लाट/लाट

विकिस्रोत कडून


लाट


 एक दिवस एका साहित्यविषयक समारंभात माझी आणि सुमित्रा गोखलेची अकस्मात ओळख झाली. समारंभ संपल्यावर ज्या अनेक लोकांनी अहमहमिकेने माझी ओळख करून घेतली, त्यात सुमित्रा गोखले ही एक होती. निवडक लोकांच्या घोळक्यात बसलेलीच तोपर्यंत मी तिला पाहत होतो. तिच्या हातातल्या चारदोन मासिकांच्या अंकांनी माझं कुतूहल चाळवलं होतं. इतर वक्त्यांची भाषणं न ऐकता ती एका मासिकात डोकं खुपसून बसली होती. मधूनच पुढं येणाऱ्या केसांच्या बटा आपल्या हातांनी मागं सारीत होती. वाचता वाचता थबकून, मनगटातले बिल्वर उगाचच कोपरांपर्यंत मायं सारीत होती. आणि व्यासपीठावरून तिचे हे आविर्भाव मी निर्विकारपणे पाहत होतो.
 पण मग मी बोलायला उठताच झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटानं भानावर येऊन तिनं हातातलं मासिक मिटलं. माझं भाषण संपेपर्यंत एकाग्रतेनं ती माझ्याकडे पाहत राहिली. समारंभ संपताच मी तिथून बाहेर पडल्यावर हसत हसत ती समोर आली आणि नि:संकोचपणे तिनं माझी ओळख करून घेतली. माझ्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कथासंग्रहाची भरमसाट स्तुती करण्यास तिने आरंभ केला. असल्या औपचारिक बोलण्याला सरावलेला मी नुसता हसलो! बोलता बोलता माझ्याशी साहित्यावर खूपशी चर्चा करण्याची आपली इच्छा तिने माझ्यापाशी व्यक्त केली. माझा पत्ता मागून घेतला. मी घरी कधी असतो ते विचारून घेतले आणि निरोप घेऊन हसत हसत ती निघून गेली.
 यानंतर सुमित्रा गोखले नेहमी माझ्या घरी येऊन माझ्याशी बोलत बसू लागली. लेखकाशी वैयक्तिक ओळख असणारा वाचक ज्या आपुलकीनं, आदरानं लेखकाविषयी, त्याच्या साहित्याविषयी बोलत असतो, त्या आदरानं सुमित्रा गोखले माझ्याशी रोज येऊन बोलू लागली. माझ्याशी साहित्याचा वाद ती उकरून काढू लागली. साहित्याखेरीज इतर विषय तिला वर्ज्य नव्हते. संगीताचं चांगल्यापैकी ज्ञान तिनं संपादन केलं होतं. नवकलेच्या उन्मेषावरील तिचे विचार एखाद्या अव्वल दर्जाच्या नवकलाकारानं व्यक्त करावेत अशा अभिरुचीचे होते. रागदारीवर बोलताना मधूनच तिला गायची लहर येई आणि ती गाऊनही दाखवी. अशा वेळी नि:स्तब्धपणे मी ते ऐकत असे आणि क्वचित वेळी तिची प्रशंसाही करीत असे. आणि नवकलेतलं काहीच कळत नसल्यामुळे त्यावर बोलायचं शक्य तितकं टाळीत असे. अशा रीतीनं लेखक आपल्या परिचयाच्या वाचकांशी जितक्या अलिप्तपणे समरस होतो, तितक्या अलिप्तपणे मी सुमित्रा गोखलेशी समरस होत असे. अशा परिचयाच्या वाचकांशी जसं एक अलिप्तपणाचं, औपचारिकपणाचं नातं निर्माण होतं, तसं ते सुमित्रा गोखलेच्यात आणि माझ्यात निर्माण झालं होतं.
 परंतु एक दिवस या नात्याच्या मर्यादा झुगारून देण्याचा तिनं प्रयत्न केला. त्या दिवशी मी फोर्टमध्ये आपल्याच तंद्रीत रस्त्यानं चाललो होतो. इतक्यात ती समोरून आली. हसत हसत आडवा हात धरून तिनं मला अडवलं आणि विचारलं, "कुठं निघालात?"
