रुणझुणत्या पाखरा/हे स्वरांनो गंध व्हा रे
सुस्नात पहाट नेहमीच बहरत राहते. मग ती पहिल्यावहिल्या अनोख्या मनोमीलनाची असो, अवघ्या देहातून धुंद स्पर्शगंध लहरवत जाणारी असो किंवा जीवनात हाती येणाऱ्या पहिल्या यशाची असो. ती पहाट जीवनभर अखेरच्या क्षणापर्यंत दरवळत राहते अंगा अंगातून तनामनातून.
आणि जीवनाची पहाट म्हणजे प्रत्येकाचं घुंगुरवाळं बालपण. माथ्यावर मायेचा, खात्यापित्या घरांचा कुटुंबवत्सल हात असावा. स्वप्नांची क्षितिजे मनात पेरणारे, ध्येयाचे कवडसे दाखवून त्यातले आवडते कवडसे हाती कसे धरावेत, तसेच त्यांच्या शोधाची दिशा दाखवणारे शिक्षक... पालक भवताली असावेत. मग ही जीवनाची पहाट अलगदपणे हाती येते. पण अशी पहाट किती जणांच्या वाट्याला येते..?
कचराकुंडीतील कागद वेचणारी, हॉटेलमध्ये वा दुसऱ्याच्या घरी काम करणारी छोटी मुलेमुली यांच्या जीवनातही घुंगुरवाळं बालपण येतं. पण हाती येत नाही. मनात ओढ आणि काहीतरी हरविल्याची खंत जागवीत ते दुरून निघून जातं. शाळेची दारे शासनाने सताड उघडी ठेवली तरी, पोटातली भूक आणि घरातले अठराविश्वे दारिद्र्य त्यांना शाळेपासून दूरच ठेवते. बालमनात प्रश्न सतत उगवत असतात. पानांचा रंग हिरवाच का? प्रत्येक झाडांच्या पानांची हिरवाई वेगळी. काहीवर पिवळट छटा तर काहींचा रंग तांबूसपणाकडे झुकणारा आकारही वेगवेगळे. आमच्या घराजवळ मारुतीचे देऊळ होते. पिंपळ वृक्षाचा मधोमध आधार देऊन रचलेले. शाळेत जाताना ते दिसलेकी. मग आपोआप हात जोडले जात. त्यावर नव्याने झुलणारी, कोवळी... गुलबट... रेशमी पाने दिसत. दवाखान्यात नुकत्याच जन्मलेल्या बाळांसारखा कोवळा गुलाबी रंग... आपण जन्मलो तेव्हा आपलाही रंग असाच असणार. मग तो का आणि कसा बदलला? असे हजारो प्रश्न माझ्याही मनात उगवत. या प्रश्नांची उत्तरे शाळेत गेल्यावर शिक्षकांच्या सहवासातून सापडतात. अर्थात त्यासाठीही ध्यास घ्यावा लागतो. शाळेत न जाणाऱ्या मुलांच्या मनातही असे प्रश्न उगवत असतील. पण उत्तर कोण देणार? आज काल अशा मुलांसाठीही चार तासांची शाळा चालविण्याचा प्रकल्प एनजीओ... अशासकीय संस्थांना दिला जातो. माझ्या रोजच्या रस्त्यावर अशी शाळा आहे. ११-१२ वाजता ही मुले बाहेर खेळताना दिसतात. मग गुरुजी आले की काय शिकवतात? काल काय शिकवलं? तुला चित्र काढायला आवडतं का रे? शाळेत गुरुजी कोणते खेळ शिकवतात? चौथीची किंवा सातवीची परीक्षा देणार का? मग पुढे काय ? शाळेत एखाद्या ताई शिकवतात कारे?... मी नेहमीच त्यांच्याशी गप्पा मारत असते. "आजी मला चित्र काढाया लई आवडतं. पण कागद, पेणशील कोण देणार?"
"मला शिणमातली गाणी छान म्हंता येतात. मी कामाला जाते ना तिथं त्या चित्रांच्या पेटीत... टीवीत लहान पोरंबी छान गानी म्हंताना मी पाहिलीत.
...गानं म्हनल की माय गांगते.". कधी मधी माझ्या मास्तरांशीही गप्पा "भाऊ शाळेत किती लेकरं?" माझा प्रश्न. "हायता की पंचेचाळीस. पटावर" गुरुजींचे उत्तर.
'पण दिसतात सतरा-अठराच." मी "व्हय बावीस लेकरं ऊस तोडायला गेलीत मायबापासोबत.' 'पण मग शासनाकडून पैसे मिळतात ४५ जणांचे. ते...?"
ताई आमी पगारी नोकर पंधराशे रुपये मोजून घेतो. दुसरीकडे तर सहासातशेच मिळतात. ही संस्था नेकीची हाय. बाकीच्या बाबतीत आमी कशाला नाक
खुपसावं?..." तर हे असं गुरुजीचं उत्तर...
जीवनात योणाऱ्या भवतालच्या माणसांची, आकाशातल्या चांदण्या... उगवता सूर्य... चंद्र, भवतालची हिरवाई, हिमालयाची बर्फाळ शिखरे, वळणे घेताना पोटात पेटका आणणारे अरुंद रस्ते, बेभान वाहणाऱ्या नद्या, उसळते सागर... अशा अनेकांशी संवाद साधण्याचे वेड तरुणाईत अनेकांना लागते. त्यातलीच एक मीही. हे वेड सांभाळता सांभाळता संध्याकाळ कधी होते ते कळत नाही. हे संवाद जणू कोमल.. शुद्ध... तीव्र... अनवट... वादी, संवादी स्वरच. कळत नकळत शब्द... अक्षरातून ते सुर वाहू लागतात. मग वाढती सांजवेळही सूरमयी बनून जाते. स्वरांचे गंधकोष होतात. संवादाचा अखेरचा स्वर आळवताना म्हणावेसे वाटते,
तनमनातून लहरणारे, हे स्वरांनो गंध व्हारे...
□