लाट/आम्हां चौघांची बाई

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
template error: please do not remove empty parameters (see the style guide and template documentation).आम्हां चौघांची बाई


 ४२च्या चळवळीत भूमिगत असताना शिवाला आम्ही आमचा पुढारी मानला होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली दरोडे घातले होते, विजेच्या तारा तोडल्या होत्या, तुरुंगातून पळालो होतो. खजिने लुटले होते आणि कधी कधी काही बायांचे उंबरठेदेखील झिजवले होते.
 चळवळ संपली. आम्ही उजळमाथ्याने वावरू लागलो आणि इतस्तत: पांगलो गेलो. दैनंदिन सहवासाला मुकलो. अझीम पुन्हा आपल्या भेंडीबाजारातल्या कुणा नातेवाइकाकडे राहू लागला. मी जोगेश्वरीला पळालो.रायबाने लालबागला मुक्काम ठोकला आणि शिवाने समाजवादी पक्षाच्या ऑफिसातच आपले बिस्तर टाकले.
 परंतु या ना त्या निमित्ताने आम्ही एकमेकांना नेहमी भेटू लागलो आणि आमच्या गत आयुष्याच्या आठवणींना उजाळा देऊ लागलो. आम्हाला भेटलेल्या त्या असंख्य बायांच्या आठवणीदेखील चघळू लागलो.
 त्या अनेक बायांतील एक काळी बाई तेवढी आमच्या चांगली स्मरणात राहिली होती. तिच्याविषयी शिवा नेहमी आठवणी काढू लागला होता. तिच्याकडे पुन्हा जायचा विचार बोलून दाखवीत होता.
 त्याचा हा विचार आम्हालाही आवडत होता. मोठा आकर्षक वाटत होता. कारण ती बाईच मुळी तशी आकर्षक होती. भरदार अवयवांची आणि बांधेसूद शरीराची होती. तिची त्वचा काळी कुळकुळीत होती. एखाद्या पॉलीश केलेल्या शिसवी लाकडासारखी ती आम्हां साऱ्यांना एकजात भासली होती. आणि मुख्य म्हणजे शिवाची आणि तिची फार चांगली ओळख होती. त्याच्याशी आणि आमच्याशी ती नेहमी फार अदबीने वागत होती. त्यामुळे शिवाने एकदा आपला जायचा विचार बोलून दाखवताच आम्ही साऱ्यांनी तत्काल संमती दिली आणि एक दिवस ठरवून तिच्याकडे गेलो.
 त्या दिवशी पुष्कळ दिवसांनी आलेले पाहताच काळीला बऱ्याच विस्मय वाटला. ती किंचित चपापली. आश्चर्यचकित झाली. अदबशीरपणे नेहमीसारखे तिने आमचे स्वागत केले आणि तिच्या खोलीत बसलेल्या एकदोन लोकांना नजरेच्या इशाऱ्याने पिटाळून लावले.
 त्या दिवशी पुष्कळ दिवसांनी तिच्यात झालेल्या बाह्य बदलाने आम्हालाही स्तंभित केले. पूर्वीपक्षा तिचा नोकझोक बराच वाढला होता. काळ्या तुकतुकीत चेहऱ्यावर तिने उगाच सफेत पावडर थापली होती. त्यामुळे ती काहीशी विचित्रच भासत होती आणि कसले तरी भडक अत्तर अंगाला आणि सवंग तेल डोक्याला चोपडू लागली होती. तिच्याभोवती पूर्वीपेक्षा अधिक माणसेदेखील गोळा झालेली होती.
 “तिने जोरात धंदा सुरू केला आहे." अझीमनं तिथून परतताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
 “नव्हे! वाढवला आहे." मी म्हणालो.
 "काही का असेना-मला ती आवडली." रायबाने थोडक्यात आपले मत दिले; आणि शिवा काहीच म्हणाला नाही. परंतु तिच्याकडे पुन्हा जायला हरकत नाही असेच आम्ही साऱ्यांनी ठरवले आणि मग वारंवार जाऊ लागलो.
 तिच्याकडे आम्ही सतत जाऊ लागलो तेव्हा शिवाला तिच्या बऱ्याचशा गोष्टी खटकू लागल्या. ती तोंडाला फासत असलेल्या पावडरपासून अंगावरल्या वस्त्रांपर्यंत अनेक गोष्टींबद्दलची आपली नापसंती त्याने व्यक्त केली. तिच्याकडे इतर लोकांनी यावे, ही बाबही त्याला आक्षेपार्ह वाटू लागली.
