वाटचाल/पूर्वपक्ष-उत्तरपक्ष

विकिस्रोत कडून


पूर्वपक्ष-उत्तरपक्ष


माझ्यासारख्या माणसाला व्याख्यानांची कितीतरी आमंत्रणे येत असतात, हे तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. पण त्याबाबतच्या गमतीदार आठवणीच तुम्हांला हव्या आहेत. कोणत्या व्याख्यानात माझी फजिती कशी झाली ह्याची वर्णने 'अ' ने करावीत आणि 'ब' ने ती चघळून सांगावीत आणि सर्व सज्जनांनी मनमोकळेपणाने हसावे, ह्यावर तुमचे समाधान दिसत नाही. इतरांच्या व्याख्यानांविषयी मी काही गमतीदार बोलून वाचकांना हसवावे अगर ह्या निमित्ताने काही चावे काढावेत असेही तुम्हाला वाटत नाही. मीच माझ्या फजितीचा अधिकृत वृत्तांत सादर करावा अशी तुमची इच्छा आहे. हे तुमचे कृत्य शिष्टाचारास सोडून आहे. कोणत्याही लेखकाला

स्वतःचे गाजलेले प्रसंग आणि इतरेजनांची फजिती यांवर लिहिण्यास सांगावयाचे असते. तुम्ही ज्या विषयावर लिहिण्यास सांगता त्याबाबत संपूर्ण सत्य सांगणे फार कठीण असते.
जे गाजलेले वक्ते असतात, मान्यवर असतात, त्यांच्या साठी असा एखादा फजितीचा प्रसंग गमतीदार असतो. मिठाप्रमाणे चव वाढविणारा असतो. कोणती ना कोणती तरी फजिती झाल्या शिवाय ज्याची सभा क्वचितच रिकामी जाते त्यांनी काय काय म्हणून सांगावे ! माझे एक मित्र आहेत. स्वतःचे नाव समजल्यास श्रोते बिचकतात हे त्यांना स्वानुभवाने इतके पूर्णपणे समजलेले आहे की, ते सभाचालकांना सांगतात- "माझे नक्की नाही, मी प्रयत्न करतो, माझे नाव जाहीर करू नका." जर श्रोते खूप जमले, गर्दी असली, तर हे अचानक उठून सांगतील, " ठीक, मी जरा बोलून घेतो." आणि नंतर मनसोक्त बोलून घेतात. आता माझा हा मित्र नेहमी व्याख्यानाच्या गमती म्हणून, 'आपण बोलतो' म्हणताच सभाचालकांचा चेहरा कसा पडला, आपण उभे राहताच लोकांची कशी जिरली व श्रोते उठून जाऊ लागल्यामुळे उरलेल्या वक्त्यांचे कसे भरीत झाले, ह्या आठवणी सांगतो. महान कलावंतांच्या ठिकाणीसुद्धा क्वचित आढळणाऱ्या ह्या, ' स्वानुभवाशी श्रेष्ठ कलात्मक तटस्थता' साधणाऱ्या महापुरुषाला वंदन करून मी काही माझे फजितीचे प्रसंग सांगतो व हे सर्व प्रसंग साधुसंतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पुण्यभूमीतील म्हणजे मराठवाड्यातीलच आहेत हेही सांगतो.
