Jump to content

वाटचाल/मी आस्तिक का नाही ?

विकिस्रोत कडून


मी आस्तिक का नाही



" मी ज्या घरात जन्माला आलो ते घर आस्तिकच आहे. माझे मामा आस्तिक, माझ्या भोवतालचे सर्व वातावरणच आस्तिक आहे. जन्मल्याबरोबर मी देखील आई, बाबा, आत्या, मावशी असेच शब्द शिकलो. मी काही असे एकदम म्हणालो नाही की, "या जगात ईश्वर नाही." माझ्या नास्तिक्याचा उदय मी जेव्हा विचार करू लागलो त्यावेळेस झालेला आहे. मी नास्तिक असलो तरी सामान्यपणे मी आस्तिकाच्या भावना दुखवीत नाही. जी वस्तू अस्तित्वातच नाही तिच्याविरुद्ध झगडण्यात मला स्वारस्य नाही. एखाद्या माणसाने जर सांगितले की, 'देव आहे' तर त्यामुळे माझे काही नुकसान होत नाही. त्यालाही इतकी बुद्धी असायला पाहिजे की 'देव

नाही' म्हटल्याने त्याचेही काही नुकसान होत नाही. पण हे त्याच्या लक्षात येत नाही. 'देव आहे' म्हटल्याने माझे काही नुकसान होत नाही.
"मी देवळात जातो, देवाच्या पाया पडतो, सर्व धार्मिक समारभांना हजर राहतो, धर्मगुरूंच्या पाया पडतो, माझ्या घरी होता होईतो धार्मिक समारंभ करीत नाही. जर बायको करायचेच म्हणाली तर करतो. कुठल्याही प्रकारे अभिनिवेश नावाची जी गोष्ट आहे ती नाही. आता माझ्यावर ही जबाबदारीच आहे की, देव नाही हा मुद्दा असल्याने सर्व धार्मिक माणसांच्या भावना आपण दुखावल्याच पाहिजेत असे मी मानत नाही. माझे असे मत आहे की या जगात ईश्वर नाही व हे मत मी विचारपूर्वक बनवलेले आहे. समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने हे हिताचे असेल, तर हे मत मी आग्रहाने मांडेन. आस्तिकांच्या विरोधात उभा राहीन. तिथे मी कुणाचीही भीडमुर्वत बाळगणार नाही. पण तसे काही चालत असेल तर मी उगीच कुणाशी भांडत बसणार नाही. कारण जीवनाचे माधुर्य पुष्कळसे अज्ञानाने भरलेले आहे.
 जर एखादे वेळी बायको मला म्हणाली की तुमचे आणि आमचे ऋणानुबंध गतजन्मीचे आहेत. तर मी आगाऊपणा करून असे म्हणणार नाही की हे संबंध गतजन्मीचे नाहीत. ते ह्याच जन्मीचे आहेत. कारण हे बायकोला सांगितल्यामुळे पुन्हा जेवायला मिळणार नाही. तेव्हा हे भांडण मी करणार नाही.
 एकदा माझ्या आईने मला विचारले, " अरे नरहरी, तू नास्तिक, तू देव मानीत नाहीस म्हणे. अरे, मग मी मेल्यावर माझे श्राद्ध करशील की नाही ?" तेव्हा मी विचारले की, मला आधी हे सांगा की, तुमच्यापैकी कोण आधी मरणार? तेव्हा आई म्हणाली, " माझी इच्छाच असेल तर अहेव मरण ही कुठल्याही बाईची इच्छा असणार !" "ठीक आहे, तू आधी मेलीस तर बाबा मागे पाहायला आहेत तोपर्यंत मी श्राद्ध करीन. जर बावा मेले तर तू पाहायला आहेस तोपर्यंत श्राद्ध करीन. तेव्हा दोघेही मेल्यावर मी काय करीन ते मी सांगायला तयार आहे. पण ते पाहण्यासाठी तुम्ही असणार नाही. समजा मी सांगितले की, मी दोघांचेही श्राद्ध करीन अन् ते केले नाही तर तुम्हाला बरे वाटेल का ?" तेव्हा आई म्हणाली, “अजिबात बरे नाही वाटणार !" " अन् समजा मी नाही म्हटले अन् पुढे करीत राहिलो तर तुम्हाला वाईट वाटेल का ?" आई म्हणाली, ' तसेही नाही' मग " तुम्ही ही श्रद्धा ठेवून म्हणायला हरकत नाही की " श्राद्ध होत राहणार." तेव्हा मी काही त्यांना असे म्हटले नाही, 'मी काही तुमचे श्राद्ध करणार नाही.'
