वाहत्या वाऱ्यासंगे/बेशरमीची झाडं

विकिस्रोत कडून

बेशरमीची झाडं



उर्मिला

 प्रिय मनू,
 तुला भेटून गेल्यापासून तुला पत्र लिहायचं म्हणतेय. पण त्यासाठीही सहा महिने घालवावे लागले. किती अचानक भेटलीस तू? भीमाशंकराच्या निमित्ताने त्या एवढ्याशा गावात मी आले. आणि लहान लहान झोपड्यांचं हॉस्पिटल आणि शाळा पाहून फाटकाच्या आत शिरले. तर काय, तिथे चक्क तू होतीस ! दोन मिनिटे डोळे फाडफाडून पहात होते मी! की खरंच तू आहेस ना? तुझं झोपडीवजा घर. आदिवासींच्या मनातला माणूस जागा करण्यासाठी रात्रंदिवस धुंद होऊन काम करणारा तुझा नवरा. शाळेत रमलेली तू. तुझ्या घरात, तुझ्या बिछान्याजवळ असलेली, सायलीच्या कळ्यांनी भरलेली नाजूक टोपली. टेबलावरचे तुझ्या मुलांचे फोटो, त्यांची पत्रं. तू प्रेमाने खाऊ घातलेले नारळाच्या दुधातले पोहे. या साऱ्या गोष्टी मला आठवताहेत. खरं तर किती कमी बोललो आपण! हातात हात घेऊन नुसत्या हसत होतो. हसण्याचा पहिला बहर ओसरून बोलायला लागणार, तेवढ्यात माझा नवरा गाडी घेऊन मला शोधत तिथे आला. घाईघाईने मला घेऊन निघून गेला. मी त्या दिवसापासून अस्वस्थ आहे. तो मला घ्यायला आला तेव्हा धड बोलण्याच्याही अवस्थेत नव्हता. तुमच्याशी किती नाटकी बोलला तो ! आठवलं तरी लाज वाटते मला. तू कुठल्यातरी बंगाली डॉक्टरांशी लग्न करणार असल्याची बातमी उडत उडत आमच्यापर्यंत आली तेव्हा आम्हाला तुझ्या नवऱ्याबद्दल खूप उत्सुकता वाटली होती. खरं सांगू ? तू हे धाडस करत आहेस त्याबद्दल अगदी खोल खोल ...मनाच्या तळात असुयाही वाटली होती. पण तरीही, असलं जातीबाहेरचं लग्न करून तू सुखी होशील असं मुळीच वाटलं नव्हतं. एका सरळ रेघेतलं मध्यमवर्गीय आयुष्य जगणाऱ्या आम्हां मुलींना तो एक अगोचरपणा वाटला होता. प्रेम करणं म्हणजे काहीतरी आचरटपणा करणं हीच आमची समजूत तोच आचरटपणा आम्हीही केला. पण आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली ! पहिली रात्रसुद्धा भटजीबुवांच्या मंत्रांनी युक्त आशार्वादाने साजरी केली. तुला आठवतं? माझं लग्न ठरलं तेव्हा आपण ज्युनिअर वी.ए ला होतो. साखरपुडयाच्या वेळी माझ्या बाबांनी पाच हजार रुपयांचा चेक माझ्या नवऱ्याच्या हाती समारंभपूर्वक दिला. मीही दागिन्यांचा घाट आणि वजन निरखण्यात गर्क होते. माझ्या लग्नासाठी वावांनी दहा हजार रुपयांचे कर्ज काढलं. पण त्यात मला काहीही गैर वाटलं नाही त्यावेळी. उलट वाटलं. मला इंजिनिअर नवरा मिळून माझा भविष्यकाळ सुखी जायचा असेल तर त्यांनी एवढा खर्च लग्नात करायला हवा. कॉलेजमध्ये येताना खुळ्यासारख प्रदर्शन करायची मी माझ्या साड्यांचं आणि दागिन्यांचं.