 मनात एक विचार असा आला आहे की, आपली फजिती फक्त व्याख्यान देण्यास गेल्यानेच होते असे नाही इतरांची व्याख्याने ऐकताना, शंका विचारताना, होणान्या गमती काही कमी नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'हिंदू कोड बिल' त्या वेळच्या संसदेला सादर केले होते तेव्हाची एक गोष्ट. ठिकठिकाणी शास्त्रीपंडित मंडळी ह्या विलाविरुद्ध व्याख्याने देत होती. एक शास्त्री आमच्या गावीही आले होते. ते दररोज एक तास व्याख्यान देत. नंतर एक तास शंकासमाधान असे. शंका विचारण्यास कुणी मुलगा उभा राहिला की म्हणत, " अरे बाळ ! खाली बस. अजून ओठावर केस उगवले नाहीत रे तुझ्या-आणि उद्घटा, त्रिकालज्ञ ऋषीच्या प्रतिपादनावर शंका घेतोस ?" इ. इ. त्यांना काहीजण तोंडी शंका विचारीत. काही लेखी विचारीत. एके दिवशी ते दुसऱ्या एकाचे शंकासमाधान करीत होते आणि मी एक लेखी शंका त्यांच्या हाती दिली. सभेच्या दुसऱ्या टोकाला जाऊन उभा राहिलो शंकासमाधान संपल्यावर शास्त्रीबुवांनी माझी चिठ्ठी उघडली व माझी शंका वाचली. त्याबरोबर ते एकदम संतापाने लाल झाले. उठून उभे राहून म्हणाले, " हरामखोरा, इकडे ये." मी म्हटले," आपण उत्तर द्या, मी इथूनच ऐकतो." शास्त्रीबुवा रागाने थरथरत होते. त्यांचा तोल सुटला व ते आसन सोडून माझ्याकडे येऊ लागले. मी सभास्थान सोडून पळून गेलो. त्या दिवशीची सभा तेथेच संपली. लोकांनी शास्त्रीबुवांना विचारले, “ प्रश्न काय आहे ?" पण शास्त्रीबुवांनी कुणाला प्रश्न सांगितला नाही व व्याख्यानाची जागा सोडून मला पळून जावे लागले म्हणून मी वाचलो. नाहीतर मला मार खावा लागला असता. ही माझी फजितीच नाही का ? ह्या प्रश्नाचे उत्तर मला अजून सापडत नाही. कुणातरी प्रतिभा व प्रज्ञा एकत्र जमलेल्या विद्वानालाच हे उत्तर विचारले पाहिजे. शास्त्रीबुवांनी प्रश्न काय होता हे कुणालाच सांगितले नाही. मीही त्या वेळी कुणालाच सांगितले नाही. प्रश्न असा होता, " त्रिकालज्ञ ऋषींच्या प्रतिपादनावर शंका येण्यासाठी फक्त ओठावर वगैरे केस उगवणे पुरते, की अजून काही अटी आहेत ?"  व्याख्यानाला श्रोते कमी येणे, अगर आलेले श्रोते कंटाळा आल्याने उठून जाणे, ही काही मी वक्त्याची फजिती समजत नाही. माझ्या अध्यक्षतेखाली माझ्या एका प्राध्यापक-मित्राने 'तुकाराम बीजे' च्या निमित्ताने पूर्ण दीडतास व्याख्यान दिलेले आहे. त्याला माझे दोन सहकारी-शिक्षक हेच फक्त श्रोते होते. दोघांनाही व्याख्यानात झोपण्याची सवय होती. दोन्ही श्रोते झोपलेले आणि वक्ता अस्खलित बोलतो आहे, याला सदृश प्रसंग पुन्हा येणार नाही असे मी समजत नाही व याला मी फजितीसुद्धा मानीत नाही. पण एके ठिकाणी मी अध्यक्ष, एक मित्र वक्ता, दोन श्रोते व एक सभा-चालक असे आम्ही पाचजण होतो. पैकी एका श्रोत्याचे घर शेजारीच होते. श्रोते नाहीत म्हणून सभा रद्द करावी असे सभा-चालकांचे मत होते. दोन्ही श्रोते ह्या भूमिकेला सहमत होते. माझा मात्र आग्रह असा की, श्रोते असोत वा नसोत सभा झाली पाहिजे. वक्ता गप्प होता. तो आपला चेहरा हसरा ठेवण्यासाठी घडपडत होता. इतक्यात ज्या श्रोत्याचे घर जवळ होते तो म्हणाला, " सभा रद्द करून जर माझ्या घरी चलाल तर चहा-पोहे देतो." लगेच आमचे वक्ते म्हणाले, " चला, सभा रद्द. मी तर चाललो. वाटल्यास तुम्ही बसा व सभा आटोपा. नाहीतरी वक्ता नसला तरी तुम्ही बोलताच. मग आजही तसेच समजा." ह्यानंतर चहापोहे झाले. आनंदात सगळेच होते. मी तेवढा चरफडत होतो. वक्त्याने अध्यक्षाची अशी फजिती केल्याचे प्रसंग फार येत नाहीत.