 आजीने एकदा देव आहे हे सिद्ध करून दाखवणारा पुरावा मला दिला. नारळात पाणी हे देवाने घातले आहे तेव्हा देव आहे असे तिचे म्हणणे. मी तिच्या समाधानासाठी म्हटले, "आजपर्यंत हा मुद्दा मला कुणी पटवूनच दिला नव्हता. आजपासून ' देव आहे' असे मानायला सुरुवात करतो."
 समाजातील हजारो, लाखो माणसांच्या भावना या ईश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्या आहेत. तेव्हा एवढाच जर मुद्दा असेल तर काय म्हणून त्यांच्या भावना दुखवायच्या? जर एवढाच मुद्दा असेल तर मीही माझ्या नास्तिक्याचा आग्रह धरायला तयार नाही. उगीच कुणाच्या आस्तिक्याच्या विरोधी भाषण देण्याची माझी इच्छा नाही. पण अडचणीची गोष्ट अशी आहे की मुद्दा फक्त एवढाच नाही. तर सबंध समाजातील आस्तिक्यबुद्धी ही समाजाला हानिकारक असणाऱ्या सर्व चालीरीती, परंपरा, रूढी यांना घट्ट धरून बसते आणि समाजाचा पूर्ण विनाश झाला तरी तो विनाश नसून ते प्राक्तन आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करते. आणि मग समाजाच्या प्रगतीच्या सर्व शक्यता या आस्तिकबुद्धीमुळे नाहीशा व्हायला लागतात. त्या दिवशी हे सांगण्याची वेळ येते की, हा सर्व मूर्खपणाचा भाग आहे उरलेल्यांच्यासाठी व लबाडीचा भाग आहे, काही जणांसाठी.
 शेवटी आस्तिक किंवा नास्तिक हे भांडण केवळ तत्त्वज्ञानापुरते नाही, हे तर भांडण सामाजिक प्रश्नांसाठी आहे. या नांदेड गावामध्ये आमचे एक मुसलमान मित्र मला म्हणाले, " इस्लामशी तुमचे काय मतभेद आहेत ?" मी म्हणालो, " काही नाही. साधा मुद्दा आहे, तू मुसलमान आहेस. तुझा तुझ्या धर्मग्रंथावर विश्वास आहे. मी मुसलमान नाही, माझा धर्मग्रंथावर श्विवास नाही. माझी कोणत्याच धर्मावर श्रद्धा नसल्यामुळे धर्मग्रंथावर श्रद्धा नाही, हे बरोबर आहे ना?" तो म्हणाला, " बरोबर आहे." व उठून गेला.
 सर्व धार्मिक माणसांचा बुद्दुपणा हा माझ्या जीवनामधले फार मोठे दुःख आहे. धार्मिक माणसाची बुद्धीच मंद होते अशी माझी समजूत आहे. जन्मभराच्या अभ्यासामुळे माणसाच्या बुद्धीला मंदत्व आणण्याचे कामच धर्माने सातत्याने केले आहे. प्रगतीला अडथळा आणण्याचे काम धर्माने केले आहे.
 मुद्दा असा आहे की कोणत्याही- देवावरच्या-श्रद्धेमुळे का होईना जर माणसे नैतिक राहिली असती तर राहू द्यात. ईश्वरावरील श्रद्धा माणसाला नैतिक राहायला उपयोगी पडली असती तर कदाचित ईश्वराच्या श्रद्धेविरुद्ध कसे बोलावे याचा मी दहावेळा विचार केला असता. धर्मावरची सर्व श्रद्धा सर्व अनैतिक बाबींचे समर्थन करण्यासाठी, जगाच्या इतिहासात वापरली गेली आहे. जगाचा व भारताचा इतिहास जर पाहिला तर असे आढळते की मानवी जीवनातल्या सगळ्या अनैतिक बाबींच्या समर्थनासाठी धर्मावरची श्रद्धा शतकानुशतके वापरली गेली आहे. आणि लोकांनी ती कबूल केलेली आहे. पण धर्म जर माणसाला नैतिक राहायला उपयोगी पडला असता तर एकाही देवळाच्याजवळ एवढी संपत्ती जमा झाली नसती. देवाचे नाव घेऊन मटका चालवायचा. साईबाबाचे नाव घेऊन आकडा लावायचा. म्हणजे साईबाबाच्या नावाचा उपयोग जुगारीसाठी करायचा.