 तिने कसे वागावे, कुणाशी संबंध ठेवावेत आणि कुणाला दूर ठेवावे याची आम्हाला फारशी क्षिती वाटत नव्हती. या बाबतीत काही गोष्टी आम्ही गृहीत धरून चालत होतो. तिच्या व्यवसायाला ते वागणे धरूनच होते. त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नव्हते.
 परंतु या बाबतीत आम्हा तिघांतदेखील मतभिन्नता होती. अझीमची या बाबतीत ठाम मते नव्हती. त्याला ती कशीही असलेली, कशीही वागलेली चालण्यासारखी होती.
 तिने जरा नेटके, स्वच्छ राहावे, उगाच रंगरंगोटी करू नये, असे मलाही वाटत होते. परंतु या माझ्या मताचा आग्रह धरण्याची माझी इच्छा नव्हती. या बाबतीतले तिचे स्वातंत्र्य मी पूर्णपणे मान्य केले होते.
 रायबाची मते मात्र अगदीच वेगळी होती. तिच्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन वास्तववादी होता. एक भोग्य वस्तू या दृष्टीनेच तिच्याकडे तो पाहत होता आणि तिच्या व्यवसायाला धरून ती वागत असल्याचा निर्वाळा तो देत होता. या बाबतीत आपल्या कल्पना तिच्यावर लादणे म्हणजे स्वत:ला तिच्या अधिक निकट आणल्यासारखे होत असल्याचे त्याचे मत होते. “रांड ती!" तो उद्गारला होता, “तिने रंगरंगोटी करायची नाही तर काय आश्रमातल्या संन्यासिनीसारखे वागायचे?"
 तिच्याकडे जाण्याआड मात्र आमची ही मते कधी आली नाहीत. पण आम्ही तिच्याकडे वारंवार जात राहिलो आणि तिचेच वागणे हळूहळू बदलत चालले. तिने रंगरंगोटी करणे हळूहळू सोडून दिले. भडक अत्तराचा वास तिच्या अंगाला येईनासा झाला. केसांना सवंग तेल चोपडायची ती बंद झाली...आणि तिच्याकडे आम्हाला इतर कोणी माणसे आढळेनाशी झाली. तिच्याविषयीच्या आपल्या साऱ्या अपेक्षा पुऱ्या झाल्याचे समाधान शिवाला लाभले.
 एवढे सारे तिने आपखुषीने आमच्याकरिता केल्यानंतर आम्हालाही तिच्याशी वागण्याचे काही नियम करणे आवश्यक होऊन बसले. याही बाबतीत शिवानेच पुढाकार घेतला. त्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काळीचे हे रहस्य आम्हा चौघांत गुप्त ठेवायचे, शक्यतो दुसऱ्या कुणा बाईकडे जायचे नाही, (बाई म्हणजे तिच्यासारखी बाई. दुसऱ्या 'चांगल्या' बाईकडे जायला मुभा ठेवण्यात आली होती!) तिचा सारा खर्च चौघांनी चालवायचा आणि चौघांखेरीज दुसऱ्या कुणाला सामील करून घ्यायचे नाही, असे आम्ही ठरवले.
 यातल्या काही बाबींना रायबाचा सक्त विरोध होता. विशेषत: दुसऱ्या बाईकडे न जायची कल्पना त्याला साफ नापसंत होती. मला तो म्हणाला, "हा साराच मूर्खपणा आहे. काळीला पोसत बसायची कल्पना काही माझ्या बुद्धीला पटत नाही. माझ्यापुरते विचारशील तर अशा सतरा बायांशी माझे संबंध असतात! ते मी सोडावेत किंवा त्यांना जन्मभर पोसत राहावे याला काय म्हणावे?"
 परंतु सामुदायिक जबाबदारीच्या तत्त्वांतून तो स्वत:ची सुटका करून घेऊ शकला नाही, शिवाच्या म्हणण्याला त्याला संमती द्यावीच लागली.
 या साऱ्या प्रकाराबद्दल आमच्या मनात मात्र कधी कधी एक प्रकारची उद्विग्नता निर्माण होऊ लागली. आम्ही चौघांनी एकत्रितपणे एका बाईशी गुप्त संबंध ठेवावेत हे माझ्या मनाला पटेनासे झाले. आमच्यासारख्या स्वातंत्र्यचळवळीतल्या लोकांनी आणि काही एक विशिष्ट राजकीय तत्त्वप्रणाली धारण करणाऱ्यांनी असे चारित्र्यहीनतेने वागावे ही कल्पना मनाला बोचू लागली. परंतु शिवाला माझ्या या शंका पटल्या नाहीत. समाजाकडे पाहण्याच्या दुबळ्या वृत्तीचे ते प्रतीक आहे असे त्याने प्रतिपादन केले. नैतिकतेची चुकीची मूल्ये स्वीकारल्याचा हा परिणाम आहे असे त्याने आमच्या निदर्शनास आणले. आणि त्याचे वैचारिक नेतृत्व आम्ही मान्य केले असल्यामुळे त्याचे हे प्रतिपादनदेखील आम्हाला बिनतक्रार मान्य करावे लागले.
