Jump to content

लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान/राष्ट्रीय स्वार्थाची उपासना

विकिस्रोत कडून


प्रकरण : ५

राष्ट्रीय स्वार्थाची उपासना



 'लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान ' या लेखमालेतील पहिला लेख जुलै १९५९ च्या 'वसंत' अंकांत आला. त्या आधी मे महिन्यांत हा विषय मी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेतील व्याख्यानांत मांडला होता. त्याचे आधी दोन महिने या विषयाची मी तयारी करीत होतों. म्हणजे विषय मनांत आला त्या वेळी चीनच्या दण्डसत्तेचें आव्हान भारताला इतक्या त्वरित येऊन पोचेल, चीन भारतावर उघड उघड लष्करी आक्रमण करून हे आव्हान त्याच्या तोंडावर अशा रीतीने फेकील असें स्वप्नांतहि आले नव्हतें. आता या लेखमालेत या विषयाची चर्चा केवळ तात्त्विक भूमिकेवरून केली होती असे मुळीच नाही. रशिया किंवा चीन या दण्डसत्तांपासून भारताच्या लोकसत्तेला नजीकच्या भविष्यकाळांत धोका पोचणार आहे हें मनांत आल्यामुळेच हा विषय असा विस्तृतपणे मांडावा असें मी ठरविलें. तरी पण आक्रमणाची ही लाट ४-५ महिन्यांतच भारताच्या सीमांवर येऊन थडकेल याची कल्पनाहि त्या वेळी मला नव्हती. रशियाच्या वाढत्या सामर्थ्याविषयी अमेरिकन पंडितांनी व शास्त्रज्ञांनी लिहिलेले लेख माझ्या वाचनांत आले त्या वेळी सोव्हिएट दण्डसत्तेच्या लष्करी सामर्थ्याची भारतानेहि पाश्चात्त्य राष्ट्रांप्रमाणेच दखल घेतली पाहिजे, त्या आक्रमणाची भारतालाहि त्यांच्या इतकीच भीति आहे हा विचार प्रामुख्याने मनांत आला. चीनची दण्डसत्ता त्या वेळी डोळ्यांसमोर नव्हती असें नाही, पण आव्हान येईल तें रशियाकडून येईल अशी कल्पना होती. कारण सामर्थ्य वाढले आहे तें रशियाचें वाढले आहे, चीन त्याच मार्गाने जात असला तरी भारताला आव्हान देण्याइतकें सामर्थ्य प्राप्त होण्यास त्याला अजून कालावधि लागेल, असें वाटत होतें. पण प्रत्यक्षांत चीनचेंच आक्रमण आले आणि तेंहि ही लेखमाला पुरी होण्याच्याहि आधी !
 वास्तविक हेहि खरे नाही. कारण प्रत्यक्षांत आक्रमण झाल्याला चार वर्षे होऊन गेलीं आहेत. १९५४ सालीच चीनने भारताचा सीमाप्रान्त बळकावला होता. आपल्या पंतप्रधानांनी कांही राजकीय धोरणाने तें भारताच्या नागरिकांना कळू दिले नाही इतकेच. पण नव्याने उघडकीस आलेल्या या सत्यामुळे या आक्रमणाचे स्वरूप जास्तच भयानक आहे असें ठरतें. चीनमध्ये कम्युनिस्टांची सत्ता १९४९ साली प्रस्थापित झाली आणि त्यानंतर अवघ्या पांच वर्षांत भारतासारख्या एका मोठ्या राष्ट्राला शह देण्याइतकें सामर्थ्यं, इतका आत्मविश्वास चीनला प्राप्त व्हावा हें जितकें आश्चर्यकारक, तितकेंच भारताच्या दृष्टीने लज्जास्पद आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बारा वर्षे झाली, पण आपला एकहि प्रश्न सोडविण्यांत आपल्याला यश आलेले नाही. गोवा, काश्मीर हे प्रश्न बाजूलाच राहिले. पाकिस्तानकडून आपले कर्ज वसूल करण्याचे सुद्धा सामर्थ्य आपल्याला नाहीं, आणि चीनला मात्र ४-५ वर्षात भारताच्या सरहद्दींत घुसून केवळ भारताच्याच नव्हे तर सर्व जगाच्या छातीवर पाय देण्याइतकें सामर्थ्य प्राप्त करून घेण्यात यश आले आहे. आपले राष्ट्र नुकतेच स्वतंत्र झालें आहे, तेव्हा इतक्यांतच आक्रमणामुळे निर्माण होणारा संघर्ष आपण ओढवून घेतला तर आपला नाश होईल ही भीति चीनला नाही, आपण केलेला मनसुबा यूनो संघटनेला अमान्य झाला तर जगांतली अनेक बलाढ्य राष्ट्र आपल्याविरुद्ध उठतील याची चीनला पर्वा नाही, आणि भारतावर स्वारी केली तर तो प्रतिकार करील आणि मग मोठे रणकंदन माजेल ही चिंता तर स्वप्नांतसुद्धा चीनच्या मनाला स्पर्श करीत नाही. चीन, पाकिस्तान (आणि गोवासुद्धा) यांच्या दृष्टीने भारत हा इतका प्रतिकारशून्य, इतका दुबळा ठरला आहे. आम्ही आत्मरक्षणाला पूर्ण समर्थ आहों असें, भारताचे शास्ते सर्वांना कंठरवाने सांगत आहेत. पण आपल्या स्त्रियांची विटंबना, सरहद्दींचा भंग व तेथील नागरिकांची मानखंडना, विवस्त्र होत असलेल्या द्रौपदीकडे शांतपणे पाहणाऱ्या धर्मराजाच्या शांतपणाने भारत पाहात उभा असतांना, या घोषणांना वल्गनांपेक्षा जास्त किंमत द्यावी असें कोणालाच वाटत नाही. अर्थात् या संयमामुळे, या शांततावादामुळे जगांत भारताची कीर्ति पसरत चालली आहे हें खरें आहे, पण कीर्ति आणि सामर्थ्य यांत फरक आहे हें आपण जाणलें पाहिजे.
 भारताला इतकें दौर्बल्य कशामुळे आले याची कारणमीमांसा गेल्या दोन प्रकरणांत केली आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतांतले काँग्रेसचे नेते हे राजकारणांत मग्न आहेत. समाजकल्याणाच्या योजना यशस्वी करून दाखविण्यास त्यांना वेळ नाही. स्वार्थ, सत्तालोभ, धनलोभ, जातीयता या दुर्धर रोगांनी काँग्रेसला ग्रासले आहे. त्यामुळे राष्ट्रसेवा करण्याचे सामर्थ्यंच तिच्या ठायीं राहिलेलें नाही. आपल्या कार्यक्षमतेचा हिशेब केला तर ती शून्यावर येऊन ठेपली आहे असें दिसतें. आपल्याला साधे हिशेबसुद्धा नीट करतां येत नाहीत, मग ठरल्या वेळांत ठरलेल्या भांडवलांत एखादी योजना यशस्वी करून दाखविणें लांबच राहिलें. आपल्या रेल्वे, आपले कारखाने, आपली शेती, आपली रुग्णालय यांविषयी सरकारने नेमलेल्या समित्यांचे अहवाल पाहिले तर उधळपट्टी, विध्वंस, कर्तृत्वशून्यता हीच आपल्या अठरा कारखान्यांचीं लक्षणें होऊन बसलेली दिसतात. हें सर्व सांगून भारतांतील राजकीय पक्ष, त्यांचे नेते व सामान्यतः सर्वच अधिकारी व कार्यकर्ते हे चारित्र्यहीन, धर्महीन, ध्येयहीन झाले आहेत, हीनवृत्तीचे व भ्रष्ट झाले आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक क्षेत्रांत अपयशी होत आहोंत असा निष्कर्ष तेथे काढला होता, आणि आपण यासाठी अत्यंत तळमळीने उपायचिंतन केलें पाहिजे असें म्हटलें होतें.
 हे उपायचिंतन करावयाचें तर वरील कारणमीमांसेच्याहि पलीकडे आपण गेलें पाहिजे, आणि या कारणांचीहि कारणमीमांसा केली पाहिजे. आपण धर्महीन, चारित्र्यहीन तरी कां झालों याचा विचार आपण केला पाहिजे. बारा वर्षांपूर्वीच आपण स्वातंत्र्य मिळविलें. त्याच्या आधीच्या वीस-पंचवीस वर्षांत आपण अनेक सत्याग्रहसंग्राम केले होते. त्या वेळीं राष्ट्राच्या हाकेला साद देऊन लक्षावधि लोक संग्रामांत उतरले होते, आणि ध्येयवादाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलें. गेल्या शंभर वर्षांच्या काळांत रानडे, टिळक, सावरकर, लजपतराय, गांधी, पटेल, नेहरू, सुभाषचंद्र यांसारखे अव्वल दर्जाचे श्रेष्ठ नेते भारताने निर्माण केले आणि त्यांच्या संदेशाने प्रेरित होऊन अखिल भारतभर हिंडून, सरकारी रोषाची पर्वा न करतां लोकजागृति करणारे तरुण तर प्रत्येक प्रांतांत सहस्रसंख्येने निर्माण झाले होते. हे सर्व लोक आता कोठे गेले? सत्ता- मोहिनीचे दर्शन होतांच हे सर्वच पतित आणि भ्रष्ट झाले काय ? आज भारतांत वर उल्लेखिलेल्या नेत्यांच्या तोडीचा एकहि श्रेष्ठ नेता नाही हें खरें आहे; आणि दन्याखोऱ्यांतून हिंडून लोकजागृति करणारे तरुण तर अपवादालाच आहेत हेहि खरे आहे. पण याचीच कारणें आपण शोधलीं पाहिजेत. स्वातंत्र्यसंग्रामांत निर्माण झालेलें तें शुभ्र चारित्र्य, तो ध्येयवाद, तें असामान्य कर्तृत्व एकाएकी अगदी निपटून नष्ट व्हावे याला केवळ सत्तालोभ, स्वार्थ ही कारणमीमांसा पुरेशी नाही असे वाटतें. सर्वच्या सर्व कार्यकर्ते आणि नेते इतके दुबळे, इतके नादान केवळ सत्ताप्राप्तीमुळे झाले असतील तर भारताला सध्याच्या आपत्तींतून डोके वर काढणे कधीच शक्य नाही असा त्याचा अर्थ होईल. रशियांत राज्यक्रान्ति झाली, चीनमध्ये राज्यक्रान्ति झाली, पण सत्ता हाती आल्यामुळे तेथल्या नेत्यांच्या कर्तृत्वाचा व चारित्र्याचा इतका लोप केव्हाहि झाला नाही. मग भारतांतच तसें कां व्हावें ? आपला ध्येयवाद इतका तकलुपी, इतका दिखाऊ होता काय ? कीर्ति, सत्ता, धन यांचा मोह जिंकण्याचे सामर्थ्यच भारतीयांच्या ठायी नाही काय ? असें म्हणवत नाही. याची कांहीतरी निराळी कारणें असली पाहिजेत. तींच आता शोधावयाची आहेत.