 माणसाच्या आस्तिक्यबुद्धीने स्वतःच्या सर्व भ्रष्टाचाराचे समर्थन परमेश्वराच्या नावावर हुडकून काढले. आणि म्हणून ईश्वराची कल्पना शांततेला उपयोगी पडली नाही, तर माणसे ईश्वराचे नाव घेऊन एकमेकांची डोकी फोडतच राहिली. हाच जगाचा इतिहास आहे. सर्व हिंदू-मुसलमानांची भांडणे तशीच आहेत, सगळी स्त्रिश्चनांची- कॅथलिक व प्रोटेस्टंटांची- भांडणे तीच आहेत. माणसाला शांततेनं जीवन जगायला कधीही देव उपयोगी पडला नाही. माणसाला नीतिमान व्हायला कधी देव उपयोगी पडला नाही. आणि माणसाला सगळ्या समाजाच्या बरोबर त्या समाजाच्या ऱ्हासाला थांबविण्याची प्रेरणा कधी देवाने दिली नाही. देवाचे काम Positive आहे. तो हिंसेला उपयोगी पडला, पापाला उपयोगी पडला, मारामारीला उपयोगी पडला; पापाच्या समर्थनासाठी, अन्यायाच्या समर्थनासाठी उपयोगी पडला. नाही तर तुम्ही अस्पृश्यतेचे समर्थन कसे करता? दोन हजार वर्षे तुम्ही अस्पृश्यतेचे समर्थन करीत आलात. माणसासारख्या माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याची संधीच तुम्ही देत नाही आणि हे काम अत्यंत पवित्र आहे असे सांगता बेशरमपणे ! याला देव उपयोगी पडतो. तसेच जगातील सगळ्या अनीतीला देव उपयोगी पडतो.
 असा भाग असताना मग प्रश्न विचारात घ्यावा लागतो मी आस्तिक आहे हे म्हणणे- नास्तिक आहे हे म्हणणे. या म्हणण्याला समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने काय अर्थ आहे ? देवामुळे माणसे जर नैतिक राहिली असती तर मग देवाचे नाव घेऊ नका असे म्हणालो नसतो. उलट माणसांनी नैतिक राहावे अशी आमची इच्छा असल्यामुळे आम्ही मग- श्रद्धा नसतानाही- देव आहे अशा थापा देत राहिलो असतो.
 ईश्वर हा शेवटी तर्कवादाचा मुद्दा नाही. शेवटी माणूस दुःखात आल्यानंतर ईश्वराचे नाव घेतो. याला आमचा काही विरोध नाही किंवा मी दुःखात आल्यानंतर देवाचे नाव घेईन असा माझा अंदाज आहे. ज्या वेळी आपण निराश होऊ त्या वेळी देवाचे नाव घेऊ, पण त्यामुळे देव आहे असे सिद्ध होते का? हा कुठला भ्रम आहे ? अतिशय चतुर माणसे कोणत्या भ्रमाचे प्रतिपादन करू लागली आहेत हे समजत नाही. ज्या वेळी सगळे संपून जाईल, काहीच शिल्लक राहणार नाही, त्या वेळी देवाचे नाव घेणे हा सज्जड पुरावा आहे का? पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर चार-सहा महिन्यांनी माणसाला काही बोलता येत नाही. त्याला 'हायड्रोफोबिया' होतो त्या वेळी तो जे बोलू लागतो ते भुंकल्यासारखे वाटू लागते. पण खरे म्हणजे त्याला मरण्याची इच्छा नसते, व तो जे भुंकल्यासारखे बोलतो, तो ' मला वाचवा, मला वाचवा' असे म्हणायला लागतो, त्यामुळे काय देव आहे असे सिद्ध होते ? जिथे काहीच माणसाचा उपाय चालत नाही तेथे देवाचे नाव घेता, तेव्हा देव आहे हे सिद्ध होते का ? आम्ही तीर्थयात्रेला जातो तेव्हा 'राम, राम' असे शब्द म्हणतो. त्यामुळे राम सिद्ध झाला आहे का? खांद्यावर प्रेताचे ओझे घेऊन आम्ही निघतो व तोंडाने ' रामनाम सत्य है ' असे म्हणतो त्यामुळे रामनामही सिद्ध होत नाही व रामही सिद्ध होत नाही.