 आम्हा सर्वांत शिवाच तिच्यावर अधिक खूष झाला होता. तिच्याकडे अत्यंत सहानुभूतीने पाहत होता. तिच्या अडचणीचे अत्यंत तत्परतेने निवारण करीत होता. तिच्या चांगुलपणाची तोंड भरून स्तुती करू लागला होता.
 परंतु तिच्याविषयी त्याच्या काही वेगळ्याच भावना आहेत असे आम्हाला मागाहून जाणवू लागले. एका सामान्य बाईपेक्षा ती काहीतरी वेगळी आहे अशा भावनेने तो तिच्याशी वागू लागल्याचे आम्हाला कळून आले. आमच्या तिच्याशी असलेल्या संबंधापेक्षा काही तरी वेगळे, नाजूक संबंध शिवा आणि ती यांच्यात प्रस्थापित झाले असावेत असा आम्हाला संशय येऊ लागला आणि रायबा शिवाच्या व तिच्या या नाजूक भावनांची आमच्यापाशी थट्टा करू लागला.
 परंतु या भावना केवळ एकतर्फी नसल्याचेही आमच्या हळूहळू लक्षात येऊ लागले होते. काळीच्या त्याच्याविषयीच्या कल्पनादेखील वेगळ्या होत्या. ती त्याच्या भावनांना नेहमी प्रतिसाद देत होती. आम्हा साऱ्यांशी ती एका विशिष्ट मापाने वागत होती; आमच्याशी शृंगार करीत होती आणि आमच्या पैशांची आपल्यापरी परतफेड करण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु त्याच्याशी वागताना ती तेच माप सर्रास लावायला विसरत होती. त्याच्यावरून मिळणाऱ्या पैशाविषयी ती आम्हाला बेफिकीर दिसू लागली. नव्हे, त्याच्याकडून असल्या बिदागीची अपेक्षाच करीनाशी झाली. त्याच्या अस्तित्वाने अधिक खुलून जाऊ लागली आणि बरेच दिवस तो न फिरकल्यास चिंतातुर होऊन आम्हाला विचारू लागली, “शिवा कुठं आहे? बरेच दिवस येत नाही तो! तब्येतीने बरा आहे ना?"
 त्या दोघांचे संबंध हे असे गुंतागुंतीचे बनत चालले आणि इकडे आमच्या संबंधात हळूहळू बराच फेरबदल होऊ लागला. अझीम पूर्वीसारखा आमच्यात अधिक वावरेनासा झाला. समाजवादावरील त्याचा विश्वास उडाला...धर्मातीत राजकारण म्हणून काही एक चीज त्याला आकलन होईनाशी झाली. भारतावरील त्याची निष्ठा डळमळली... पाकिस्तानची निर्मिती मुसलमानांच्या उन्नतीकरिता आवश्यक असल्याबद्दल आता त्याची खात्री पटून गेली.
 इतक्या झपाट्याने त्याचे मतांतर होत गेले की तो आम्हाला भेटायचा बंद होऊन पाकिस्तानात कधी निघून गेला याची आम्हाला काही दिवस दाददेखील लागली नाही. कराचीहून त्याचे मला चार ओळीचे पत्र आले. तेव्हाच त्याच्या अचानक नाहीसे होण्याचे कारण आम्हाला कळून आले.
 त्याच्या या अत्यंत विसंवादी वर्तनाने मला धक्का बसला. शिवाला अत्यंत उद्वेग वाटू लागला. रायबा नुसता हसला. जणू असे कधी तरी होणार हे त्याला आधीपासूनच माहीत होते. परंतु त्याबद्दल काही विशेष वाटून घ्यायचीही त्याची तयारी नव्हती. माणसातली ही अतिरिक्त विसंगती त्याने पुरती समजून घेतली होती. आम्ही तडफडलो, अझीमला चार शिव्या घातल्या. त्याच्या मूर्खपणाला दोष दिला. परंतु तो काहीच म्हणाला नाही. आमचे बोलणे संपताच त्याने समारोप केला, “चालायचेच! त्यात एवढे वाटून घेण्यासारखे काहीच नाही. तो तसा कच्चाच होता. त्याला मते अशी नव्हतीच! राजकारणापासून काळीपर्यंत तो आपल्या मागे येत होता. परंतु आता त्याने येण्याचे नाकारले, एवढेच!'