 कोणत्याहि समाजाचा वा राष्ट्राचा उत्कर्ष आणि विलय, किंवा त्याला प्राप्त झालेली कोणतीहि उतममध्यमाधम दशा ही त्याने स्वीकारलेल्या समाजसंघटनेच्या, समाजरचनेच्या मूलभूत तत्त्वांवर म्हणजेच त्याच्या सामाजिक वा राष्ट्रीय तत्त्वज्ञानावर अवलंबून असते. समता, विषमता, व्यक्तिस्वातंत्र्य, धर्मनिष्ठा, समाजवाद, साम्यवाद, लोकसत्ता, दण्डसत्ता, जातिनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, शब्दप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्य, हीं सर्व समाजरचनेची तत्वें होत. यांतील जीं कोणतीं तत्त्वें एखाद्या समाजाने स्वीकारली असतील ती सर्व मिळून त्यांचे तत्त्वज्ञान होतें, आणि त्याने स्वीकारलेलें हें तत्त्वज्ञान त्यावर त्याचा उत्कर्षापकर्ष अवलंबून असतो. चौदाव्या पंधराव्या शतकांत पश्चिम युरोपांतील जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड इ. राष्ट्रांचा झपाट्याने उत्कर्ष होऊं लागला. तो त्याने त्या वेळीं ग्रीक विद्येचें म्हणजेच तत्त्वज्ञानाचें जें पुनरुज्जीवन केलें त्यामुळे झाला असें इतिहासकार सांगतात. तोपर्यंत अनियंत्रित राजसत्ता, परमेश्वरप्रणीत धर्मसत्ता, शब्दप्रामाण्य, जन्मनिष्ठ उच्चनीचता, हें त्या देशांचें तत्त्वज्ञान होतें. ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनानंतर हे सर्व पालटलें, नष्ट झालें. त्या जागी व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, लोकसत्ता, बुद्धिप्रामाण्य, समता, हें तत्त्वज्ञान आलें, आणि यामुळेच त्या पाश्चात्य राष्ट्रांचा उत्कर्ष झाला व पूर्व युरोपमधील पोलंड, बल्गेरिया, रुमानिया, रशिया इ. राष्ट्रांनी ही नवीं तत्त्वें स्वीकारली नाहीत म्हणून त्यांचा अपकर्ष झाला याबद्दल इतिहासवेत्त्यांत दुमत नाही. गेल्या शतकाच्या अखेरीस जपानचा उत्कर्ष झाला. अल्पावधीत तो देश महत्पदाला चढला व बलाढ्य झाला याचें कारण त्याने राष्ट्रनिष्ठा, समता, विज्ञाननिष्ठा, प्रयत्नवाद ही पाश्चात्त्य संस्कृति, समाजरचनेचीं ही पाश्चात्त्य तत्त्वें अंगीकारली हें होय असेंच सर्व पंडितांचें मत आहे. इसवी सनाच्या अकराव्या-बाराव्या शतकापासून भारतांतील सर्व प्रांत इस्लामी आक्रमणाला बळी पडत गेले आणि त्यांतून ते मुक्त होतात न होतात तोच पुन्हा ते पाश्चात्त्य आक्रमणाला बळी पडले. याची मीमांसाहि अशीच केली जाते. शब्दप्रामाण्य, अपरिवर्तनीय अपौरुषेय धर्म, अनियंत्रित राजसत्ता, जन्मनिष्ठ उच्चनीचता, अतिरिक्त निवृत्तिवाद, त्यांतून आलेला दैववाद, ही त्या काळांत भारताची संस्कृति होती, समाजरचनेचीं तत्त्वें होतीं, त्याचें तत्त्वज्ञान होतें. म्हणून मोगल, इंग्रज, फ्रेंच, डच यांच्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही; आणि आज इतिहासकार असें सांगतात की, हें तत्त्वज्ञान निषिद्ध मानून गेल्या शंभर वर्षांत त्याने व्यक्तिस्वातंत्र्य, समता, राष्ट्रनिष्ठा, लोकसत्ता, इहवाद, प्रयत्नवाद, विज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रामाण्य, धर्माची परिवर्तनीयता हें तत्त्वज्ञान स्वीकारलें म्हणूनच ब्रिटिशांसारख्या बलाढ्य राष्ट्राशी लढा करून त्याला स्वातंत्र्य मिळवतां आलें. राष्ट्राचा उत्कर्ष वा अपकर्ष त्याने स्वीकारलेल्या तत्त्वज्ञानामुळे होतो या विधानाचा अर्थ एवढ्यावरून स्पष्ट होईल. तो जमेस धरून मला असे म्हणावयाचे आहे की, स्वातंत्र्योत्तर काळांत आपण जे तत्त्वज्ञान स्वीकारले आहे त्यामुळेच सध्या आपली अधोगति झाली आहे. आपल्या कोणत्याहि योजना यशस्वी होत नाहीत, कोणीहि आपल्या देशाचा अवमान करावा, सरहद्दींचा भंग करावा, आक्रमण करावें, आणि आपल्याला कसलाहि प्रतिकार करतां येऊ नये, इतके आपण दुबळे झालों आहोंत; चारित्र्य व कर्तृत्व यांचा या भूमींतून सर्वस्वी लोप झाल्यासारखें दिसावें अशी दशा झाली आहे, याचें प्रधान कारण म्हणजे काँग्रेसने व तिच्या नेत्यांनी स्वातंत्र्योत्तर काळांत (आणि कांही अंशीं पूर्वीच्या २५-३० वर्षांत) राष्ट्रनिष्ठा, धर्म, लोकसत्ता, बुद्धिनिष्ठा, शांततावाद, अहिंसा, सत्य, यांच्या विषयीचे जे सिद्धान्त म्हणजे जें तत्त्वज्ञान स्वीकारलें तें आहे.
 राष्ट्रनिष्ठा ही एक महाशक्ति आहे. पाश्चात्य विद्येचा भारतांत प्रसार झाल्यानंतर आपल्या नेत्यांनी आपली रसना व लेखणी झिजवून लोकांमध्ये ही निष्ठा दृढमूल केली, आणि तिच्याच प्रभावाने भारतांत क्रान्ति होऊं शकली. पण आज आपण वाणीने राष्ट्रनिष्ठेचा पुरस्कार करीत असलों तरी तिचें खरें स्वरूप जाणून घेऊन ती महाशक्ति जनमानसांत निरंतर तेवत ठेवण्याचे प्रयत्नं मात्र आपल्या हातून होत नाहीत. राष्ट्रभक्ति या निष्ठेची दोन अंगे आहेत. एक पूर्व परंपरेचा अभिमान आणि दुसरें व तितकेच महत्त्वाचे अंग म्हणजे परकीयांचा, देशाच्या शत्रूंचा, आक्रमकांचा द्वेष ! या दोन्ही अंगांचा जसा परिपोष व्हावयास हवा तसा येथे होत नाही व होण्याची आशा नाही. कारण येथे स्वीकारलेले तत्त्वज्ञान हें त्यांना विरोधी आहे.
 पूर्व परंपरेचा अभिमान हा राष्ट्रनिष्ठेचा आत्मा आहे. त्या अभिमानावांचून कोणत्याहि राष्ट्राला आजवर पराक्रम करता आलेला नाही व पुढे येणार नाही. कम्युनिस्ट हे या अभिमानाचे शत्रु आहेत किंवा होते. मार्क्सवादाने राष्ट्रनिष्ठेची व परंपरापूजेची कमालीची हेटाळणी केली आहे. लेनिन व त्याचे सहकारी क्रान्तीनंतर प्रारंभी हेंच करीत असत. रशियाचा इतिहास १९१७ सालापासून सुरू होतो असें ते म्हणत, आणि त्या दृष्टीने लिहिलेला इतिहासच शाळा-कॉलेजांत शिकवीत असत. पण जर्मन राष्ट्र समर्थ होऊं लागले आणि हिटलरचें आक्रमण रशियावर होणार असा धोका उत्पन्न झाला त्या वेळी केवळ अर्थवादी तत्त्वज्ञानाने पराक्रमाचें स्फुरण जनतेंत होत नाही हें स्टॅलिनच्या ध्यानांत आलें; तेव्हा रशियाच्या उन्नतीसाठी त्याने मार्क्सवाद वाऱ्यावर उधळून दिला आणि परंपरेचा अभिमान व शत्रूचा द्वेष या राष्ट्रनिष्ठेच्या दोन्ही अंगांचा तो रशियन जनमानसांत पोष करूं लागला. पीटर दि ग्रेट, कुटुसाफ, अलेक्झँडर नेव्हस्की यांचा गौरव करून आपल्या पूर्वजांनी नेपोलियनचा, पोलंडचा व इतर आक्रमकांचा पराभव कसा केला याची वर्णनें तो करूं लागला. हे सर्व पुरुष सरंजामदार वा राजे होते. पूर्वी यांची निंदा होत असे. आता ऐक्यासाठी, स्फूर्तीसाठी, पराक्रमासाठी स्टॅलिन त्यांचा गौरव करूं लागला. या गौरवाचा सारार्थ एकच होता. राष्ट्ररक्षणासाठी त्यांनी अतुल धैर्याने केलेला शत्रूंचा संहार ! या गौरवाबरोबरच जर्मनीचा भयंकर द्वेष त्याने रशियन जनतेंत पद्धतशीरपणें पसरवून दिला. तें जगांतील कामगारांचें ऐक्य, ती आंतरराष्ट्रीय दृष्टि त्याने हद्दपार केली आणि जर्मनांचा द्वेष या आगीने त्याने रशियन कामगारांची मनें पेटवून दिली. कारण मरण-मारणाचा संग्राम तिच्यावाचून करणेंच शक्य नसतें. रशियाचे साफ निर्दाळण करण्यासाठीच जर्मन उद्युक्त झाले होते, तेव्हा त्यांचा संहार करावयाचा, कत्तली करावयाच्या तर नागरिकांच्या मनांत त्या शत्रूविषयी जहरी, आसुरी द्वेषच असला पाहिजे. असीम राष्ट्रभक्ति आणि तितकाच कडवा शत्रुद्वेष यांवाचून मरण-मारणाचा संग्राम होत नसतो; आणि म्हणून मार्क्सवाद, आंतरराष्ट्रीयता हें व्यापक तत्व सोडून देऊन सोव्हिएट नेत्यांनी राष्ट्रनिष्ठेच्या दोन्ही अंगांचा परिपोष जनतेंत करून जर्मनीवर विजय मिळविला.
 चीनचा माओ हा प्रारंभापासूनच शहाणा झाला होता. राष्ट्रनिष्ठा ही महाशक्ति आहे, त्या महाप्रेरणे वाचून आपल्या समाजाचा उत्कर्ष होणार नाही, त्याच्या अंगीं सद्गुणांचे संवर्धन होणार नाही, हें त्याने प्रारंभींच जाणलें होतें, आणि प्रत्येक कम्युनिस्टाने राष्ट्रनिष्ठ असलेच पाहिजे असा त्याने दंडक घालून दिला होता. राष्ट्रनिष्ठेचें द्विविध रूपहि त्याने ओळखलें होतें. पूर्व परंपरेचा निःसीम अभिमान आणि शत्रूविषयीचा कडवा द्वेष यांतूनच कर्तृत्वाची प्रेरणा मिळते, त्यामुळेच पशूचीं माणसें होतात याविषयी त्याला शंका नव्हती. म्हणून त्याने जीं राष्ट्रीय कवनें रचली त्यांपैकी प्रत्येकांत त्याने या द्विविध भावनांचे उद्दीपन केलेले आहे. सम्राट् शी हुआंग आणि वू ती, त्याचप्रमाणे सम्राट् तै शुग, तै सु आणि चेंगीजखान यांचे स्मरण तो या कवनांत करतो. त्यांचा मुख्य गुण तो एकच जाणतो. गरुड हे लक्ष्य ठेवून ते धनुष्याची प्रत्यंचा ओढतात! यांतले कोणी अक्षरशत्रु होते, कोणी क्रूर होते; पण याबद्दल त्यांचा अधिक्षेप तो करीत नाही. सम्राट् तर सगळेच होते; पण हा कामगारप्रेमी नेता यासाठी त्यांची निंदा करीत नाही. ते सर्व चिनी होते, चीनचे सम्राट् होते, याचा त्याला अभिमान वाटतो; आणि यांचा जितका अभिमान तितकाच जपान, अमेरिका यांचा द्वेष त्याच्या गीतांतून जळजळत असतो. शत्रूच्या संहाराचा उल्लेख केल्याखेरीज तो आपलें गीत पुरें करीतच नाही. तीन हजार वर्षांपूर्वी आम्ही दिशादर्शक यंत्राचा शोध लावला, सतराशे वर्षांपूर्वी कागद तयार करण्याची कला हस्तगत केली, बाराशे वर्षापूर्वी मुद्रणयंत्र तयार केले, या पूर्वीच्या दिव्य इतिहासाचा जसा तो ठायीं ठायीं गौरव करतो, त्याचप्रमाणे तितक्याच आवेशाने व त्वेषाने शत्रूचे आम्ही निर्दाळण केलें हेंहि पावलोपावलीं तो अभिमानाने सांगतो. स्वाभिमान व परद्वेष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे माओला माहीत आहे.
 आता या दृष्टीने भारताचा विचार केला तर काय दिसतें तें पाहा. भारतांत पाश्चात्त्य विद्येच्या प्रसाराबरोबरच पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू झाली; आणि तिच्यांतूनच राष्ट्रनिष्ठेचा उदय झाला. प्रारंभीच्या काळांत लो. टिळक यांच्याकडे या चळवळीचें नेतृत्व होतें. त्या वेळीं राष्ट्रनिष्ठेच्या दोन्ही अंगांचा परिपोष येथे होत होता. टिळकांनी पूर्व परंपरेचा अभिमान आणि ब्रिटिशांचा द्वेष या दोन्ही भावना भारतीय जनतेच्या ठायीं अखंड ४० वर्षे तेवत ठेविल्या होत्या. त्यानंतर भारताचें नेतृत्व महात्माजींकडे आलें आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्वार्थ हें जें आमचें एकमेव लक्ष्य होतें त्यावरून भारतीयांची दृष्टि विचलित झाली. सत्य, अहिंसा, मानवता, विश्वबंधुत्व ही मूल्ये राष्ट्रीय स्वार्थापेक्षा श्रेष्ठ ठरली आणि त्यांचे प्रयोग येथे होऊ लागले. वैयक्तिक जीवनांत हीं तत्त्वें अत्यंत वंदनीय अशी आहेत. पण राष्ट्रीय जीवनांत त्यांचा प्रवेश होतांच त्यांना अत्यंत विपरीत रूप येऊं लागलें. तसें तें येणें अपरिहार्यच होतें. राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी सुद्धा सत्य, अहिंसा यांचा त्याग करणें युक्त नव्हे असें महात्माजींचें मत होतें. "माझी राष्ट्रभक्ति अन्यनिरपेक्ष नाही. या राष्ट्रभक्तींत परक्यांचे अहित तर येत नाहीच, तर उलट त्यांच्या हितासाठीच आम्हांला स्वातंत्र्य हवें आहे. इंग्लंडचा नाश होऊन भारताला स्वातंत्र्य मिळत असेल तर मला स्वातंत्र्य नको." असें प्रतिपादन ते करीत. सुदैवाने महात्माजींची हीं मतें राष्ट्राने फारशी मानली नाहीत. एकांतिक सत्य-अहिंसेवर काँग्रेसमध्ये कोणाचाहि विश्वास नव्हता. पंडितजी, वल्लभभाई यांनी केवळ धोरण म्हणून आम्ही अहिंसा मान्य करतों, शस्त्रयुद्ध शक्य नाही म्हणून हा सत्याग्रहाचा मार्ग आम्ही स्वीकारतों, असें अनेक वेळा जाहीर रीत्या सांगितलें आहे, लिहिले आहे. आम्हीं अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळविलें असे काँग्रेसचे नेते आज सांगत असतात, पण तें खरें नाही हें त्यांचे त्यांनाच इतरांपेक्षा जास्त माहीत आहे. १९४७ पूर्वी येथे जे तीन चार सत्याग्रहाचे लढे झाले त्यांतल्या नेत्यांना किंवा सैनिकांना इंग्रजांविषयी प्रेम नव्हते. रौलेट कायदा, जालियनवाला बाग या अत्याचारांच्या स्मरणाने ब्रिटिशांविषयी लोकांत द्वेषच पसरला होता, आणि त्यामुळेच स्वातंत्र्य संग्राम शक्य झाले. लक्षावधि लोक स्वातंत्र्यसंग्रामांत उतरले ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि ब्रिटिशांच्या द्वेषामुळेच उतरले. पण असें जरी असले तरी परंपराभक्ति आणि शत्रुद्वेष या दोन भावनांचा जो पद्धतशीर योजनापूर्वक, प्रयत्नपूर्वक परिपोष व्हावयास हवा होता तो भारतांत झाला नाही. सर्व नेत्यांचे अग्रणी जे महात्माजी त्यांचा या वृत्तीला कडवा विरोध; दुय्यम नेत्यांची त्यांच्या सत्य-अहिंसेवर श्रद्धा नाही, पण धोरण म्हणून त्यांनी ती स्वीकारलेली ! त्यामुळे या महाशक्तीच्या जोपासनेविषयी ते उदासीनच राहिले. अशा स्थितीत मुळांतच शत्रुद्वेष ही जो मनुष्याची उपजत वृत्ति, तिच्यामुळे जेवढे शक्य तेवढे झाले. पण इतर राष्ट्रांनी सर्व सामर्थ्य खर्च करून, विश्वप्रयत्न करून, वाढविलेली ती महाशक्ति कोणीकडे आणि आईबापांनी टाकून दिलेल्या अनाथ कन्यकेप्रमाणे कशी तरी वाढलेली भारतांतील राष्ट्रनिष्ठा कोणीकडे !