 देव हा तर्काचा विषय नाही तर तो अनुभवाचा विषय आहे.तेव्हा ज्यांना त्याचा अनुभव असेल त्यांनी 'आहे' म्हणून सांगावे, ज्यांना तो नसेल त्यांनी 'नाही' म्हणून सांगावे. एकही अपवाद जाता कुणालाही परमेश्वराचा अनुभव आला आहे असे मला वाटत नाही. हे तुम्हांला मान्य आहे की, देव हा तर्काचा विषयच नसल्यामुळे ज्यांना तो दिसतो आहे, जाणवत आहे त्यांनी 'दिसतो आहे ' असे मानावे व ज्यांना तो जाणवतच नाही त्यांनी 'नाही' असे प्रामाणिकपणे सांगावे. इतके आपण कबूल करायला तयार आहोत काय ? हे जर कबूल असेल तर शेकडा ९८ धार्मिक व सश्रद्ध माणसे अप्रामाणिक आहेत असे म्हणावे लागते. व हाच तर माझा मुद्दा आहे की, ईश्वरावरची श्रद्धासुद्धा तुम्हाला प्रामाणिक राहायला उपयोगी पडत नाही. शांत राहायला उपयोगी पडत नाही, समाजाच्या कल्याणासाठी उपयोगी पडत नाही. माणसाच्या ठिकाणी किमान दानत असायला पाहिजे की, आपल्याला ईश्वरासंबंधी वाटते हे खरे बोलावे. हे खरे सांगायला देखील ईश्वराची श्रद्धा उपयोगी पडली नाही. ईश्वर अशी नेहमी प्रेरणा देत आला की, 'खोटे बोल !' म्हणत रहा, 'काशीस जावे, नित्य वदावे !' असे तोंडाने म्हणत राहावे, 'देव आहे, देव आहे.' मला तो दिसणार नाही, पण आहे. कारण देव दिसण्याइतका मी कुठे पुण्यवान आहे ? जे महान पुण्यवान आहेत त्यांना तो दिसतो व जे कुणी महान पुण्यवान आहेत ते आपल्याला कधी दिसतच नाहीत. जर देव तर्काने सिद्ध होत असेल तर 'देव आहे,' हे कुणाला कधीही सिद्ध करता येणार नाही आणि जर देव ही तर्काने सिद्ध होणारी गोष्ट नसेल व ज्यांना देवाचा अनुभव नाही त्यांनी ' देव आहे' असे मानणे, हे अप्रामाणिकपणाचे लक्षण आहे. मी काही अणू पाहिलेला नाही, तरी मी अणू आहे असे मानतो. कारण तो पुराव्याने सिद्ध करता येतो. ज्याचा अनुभव मी घेतलेला नाही, तरी पण त्याची शक्यता मी मानतो. कारण त्या गोष्टी पुराव्याने सिद्ध करता येणान्या आहेत. जे पुराव्याने सिद्ध करता येत नाही आणि प्रत्यक्ष अनुभवाचा विषय नाही, ते आहे असे जर मी सांगत असेन, तर जे पुराव्याने सिद्ध करता येते व जे प्रत्यक्षाचा विषय आहे ते नाही असे मला मानले पाहिजे. हा मुद्दा Logic चा आहे.
 देवाच्या नादी लागून माणूस उगीचच भ्रामक युक्तिवाद करीत आहे आणि देवाच्या नादी लागून भ्रामक युक्तिवाद करीत असताना माणसाला आपण बुद्धिवादी झालो आहोत असा निष्कारण भ्रम व्हायला लागतो.