 अझीमच्या विचित्र वागण्याचे त्याने केलेले हे विश्लेषण आम्ही आमच्या समाधानाखातर गृहीत धरून चाललो. परंतु काळीला मात्र ते शक्य झाले नाही. तो असा एकाएकी निघून गेला यावर आधी तिचा विश्वासच बसला नाही. परंतु शिवाने सांगितल्यानंतर तिला ते खोटेही म्हणता येईना. तो असा अचानक, न सांगता निघून जावा याचा तिला फार संताप आला. आपल्याला त्याने फसवले, वंचित केले असा तिने स्वत:चा समज करून घेतला. आम्ही सारेच कधी ना कधी असे अझीमसारखे अदृश्य होऊ असा तिच्या मनाने कयास बांधला. तिचे आमच्याशी वागणे बदलले. ती रूक्ष बनली. थंड्या वृत्तीने आमचे स्वागत करू लागली. आमचे अस्तित्व तिला फारसे जाणवेनासे झाले. आमची तिला विशेष पर्वाच वाटेनाशी झाली. आमच्याशी ती एकप्रकारे फटकूनच वागू लागली.
 तिच्या स्वभावातल्या या फरकाने रायबा चटकन सावध झाला. खरे म्हणजे तो पहिल्यापासून संतुष्ट नव्हताच आणि तिच्याशी असलेले आपले संबंध तोडून टाकण्याची संधीच शोधीत होता. ती त्याने यावेळी घेतली. तो तिच्याकडे जायचा मंदावला. जाईनासा झाला. तीदेखील एका अक्षराने त्याचा उल्लेख करीनाशी झाली.
 तिच्या या विक्षिप्त वागण्याची झळ शिवाला मात्र लागत नव्हती. तिने त्याचा सर्वच बाबतीत अपवाद केला होता. तो आपल्याला दगा देणार नाही, असा फसवणार नाही याविषयी तिला पुरी खात्री होती. त्याचे ती पूर्वीसारखे हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करीत होती. आणि रायबा तिच्याकडे यायचा बंद झाल्यानंतर तिच्या या रोषाचा धनी व्हायची पाळी माझ्या एकट्यावर आली.
 ते मलाही आवडले नाही आणि हळूहळू मीही तिच्याकडे जायचा बंद झालो. ते ऐकून रायबा मला म्हणाला, "बरे केलेस! तिच्या बाबतीत प्रथमपासूनच आपले चुकत गेले. परंतु अझीमने आपल्याला चूक सुधारायची संधी दिली. त्याच्यामुळे आपला केवढा फायदा झाला बघ! त्या किळसवाण्या प्रकारातून एकदाची स्वत:ची सुटका तरी करून घेता आली!
 पण शिवाला हे मानवले नाही. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही तिघे एकत्र आलो, तेव्हा तो आम्हाला म्हणाला, "काळीने तुम्हा दोघांना बोलावले आहे!"
 "ते कशाला बरे?' रायबा खेकसला, “पैसे कमी पडले काय?"
 "असतीलही!" मी म्हणालो, "पण त्याकरता आमची आवश्यकता आहेच असे नाही. तसे नसते तर तिने आमच्याशी असे घाणेरडे वर्तन केले नसते!"
 “तुम्ही लोकांनी तिच्याविषयी उगाचच चुकीची कल्पना करून घेतली आहे." शिवाने म्हटले, “अझीमने काही शिष्टाचार पाळायला नको होते? काही सभ्यपणा दाखवायला नको होता? आपल्याला विश्वासात घ्यायला नको होते?"
 "हवे होते ना! पण या साऱ्या गोष्टींशी तिचा फार कमी संबंध आहे." रायबा मध्येच म्हणाला. "का बरे? तिनं शिष्टाचाराची अपेक्षा करणं चूक कसं? आपण चौघांनी तिची जबाबदारी घेतली होती? आठवते?"
 "चांगले आठवते!" रायबा.
 “अझीमने ती मोडली नाही?" शिवा.
 "आणि तिने काय ती पाळली? ती आपल्या साऱ्यांशी सारखीच वागत होती? आमच्याशी असलेले तिचे संबंध आणि तुझ्याशी असलेले संबंध यात फरक नव्हता? अझीम गेल्यानंतरदेखील ती तुझ्याशी एकाच मापाने वागली?"
