Jump to content

वारकरीची जन्मकथा

विकिस्रोत कडून

वारकरीची जन्मकथा


 शेतकरी संघटना हे नांव आणि कल्पना आम्ही बरेच दिवस मनांत बाळगत होतो आणि त्याविषयी बोलत होतो. आम्ही म्हणजे बाबूलाल परदेशी, शंकरराव वाघ, बाबासाहेब मांडेकर अशी चाकणच्या परिसरातील पाच-सहा माणसं. १९७८ मध्ये कांद्याचे भाव पहिल्यांदा पडले तेव्हापासून ते १९८० पर्यंत चाकणच्या बाज़ारावर कांद्याच्या प्रत्येक हंगामात घारीच्या नजरेने देखरेख ठेवायची. १९८० मध्ये कांद्याचे पिक तर मोठं आलं आणि यंदा पुन्हा निर्यातीला परवानगी नसल्याने भाव घसरणार हे स्पष्ट झाले. तेव्हा संघटनेला काहीतरी मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करू लागलो. चाकण गावाच्या मध्यभागी एका खोलीवर पाटी लावली आणि त्या जागी बाजाराच्या दिवशी कार्यकर्त्यांनी तासभर तरी येऊन जावे, अशी जाहीरात केली. माझ्या आठवणीप्रमाणे पहिली बैठक झाली २७ ऑक्टोबर १९७९ रोजी. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे त्या दिवशी झालेला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे तातडीने साप्ताहिक चालू करायचे. साप्ताहिकाचे बाळंतपण काही लहान नाही. त्याचं नाव आधी ठरवावं लागतं, ते नाव दिल्लीहून मंजूर करावून आणावं लागतं, लेख, छपाई, पैशांची व्यवस्था, अनेक सव्यापसव्य उरकावी लागतात. अनियतकालीक काढले तर पुष्कळ अडचणी दूर होतात. अनियतकालीक म्हणजे ज्याचा निघण्याचा काही निश्चित कार्यक्रम नाही असे पत्रक. कधी दोन दिवसांनी तर कधी महिनाभरही निघणार नाही. त्याचं नाव काहीही असू शकतं. वर्गणीदार वगैरेची कटकट नाही. आवश्यकतेप्रमाणे किंवा सोयीप्रमाणे जेव्हा जमेल तेव्हा पत्रकाची प्रसिद्धी करायची, आज मागे वळून पाहिले म्हणजे असे वाटते की त्यावेळी अनितकालीक काढले असते तर जास्त योग्य झाले असते. निदान जास्त पेलवले असते; पण शेतकरी संघटनेच्या ताकदीविषयी व भविष्याविषयी जमलेल्या सर्वांच्याच मनात जबरदस्त आत्मविश्वास होता. अनियतकालिक काढणे म्हणजे पोरकटपणा वाटला. त्याऐवजी छोटे का होईना नियमित चालणारे साप्ताहिक काढावे. हे संघटनेच्या प्रतिष्ठेला व स्वरूपाला जास्त साजेसे वाटले. बाजारच्या दिवशी सगळ्यांनी एकत्र जमायचे. हेच त्यावेळच्या संघटनेचे मूळ स्वरूप. त्याच दिवशी जमणाऱ्या प्रत्येकाला साप्ताहिक देता आले तर सामुदायिक वाचन व चर्चा होऊ शकेल अशीही कल्पना. गावोगांव अंक गेला पाहिजे म्हणजे
चाकणच्या परिसरातील शंभर दिडशे गावात अंक पोचला पाहिजे. तिथे नुसता अंक पोचून उपयोगी नाही, तो वाचला गेला पाहिजे. चाकणच्या पश्चिमेकडील मावळ खोऱ्यामध्ये साक्षर माणसांचा दुष्काळच, मग गावोगावी तो अंक वाचून दाखविणाऱ्या माणसांची योजना पाहिजे. अशा सगळया कल्पनांनी साप्ताहिक काढायचे ठरले. ऑक्टोबर संपत आलेला. दोन एक महिन्यात कांद्याचा हंगाम सुरू होणार. एवढ्या काळांत सर्वकाही खटाटोप आटोपून अंक चालू करणे आणि तो गावागावात उभा करणे हे अशक्यच होते. दिल्लीहून नावाची मंजूरी यायलाच कितीतरी महिने लागतात. मग काय करावे ? बाबूलाल परदेशी हा पट्टीचा वक्ता तर आहेच, पण चाकण आळंदी परिसरात बरीच वर्षे नट आणि किर्तनकार म्हणूनही गाजत आहे. चाकणला झालेल्या 'संत तुकाराम' या नाटकाच्या प्रयोगाने खूपच उत्साह तयार केला होता. बाबूलालच्या वडीलांनीसुद्धा कीर्तनकार मुलाला साष्टांग नमस्कार घातला. देहू आळंदीच्या या परिसरात बाबूलालचा चांगला मान होता. कधीतरी पुढे मागे एक भक्तीमार्गी साप्ताहिक काढावे अशी त्यांची कल्पना होती. हे साप्ताहिक प्रामुख्याने आजीव सदस्यांनी दिलेल्या देणगींच्या व्याजातून चालेल असा आडाखा होता. या दृष्टीने 'साप्ताहिक वारकरी' या नावाला त्याने दिल्लीहून मान्यता आणून ठेवली होती. तशी मान्यता येऊन दोनतीन