाहिली पाहिजे; यांनी निर्माण केलेले ज्ञान कोणच्या पद्धतीने निर्माण केले आहे, ते कितपत विश्वासार्ह आहे, व जे अंतिम डोळ्यापुढे ठेवून ही शास्त्रे आपणांस उपदेश करणार ते अंतिमच आपणास मान्य आहे की नाही, याचा विचार झाला तरच वरील प्रश्न सोडविणे शक्य आहे. म्हणून या दोन सल्लागारांचे ज्ञान मिळविण्याचे मार्ग व त्यांची विश्वसनीयता आपण प्रथम तपासून पाहू.
आधिभौतिक शास्त्रात प्रत्यक्ष अनुभव प्रयोग व अवलोकन यांवर सर्व भिस्त असते. या तीन साधनांनी जी माहिती जमा होते, तिच्यावरून यांतील सिद्धान्त सांगितलेले असतात. हे अनुभव किंवा प्रयोग एकट्यादुकट्याचे असून चालत नाही. या क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो अभ्यासकांचे अनुभव एकत्र करावे लागतात. एकाला आलेला अनुभव दुसऱ्यांना पटवून द्यावा लागतो व त्याचे बाह्य परिणाम तर जगांतल्या कोणत्याही माणसाला दिसतील असे असतात. या शास्त्रांमध्ये हजारो सिद्धान्त असे आहेत की त्यांबद्दल जगातल्या एकाही पंडिताला संशय नाही. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन यांच्या गतिस्थितीबद्दल व जडवस्तूंच्या मूलस्वरूपाबद्दल मतभेद आहेत. तसेच प्रत्येक शास्त्रातल्या काही नवीन सिद्धान्ताबद्दलही मतभेद आहेत. पण हे सर्व खरे असले तरी प्रत्येक शास्त्रात वादातीत असे पुष्कळच सिद्धान्त आहेत. याशिवाय या शास्त्रांत पुष्कळ प्रयोग असे आहेत की ते अगदी सामान्य सुशिक्षिताच्या बुद्धीलाही पटवून देता येतात. व्यक्तीच्या पापपुण्यावर ते समजणे न समजणे मुळीच अवलंबून नाही आणि यापेक्षाही विशेष म्हणजे या शास्त्राने आपल्या सत्यतेचे पुरावे म्हणून आगगाडी, तारामंत्र, विमान, रेडिओ, सिनेमा इत्यादी जे प्रकार समाजापुढे मांडले आहेत. त्याबद्दल जगातल्या दोनशे कोटी लोकांपैकी एकालाही शंका घेणे शक्य नाही.
धर्मशास्त्राची स्थिती याच्या बरोबर उलट आहे. त्याचे ज्ञानाचे मुख्य साधन म्हणजे अंतर्दृष्टि होय. परमेश्वर, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक इत्यादी सर्व गोष्टी ज्ञानेंद्रियाच्या पलीकडच्या आहेत. डोळे मिटल्यावर त्या दिसू लागतात. कान मिटल्यावर ऐकू येतात. बुद्धि थांबल्यावर त्याचे ज्ञान होते असे त्यांचे म्हणणे आहे. डोळे व कान थांबल्यावर येणारे हे अनुभव प्रत्यक्षाइतकेच विश्वसनीय आहेत असे त्यास वाटते. पण हे अनुभव भौतिक शास्त्रांतल्याप्रमाणे हजारो जणांचे नसून एकट्या-दुकटया पुण्यपुरुषांचे असतात. यांत एकाला आलेला अनुभव दुसऱ्याला पटवून देता येत नाही. ज्याची त्यालाच फक्त खूण पटते. पण अंतरी पटलेल्या खुणांवरून उभारलेल्या धर्मशास्त्रात असा एकही सिद्धान्त नाही, की ज्यावर जगांतल्या सर्व धर्मनिष्ठांचे एकमत आहे. परमेश्वर हा कपिल व बुद्ध यांना मान्य नाही. आत्मा बुद्धाला मान्य नाही. हे दोन्ही ज्यांना मान्य आहेत, त्यांच्यामध्येही त्यांच्या स्वरूपाबद्दल अनंत मतभेद आहेत. जगताचे मिथ्यात्व तर फारच थोड्यांना मान्य आहे. अंतिम प्राप्तव्याबद्दल तर याहीपेक्षा जास्त वाद आहेत. नीती व आचार यांची अशीच स्थिती आहे. तेथे तर एकाच धर्माच्या पंडितांतही शेकडो मतभेद आहेत. शास्त्रीय संशोधनाची प्रत्यक्ष फळं म्हणून रेडिओ, विमान ही जशी जगापुढे मांडली जातात व ज्यांच्याबद्दल एकही मानव संशय घेऊ शकत नाही. अशी फळे धर्मशास्त्रात मुळीच नाहीत. धर्मशास्त्रज्ञ तुम्हाला एकही गोष्ट पटवून देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते फक्त आज्ञा करतात. ब्राह्मणांनी यज्ञ करावे. तेलतूप विकू नये, किंवा एका गालात मारली तर दुसरा पुढे करावा यासारखे विधिनिषेध जसे कारणावाचून सांगितले जातात. तसेच जगाच्या आरंभी एकदम जल निर्माण झाले व त्यात एक सुवर्णाचे अंडे परमेश्वराच्या लीलेमुळे उत्पन्न झाले किंवा पृथ्वी चौकोनी असून तिच्याभोवतीच सर्व ग्रहगण फिरतात, हे सिद्धान्तही पुराव्यावाचून सांगितले जातात.
आपण बोलावलेल्या सल्लागाराची लायकी- नालायकी ही अशी आहे. वस्तुस्थिती अशी आहे याबद्दल कोणाचाच वाद नाही. या इतिहाससिद्ध गोष्टी असल्यामुळे धर्मनिष्ठांनाही याबद्दल शंका घेता येत नाही. पण यावरून भौतिक शास्त्रेच व्यवहारात प्रमाण धरली पाहिजेत असा जर तुम्ही निष्कर्ष काढाल तर तो मात्र धर्मशास्त्राला संमत नाही. आहे हे स्थितीच धर्मशास्त्राच्या श्रेष्ठत्वाला कारण आहे व भौतिक शास्त्रांना मानवाच्या वर्तनाच्या बाबतीत अगदी हीन दर्जाचे स्थान आहे असे सांगणारे पुष्कळ विद्वान् लोक आहेत. म्हणून त्यांच्या म्हणण्याचा आपणास विचार केला पाहिजे
धार्मिक लोक बुद्धिनिष्ठ लोकांवर नेहमी असा एक आक्षेप घेत असतात की, ज्या प्रत्यक्ष प्रमाणावर तुमचा सर्व भर आहे, ते प्रमाणच विश्वनीय नाही. एकादी गोष्ट खरी की खोटी हे तुम्ही डोळयाने पाहून ठरवता. पण डोळा आपणास नेहमी खरेच ज्ञान करून देईल हे कशावरून ? डोळ्याला अंधेरात एक दिसते, उजेडात दुसरेच दिसते. मन भ्याले असेल तर झाडाच्या ठायी भूत दिसेल. दोरीच्या ठायी सर्प दिसेल. फार उन्हातून चाललो तर पाणी नसेल तेथे पाणी दिसते. एका माणसाला एका ठिकाणाहून वस्तू एका प्रकारची वाटली तर दुसऱ्याला दुसऱ्या ठिकाणाहून दुसऱ्याच प्रकारची वाटते डोळयांना विकार झाले तर मग पहावयासच नको. तेव्हा डोळयांतल्या विकारामुळे अगर बाह्य परिस्थितीमुळे वस्तू मुळात जशी नाही तशी ती दिसू शकते किंवा पुष्कळ वेळा मन अन्य व्यवसायात गढून गेलेले असताना वस्तू पुढे असूनही दिसत नाही. हीच गोष्ट इतर ज्ञानेंद्रियांची. असे असतांना या ज्ञानेंद्रियांनी दिलेले ज्ञान विश्वसनीय कसे मानावे ?