 परंपराभक्ति हा राष्ट्रनिष्ठेचा आत्मा होय. या आत्म्याची उपासना इतर देशांत कशी चालवितात त्याचीं कांही उदाहरणें वर दिलींच आहेत. भारतीय विद्याभवनाचे कुलपति श्री. मुनशी यांनी सर्व जगाचा प्रवास करून आल्यावर याविषयीचे आपले विचार 'भवन जर्नल' मध्ये मांडले आहेत ते येथे देतों. चालू संदर्भात ते आपल्याला निश्चित उद्बोधक वाटतील. जगाचा प्रवास करीत असतांना श्री. मुनशी यांना प्रत्येक देशांत चैतन्य, उत्साह, आशावाद भरून राहिलेला दिसला. भारतांत मात्र सर्वत्र मरगळ, निरुत्साह, शून्य ! असें कां व्हावें याचा विचार एका पत्रांत त्यांनी मांडला आहे. त्या सर्व देशांत राष्ट्रनिष्ठा ही महाशक्ति अखंड प्रज्वलित ठेवण्याचे प्रयत्न होत असतात, आणि हिंदुस्थानांत तसे कांहीच प्रयत्न होत नसल्यामुळे ही अधोगति झाली आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे. ते म्हणतात, सर्ववंद्य अशा महापुरुषांची पूजा, समाईक अशा पूर्वपराक्रमाची पराक्रमाची स्मृति, आणि सांघिक पराक्रमाची ईर्षा यांनी समाज एकजीव होत असतो. राष्ट्र घडत असतें. त्या दृष्टीने गेली १२ वर्षे भारताने व्यर्थ घालविली. अमेरिकेत शिक्षण-पद्धतिच अशी आहे की, कोणतेहि परकी समाज तेथे दोन तीन पिढ्यांत अमेरिकन होऊन जावे. वॉशिंग्टन, लिंकन हे माझे पूर्वज ही भावना तेथे नागरिकांच्या मनांत रुजविली जाते. त्या तऱ्हेचें शिक्षण देण्याचा कसलाहि प्रयत्न भारतांत होत नाही. आपली शिक्षणपद्धति अगदी फलशून्य आहे. हिंदूंनी आतापर्यंत आपल्या पूर्वपरंपरेचा अभिमान टिकविला होता. पण आणखी वीस वर्षांत हिंदूंविषयी हेंच म्हणता येईल की नाही याची शंका आहे. गेली शंभर वर्षे आपल्या नेत्यांनी ध्येयवृत्ति टिकविली होती. आता ती नष्ट झाली आहे. (भवन जर्नल २५-१-१९५९. कुलपतींचें पत्र. सारांशरूपाने.) जगांत कोठेहि आपण गेलो तरी एका देशांत असलेल्या भिन्न समाजांना एकरूप करून टाकण्याचे मार्ग ठरलेले आहेत. समान ईर्षा, समान पूर्वपराक्रम, समान महापुरुष- परंपरा ! त्या भूमीच्या प्राचीन परंपरेचा अभिमान जे धरतील तेच खरे राष्ट्रनिष्ठ. मग ते कोणत्याहि धर्माचे असोत. या दृष्टीने व्यास, वाल्मीकि, श्रीकृष्ण, श्रीरामचंद्र, महावीर, बुद्ध, विक्रमादित्य, चंद्रगुप्त, कबीर, अकबर, शंकराचार्य, शिवछत्रपति, लो. टिळक, महात्माजी ही परंपरा जो वंद्य मानील तोच राष्ट्रनिष्ठ भारतीय अशा वृत्तीची जोपासना येथे व्हावयास हवी होती. मुनशी म्हणतात तशी स्वातंत्र्योत्तर काळांत ती झाली नाहीच, पण स्वातंत्र्यपूर्व काळाची कथाहि तीच आहे! मानवता, विश्वबंधुत्व, विशालता यांविषयीच्या विपरीत कल्पनांमुळे काँग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या वर सांगितलेल्या परंपरेची एकनिष्ठ उपासना केली नाही. एवढेच नव्हे तर अनेक वेळां जाणूनबुजून तिची अवहेलना केली आहे. या देशांत हिंदूखेरीज मुस्लिम, ख्रिस्ती इ. अनेक परधर्मी समाज आहेत. त्या सर्वांच्या चित्तांत राष्ट्रनिष्ठा दृढमूल करून टाकण्यासाठी वरील परंपरेचा अभिमान त्यांच्या ठायीं उत्पन्न करणें व तो सतत प्रज्वलित ठेवणें अवश्य होतें. पण त्या परधर्मीयांना, आणि विशेषत: मुस्लिम समाजाला ही परंपरापूजा मान्य होणार नाही म्हणून काँग्रेस ने अत्यंत विपरीत धोरण स्वीकारले. या परंपरेचा आग्रहच तिने सोडला; इतकेंच नव्हे तर मुस्लिम लीगच्या अनुनयाची वृत्ति स्वीकारून हिंदूंच्या परंपराभक्तीचा अवमानहि केला. 'वन्दे मातरम्' हें आपलें राष्ट्रगीत, पण मुस्लिमांना तें अप्रिय; त्यामुळे एका मुस्लिमाचा जरी विरोध असेल तरी तें सभेंत म्हणूं नये अशी काँग्रेस सरकारची आज्ञा ! वास्तविक मुसलमान समाजहि कडवी राष्ट्रनिष्ठा जोपासूं शकतो, हें तुर्कस्थान, ईजिप्त यांच्या इतिहासावरून त्या वेळी प्रत्यक्ष दिसत होतें. तुर्कस्थानचा केमाल पाशा, ईजिप्तचा झगलूल पाशा यांचे लाखो अनुयायी मुस्लिमच होते. पण राष्ट्रनिष्ठेचा त्यांचा संदेश त्यांनी मोठ्या भक्तीने स्वीकारला. तुर्कस्थानांत अभिमान तुर्की भाषेचा, अरबीचा नाही. कुराणहि तुर्कीतून पढलें पाहिजे हा केमाल पाशाचा दंडक तुर्की मुस्लिमांनी मान्य केला. तुर्कस्थानांत जे पराक्रमी पुरुष होऊन गेले ते मुस्लिम नसले तरी तुर्कांनी वंद्य मानले पाहिजेत, तुर्केतर मुस्लिमांशी आपला संबंध नाही, आपण त्यांचा वारसा सांगू शकत नाही, हे परंपराभक्तीचें केमाल पाशाचे तत्त्वहि त्यांनी मान्य केलें. मुसलमानी धर्माच्या उदयापूर्वी तुर्कस्थानांत होऊन गेलेले जे अटिल्लासारखे वीर, त्यांचें गुण- संकीर्तन तुर्क आज करतात, त्यांचा अभिमान ते आपले पूर्वज म्हणून धरतात. इस्तंबूलचा सुलतान हाच मुसलमानांचा धर्मगुरु- खलिफा असे. पण राष्ट्रनिष्ठेच्या आड ती खिलाफत येते हें दिसतांच केमाल पाशाने ती नष्ट करून टाकली, आणि अखिल तुर्क समाजाने या कृत्याला पाठिंबा दिला. याचा अर्थ असा की, राष्ट्रनिष्ठेसाठी मुस्लिम समाजहि धर्मक्रांति करूं शकतो. भारतांतहि हेंच घडलें असतें. तसे घडूं नये म्हणून इंग्रजांचे प्रयत्न असत हे खरें; पण काँग्रेसच्या नेत्यांनी तरी तें घडविण्यासाठी काय प्रयत्न केले ? कांही नाही. त्यांना ही दृष्टिच नव्हती. सर्वधर्मीय समाजांची एक परंपरा निर्माण करून तिची भक्ति हा राष्ट्रीयतेचा निकष ठरवून ती भक्ति भारतांत दृढमूल करण्याऐवजी इतर समाजांना जें अप्रिय तें हिंदूंनीहि वर्ज्य मानावें, निदान त्याचा आग्रह धरू नये, त्याविषयी (म्हणजे स्वतःच्या आत्म्याविषयीच) उदासीन राहावें, असा उपदेश त्यांनी चालविला. स्वातंत्र्यानंतर भारत या नांवाचा आग्रहहि त्यांनी धरला नाही. कारण इतर धर्मीयांना तो तितका मान्य होणार नाही ! म्हणून 'भारत' याच्या जोडीला 'इंडिया' असें अभद्र नांव त्यांनी ठेवून दिलें. पूर्वपरंपरेची पूजा म्हणजे राष्ट्राच्या अहंकाराचें पोषण होय. तो अहंकार जेवढ़ा पोसेल, प्रबळ होईल तेवढे राष्ट्राचें कर्तृत्व पोसत असतें. त्याला दुखवणें म्हणजे राष्ट्राची हत्या होय. पण काँग्रेसच्या नेत्यांना याची जाणीवच नाही. कारण राष्ट्रीय स्वार्थ हें त्यांचें लक्ष्य नाही.