 लग्नानंतर उटकमंडला गेलो. नवरा, नव्या साड्या परदेशी वस्तू आणि मी. त्या पसाऱ्यात धुंद होत गेले. प्रणयाचे रंग गडद होण्यासाठी दारू हवीच हा माझा अडाणी गोड गैरसमज.
 पहिली दोन वर्षे भिंगरीसारखी गेली. गौतमीच्या वेळी दिवस राहिले आणि मी थोडा जमिनीवर उतरले.
 तीन महिन्यांच्या गौतमीला घेऊन घरी आले तेव्हा लक्षात आलं की नवरा दारूच्या कवेत गेलाय. आणि दारू घेतली की त्याला बाई लागतेच. मग ती कुणीही असली तरी चालते. मीही त्याच्या दृष्टीने वाईच होते. पण आई झाल्यामुळे माझ्यातले वाईपण हरवत चालले होते. त्याला जे हवं असे ते मला देता येत नसे. मग काय वाट्टेल ते ! कधी कधी त्याचे मित्र, त्याचे सहकारी, रात्री उशिराने त्याला घरी आणून टाकीत.
 चार वायकांच्यात जायचीही मला लाज वाटू लागली. गेल्या सहा वर्षात तर मी स्वतःला इतरांपासून खुडून घेतलंय. मध्यन्तरी धाकट्या नणंदेला जवळ ठेवून घेतलं होतं. पण तिच्या मैत्रिणीवरही याची नजर गेली.
 माझी गौतमी आता मोठी होत चालली आहे. खरं तर तिलाही खूप एकटेपणा वाटतो. पण तिला दुसर भावंड देण्याची ताकदही या दारूमुळे संपली आहे. माझ्या घरात परदेशी रेकॉर्डप्लेअर आहे, टेप आहे, मिक्सर आहे, फ्रीज आहे, खूप काही आहे... मीही आहे.
 कधी कधी वाटतं, गौतमीला या घरापासून दूर एखाद्या वसतिगृहात ठेवावं. पण तेवढाच एकुलता एक रेशमी तुकडा माझ्या जीवनात आहे. तिच्या वडिलांना सोडून, दूर कोठेतरी एकटं राहण्याचा विचार माझ्या मनात खदखदतो आहे.
 पण मना, कुठे जाणार मी? बाबा आता नाहीत. आईच हेमंताकडे रहाते. माझ्या लग्नाचे कर्ज हेमंताने फेडले. त्या दहा हजारात माझ्या उभ्या आयुष्याचं सूत्र माझ्या नवऱ्याच्या हातात देऊन टाकलं सर्वांनी. चार दिवस माहेरी गेले तर कौतुकाने वहिनी माहेरपणा करीलही. पण हक्काचा आधार शोधण्यासाठी माहेरी जाण्याचा हक्क मी गमावला आहे.
 आणि गेल्या वर्षी पस्तिशी ओलांडली मी माझ्या एम.ए. च्या डिग्रीला काय किंमत आहे या क्षणी ? नुस्ते कागद आहेत ते माझ्यासाठी. माझ्या दारुड्या नवऱ्याच्या पगारातले निम्मे तरी पैसे गौतमी अन् माझ्यासाठी मिळतील अशी कुठे आहे सोय ? आहे असा कायदा ?
 माझा नवरा क्लास वन ऑफिसर आहे. कामं कशी करायची आणि करवून घ्यायची हे तो चांगलं जाणतो. त्याचं दारू पिणं, स्त्रियांचा उपभोग घेणं हे समाजाला बोचणार कसं ? उलट त्यानं दारू प्यायलाच हवी. त्याच्या पोझीशनसाठी. अलीकडे त्याचे हात थरथरतात. शुद्धीवर असला की इतकं लाघट बोलतो की माझा ताठरपणा गळून जातो. आणि सहवासाने, संस्काराने निर्माण झालेला आपलेपणा मुळासकट करवाडून काढताही येत नाही. समजेनासं झालंय मला नेमकं काय करू मी ते !