 रायबाच्या या प्रश्नांच्या भडिमाराला शिवाने लागलीच उत्तर दिले नाही. तो किंचित गंभीर झाला. मग काही वेळाने म्हणाला, “ती माझ्याशी वेगळी वागते हे मला मान्य आहे. पण त्याला दोन कारणे आहेत. एक तर मी तिला पहिल्यापासून, तुमच्या आधीपासून ओळखतो. आणि दुसरे म्हणजे तिला माझा विश्वास वाटतो. हा आपल्याला फसवणार नाही असे वाटते. तुमच्याविषयी तिला तसे वाटत नाही."
 "मग ठीक आहे." रायबा कोरड्या सुरात उद्गारला, "कटकटच गेली. विश्वास वाटत नाही म्हणजे मग प्रश्नच संपला."  "असे नाही. असेच काही नाही!' शिवा पुन्हा गयावया करून बोलू लागला. “अझीम गेल्यानंतर तिला तसे वाटले. आता नाही वाटत. तुम्ही दोघांनी जरा समजून घ्या सारे-"
 "तिला पैसे हवे आहेत एवढेच ना?"
 "नाही. तुम्ही तिच्याकडे यावे अशी तिची इच्छा आहे. तिचे वागणे समजून घ्यावे-"
 "हट्!" रायबा त्वेषाने उद्गारला, "असल्या यःकश्चित हेंगाड्या बाईचे म्हणणे मला बिलकूल ऐकून घ्यायचे नाही. हमीदला ऐकायचे असेल तर त्याने ऐकून घ्यावे." आणि असे म्हणून तो उठून त्वेषाने तिथून निघून गेला.
 "निदान तू तरी चल." शिवा आवाजात शक्य तितकी अजीजी आणून मला म्हणाला आणि त्यावरून 'ती फारच अडचणीत सापडली असली पाहिजे' एवढे अनुमान काढायला मला वेळ लागला नाही. तिच्याविषयी मला सहानुभूती वाटू लागली. परंतु तसा एकदम होकार देणे माझ्या स्वाभिमानाच्या विरुद्ध झाले असते. म्हणून मी म्हणालो, "मला विचार केला पाहिजे."
 "त्यात विचार कसला करायचा आहे?" शिवाने माझा दुबळा मनोनिग्रह ओळखून म्हटले, "तू तिला भेट तर खरा! म्हणजे माझ्या म्हणण्याची तुला प्रचीती येईल." आणि त्याने मला जवळ जवळ तिच्याकडे चलायची सक्ती केली. त्याच्याबरोबर उठून मी चालू लागलो. तसाच त्याच्याबरोबर तिच्या घरी गेलो. मला तिच्यापुढे ढकलीत तो एक मोठी कामगिरी पार पाडल्याच्या आविर्भावात तिला म्हणाला, “एकाला तरी आणला! आता झाले तुझे समाधान?"
 ती माझ्याकडे पाहून नुसती हसली; काहीच म्हणाली नाही. तिचे पूर्वीचे गुबगुबीत शरीर बरेचसे ओसरून गेले असल्याचे तिच्याकडे लक्षपूर्वक पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले. ती उदास, दुःखी दिसत असल्याचे मला जाणवून आले. परंतु त्या उदासीनतेचे कारण शोधायच्या फंदात मी पडलो नाही. सहज म्हणून मी विचारले, "कसे काय? मजा आहे ना?"
 "नका असं बोलू!" ती आपल्या हेंगाडी स्वरात एकदम भावनावश होऊन म्हणाली. एव्हाना शिवा कुठे बाहेर सटकला आणि तिच्या त्या ताणलेल्या भावनांचा भडिमार मला एकट्याला सहन करावा लागला. तिचा आवाज चिरका बनला; गदगदून बाहेर पडू लागला.
 "मी चुकले!' पश्चात्तापाच्या त्या क्षणाला ती म्हणाली, "आता तुमच्याशी मी अशी वागणार नाही! कधीच वागणार नाही!"
 तिला अशी असहाय झालेली, माझ्यापुढे लोटांगण घालताना पाहून प्रथम मला खूप बरे वाटले आणि मागाहून करुणा आली. "उगाच रडू नकोस!" मी म्हणालो. "मी तर सारे विसरून गेलो आहे." आणि त्या दिवसापासून मी पुन्हा अधूनमधून तिच्याकडे खेप टाकू लागलो.
 परंतु तिच्यात आता फार चमत्कारिक बदल झाला असल्याचे मला जाणवू लागले. ती सदाच गंभीर राहू लागली. उदास दिसू लागली. पूर्वीसारखी मोकळेपणे वागेनाशी झाली. तिला याविषयी विचारले तेव्हा ती नुसती हसली; गंभीरपणे हसली. काही म्हणालीच नाही. मीही अधिक खोलात शिरलो नाही.