 तिनं हात आडवा करून अडवावं, हे मला आवडलं नाही. तरीही हसून औपचारिकपणे मी म्हणालो, “सहज इकडेच." आणि बाजूच्या शोकेसेसमध्ये ठेवलेल्या रंगीबेरंगी कपड्यांकडे बघू लागलो.
 माझ्याकडे रोखून पाहत तिनं पुन्हा विचारलं, "काही खरेदीबिरेदी?"
 मोठ्यानं हसून मी उत्तर दिलं, “आम्ही कसली खरेदी करणार सुमित्राबाई? इतरांच्या खरेदीवर आमची कामं होतात!"
 त्याबरोबर तिनं चटकन विचारलं, “तुम्हाला खरंच काही घ्यायचं आहे का?"
 तिचं हे विचारणंही मला आवडलं नाही. अशा रीतीनं माझ्याशी ओळख करून घेणारी, माझ्याशी ओळख वाढवणारी आणि माझ्या पुढं पुढं करणारी सुमित्रा गोखले काही पहिलीच नव्हे. अशा पुष्कळांना मी आपल्या जीवनाचा स्पर्शही होऊ दिला नव्हता. माझ्या कलेच्या विश्वात वावरणारी ही माणसं माझ्या जीवनाचा भाग होऊच शकत नव्हती.
 सुमित्रा गोखलेला मी उत्तर दिलं, "छे: छे: आता मी जे काही म्हणालो त्याचा अर्थ तुम्ही काही खरेदी करून द्यावी असा नाही हं! माझ्या बोलण्यातील ती एक लकब, इतकंच!" आणि 'बरंय, येतो-' असं म्हणून आपल्याच तंद्रीत मी पुढं चालू लागलो.
 या प्रसंगानंतर सुमित्रा गोखले माझ्याकडे नेहमीप्रमाणं येत राहिली. आपल्या सवयीप्रमाणे माझ्याशी बोलत राहिली. साहित्य, संगीत, चित्रपट इत्यादी विषयांवर आमचा अप्रतिहतपणे वाद होत राहिला. असंच बोलता बोलता एक दिवस तिनं मला विचारलं, “तुम्ही 'जॉनी बेलिंडा' पाहिलात का हो?"
 "जॉनी बेलिंडा' हा चित्रपट तेव्हा मुंबईत लागला होता. मी नकारार्थी मान हलवली.
 त्याबरोबर तिनं चटकन विचारलं, “आपण पाहू या का?"
 तिच्या स्वरात एक वेगळीच आर्तता मला जाणवली. तिचे घारे डोळे कसल्या तरी जिव्हाळ्याने चमकू लागले. मला ते सगळं विलक्षण, विचित्र वाटू लागलं. मी लगेच उत्तरलो, "नको! चित्रपट पाहण्याचा मला फारसा शौक नाही."
 ती स्तब्ध राहिली. थिजल्यासारखी बराच वेळ बसून राहिली. मग हळूहळू ती इतर विषयांवर बोलू लागली. 'ती अमकी कथा वाचलीत का हो?' असं तिनं मला विचारलं. त्याबरोबर मध्येच थबकलेली संभाषणाची गाडी पूर्ववत चालू झाली. तन्मयतेनं मीही त्या कथेवर तिच्याशी बोलू लागलो.  परंतु दुसऱ्या दिवशी ती आली तेव्हा भरकटलेल्या मनानं मी नुसता पडलो होतो. मनात कसल्या तरी भावनांना कढ आले होते. मनातल्या उसळत्या भावनांचा कुणाजवळ तरी स्फोट करावासं वाटू लागलं होतं. अशा ऐन वेळी सुमित्रा गोखले आली. येताच नेहमीप्रमाणे हसत हसत तिनं विचारलं, “हॅलाव? कसला विचार चालला आहे?"
 मी सावरून बसत म्हणालो, “कसला नाही." आणि पुन्हा विचारमग्न होऊन बाहेर पाहू लागलो.
 असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं. सुमित्रा गोखले आल्याबरोबर मनातले विचार बाजूला फेकून देऊन मी तिच्याशी हव्या त्या विषयावर बोलू लागलो होतो. माझ्या मनातल्या उलथापालथीची दाददेखील लागू दिली नव्हती. परंतु त्या दिवशी मनानं इतका अस्वस्थ झालो होतो की, एरवी ती आली असताना आपोआप येणारा औपचारिकपणा निर्माण होऊ शकला नाही.
 माझी वेगळी, विचित्र मन:स्थिती तिनंही ओळखली आणि नेहमीच्या जिव्हाळ्याच्या स्वरात तिनं मला विचारलं, "तुम्हाला बरं नाही का?"
 तिनं असं विचारावं याचं मला आश्चर्य वाटलं नाही. तथापि माझ्या जीवनात ती डोकावू पाहत असल्याची मला जाणीव झाली. आजवरचा परकेपणा तिच्या दृष्टीनं संपवून टाकल्याचं मला जाणवलं. तिला काही तरी कडवट उत्तर देऊन हा परकेपणाचा पडदा तसाच घट्ट पकडून ठेवावा असं तीव्रतेनं मला वाटलं.
 पण मग माझं मलाच वाटू लागलं, आता एखादा माझा मित्र आला असता तर त्याच्याशी मी माझं मन मोकळं केलं नसतं का? मग बिचाऱ्या सुमित्रा गोखलेनंच आपलं असं काय घोडं मारलं आहे की, आपण सदानकदा तिच्याशी इतक्या तुटकपणे वागावं? ज्या माझ्या मित्रांशी मी माझं मन मोकळं करतो तेही माझे एकाएकी मित्र बनले नव्हते. कालांतराने त्यांच्यात आणि माझ्यात जिव्हाळा निर्माण झाला होता. एक प्रकारचा विश्वास वाटू लागला होता. सुमित्रा गोखलेच्या इतक्या परिचयानंतर आता तिच्याविषयी इतका विश्वास निर्माण व्हायला काय हरकत होती?
 बाहेर शून्यपणे पाहत मी म्हणालो, "आज सकाळी गळफास लावून आत्महत्या केलेली एक मुलगी मी पाहिली-गळफासाला लटकलेली."
 बराच वेळ ती काही बोलली नाही. नुसती माझ्याकडे पाहत राहिली. मग मीच पुढं म्हणालो, "तिचं एका तरुणावर प्रेम होतं."
 "मग? मग झालं काय?" तिनं अस्वस्थपणं विचारलं.
 "कुणास ठाऊक! तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. कदाचित दुसऱ्याच कुणा मुलीशी त्यानं जमवलं असेल. तिला बिचारीला फसवलं असेल!"
 "त्याला तिच्या प्रेमाची कल्पना होती का?"
 तिचा हा प्रश्न मला पोरकट वाटला. मी उत्तरलो, “असेल किंवा नसेल. मला त्याची कल्पना नाही. तिचं त्याच्यावर प्रेम होतं इतकंच मला माहीत आहे. बाकीचे माझे तर्क आहेत. पाहिलेला तो प्रसंग सारखा मला आठवतो आहे."
 सुमित्रा गोखले चित्रासारखी स्तब्ध बसून माझं बोलणं ऐकत होती. थोडा वेळ कोणी काहीच बोललं नाही. मग तिनं शुष्क स्वरात मला विचारलं, “तुम्ही तिचा इतका विचार का करता आहात?"
 तिच्या स्वरातल्या तटस्थपणाच्या भावनेची मला चीड आली. मी आवेगानं म्हणालो, "प्रेमासाठी एक माणूस आपला जीव गमावतो, स्वत:ला गळफास लावून घेतो, यात विचार करण्यासारखं काहीच नाही का? तिच्या दिव्य प्रीतीनं मी दिपून गेलो आहे. मृत्यूला मिठी मारणाऱ्या तिच्या उत्कट प्रीतीवर मी प्रेम करू लागलो आहे. वाटतं की, तिच्या प्रियकराच्या दृष्टीनं तिच्या या विलक्षण कृत्याचा अर्थ लावावा. तिच्या जीवनात डोकावून पाहावं."