ज्ञानेंद्रियांची स्थिती वर सांगितल्याप्रमाणे आहे यात शंकाच नाही. पण यावरून प्रत्यक्ष ज्ञान घेताना फार काळजी पूर्वक घेतले पाहिजे असे फारतर म्हणता येईल. कारण त्या प्रत्यक्षाच्या जागी जे अंतर्दृष्टीचे प्रमाण धार्मिक लोक आणू पाहतात व उपनिषदातील ऋषींनी आणि शंकराचार्यांसारख्या तत्त्ववेत्त्यांनी ज्या साधनाने ब्रह्माचे व जगाचे स्वरूप जाणले असे त्यांचे म्हणणे आहे. ते प्रमाण याहीपेक्षा फसवे आहे. डोळ्याच्या अंगचे सर्व दोष त्या अंतर्दृष्टीच्या ठायी असून शिवाय इतरही अनेक दोषांनी ती भरलेली आहे. डोळ्याला जसे निरनिराळ्या अवस्थेत निरनिराळे दिसते तसे या दृष्टीला भास होत असतातच पण शिवाय मुख्य गोम अशी आहे की तिच्या साह्याने दोन माणसांना झालेले ज्ञान पुष्कळ वेळा सारखे नसते. शंकराचार्य, रामानुज, मध्व, कपिल, वसिष्ठ, याज्ञवल्क्य, बुद्ध, जीझस् या सर्वांना अंतर्दृष्टीनेच ज्ञान झालेले असताना त्यांपैकी प्रत्येकाचे मत इतके भिन्न का असावे ? ब्रह्म व आत्मा एकरूप आहेत व ते भिन्न आहेत, ही ज्ञाने अंतर्दृष्टीनेच मिळालेली आहेत. देव अनेक आहेत व देव एकच आहे हे तिनेच सांगितले. आत्मा आहे व नाही हे ज्ञान तिजपासूनच झालेले आहे. याशिवाय धर्मशास्त्रांतला फारच मोठा दोष म्हणजे या आतल्या दृष्टीपासून झालेले ज्ञान पडताळून पाहण्यास मुळीच साधन नाही. ईश्वर, आत्मापरलोक हे पाहून कोणीही परत येत नाही. एकमेकांना एकमेकांचे अनुभव कधीही पटत नाहीत. डोळ्याने दिलेल्या ज्ञानात ही तरी सोय आहे. ते इतर इंद्रियांना तपासता येते व इतरांच्या अनुभवाशी तोलता येते. आणि हजारो जणांचे अनुभव जमले म्हणजे मगच ते खरे ज्ञान असे समजले जाते. पडताळून पाहाता येईल असे जे ज्ञान या दिव्य दृष्टीने प्रगट केले आहे ते बहुतेक सर्व चुकीचे ठरले आहे. त्याचे विवेचन पुढे येईलच. पण वरील विवेचनावरून पाहाता अंतर्दृष्टी हे ज्ञानसाधन अगदी अविश्वसनीय आहे हे ध्यानात येईल. बुद्धिनिष्ठ माणसाबद्दल आणखी काही गैरसमज उत्पन्न करून देण्याची अलीकडे पद्धत पडत चालली आहे. रा. गो. म. जोशी यानी त्यांच्या पुस्तकात यासंबंधी बरेच अर्थशून्य विवेचन केले आहे (पान ३९९) बुद्धिनिष्ठ मनुष्य अनुमान किंवा आप्तवाक्य मानीत नाही असे उगीचच काही लोक म्हणतात. व दुसरे काही म्हणतात की न्यूटन, डार्विन यांचा शब्द तुम्ही खरा मानता मग शंकराचार्य, वसिष्ठ यांचा का खरा मानीत नाही ? पण याचे उत्तर अवघड नाही. येथे न्यूटन किंवा शंकराचार्य असा प्रश्न नसून ज्ञान मिळविण्याची पद्धत कोणची असा प्रश्न आहे. अतर्दृष्टीने पाहिलेले सिद्धान्त खरे नसतात असे आढळल्यामुळे त्या दृष्टीचा उपयोग करून जो कोणी ज्ञान सांगू लागेल त्याच्यावर विश्वास बसत नाही. प्रत्यक्ष अनुभवाचा उपयोग करून कोणीही कोणचाही सिद्धान्त सांगितला तरी बुद्धिनिष्ठ मनुष्य तो मानण्यास तयार असतो. तेव्हा ज्ञानेद्रियांचा पुरावा केव्हा केव्हा सदोष असला तरी मानवाला उपलब्ध असलेल्या ज्ञानसाधनांमध्ये ते सर्वांत श्रेष्ठ साधन आहे, हे विसरून चालणार नाही. त्यापेक्षा निर्दोष साधन सापडेपर्यंत त्याचाच आश्रय केला पाहिजे व अचिंत्य भावांचे तर्काने आकलन करू नये असे सांगावयाचे असेल तर दुसऱ्या कशानेच ते आकलन होणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.
भौतिकशास्त्रांवर दुसरा असा आक्षेप येतो की त्यांचे सिद्धांत स्थिर नाहीत. दर दहावीस वर्षांनी काही तरी नवीन शोध लागतो व पूर्वीचा ढासळून पडतो. त्यामुळे अस्थिर, नित्य पालटणाऱ्या अशा भौतिक शास्त्रांच्या पायांवर समाजाचे नियम न रचता, सनातन शाश्वत अशा धर्मग्रंथांच्या आधारेच समाजशास्त्र रचले पाहिजे असे ते म्हणतात. या लोकांच्या मते भौतिकशास्त्रे अजून बाल्यावस्थेत आहेत व त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे. पण यावर अशी शंका येते की, भौतिकशास्त्रे ही बाल्यावस्थेत आहेत व आस्थिर आहेत असे जरी क्षणभर मानले तरी धर्मशास्त्र हे प्रौढ व स्थिर आहे, या म्हणण्याला तरी काही अर्थ आहे काय ? सर्व जगाचे धर्म पाहिले तर तत्त्वज्ञान, नीति व आचार या विषयात त्या धर्माच्या जन्मापासून आतापर्यंत कायम राहिलेला एकही सिद्धांत सांगता येणार नाही. इतर धर्म सोडून दिले तरी सनातन म्हणविण्याच्या हिंदुधर्मात तरी वेदकाळापासून आतापर्यंत अगदी स्थिर राहिलेला असा कोणचा विचार आहे ? अगदी खेळीमेळीने वागणारे इंद्र-वरुणादी देव जाऊन तेथे निर्गुण, निराकार परब्रह्म आले. त्याच्या स्वरूपाबद्दल पुन्हा मतभेद सुरू झाला. आत्मा व ब्रह्म पूर्ण एक, थोडेसे भिन्न व पूर्ण भिन्न अशी निरनिराळी मते सुरू झाली. हे ब्रह्म प्राप्त करूत घेण्याच्या मार्गाबद्दल अशीच चंचल मनःस्थिती दिसते. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग, ज्ञानयुक्त, भक्तिप्रधान, कर्मयोग असे अनेक पंथ यात आहेत. नीतीच्या बाबतीत हेच आहे. अनेक स्मृती होऊन त्यांनी पूर्वीच्यांची मते रद्द केली. यापेक्षा अस्थिरतेचा पुरावा आणखी कोणचा पाहिजे ? आचारही असेच पालटत आले आहेत गाईचे मास खाणे हा एका काळी धर्म होता. आता तिला पशू म्हणणे हाही अधर्म आहे. आपले स्वरूप सर्व अंगाने असे नित्य पालटत असताना या धर्माने स्थिरतेची प्रौढी मिरवावी, यात काय अर्थ आहे ? नाही म्हणावयास आत्म्याचे अस्तित्व व तदनुषंगिक कर्मवाद ही आतापर्यंत कायम राहिली आहेत असे म्हणता येईल. पण येथे असा प्रश्न उत्पन्न होतो की, एखादे मत दोन हजार वर्षे लोकांनी उराशी धरून ठेवले, एवढयासाठीच ते खरे मानावयाचे की काय ? ईश्वर, आत्मा पुनर्जन्म, कर्मवाद हे मोक्षधर्मशास्त्राचे सिद्धांत पडताळून पहाण्याला साधनच नसल्यामुळे ते हजारो वर्षे टिकले या म्हणण्यात काही अर्थ नाही. जाखाई, जोखाई, मरीआई यांची पूजा वेदपूर्वकाळापासून आतापर्यंत म्हणजे हिंदूच्या अत्यंत श्रेष्ठ तत्त्वज्ञानापेक्षाही जास्त वेळ टिकून राहिली आहे. पण तेवढ्यावरून तिला कोणीच श्रेष्ठ समजत नाही तेव्हा भौतिकशास्त्रे अस्थिर आहेत व धर्मशास्त्र हे स्थिर आहे, या म्हणण्यात काही जीव नाही. बरे, भौतिक शास्त्रांचा सिद्धांत काल निघाला की आज अमलात आणावा, असे कोणीच म्हणत नाही. शास्त्रज्ञ सांगतील तो योग्य काल गेल्यानंतरच तो अमलात आणावा असेच कोणीही विचारी मनुष्य म्हणेल. योग्य काल म्हणजे पन्नास पाऊणशे वर्षे ठरविला तर त्यानंतरही म्हणजे दोनशे वर्षांनी किंवा चारशे वर्षांनीसुद्धा सिद्धांत बदलू शकतो हे खरे आहे व त्यामुळे मधली चारशे वर्षे ज्यांनी तो पाळला त्यांचे नुकसानही होईल. पण ही आपत्ती कोणत्याच मार्गाने टाळणे शक्य नाही, गीतेचा ज्ञानयोग निर्माण होईपर्यंत वेदवादरत होऊन काम्यकर्मे करीत राहणाऱ्या लोकांच्या आत्म्याचे नुकसान झालेच की नाही ? शंकरचार्यांचा संन्यासपर अर्थ ज्यांनी मान्य केला, त्या लोकांनी कर्मों सोडून दिल्यामुळे टिळकांचे गीतारहस्य निर्माण होईपर्यंत समाजाचे नुकसान होतच होते ना ? प्रतिलोमविवाह मान्य करणाऱ्याचे मनु येईपर्यंत व आनुलोम चालू ठेवणाऱ्यांचे याज्ञवल्क्य सांगेपर्यंत नुकसान झाले त्याची काय वाट ? हे जसे नुकसान माणसांनी सोसले तसेच भौतिकशास्त्र मान्य करून त्याअन्वये समाजरचना केली तर सोसावे लागेल, यापेक्षा जास्त काही नाही. पण एवढयासाठी प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान मिळविणान्या भौतिकशास्त्राचे सिद्धांत टाकावे व अंतर्दृष्टीसारख्या सर्वस्वी अविश्वसनीय साधनाने ज्ञान मिळविण्यासाठी मोक्षधर्मशास्त्राचे सिद्धांत मान्य करावे, असे मुळीच ठरत नाही. (धर्मशास्त्रात अवलोकन, अनुभव, प्रयोग यावरून जे सिद्धात सांगितले असतील त्याबद्दल हे बोलणे नाही. पण डोळे मिटल्यानंतर जे दिसले त्याच्या आधाराने किंवा वेदांतील स्वल्पविराम व अवग्रह चिन्हे यांवर मारामारी करून त्यावरून जे सिद्धांत सांगितले जातात त्याबद्दल हे लिहिले आहे
आधिभौतिक शास्त्रे ही मानवकृत व म्हणून दिक्कालांनी मर्यादित आहेत; धर्मग्रंथ हे साक्षात् परमेश्वराने मांगितले असल्यामुळे त्यांना दिक्कालाची मर्यादा नाही. तेव्हा धर्मशास्त्रापुढे दिक्कालांनी मर्यादित अशा भौतिक शास्त्राची मुळीच मातब्बरी नाही, असा एक मुद्दा नेहमी पुढे येत असतो. येथे पहिल्या प्रथम परमेश्वराच्या अस्तित्वाचाव प्रश्न उपस्थित होईल. पण तो न करताही असे विचारता येईल की अमुक एक ग्रंथ परमेश्वराने सांगितला हे कशावरून ठरवावयाचे ? वेद व उपनिषदे हीच परमेश्वराने सांगितली हे कशावरून ? पण लक्षात कोण घेतो? निबंधमाला, हे ग्रंथ किंवा टिळक, रामन्, बोस यांचे ग्रंथ यांना परमेश्वरवाणी का म्हणू नये ? मधुच्छंद, श्यावाश्व, सप्तवध्रि, श्रृष्टिगु या लोकांनी लिहिलेली सूत्रे ती परमेश्वराची, मग गीतगोविंद किंवा गीताज्जली ही का नव्हत? रामन्, बोस हे लोक आपल्या म्हणण्यास पुरावा देतात. नुसत्या आज्ञा करीत नाहीत; आणि जयदेव किंवा रवींद्रनाथ आम्ही हे काव्य पाहिले असे न म्हणता रचले असे म्हणतात एवढाच त्यांचा दोष ना ? पण पुरावा न देणे किंवा 'पाहिले' असे म्हणणे हे कोणीही करू शकेल. अंतर्दृष्टि हे साधन योग्य की अयोग्य हा वाद जरी क्षणभर मिटता घेतला, तरी अंतर्दृष्टीने पाहून लिहिलेला ग्रंथ कोणचा व तसा नाही कोणता, हे ठरविणे अशक्य आहे. असे असताना अमुक एक ग्रंथ परमेश्वरप्रणीत आहे, व त्यामुळेच त्यांतील धर्मशास्त्र सर्वव्यापी व सर्वज्ञ आहे असे म्हणणारे लोक त्या ग्रंथावर नसत्या आपत्ती ओढवीत आहेत असे म्हटले पाहिजे. वेद, उपनिषदे, मनुस्मृति हे ग्रंथ मनोहर काव्य, प्रगल्भ तत्त्वज्ञान व आनुवंशाचा शोध यासाठी निरतिशय आदरणीय आहेत. महाभारत, रामायण यासारखे काव्य त्रिखंडांतही सापडणे शक्य नाही. पण हे म्हणणे निराळे व ते ग्रंथ सर्वज्ञ आहेत व त्यांतील प्रत्येक वाक्य हे प्रमाण मानले पाहिजे हे म्हणणे निराळे. ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, कर्म या अतींद्रिय सृष्टीतल्या विषयासंबंधी त्यांनी जी विधाने केली आहेत त्यात परस्परविरोध वाटेल तितका आहे. व विज्ञानाच्या कक्षेत येऊन ऐहिक विषयासंबंधी त्यांनी जे ज्ञान सांगितले आहे, त्यातले पुष्कळसे चूक आहे. जगदुत्पत्तीसंबंधी, व मानवाच्या उत्पत्तीसंबंधी यांनी जी माहिती दिली आहे ती चूक आहे, असे डार्विनने दाखविले आहे. यज्ञापासून पर्जन्य होतो हेही मनूचे विधान चूक आहे. कारण कांगो व्हॅलीत व ब्राझीलमध्ये यज्ञ नाहीतच; पण माणसेही फारशी नाहीत. सकरापासून निर्माण झालेल्या प्रजेचे विशेष गुण त्याने सांगितले आहेत तेहि आता रा. गो म जोशी यांखेरीज कोणी खरे मानीत नाहीत. सूर्याला स्वर्भानु म्हणजे राहू ग्रासतो व त्यामुळे ग्रहण लागते, हे ऋग्वेदांतले (५-४०-७ विधान चूक आहे, हेही सर्वांना माहीत आहेच. त्याचप्रमाणे घटामध्ये वीर्य पडल्याने पुत्रोत्पत्ती होऊ शकते, ही ऋग्वेदांतली कल्पनाही (७-३३ बरोबर नाही, याबद्दलही वाद नाही. जेथे जेथे पडताळा पहाता येतो, तेथे तेथे श्रुतिस्मृतीचे ज्ञान हे बहुतेक चूक ठरते. त्या जर सर्वज्ञ आहेत व ईश्वरप्रणीत आहेत, तर असे का व्हावे ? श्रुतिस्मृतीचे हे जे अज्ञान वर दाखविले आहे त्यातील हेतूबद्दल कोणीही गैरसमज करून घेऊ नये. या चुकांमुळे त्या ग्रथाचे वैभव रतिमात्रही कमी होत नाही असे माझे मत आहे. असल्या आणखी पांचशे चुका जरी आढळल्या तरी त्यातील अलौकिक काव्यप्रतिभा व बुद्धीची विशालता यांना अणूइतका सुद्धा दोष देता येणार नाही. ते ग्रंथ सर्वज्ञ आहेत, दिक्कालाच्या अतीत आहेत व म्हणून दिक्कालांनी मर्यादित भौतिक शास्त्राची त्यांच्यापुढे किंमत नाही, असे म्हणणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी व अंतर्दृष्टी हे ज्ञानसाधन कसे अविश्वसनीय आहे हे दाखविण्यासाठी ही खटपट केली आहे. वेद व स्मृति यांत चुका सापडतात म्हणून अंतर्दृष्टी अविश्वसनीय मानावयाची तर प्रिन्सिपियात चुका सांपडतात, म्हणून प्रत्यक्ष प्रमाणे अविश्वसनीय का मानू नयेत, असा एक प्रश्न येथे विचारता येण्याजोगा आहे. पण त्याचे उत्तर वर आले आहे. प्रत्यक्ष प्रमाण हे पूर्ण निर्दोष व सर्वंकष आहे, असे कोणीच कधी म्हणन नाही. ते कमीत कमी निर्दोष आहे एवढेच म्हणणे आहे. शिवाय त्याला बाह्य साधनांची अपेक्षा असते त्यांत जसजशी सुधारणा होत जाईल, तसतसे प्रत्यक्ष ज्ञान जास्त चांगले होणार. अंतर्दृष्टीचे तसे नाही. वेदपूर्वकालापासून पृथ्वीच्या अंतापर्यंत तिची शक्ती कायम असावयास पाहिजे. तिच्यातही सुधारणा होते आहे, असे म्हणावयाचे असेल तर मागील ग्रंथांची सर्वज्ञता लटकी ठरेल. सर्वज्ञतेचा हेका भौतिकशास्त्रे कधीच धरीत नाहीत. प्रत्यक्ष प्रमाणाच्या व मानवी बुद्धीच्या मर्यादा आधिभौतिक शास्त्रज्ञाच्या नेहमी ध्यानात असतात. शास्त्र ही धूर्त असतात व आपल्याला न कळणाऱ्या गोष्टी जगात आहेत, अशी कबुली देणे त्यांना कमीपणाचे वाटते, असे रा. गो. म. जोशी लिहितात (पान ६६). स्वताला शास्त्रज्ञ म्हणविणाऱ्या या माणसाची ही वृत्ती खरोखर अत्यंत मनोरंजक आहे शास्त्रे जर नेमकी एकादी गोष्ट नसतील तर हीच. आपल्या ज्ञानाच्या मर्यादा स्पष्टपणे ओळखून इतके कळते, इतके कळत नाही असे सांगण्याची प्रथा प्रथम याच शास्त्रांनी पाडली. ठायी ठायी अज्ञान आणि विसंगती दिसत असूनही सर्वज्ञतेची ऐट आणणे हे धर्मग्रंथांनाच साजते. शास्त्रांनी ते कधीही केलेले नाही.
पण अमुक एक आपणास कळत नाही हे सांगण्याची शास्त्राची जी सत्य व नम्र वृत्ती आहे तिचा फायदा घेऊन काही लोक म्हणतात की मानवी बुद्धीला मर्यादा आहे. असे जर तुम्हीच कबूल करता, तर जेथपर्यंत ती बुद्धी जाईल तेथपर्यंत जाऊन तेथून पुढे श्रद्धेचे क्षेत्र आहे असे कबूल करावे. पण श्रद्धेचे क्षेत्र आहे असे कबूल करावयाचे म्हणजे काय करावयाचे ? जडाच्या पलीकडे आपल्याला समजत नाही एवढ्याचसाठी ते दुसऱ्या कोणाला तरी समजते, असे मानावयाचे की काय ? आपले अज्ञान हाच दुसऱ्यांच्या ज्ञानाचा पुरावा कसा होतो ते कळत नाही ! श्रद्धा कोणावर व का ठेवावयाची ? श्रद्धेचे क्षेत्र मानणारे लोक तरी वाटेल त्यावर श्रद्धा ठेवतील काय ? आप्तवचनांवर श्रद्धा ठेवावी हे मान्य केले तरी आप्त कोण हा प्रश्न पुन्हा राहतोच. कपिल महामुनी, व्यास, श्रीकृष्ण, गौतमबुद्ध, शंकराचार्य, समर्थ, टिळक या महाविभूतींनी जे सांगितले त्यावर श्रद्धा ठेवावी, हे म्हणणे वाटेल त्या बुद्धिनिष्ठाला मान्य होण्याजोगे आहे. कारण या विभूतींचे चारित्र्य, त्यांचा त्याग, सागरासारखी त्यांची बुद्धी व महामेरूसारखे कर्तृत्व याबद्दल कोणालाही शंका नाही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या थोर पुरुषांच्या सांगण्यामध्ये अंतिम हेतु, जगाचे स्वरूप व मार्ग याबद्दल इतके मतभेद आहेत की त्यांच्या अलौकिक बुद्धीमुळे त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी असे वाटण्याऐवजी त्यांची बुद्धी अलौकिक होती. याच कारणासाठी ते ज्या विषयांत संचरत होते त्या विषयांत निश्चित असे काहीच नाही, तेव्हा आपण त्या नादी लागण्यात अर्थ नाही असेच कोणालाही वाटेल. भौतिक शास्त्रांत व अध्यात्मांत हाच तर मुख्य फरक आहे, पहिल्यामध्ये हजारो सिद्धांत असे आहेत की ज्याबद्दल एकही भौतिक शास्त्री शंका घेऊ शकत नाही व दुसऱ्यात असा एकही सिद्धांत नाही की ज्यावर सर्वांचे- एकाच धर्मातील सर्वांचे सुद्धा एकमत आहे. आणि म्हणूनच श्रद्धेचे क्षेत्र याला काही अर्थ नाही. मानवी बुद्धी खुंटली की त्या पलीकडे समजत नाही, म्हणून स्वस्थ बसण्याखेरीच दुसरा मार्ग नाही.