 आमचा मराठवाडा विभाग अजून पुण्या-मुंबईइतका प्रगत झालेला नाही. शहरी भागात टाळ्या वाजवून व्याख्यान बंद पाडतात, अगर श्रोते उठून जातात. पण अंडी, टोमॅटो वगैरे मारीत नाहीत. खेड्यात तर ऐन निवडणुकीतही बहुधा सभा उधळीत नाहीत. ग्रामीण भागात सभा रात्री असते. आधी गाणी वाजवून श्रोते जमा करतात. नंतर व्याख्यान. त्यानंतर करमणुकीचा कार्यक्रम असतो. स्त्रिया, मुले, तरुण, म्हातारे असा गच्च श्रोतृसमुदाय असतो. व्याख्यान चांगले असो, वाईट असो ही मंडळी उठून जात नाहीत. टाळ्या वाजवीत नाहीत. ती वक्त्याकडे लक्षच देत नाहीत. ती आपापसांत गप्पागोष्टी करीत बसलेली असतात. ह्या मंडळींसमोर व्याख्यान देणे म्हणजे खरी फजिती. तुम्ही विनोद करा, लोक हसत नाहीत. तुम्ही भावनाप्रधान आवेशयुक्त बोला, लोक प्रतिसाद देत नाहीत. रेडिओवर निदान आपले व्याख्यान उभा महाराष्ट्र ऐकतो आहे असा भ्रम असतो. इथे त्या भ्रमालाही जागा नसते. व्यवहारतः श्रोते गच्च भरलेले असतात. तत्त्वत: एकही श्रोता नसतो. त्यांच्यासमोर तासभर बोलणे म्हणजे काय, हे अनुभवाखेरीज कळणेच अशक्य. मधन मधून अध्यक्ष उभा राहून सांगतो, " बंधू-भगिनींनो, आजचे वक्ते फार विद्वान आहेत. त्यांचे व्याख्यान शांतपणे ऐकून घ्या.” एक-दोनदा सांगून मग अध्यक्षही चिडतात व ओरडून सांगतात, " बंधूभगिनींनो, तुम्ही शांत राहत नाही, ही शरमेची गोष्ट आहे. यामुळे गावाची अब्रू जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी आपणांस शेवटची विनंती करीत आहे. इतक्या उपर जर आपण शांत राहिला नाहीत तर मग आजचे नाटक रद्द करावे लागेल." आणि मिनीटभर खरोखरच सगळीकडे शांतता होते व अध्यक्ष हसरा चेहरा करून वक्त्याला सांगतात, “ साहेब, आता बोला." आधी लोक व्याख्यान ऐकत नव्हते, त्या वेळी जर वक्त्याला लाज वाटली नसेल तर त्याला निदान नाटकाच्या धास्तीने लोक गप्प बसले ह्याची तरी लाज वाटतेच. ह्या दोन्ही वेशींतून जो बाहेर पडला त्याला विश्वविजयी होण्यासाठी 'अश्वमेधाचा घोडा' सोडण्याची गरज नाही. तो स्वयंभू विश्वविजयी' असतो. आपण विचाराल, " हा प्रसंग तुमच्यावर किती वेळा आला?" माझ्या प्रिय भूमीत असे विचारीत नाहीत. विचारलेच तर, " दर साल किती वेळा हा योग येतो !" असे विचारतात. माझ्यासारखा सनदी वक्ता फक्त हसतो. कारण असे प्रसंग काय मोजायचे असतात ! ते कबूलसुद्धा करायचे नसतात.