 परंतु पुढे पुढे तिचा साराच नूर पालटत गेला. तिच्या अंगावरची उंची वस्त्रे हळूहळू दिसेनाशी झाली, जागेचे भाडे थकू लागले. पैशांची तिला सतत चणचण भासू लागली. आणि आपला पूर्वीचा सारा गर्व फेकून देऊन ती माझ्यापाशी अधिक पैशांची मागणी करू लागली.
 "तुम्हां दोघांशिवाय मला कुणाचाच आधार नाही." ती म्हणू लागली, “दुसरे काहीच साधन उपलब्ध नाही."
 मी थंडपणे तिला म्हणालो, “दोघेच का बरे?" आणि तिच्या तोंडाकडे पाहिले.
 "मग काय?" ती रूक्षपणे हसून उद्गारली, “आता कोणी ढुंकूनदेखील बघत नाही माझ्याकडे. पूर्वीचे संबंध मी तुम्हा लोकांसाठी तोडले ते आता जुळत नाहीत. आणि जसजसे वय होते आहे तसतसे नवीन कोणी यायला तयार होत नाही."
 मी काहीच उत्तरलो नाही. मग तिनेच एकाएकी विचारले. “तुमचे दोस्त काय करतात?"
 "कोण रायबा?" मी विचारले.
 "होय."
 "मला काय माहीत? बरेच दिवस मला तो भेटला नाही."
 “पण मला माहीत आहे"-ती म्हणाली, "ते दुसऱ्या बायांकडे जातात."
 "तुला काय माहीत?"
 “शिवाने सांगितले.”
 "त्याला तरी कसे कळले?"
 "रायबानेच सांगितले. तो म्हणाला, मी काय करावे आणि काय करू नये हे मी ठरवणार. इतर बाया मला सुख देतात. काळी तसे देऊ शकत नाही. म्हणून मी त्यांच्याकडे जातो."
 रायबाचे काळीविषयीचे म्हणणे मात्र तंतोतंत खरे होते. तिच्या त्या सदासर्वकाळ संत्रस्त चेहऱ्याकडे आणि ओसरू लागलेल्या शरीराकडे पाहून काही क्षण सुखात घालवण्याची कल्पना हळूहळू माझ्या मनात येईनाशी झाली...त्या सहवासाची पूर्वीसारखी ओढ वाटेनाशी झाली. सावकाश तिच्याविषयी माझ्या मनात तिरस्कार निर्माण झाला. मी तिला भेटायचा बंद झालो. आणि शिवा मला तिच्याकडे जायला भाग पाडील या भीतीने त्यालाही भेटायचे टाळू लागलो.
 आणि पुढे माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. एका मुलीने माझ्या आयुष्यात प्रवेश केला आणि मी पार बदलून गेलो. पूर्वीचे सारे ऋणानुबंध विसरून गेलो. सारा भूतकाळच माझ्या मनातून नष्ट झाला. फक्त ती मुलगी तेवढी राहिली. तिच्याशिवाय मला दुसरे काही दिसेनासे झाले, काही कळेनासे झाले. माझा वेळ तिच्या सहवासात जाऊ लागला. अखेर यथावकाश मी तिच्याशी लग्न केले.
 शिवा लग्नाला आला होता. रायबाही हजर राहिला होता. हे दोघे तर अनेक दिवसांनी त्या निमित्ताने एकत्र आले होते. परंतु दोघे एकमेकांना टाळू पाहत होते! रायबा बेफिकीरपणे एका टोकाला बसून सारख्या सिगारेटी ओढीत होता. शिवा त्याच्या जणू खिजगणतीतच नव्हता.
 शिवा मात्र अस्वस्थ दिसत होता. सारखा बसल्या जागेवरून माझ्याकडे पाहत होता. कधी एकदा हा निकाचा सोहळा संपतो असे त्याला झाले होते. निका संपताच तो माझ्याजवळ आला, तेव्हा मीच म्हणालो, “सॉरी, बायकोची ओळख करून देता आली नाही. ती आत आहे."
 “काही हरकत नाही. पुन्हा भेटेन केव्हातरी! फक्त सांगायचे एवढेच की, मित्रांना विसरू नकोस."
 "अरे वा! कसा विसरेन?" मी वरवर उद्गारलो. परंतु त्याची मैत्री चिरंतन राहावी अशी इच्छा माझ्या मनात नव्हती.