सर जेम्स जीनस् याने आपल्या 'मिस्टीरियस युनिव्हर्स' या पुस्तकात एक चमत्कारिक प्रश्न उपस्थित केला आहे. पदार्थविज्ञानशास्त्रांत अलीकडे अशा काही गोष्टी आढळतात की, त्यामुळे आतापर्यंत भौतिक शास्त्रज्ञांनी मानलेला कार्यकारणाचा दुर्लघ्य नियम ढासळून पडत आहे, असे तो म्हणतो. (पान १७) रेडियम या धातूंतील अणूंचे हेलियम व शिसे या धातूत नित्य रूपांतर होत असते. पण दोन हजार अणू घेतले तर त्यांतील अमकाच अमुक वेळेला का रूपांतरित व्हावा, हे शास्त्राज्ञांना सांगतो येत नाही. कोणचेही कार्यकारणाचे नियम या ठिकाणी लागू पडत नाहीत. म्हणूनच याला रूदरफोर्ड व सॉडी यांनी Spontaneous disintegration असे म्हटले आहे. शिवाय आइन्स्टाइनच्या रिलेटिव्हिटीच्या सिद्धांतामुळे विश्वाची पोकळी किंवा अवकाश (Space) हा मर्यादित आहे असे सिद्ध झाले आहे. अवकाश मर्यादित आहे म्हणजे काय याचा अर्थ कल्पनेनेसुद्धा जाणणे शक्य नाही. कारण पृथ्वीला सोडून एका रेषेत आपण कोट्यवधि नव्हे असंख्य मैल जरी लांब गेलो तरी तेथून पुढे पोकळी नाही म्हणजे काय हे समजणे शक्य नाही. यावर हे गणिती उत्तर देतातं की तर्कदृष्ट्या तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण विश्व आता तर्काच्या कक्षेत राहिले नाही. गणिताच्या नियमाने अवकाश हा सांत ठरला आहे, तेव्हा तो तसा धरलाच पाहिजे. (पान १२३)
कार्यकारणभाव व तर्कशास्त्र प्रत्यक्ष भौतिक शास्त्रांनीच लाथाडल्यावर मग उरले काय असे वाटून विचारवंताचे मन अस्वस्थ होऊन जाते. पण यासंबंधी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. एक तर स्वतः जीनस् नेच म्हटले आहे की बाह्यतः दिसणारा निसर्गाचा हा लहरीपणा कदाचित् अधिक संशोधनाअंती खरा नाही असे ठरून कार्यकारणाच्या कैचीत वरील रेडियमचे रूपांतर बसविता येईलही. इतिहासात मागे असे अनेक वेळा झाले आहे. अगदी गती खुंटली असे वाटल्यानंतरही पुन्हा कार्यकारणभाव लागतो असे आढळले आहे व या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा संभव आहे. (पान १९) या म्हणण्याप्रमाणे थोडेसे होऊही लागले आहे. प्रकाशाची गती कोणत्याही अवस्थेत बदलत नाही असे धरून रिलेटिव्हिटीचा सिद्धांत सांगितलेला आहे. पण ते गृहीतकृत्यच चूक आहे. प्रकाशाच्या गतीत फरक पडतो असे आता आढळले आहे.
पण याहीपेक्षा या प्रश्नाला निराळे उत्तर देता येण्याजोगे आहे. आपण असे समजू की शास्त्रज्ञाच्या अपेक्षेप्रमाणे रेडियममधील अणूंचे रूपांतर कार्य कारणाच्या कैचीत कधीच बसले नाही. जडसृष्टीतले व्यापारही कार्यकारणाला न जुमानता बेबंद होऊ लागले; तर्काला वेडेपणाचे वाटतील असे सिद्धांत गणितामुळे गृहीत धरावे लागले. पण असे झाले तरी धार्मिक लोकांना यात आनंद वाटण्याजोगे काय आहे ते कळत नाही. जीवनाच्या नियमांच्या कार्यकारणांचा जसा अजून उलगडा झाला नाही, मनाचे व्यापार शास्त्रांच्या कठोर नियमांना जसे अजून दाद देत नाहीत, त्याचप्रमाणे जड सृष्टीतली अंतिम तत्त्वेही कार्यकारणाला वश नाहीत, असे म्हणून शास्त्रज्ञांना दुर्दैवाने हात टेकावे लागतील व इतर सृष्टी प्रमाणेच जड सृष्टीही अनिर्बंध आहे म्हणून कोणचाच नियम कोणी कोणाला सांगू नये असे फार तर ठरेल. यापेक्षा निराळे काय ? जड सृष्टीच्या अभ्यासकांना पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही, यावरूनच दुसऱ्या कोणाला तरी ते ज्ञान होते, (म्हणजेच येथून पुढे श्रद्धेचे क्षेत्र लागले) असे म्हणणे म्हणजे वेडगळपणाचा कळस आहे. कुणालाच काही कळत नाही- अंतर्दृष्टीला कधीच कळत नव्हते, व प्रत्यक्ष प्रमाणांनी जडवस्तूंचे तरी स्वरूप पूर्णपणे कळेल असे वाटले होते तीही आशा नष्ट झाली. एवढाच खेदजनक सिद्धान्त फारतर यावरून निघेल. पण तुम्हाला येत नाही येवढ्याचसाठी ते आम्हाला येते असे माना, असे सांगणे याने मनोरंजन होण्यापलीकडे काहीच साधणार नाही.
धर्मशास्त्राचा एकेक प्रांत काबीज करीत विज्ञानाने ऐहिक विषयाचे तर सर्व क्षेत्र व्यापलेच आहे व आता मोक्षधर्मशास्त्राला त्याच्या स्वतःच्या घरातच विज्ञानाने शह दिला आहे. जडवस्तूंचे व्यापार उकलता उकलता मानवाचाही अभ्यास विज्ञानाने सुरू केला. त्याच्या जड देहाचे सर्व शास्त्र हस्तगत झालेच आहे व आता मनाबद्दलही विज्ञान काही सिद्धान्त सांगू लागले आहे. मन हा धर्मशास्त्राचा बालेकिल्ला आहे. त्याचे जे व्यापार चालतात ते आत्म्याचे अस्तित्व मानल्यावाचून स्पष्ट करणे अशक्य आहे असे धर्मशास्त्र म्हणते. पण तेही चुकीचे आहे, असे अलीकडचे शास्त्रज्ञ म्हणू लागले आहेत. त्यांचे म्हणणे असे मनाचे व्यापार आम्हास सर्वस्वी उकलता आले आहेत असे आम्ही म्हणत नाही पण आतापर्यंत जो काही अभ्यास झाला आहे, त्यावरून एवढे मात्र खास सांगता येते की, ते उकलण्यासाठी आत्मा म्हणून एक काही देहनाशानंतर टिकून रहाणारे व अविनाशी तत्त्व आहे असे मानण्याची मुळीच जरूर नाही. आत्मा किंवा परमेश्वर यांच्याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही तुम्ही ज्या गोष्टीवरून ते सिद्ध होतात असे म्हणता त्या गोष्टीवरून ते सिद्ध होत नाहीत इतकेच आम्ही म्हणतो व आम्हाला पटेल अशा इतर कोणच्याही रीतीने आत्म्याचे अस्तित्व तुम्ही सिद्ध केले नसल्यामुळे आम्ही तो मानावयास तयार नाही. तो नसेलच असे आम्ही म्हणत नाही. त्याचे अस्तित्व सिद्ध झाले नाही एवढेच आमचे म्हणणे आहे
अलीकडच्या भौतिक शास्त्रज्ञांच्या मताने मन ही जडाहून काही निराळी वस्तु नाही. आगगाडीच्या इंजनापेक्षा रेडीओचे व्यापार सूक्ष्म असतात. रेडीओपेक्षा सजीव अशा झाडाच्या वाढीचे व्यापार सूक्ष्म असतात. त्यापेक्षा मानवाच्या देहाच्या वाढीचे व्यापार सूक्ष्म असतात. देहातल्या देहांतच हाता पेक्षा कानाचे व कानापेक्षा डोळ्याचे व्यापार सूक्ष्म असतात. याच रीतीने अत्यंत सूक्ष्म व्यापार असलेले मन हे एक यंत्र आहे. परमाणूंच्या संघटन- विघटनाचेच ते कार्य आहे. त्याचे व्यापार अत्यंत सूक्ष्म आहेत, इतकाच काय तो इतर जड गोष्टीत व त्याच्यात फरक आहे. गुलाबांच्या फुलातून सुगंधाचे जसे अत्यंत सूक्ष्म पण मधुर कण निघत असतात, कण्हेरीच्या फुलातून त्याचप्रमाणे सूक्ष्म पण उग्र कण जसे निघत असतात व हिरव्या चाफ्याच्या फुलातून जसे भिन्न भिन्न गंधांचे कण निघत असतात त्याचप्रमाणे मनातून त्याहीपेक्षा सूक्ष्म असे रागद्वेषाचे कण निघत असतात व विचारविकारांच्या लहरी म्हणजे याच कणांचे आघात किंवा प्रत्याघात होत.
