रुणझुणत्या पाखरा/'वॉटर' आणि
निरागसतेच्या कोमल झाडाला आलेले ते गोंडस फूल. त्या फुलांचे नावं आहे छुंईया. आपल्याला त्या फुलाचे दर्शन उरात ठसून आठवते, ते त्याच्या डोक्यावरचे काळेभोर केस कापताना. हजामाचा वस्तरा त्या निरागस लेकराच्या डोक्यावरून फिरतोय. कारण सात वर्षांची छुंईया विधवा 'विगतः धवः' भाग्यहिन आहे. तिचे दर्शनही पापाचा शिडकावा करणारे आहे. पण तिचे डोळे? अम्माचा ...आईचा शोध घेणारे. गंगेकाठच्या विधवाश्रमात सोडून जाणाऱ्या वडिलांना तिच्या जगण्याचा, अस्तित्वाचा अर्थ विचारणारे. अत्यंत निरामय, कोवळी नजर पांढऱ्या वस्त्रात आकंठ लपेटलेला चिमणा देह. तो भवतालच्या माणसांना वाहत्या गंगेला काहीतरी विचारतो आहे. त्या आश्रमात भवताली शुभ्र, एकवस्त्रांकिता विधवा आहेत. विविध वयाच्या, विविध आकाराच्या, विविध आवाजाच्या, विविध नजरेच्या. स्वत:च्या आशा आकांक्षा, इच्छा, राग, लोभ, द्वेष... सारे पांढऱ्या वस्त्रात बांधून श्वास मोजून जगणाऱ्या. त्यात एक ऐंशीचा घाट पार केलेली वृद्धा. बुंदीच्या लाडूसाठी तरसणारी. तो मिळताच कायमचे डोळे मिटणारी. अर्थात हा लाडू देण्याचे धाडस छुंईयाच करणार.
'सप्तवर्षात् भवेत् कन्या' अशी छुंईया आश्रमात येते आणि सगळ्यांच्या एकसुरी जगण्यावर एक कोमल रंग चढतो. त्या आश्रमाची प्रमुख ढोलमटोल मधुमती. छुंईयाला अम्माकडे जायचेय. तिला पकडून आणायला सांगणाऱ्या मधुमिताला ती दुधाच्या दातांनी कडकडून चावते. कौतुकाची तृप्त लहर इतर सगळ्या विधवांच्या चेहेऱ्यावर. कल्याणी, मुलामय आरसपानी कांतीची लख्ख गौरांगना देखणी कल्याणी. तिचे काळेभोर केस मात्र वाढलेले. शेठकडे पाठवून आश्रमाचा खर्च भागवण्याचे मधुमिताने शोधलेले माध्यम. मनाने मलीन न झालेली अनाघ्रात अशी कल्याणी, छुंईयावर सतत पाखर घालणाऱ्या दोन पक्षिणी. कल्याणी आणि शकुंतला दिदी. कल्याणीने स्वत:ची माया ममता बारक्या काळू कुत्र्यावर पांघरली आहे. छुंईया पण त्याच्यात रमते. रात्रंदिवस. एक दिवस ते छुंईयाच्या हातून निसटते नि रस्त्यावरून धावू लागते. मागे सुसाट धावणारी छुंईया. नारायण त्याला उचलतो तिथे धापा टाकत पोचलेली छुंईया. मागोमाग कल्याणी. नारायण गांधीजींच्या विचारांवर श्रद्धा असलेला तरूण वकील. श्रीमंत सेठचा एकुलता एक मुलगा. प्रथमदर्शनीच कल्याणीच्या प्रेमात खोल बुडालेला. छुंईया बद्दल आस्था, करूणा.
निरभ्र मनाचा नारायण आईला विधवेशी लग्न करणार असल्याचे सांगतो. कल्याणीला घरी घेऊन जायला येतो. कल्याणीच्या विवाहाचे लाडू, पुरी खाण्याची स्वप्ने पहाणारी छुंइया, कल्याणीच्या पुनर्विवाहाला मधुमिताचा विरोध. मधुमिता संतापाने तिचे केस कापते. तरीही इतर सर्वांच्या निःशब्द शुभेच्छा घेऊन कल्याणी नारायण बरोबर नावेत बसते. नारायण पल्याडच्या तीरावर असलेला त्याचा वाडा तिला दाखवतो. कल्याणी चमकते आणि दृढ शब्दात सांगते, नांव परत मागे फिरव.