 तो गेल्याचे रायबा बसल्या जागेवरून पाहत होता. मग तो उठून माझ्याकडे आला.
 “अभिनंदन!"
 "थँक्यू."
 “शिवा काय सांगत होता?"
 “मित्रांना विसरू नकोस."
 "आणि त्या हेंगाडणीला?' तो तिरस्काराने म्हणाला, “तुला सांगतोय. तुझे लग्न झालेय. चांगला सुखाने संसार कर! त्या काळीचा नाद सोडून दे!"
 "तुझा उपदेश स्तुत्य आहे. आणि तो पाळायचेही मी ठरवले आहे. नव्हे, आधीपासूनच अंमलात आणला आहे. परंतु तुझ्या बाबतीत मी काय काय ऐकले!-ते सारे खरे आहे?"
 "तंतोतंत खरे!"
 "असे का?"
 "ते असेच असायचे! हे बघ! मी कलंदर मनुष्य आहे. आजवर कुणाच्या बंधनाला मी जुमानलेले नाही. कुठले आदर्श फारसे मानायच्या फंदात पडलेलो नाही. ज्या ज्या वेळी मनाला जे जे पटत गेले त्या त्या वेळी ते ते करीत गेलो आणि पुढेही करीत राहणार-"
 तेवढ्यात माझी बायको दरवाजात येऊन उभी राहिली आणि तो गप्प राहिला. अधिक वेळ न थांबता लगेच तो तिथून निघूनही गेला.
 लग्न झाले आणि माझा संसार सुरू झाला. त्या नवथर काळात मी जगाला विसरूनच राहिलो. माझ्या संसारात मश्गुल झालो. तासनतास बायकोच्या सहवासात व्यतीत होऊ लागले. घरात आणि बाहेर सतत ती माझ्याबरोबर राहू लागली. तिच्या संगतीतल्या रात्री मला पुलकित करू लागल्या.
 त्या दिवसांत काळीशी असलेल्या माझ्या संबंधाच्या आठवणीही मला किळसवाण्या वाटू लागल्या. आपल्या आयुष्यातला तो एक अत्यंत गलिच्छ भाग असल्यासारखे मला वाटू लागले. तो मूळातच विसरून जाण्याची मी पराकाष्ठा करू लागलो.
 परंतु एक दिवस बायकोबरोबर सहज रस्त्याने फिरत असताना लांब मला शिवा दिसला आणि नकोशा वाटणाऱ्या आठवणी एकदम मनात दाटल्या. विसरलेले चारित्र्य एकाएकी नजरेसमोर उभे राहिले. मला स्वत:ची लाज वाटू लागली आणि शिवाचा तिरस्कार मनात दाटला. त्याला टाळायचा मी प्रयत्न करू लागलो. सरळ दुसरा रस्ता पकडला. परंतु त्याने मला नेमके हेरले आणि माझ्यासमोर येऊन तो उभा राहिला. अनिच्छेनेच मी त्याची बायकोशी ओळख करून दिली.
 "आहेस कुठे?" त्याने विचारले.
 "इथेच!"
 "बायको सोडीत नाही?"
 त्याचे हे बोलणे माझ्या बायकोला आवडले नाही. ती मला तिथून निघायला खुणा करू लागली.
 "तुझ्यापाशी माझे काम होते." तो पुढे म्हणाला.
 "काय आहे? बोल ना!"
 परंतु तो काही क्षण गप्प राहिला. माझ्या बायकोकडे त्याने एकदा पाहिले. त्याला तिची अडचण होत असल्याचे माझ्या लक्षात आले.
 "काळेने तुला बोलावले आहे-" तो अखेर म्हणाला.
 "काळे?"
 "काळे-मि. काळे." त्याने पुन्हा म्हटले आणि उगाच डोळे मिचकावले आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
 "त्याला सांग, सध्या मला भेटता येणार नाही."
 "पण-पण नुसते भेटायला."
 "नो नो! सध्या शक्यच नाही!" असे म्हणून मी त्याला वाटेला लावले. बायकोच्या हजेरीत त्याने आपल्याशी काळीचा सरळ उल्लेख केला नाही हे मला बरे वाटले. त्यानंतर तो दोनतीनदा असाच भेटला तेव्हा बायकोचा मला असाच ढालीसारखा उपयोग झाला. तिच्या अस्तित्वाचे संरक्षण लाभू लागले. कारण तो तिच्यासमोर काळे या नावानेच काळीला संबोधू लागला. 'काळेला फार वाईट दिवस आलेत!', 'एकदा तरी काळेला भेटून ये!' इतपत तो तिच्याविषयी माझ्यापाशी बोलू लागला.