यावर धर्मशास्त्रज्ञांचे म्हणणे असे की, शरीराप्रमाणेच मन हेही जड आहे व तेही जड वस्तूप्रमाणेच कार्यकारणांनी बद्ध आहे असे जर तुम्ही म्हणाला तर नीतिअनीतिबद्दल एक चकार शब्दही तुम्हाला काढता येणार नाही. मन हे जर कार्यकारणभावाने बद्ध असेल तर त्याची स्थिती दगडाप्रमाणेच आहे. मागल्या क्षणाच्या अवस्थेवर त्याची पुढल्या क्षणाची अवस्था अवलंबून असणार. ती पालटण्याचे दगडात जसे सामर्थ्य नाही तसे मनातही नाही. मनात जर हे सामर्थ्य नाही म्हणजे कोणचीच क्रिया किंवा विचार करण्याचे स्वातंत्र्य जर त्याला नाही तर त्याला अमुक कर, तमुक कर असा उपदेश करणे हे दगडाला उपदेश करण्याइतकेच अर्थशून्य आहे. तेव्हा आत्मा नाही किंवा मनाला स्वातंत्र्य नाही असे तुम्हास मानावयाचे असल्यास माना पण मग नीती- अनाीतीचा विचार तुम्हाला मुळीच सांगता येणार नाही. नीतिशास्त्रप्रवेश या आपल्या ग्रंथांत प्रो. वा. म. जोशी यांनी याच तऱ्हेचे विचार सांगितले आहेत. ते म्हणतात की, आत्म्याला जड मानले तर नीतिशास्त्राच्या मुळावरच कुठार घातल्यासारखे होईल. रसेलच्या जडवादावर टीका करताना रा. गो. म. जोशी यांनी असेच म्हटले आहे इतरही अनेक पंडितांचे असेच मत आहे.
नीतीविशारदारांच्या या आक्षेपाला दोन प्रकारे उत्तर देता येईल. एक म्हणजे मन जड कोटीत घातले तर नीती-आनीतीचा उपदेश व्यर्थ आहे हे त्यांचे विधान बरोबर नाही. त्याची मीमांसा पुढे येईलच; पण दुसरे असे की. जडवादावर त्यांनी जो आक्षेप घेतला आहे तो त्यांच्यावरही तितक्याच जोराने परत फिरतो हे ते विसरतात. धर्मशास्त्रामध्ये कर्मविपाकाचे महत्त्व फार आहे. आणि कर्माचे नियम कठोर व दुर्लंघ्य आहेत असे म्हणतात. कर्मचत्र एकदा सुरू झाले म्हणजे त्यांत कधी खळ पडत नाही. जी जी कृत्ये मानव करतो त्या त्या कृत्यांची फले म्हणजेच त्याचे कर्म हे मेल्यानंतरही त्याच्याबरोबर जात असते. इतकेच काय, पण एका महाप्रलयानंतरही ते नष्ट न होता प्रत्येक जीवाच्या वाटणीला ते जसेच्या तसे येते; आणि जीव एकदा कर्मबद्ध झाला म्हणजे चांगले वाईट करणे हे सुद्धा त्याच्या हाती नाही; इच्छा नसताही मनुष्यांच्या हातून पापे होतात, असे गीताकारच म्हणतात. मनुष्याला वासना होतात त्याही पूर्वकर्मानुसारच होतात व त्याची बुद्धी हीसुद्धा कर्मानुसारिणीच असते. जडवादामध्ये मागल्या क्षणाच्या कारणामुळे पुढच्या क्षणाचे कार्य होत असते व मनाला स्वातंत्र्य नसते; तीच स्थिती कर्मवादात निर्माण होते. मागल्या कारणावर पुढचे कार्य असे न म्हणता मागल्या कर्मावर पुढची वासना व वर्तन अवलंबून असते असे म्हणावयाचे इतकाच फरक. कर्माचा हा नियम न मानावा तर कृतकर्माची फळे भोगावी लागत नाहीत, असे होऊन पुण्य कर असे सांगण्याला काहीच अर्थ राहाणार नाही; आणि जन्मतःच एक दरिद्री, एक श्रीमंत, एक शूर तर दुसरा भ्याड कां व्हावा याची उपपत्तीही नीट लावता येणार नाही. व मग मोक्षधर्मशास्त्राचा पायाच उखडला जाईल. यातून सुटण्यासाठी वेदान्ती आत्म्याची साक्ष घेतात. मी स्वतंत्र आहे. वाटेल ते करू शकेन असे जे मनुष्याला वाटत असते, त्यावरूनच कर्माने बद्ध अशा सृष्टीच्या पलीकडे स्वतंत्र अशी ब्रह्मसृष्टी आहे व आत्मा त्या ब्रह्मांचाच अंश असल्यामुळे त्यालाही स्वातंत्र्य आहे असे ते मानतात; पण आत्म्याची ही साक्ष फुकट आहे. मी स्वतंत्र आहे, हे जसे आत्म्याला वाटते तसेच मी ब्रह्माहून निराळा आहे असेही आत्म्याला वाटते; पण या दुसऱ्या वाटण्याला मात्र वेदान्ती भ्रम आहे असे म्हणतात हा जर भ्रम आहे तर 'मी स्वतंत्र आहे' असे वाटणे हाही भ्रम असणे शक्य आहे. आणि दुसरे असे की, ब्रह्माचा अंश म्हणून आत्मा जर स्वतंत्र धरावयाचा तर तो मुळातच बद्ध का व्हावा असा प्रश्न उत्पन्न होतो. पण मुळात तो बद्ध का होतो, हे आम्हास सांगता यावयाचे नाही असे वेदान्ती म्हणतात. माता हा केवढा द्राविडी प्राणायाम आहे पहा. ब्रह्म हे अविभाज्य व स्वतंत्र आहे. असे असताना प्रथम आत्मा त्यातून विभक्त होतो असे मानावयाचे. मग तो कर्माच्या कठोर कायद्यांनी बद्ध होतो असे मानावयाचे. मग मोक्षधर्माला जरूर म्हणून त्या आम्याची भ्रामक साक्ष घ्यावयाची व तिच्या जोरावर तो स्वतंत्र आहे 'तोही थोडासाच- कारण फार स्वतंत्र मानला तर नीतीशास्त्र ओरडेल) असे मानावयाचे; आणि मग त्या अर्धवट बद्ध मानलेल्या आत्म्याला म्हणावयाचे की, बाबारे, तू पूर्ण स्वतंत्र आहेस, आपण बद्ध आहो असे तुला वाटते तो भ्रम आहे, हे ध्यानात घेताच तू मुक्त होशील. अद्वैत सांगताना म्हणावयाचे की, ब्रह्म, व आत्मा हे एकच आहेत व आत्म्याला आपण निराळे आहोत असे वाटते तो भ्रम आहे. कर्मवाद सांगताना म्हणावयाचे की कारणे सांगता येत नाहीत हे खरे; पण आत्मा बद्ध होतो हे खास, आणि पुन्हा मोक्ष कसा मिळेल असे विचारताच, आत्म्याची साक्ष काढून तो स्वतंत्र आहे असे ठरवायचे. वेदान्ताचा हा असा गोंधळ आहे, आणि वेदान्ताचाच आहे असे नाही. तत्त्वज्ञानाची कोणचीही शाखा गोंधळावाचून अशक्य आहे.
