रुणझुणत्या पाखरा/थंडी, थंडी ...थंडी

विकिस्रोत कडून

 थंडीची कुडकुडणारी लाट वर्षा-दोन वर्षांनी येतच असते आणि खरे तर आपण मध्यमवर्गीय माणसे तिची वाट पाहतोच. बे एकम् बेच्या पाढ्याच्या तालावर जगणाऱ्या माणसांना हा बदल खूप हवासा वाटतो. खरेतर आश्विन पुनवेला शेकोटी पेटवून गप्पाष्टकांचा डाव मांडायला सुरुवात होते. पण अलीकडे कोजागिरी, दिवाळीचे पहिले पाणी बिनाथंडीतच जातात.
 'दिवाळी संपली. तुळशीचं लगीन हाकेवर आलंय. पण थंडी पळाली की!' 'यंदा शेकोटीची मजा लुटायला मिळणार की नाही?' असे संवाद ऐकू येत आहेत, तोवर थंडीबाई दारात येऊन शीळ घालतात आणि दृष्टी सृष्टीचा नूर बदलून टाकतात. कधी पूर्वेच्या बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ थैमान घालते, तर कधी दक्षिणेकडच्या हिंदी महासागरावर वादळे घोंगावतात. एकूण काय थंडीची लाट येतेच. रस्त्यावर, घरासमोर, बंगले-वाडे यांच्या पटांगणात, मोकळ्या जागेवर शेकोट्या पेटायला लागतात. हूहूहू हात शेकत गप्पांचे डाव, आठवणींच्या भेंड्यातही तरंगायला लागतात आणि थंडीची रंगत वाढत जाते.
 थंडी प्रेमीजनांची, नवविवाहितांची विशेष लाडकी.

थंडगार ही हवा
जवळ तू हवा हवा
थंडगार ही हवा ।

 एकमेकांच्या मिठीत विवाहाची बंधने अधिक घट्ट होत जातात. एकमेकांची खरी ओळख पटत जाते. शेकोट्यांच्या साक्षीने काही जण प्रेमाच्या नाजूक बंधनात अडकून जीवनसाथी बनतात, तर काहींची नाजूक बंधने संथ तळ्यात खडा टाकल्यावर कसे तरंग उठतात तशी क्षणिक ठरतात. तरीही ती अधमुऱ्या तरुणाईतल्या पहिल्यावहिल्या प्रीतीची आठवण असते... कधी बाबा आमट्यांच्या हेमलकसा... आनंदवनाच्या छावणीत पेटवलेली शेकोटी. भारतातून एकत्र आलेली तरुणाई. गप्पा गाण्यांची मैफल. तीही अर्ध्याकच्च्या हिंदीतली. एखादी मऱ्हाटी सावळी देखणी बाला नि काश्मीरमधला उंचपुचरा लालबुंद गोरा, सडसडीत कॉलेजकुमार नेत्र पल्लवी. मग शब्दांची देवघेव 'अरि ये थंडी तो हमारे कश्मीरमे चौबीस घंटे रहेती है। आईये हमारे यहाँ । रंग बिरंगे फूलोंकी... गुलाबोंकी घाटी हैं।'
 'बुलाओ तो सही. आयेंगे ना!'
 हां जरुर. आओगी तो वापस जाना मुश्कील होगा'
 मग उत्तराऐवजी लाजून खाली पाहून हसणे. तर कधी आंतरविद्यापीठ एन. एस. एस. शिबीरे. तीही डिसेंबर - जानेवारीच्या मुहूर्तावरची. तिथेही ज्वालांनी लहरणाऱ्या शेकोट्या आणि त्यांच्या साक्षीने फुलणारी प्रीतीची फुले.
 ..अशा फुलांच्या आता फक्त आठवणी. २५-३० वर्षे उलटून गेलेली. पण थंडीतली शेकोटी पेटली की, पांढऱ्या केसांच्या मनातही काळाआड लोपलेल्या खुणा... काही तृप्तीच्या तर काही निसटलेल्या क्षणांच्या, जाग्या होतातच!
 आताही थंडीची लाट अंगावर कोसळते आहे. अशा वेळी महाविद्यालयात असताना मनात ठसलेली गाणी आठवतातच. आणि गाणी गाणारा आवाज तबकडीत बंद करुन त्यांना चिरतारुण्याचा वसा देणारा शास्त्रज्ञ थोरच. तर ओठावर ओळी आल्याच

ठंडी ठंडी हवा
पूँछे उनका पता
याद आये सखी री,
तो झूमे बता
ठंडी ठंडी हवा ऽऽ

 आठवणींमध्येही हवीशी ऊब असतेच. कधीच न कोमेजणारी. थंडीच्या दिवसांतच दुपारी भरणाऱ्या शाळा सकाळच्या होतात. आहे ना ताप ? सकाळच्या साडेसहा सातच्या थंडीत ते मित्र शाळेत निघालेले. शाळेच्या ड्रेसमध्ये... अर्धी निळी पॅट आणि अर्ध्या बाह्यांचा पांढरा शर्ट. त्यात कुडकुडत स्लिपर घालून चालणारे तीन जण आणि एक मात्र पायात बूट. ड्रेसवर घातलेला लांब बाह्यांचा लोकरीचा स्वेटर, डोक्याला गरम टोपी आणि गळ्यात आईने विणलेला मफलर... असा एखादाच !
 ... आता ऊस गाळपाचा हंगामही सुरू झालाय. आमच्या गावाच्या आसपास अनेक साखर कारखाने, एक दिवस सकाळी फिरून येत असताना काही बैलगाड्या दिसल्या. त्यात दोन-तीन लेकरं, त्यांची माय, गाडी हाकणारा बाप, सहा-सात वर्षांची पोर तान्हं लेकरू जोजवीत गाडीत बसलेली. माय गाठोडीत चाचपीत शोधाशोध करणारी. थंडीत काकडणारं पोरगं डोळ्यासमोर पुस्तक घेऊन बसलेलं...
 काही दिवसांपूर्वी गावाकडे गेलो होतो. वाटेत साखर कारखाना लागला. तिथेही झोपड्या टाकलेल्या मजुरांच्या जोड्या कारखान्यावर कामाला येतात त्यांच्या एकच नवी आणि चांगली गोष्ट या दोन वर्षांत जाणवतेय.
 कारखान्याच्या आवारात पोरांसाठी साखरशाळा. पहिली ते सातवीच्या मुलांना शिकविणारे शिक्षक. शाळेला लागून अंगणवाडी. मुलींच्या कडेवरची लेकरं अंगणवाडीत आणि पोरी उत्साहाने शाळेत. या साखरशाळा स्वयंसेवी संस्था चालवीत असल्याने तिथले शिक्षक वेळेवर येतात. मन लावून शिकवतात. शिवाय काळा गुंडाळीफळा, रंगीत, पांढरे खडू, हजेरी पुस्तक, मधला खाऊ तोही पोटभर, वगैरे वगैरे. एकूण चांऽऽगभलंऽऽ. तर,

थंड थंड थंडी, वाजवाज वाजली
ओठांची बोबडी घशात अडकली...