 मुस्लिम हे आपले धाकटे भाई आहेत, तेव्हा त्यांच्याशी प्रेमाने, औदार्याने, वागावें असें तेव्हा सांगितलें जाई, आणि आजहि सांगितलें जातें. हा उपदेश फारच चांगला आहे. पण मुस्लिम हे भाऊ केव्हा ठरतील ? आईवर, या भारतभूमीवर त्यांचें आमच्याइतकेंच प्रेम असेल, आमच्याइतकीच अनन्यनिष्ठा असेल तेव्हा ! व्यास- वाल्मीकि, राम-कृष्ण, शिवछत्रपति, राणा प्रताप यांच्यावर आमच्याइतकीच त्यांची भक्ति असेल तेव्हा ! भारतांतल्या मुसलमानांतहि अशा राष्ट्रीय वृत्तीचे लोक होते. वास्तविक त्यांना काँग्रेसने भाई मानावयास हवें होतें, पण त्यांना जवळ करण्याऐवजी काँग्रेसने या थोर परंपरेचा ज्यांना अत्यंत तिटकारा, ती आपली परंपरा आहे असें मानावयास जे कधीहि तयार नव्हते म्हणजे जे खरोखरच आमचे भाई नव्हते त्या लीगच्या लोकांचा अनुनय करण्यांतच धन्यता मानली. त्या मुस्लिमांना संस्कृतचा द्वेष व उर्दूची भक्ति ! अर्थातच काँग्रेसलाहि उर्दूचें प्रेम; आणि तें किती ? तर हिंदी भाषासुद्धा संस्कृतनिष्ठ असण्यापेक्षा उर्दूनिष्ठ असली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. शिवछत्रपति व राणा प्रताप हे हिंदूंना अत्यंत प्रिय. लगेच महात्माजींनी त्यांना मूढ व भ्रान्त ठरविलें ! हे दोन पुरुष म्हणजे भारताचा आत्मा आहे. आमची प्राणशक्ति माहे. त्यांची निंदा करण्याने आपण केवढी भयानक हिंसा करीत आहोंत याची महात्माजींना कल्पनाच नव्हती काय ? पण हें तरी कसें म्हणावें ? मुस्लिमांच्या पूर्व-परंपरेंत भयंकर कत्तली करणारे अनेक बादशहा होऊन गेले. पण त्यांना कोणी भ्रांत किंवा भूढ ठरविलें नाही. त्यामुळे त्या समाजाच्या भावना दुखविल्या जातील हें काँग्रेसच्या नेत्यांना निश्चित माहीत आहे. पण तशाच भावना हिंदूंनाहि आहेत हें त्यांनी कधी जाणलें नाही. त्यामुळे इतर समाजांत भारतनिष्ठेचे बीजारोपण करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी हिंदू- विरुद्ध मुस्लिमांची बाजू घेण्यांत त्यांनी भूषण मानले. यांत अधःपात सगळ्यांचाच झाला. मुस्लिमांचा धर्म निराळा असला तरी या भूमीच्या प्राचीन पराक्रमी पुरुषांचेच ते खरे वारस आहेत. त्यांचे भरणपोषण सर्व या भूमीनेच केलें आहे. तेव्हा तिच्या प्राचीन वैभवाच्या अभिमानानेच त्यांची उन्नति होईल. इतर देशांतल्या मुस्लिमांनी हें जाणलें आहे. ईजिप्तच्या राष्ट्रसभेचे चिटणीस हमीद् अल् अलेली १९१० सालच्या आपल्या भाषणांत म्हणतात, "ज्यांनी पिरामिड उभारले, युरोपचें अस्तित्वहि नव्हतें तेव्हा ज्यांनी संस्कृति निर्माण करून तिचा प्रसार केला त्यांचे कर्तृत्व, त्यांची प्रज्ञा आमच्या रक्तांत आहे." हिंदुस्थानांतील अनेक मुस्लिम पंडितांनीहि याच तऱ्हेचा उपदेश आपल्या बांधवांना केला आहे. ('भारतीय लोकसत्ता' या ग्रंथांत या विषयाचें विस्तृत विवेचन मीं केलें आहे. जिज्ञासूंनी तें पाहावें. पृष्ठ ४०२- ४१२) अशा अभिमानानेच समाजाच्या अंगीं कर्तृत्वाचा उदय होतो. त्याला पराक्रम शक्य होतो. येथला मुस्लिम समाज भारताच्या बाहेरच्या मुस्लिमांच्या पराक्रमाचा वारसा अर्थातच सांगू शकत नाही. येथले ख्रिस्ती आम्ही नेपोलियन, वॉशिंग्टन, न्यूटन यांचे वारस आहों, असें म्हणूं लागले तर तें हास्यास्पद होईल; आणि फ्रेंच किंवा इंग्लिश लोक त्या तत्त्वावर त्यांना कधीहि जवळ करणार नाहीत. ते ख्रिस्ती असले तरी भरत- भूमीच्या प्राचीन पराक्रमाचे- रामकृष्णांचेच ते वारस होत. त्याचप्रमाणे मुस्लिमांचें आहे. ज्या भूमींत आपण राहतो तिच्या या वैभवाचा अभिमान जो समाज धरीत नाही त्याची उन्नति होत नाही. हें ध्यानीं घेऊन काँग्रेसने तसा अभिमान बाळगणाऱ्या राष्ट्रनिष्ठ मुस्लिमांनाच जवळ करावयास हवें होतें, पण तें न करतां मुस्लिमांनी काँग्रेसमध्ये यावें म्हणून देवाण-घेवाणीच्या बाजारी तत्त्वावर ऐक्य करण्याचे तिने प्रयत्न केले. कायदेमंडळांतील जागांचा व मंत्रिपदाचा सौदा करून लीगला वश करण्याचें धोरण तिने आखलें. त्यामुळेच भारताचा नाश झाला. राष्ट्रीय अहंकाराच्या जाणिवेतून त्यागाची प्रेरणा मिळत असते. हिंदूंचा हा अहंकार काँग्रेस पदोपदीं दुखवीत असे, आणि मुस्लिमांत तर तो निर्माणच झाला नाही. त्यामुळे पाकिस्तानी वृत्ति बळावत गेली व मुस्लिम अत्याचार करूं लागले. पण त्याचा प्रतिकार करण्यासाठी काँग्रेसने संघटना उभारण्याचेहि नाकारलें. कारण राष्ट्रशत्रूंची हिंसा तिला वर्ज्य होती, आणि या अहिंसक वृत्तीमुळे भारताची घोर हत्या मात्र घडली.
 पण या अनुभवाने शहाणे होण्याचे मात्र काँग्रेसचे नेते नाकारीत आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचें भावनात्मक ऐक्य घडविण्याचा विश्वप्रयत्न व्हावयास हवा होता. येथल्या परंपरेच्या ओघांत, अमेरिकेप्रमाणे सर्वांना मिसळून टाकण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी अपार कष्ट करावयास हवे होते. पण राष्ट्रनिष्ठा याचा जो अर्थ प्रत्येक देश जाणतो तो भारताच्या नेत्यांना मान्य तरी नसावा किंवा कळत तरी नसावा असें वाटतें. नाहीतर मुस्लिम लीगशी- आम्ही जिनांचे वारसदार आहों म्हणून जाहीरपणे सांगणाऱ्यांशी- त्यांनी सख्य केलें नसतें. केरळातील मुस्लिम लीगचा जाहीरनामा मल्याळी भाषेत असल्यामुळे आपण वाचला नव्हता असें पंडितजी म्हणाले. पण तो वाचण्याची जरुरी काय होती ? तो काय असणार हे गेल्या चाळीस वर्षांच्या अनुभवाने ध्यानांत येण्यास हरकत नव्हती; पण त्यांना तें ध्यानांत घ्यावयाचेंच नाही हें खरें आहे. कारण ही काही अपवादात्मक गोष्ट नाही. द्रवीड कळहम्-चे नेते भारताच्या परंपरेचा वाटेल तो अवमान करतात, पण त्यांच्याशीहि काँग्रेस सख्य करते ! परक्या मिशनऱ्यांचे धर्मप्रसाराचे प्रयत्न भारताच्या ऐक्याला निश्चित घातक आहेत, असल्या धर्मान्तरानेच समाज पूर्वपरंपरेंतून तुटून निघतात, तिचे विरोधक बनतात. असें धर्मान्तर परके ख्रिस्ती मिशनरी फार मोठ्या प्रमाणावर करीत आहेत याचे शेकडो पुरावे उपलब्ध झाले आहेत. नियोगी कमिटीचा तसा अभिप्राय आहे. बैतुलपूरच्या महारोग्यांच्या इस्पितळांतील रोग्यांनी तशा तऱ्हेची तक्रार राज्यपाल पाटसकरांच्याकडे केलेली आहे. मंगलोरच्या 'क्रुसेडर्स लीग'च्या विरुद्ध हीच तक्रार आहे. नाग टोळ्यांच्या बंडाळीमागे परके मिशनरी आहेत असेंहि दिसून आले होते. भारतीय ख्रिस्ती लोकांनीसुद्धा परक्या मिशनऱ्यांना विरोध दर्शविला आहे. यासाठीच असें छळाने, कपटाने होणारें धर्मान्तर कायद्याने बंद करावं असा ठराव प्रकाशवीर शास्त्री यांनी लोकसभेत आपला होता; पण काँग्रेसने तो मान्य तर केला नाहीच, उलट तिचा मंत्रिमहाशयांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केलेल्या सेवेचा गौरवच केला ! ही सेवा करतांनाच भारताच्या एका महाशक्तीवर हे परके मिशनरी केवढा घाव घालीत आहेत याची जाणीव काँग्रेसजनांना नाही काय ? सरहद्दीवरच्या जमातींच्या बाबतीत हेच घडत आहे. श्री. ह. वि. कामत यांनी नेपाळ, भूतान, कॅलिम्पांग या भागांत हिंडून माहिती जमा करून 'कम्युनिस्ट चायना कॉलनायझेस तिबेट, इन्व्हेड्स इंडिया' या नांवाची एक पुस्तिका लिहिली आहे, सरहद्दीच्या भागांतील लोकांची मनोवृत्ति काय आहे हे तीवरून स्पष्ट दिसून येईल. कॅलिम्पांग येथील एका दुकानदाराने श्री. कामत यांनी दिलेले एक भारतीय नाणें नाकारलें हें नाणें सर्व हिंदुस्थानांत चालतें, असें कामतांनी सांगितलें तेव्हा तो दुकानदार म्हणाला, 'पण हा देश निराळा आहे.' स्वातंत्र्य मिळून आज बारा वर्षे होऊन गेलीं, पण सरहद्दीवरच्या भारतीयांना, तेथील जमातींना शान, कुमान, काचीन, नाग या लोकांना भारत हा आपला देश आहे असें दृढनिश्चयाने वाटलें पाहिजे असे कसलेहि प्रयत्न काँग्रेसने केलेले नाहीत. चीनने मात्र अत्यंत धडाक्याने या जमातींत प्रचार चालविला आहे. उद्या युद्ध जुंपलें तर आपल्याला चीनकडे जाणे श्रेयस्कर आहे, ही भावना चीनचे नेते या प्रदेशांत निर्माण करून ठेवीत आहेत. म्हणजेच त्यांची भारतनिष्ठा विचलित करीत आहेत. पण विचलित करीत आहेत, असें तरी कां म्हणावें ? ती निष्ठा तेथे आपण कधी प्रस्थापित तरी केली होती का ? तिचें महत्त्व आज तरी आपण जाणलें आहे काय ?
 परंपरेचा अभिमान हे जें राष्ट्रभक्तीचें अत्यंत सोज्ज्वळ अंग त्याची जेथे ही परवड, तेथे परक्यांचा, आक्रमकांचा, जुलमी राज्यकर्त्यांचा द्वेष या दुसऱ्या अंगाची काय स्थिति असेल याची कल्पना सहज करता येईल. शत्रूवर प्रेम करावे हीच शिकवण काँग्रेसचे नेते भारताला देऊं लागले आणि द्वेष, प्रक्षोभ, संताप, ही कांही त्याज्य, हीन, निंद्य भावना आहे असा उपदेश येथे होऊं लागला. वास्तविक आक्रमकांचा द्वेष, मातृभूमीवर अत्याचार करणाऱ्यांविषयीचा जहरी संताप, तीव्र अमर्ष, ही अत्यंत शुद्ध व सात्विक भावना आहे. एरव्ही आपण सामान्य माणसें शेजाऱ्यांचा, भाऊबंदांचा द्वेष करीत राहतो, त्याच्या बुडाशी हीन असा स्वार्थ असतो; पण आक्रमकांच्या द्वेषामागे राष्ट्रीय स्वार्थ असतो. त्यामुळे माणसांतलें हीण जळून जातें, त्याच्या मनाचें उन्नयन होतें व तो वाटेल त्या पराक्रमाच्या कोटी करावयास सिद्ध होतो. भारतांतल्या हजारो क्रान्तिकारकांनी मातृभूमीवरील प्रेमाचें दुसरें अंग जें इंग्रजांचा द्वेष त्या द्वेषामुळेच अंदमान साहिलें, वधस्तंभ सोसला. महात्माजींच्या सत्याग्रहाच्या चळवळींत जे सामील झाले तेहि इंग्रजांच्या द्वेषानेच प्रेरित झाले होते. इंग्रजांवर प्रेम त्यांपैकी कोणीच करीत नव्हता, आणि मातृभूमीचें प्रेम व इंग्रजांचा द्वेष यामुळेच भारताच्या भिन्न प्रांतांत ऐक्य टिकून होतें. समान शत्रु, समान आपत्ति हा ऐक्याला पोषक असा घटक आहे.
 'रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेने 'नॅशनॅलिझम' या नांवाचा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. त्यांत इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया इत्यादि देशांत राष्ट्रनिष्ठेचा उदय व परिपोष कसा झाला तें विवरून सांगितलें आहे. एक धर्म, भाषा, परंपरा इत्यादि कारणें देऊन दर ठिकाणीं अंतिम निर्णायक कारण म्हणून परक्यांचे आक्रमण हे दिलेले आहे. इंग्लंडमध्ये राष्ट्रभावना उदित झाली ती फ्रान्सबरोबर झालेल्या शतवार्षिक युद्धामुळे. नेपोलियनच्या आक्रमणामुळे जर्मनी संघटित झाला. त्याच्या आधी हे घडून येत नव्हते. रशियावर १८१२ साली नेपोलियनने स्वारी केली त्या वेळी त्याचा अहंकार दुखावला आणि अगोदर फ्रेंचमय होऊन गेलेले सरंजामदारहि फ्रेंचांच्या द्वेषाने पेटून गेले व मातृभूमीच्या रक्षणासाठी उभे राहिले. (या ग्रंथाची पहिली पांच प्रकरणें पाहावी. ग्रंथ इंग्लंडमधल्या सहा सात पंडितांनी मिळून अनेक वर्षे संशोधन करून लिहिला आहे आणि युरोपातल्या वीस पंचवीस इतिहासवेत्त्यांनी तो तपासून पाहिला आहे.) जपानमध्ये १८५४ च्या आधी तीनशे वर्षे नुसता अंधार होता. अराजक होतें. दुही, फूट, मत्सर, परस्परांचा द्वेष, जातीय वैमनस्य यांनी, स्वातंत्र्योत्तर भारताप्रमाणे, तेथे नुसती बजबज माजली होती. इतकी की, अमेरिकन सेनापति कमोडोर पेरी याने नुसत्या तोफांच्या दहशतीने जपानला शरण आणले. पण या परकी आक्रमणामुळेच जपानी लोक खडबडून जागे झाले. अमेरिकेविषयीच्या द्वेषाची आग सर्व देशभर पसरली आणि त्या आगींत क्षुद्र भेद, जातीय भेदसुद्धा पार जळून गेले. वाटेल त्या त्यागास जपानी सिद्ध झाले, आणि थोड्याच अवधीत त्यांनी आपला देश बलाढ्य, समृद्ध व समर्थ करून टाकला.
 हिंसा, द्वेष यांतून कधी चांगलें निर्माण होत नाही, झालें तरी तें टिकाऊ नसतें, असें सध्याचें काँग्रेसचे तत्त्वज्ञान आहे. पण इतिहासाला तें मंजूर नाही. १८५४ पूर्वी जपानमध्ये मातृभूमीचा अभिमान होताच, पण अमेरिकेच्या द्वेषामुळे त्यांतून स्फुलिंग बाहेर पडले, आणि मग त्यांतून जपानच्या सर्व गुणसंपदेचा उदय झाला. पण जपानचाच काय ? सर्व मानवी संस्कृतीचा इतिहासच असा आहे. ग्रीक, रोमन, युरोपीय, अमेरिकन, भारती, मिसरी- सर्व, सर्व संस्कृतींच्या पायाशी हिंसाच होती. शेकडा ६०-७० जनांना गुलामगिरीत पिचत ठेवल्यावांचून त्या काळांत संस्कृतीचा उदय होणेंच शक्य नव्हते. तरी त्या संस्कृतींनी अमर कार्य केलें आहे. जर्मनी, रशिया, जपान यांचे इतिहासहि तेंच सत्य दर्शवितात.