 गौतमच्या भविष्यासाठी नवरा, घर, वैभव यांच्याकडे पाठ फिरवून, स्वतःचं अस्तित्व शोधून कर्तृत्वाची जमीन शोधून ताठ उभी राहू ? की गौतमीच्याच पालनपोषणाची आणि लग्नाचीही सोय व्हावी म्हणून फ्रीजवर ठेवलेला चकचकीत प्लॅस्टिकचा फ्लॉवरपॉट बनून इथेच राहू मी ?
 मना, हे सारं करताना गौतमीचा मी ढाल म्हणून उपयोग करतेय का? की मलाच स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा आहे ?
 तुझा संसार पाहून खूप तृप्त झाले मी. आता पायांखाली जमीन सापडतेय असंही वाटू लागलंय. जीवनातला फार मोठा निर्णय घेऊन तुझ्याकडे आले तर, मला हवं असलेलं घर आणि मला हवी असलेली पायाखालची जमीन मिळवून देण्यासाठी तू आणि तुझे चारुदत्त मदत करू शकाल का ?
 मन्नू, मनात जे जे आलं ते लिहून टाकलं. तुला वाटलं तर हे पण पत्र फाडून टाक. पण लिहिल्यानंतरही कसं निवान्त वाटतंय मला !
 या निवान्तपणातूनही पुढचा रस्ता दिसेल.

तुझीच
उर्मिला


 ...माझ्या हातात ते पत्र आहे.
 उर्मिलेला हवं असलेलं घर आणि जमीन देण्याचं सामर्थ्य माझ्यात तरी आहे का? आपलं घर आणि ही जमीन आपली आपणच निर्माण करायला हवी
 या कणखर जमिनीच्या आधाराची आवश्यकता उर्मिलेला आज का होईना पण वाटली.
 अशा हज़ारो उर्मिला सजून नटून काचेच्या महालात निर्जीवपणे बसल्या आहेत. त्यांना कोणी जाग आणायची?
सकीना
 ही सकीना. चार मुलांची आई काळीसावळी हातपाय फुलवातीगत काटकुळे, केस नेहमीच पिंजारलेले . फंकर मारली तर उडून जाईल अस शरीर उदास डोळे , कधी कधी कुठेतरी हरवून जाणारे पण ओठावर मात्र हलकस हसू नेहमीच रेंगाळत असतं.
 हिचा नवरा ममदू. मजुरी करतो. कधी कधी रिक्षापण चालयता दिवसाकाठी दहापाच रुपये कमावतो. पण सहा माणसांचा ससार एकट्याला रेटत नाही. मुल नेहमीच भुकेली असतात. इतर रिक्षावाल्यांपेक्षा ममदू जरा वेगळा आहे तो मोर्चात पुढे असतो. सभांना आवर्जून जातो. कुणा रिक्षावाल्यावर अन्याय आला तर हा त्याच्यासाठी वणवण करतो. त्याच्या झोपडीत दोन फोटा अगदी कोवळ्या मनाने जपलेले आहेत , एक आहे राममनोहर लोहियांचा . कुठल्यातरी मासिकावर आलेला हा फोटो त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीत सुरेखपणे बसवलायं आणि दुसरा त्याचा स्वतःचा . कोणत्या तरी सत्याग्रहाच्या वेळी घेतलेला.
 तो शुद्धीवर असला तर त्याच्या गप्पा काम वाजूला ठेवून ऐकण्यासारख्या असतात. पण तो शुद्धीवर असणं हे कधीतरीच घडणार! त्यांच्या झोपडीशेजारी माझं दगडविटांचं घर आहे . ही झोपडी त्यांनी एका दिवसात उभी केली. ममदूने लाकडं आणून टाकली. पोरांनी नाल्याच्या कडेला उगवलेल्या वेशरमीच्या लवचिक फोकांचा ढीग जमवला . ही बेशरमीची झाडं कुठेही उगवतात . जरासं पाणी मिळालं की वस!
