Jump to content

वाहत्या वाऱ्यासंगे/वाहत्या वाऱ्यासंगे ...

विकिस्रोत कडून

वाहत्या वाऱ्यासंगे ...


 वाहत्या वाऱ्यासंगे धावणारे मन प्रत्येकाच्या ओंजळीत असतेच, परिस्थिती, पंथ, धर्म, लिंग, देश, जात आदींचे बांध, भिंती घालून आम्ही त्याला पार कोंदटून टाकतो. त्या भिंतींचीही मग सवय होऊन जाते आणि अंधारच उजेड वाटू लागतो. बे एकं बे, बे दुणे चारचा पाढा म्हणण्यात बे दाहे वीसच्या अखेरच्या मुक्कामावर कधी येतो ते कळत नाही. भिरभिरत येऊन माथ्यावर पडणारे लिंबाचे पान, डोळे मिचकावित खुणावणारी फुले, रस्त्यावरून जाणारी तहेतऱ्हेची माणसे... असे कितीतरी. या साऱ्यांकडे आम्ही पाहतो रोबोटच्या नजरेने. यंत्रमानवाच्या निरंग नजरेने.
 पण कधी कधी, अगदी अचानकपणे या भिंतीलाही एखादी चीर पडते. निमित्त काही का असेना पण चिरीतून उजेडाची तिरीप थेट आता येते. नि मन त्या इवल्याशा फटीतून निसटते ते थेट आभाळापर्यंत जाऊन पोचते. वाऱ्याचे बोट धरून, घरादारात... पानाफुलात... डोंगरदयात... नदीतळ्यात अगदी मन मानेल तसे मुक्तपणे भटकत रहाते. अगदी तनामनातही घुसते. इथे ... तिथे डोकावत अनुभवांचे रंगविभोर क्षण ओंजळीत साठवून ठेवते.
 आणि मग कधी कधी, शब्दांना किरणांचे मृद्गंध लखडून जातात.
 ... मन केवढं केवढं
 जसा खाकसाचा दाना
 मन एवढं एवढं
 त्यात आभाय माईना ...
 दिवसरात्र मातीत घाम गाळून संसार सावरणाऱ्या मनातलं गुज जात्याच्या कानात मोकळं करणाऱ्या, जगाच्या दृष्टीने अडाणी-निरक्षर असणाऱ्या बहिणाबाईच्या शब्दात उगवाईच्या दिशा रुणझुणू लागतात. आभाळ, घरटं, जातं, तवा यांनाही अमरत्व लाभते.
 तर अशी ही उजेडाची चिरी
 आज काळ पुढे चाललाय. बंद घरांच्या खिडक्या आता उघडू लागल्या आहेत. संवादासाठी शिड्या व पायऱ्याही नसलेली चार मजली चिरेबंदी इमारत आता हलू लागलीय. तिथेही जिने, पायऱ्या उगवायला लागल्या आहेत. आणि अनेकांची मने वाऱ्याचा शेव धरून. अवतीभवती उघड्या डोळ्यांनी कुतुहलाने पाहू लागली आहेत. सगळ्यांच्या शब्दांना उगवाईचा मृदगंध लाभत नाही.
 ... मज नकळत कळते कळते
 गंधातून गूढ उकलते...
 भवताली सतत लहरणाऱ्या जीवनाचे गूढ नकळत कळण्याची वा जाणण्याची तरलता सर्वांनाच नाही लाभत. पण म्हणून काय झालं ? वाहत्या वाऱ्यासंगे सैरभैर उनाडणाऱ्या मनाने ओंजळीत घट्ट पकडून ठेवलेल गहिरे क्षण मोकळ्या आभाळाखाली मांडून ठेवावेसे वाटतातच! आणि पुनःपुन्हा अनुभवावेसे वाटतात. आपल्या हातावर ठेवावेसे वाटतात.
 राजस्थानात रांगोळीला 'मांडणा' म्हणतात. 'मांडणा' जणू मनातून उमटलेल्या रेषांची लय पकडण्याचा प्रयत्न.
 तर अशा काही क्षणांचा हा मांडणा. 'वाहत्या वाऱ्यासंगे.' तसाच हा एक प्रयत्न, वाहत्या वाऱ्यासंगे, उनाडणाऱ्या मनाने अनुभवलेल्या लयीचा, रेषांचा. मांडणा रेखाटण्याचा!

प्रा. शैला लोहिया