 जर्मनी, रशिया, जपान हे देश दण्डसत्तेचे, एकतंत्री सत्तेचे पुरस्कर्ते आहेत म्हणून राष्ट्रीय ऐक्यासाठी परक्यांचा द्वेष चेतविणें त्यांना अवश्य आहे असे कोणास वाटेल. पण अमेरिकेच्या इतिहासांतहि हेंच दिसून येतें. (इंग्लंडचे उदाहरण वर दिलेच आहे.) अमेरिका स्वतंत्र होण्याआधी तेथे तेरा वसाहती होत्या, आणि त्यांचे आपसांत नित्य कलह, संघर्ष चालू होते. पण इंग्लिशांनी त्यांच्यावर जुलूम केला. त्याचा संताप येऊन त्या सर्व वसाहती प्रतिकारार्थ एक झाल्या व त्यांतूनच आजच्या महान् अमेरिकन राष्ट्राचा जन्म झाला. पुढे अमेरिकेत येऊन राहिलेल्या भिन्न भिन्न युरोपीय जमातींना पूर्ण अमेरिकन करून टाकून एकसंध समाज निर्माण करण्याचे कार्यहि परराष्ट्रांशी युद्ध, संघर्ष यांमुळेच झालें असें इतिहासवेत्ते सांगतात. अमेरिकेतील यादवी युद्धांतून उत्तर-दक्षिणेत जो दूरीभाव निर्माण झाला होता तो स्पेन अमेरिका युद्धामुळे, म्हणजे दोघांनाहि समान शत्रु निर्माण झाल्यामुळे बराचसा कमी झाला, आणि मग राष्ट्रीय भावनेवर कळस कोणीं चढविला ? तर विड्रो विल्सन यांनी ! हें सांगतांना वरील ग्रंथाचे (नॅशनॅलिझम) लेखक म्हणतात, 'दुसऱ्या राष्ट्राचा सांघिक द्वेष करण्याचें अथवा सामूहिक रीत्या संतापून उठण्याचें सामर्थ्य हें जर राष्ट्रनिष्ठेचें एक लक्षण असेल (आणि तें फार मोठें लक्षण आहे हें या ग्रंथांत अनेक ठिकाणीं सांगितलें आहे.) तर १९१७ साली अमेरिका हे संपूर्ण अर्थाने राष्ट्र झालें असें म्हटलें पाहिजे.
 युद्ध, परराष्ट्राशी संघर्ष, परक्यांच्या द्वेषामुळे, संतापामुळे सामुदायिक उठावणी करण्याचें सामर्थ्य याचे राष्ट्राच्या घडणीच्या दृष्टीने जे महत्त्व आहे तें प्रत्येक राष्ट्राच्या विवेचनांत या ग्रंथांत आवर्जून सांगितलें आहे आणि शेवटी विश्वराष्ट्राचा विचार करतांना तशी विश्वसंघटना होण्याचा संभव नाही असें सांगून त्याचें एक कारण म्हणून बाह्य राष्ट्रसंघर्षाचा अभाव हे दिलें आहे. एका तत्त्ववेत्त्याने तर मंगळ, शुक्र, यांच्याशी दळणवळण सुरू होऊन त्यांच्याशी संघर्ष सुरू होईपर्यंत विश्वराष्ट्र घडणेंच शक्य नाही असें म्हटलें आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. भिन्न धर्म, भिन्न जाती, भिन्न पंथ या सर्वांनी ऐक्य करावयाचें म्हणजे सर्वांनाच मोठा त्याग करावा लागतो, संयम ठेवावा लागतो, कांही अपमान सोसावे लागतात. हे सर्व ते समाज केव्हा करतील ? सर्वांवर प्राणसंकट आलें, सर्वावर आक्रमण झालें, सर्वनाश दिसूं लागला तर. म्हणून त्या वेळीं जी परद्वेषाची भावना निर्माण होते ती समाज जगण्याला अवश्यच असते, आणि अखिल समाजाच्या हितबुद्धींतून ती निर्माण झालेली असल्यामुळे ती अगदी उदात्त व सात्त्विक अशीच असते. खेड्यापाड्यांतल्या, आळीआळीतल्या क्षुद्र स्वार्थापायी जे रागद्वेष निर्माण होतात, म्युनिसिपालिट्यांतल्या भांडणांतून जे किळसवाणे मत्सर व विद्वेष जोपासले जातात त्यापेक्षा अखिल भारताच्या शत्रूविषयीचा जो द्वेष तो कितीतरी सोज्ज्वळ व उदात्त आहे. कारण या द्वेषाला स्वार्थाचा संपर्कहि नसतो. स्वार्थ असला तरी तो राष्ट्रीय स्वार्थ असतो. आणि त्यामुळेच निर्माण झालेले रागद्वेष हे अतिशय उंच पातळीवरचे असतात. सामान्य रागद्वेषांत, वैयक्तिक क्षुद्र स्वार्थात बरबटलेल्या मनुष्याला एवढ्या उंचीवर नेतां आलें तर समाजाचा तो फार मोठा उत्कर्ष आहे, ती फार मोठी प्रगति आहे यांत शंकाच नाही.
 पण भारताच्या नेत्यांचें एवढ्या उंचीवर, या प्रगतीवर, समाधान नाही. सर्व समाजाने वैश्विक उंची गाठली पाहिजे, व्यक्तीचा आत्मा मानवतेइतका विशाल झाला पाहिजे, अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर' ' जो खांडावया घाव घाली, कां लावणी जयाने केली, दोघां एकचि साउली, वृक्षु दे जैसा,' हा उपदेश संतांनी परमार्थात केला. तो समाजकारणांत, राजकारणांत, राष्ट्रीय व्यवहारांत आणावयाचा अशी त्यांची प्रतिज्ञा आहे. सत्याने असत्य जिंकावें, अहिंसेने हिंसा जिंकावी हे तत्व राजकारणांतहि प्रभावी झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. यामुळे या देशावर पूर्वीही अनेक वेळां महान् आपत्ति ओढवल्या आहेत, आणि दुर्देवाने आजहि तेंच घडत आहे.
 मुख्य आपत्ति म्हणजे असल्या उपदेशाने समाजाला मरगळ येते. कारण असली श्रेष्ठ ध्येयें, उदात्त तत्त्वें त्याला कळत नाहीत. संतांनी स्त्रीपुत्रांची निदा करून संसाराची किळसवाणी वर्णने करून माणसांच्या सामान्य राग- द्वेषांची उपेक्षा केली. षड्-विकार हे रिपु आहेत असें सांगितले. त्यामुळे संतांना इष्ट तो परमार्थं तर साधला नाहीच, पण येथला माणूस ५०० वर्षेपर्यंत मरगळून कर्तृत्वहीन झाला होता, पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे क्षुद्र रागद्वेष नाहीसे झाले नाहीत ते नाहीतच. ते उलट आणखी प्रबळ झाले, आणि मग याचा अत्यंत वाईट परिणाम झाला. तोंडाने उच्च तत्वांचा जप करावयाचा आणि प्रत्यक्ष जीवन खातेऱ्यात घालवावयाचें, दृष्टि तारामंडळाकडे ठेवावयाची आणि उभें शेणांत राहावयाचें, असा कमालीचा मिथ्याचार भारतांत सुरू झाला. पण दुसरें कांही घडणेंच शक्य नाही. मनुष्याच्या जीवनांत पाशवी वासना प्रबळ असतात. त्यांना योग्य वळण लावून, त्यांचें उन्नयन करून त्याला मानव बनविणे एवढेच खरोखर शक्य आहे, पण आपण त्याला देव करण्याच्या प्रयत्नांत नेहमी असतो. त्यामुळे तें तर साधत नाहीच; उलट मानवांतला पशुमात्र उसळून नंगा नाच घालूं लागतो.
 स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दहाबारा वर्षांचा आपला इतिहास पाहिला तर या भीतिदायक सत्याचा आपल्याला चांगलाच प्रत्यय येईल. तेथल्या नुसत्या विद्यार्थिवर्गाच्या लीला पाहिल्या तरी या भूमींत माणसेंच राहतात काय, अशी कोणालाहि शंका आल्यावांचून राहणार नाही. मग त्याच्या जोडीला म्युनिसिपालिट्यांतले नगरपिते, प्रत्येक वस्तूंत काळाबाजार करून जनतेला हैराण करून टाकणारे व्यापारी, अन्नांत, औषधांत भेसळ करणारे कारखानदार, ते पोलीस, ते अधिकारी यांची भर घांतली तर काळजाचा ठाव सुटतो. हें सर्व कां व्हावें ? १९४७ पूर्वी अखिल भारतीय जनतेसमोर कांही ध्येय होतें. स्वातंत्र्यप्राप्ति हें तें ध्येय होतें आणि त्यासाठी कांही त्याग करावा, संयम करावा, विवेकाने आपल्या पशुवासना आवराव्या अशा वृत्तीची जोपासना येथे होत होती. आजहि भारतांत ध्येय आहे, राष्ट्रविकास योजना हे कांही सामान्य ध्येय नाही. त्यांत माणसाचा स्वार्थहि आहे, पण एकतर मागल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे येथले नेते व अधिकारी अत्यंत लोभी, स्वार्थी व केवळ भाडोत्री असल्यामुळे त्या स्वार्थाच्या लाभाची जनतेला खात्री नाही, पण त्यापेक्षाहि महत्त्वाची गोष्ट ही की, हौतात्म्याची प्रेरणा द्यावी असें तें ध्येय नाही. राष्ट्राच्या स्वातंत्र्याचें ध्येयमात्र तसें आहे. राष्ट्रावर आलेल्या आक्रमणाचा प्रतिकार हे ध्येय तसें आहे. त्या प्रतिकाराच्या भावना प्रदीप्त झाल्या की, त्यांतून रागद्वेष चेततात (राग म्हणजे स्वराष्ट्राचें प्रेम आणि द्वेष म्हणजे शत्रुराष्ट्राचा द्वेष). त्यामुळे लोक त्याग, संयम, आत्मबलिदान याला तयार होतात. मग विकासयोजनासाठी कष्टाला ते तयार होतील यांत शंका कसली ?
 चीनने भारतावर १९५४ साली आक्रमण केलें. त्याच वेळी सर्व भारतभर दौरा करून काँग्रेसने चीनविषयीच्या द्वेषाचा वडवानल भारतांत पेटवून द्यावयास हवा होता. त्यामुळे आज मरगळून गेलेले भारतीय जिवंत झाले असते. विकासयोजनांचा व युद्धांत चीनला जो प्रतिकार करावयाचा त्याचा संबंध किती निकट आहे तें हजारो प्रचारकांनी खेडुतांना पटवून दिलें असतें, तर आज त्या योजनांमागे जनता नाही म्हणून आक्रोश करण्याची पाळी आली नसती. आज आपल्या उन्नतीच्या सर्व योजना भाडोत्रीपणे चालल्या आहेत. याची अनेक उदाहरणें, अनेक प्रमाणे मागे दिलींच आहेत. आपले गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी सरकारी अधिकाऱ्यांची सर्वत्र भाडोत्री वृत्ति आहे असें म्हटलें आहे. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची वृत्ति काय निराळी आहे ? काँग्रेसने नेमलेल्या 'दहांच्या समितीने' जो अहवाल सादर केला तो अगदी निर्णायक व तितकाच उद्बोधक आहे. समिति म्हणते : काँग्रेसच्या कार्यकत्यांना तळमळ अशी नाहीच. कोणत्याहि प्रश्नाचा गांभीर्याने ते विचारच करीत नाहीत. कसलाहि ध्येयवाद नसल्यामुळे त्यांच्यांत ऐक्य टिकत नाही. काँग्रेसमध्ये सत्ता हेंच प्राप्तव्य आहे. सेवा हो वृत्तिच नाही. काँग्रेससंस्था ही सेवासंस्था म्हणून राहिली नाही. शिस्त व चारित्र्य यांचे मानदंड नाहीसे झाले आहेत. काँग्रेसकार्यकर्त्यांची राष्ट्रनिष्ठा ओसरत चालली आहे. (टाइम्स: २७-११-५९) हें सर्व कशामुळे झालें याचा आपण विचार केला पाहिजे. माझें असें निश्चित मत आहे की, आक्रमक चीनबद्दल जळता द्वेष आपण समाजांत पसरविला असता तर हें हीण सर्व जळून गेलें असतें, आणि लोक त्यागाला सिद्ध झाले असते. त्यांना तळमळ वाटली असती. त्यांच्या ठायीं सेवावृत्ति निर्माण झाली असती. प्रत्येक राष्ट्राच्या नेत्यांनी लोकांच्या या वृत्तीला साद घालून त्यांच्या मनाचें उन्नयन केलें आणि चारित्र्य, कर्तृत्व, राष्ट्रसेवा, अतुल त्याग इ. सद्गुणांची जोपासना समाजाच्या ठायी करून राष्ट्र सामर्थ्यशाली केलें. शत्रूवर प्रेम करण्याचें पाप त्यांनी केलें नाही.