कर्माच्या नियमांनी आत्मा बद्ध होतो, असे तरी म्हणावे किंवा होत नाही असे तरी म्हणावे; किंवा कर्माचे नियम तितकेसे कठोर नाहीत, काही कर्माची फळे कदाचित् न मिळणे शक्य आहे असे तरी म्हणावे पण यातला कोणताही पक्ष धर्मशास्त्राला स्वीकारणे शक्य नाही. ते आपल्या सोयीप्रमाणे आत्म्याला थोडासा स्वतंत्र मानणार, आणि सगळे मानण्या न मानण्यावरच अवलंबून असेल तर शास्त्र कशाला सांगता असे विचारले तर उत्तर मिळणार नाही. यावरून असे दिसेल की कार्यकारणभाव पतकरण्याने जी अडचण येते तीच कर्मवादात येते आणि याच्याही पुढे जाऊन असे म्हणता येईल की कार्यकारणभाव पतकरण्याने वरील अडचण नाहीशी होते. इतकेच नव्हे तर नीतिनियमन हे जडवादालाच फक्त शक्य आहेत. कसे ते पहा.
जडवाद्यांच्या मताने मन व इतर पदार्थ यांत तात्त्विक फरक मुळीच नाही. मनाचे व्यापार फार सूक्ष्म व इतरांचे स्थूल इतकाच फरक. हे ध्यानात ठेवले तर नीतिनियमन याच पंथांत कसे शक्य आहेत ते ध्यानात येईल. फुलांचा जसा वास, शब्दांचा जसा नाद, तशाच मनाच्या रागद्वेषाच्या उर्मी आहेत. एखाद्या झाडाच्या कुजक्या फांद्या तोडून टाकून त्याच्या बुडाशी खत पाणी घालणे हे जितके साधे आहे तितकेच मनाच्या उर्मी म्हणजे रागद्वेष हे तितक्याच सूक्ष्म अशा दुसऱ्या रागद्वेषाने बदलणे साधे आहे. झाडांच्या कुजलेल्या फांद्या म्हणजे काही कणांचा समूह चाकूने म्हणजे दुसऱ्या काही कणांच्या समूहाने जसा आपण दूर करतो तशाच मनातल्या अधम किंवा कुत्सित भावना हा जो अत्यंत सूक्ष्म कणांचा समूह तो प्रेमाने किंवा क्रोधाने म्हणजे दुसऱ्या तसल्याच सूक्ष्म कणसमूहाने दूर करावयाचा म्हणजेच नीतिशास्त्र सांगावयाचे.
येथपर्यंतच्या विवेचनावरून असे ध्यानात येईल की प्रत्यक्ष अनुभव. अवलोकन प्रयोग यांच्या साह्याने मिळविले ले जे ज्ञान तेच सर्वांत जास्त विश्वसनीय असते. व आधिभौतिक शास्त्र ही याच पद्धतीने ज्ञान मिळवीत असल्याकारणाने धर्म- अधर्म, नीती- अनीती हे सर्व त्यांच्याच आधाराने ठरविले पाहिजे. अतींद्रिय सृष्टीतले ज्ञान मिळविण्यास आपणास काहीच साधन नाही. अंतर्दृष्टी हे साधन अगदीच भ्रामक व अविश्वसनीय आहे असेही आपण पाहिले. त्याचप्रमाणे भौतिक शास्त्रावर त्यांच्या विरोधकांनी किंवा अर्धवट मित्रांनी जे आक्षेप घेतले आहेत त्यांतही काही जीव नाही असेही आपल्या ध्यानात आले. आता या भौतिकशास्त्रांचा सल्ला दर ठिकाणी आपणास कसा कल्याणकारक होईल हे निरनिराळ्या क्षेत्रांतली उदाहरणे घेऊन विशद करून दाखविले की या प्रकरणाचे काम संपले.
एक विवाह हाच विषय घेतला तर त्यांत शरीरविज्ञान, अर्थशास्त्र, जीवनशास्त्र, मानसशास्त्र इत्यादि अनेक शास्त्रांचा सल्ला घेऊनच काय ते निश्चित करावे लागेल. कोणाच्या दोन गटातील स्त्री-पुरुषांचा विवाह व्हावा हे तसले विवाह जेथे झाले असतील तेथे त्याचे परिणाम काय झाले हे पाहूनच ठरवावयास पाहिजे. आपल्या स्मृतीत याचा विचार केला असेलच असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. कारण केला आहे की नाही ते त्यांनी दिले नाही. विचार करून कारणमीमांसा ठरवून जर त्यांनी नियम सांगितले असतील तर ते नियम पुन्हा तपासून पाहून नव्या परिस्थितीत हितावह आहेत की नाही हे पाहण्यास काहीच हरकत नाही. तेव्हा स्मृतीतील विधाने विचारात घ्यावी हे खरे. आधिभौतिक शास्त्रांच्या कसोटीवर घासल्यावाचून ती प्रमाण मानू नयेत इतकाच भावार्थ. कारण ब्राह्म, गांधर्व वगैरे विवाहपद्धती सांगून अमक्या वर्णाला अमकी हितकर असे जे मनूने सांगितले आहे, त्यात काही अर्थ नाही. कोणचेही विज्ञान त्याला पाठिंबा देणार नाही. वधूवरांच्या वयाबद्दलचे तसेच सकरजप्रजेसंबंधीचे मनूचे म्हणणे टिकण्याजोगे नाही. या व इतर बाबतीत अर्वाचीन संशोधकांनी पुष्कळच अभ्यास केला आहे. आते- मामेबहिणीशी जे लग्न करतात त्यांच्या संततीत वेडेपणा, मानसिक दौर्बल्य फार अढळते असे एक शास्त्रज्ञ म्हणतो. वधूवरांच्या वयांत दहापेक्षा जास्त अंतर असू नये असे दुसऱ्याने म्हटले आहे. आईच्या व मुलीच्या प्रसवशक्तीत, आनुवंशिक संबंध काही नाही असे तिसऱ्याने सांगितले आहे. तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार विवाह- प्रकरणी व्हावयास पाहिजे. धर्मशास्त्रात अमुक सांगितले आहे एवढा आधार कोणच्याही गोष्टीला पुरेसा नाही. पुनर्विवाह करावा की न करावा हे त्या विवाहाने त्या स्त्रीच्या अपत्यावर व एकंदर समाजावर परिणाम काय होईल ते पाहूनच फक्त ठरविले पाहिजे. परलोकाचा कोणताही विचार समाजविचारात घुसू देता कामा नये. कारण परलोक अजून सिद्ध झाला नाही व तो असला तरी तो व त्याचे इहलोकाशी असलेले संबंध जाणण्यासाठी अंतर्दृष्टी या अत्यंत अविश्वसनीय साधनाखेरीज दुसरे साधन नसल्यामुळे त्याचा विचार करणेच शक्य नाही.
नीतिकल्पनांचा उदय व वाढ या आपल्या ग्रंथांत वेस्टमार्कने निरनिराळ्या धर्मांमध्ये- अगदी रानटी टोळयांपासून अत्यंत सुसंस्कृत समाजापर्यंत सर्व लोकांमध्ये कित्येक विचित्र नीतिकल्पना कशा रूढ होत्या ते सांगितले आहे. ते सर्व वाचले म्हणजे कारणमीमांसा न करतात केवळ धर्मक्षेत्रातल्या काल्पनिक कारणावर विसंबून समाजाचे नियम बनविणे कसे घातुक आहे, हे चांगले दिसून येईल.
