रुणझुणत्या पाखरा/भूमीकन्या भंवरीबाई

विकिस्रोत कडून



 भंवरीबाई त्यावेळी वर्तमानपत्रांच्या मथळ्यांतून केवळ भारतभरच नव्हे तर भारताबाहेर जाऊन पोचली होती. भंवरीबाई जयपूर परिसरातली. एक हुशार आणि धाडसी, शिक्षण नसलेली कुंभारीण. चाकोरीतलं अ..आ..ई.., १,२,३ असं शिक्षण नसले तरी सामान्य व्यक्तीजवळ नव्या उजळत्या प्रकाशाची किरणे हवेतून सर्वांपर्यंत पोचतातच. भोवतालच्या गप्पा, चर्चा, बातम्या यांतून अडाणी मानली जाणारी व्यक्तीपण खूप काही शिकते. महिलांच्या सर्वांगीण विकासाचे काम १९७५ पासून जागतिक पातळीवर सुरू झाले. १९८४-८५ पासून त्याला वेग आला. काम तळागाळापासून सुरू केले तर ते सर्वांपर्यंत पसरते याचे भान शासनाला आले. राजस्थानात शासनाने 'साथिन' हे पद ग्रामीण परिसरातील महिलांच्यात सर्वांगीण महिला विकास व्हावा या हेतूने निर्माण केले. भंवरी जयपूर जवळच्या खेड्यात साथिन म्हणून काम करू लागली. घरोघरी जाऊन मुलींना शाळेत घालण्यासाठी आई, आजीशी संवाद करीत असे. मुलगी वयात आली, की नैसर्गिक बदल होतात. पण ती लग्नाला योग्य होत नाही. आपण मातीची कुंडी बनवतो तिला आकार देतो. पण ती सर्वांगानी भाजल्या शिवाय परिपूर्ण बनत नाही. तिच्यात माती, पाणी घालून रोप लावता येत नाही. ती कच्ची राहिली तर कुंडीच मोडून विरघळून जाते. पोर तेरा चौदाची असेल नि बापानी लगिन लावले तर गर्भाशयात बीज रूजत नाही. अपकार होतात. त्यात मुलीची शक्ती जाते. तिला वेगवेगळे आजार होतात. पोरीला शिकवा. असे ती सांगे. बाईला मारहाण करू नका, दारू पिऊ नका सांगे. महिलांची मंडळे तिने तयार केली.

बहेना चेत सको तो चेत
जमानो आयो चेतन को...
तू खुदको बदल, तू खुदको बदल
लबही तो जमाना बदलेगा...

 यासारखी अर्थपूर्ण गाणी खड्या सुरेल आवाजात गाऊन ती महिलांना एकत्र आणी. तीज, गणगोर, शिळासात या सारख्या पारंपारिक उत्सवांना महिलांना जमवून नवे विचार सांगणारी नवी गाणी सांगे. स्त्रियांच्यात भंवरीबाई लाडकी साथीन् बनली. पण गावातल्या पुरूषांच्या डोळ्यांना ती काट्यागत खुपू लागली. घरातल्या स्त्रिया नवऱ्याच्या दारू पिण्याला विरोध करू लागल्या. दहा बारा वर्षाच्या लेकीचा 'ब्याव'.. लगिन करायला, प्रौढ पुरूषासोबत बालिकेचा विवाह करायला नकार देऊ लागल्या. स्त्रियांचे जागे होणे, नव्या विचारांनी चालणे हे पुरूषांना खपेना. आणि एक दिवस नको ती वेळ गाठून भंवरीवर गावातील पुरूषांच्या बहकाव्यात येऊन काही गुंडानी सामूहिक बलात्कार केला. भंवरी काही अठरा..वीस..तीसची तरूणी नव्हती. ती जाणत्या लेकरांची माय होती. प्रौढा होती. राजस्थानातल्या महिला संघटना, अरूणा रॉय सारख्या कार्यकर्त्या, काही सुजाण पुरूष कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था यांच्या सह अनेक लहान गावा मोहल्ल्यातल्या महिला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. "ज्या राज्याच्या सर्वोच्च न्यायालयात 'न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति' असे म्हणणाऱ्या तत्वज्ञाचा(?) पुतळा उभा असतो ते राज्य भवरीला काय न्याय देणार?" अशी कठोर टीका महिलांनी केली. ती भंवरीबाई १९९५ च्या बिजींगच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत अगदी जवळून अनुभवायला, मिळाली. संवाद झाला. आणि माझ्या मनात ओळी भंवरल्या..

त्या विभोर सांयकाळी
कृष्णतुळशीच्या रंगातून
मिणमिणत्या पहाट डोळ्यांतून
अंगभर जाणवलीस
तनामनात भंवरलीस
आणि बीजींगची वाट कशी
पायाखाली आल्यागत वाटली.
मीरेच्या पायात रूतणारी वाळू
तुझ्याही पायाखाली. विषाचा पेला तोच.
फक्त समोर ठेवणारे चेहरे वेगळे..

 मीरेला वाटलं होत की 'धीरज का घागरा' नि 'सच की ओढणी' पहेनल्यावर तरी तो देश,.. जिथे स्त्रीच्या भावना, वेदना 'माणूस' या नात्याने जाणल्या जातील, तो सापडेल. पण..!! आज अनेकजणी माणुसकीहीन परंपरा, स्त्रियांना पायदळी तुडवणारे रीतीरिवाज, अंधश्रद्धा यांनी रचलेले उंच उंच गड उतरून जमिनीवर पाय ठेवीत आहेत. पायात रूतणारे काटे काढून नव्या वाटा धांडोळत आहेत.
 ...मार्च आला की महिला दिनाच्या निमित्ताने भंवरीबाई आठवतेच. मध्यतरी कोलकत्याला महिलांचा राष्ट्रीय पातळीवरचा मेळावा झाला होता तिथे भंवरी आली होती. मी भंवरीची आठवण काढताच सुनिताने लगेच माहिती दिली.
 "भाभी, भंवरी कोलकत्याला भेटली होती. तिने साथिन् ची संघटना बांधली आहे. तिचा पोषाख, तो घागरा... डोळ्यातली चमक, माथ्यावरचे बोर, ओढणी अगदी आहे तसेच आहे..."
 अशावेळी मन उद्याच्या आशांनी लखलखून जाते. ओठावर ओळी येतात
माझ्या कातडीचे लिलाव
चौरस्त्यात मांडलेस
वयाचे हिशेब मांडित.
आणि तरीही
सात जन्मांचे वायदे स्मरून
तुझ्याच अंगणात बहरले
तुळस होऊन.
व्यास महर्षीची
आर्द्र हाक
जागी होतेय मनात.
हे भाविनी, हे अग्निकन्ये, हे मनस्विनी !!!
आणि दगडी वृंदावनाचे चिरे फोडून
पुन्हा एकदा जन्माला येतेय
भूमीकन्या सीता
नवे रामायण लिहिण्यासाठी...