 "तिच्या प्रियकराच्या दृष्टीनं?' सुमित्रा गोखलेनं चमकून विचारलं.
 तिला माझं बोलणं कळावं म्हणून मी पुन्हा म्हणालो, "मला वाटतंय की, ती आता माझीच चालतीबोलती प्रेयसी बनली आहे आणि तिनं आत्महत्या केली आहे. अशा वेळी माझ्या मनात कोणते विचार उसळतील याचा मी अंदाज घेतो आहे. एक सुंदर कथा घडवण्याचा मनातल्या मनात प्रयत्न करतो आहे."
 इतकं बोलून मी स्तब्ध झालो. त्या मुलीचाच विचार करीत राहिलो. पाहिलेला तो प्रसंग सारखा पुन्हा पुन्हा आठवू लागलो. आणि सुमित्रा गोखले माझ्याकडे पाहत राहिली. चित्रासारखी स्तब्ध बसून राहिली. आज तिनं इतर विषय काढले नाहीत. कुठल्याही कथेवरील वाद उकरून काढला नाही आणि संगीताचा विषय काढून एखादं गाणंही ती गुणगुणली नाही. मी माझ्याच तंद्रीत असताना "बरंय, येते." असं ती म्हणाली आणि निघून गेली.
 दुसऱ्या दिवशी ठरावीक वेळेला ती आली तेव्हाही त्या आत्महत्या केलेल्या मुलीचाच मी विचार करीत होतो. तिचं गळफासाला लटकणारं, हेलकावणारं प्रेत मला दिसत होतं. सुमित्रा गोखलेची मी नीटशी दखल घेतली नाही. हातानंच तिला बसायला सांगून मी पूर्वीसारखा बाहेर पाहू लागलो. हे बघून शुष्क स्वरात तिनं विचारलं, “अजूनही त्या मुलीचाच विचार करता आहात का?"
 "होय."
 आणि मी तिच्याकडे पाहिलं. ती भकासपणे आता बाहेर पाहू लागली होती. कसला तरी विचार करू लागली होती. मी आश्चर्यानं विचारलं, “तुम्ही कसला विचार करता आहात?"
 "त्या मुलीचा.” ती खिन्नपणे माझ्याकडे पाहत म्हणाली, "खरंच, माणूस प्रेम का करतो?"
 मी हसून म्हणालो, “सुमित्राबाई, या प्रश्नाचं उत्तर आजतागायत कुणाला सापडलेलं नाही."
 ती शांतपणे ऐकत होती. काही वेळ ती तशीच स्तब्ध बसली. मग एकाएकी माझ्याकडे वळून तिने विचारलं, "तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं आहे?"  तिच्या प्रश्नानं मी एकदम दचकलो. तिच्या प्रश्नामागील जिव्हाळ्यानं चमकलो. पण मग उत्तर दिलं, “कालपासून त्या आत्महत्या केलेल्या मुलीवर मी प्रेमच करतो आहे."
 मला एकदम मध्येच अडवून ती म्हणाली, “तसं नव्हे! खरंखुरं प्रेम-"
 "मग हे काय खोटं आहे? तिनं आपल्या प्रियकरावर खरंखुरं प्रेम केलं नाही काय? त्या खऱ्याखुऱ्या प्रेमावरच मी-"
 “नव्हे! ते नको!" पुन्हा तिनं मध्येच अडवलं. “तुम्ही कुणा मुलीवर केलेलं प्रेम-"
 मी उलट तिलाच विचारलं, "तुम्ही हा प्रश्न मला का विचारता आहात?"
 तिनं चटकन उत्तर दिलं नाही. पूर्वीप्रमाणं ती शून्यपणे बाहेर बघत राहिली आणि मग काही वेळानं माझ्याकडे दृष्टी वळवून विलक्षण आवेगानं पुटपुटली, “कारण-कारण मीही एकावर प्रेम केलं आहे."
 सुमित्रा गोखलेच्या या शब्दांबरोबर तिच्याविषयीचा आजवरचा परकेपणा जळून खाक झाला. एखाद्या कथेतल्या नायिकेविषयी जो जिव्हाळा संचारतो तो सुमित्रा गोखलेविषयी माझ्या मनात संचारला. तिच्या जीवनात डोकावून पाहण्याची अनिवार इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली. कुतूहलानं मी तिला विचारलं, “मग पुढं काय झालं?"