बालहत्येची चाल तर जुन्या काळी अगदी सर्रहा चालू होती आणि ती केवळ रानटी टोळ्यांत नसून ट्युटॉनिक, चिनी, आरब, रजपूत यांसारख्या सुधारलेल्या लोकांमध्येही होती. त्यातल्या त्यात एक फरक मोठा ध्यानात घेण्याजोगा आहे. अथेन्स स्पार्टा, रोम या संस्कृत राष्ट्रांमध्येही बालहत्या मान्य असे. प्लेटो, ॲरिस्टॉटल यांसारखे पंडितही तिचा पुरस्कार करीत. पण हे लोक अलौकिक धर्मविचारांनी बालहत्या करीत नसल्यामुळे दुर्बल, रोगी अशी मुले तरच मारावी असा तरी विवेक ते पहात. असे पण धार्मिक समजुतीनेच जेथे बालहत्या होत असे तेथे दुर्बल मूल जगविण्यासाठी त्याच्याच सशक्त भावंडाला मारून त्याचे मांस दुर्बलाला भरविण्याची चाल असल्याचे आपणास दिसून येते. एक सोडून एक मूल मारावे अशीही पद्धत पुष्कळ ठिकाणी होती. यावरून धार्मिक समजुतीच्या बुडाशी कारणमीमांसा असणे किती जरूर आहे हे ध्यानात येईल.
वैवाहिक नीतीसंबंधी वरीलप्रमाणेच हकीगत आहे. ज्या चाली आपल्याला अत्यंत किळसवाण्या वाटतात, तसल्या कित्येक चाली रानटी व सुधारलेल्या लोकातसुद्धा धर्माच्या आज्ञा म्हणून पाळल्या जात असत. एकाच काळी स्त्रीने अनेक पती करणे, वधूचा प्रथम संभोग गुरु, राजा किवा टोळीचा नायक यांना देणे. मित्राला इतर आदरातिथ्याबरोबरच काही दिवस बायको किंवा मुलगी देणे या व असल्या कित्येक चाली कितीतरी देशांत रूढ होत्या प्रत्येक मुलीने ॲफ्रोडाइटच्या मंदिरात जाऊन प्रथम भेटेल त्या पुरुषाशी संगत व्हावे अशी बाबिलोनमध्ये रूढी होती. (जोसेफ मॅक्केबूकृंत Evolution of Marriage व लिओ मार्कन् कृत Prostitution in the ancient world ही पुस्तके पहा.) पण मागच्या चालींचीच उदाहरणे देण्याची जरूर आहे असे नाही आपली पत्नी व कन्या भक्तिभावाने सद्गुरूला अर्पण करून मोक्ष मिळविणारे लोक आजच्या सुशिक्षित समाजातही सापडतात. तेव्हा सायन्स हे मानवी संस्कृतीचे थडगे रचणार आहे असे सांगणाऱ्यांनी धर्माने काय रचले आहे हे जाणणे जरूर आहे.
आज सुशिक्षित म्हणविणारे जे आपण त्यांच्यातही अमक्या वारी अमुक खाऊ नये तमक्या वारी तमुक करू नये, परदेशांत गेल्याने पाप लागते व गोमूत्र प्यायल्याने ते जाते, असल्या वेडगळ समजुती दृढमूल होऊन बसल्या आहेत या सर्वाचे कारण हेच की आपला आचार चांगला की वाईट हे ठरविण्याची कसोटी काह तरी अलौकिक, आपल्याला न समजेल अशी, केवळ अंतर्दृष्टीनेच जाणता येण्याजोगी अशी असावी असे लोकांना वाटते. ही समजूत दूर होऊन प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या पायावर उभारून त्याअन्वये आचार ठेवावा असे लोकांना वाटू लागले तर समाजाच्या शक्तीचा चाललेला अपव्यय थांबेल असे वाटते.
धर्म, नीती, आचार हे सर्व आधिभौतिक शास्त्रांच्या कसोटीने स्वीकारल्यानंतर आपल्या समाजात एकदम क्रान्ती होऊन जाईल व नंदनवनाचे सुख खाली येईल असे म्हणण्याचा मुळीच उद्देश नाही. मानवाची बुद्धी मर्यादित आहे व विचारांपेक्षा विकारांची सत्ता त्याच्या मनावर जास्त चालते. त्यामुळे भौतिक शास्त्रे प्रमाण मानल्याबरोबर सुखाचे साम्राज्य पसरेल असे कधीच कोणी म्हणणार नाही. पण अंतर्दृष्टीपेक्षा, अवलोकन, अनुभव व प्रयोग ही ज्ञानसाधने श्रेष्ठ असल्यामुळे त्यांनी मिळविलेल्या ज्ञानावरून काही निष्कर्ष काढले तर ते जास्त सुखावह होतील, एवढेच सांगावयाचे आहे. चातुर्मासात कांदेलसूण खावे की नाही, शुद्धीसाठी गोमूत्र प्यावे की काय हे अंतर्दृष्टीवर उभारलेल्या धर्मशास्त्राला विचारण्यापेक्षा प्रयोगावर उभारलेल्या वैद्यकशास्त्राला विचारणे जास्त चांगले. धर्मशास्त्र हेही प्रयोगावरच उभारले आहे असे काही लोक सांगतात. तसे असले तर उत्तमच. कारण मग भौतिक शास्त्रात जसे आपण नित्य प्रयोग करून जुने चुकीचे ठरल्यास किंवा कमी हितावह ठरल्यास ते टाकून देऊन नवीन घेतो, तसेच धर्मांतही करता येईल. पण धर्मनिष्ठ लोक त्यालाच तयार होत नाहीत, म्हणून तर सर्व प्रश्न उद्भवतो. आहार, स्नानसंध्या, येथपासून पुर्नविवाह, जातिभेद येथपर्यंत सर्व प्रश्न जर धर्माने विज्ञानाच्या साह्याने सोडविले तर मग वादच राहाणार नाही.
भौतिक शास्त्रे ही मानवाची वासना पूर्ण करण्याच्याच कामी फक्त उपयोगी पडतात, व मानवाची वासना पूर्ण करू पाहणे हे सशाच्या शिंगाचा शोध करण्यासारखे आहे म्हणून ती शास्त्रे फार कमी दर्जाची आहेत, असे रा. गो. म. जोशी यांनी म्हटले आहे. पण मानवाची वासना मुळातच नाहीशी करून टाकणे, इतकेच काय पण तिला इष्ट वळण लावणे, हे जे धर्मशास्त्राचे काम ते कितपत शक्य आहे व शक्य झाले आहे ते कोणास सांगावयास नकोच आहे. तेव्हा धर्माचा हा प्रयत्न कोणाचे शिंग शोधण्यासारखा आहे ते जोशांनी एकदा जाहीर करावे. वास्तविक नीती व विज्ञान या दोन्ही गोष्टी समाजाला सारख्याच महत्वाच्या आहेत. विज्ञानाने सामर्थ्य निर्माण होते. त्याचा मानवाला कल्याणप्रद उपयोग कसा करावा हे नीतिशास्त्र सांगते. पण उलट नीती काय व अनीती काय हे ठरविण्याला परिस्थितीचे जे ज्ञान लागते ते विज्ञानावाचून अशक्य आहे. म्हणून या दोहींचे महत्त्व ज्या समाजात सारखेच मानले जाईल, व धर्म, नीति व आचार हे विज्ञानाच्या पायावरच जेथे उभारले जातील तोच समाज समर्थ व सुखी होईल यात शंका नाही.
आधिभौतिक शास्त्रांचे अधिकार.