 मी लहानपणापासून धर्मवाङमय वाचले आहे. बहुतेक धार्मिक मंडळींनी जे धर्मवाङमय वाचलेले असते त्यापेक्षा अधिक मी ते वाचले आहे आणि माझी श्रद्धा आहे की, बहुतेक लोक धार्मिक आहेत याचे कारण त्यांनी धार्मिक वाङ्मय वाचले नाही. आणि प्रत्येक जण आपल्या धर्माचे वाङ्मय वाचायला टाळाटाळ करतो. आम्ही मूर्ख असल्यामुळे श्रद्धेने आम्ही आमच्या धर्माचे वाङ्मय वाचायला सुरवात केली, हा आमच्या नास्तिक्याचा आरंभ आहे. गेल्या वर्षी मी लहान मुलांच्या मासिकासाठी एक लेख लिहिला आहे. ती गोष्ट अगदी खरी घडलेली आहे. उस्मानिया विद्यापीठाचे पहिले मराठी विभागाचे प्रमुख श्री. काकासाहेव जोशी हे मी लहान असताना वसमतला आले होते. त्यांना गोष्टी सांगण्याचा खूप नाद. ही सर्व धार्मिक मंडळी. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली- देवाने एकदा काय केले- समुद्र घुसळून काढण्याचे ठरविले. मंदारला केले रवी. वासुकीला केले दावे. शेपटाकडून झाले देव, तोंडाकडून झाले राक्षस. मग त्यांनी समुद्र घुसळून काढला. त्यातून चौदा रत्ने बाहेर आली. देव अमृत प्याले. वगैरे सारी कहाणी सांगितली व नंतर ते मला म्हणाले, " मी आता तुला ही कहाणी सांगितली. या कहाणीचे तात्पर्य काय ते सांग पाहू ?" तेव्हा मी म्हणालो, " या कहाणीचे तात्पर्य असे की, जे लबाड असतात त्यांना अमृत मिळते." तेव्हा ते भयंकर ऑफ झाले. ते म्हणाले, " असे नाही, देवांना अमृत मिळाले तेव्हा आपण देवाच्या बाजूने राहावे." मी म्हणालो, " मला तुमच्या कहाणीत जे जाणवले ते इतकेच की, जे लबाड असतात त्यांना अमृत मिळते." तेव्हा ते म्हणाले, "तू नरकात जाशील." आमच्याकडे वयाच्या नवव्या वर्षापासून हा मुद्दा आहे- 'तू नरकात जाशील.' आमचे आदरणीय विद्वान यज्ञेश्वर कस्तुरेशास्त्री मला म्हणाले, “ कुरुंदकर, तुम्ही रोज नास्तिक्याच्या गोष्टी बोलता, आपण मेल्यानंतर नरकात जाऊ याची भीती तुम्हाला नाही वाटत?" तेव्हा मी म्हटले, " नाही. आम्ही तेथे मोठा प्लॉट घेतला आहे. घर बांधण्याचे काम सुरू आहे. ते बांधून झाल्यानंतर तेथे राहायला जाऊ. पण अधून-मधून तुम्हालाही तेथे यावे लागेल." " मला कशाला तेथे यावे लागेल ?" तेव्हा मी म्हणालो, "संस्कृत पाठशाळेच्या ग्रँटचे फॉर्म घेऊन हिंडेल कोण ? तेव्हा ग्रँटसाठी यावेच लागेल, आठ-पंधरा दिवसांनी !"
 कधीही आस्तिक मंडळींना असे वाटतच नाही की, समोरच्या माणसाला तुम्ही नरकात जाल असे म्हणणे ही शिवी आहे. मी जर त्यांना असे म्हणालो की, " आपण अत्यंत मठ्ठ आहात, तेव्हा आपण नरकातच जाणार." तर त्या माणसाला असे वाटेल की, एवढा विद्वान माणूस, धार्मिक माणूस ; त्याला तुम्ही अशा शिव्या देता आहात ? पण त्यांनी जर असे सांगितले की, तुमचा देवावर विश्वास नाही ना ? मग तुम्ही नरकात जाल, तर ती मात्र आम्हाला शिवी आहे असे वाटत नाही. या सर्व धार्मिक मंडळींना आपण समोरच्या माणसाचा अपमान करतो याचा कॉमनसेन्स सुद्धा नसतो, असा माझा अनुभव आहे.