 "पुढं काहीच झालं नाही.' ती शुष्कपणे उत्तरली, “माझं त्याच्यावर प्रेम होतं. फार फार प्रेम होतं. मी त्याच्याशी लग्नदेखील करणार होते. आरंभी त्याचाही माझ्यावर फार लोभ होता. पण पुढं तो मला विटला; टाळू लागला. एका दुसऱ्याच मुलीशी त्यानं जमवलं. तिच्याशी लग्न करून तो आता मोकळा झाला आहे."
 सुमित्रा गोखले बोलायची थांबली आणि तिच्याविषयीच्या सहानुभूतीची एक लाटच्या लाट माझ्या मनात उसळली. तिचं आणि माझं आजवरचं औपचारिक नातं संपुष्टात आलं आणि तिच्याविषयीच्या जिव्हाळ्यानं माझं मन दाटून गेलं. तिच्या संथ शब्दांनी माझ्या मनाचा कोपरा आणि कोपरा व्यापून टाकला. आयुष्यात फटका खाल्लेल्या त्या तरुण मुलीविषयी मला करुणा वाटू लागली. माझं मनच सुमित्रा गोखलेमय झालं. व्यथित मनानं मी एकेरीवर येऊन तिला म्हणालो, "तू हे मला आधीच कां सांगितलं नाहीस?" परंतु ती काहीच बोलली नाही. भकासपणे मला न्याहाळू लागली; मग गोरीमोरी होऊन बाहेर बघू लागली.
 रडवेली, गोरीमोरी झालेली सुमित्रा गोखले त्या दिवशी प्रत्यक्षात निघून गेली तरी ती माझ्याचबरोबर होती आणि तिच्यात आता एक वेगळाच कायापालट झाला होता. ती स्वैरपणे वेड्यासारखी माझ्याशी कितीतरी बडबडत होती, माझ्याशी लगट करू पाहत होती, माझ्या अधिकाधिक जवळ येत होती. आणि मी तिच्या प्रत्येक कृतीला प्रतिसाद देत होतो. मग ती लाजत लाजत माझी प्रेमयाचना करू लागली; लग्न करण्यासाठी माझी मनधरणी करू लागली; आणि मी शब्दांची खोटी आश्वासनं देऊन तिला चकवू लागलो. माझ्या शब्दांवर भोळेपणानं विश्वास ठेवून ती प्रेमभराने माझी चुंबनं घेऊ लागली, त्याचबरोबर सुखदु:खांच्या लाटांवर लाटा माझ्या मनात उसळू लागल्या...
 आणि मग फसल्याची जाणीव झाल्यानंतर गळफास लावून घेऊन आत्महत्या करणारी सुमित्रा गोखले!...फासाला लटकलेल्या त्या प्रेताऐवजी, सुमित्रा गोखलेचा लटकणारा, हेलकावणारा देह मला दिसू लागला. आणि मी शहारून गेलो! तिचा तो निर्जीव, भेसूरपणे हलणारा देह पाहून दु:खावेगानं माझं मन फाटून गेलं. पश्चात्तापानं पोळलेल्या अंत:करणानं सुमित्रा गोखलेच्या नावानं मी मनातल्या मनात टाहो फोडू लागलो...


 त्या रात्री स्वत:ला आवरणं मला अशक्य झालं. मी टेबलापाशी बसलो आणि समोरचे कागद पुढं ओढले. आणि मग मनातल्या भावनांच्या समुद्रातून भाषेचा ओघच्या ओघ कागदावर वाहू लागला. शब्दांचा सैरावैरा लोंढाच्या लोंढा आला आणि त्यातून सुमित्रा गोखले आकार घेऊ लागली. तिचं भोळंभाबडं व्यक्तिमत्त्व त्यातून साकार होऊ लागलं. त्या मुलीच्या आत्महत्येपासून अंधुकपणे मनात वावरत असलेली ती कथा एखाद्या चित्रासारखी कागदावर उतरू लागली. आणि किरकोळ, सर्वसामान्य माणसांप्रमाणं दुबळं प्रेम करणाऱ्या सुमित्रा गोखलेच्या व्यक्तिमत्त्वाला, प्रेमासाठी आत्महत्या करणाऱ्या धीरोदात्त नायिकेच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मुलामा चढू लागला...देहभान विसरून रात्रभर मी लिहीत होतो. पहाटे थकून मी टेबलावर डोकं टेकलं....