 आमच्याकडे परिचय करून देणाऱ्यांचा त्रास पूर्वी फारसा नसे. कारण सर्वांचेच परिचय सारख्या ठरीव पद्धतीने होत. त्यात काही गम्मत नसे. पण या चार-दोन वर्षांत नवे वारे निर्माण होत आहे. 'हसऱ्या व खेळकर' शैलीत वक्त्याचा परिचय करून देण्याची नवी टूम निर्माण होत आहे. त्यात कोणत्या कोटया कोणत्या वेळी व्यक्त होतील ह्याचा नेम नाही. एक विद्वान माझा परिचय करून देताना म्हणाले, " कुरुंद-हे दगडाच्या एका प्रकाराचे नाव आहे. ह्या दगडाची जाती तयार केली जातात. उपचार म्हणून जात्यालाच कुरुंद म्हणता येईल. आजचे वक्ते निरनिराळ विद्वान विद्यार्थी तयार करीत आहेत. म्हणून ते खऱ्या अर्थाने 'कुरुंद-कर' आहेत. शिवाय ते स्वतःही फार श्रेष्ठ प्रकारचे 'कुरुंद' आहेत." दूसरे एक विद्वान एकदा म्हणाले, " आपल्या सौंदर्याने स्त्रियांचे मनहरण करणारे ' नारीहर' पुष्कळ आहेत व पुढे होतील. पण आजचे वक्ते नारीहर नसून त्यापेक्षा फार श्रेष्ठ कोटीतील म्हणजे 'नरहर' आहेत." आमच्या नांदेडलाच एक माझे मित्र असे आहेत की, ते कोणत्याही वक्त्याचा परिचय करून देताना, " त्या दयाघन प्रभूने जेव्हा संकल्पमात्रे करून मिथ्या प्रपंचाची उभारणी केली, तेव्हापासून आजवर हे जगताचे रहाट-गाडगे चालूच आहे. ह्या चक्रनेमिक्रमात जे खरे शहाणे आहेत ते मौनपूर्वक अलिप्त होऊन मोक्षाला जातात. इतर प्रपंची-जन या मायाजालाला सत्य समजून लिप्त होतात." असा आरंभ करून मग वक्त्याकडे वळतात. हे माझे मित्र निवृत्त शिक्षक आहेत. शेकडो शिक्षणाधिकाऱ्यांचा परिचय त्यांनी ह्या प्रकारे करून दिला आहे. मलाही हा योग आला आहे. हे सदगृहस्थ असा परिचय करून देतात हे आश्चर्य नाही. ती 'जित्याची खोड ' समजून मी क्षम्य मानण्यास तयार आहे. पण ह्या माझ्या मित्राला मुद्दाम 'परिचय करून देण्यासाठी ' बोलावून नेणारे चाहते आहेत ह्याचे मात्र खरे आश्चर्य वाटते.
 तरीही या परिचायकाचा त्रास फारसा नाही हे म्हटलेच आहे. कारण बहुधा लोक वक्त्यालाच त्याचा परिचय काय करून द्यावा, हे विचारतात आणि भाषणाचा मुख्य भाग आपल्या गावाचा आणि श्रोत्यांचा परिचय वक्त्याला करून देण्यासाठी वापरतात. खरा त्रास त्यांचा होत नाही. हा त्रास प्रामुख्याने अध्यक्षाचा होतो. हा अध्यक्ष वयस्कर, ज्येष्ठ व गावातील वृद्ध असतो आणि त्याच्यावर बधन घालणे फार कठीण असते. माझ्यासारख्या वक्त्याचा बाप, मामा इ. नातेवाईक अध्यक्षांच्या परिचयाचे असतात. त्याला वक्त्याच्या खाजगी जीवनाचीही माहिती असते. हा असा अध्यक्ष म्हणजे खरा सूड असतो. एके ठिकाणी मी शाकुंतलावर बोललो. दोन तासांच्या रसग्रहणपर व्याख्यानाचा समारोप करताना अध्यक्ष म्हणाले, "आजच्या