...तो वाडा. ज्या सेठकडे मधुमिता कल्याणीला रात्री पाठवीत असते. त्या सेठचा असतो. आणि जगण्याचा अर्थ हरवलेली कल्याणी एक दिवस गंगेत नाहीशी होते. मधुमिताशी खिडकीतून गप्पा मारणारा, तेथील सुंदर विधवांना रात्रीचा शेठ शोधून देणारा एक 'तृतीय-पुरूषी'. मधुमिता छुंईयाला त्याच्या बरोबर सेठकडे पाठवते. परंतु पांखर घालणारी दुसरी पक्षिणी हा डाव उधळते. छुंइयाला कडेवर घेऊन पळत सुटते. नारायणाला शोधणार कुठे नि कसे? पण अलोट गर्दी रेल्वेस्टेशनकडे धावणारी. महात्मा गांधीजी रेल्वेतून जातांना वाराणशीला दोन मिनिटे थांबून लोकांसमोर बोलणार असतात. तिथे गांधीभक्त नारायण नक्कीच असेल. पुन्हा छुंईयाला कडेवर घेऊन जीव समर्पून धावणे.
..गाडी सुटली आहे. दरवाजात नारायण. शकुंतला दिदी, चालत्या गाडीत छुंइयाला त्याच्या हातात देते. नारायणच्या डोळ्यातली आश्वासकता आणि छुंइयाचे तृप्त निरागस डोळे, शकुंतला दिदीला जगण्याचे अर्थ ...संदर्भ सापडल्याचा निरामय अनुभव. ...दिपा मेहेताचा 'वॉटर' हा चित्रपट बघायला मिळणे एक अस्वस्थ अनुभव. कल्याणीच्या पुनर्विवाहाला नाकारणाऱ्या मधुमिताच्या पोटऱ्या, पायांनी चेपतानां तिच्या अंगावर दणादणा नाचून...तुडवून छुंईयाने व्यक्त केलेला संताप. होळीच्या वेळी छुंईयाला कृष्ण बनवून विधवा आश्रमात एकमेकींच्या अंगावर गुलाल उधळून साजरी केलेली रंगपंचमी. सारेच न विसरता येणारे अनुभव.
आम्ही राष्ट्रीय आणि महाराष्ट्र प्राधिकरणाच्या वतीने यावर्षी मार्च मध्ये परित्यक्ता व एकाकी महिलांचे संमेलन घ्यायचे ठरवले. विधवा हा शब्द का वापरायचा? ती स्त्री मुलांना अन्न, शिक्षण देण्यासाठी, त्यासाठी अर्थार्जन करण्यासाठी दहा दिशा धुंडाळते. तिला भाग्यहीन का म्हणायचे? म्हणून आम्ही 'एकाकी' हा शब्द योजिला. त्यांचे दैनंदिन जगण्याचे आर्थिक, सामाजिक प्रश्न जाणण्यासाठी सर्वेक्षण पत्रिका तयार केली. वाटले होते ३००/३५० महिला येतील. आठशेच्या आसपास आकडा गेला. जिलब्या, मसालेभात खातानाची धडपड, चढाओढ..! परित्यक्तांपेक्षा एकाकी, निराधार जीवन जगणाऱ्या विधवांची संख्या जास्त, वॉटर पहातांना मला त्या परिषदेचा अनुभव आठवला.
... 'वॉटर'च्या चित्रीकरणाला विरोध झाला. मग पात्रं बदलली. श्रीलंकेत तो चित्रित झाला. आमच्या धर्माने समाजाच्या अंगावर केलेल्या खोल जखमा आम्ही किती दिवस झाकून पाकून ठेवणार? आमचा धर्म.. जो जन्माने दिला, मग तो कोणताही असो, निरोगी, करण्याची बांधिलकी त्या धर्माचे म्हणून आपण स्वीकारायला नको? आपले घर आपणच झाडून स्वच्छ ठेवायला हवे ना?
□