वर्ष होऊन गेली होती. पण साप्ताहिक चालू करायला बाबूलालला काही फुरसत नव्हती. त्याने साप्ताहिकाचे नाव आम्हाला देऊ केलं. शेतकरी संघटनेकरिता काढलेले साप्ताहिक आणि त्याचं नाव 'वारकरी' हे थोडं खटकलं आणि माझ्यासारख्या नास्तिकाला तर विशेष खटकलं. पण साप्ताहिक तातडीने चालू करण्याची इतकी निकड होती की काही काळ का होईना याच नावाखाली साप्ताहिक काढायचं ठरलं. निर्णय झाला. ३ नोव्हेंबर १९७९ रोजी पहिला अंक निघाला. २७ ऑक्टोबरला साप्ताहिक काढायचा विचार मनात आल्यापासून सात दिवसाच्या आत पहिला अंक प्रकाशित होतो हे अगदी मराठी पत्रकारितेतसदा मोठे दुर्मिळ असले पाहिजे. अंक निघायचा डेमी फुलसाईज या आकाराचा चारपानी. बाबूलाल परदेशींचा छापखाना. त्यांच्या छपाई यंत्राच्या सोयी प्रमाणे आकार वगैरे. पैशांची अडचण पहिल्यापासून असल्याने चाकणच्या बाजारपेठेतील आडते, तेल गिरण्या अगदी किराणामालाचे दुकानदार यांच्यासुद्धा जाहिराती घेतल्यावाचून गत्यंतर नव्हते. पण या 'साप्ताहिक वारकरी'ची भूमिका फार काटेकोरपणे ठरविण्यात आली होती. पहिल्या अंकापासून ते शेतकरी संघटनेचे मुखपत्र आहे हे अगदी स्पष्ट करण्यात आले. मुद्रक प्रकाशक
आणि संपादक शरद जोशी आणि कार्यकारी संपादक बाबूलाल परदेशी. पहिल्या अंकाचा प्रकाशन समारंभ करायचा ठरला. आज त्या प्रसंगाची आठवण आली तरी करमणूक झाल्याखेरीज राहात नाही. चाकण बाजारात एका ठिकाणी लहानसा मांडव घातला. कार्यकत्यांच्या पैकी कुणाच्या तरी ओळखीने एक लाऊड स्पिकरपण लावला. उद्घाटन समारंभाच्या वेळी संघटनेच्या सगळ्या कार्यकत्यांनी संघटनेचे असे काही चिन्ह लावावे, म्हणजे नंतर कांद्याचा बाजार चालू झाला की संघटनेचे कार्यकर्ते वेगळे दिसून यावेत अशी सोयही होऊन जाईल. कल्पना तर निघाली. एका बाजूला अंक तयार होत होता. दुसऱ्या बाजूला जाहिराती गोळा करणे चालले होते. आणि आम्ही शेतकरी संघटनेच्या चिन्हाचा काही नकाशा, आराखडा न बनवता चोवीस तासांत शंभर दोनशे बिल्ले मिळवायला निघालो. बाबूलाल परदेशीचे सगळे संपर्क जुन्या समाजवाद्यातले. चाकणच्या मामा शिंद्यांपासून ते पुण्याच्या डॉ. रमेशचंद्र ते मोहन धारियापर्यंत. डॉ. रमेशचंद्र समाजवादी पक्षातले मोठे संघटक मानले जायचे. त्यांच्याकडे आम्ही विचारायला गेलो बिल्ले कसे व कोठे तयार करायचे. डॉ. साहेब भेटलेच नाहीत. मला वाटते त्यांच्या धाकट्या भावाचा प्लॅस्टिक मोल्डींगचा छोटासा उद्योगधंदा होता. तो बाहेर पडता पड़ता भेटला. त्याला आमचं काम समजावून सांगितल्यावर, तो म्हणाला की प्लॅस्टिकचे बिल्ले तो दोन तीन दिवसांत बनवून देऊ शकेल. बिल्ला कसा असावा? त्यावर शेतकरी संघटना हे शब्द असावेत आणि रंग फक्त तांबडा आणि पांढरा असावा एवढंच काय ते आमच्या डोक्यात स्पष्ट होतं. अक्षरांची बांधणी किंवा मांडणी कुणाकडून तरी करून घेऊन मंजूर नामंजूर करायला वेळच नव्हता. आम्ही हे काम रमेशभाईंच्या भावाकडं सोपवलं व निघालो. त्या वेळी तयार झालेल्या प्लॅस्टिकच्या बिल्ल्याचे काही नमुने आजही उपलब्ध आहेत, पण शेतकरी संघटनेचे ते तांबडे गोलाकार प्रतिक आज जगभर प्रसिद्ध झाले आहे. आणि लक्ष्यावधींना स्फुर्ति देत आहे. संघटनेच्या मुखपत्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कोण येणार? खासदार आमदार तर सोडाच अगदी पंचायत समितीचा सभापतीसुद्धा या कार्यक्रमाला यायला तयार झाले नसते. शेवटी आंबेठाण जवळच्या एका गावातील पंचायत समितीच्या एका सदस्याच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. दुसरे कुणी आले नसते हेही खरेच, पण त्याबरोबर पंचायत समितीचा हा मेंबर भामनेरच्या सडकेच्या आंदोलनात उपयोगी पडेल अशी थोडीफार आशा असावी. बाबूलाल परदेशीच्या कल्पना जास्त व्यवहारी, हे पुढारी निदान शंभर रू. देऊन आजीव