 सुमित्रा गोखले दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आली. तेव्हा थकल्यासारखा मी लोळत पडलो होतो. येताच टेबलावर लिहून ठेवलेले कागद तिने पाहिले. माझ्याशी एक शब्दही न बोलता कुतूहलानं ती ते वाचू लागली. ती वाचत असताना मी तिच्याकडे पाहत राहिलो. वाचता वाचता तिचा चेहरा किंचित फुलला. वाचून होताच हातातले कागद तिनं पुन्हा होते तसेच टेबलावर ठेवले आणि संथपणे तिथंच खुर्चीवर बसत तिनं विचारलं, “हे सगळं तुम्ही काय लिहिलं आहे?"
 "तुला कळलं नाही काय?"
 "कळलं थोडंसं. त्यातला माझ्याविषयीचा भाग तेवढा कळला. माझ्या जीवनात लिहिण्यासारखं असं काय आहे?"
 "काहीच नाही?" मी आश्चर्यानं विचारलं.
 "ठीक आहे. कथा कधी पुरी होईल?"
 मी खिन्नपणं उत्तरलो, "कुणास ठाऊक? खरं सांगू का? रात्री देहभान विसरून मी हे लिहिलं. परंतु त्या कथेला हवा तो आकार आलेला नाही. त्या शोकांतिकेत आवश्यक तो आवेग येत नाही. पश्चात्तापानं पोळलेल्या नायकाच्या अंत:करणाचं दु:ख त्यात प्रकर्षानं प्रकट होत नाही. माझ्या मनातला हवा तो आशय कागदावर उतरलेला नाही. असं का व्हावं? मी तुझ्या भावनाशी पुरता समरस झालो नाही की काय? की तुझं दु:खच पुरतेपणी मला कळलं नाही? की माझं शब्दसामर्थ्यच लंगडं पडलं? माझी प्रतिभाच पंगू आहे का? सुमित्रा गोखलेचं दु:ख, तिच्या वेदना साकार करण्याइतकंही सामर्थ्य तिच्यामध्ये नाही?"
 बोलता बोलता धडपडत मी उठून उभा राहिलो आणि असहायतेनं तिच्याकडे पाहू लागलो. माझ्या प्रतिभेच्या कक्षेत ती मावत नसल्याची जाणीव मला असह्य झाली. माझ्या प्रतिभेच्या दौर्बल्याच्या कल्पनेनं मला रडू कोसळलं...
 सुमित्रा गोखले टक लावून माझ्याकडे पाहत होती. थक्क झाल्यासारखी मला न्याहाळीत होती. मग एकाएकी तिचा चेहरा केविलवाणा दिसू लागला. क्षणार्धात ती गोरीमोरी झाली. कसले तरी कढ तिला अनावर आले. आवेगानं तिचे डोळे भरून आले. संथ शब्दांत ती म्हणाली, "तुम्हाला मी एक सांगू का?"
 तिचं काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत मी नव्हतो. तरी विचारलं, "काय?"
 ती घुटमळली. काही वेळ काहीच बोलली नाही. मग त्याच संथ स्वरात पुन्हा म्हणाली, "तुम्ही रागावणार तर नाही?"
 तिच्या बोलण्यानं मी व्यथित झालो. मी तिच्यावर रागावण्याची कशी शक्यता होती? "सांग ना काय ते!" असे म्हणून मी तिच्याकडे पाहू लागलो.
 चित्रासारख्या स्तब्ध असलेल्या सुमित्रा गोखलेनं जागच्या जागीच किंचित चाळवाचाळव केली. तिचे डोळे पुन्हा भरून आले आणि काही वेळानं तिचे संथ शब्द उमटले, "मी तुमचा एक फार मोठा अपराध केला आहे-तुमची उगाच फसवणूक केली आहे."