वक्त्यांना मी लहानपणापासून ओळखतो. त्यांचे वडील म्हणजे साधुपुरुष. सज्जन व प्रतिष्ठित वकील. आणि मामा (कै. डॉ. ना. गो. नांदापूरकर) म्हणजे काय ? अतिशय विद्वान व खानदानी देशपांडे, जुने वतनदार, शिवाय प्रोफेसर. त्यांचे पण हे भाचे हे अशा विषयावर बोलतात. आई-बापांना न विचारता, पोरा-पोरींनी केलेला प्रेमविवाह नामक गाढवपणा ह्यांना कौतुकाचा वाटतो. स्वतः प्रेमविवाह करून बापाचे नुकसान करणाऱ्याकडून ह्यापेक्षा दुसरे काय अपेक्षावे ? यांना शंकराचार्यावर बोलण्याची लाज वाटेल, ज्ञानेश्वरावर बोलण्याची लाज वाटेल, पण कालिदासावर बोलण्याचा हुरूप आहे-" इ. इ. आणि हा समारोप करणाऱ्यांच्याविषयी मला राग नाही. खरोखरी तो जुनाट विचारांचा वृद्ध माझ्यावर प्रेमही करीत होता व माझे कल्याण व्हावे ह्या प्रामाणिक बुद्धीनेच बोलत होता ह्याची मला खात्री आहे.
 नांदेड-औरंगाबाद-लातूर-जालना अशी शहरवजा मोठी खेडी सोडली तर इतर भागात वक्त्यावर गुदरणारे प्रसंग शहरभागातील प्रसंगांपेक्षा फार निराळे असतात. त्यांची काही उदाहरणे मी मुद्दामच दिली. बोलणाऱ्याची नेहमी फजिती होतेच असेही नाही. आणि वर सांगितली तितकीच माझ्या फजितीची पूर्ण कहाणी आहे असेही नाही. पण सगळा भात उकरून पाहण्याची गरज नाही. चार शिते पाहिली म्हणजे पुरे. ह्या सगळ्या प्रकारानंतर वक्ते वक्त्यांचा मार्मिक सूड कसा घेतात त्याचे एक उदाहरण सांगून हा ' आत्मघातकी उद्योग' थांबवितो.
 माझ्या मित्रमंडळीत एक आगरकरांचे चाहते व अभिमानी मित्र होते. होते म्हणण्याचे कारण असे की, ते गृहस्थ अजून आहेत, पण आता ते माझे मित्र नाहीत. ज्या कारणाने आमची आपापसांतील मैत्री तुटली, ते कारण व तो प्रसंग असा आहे: ते माझे मित्र नेहमी म्हणावयाचे, " आपण आगरकर पुण्यतिथीचा कार्यक्रम घेऊ." कार्यक्रम घेण्यास माझी हरकत नव्हती. पण माझ्या ह्या मित्राला कार्यक्रम विशिष्ट प्रकारे हवा होता. त्याचे म्हणणे असे की, पूर्वपक्ष म्हणून एक तास कुणीतरी आगरकरांच्या विरोधी बोलावे. मग उत्तरपक्ष म्हणून मी खंडनपूर्वक आगरकरांची बाजू मांडीन. हा असा कार्यक्रम रचणे फार कठीण होते. कारण पूर्वपक्ष मांडण्यासाठी कोणीतरी सनातन धर्माभिमानी पकडणे भाग होते. सनातनी माणूस म्हणणार, " तुम्ही धर्मशास्त्र प्रमाण मानून चर्चा करणार असाल तरच मी येतो. शिवाय तुमच्या आक्षेपांना उत्तरे देण्याची संधी मला मिळावी." ह्यातून फक्त भांडणे, कदाचित मारामारी, निदान शत्रुत्व नक्की निर्माण होणार हे माझ्या व्यवहारी बुद्धीला दिसत होते. पण माझ्या मित्राला तर असा कार्यक्रम हवा होता. त्यांना उत्तरपक्ष करण्याचे भले मोठे टेंगुळ उठले होते.