वर्गणीदार होतील असा त्यांचा आडाखा. पुढाऱ्यांनी ते कबूलही केले आणि पन्नास रू. रोख दिले. उरलेले पन्नास रू. अजून द्यायचे आहेत. पहिला अंक तर प्रसिद्ध झाला. प्रसिद्धीच्या वेळापर्यंत अंक कसाबसा छापून झाला. बाबूलाल सिद्धहस्त लेखक आहे. अगदी नवे अगदी मूलगामी बोलणारे लिहिणारे मला जे लोक पाच दहा वर्षांत भेटले त्यांच्यात त्याचा अगदी वर क्रमांक लागेल. एका बाजूला जुळवणाऱ्याला हजर करायचे, त्याला एक पाच दहा ओळींचा मजकूर देऊन कामाला लावायचे, तेवढा मजकूर जुळवून होईपर्यंत आणखी पंधरा वीस ओळी लिहून द्यायच्या असे त्याने अनेकवेळा केले आहे. पण त्याचा छापखाना हा व्यंकटेश माडगुळकरांच्या ग्रामीण कथांत शोभून दिसण्यासारखा. सगळे जुळारी हे अर्धवेळ शेती करणारे. आणि त्यापेक्षा जास्त वेळ इतर अनेक भानगडीत अडकलेले. त्यांना बाबापूता करून शोधून बोलावून आणावे लागे तरी ते सारखे निसटून जात. तारीख आणि वेळ यांची जाणीव बाबूलालच्या छापखान्यांत फारशी नाही. लग्नाची तारीख उद्यावर येऊन पडली, आता तरी लग्न पत्रिका द्या म्हणून ग्राहकच त्यांच्याकडे काकुळतीला येऊन बसलेले दिसायचे. चाकणमधला एकुलता एक छापखाना म्हणून त्याच्या सोयीने लग्नाच्या तारखा मागेपुढे कराव्या लागत. गुरुवार सकाळपर्यंत संपादक म्हणून मी मजकूर हजर करायचा असं ठरलं होतं. सगळ्या कामाच्या धादलीत बुधवारी रात्रभर बसून सत्तावीस अठ्ठावीस पानं मजकूर लिहून काढायचा आणि उजाडता उजाडता बाबूलालच्या घर कम छापखान्यासमोर जाऊन उभा राहायचो. बाबूलालची आणखी एक सवय म्हणजे मारूतीच्या देवळात रात्री तीन साडेतीनपर्यंत गप्पा मारायच्या आणि नंतर सकाळी दहावाजेपर्यंत ताणून द्यायची. त्यांच्या बायकोलाही माझ्या येण्याची कटकट वाटत असावी. ती बाबूलालला गदगदा उठवायची, "अहो तुमचा सासरा आलाय बघा." मग दुपारपर्यंत वेळ जुळारी शोधण्यात जायचा. कधी जुळारी मिळायचे कधी मिळायचे नाहीत.