 जांभुळफिक्या रंगाची फुलं अंगाअंगांवर फुलवीत शेतांच्या , पांदीच्या कडेने बेशरम उभी असते . कितीही तोडली तरी तिला धुमारे फुटतच असतात. या वेलींची उभीआइवी वीण विणून सकीनाने झोपडीचे पट विणले . शेणमाती कालवून ते लिंपून घेतले . उकिरड्यावर पडलेले आरशाचे तुकडे आणून ते मातीत मढवून भिंतीत बसवले . एक तुकडा बाहेर नि एक आतल्या खोलीत. त्या दिवशी मी सारखी खिडकीत येऊन उभी राही.
 झोपडीचं... उभ्या राहणाऱ्या झोपडीचं कौतुक पहाताना मला राम-सीतेच्या झोपडीची आठवण झाली. ती पण अशीच असणार ! लक्ष्मणानं लाकडवेली आणून टाकल्या आहेत , राम लाकडाची मेख रोवतोय , सीता मातीचा चिखल करतेय...
 झोपडी उभी राहिली . ममदून अंगण दाबून घेतलं. सकीनाने शेणाचा दाट सडा घातला. माझ्या नि तिच्या लेकींनी रांगोळीची चित्रे अंगणात रेखाटली. रात्री सुखावलेली सकीना म्हणाली, "भावी, तुमी शेजार दिलात .लई चांगलं केलं. आता यानले तुमचा नि दादांचा धाक ऱ्हाईल. दारू कमी व्हईल. माजा मार टळेल . पोरं सुखानं घास खातील , भौत अच्छा हुआ." चारआठ दिवस कसे छान गेले ! एक दिवस दिवलागणाच्या वेळी शजारी कल्ला झाला म्हणून वाहर आलं , तर काय? ममदू दारू पिऊन तर्रर्र, सकीनाशी झटतोय. पोरं कसनुशी होऊन वाहेर उभी आहेत , हे दृश्य.
 "कौन आया था इधर ? बोल . साली की चमडी उखाड दूंगा. कुनासंग बोलत व्हतीस ? आँगनसे बाहर आयी तो देख . वेशरम कही की !" आणखीनही खूपसं , न ऐकवणारं तो वडवडत होता. ते सारं असह्य होऊन मी अंगणात आले.
 त्याला रागावू लागले तर सकीनाच माझी समजूत घालू लागली. "भावी , आता ते मानसात न्हाईत. कुछ मत बोलो उनको. दारू हाय ती . माजी सवत.".
 तिचं बोलणं ऐकून तो आणखीनच उखडला. "गप ए. मी पुरुस हाय. मी काई वी करीन. तू वाईपरमानं रहा. आपल्या लोकात चार बाया करतात. पन आनली का तुला सवत ? तेरेकू मेरी किंमतच नई . किसी के साथ वात करी तो देख , कुऱ्हाडसे दो टुकड़े कर दूंगा."
 दर चार-आठ दिवसांनी हा गोंधळ असे . हळूहळू दररोजच हे घडू लागलं. कधीमधी सकीना दुपारी घरी येई . मन मोकळं करी. " भावी, मला वाटतं चार घरी काम करावं, गोधडी लई छान शिवता येते मला गोधड्या शिवाव्या. चार पैसे मिळवावे. पोरानला पोटभर खाऊ घालावं. पर या वावाला माजा इसवासच येत नाय. तरी तुमी पहाताव मला . अंगाला माती लावून ऱ्हाते मी. कधी कधी वाटतं जावं वापाच्या घरला. पन ही पोरं, ही झोपडी, पाय मागे वढतात."
 एके रात्री तर कहर झाला.. सकीनाला नाकातून रक्ताची धार लागेस्तो मारलं. पोरं अम्मीको वचाओ करून ओरडताहेत. मी सुन्नपणे घरातून सारं ऐकत होते. वाहेर जाण्यासाठी मन तडफडलं. पण बाहेर जाऊन काय करणार होते मी ? त्याच्या लेखी मी कोण होते?
 सकाळी सकीना आली . डोळे सुजलेले . हातावर , गालावर वळ , म्हणाली, "मै जाती हू . दोन पोरीनला घेऊन जाते. एक पोरगी नि एक पोरगं राहतील वापासंगं. वाप त्यानला ईख चाराल नाय तर हिरीत लोटील. मी कुनाकुनाची काळजी करू ? नि कुठवर मार खाऊ ? वापाच्या घरी तरी वसून थोडंच खायला मिळणार आहे? चार धरी कामं करीन , इज्जतीनं राहीन."