 तें पापच आहे. अत्यंत निंद्य व गर्हणीय असें पाप आहे. कारण लाखांतल्या एकाहि माणसाला तें शक्य नसल्यामुळे तसल्या उपदेशाने समाजांत मिथ्याचार सुरू होतो. ब्रह्मचर्याचा व संन्यासाचा सार्वत्रिक उपदेश केला तर परिणाम काय होतो तें बुद्धधर्मीय विहारांनी व कॅथॉलिक धर्मीय मठांनी जगाला सांगितलें आहे. या विहारांत व मठांत अत्यंत हिडीस व भयानक अत्याचार माजले होते. शत्रूवरील प्रेमाच्या उपदेशाने हेंच होणार आहे, झालें आहे, होत आहे. वैयक्तिक जीवनांत हा उपदेश ठीक आहे, पण राष्ट्रीय जीवनांत असल्या उदात्त तत्त्वांचा उपदेश करणें अत्यंत घातक आहे. सामान्य मानवी जीवनांतून रागद्वेष, स्वार्थ, अहंकार कधीहि नष्ट होणार नाहीत आणि मानवाच्या ठायींच्या त्या मोठया शक्तिच आहेत. त्यांचा सात्त्विकतेच्या प्रेमाने साधुसंतांनी अवमान केला तर समाज पौरुषहीन होतो, निःसत्त्व होतो. म्हणून स्वार्थाला राष्ट्रीय स्वार्थाचें रूप देणे, अहंकाराचें राष्ट्रीय अहंकारांत रूपांतर करणें आणि द्वेष, अमर्ष या शक्तीला सामुदायिक रूप देऊन आक्रमकांविरुद्ध त्या अग्निज्वाळेचा उपयोग करणे हाच समाजाची उन्नति करण्याचा राजमार्ग होय. हें न केलें तर ही ज्वाळा उलटी फिरते व समाजाचा नाश करते. परक्यांचा आक्रमकांचा द्वेष त्याला शिकवला नाही तर तो स्वकीयांचा, आप्तजनांचा द्वेष करू लागतो. आक्रमकांच्या हिंसेला त्याला प्रवृत्त केलें नाही तर तो स्वकीयांची हिंसा करू लागतो. सध्यां भारतांत हेंच चालू आहे. शत्रूशीं अहिंसा व भारतीयांवर रोज तीन वेळां गोळीबार ! पाकिस्तानशीं प्रेमाने वाटाघाटी. त्याने अत्याचार केले, गांवें बळकावलीं तरी प्रेमाने वाटाघाटी ! आणि बेळगांव सीमेवर हिडीस पाशवी अत्याचार, आणि तें करणाऱ्यांना राष्ट्रपतिपदक !
 पण भारताला हा शापच आहे. अतिरेकी, अव्यवहारी सात्त्विकतेच्या, औदार्याच्या बेहोषीने स्वजनांच्या हिताचा नाश करावा आणि त्यांतच श्रेष्ठ धर्म आचरल्याचा अभिमान मिरवावा, अशी वृत्ति जोपासली जाणें हा भारताला शापच आहे. आम्हांला सत्य, औदार्य सुचावयाचें तें परक्याशीं वागतांना. धर्मराजा फासे खेळावयास बसला. भीमाने ठार मारलेल्या राक्षसाच्या हाडाचे फासे केले होते. त्यामुळे भीमाने आरोळी मारली की, पांडवांना अनुकूल दान पडे. त्यावर शकुनीने तक्रार केली. तेव्हा धर्माने भीमाला ओरडण्याची बंदी केली. कारण काय ? कांही नाही. केवळ औदार्य, शत्रुप्रेम ! पुढे कौरवांचें कपट ध्यानांत आल्यावर धर्मराजाने तसे स्वच्छ सांगून खेळ बंद करावयास हवा होता, पण तसें त्याने केलें नाही. कारण वचननिष्ठा ! मनांत विचार असा येतो की द्रौपदीला पणाला लावतांना तिला विवाहांत दिलेल्या 'नातिचरामि' या वचनाने तो बद्ध नव्हता काय ? तिला त्याने पणाला लावली ही केवढी हिंसा आहे! केवढा वचनभंग आहे ! पण त्याच्या यातना स्वकीयांना भोगावयाच्या होत्या. त्याला धर्मराजाची हरकत नव्हती. आमच्या सर्व श्रेष्ठ निष्ठांचा फायदा नेहमी शत्रूलाच मिळावयाचा !. स्वतःच्या स्त्रीच्या बाबतीत धर्मराजाने धर्मद्रोह केला. हिंसाच केली. मग तशीच हिंसा, तसाच वचनभंग तिच्या वस्त्राला दुःशासनाने हात घालतांच पुन्हा करून त्याने ती विटंबना थांबविणें अवश्य होतें. पण ती हिंसा परक्याच्या बाबतींत झाली असती. ती आम्हांला वर्ज्य आहे. पहिली हिंसा स्वजनांच्या बाबतींत होती. तिने जगाला आमचें औदार्य दिसतें. या औदार्यामुळेच पुढे अखिल भारतांतल्या क्षत्रियांचा, १८ अक्षौहिणींचा संहार झाला. मुस्लिम लीगवरील काँग्रेसच्या प्रेमामुळे पाकिस्तान निर्माण होऊन लाखो हिंदवासीयांचा जसा संहार झाला त्याच प्रकारची ही पूर्वावृत्ति होती. त्या वेळी जर धर्मराजाने हिंसा करून, वचननिष्ठा सोडून द्रौपदीची विटंबना थांबविली असती तर पुढील घोर हिंसा टळली असती, पण मग धर्मराजाला जागतिक कीर्ति मिळाली नसती! आजहि टॉयनबीसारखे पंडित येथे येऊन भारताची जी प्रशंसा करतात तिला आपण मुकलों असतों! राष्ट्रीय स्वार्थापलीकडे भारताला कांही दिसत नाही अशी त्याची जगभर अपकीर्ति झाली असती! त्या सभेंत भीष्म, द्रोण यांनीहि कांही तत्त्वज्ञान सांगून द्रौपदीची विटंबना खुशाल होऊं दिली. वास्तविक स्त्रीची विटंबना थांबविणें हा सर्वश्रेष्ठ धर्म होय. तें सर्वश्रेष्ठ सत्य होय. पण निरनिराळीं तत्त्वें सांगून त्या वेळचे सर्व दळे पुरुष स्वस्थ बसले. विटंबनेचा संताप आला फक्त भगवान् श्रीकृष्णाला. पण त्यामुळेच त्या वास्तववादी, व्यवहारवादी, स्वजनप्रेमी महान् तत्त्ववेत्त्याला, भारताच्या त्या महापुरुषाला आम्ही पद्धतशीरपणें विसरलो आहों, कारण समाजशत्रूंचा संताप भारतीयांना वर्ज्य आहे ! स्वजनहिंसा मात्र वर्ज्य नाही !
 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या राष्ट्रध्वजाचे स्वरूप ठरविण्याची वेळ आली त्या वेळी ज्यांचें पावन नाम हजारो वर्षे भारतीयांच्या कानांत घुमत राहिलें आहे, ज्यांच्या स्मरणाने त्यांच्या वृत्ति उचंबळून येतील त्या राम- कृष्णांचे स्मरण कोणत्याहि काँग्रेस कार्यकर्त्याला झाले नाही. त्यांना आठवला तो सम्राट् अशोक ! कारण तो अहिंसावादी होता, आणि श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण हे शस्त्रधर होते. शत्रूचा त्यांना संताप येत असे. चीड येत असे. स्त्रियांची विटंबना त्यांना सहन होत नसे, आणि या अमर्षामुळे त्यांनी शत्रूंचा संहार केला. अर्थातच काँग्रेसला त्यांचे नाम वर्ज्यच झाले. पण कोट्यवधि भारतीयांपैकी अशोकाचे स्मरण होतांच ज्यांना स्फुरण चढेल, ज्यांच्या अंगावर रोमांच येतील असे किती आहेत ? ज्या खेड्यापाड्यांत आमच्या नेत्यांना जागृति निर्माण करावयाची आहे, त्यांपैकी किती खेडयांत अशोकाची पूजा होते ? अशोकाचें नांव माहीत असणारे तरी किती आहेत? हजारांत एक लाखांत एक तरी असेल का ? मदर रशिया या पुस्तकांत रशियाच्या दुसऱ्या महायुद्धांतील पराक्रमाविषयी लिहितांना मॉरिस हिडसनने म्हटले आहे की, रशियाचे नेते कार्ल मार्क्सला मानीत. पण हा अज्ञात पुरुष रशियन जनतेला स्फूर्ति देण्यास असमर्थ होता, म्हणून कम्युनिस्टांनी आपल्या ध्वजावरचें त्याचें ध्येयवाक्य काढून टाकले आणि महाराणा पीटर, अलेक्झँडर नेव्हस्की यांच्या नांवाचा ते घोष करूं लागले. राष्ट्रध्वज हें पराक्रमाचें स्फूर्तिस्थान असावयास पाहिजे, आणि स्फूर्ति ही युगायुगांच्या स्मरणांतून, पूजनांतून प्राप्त होत असते. ती पराक्रमांतून, शत्रूच्या संहारांतून येत असते. भारतीयांच्या मनोमंदिरांत अशोकाला तें स्थान नाही. पण आमच्या नेत्यांनी हें जाणले नाही आणि जाणलें असले तरी आपल्या तत्त्वज्ञानाच्या आग्रहापुढे त्यांना या महाशक्तीची पर्वा नाही. श्रीकृष्णाचें सुदर्शन आणि दाशरथीचें धनुष्य यांचे त्यांना वावडें आहे. तेव्हा त्यांच्यापासून जनतेला स्फूर्ति मिळणार असली तरी राष्ट्रध्वजावर त्यांच्या स्मृतीला स्थान मिळणार नाही.
  या सर्वांच्या मागे एक मोठें तत्त्व आहे. संताप, द्वेष, अमर्ष, क्रोध यांपासून आपल्या नेत्यांना भारतीय जनतेला मुक्त करावयाचें आहे. १९५४ सालींच चीनने भारतावर आक्रमण केलेलें आहे, पण पंडितजींनी तें जनतेला कां कळविलें नाही? जनतेंत प्रक्षोभ माजेल म्हणून ! बंगालची फाळणी झाली. तेव्हा तिचा संताप येऊन लोकांत विलक्षण जागृति निर्माण झाली, लोक राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन वाटेल त्या त्यागास सिद्ध झाले. त्या वेळीं लाला लजपतराय म्हणाले की, 'कर्झनसारखे व्हाइसरॉय इंग्रजांनी पुन्हा पुन्हा नेमले तर किती चांगले होईल !' त्यांचा भावार्थ असा की, परक्यांच्या जुलमामुळे, आक्रमणामुळे लोकांत प्रक्षोभ माजतो आणि लोक राष्ट्रसेवेसाठी अवश्य तो त्याग करण्यास सिद्ध होतात. नेमका हाच प्रक्षोभ काँग्रेसच्या नेत्यांना नको आहे. मध्यंतरीं वृत्तपत्रांत कांही लष्करी अधिकाऱ्यांनीहि पत्रें लिहून पंडितजींचा पाठपुरावा केला होता. सर्वांना हीच चिंता आहे, की लोकांच्या भावना आता चेतविल्या जातील कीं काय? द्रौपदीची विटंबना विनाप्रक्षोभ पाहणाऱ्यांची परंपराच या अधिकाऱ्यांनी पुढे चालविली यांत शंका नाही. या वेळी चीनच्या आक्रमणाकडे बोट दाखवून पंडितजींनी राष्ट्राला साद घातली असती तर लोकांची मरगळ नाहीशी होऊन त्यांच्या ठायीं चैतन्य आलें असतें. वास्तविक १९४७-४८ सालापासूनच हें जनताजागृतीचें धोरण अवलंबावयास हवें होतें. काश्मीरवर आक्रमण झालें होतें. गोव्याचा संघर्ष चालू होता. चीनने तिबेट गिळंकृत केला होता. या प्रसंगांनी सावध होऊन आपल्या नेत्यांना जनतेचें राष्ट्रप्रेम धगधगत ठेवतां आलें असतें, आणि मग आपसांतले मत्सर, गटबाजी, दुही, क्षुद्र स्वार्थ, द्वेष हे सर्व त्या अग्नींत खाक होऊन लोक उत्साहाने राष्ट्रकार्याला लागले असते. आज भारतीयांची शक्ति परस्परांच्या द्वेषांत खर्च होत आहे. तो शत्रुद्वेषाने संघटित झाली असती व आपल्या सर्व योजना सफळ झाल्या असत्या. प्रत्येक देशांत हें घडलें आहे, घडत आहे; पण प्रक्षोभ, शत्रुद्वेष, वैराग्नि हें सर्व भारतीयांना वर्ज्य आहे. आमच्या नेत्यांची शुचितेवर श्रद्धा असल्यामुळे असल्या मार्गाने ते देशांत कदापि चैतन्य निर्माण होऊ देणार नाहीत. मात्र याचा परिणाम एकच होतो. शत्रुद्वेष, आक्रमकांविषयींचें वैर याऐवजी भारतीय जनता परस्परांचा द्वेष, एकमेकांविषयी वैर या भावना जोपाशीत आहे. कर्तृत्वशून्य व पौरुषहीन होत आहे. तिला मरगळ येत आहे. कोणत्याहि कार्याविषयी तिला उत्साह नाही. भारत आणि चीन या आपल्या पुस्तकांत श्री. रा. कृ. पाटील यांनी एक उद्बोधक उदाहरण दिले आहे. पंडितजी एकदा सिंद्री येथील खतांच्या कारखान्याला भेट देण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी तेथील मजुरांना विचारलें की, "तुम्ही येथे कोणासाठी काम करतां?" पंडितजींची अपेक्षा अशी की, राष्ट्रविकास योजनेसाठी, भारतासाठी, समाजकल्याणासाठी आम्ही काम करतों, असें ते म्हणतील. पण त्या मजुरांनी, 'आमच्या कंत्राटदारासाठी आम्ही काम करतो,' असें उत्तर दिलें. चीनमधला सामान्यांतला सामान्य कामगार, बूटपॉलिश करणारा मुलगासुद्धा राष्ट्रकार्याच्या जाणिवेने बोलतो याची अनेक उदाहरणें रा. कृ. पाटील यांनी दिली आहेत; आणि अनेक युरोपीय, व इतर पंडितांनी, प्रवाशांनीहि दिलीं आहेत. ६५ कोटी चिनी जनतेंत एवढी मोठी सामाजिक जाणीव निर्माण करण्यांत तेथील नेत्यांना यश आलें तें कशामुळे? कोणती किमया त्यांनी केली? चीनच्या प्राचीन वैभवाची भक्ति व आक्रमकांचा द्वेष ही ती किमया आहे. या ग्रंथांतील तिसऱ्या प्रकरणांत याचें विवेचन केलें आहे, म्हणून त्याची पुनरुक्ति येथे करीत नाहीं. पण आपणांवर आक्रमण करणाऱ्या दण्डसत्तांचें सामर्थ्य कशांत आहे हें मात्र वाचकांनी ध्यानांत घेणें अवश्य आहे.