 दुसऱ्या दिवशी सकाळी काम हमखास सुरू होईल असे आश्वासन बाबूलाल द्यायचा आणि एकदा काम चालू झालं की काय हो, दोन तीन तासात अंक तयार असं सांगून माझी चिंता दूर करायचा प्रयत्न करायचा. शुक्रवारी सकाळी पुन्हा मी हजर आणि पुन्हा परिस्थिती तीच. शनिवारी दुपारपर्यंत का होईना अंक कसाबसा तयार करावा ही माझी धावपळ असायची, बाबूलाल घड्याळ काय पण कॅलेंडरकडे सुद्धा लक्ष देणे म्हणजे विलायतेतून आलेल्या लोकांचे फॅड समजायचा. साप्ताहिक वारकरीचा प्रत्येक

अंक म्हणजे जुळारी, छापखाना, बाबूलाल आणि वेळ यांच्याशी घेतलेली निकराची झुंज व्हायची. छपाई कामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड संख्येने मुद्रण दोष. मला स्वत:ला मीच लिहीलेला मजकूर छापलेला तपासता येत नाही. लिहीलेली वाक्य मनात इतकी पक्की बसलेली असतात की मुद्रणातल्या चुका लक्षातच येत नाहीत. आणि बाबुलालला कोणत्याच चुका चुका वाटत नाहीत. असा सगळा आनंद. भावी काळातील राजवाडे वारकरीचे अंक घेऊन बसतील तेव्हा मुद्रणदोष ओलांडता ओलांडता वाचताना त्यांच्या डोक्याला मुंग्या आल्याखेरीज राहणार नाहीत. त्यावेळी लिहिलेल्या लेखांपैकी अनेक लेख हे केवळ स्थानिक महत्त्वाचे पण त्याबरोबर 'इंदिरा इंडिया झाली भारताचे वाली कोण', 'इंदिरा गांधींची पहिली गाडी चुकली', 'विचारवंतांचे बुद्धिदारिद्रय', 'एकोणपन्नास कोटीची कर्जमाफी' इत्यादी आजही अनेकांना आवडणारे लेख त्या वेळी प्रसिद्ध झाले. साप्ताहिक वारकरीने संघटनेच्या कामात काय हातभार लावला व काय भूमिका बजावली याबद्दल वेगळे सविस्तरपणे लिहायला पाहिजे. साप्ताहिक 'वारकरी' नंतर 'शेतकरी संघटक' त्यानंतर 'ग्यानबा' हा प्रवाससुद्धा मोठा सूचक आहे. साप्ताहिक वारकरी संघटनेचे मुखपत्र होते. शेतकरी संघटकच्या पहिल्या अंकात 'शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव' मिळू लागले तर या देशाचे दारिद्र्य नष्ट होण्यास वेळ लागणार नाही या विचारांशी फक्त बांधीलकी सांगितली. ग्यानबा त्याहीपेक्षा आणखी स्वायत्त आणि स्वतंत्र रहावा असा आग्रह आहे.

 पहिल्या महिन्यात दोन महिन्यातच साप्ताहिकाच्या आठवडी बाळांतपणाचा मोठा त्रास वाटायला लागला आणि एवढे करून कुणी वाचतं की नाही ही शंका कायमच. २३ जानेवारी १९८० रोजी भामनेरच्या मोर्च्याकरिता मी वांद्रयाला मुक्कामाला जाऊन पोचलो. झोपायच्या आधी तिथली बरीच तरुण मंडळी कुतूहलाने गप्पा मारायला जमली होती. त्यावेळी 'शेतकऱ्यांची संघटना अडचणी आणि मार्ग' ही लेखमाला वारकरीमध्ये प्रसिद्ध झाली होती. यात संघटनेच्या विचाराचा सर्व तथ्यांश येऊन गेला होता. पण ती लेखमाला कोणी वाचते आहे अशी मलाही आशा नव्हती. वांद्रयाचा भोसले नावाचा एक कार्यकर्ता आहे. त्याने बोलता बोलता एकदम वाक्य फेकले. 'ज्या समाजाची प्रगती खुंटली आहे त्याची स्थिती साचलेल्या डबक्याप्रमाणे होते.' मी एकदम चमकलो. या लेखमालेतले हे वाक्य मी चटकन ओळखले व त्याला विचारले, 'हे वाक्य तू कुठे वाचलेस?' तो म्हणाला ‘साहेब हे तुमच्या लेखातले वाक्य आहे.'

'तुम्ही हे लेख वाचता?', 'म्हणजे काय? आम्ही गावात सार्वजनिक वाचन करतो आणि माझी तर वाक्येच्या वाक्ये पाठ आहेत.' असे सांगून त्याने कितीतरी वाक्ये म्हणून दाखवली. मला खूप बरं वाटलं. इतक्या उपद्व्यापाने फेकलेले बियाणे, मावळातील सगळ्या डोंगरमाथ्यावर एका ठिकाणी तरी रुजत असेल तरी सगळ्या कष्टांचे चीज झाले.

(साप्ताहिक आठवड्याचा ग्यानबा, १ मार्च १९८८)

■ ■