 थोडी पुढे जाऊन ती परत माघारी आली नि हलक्या आवाजात बोलली." लक्ष ऱ्हाऊद्या पोरांवर उपासी ऱ्हायली तर भाकरतुकडा द्यावा , मी तुमचे उपकार ठेवून घेणार नाई ."आणि तटकन वळून निघून गेली.
 चार दिवस गेले. आठवडा गेला. एक दिवस सकाळी सकीनाचा आवाज ऐकल्याचा भास झाला , माझी लेक कुंपणावरच्या वेलीवरच्या उसावरच्या शेंगा तोडीत होती. तिच्याशी सुलताना ,सकीनाची लेक बोलताना दिसली. मी न राहवून वाहेर आले. सकीना घरापुढचं अंगण झाडत होती. मला पाहून ती रुखंफिकं हसली.
 "देखो ना. चार दिनमें कितना उखाड दिया है आंगन. और घरमें देखो ! एवढी मेहनत करून चूल घातली मी . नुसती इखरून विखरून टाकलीय . वाई विना कळा नाय घराला." मी नुसती तिच्याकडे वघत राहिले. बहुधा माझ्या नजरेने तिला प्रश्न विचारला असावा.
 तू आलीस सकीना? आपल्या पायांनी ? पराभूत होऊन?
 ती हातातला झाडू कमरेशी धरुन जवळ आली. हलक्या आवाजात वोलू लागली , "भाबी , माँ के घरमें कौन है अपना? इनके पल्लोमे डाल दिया है . इधरीच ठीक है . आन जाणार कुठे? मी मेले तरी यानला वायकू भेटेल . पन पोरानला माय मिलेल का?
 "तुमी एवढ्या शिकला. भाईर जाता , भासनं देता. पन दादा वसकतातच की तुमच्या अंगावर ! हम औरताँ तो क्या, बेशरम के झाडा है...आम्ही बाया, बेशरमीची झाडं आहोत. किती वी तोडा, किती वी कापा , अमाले पानं फुटायचीच!"
 वेशरमीची दिशाहीन , रसहीन , निस्तेज पण जिवंत झाडं . इथे तिथे जीव धरुन जगताना पाहिली की जीव गुदमरून जातो. वाटतो ,
जुई कळ्यांनी आपले श्वास किती कोंडून घालायचे?
अनुबाई
 "वाई तुमचा परकल कसा पांढराफेक सोवच्छ धुतला वघा मी. या ना भाइर वगायला . दादांची पँट वी घासू घासू धुतलीया." अनुमावशी बाहेरून हाक मारीत वोलल्या.
 मी बाहेर गेले . दोरीवरच्या कपड्यांकडे डोळाभर कौतुकाने पहात ही वाई उभी होती . एकाच दिवशी भलामोठा धोवीघाट उरकल्याचा शीण कपाळावरच्या घामावरून काय तो जाणवत होता.
 अनुमावशीची लहर असते. कधीकधी धुवायला टाकलेले कपडे त्या खुशाल घडी घालून खणात ठेवतात . तर लहर आली की चादरीसकट सगळं घरदार धुवायला काढतील. सगळा दणका एकाच दिवशी उडवून देतील . वाईचा कामाचा उरक जसा जबरी तसा आवाजही जणू हजार पॉवरचा वल्व . मला नेहमी सांगावं लागतं, मावशी जरा हळू बोला . घशाला त्रास होईल तुमच्या. त्यावर त्यांचं ठोकर आवाजात मावशीचं उत्तर मिळणार ,"माझ्या घशाला लागलीय धाड !".
 स्वारी रंगात आली की खास आवाजात ओरडणारच. "बाई भाइर या. पितळेचं टीप कसं चक्क केलंय. तुमचं इस्टील झक मारील याच्या म्होरं."