 शेवटी कार्यक्रम ठरला. पूर्वपक्ष मी करावयाचे ठरविले. आगरकरांच्या विरोधी व सनातन धर्माच्या बाजूने मी काय बोलतो हे ऐकण्याची उत्सुकता होती म्हणा, थोडीफार वक्ता म्हणून माझ्या नावाला किंमत आहे असे म्हणा, किंवा उलट बाजूने माझे मित्र सगळ्यांना सांगत होते, " मी कुरुंदकरांची कशी उडवतो ते पाहण्यास या " ह्या प्रचारामुळे म्हणा, सभागृह गच्च भरलेले होते. परिचय, पुष्पहार आदींच्या नंतर मी पूर्वपक्ष मांडला. माझा पूर्वपक्ष माझ्या आगरकराभिमानी मित्राला इतका अनपेक्षित होता की काय बोलावे हे त्यांना सुचेना. त्यांनी उत्तरपक्ष केलाच नाही. फक्त मला शिव्या दिल्या. लोक हसत होते. मीही शिव्या हसत ऐकत होतो. रागारागाने हे मित्र सभास्थान सोडून गेले व येथून जी माझी-त्यांची मैत्री त्यांच्या बाजूने तुटली ती अनेकदा प्रयत्न करूनही अजून जुळलेली नाही. भांडणे नको, गावात तट पडणे नको, म्हणून मित्रप्रेमाने मी कार्यक्रम घेतला. पूर्वपक्ष मी केला, पण पदरात फळ काय पडले तर 'मैत्रीचा वध.'
 "माझ्याविरुद्ध कुणीतरी बोला, म्हणजे मी ठोकून काढतो. मात्र विरुद्ध बोलताना मला अपेक्षित आहेत तेवढे मुद्दे बोला. मला अनपेक्षित बोलाल तर मैत्री संपली," हा पवित्रा तेव्हाही मला बालिश वाटला. आजही बालिशच वाटतो. पण सहज गंमत म्हणून जो आगरकरविरोधी पूर्वपक्ष त्या वेळी मी मांडला तो आजही मला बालिश वाटत नाही. आजही मी त्या पूर्वपक्षाच्या प्रामाणिक उत्तरपक्षाची वाट पाहत आहे. माझा पूर्वपक्ष असा होता : " कोणत्याही समाजव्यवस्थेत काही गुण असतात. काही दोष असतात. बालविवाहाचा गुण हा की, हुंडयाचे प्रश्न फार बिकट नव्हते. देखणेपणाचे व कातडीच्या सौंदर्याचे स्तोम नव्हते. संसाराला स्थिरता खूपच होती. दोष हा, की त्यातून स्त्रियांची गुलामी व विधवांच्या संततीचे प्रश्न निर्माण होत प्रौढ विवाहामुळे स्त्रियांची गुलामगिरी संपेल ही खात्री नाही. हुंडयाचे प्रस्थ वाढत राहते. कातडीच्या सौंदर्याला भाव येतो व कुमारीमातांचे प्रश्न निर्माण होतात. विधवेने अनैतिक वागणे, त्यातून विधवांच्या संततीचा प्रश्न निर्माण होणे, हे ज्या व्यवस्थेत घडते ती व्यवस्था वाईट व कुमारी-मातांचा प्रश्न ज्या व्यवस्थेत निर्माण होतो, ती चांगली हे जोपर्यंत आपण सिद्ध करू शकत नाही तोवर आगरकरांच्या भूमिकेला सुधारणा म्हणणे कठीण आहे. कारण सुधारणा हा चांगल्या दिशेने घडणारा बदल असतो."
 माझ्या समोर एक उत्तरपक्ष आहे, पण तो आगरकरांच्या चाहत्यांना पटेल की नाही कोण जाणे. मी विधवांच्या संततीचा प्रश्न निर्माण करणाऱ्या समाजव्यवस्थेपेक्षा कुमारी-मातांचा प्रश्न निर्माण करणारी व्यवस्था अधिक चांगली मानतो.