 एकदा माझे मामा डॉ. नांदापूरकर- यांचे गुरू चिं. नी जोशी यांनी मला महाभारतातील आदिपर्वातील कश्यपाची कहाणी सांगितली. ते म्हणाले, “ भी तुला एक गोष्ट सांगतो, त्याचे तात्पर्य तू मला सांग." मी म्हणालो, " सांगतो." त्यांनी मग गोष्ट सांगितली. कश्यपमुनींच्या दोन बायका होत्या. एकीचे नाव होते विनता, दुसरीचे नाव कद्रू. या दोघींनी एकदा सिद्ध करावयाचे ठरवले की, सूर्याच्या रथाच्या घोड्याची शेपटी पांढरी की काळी ? दोघींनी प्रतिज्ञा केली की, जिचे म्हणणे खरे असेल तिने मालकीण व्हायचे व जिचे खोटे असेल तिने जन्मभर दासी व्हायचे आणि नंतर कद्रूच्या लक्षात आले की, शेपूट पांढरेच आहे. तेव्हा तिने आपल्या मुलांना- सापांना सांगितले की, शेपटीला तुम्ही मिठी मारा. तेव्हा नंतर विनता झाली दासी व कद्रू झाली मालकीण. मग पुढे गरुडाने आपल्या आईची दास्यातून सुटका केली.' अशी ही सगळी कहाणी सांगितल्यावर मला तात्पर्य विचारले. तेव्हा मी म्हणालो, "मला आधी हे सांगा पाहू की, ही कहाणी कलियुगातली आहे की त्रेतायुगातली, द्वापार की सत्ययुगातली आहे ?" ते म्हणाले, " ही कहाणी सत्ययुगातली आहे." तेव्हा या कहाणीचे तात्पर्य असे की, "कलियुगात माणसे जसे द्वेष, मत्सर करणारी, लबाड, लुच्ची आहेत, तसेच सत्ययुगातील माणसेही द्वेष, मत्सर करणारी, लबाड-लुच्ची होती. जसा त्या वेळी लबाड, लुच्च्यांचा विजय होतो तसाच याही वेळेला लबाडलुच्च्यांचा विजय होतो." तेव्हा मामा म्हणाले, " आमचे गुरू म्हणाले की, तू नरकात जाशील. तेव्हा मी त्याला 'endorse' करतो की तू नक्की नरकात जाशील."
 तेव्हा माझ्या मनावर सगळ्या धर्मवाङ्मयाचे जे संस्कार झाले आहेत, ते असे आहेत. इथे जागोजागी असा उल्लेख आहे की, देवाने अमकी लबाडी केली व त्यांचा विजय झाला. देवांच्या सर्व विजयाच्या कहाण्या सर्व पुराणांमध्ये भरलेल्या आहेत व सर्व कहाण्यांच्यामध्ये लबाडीचे उल्लेख आहेत. सबंध राक्षसांच्या पराभवाच्या कहाण्या पुराणांच्यामध्ये भरलेल्या आहेत. या राक्षसांच्या पराभवांच्या कहाण्यांमध्ये त्यांचा भोळेपणा हे कारण आहे. माणसे भोळी असल्यामुळे पराभूत झाली, माणसे लबाड असल्यामुळे विजयी झाली, एवढेच जर तुम्ही सांगणार असाल-धर्मामधून, तर त्यातून प्रेरणा लबाड असणे ही मिळणार आहे, सज्जन असण्याची नाही... ज्याला तुम्ही धर्माचे पूज्य वाङ्मय समजता त्या धर्माच्या पूज्य वाङ्मयात माणसाला नैतिक करणाची शक्ती नाही हे तुम्ही ओळखा.
 धर्माच्या नावाने आपण इहलोकांचे हितसंबंध बोलतो, धर्माच्या नावाने आपण इहलोकातील लबाड्यांचे संरक्षण करतो, धर्माच्या नावाने आपण सर्व प्रगतीचे अडथळे सांगतो. एवढेच जर आपण धर्माच्या नावाने करणार असलो तर मग त्याच्या विरोधी राहणे आणि आपण आस्तिक नाही हे सांगणे आवश्यक होऊन जाते.