 परंतु माझ्या बायकोला मात्र या काळेचे विलक्षण कुतूहल वाटू लागले. मी तिला उडवाउडवीची उत्तरे दिली आणि एक दिवस शिवा असाच भेटल्यानंतर तिच्याविषयी बोलू लागला, तेव्हा त्याला दंडाला धरून मी एका बाजूला नेऊन सांगितले, “कृपा करून हा प्रकार थांबव!"
 त्याने मला एकदा आपादमस्तक पाहिले. मग आवाजात भावनाविवशता आणून तो उद्गारला, “तिची अवस्था फार वाईट आहे."
 “असू दे! मी आता काही करू शकत नाही."
 "तू येऊ नकोस. निदान काही पैसे तरी!"
 "नो! मी काहीच करणार नाही. काही करू इच्छीत नाही. मला पुन्हा काही विचारू नकोस! याकरिता भेटू नकोस."
 तो गप्प राहिला. एक आवंढा गिळून हताशपणे माझ्याकडे पाहू लागला.
 "हे बघ! काळीशी असलेल्या माझ्या संबंधाची मला शरम वाटते. माझ्या आयुष्यातली ती एक किळसवाणी बाब आहे असे वाटते. माझ्या चारित्र्यावरचा एक कलंक वाटतो. आणि तो धुऊन टाकण्याचा मी प्रयत्न करतो आहे. ते सारे पूर्वीचे विसरून जातो आहे. स्वत:ची त्या किळसवाण्या प्रकारातून मला सुटका करून घ्यायची आहे. तू कशाला मला त्यात पुन्हा अडकवतो आहेस?"
 माझ्या या बोलण्याचा त्याच्या मनाला बसलेला धक्का त्याच्या चेहऱ्यावर उमटला. त्याच्या मनाला खूप झालेल्या वेदना त्याच्या डोळ्यांत प्रकट झाल्या. काही क्षण दगडासारखा निश्चल असा तो माझ्यापुढे उभा राहिला. “तुला सारे किळसवाणे वाटते?' तो पुटपुटला.
 "होय."
 "तुझी खात्री आहे?"
 "होय होय होय."
 "ठीक आहे. यापुढे तुला मी काळीच्या वतीने काही सांगायला येणार नाही."
 'थँक्स-मेनी मेनी थँक्स!' मी म्हणालो. परंतु माझे थँक्स घ्यायलाही तो तिथे थांबला नाही. माझ्याकडे त्याने पाठ वळवली आणि सावकाश चालत तो रस्त्यावरल्या गर्दीत मिसळला; दिसेनासा झाला.
 "त्या काळेच्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला.” मी बायकोचे विलक्षण शिगेला पोहोचलेले कुतूहल शमविले. “लेकाचा सारखा पैशांची याचना करतो आहे. याच्या बापाचा मी काय देणेकरी लागतो आहे?"
 त्यानंतर मात्र शिवाने पुन्हा माझ्यापाशी काळीचा विषय कधी काढला नाही. पुन्हा येऊन मला कधी सतावले नाही. तिच्याकडे चलायचा आग्रह केला नाही आणि तिच्या वतीने पैशाची मागणी केली नाही. कधी रस्त्यात दिसताच दुरूनच नाहीसा होऊ लागला. आणि एखादेवेळी अचानक समोरासमोर गाठ पडलीच तर मामुली चार शब्द बोलून तो पुढे सटकू लागला आणि दुरान्वयाने का होईना, काळीशी येणारा माझा संबंध असा कायमचाच तुटला.
 त्यानंतर मात्र तो कायमचाच भेटेनासा झाला. अनेक महिने दृष्टीस पडला नाही. कुणीतरी एक दिवस सहजपणे सांगितले की, तो कम्युनिस्ट पक्षात सामील झाला आहे. परंतु मी तिकडे विशेष लक्ष दिले नाही. मग एकदा तो मला भेटला आणि त्याने सांगितल्यावरून कळले की, काळी आता त्याच्या खोलीवरच राह्यला गेली आहे आणि तिच्याशी लग्न करायचा त्याचा बेत आहे!

काही कथासंग्रह

मोकळा । राजीव नाईक

स्वस्तिक । अनिल डांगे

गंधर्व । बाळकृष्ण प्रभुदेसाई

त्रिसुपर्ण । प्रभाकर पाध्ये

निळेगर्द आणि लालभडक । ए० वि० जोशी

कॅक्टस व्हिला । सुरेश मथुरे

सांज । सखा कलाल

राखी पाखरू । चिं. त्र्यं० खानोलकरमौज प्रकाशन गृह