 ज्या चीनशी आपला मुकाबला आहे त्याच्या सामर्थ्याचा आपण विचार केला तर प्रत्येक भारतीय चिंतातुर होईल. चीनच्या नेत्यांनी अनेक मार्गांनी, अनेक साधनांनी राजकीय दृष्टीने चीनच्या ६५ कोटी लोकांना प्रबुद्ध करण्यासाठी विश्वप्रयत्न तर केले आहेतच, पण त्याहिपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आज चाळीस वर्षे चिनी माणूस सारखा रणांगणांतच उभा असल्यासारखा आहे. तो चिआंग-कै- शेकच्या देशद्रोही फौजांशी लढत आहे, जपानशीं लढत आहे, अमेरिकेशी लढत आहे. या लढ्यांत तो अक्षरशः अग्निदिव्यांतून अनेक वेळा बाहेर आलेला आहे. जपानच्या आक्रमणाच्या वेळी खेडयाखेड्यांत, घराघरांत चिनी माणूस लढत होता. आग, जाळपोळ, लूटमार, कत्तली हा जपान्यांचा नित्याचा खेळ होता. त्यांना तोंड देतां देतां बेडर झालेला, कडवट भावनांचा चित्तांत परिपोष करणारा, सर्व प्रकारच्या युद्धांत निष्णात असलेला, थंडी, वारा, ऊन, पाऊस, उपासमार, यमयातना यांची तमा नसणारा असा चिनी माणूस पोलादाने घडविलेला आहे. शून्याच्या खालच्या थंडीत आणि १२० अंशाच्या वरच्या उन्हांत तो सहज काम करू शकतो. तुफान नद्या ओलांडणे, दऱ्या डोंगर चढणें, गहन अरण्यांत दिवस काढणें याची त्याला खातरजमा नाही. अशा ६५ कोटी चिन्यांशीं आपल्याला लढा करावयाचा आहे, आणि आपण कसे आहोत ? गेल्या शंभर वर्षांत आपण लढाई पाहिलेली नाही. आपल्या सैन्याने पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत मिळून ८/१० वर्षे लढाई देखली आहे, पण ती शिपायांनी आणि तिसऱ्या चवथ्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी. (जनतेने नव्हे.) याच्यावर इंग्रजांनी आपल्याला कधी जाऊं दिलेच नव्हते. युद्धाचें नेतृत्व करणें, योजना आखणे, सर्व व्याप डोळ्यांपुढे ठेवून त्याची चिंता वाहणे, व अनेक आघाड्यांवर युद्ध चालविणें या कर्तृत्वाचा आपल्याला अभ्यासच नाही. शिवाय या सर्वांतून जो कांही अनुभव आला असेल तो फक्त आपल्या शिपायांना आला आहे. जनतेला यांपैकी कशाचाच अनुभव नाही. जनता संग्रामांत उतरली होती ती सत्याग्रह संग्रामांत. त्यांत पुष्कळांना 'अ' वर्ग मिळे, पुष्कळांना 'ब' वर्ग ! त्या वेळी तुरुंगांत दूध पिऊन पुष्कळांची वजनें वाढलींसुद्धा. सामान्य जनतेचे 'क' वर्गांत कांही हाल झाले, पण ते तुरुंगांच्या इमारतींत. अन्नवस्त्र तेथे निश्चित होते. बर्फ नव्हते, आग नव्हती, जाळपोळ नव्हती, कत्तल नव्हती. चिन्यांशीं तुलनेने पाहतां आपण लढाई अनुभवली आहे या म्हणण्याला काडीचाहि अर्थ नाही. अशा या चीनची अद्ययावत् सेना ३० लक्ष आहे, तर आपली ५ लक्ष आहे.
 पण अत्यंत महत्त्वाचा फरक आहे तो असा की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या क्षणापासून आपल्याला हे स्वातंत्र्य सुखाने कोणी भोगू देणार नाहीं, कोठून तरी आक्रमण येणारच ही जाणीव ठेवून युद्धसाधन-संभाराच्या आणि मानसिक प्रवृत्तीच्या दृष्टीनें चीनने तयारी केलेली आहे, आणि स्वातंत्र्य- प्राप्तीनंतर आता युद्ध, लढाई संपली, आपल्यावर कोणी आक्रमण करणार नाही अशा पूर्ण विश्वासाने आपण दोन्ही दृष्टींनी युद्धपराङ्मुख राहिलों. आणि तसेच राहणार असे आपले तत्वज्ञान आहे. विश्वबंधुत्व, शत्रुप्रेम, शांतता, पंचशील या उदात्त तत्त्वांनी पंडित जवाहरलाल इतके मोहून गेले की, चीन आपल्याला दगा देईल असें त्यांच्या स्वप्नांतहि आले नाही. सर्व राजनीतीचें सार म्हणजे अविश्वास, असें महाभारतकार म्हणतात. 'संक्षेपो नीतिशास्त्राणां अविश्वासः परो मतः ।' राजकारणांत कधीहि, कोणावरहि विश्वास ठेवू नये असे तत्वज्ञान आहे; आणि निरागस बालभावाने सर्वांवर विश्वास हें ठेवावा असें आपलें तत्त्वज्ञान आहे, आणि त्यावर आपली इतकी श्रद्धा आहे की, आक्रमण झालेले कळले असूनहि पंचवार्षिक योजनेतील औद्योगिक विकासांत युद्धसामग्रीचा समावेशहि आपण केला नाही. मेजर- जनरल परांजपे आपल्या भाषणांत म्हणतात, "आपल्या एकसारख्या चाललेल्या शांतिपाठामुळे युद्ध हा शब्द उच्चारणेंहि आतापर्यंत पाप होतें. त्यामुळे युद्धाचा देशांतील उद्योगधंद्यांशी संबंध असतो याचाहि सर्वांना विसर पडला होता. त्यामुळे गेल्या दोन पंचवार्षिक योजनांत राष्ट्राची युद्धसंपत्ति वाढविण्यावर जो भर द्यावयास हवा होता तो दिला गेला नाही. संरक्षणदलाच्या काय गरजा आहेत, कोणत्या उद्योगांना प्राधान्य द्यावें, कारखाने कोठे उभारावेत इत्यादि गोष्टींचा विचारहि पहिल्या दोन योजनांच्या आखणीत केला गेला नाही." (केसरी, २०- १२- ५९). चीन आक्रमण करील ही कल्पनाच संभवनीय नसल्यामुळे सरहद्दीवरच्या रस्त्यांच्या बांधणीचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा विचारसुद्धा भारताने केला नाही. चीनने मात्र तो विचार करून कृतिहि केली. भारताच्या सरहद्दींतच त्याने रस्ते बांधून काढले !
 स्वातंत्र्यप्राप्तीच्या क्षणापासून संरक्षणाची, युद्धाची चीनने तयारी केली तशी आपल्याला करता आली नसती असे नाही; पण तशी करावयाची नाही असे आपले ठरलेले आहे. जनतेत प्रक्षोभ माजूं द्यावयाचा नाही, कारण द्वेषाने कधी कल्याण होत नाही, परराष्ट्राशी लष्करी करार करावयाचा नाही, कारण तो भेकडपणा आहे, आणि स्वतः युद्धसाहित्य सिद्ध करावयाचें नाही कारण आक्रमण होणारच नाही. पंचशीलाचीं तत्त्वें त्रिकालाबाधित आहेत अशी आपली श्रद्धा आहे. खरोखर भारतांतील क्षात्रधर्माची ही हत्या आहे. आश्चर्य असे की, सध्याचें आपलें हें तत्त्वज्ञान गांधीवादांत मुळीच बसत नाही. अन्यायाचा, आक्रमणाचा प्रतिकार केलाच पाहिजे हें महात्माजींचे पहिले तत्व होतें. त्यांच्या सर्व तत्त्वज्ञानाचा तो आदि सिद्धान्त आहे. प्रतिकार शस्त्रबलाने करावयाचा कीं आत्मबलाने म्हणजे सत्याग्रहाने एवढाच प्रश्न मतभेदाचा होता. त्याबाबत त्यांचे मत असें की प्रतिकार सत्याग्रहाने करणें उत्तम, पण तें शक्य नसेल तर शस्त्रबलाने करावा. ते म्हणत की, प्रतिकार- शून्य राहून राष्ट्र पौरुषहीन होण्यापेक्षा हजार वेळां हिंसा झालेली चालेल. या दृष्टीने पाहतां स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एक तर काँग्रेसने सत्याग्रह सेना तयार करण्याच्या मार्गास लागणे अवश्य होते आणि काश्मीर, गोवा, हैदराबाद येथे ती सेना पाठवून प्रतिकार करावयास हवा होता. तिबेटवर आक्रमण झाले तेव्हा हि शांतिसेना तेथे पाठविणें अवश्य होते. कारण शेजाऱ्यावर हल्ला झाला असतांना तटस्थ राहणे हा महात्माजींच्या मतें भेकडपणा होय. आज चीनचें आक्रमण झालेलें पाहतांच लक्षावधि सत्याग्रही नागरिक स्त्री- पुरुष, वृद्धबाल तेथे जाणें अवश्य होते. पण हा मार्ग सध्या आपण अनुसरत नाही. मग राहिला दुसरा मार्ग शस्त्रबलाचा. तो स्वीकारावयाचा असें बारा वर्षांपूर्वी ठरवून तेव्हाच तयारीला लागणें अवश्य होतें. त्यासाठी शस्त्रास्त्रे, रस्ते, वाहतुकीची साधने, औद्योगिक उत्पादन यांच्या तयारीला प्रारंभ करावयास हवा होता. आणि महत्त्वाची तयारी म्हणजे समाजाच्या रागद्वेषाची चेतावणी ही होय. पण वर सांगितल्याप्रमाणे युद्धाच्या दृष्टीने औद्योगिक उत्पादनाचा आपण विचार केला नाही व राष्ट्राला प्रक्षुब्ध करणें हे आपल्याला निषिद्ध असल्यामुळे आपण कोणताच मार्ग अवलंबिलेला नाही. आणि सहा सहा वर्षे परकीय आक्रमण धर्मराजालाहि हेवा वाटावा इतक्या शांततेने आपण पाहात बसलों आहोत. आपलें राष्ट्र सध्या पौरुषहीन झालें आहे, मरगळून गेलें आहे, कर्तव्यशून्य झालें आहे, त्याचें हें कारण आहे. धड शस्त्रवादी नाही व धड गांधीवादीहि नाही असे तृतीयपंथी, भ्रष्ट, तेजोहीन, चैतन्यहीन, स्फूर्तिशून्य तत्त्वज्ञान आपण स्वीकारले आहे.