 आता मी तिच्याकडे विस्मयानं पाहू लागलो. तिच्या विचित्र, गूढ बोलण्यानं बुचकळ्यात पडलो. वाटू लागलं, सुमित्रा गोखले आपल्याला अजूनही समजली नाही की काय? आत्यंतिक जिव्हाळ्याच्या स्वरात मी तिला म्हणालो, "तुला काय म्हणायचं आहे? काही सांगायचं आहे का? तुला माझा अजूनही कसला संकोच वाटतो आहे?..."
 "नाही, तसं नव्हे! तुम्ही उगाचच गैरसमज करून घेता आहात. मला काही दुसरंच सांगायचं आहे."
 "मग सांग ना."
 सुमित्रा गोखले काही क्षण स्तब्ध बसली आणि मग मनाचा हिय्या करून घाईघाईनं म्हणाली, “मी तुम्हाला परवा जे सांगितलं ना, ते सगळं खोटं आहे. मला कुणी फसवलेलं नाही. तशा कुणावरही मी कधी प्रेम-प्रेम केलेलं नाही. मी उगाचच वेड्यासारखं काहीतरी तुम्हाला सांगितलं."
 तिचं हे बोलणं ऐकून मला विलक्षण धक्का बसला. मी ओरडून विचारलं, "तू हे काय बडबडते आहेस?"
 "बडबडत नाही. खरंच! ते सगळं खोटं आहे. साफ खोटं."
 माझं डोकं ते ऐकून फिरून गेलं. संतापून मी विचारलं, “पण का? तू मला खोटं का सांगितलंस?"
 ती अडखळत उत्तरली, "मला-मला खरं-खरं बोलायचं धाडस झालं नाही."
 "खरं?-खरं काय?"
 माझ्या या अवतारानं ती भांबावली; आणि मग पुन्हा अडखळत म्हणाली, "मी तुमच्यावर तुमच्यावरच-अगदी तुमच्या ओळखीच्या आधीपासून-आधीपासूनच प्रेम..."
 मी हे काय ऐकत होतो? सुमित्रा गोखलेच्या प्रेमभंगाची कथाच खोटी होती? तिचं दुःखच खोटं होतं? तिच्या वेदनाच तकलुपी होत्या? तिच्या स्वरातला भावनांचा आवेगच उसना, कृत्रिम होता? आपल्या भावना उघड बोलून न दाखवता तिनं त्यांना खोटं नाटकी रूप दिलं होतं?
 मला काहीच समजेनासं झालं. मी गोंधळलो; भांबावून गेलो. जागच्या जागी थिजून उभा राहिलो. सुमित्रा गोखले आपल्या कृत्रिम भावनाप्रवाहात मला फरपटत कुठं तरी ओढून नेत आहेसं मला वाटू लागलं. तिच्या खोट्या कथेची जाणीव मला गुदमरून टाकू लागली. आणि पाहता पाहता माझ्या मनाची एकदम उलटी क्रिया सुरू झाली. तिच्याविषयी गेले दोन दिवस अकस्मात आलेली सहानुभूतीची लाट तितक्याच गतीनं मागं फिरली; विरून जाऊ लागली. गेले दोन दिवस तिच्याविषयी संचारलेला जिव्हाळाही क्षणार्धात ओसरून जाऊ लागला. गेले दोन दिवस संचारलेला आवेशही एकाएकी संपून गेला. भावना पूर्णपणे थंडावल्या. मन ओकं ओकं झालं. सुमित्रा गोखले मला पुन्हा पहिल्यासारखी परकी वाटू लागली. हाताच्या अंतरावर दोन्ही हातांनी तोंड झाकून बसलेली सुमित्रा गोखले, त्या दिवशी साहित्यसमारंभात दाटीवाटीनं बसलेल्या अनेक श्रोत्यांपैकीच एक वाटू लागली. कोरड्या, शुष्क स्वरात आणि निर्विकारपणे मी तिला म्हणालो, “हे कसं शक्य आहे सुमित्रा? कसं शक्य आहे?"