रुणझुणत्या पाखरा/सुभगा सावित्री

विकिस्रोत कडून



 "थांबा. यशवंता तू जातीचा नाहीस. तू एका विधवेला बळजबरीतून झालेली नीच अवलाद आहेस. जोतीरावांनी तुला दत्तक घेतले म्हणून काय झाले? जातीच्या माणसानेच त्यांच्या प्रेतासमोरचे मडके हाती घेतले पाहिजे. चला मंडळींनो परत..." तो प्रौढ गृहस्थ गडगडाट करीत बोलला.
 "थांबा" असे म्हणत ती स्त्री पुढे आली.
 'मी तर आहे ना तुमच्या जातीची? मी घेते ते मडके हाती आणि माझ्याच पतीच्या अर्थीपुढे...अंत्ययात्रेत पुढे रहाते..' ती नऊवारी लुगडे गुंडाळलेली मुलगी पुढे आली आणि तिने सुतळीने बांधलेले ते मडके हातात घेतले...
 एक विचित्र सुन्नता. इतक्यात एक कन्या उभी राहिली आणि तिने प्रश्न केला.
 'मॅडम, आपलं पथनाट्य उठावदार व्हावं म्हणून तर हा प्रसंग त्यात घुसडला नाही ना?'
 प्रश्न मला नक्कीच बोचला आणि आवडला. "बेटा जी व्यक्ती प्रत्यक्ष जगून गेली, अशा आगळ्यावेगळ्या व्यक्तीच्या चरित्रात घुसडपट्टी केली तर प्रेक्षक.. वाचक सहन करतील?.. पण हे असत्य का वाटते तुम्हाला? आपण एकविसाव्या शतकात जगतोय, म्हणून ते असत्य वाटतेय," मला मध्येच अडवीत दुसरी कन्या बोलू लागली.  "..म्हणून तर! मॅडम २१ व्या शतकातही जाती बाहेरच्या मुलावर प्रेम केलं म्हणून मुलगी मारली जाते.. एखादी मुलगी आपल्याशी लग्न करायला नकार देते म्हणून तिच्या अंगावर ॲसिड फेकून तिला विद्रुप केले जाते..
 "हो आमच्या गावातल्या जेमतेम चौदा वर्षाच्या मुलीचे लग्न करून दिले. बिचारी आठवीत होती. हुशार होती. लग्न लवकर का? तर मुलगा मुंबईत नोकरीला आहे, कुठल्याशा कंपनीत. नि त्याला महिना पाच हजार रुपये पगार आहे.. पण मॅडम दीडवर्षात तो एडस् ने मेला नि ती मुलगी आली माघारी, आता तर फार वाईट अवस्था आहे तिची. तिला घरात घेत नाहीत. शिळे तुकडे खायला देतात. एडस् बद्दल धड माहिती कोणालाच नाही मग यात त्या मुलीचा काय दोष?" तिसरीचा प्रश्न. लगेच चवथीने खंत बोलून दाखवली.
 "दीडशे वर्षांपूर्वी ज्योतिबांनी आपल्या आईवडिलांना स्पष्टपणे सांगितले होते की मूल न होणे हा केवळ पत्नीचा दोष नसतो. पुरूषातही दोष असू शकतो. सावित्रीत जर दोष आढळला तर मी जरूर दुसरा विवाह करीन पण माझ्यात दोष आढळला तर सावित्रीचा दुसरा विवाह करून देण्याचे वचन..आश्वासन मला द्याल? खरंच! हे जेव्हा वाचतो, ऐकतो तेव्हा वाटतं ज्योतीराव आणि सावित्रीबाई एकविसाव्या नव्हे तर एकतिसाव्या शतकात जगत होते..." "हो ना. आणि आपण? आपले विचार, आपली जगण्याची रित.. सगळेच सतराव्या शतकातले. आपल्या मेंदूचे कंडिशनिंग कोणी केलेय? धर्मानी की जातीपातीच्या जख्खड परंपरांनी?" आणखी एकीची खंत.
 ...गेल्यावर्षीची ही हकीकत. तीन जानेवारी हा क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा जन्मदिवस. त्या निमित्ताने पथनाट्य बसवले जात होते. गाव तसे तालुक्याचेच. पण आडवळणाचे. जीवनविषयक तंत्रशिक्षण देणारे मुलींचे गृहविज्ञान महाविद्यालय, जेमतेम शंभर मुलींचे. त्यावेळची ही चर्चा.
 ते संवाद ऐकून मीच नाही तर नोकरी आणि भाकरीच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या आम्ही पाच सहा जणी खूप अंतर्मुख आणि अस्वस्थ झालो.
 आणि माझ्या मनात दहा बारावर्षापूर्वीचा तो प्रसंग जागा झाला. ते सुशिक्षित मध्यमवर्गीय घर. गृहस्थ वकील. सुसंस्कृत. प्रगत आणि प्रगल्भ विचारांचे. अचानक पोटाचा विकार जडला. मग डॉक्टर्स.. तपासण्या वगैरे. तो आजार जीव घेणाऱ्या कॅन्सरचा ठरला. सद्गृहस्थांनी हे सत्य पचवले. त्यांची आज सुविद्य असणारी पत्नी विवाहाचे वेळी जेमतेम आठवी-नववी उत्तीर्ण होती. परंतु पतीच्या प्रोत्साहनाने त्या पदवीधर झाल्या. मुले शिकली. जणू पाचही बोटे तुपात. त्यात हे नवे संकट. पण वकीलसाहेबांनी अत्यंत हळुवारपणे आणि जीव लावून ते सत्य पत्नीला स्वीकारण्याचे धाडस दिले. आणि वचन घेतले. मृत्यू हा प्रत्येकाचा साथी आहे. आज मी उद्या तू. पण आपल्या जीवनात आपले जे भावबंध जुळले तीच आपल्या दोघांची खरी संपत्ती. 'मी नसलो तरी मी तुझ्या मनात असणारच. आपल्या नातवंडांतून असणार.. मी गीतेचा सेवक. माझ्या शेवटच्या क्षणी तुझ्या ओठातून बहरणाऱ्या गीतेच श्लोक ऐकत मला शेवटचा श्वास घ्यायचाय..मी तुझ्यात आहेच. परंपरेने स्वीकारलेले सौभाग्यलेणे केवळ माझ्या असण्याची खूण नाही. तू माझे जीवन फुलवलेस, मला भाग्यवान केलेस. तू माझी सुभगा आहेस. तू सौभाग्य लेणे उतरवायचे नाहीस. ते तुझे आणि माझे सौभाग्य आहे. आपल्या कुटुंबाला भाग्य देणारे तुझे कपाळ पांढरे राहणार नाही. सर्व सौभाग्यलेणी तू उतरवणार नाही असे आश्वासन मला दे..'
 वकीलसाहेबांना दिलेले आश्वासन त्यांच्या सखीने पाळले.
 अगदी परवा त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. कुंकवाने रेखलेले सुभग कपाळ, पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र अशी ती सुभगा नातवाला खेळवीत अंगणात स्वागताला उभी होती...माझे स्वागत तिनेच केले. संध्याकाळी परत निघाले. "बाई, देवघरातली समई चेतवना ना?' सुनेने हाक दिली. मराठवाड्यात राजस्थानी कुटुंबात आईला 'बाई' म्हणतात.
 त्यांनी निघताना मला कुंकू लावले. खणानारळाने माझी ओटी भरली. ती सुभगा सावित्री नेहमीच मनात उगवलेली असेल.