 चीनच्या दण्डसत्तेने आपल्या लोकसत्तेला जें आव्हान दिले आहे त्याला प्रत्युत्तर द्यावयास भारत समर्थ व्हावा अशी आपली इच्छा असेल तर काँग्रेसप्रणीत वरील अधम तत्त्वज्ञान आपण सोडलें पाहिजे, भारतांतून नष्ट केले पाहिजे. आणि भारताचा राष्ट्रीय स्वार्थ हे एकच उद्दिष्ट आपल्या डोळयांपुढे आपण ठेवलें पाहिजे. भारताच्या जनतेचें जें कल्याण, तिचा ज्यांत ऐहिक उत्कर्ष, तिची जी भौतिक प्रगति, ती साधण्यासाठी जें करावें लागेल तेंच सत्य, तीच अहिंसा, तोच धर्म ही आपली दृष्टि असली पाहिजे. विश्वबंधुत्व, मानवता, पंचशील हीं तत्वें वंद्य आहेत, पण भारताच्या हिताच्या आड तीं येत असतील तर त्यांचा त्याग आपण केला पाहिजे. आपला स्वार्थ साधल्यानंतर त्या थोर तत्त्वांसाठी प्रत्येक राष्ट्राने कांही प्रयत्न करावे हे योग्यच आहे. पण सध्या निरपेक्षपणे त्यांची उपासना चालली असल्यामुळे भारतावर मोठी संकटपरंपरा कोसळत आहे. 'पंचशीलाचा जन्म पापांत झाला आहे' अशी जी कटु टीका आचार्य कृपलानी यांनी केली ती याच अर्थाने चौ एन् लाय वाटाघाटीसाठी येणार असें ठरल्यानंतर भारतीय संसदेतील सभासदांना एक भीति वाटू लागली. ती अशी की, आपले पंतप्रधान चीनने व्यापलेला प्रदेश कदाचित् त्याला देण्याचें मान्य करतील, आणि त्यामुळे लोकसभेत 'भारताचा तसुभरहि प्रांत चीनला देणार नाही', असें आश्वासन त्यांनी मागितलें. याचा अर्थ फार भयंकर आहे. राष्ट्रहितापेक्षा परक्यांना न्याय देण्यांत आपले नेते धन्यता मानतात, राष्ट्रीय स्वार्थ हें त्यांचें एकमेव लक्ष्य नसून कांही अंतिम निरपेक्ष सत्याचे ते उपासक आहेत अशी जनतेला भोति वाटू लागली आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि आतापर्यंत हेंच घडत आल्यामुळे लोकांना तसे वाटणें स्वाभाविक आहे. स्वयंनिर्णयाच्या उदात्त तत्त्वान्वये आपण पाकिस्तान देऊन टाकले. सार्वमताच्या तत्वासाठी काश्मीरचा प्रश्न नासून टाकला. तिबेट हा स्वायत्त प्रदेश आहे असे आपले मत असूनहि १९५४ च्या एप्रिल- मध्ये झालेल्या हिंद-चीन करारांत तिबेट हा चीनचा भाग आहे हे आपण मान्य केलें, आणि मग थोर न्यायबुद्धीने ल्हासाला जाणाऱ्या व्यापारी मार्गावर आपलीं जीं लष्करी ठाणीं होतीं व आपले पोस्ट व तार खातें यांच्या संरक्षणासाठी ज्या सैन्याच्या तुकड्या होत्या त्या आपण काढून घेतल्या. आधीचे इंग्रज सेनापति असें करूं नका, यांत भारताला धोका आहे असें परोपरीने सांगत होते. पण न्यायबुद्धीपुढे भारताचे हित आपण गौण लेखीत असल्यामुळे आपण उदार मनाने सैन्य काढून घेतलें, आणि मग तिबेटचा स्वाहाकार शांतपणे पाहात बसलों. परवा चीनने आक्रमण केल्यानंतर 'तुमचें लांगजूच्या पूर्वेचें तामादेम हें लष्करी ठाणे मॅकमोहन रेषेच्या बाहेर आहे' असें भारताला त्यानें सुनावतांच भारताने कसून तपास केला व सत्य ध्यानांत येतांच आपण होऊन तें ठाणें सोडून दिलें. चीन मॅकमोहन रेषा मानीत नाहीच, तरी पण आपण राष्ट्रीय स्वार्थापेक्षा सत्य श्रेष्ठ मानतो, तेव्हा हें ठाणें सोडणें अवश्यच होतें. आणि आता भारताचा कांही प्रदेश न्यायबुद्धीने पाकिस्तानला देऊन टाकावयाचा आहे! त्यासाठी घटना बदलून घेणें अवश्य झाल्यामुळे काँग्रेसनेत्यांनी तेंहि केले आहे. कारण भारत सोडून सर्वांना न्याय देणें हेंच आपले ध्येय आहे. परक्यांवर अविश्वास दाखविणें हाहि आपल्या मतें अन्याय आहे, ती हिंसाच आहे. म्हणून १९५८ च्या जानेवारीत चीनचे लष्करी शिष्टमंडळ भारतांत आलें होतें, त्याला आपण आपली सर्व लष्करी ठाणीं दाखविली. टँक्स्, विमानें, दारूगोळा सर्व कांही हिशेब दिला. त्याचा रोजचा दहा हजारांचा खर्चहि आपण केला, आणि चीनने आपल्यावर आक्रमण केलेलें असतांना, वाटेल ते आरोप चीन भारतावर करीत असतांना, चिनी लष्करी अधिकाऱ्यांना आपले सर्व लष्कर, सर्व सरंजाम आपले संरक्षणमंत्री श्री. कृष्ण मेनन यांनी दाखविला. चीनने भारतावर आक्रमण करून आपल्या सैनिकांची हत्या केली असतांनाहि चीनला यूनोंत स्थान मिळवून देण्याचा आपण जो आग्रह धरला तो याच उदारबुद्धीने होय. चीनने आक्रमण केलें, आपला प्रदेश बळकावला तरी त्याचा द्वेष करणें हें युक्त नव्हे, तें भारतीय संस्कृतींत बसत नाही; आणि भारत सोडून जगांत कोठेहि अन्याय होऊं द्यावयाचा नाही, अत्याचार घडू द्यावयाचा नाही हें आपलें ब्रीद आहे. त्यामुळेच जगांत भारताची कीर्ति झाली आहे. परवा इंग्लंडचे मोठे इतिहासपंडित टॉनयबी येथे व्याख्यानासाठी आले होते. त्यांनी व्याख्यानांत सांगितले की, भारतांतील पशुपक्षी, हिंस्र श्वापदे यांच्या मुद्रा पाश्चात्त्य जगांतल्या श्वापदांपेक्षा निर्भय दिसतात. येथला माणूस जास्त प्रेमळ, जास्त अहिंसावादी, उदार व निरागस असल्याचेंच त्यांच्या मतें हे द्योतक आहे. ही कीर्ति आपल्याला जास्त लोभनीय वाटते. मागे ऋषींच्या आश्रमांतच असें अहिंसक वातावरण असे. आतां काँग्रेसच्या राज्यांत अखिल भारतांत ते पसरलें आहे हा भारतीय संस्कृतीचा फार मोठा विजय आहे! राष्ट्राच्या संरक्षणापेक्षा, सामर्थ्यापेक्षा या विजयाचा लोभ भारतीयांनाच जास्त आहे.
 दण्डसत्तांच्या आक्रमणाला तोंड देण्यास भारत समर्थ व्हावा अशी जर आपली इच्छा असेल तर हा विश्वव्यापक तत्त्वांचा लोभ म्हणजे त्या कीर्तीचा लोभ आपण सोडला पाहिजे. हा फक्त कीर्तीचा लोभ आहे असें म्हणण्याचे कारण असे की, तीं विश्वव्यापक तत्त्वें प्रत्यक्षांत कधी अवतरत नाहीत. साकार होत नाहीत. समाज पौरुषहीन करून टाकण्याचें कार्य मात्र ती करतात. अर्नोल्ड टॉयनबी यांच्या वर उल्लेखिलेल्या व्याख्यानांचा विषय 'विश्वराष्ट्र आणि भारत' असा होता. त्यांत विश्वराष्ट्र घडविण्यांत भारताने फार मोठी कामगिरी केली आहे अशी भारताची त्यांनी स्तुति केली आहे. 'संडे टाइम्स' मध्ये या व्याख्यानांचे परीक्षण करणारा टीकाकार कठोर वास्तववादी असावा असें दिसतें. "या स्तुतीला आपण पात्र आहोंत काय ?" असा नास्तिक प्रश्न त्याने केला आहे. भारतांत ही तत्त्वें सांगितली गेली हे त्याला मान्य आहे. महावीर, बुद्ध, अशोक यांनी आणि अलीकडे महात्माजींनी या उदार, विश्वधर्माचा उपदेश केला हें खरेंच आहे. पण भारतांत, विश्वधर्म लांबच राहिला, केवळ भारताचेंहि ऐक्य घडलें नाही. भिन्न राजघराणी, भिन्न जाति, पंथ, जमाती यांचे नित्य संघर्ष व कत्तली येथे चालू होत्या; आणि महात्माजींच्याहि डोळ्यांदेखत त्यांच्या साठ वर्षांच्या तपःसाधनेनंतर अत्यंत भयानक अशा कत्तली झाल्या. त्या थोर महात्म्याची तत्त्वें प्रत्यक्षांत कधीच आली नाहीत, असें सांगून हा टीकाकार म्हणतो की, गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास पाहतां टॉयनबी हा एक वेडा स्वप्नवादी वाटू लागतो. (संडे टाइम्स: २७-३-६०).
 दुर्दैव असे की, आपण हें वेडें स्वप्नाळू तत्त्वज्ञान स्वीकारून आज स्वतःचा नाश करून घेत आहोत आणि त्याहून शतपट दुर्दैव असे की, या तत्त्वाचा स्वीकार आपल्या नेत्यांनी प्रामाणिकपणे केलेला नाही. स्वतःच्या देशाच्या कारभारांत सत्य, अहिंसा, न्याय, औदार्य, समता यांची ते पदोपदी अवहेलना करतात, किंबहुना तेच येथल्या राज्यकारभाराचे मुख्य लक्षण झालें आहे. असें असल्यामुळे येथे सर्वत्र मिथ्याचार चालू आहे. आणि या मिथ्याचारामुळेच आपला नाश होत आहे. आपले तत्त्वज्ञान फार उदात्त आणि आपली करणी अत्यंत हीन, अत्यंत अधम असे नित्य घडत असल्यामुळे इतर देशांनी केवळ राष्ट्रीय स्वार्थाची दृष्टि ठेवून स्वसमाजाचें जें कोटकल्याण करून घेतलें तें भारतीयांना साधतां येत नाही. केवळ आपल्या राष्ट्रीय परंपरेचा अभिमान बाळगणे, त्या अभिमानाने राष्ट्रीय अहंकाराचा पोष करणें, आक्रमकांचा द्वेष समाजांत दृढमूल करून टाकणें, न्याय, सत्य, अहिंसा यांची उपासना केवळ राष्ट्रमर्यादेतच ठेवणें (आणि तीहि हितकारक ठरेल तेव्हाच) मुत्सद्देगिरीने अन्य राष्ट्रांना दूर ठेवणें, त्यांच्यावर कधीहि विश्वास न टाकणें हे धोरण सर्व महत्त्वाकांक्षी राष्ट्रें अवलंबितात. त्याचाच अवलंब आपणहि केला पाहिजे. तिसऱ्या, चवथ्या प्रकरणांत दाखविल्याप्रमाणे आपल्या देशांत चारित्र्य व कर्तृत्व शून्यावर येऊन ठेपले आहे. समाजाचा उत्कर्ष व्हावयाचा तर चारित्र्याचें व सद्गुणांचे संवर्धन आपण केलें पाहिजे. तेंहि याच मार्गाने होईल. जपान, जर्मनी येथे जाऊन आलेले लोक तेथील लोकांची उद्योग-तत्परता, कार्यक्षमता, संघटनाबुद्धि, थोर चारित्र्य, सत्यप्रियता, समाजहितबुद्धि, जबाबदारीची जाणीव इ. गुणांची प्रशंसा करीत असतात. ते गुण त्यांनी याच मार्गाने संपादन केले आहेत. त्यांची राष्ट्रभक्ति, त्यांचे परंपरेचें प्रेम, शत्रुराष्ट्राचा द्वेष, राष्ट्रीय अहंकार या प्रेरणाच त्याच्या बुडाशीं आहेत. आपल्या देशांत आज चाळीस वर्षे महात्माजींसारखा महावीर, बुद्ध, जीजस यांच्या तोलाचा महापुरुष सत्य-अहिंसेचा, शत्रुप्रेमाचा, विश्व- बंधुत्वाचा उपदेश करीत आहे. पण परिणाम मात्र जर्मनी, जपान यांच्या बरोबर उलट झालेला आहे. आपण सर्व सद्गुणांना मुकलों आहों याचें कारण उघड आहे. तीं महान् तत्त्वे, तें अति उच्च ध्येय कर्तृत्वाला प्रेरणा देऊ शकत नाही. माझा देश, माझें राष्ट्र, माझी परंपरा येवढेच मी जाणतो. त्याच्या सुखांत माझें सुख आहे, त्याच्या भक्तींत माझ्या अहंकाराचा उगम आहे, हें माझ्या बुद्धीला आकळू शकतें. म्हणून यांना दुखावणाऱ्या, त्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूच्या द्वेषाने मी वाटेल त्या त्यागाला सिद्ध होतों. तसा विश्वबंधुत्वाने, मानवताप्रेमाने होत नाही. शत्रूवरच्या प्रेमाच्या उपदेशाने तर मला मरगळच येते. हें सर्वं जाणून, राष्ट्रनिष्ठा या महाशक्तीची इतर राष्ट्रांनी केली तशी, विश्वव्यापक ध्येयवाद सोडून, आपण उपासना केली पाहिजे. तरच या राष्ट्रांत सत्य, अहिंसा कांही प्रमाणांत तरी शिल्लक राहतील.
 सध्या मात्र त्यांचा समूळ नाश करण्याच्या योजनेंत आपण आहों. कारण आपण प्रत्येक क्षेत्रांत मिथ्याचार करीत आहोत. तत्त्वांच्या घोषणेंत अति उदात्तता आणि स्वदेशांतील कारभारांत कमालीची तत्त्वभ्रष्टता असें पावलोपावली आपलें वर्तन दिसतें. राष्ट्रनिष्ठेच्या बाबतींत हा मिथ्याचार कसा चालू आहे तें येथवर दाखविलें. धर्म, लोकशाही, कायद्याचें पालन या तत्त्वांच्या बाबतींत हेंच चालू आहे. आणि त्यामुळे असेच अनर्थ घडत आहेत. त्याचा विचार पुढील प्रकरणांत करावयाचा आहे. सध्या आपण राष्ट्रनिष्ठेपुरता विचार संपवू. प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याला कार्यप्रवृत्त करणारी ही एक महाशक्ति आहे. म्हणून परंपरेंतून दिसून येणारा अहंकार आणि आक्रमकांविषयीचा द्वेष या तिच्या दोन्ही अंगांचा परिपोष आपण केला पाहिजे. तो आपण केला तर आपल्या समाजाला सध्या जी मरगळ आली आहे ती नष्ट होईल. आपल्या अंगीं चैतन्य निर्माण होईल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नष्ट झालेला ध्येयवाद पुन्हा जागृत होईल आणि मग त्यामुळे आपल्या सर्व योजना सफल होऊन दण्डसत्तेच्या आव्हानाचा स्वीकार करण्यास आपण समर्थ होऊ.

+ + +