 रुंदबंद दगडी वांधा . उंची भरपूर . भव्य कपाळ , गव्हाळ रंग , हसणारे बोलके टप्पोरे डोळे . कोऱ्या कपाळावरचं हिरवं गोंदवण आणि दणकट वागणंबोलणं, अशी ही आमची अनुमावशी, अनुसया पवारीण . कामाचा उरक दांडगा. पण ठोक कामच करायला सागा . बारीकसारीक. नाजुकसाजुक कामाचा मात्र कंटाळा
 "आज जग फ्रीज पुसता का अनुबाई ?" असं विचारलं तर रोखठोक सांगतील . "बाई तसली बारिकीची कामं नगा सांगत जाऊ.. लई भ्या वाटतयं बघा . आमची वैनी वी मला भाजी चिराया बसले की दहांदा सांगती की वन्सं फोड जरा बारीक धरा. मला दणदण भाकरी थापायला सांगा . फरशा पुसावा सांगा . रानातली कामं सांगा . धुणं धुवाया मांगा , पयला नंबर काढीन मी , पन नाजूक काम म्हटलं की जीवच लई घाबरा हुतो. वाटतं फुटतं की काय. हापटतं की काय . छातीत धाडधाड होतंय वघा."
 तिच्या या आगाऊ बोलण्याला वैतागून मीही फ्रीज पुसता पुसता म्हणते, "अहो शिका मग. माझ्या पाच माणसांच्या संसारात कुटून आणू असली मोटी कामं? कधीतरी भाजी चिरुन पहावी . खिडक्या नीटनेटक्या पुसाव्यात."
 त्यावर वाईचं उत्तर तयार . "वाई सोबतचा संसार करायची वेळ आली असता ना. तर समदं शिकले असते मी. पन हुवा जलम भावांचा संसार करण्यात गेला . आता कितीक दिस राहिलेत माझे? न्या झालं निभावून . आन हे वगा , म्होरल्या जलमात बी तुमच्याच घरी कामाला ऱ्हाईन . पन लगीन होन्या आगुदर बरंका . मग समदं वारीक , नाजूक काम शिकवा, आनं द्या लावून लगीन वी तुमीच ! चांगल्या नवऱ्यासंगं!" असं बोलून दिलखुलास हसणं.
 अनुवाईला असं मनभरून हसता येतं म्हणूनच ती स्वतःची दु:खं विसरू शकते. अनुवाईला तिच्या पवारीपणाचा काठोकाठ अभिमान आहे. मी कधी कधी मुद्दाम चिडवते तिला . "अनुवाई , पवारीण कशा हो तुम्ही ? भिशीण म्हणा की ! सासरचं आडनाच भिसे ना तुमचं?"
 अनुवाई उसळून उत्तर देणार. "हात त्याचा मुडदा वशीवला. कोन कुटला भिशा आनला हो? माजून धा दिस तरी नांदविलं का त्या दादल्यानं मला? आन नांदवणार तरी कसा? पुरुषात तरी जिम्मा होता का त्यों? नव्हता असं समदी म्हणतात. देवालाच म्हाईत ते. मला तरी कुठं अनुभाव हाय? माजा जलम पवारांच्या दारात गेला. मग पवारीणच की मी."
 एक दिवस थोडा अगोचरपणा करुन मी तिला म्हणालेच , " अनुवाई , उभा जन्म पवारांच्या अंगणात का घालवलात! पाट का नाही लावून घेतलात? तुमच्यात पाटाचं लगीन होतं ना?"
 तशी अनुवाईनं हातातलं काम टाकून दिलं आणि माझ्याकडे पहात ती कळवळून वोलली . "आता काय म्हणावं वाई तुम्हाला? एक डाव वोलला . पुन्ना नगा असं बोलू. पाटाची वाई काय पतिवरता असते? अवं कसा का असंना, घेवावामनासमुर त्याच्या पदरात टाकलं होतं मला माझ्या मायवापांनी. येक दिवस बी त्यांच्यासंगं सौंसार केला न्हाई मी . पन कितीवी झालं तरी नवरा व्हता त्यो. त्याची सर पाटाच्या नवऱ्याला कशी येईल? अवं त्याच्या नावानं कुकु ल्याले की चार महिने !"
 अनुबाईनं खाली बसकण मारली आणि आपल्या जलमाची चित्तरकथा तिनं सुरू केली. "आमच्या मायेला एक ईसाला कमी चार येवढी लेकरं झाली. त्यातली जगली फकस्त दोन. आमचे शिदूआण्णा मोठे. माजा लंबर खालून दुसरा. आमचे वडील देसायाच्या घरी सालदार हुते . शेतात भरपूर काम करायचे. खायला कमी न्हवतं. माझी माय एकतर गरवार असायची नाहीतर बाळातीण. लेकरू जलमताना चांगले असायचे. पन नंतर पोटाचा डबा व्हायचा नि दोन वर्षात मातीत जायचे.समदी अशीच गेली. शिदूअण्णांच्या पाठीला टेका द्यायला मीच काय ती जिती हाय. माझी माय शेतात कामाला जायची. भुईमुगाचे येल उपटायच्या कामात ती भाद्दर होती. भरपूर वाटा मिळायचा. खायलाप्यायला भरपूर व्हतं. पन शिवारात न्हाई शेत नि गावात न्हाई घर. आमच्या शिदू अण्णाला बायको कोणी देईना. तो ईसावर पाच वरसांचा झाला तरी गोसावीच ऱ्हाईला. माज्या बापाला लई घोर पडला. त्यानला वाटे. त्यांच्या समुर लगीन झालं न्हाई तर पुढे कोन पोरगी देणार? आन् तसाच पुढे म्येला तर वंसाचा दिवा कोन लावणार? त्यांना शांती कशी मिळणार? बरं शिदूआण्णा शिकलेला असता तर दिली असती कोनीतरी पोरगी. पण हा अंगठे भाद्दर. तो मोंढ्यात हमाली करी. शेवटी आमच्या धाकल्या चुलत्यांनी तोडगा काढला. त्यांच्या बायकुच्या म्हायेरी एक घोडनवरा होता. त्याची भैण न्हातीधुती होती तरी अजून बिनलग्नाची होती. चुलते म्हणाले अनशीला देऊ त्याला आन् त्याची भैन आपल्या शिदूअण्णाला करून घेऊ.
 "लगीन झालं तवा मी होते नऊ वरसांची. शिदूअण्णा होते ईसावर सात वरसांचे. मी लहान होते पण थोराड हाडाची होते. सासरी दुभतं होतं. सासू रोज सांजसकाळ मला दूध देई . बदामाचा नि वैदूच्या औषधाचा खुराक चारी. ती म्हणे, पोरगी थोराड हाये. खाऊपिऊ घातलं तर लवकर शाणी होईल. पोराला आसरांनी घट्ट धरून ठिवलं. देवऋषी लागीर यांनी उतार पडला नि तंवर पोरगी शाणी झाली तर निदान वंसाचा दिवातरी लागल. पन त्यो निव्वळ येडा होता. सांज झाली की जोरजोरात ओरडायचा. धान घान श्या द्यायचा. लई भ्या वाटायचं मला. जेमतेम महिनाभर ऱ्हाईले मी तिथे. पंचमीला म्हायेरी आले ती परत गेलेच न्हाई. माईने पोर लहान आहे म्हणून म्हायेरीच ठिऊन घेतलं. भादवा संपत आला होता. एक दिवस सांगावा आला की त्यो मेला म्हणून . लिवलं असेल, तसाच जलम जायचा! कशाला उगा घोर करून मन दुखी करायचं? तुकाराम बाप्पानं सांगितलंय न्हवं? ठेविले अनंते तैसेचि रहावे."
 अनुबाई हसत उठून कामाला लागली. चहा टाकताना माझ्या मनात आलं, संताच्या शिकवणुकीमुळे महाराष्ट्रातला पुरुषार्थ दुबळा झाला असं म्हणतात. पण हे ही खरं की त्यांच्या शिकवणुकीमुळे दीनदुबळ्यांना, बायाबापड्यांना स्वतःचं दुःख सोसण्याचं बळ मिळालं!

܀܀܀