Jump to content

रुणझुणत्या पाखरा/आम्ही बाया

विकिस्रोत कडून

 दुपारचे दोन वाजले की ती जिना उतरून खाली येणारच. रोज चार पाच जण सही घेण्यासाठी आलेलेच असत. एखादी वृद्धा. मुलांना तिच्या नावची संपत्ती हवी असे. मुले तिला घेऊन येत. तिच्या संमतीपत्रावर त्या बाईंची सही असे. पण बाई सगळी सविस्तर चौकशी केल्याशिवाय सही देत नसत. कुण्या आसन्नमरण व्यक्तीची साक्ष नोंदवायला तिला जावे लागे. ती तांगा वा मोटारीची अपेक्षा न करता घरापर्यंत पायी जाऊन, त्या व्यक्तीला दिलासा देणाऱ्या गोष्टी बोलून सही करी. तिला त्या लहानशा जिल्ह्याच्या गावचे लोक बाई म्हणत. घर समतावादी. ओळखीच्यांना थेटवर प्रवेश असे. बाईच्या या मधाळ स्वभावामुळे गावातल्या सर्व जाती जमातीच्या बाया स्वत:चे दुःख मोकळं करायला बाईकडे येत. दुःख कोणतं? नवरा दारू पितो.. बेदम मारतो. सासू कोंडून घालते.. उलथनं तापवून चटके देते.. जेवायला देत नाही.. नवऱ्याशी बोलू देत नाही. सासरा शिव्या घालतो., माहेरून पैसे, सोनं आण म्हणतो, दिराची नजर चांगली नाही.. जाऊ जाच करते. वगैरे..वगैरे..वगैरे.
 एक दिवस एक मध्यमवयीनबाई मोठमोठ्याने रडत आली. बरोबर दोन तीन बाया. आल्या आल्या डोक्यावरचा पदर काढून तिने पाठ दाखवली. पोलके फाटले होते. पाठीवर वेताचे सप सप वार केलेले. इंचभर जागा मोकळी नव्हती. घाव रक्ताळले होते...
 त्या बाई दोन शब्द गोड बोलण्या पलिकडे, नवऱ्याला समजावून सांगते, आणि चहा पाजण्या पलिकडे काय करणार होत्या ?...?
 'बाई हम औरतांका जीना धोबी के कुत्तो जैसा. न घरका ना घाटका. ऐसा क्यूं?.. प्रश्न करीत ती मार खाल्लेली महिला दिलाशाचा श्वास घेऊन निघून गेली.
 ...मी असेन तेव्हा ११/१२ वर्षांची. ऑनररी मॅजिस्ट्रेट बाई माझी आई होती. तो प्रसंग आजही चोपन्नवर्षानंतर जसाच्या तसा समोर येतो. त्या प्रसंगाने माझ्या अंतर्मनाची खिडकी खटकन उघडली गेली आणि 'हे असं का?' हा प्रश्न तिथे कायमचा तोरणासारखा टांगला.. कोरला गेला. नंतर देवलांची 'शारदा', ह.ना.आपट्यांची 'यमू' मनाचे पडदे गदगदा हलवून गेल्या. साने गुरूजींची सगळी पुस्तके अधमुऱ्या वयात हाती आली, त्यांनी गोळा केलेल्या स्त्री जीवनातील सुखं दुःख घरगुती भाषेत मांडणाऱ्या स्त्रीरचित ओव्यांनीही मन अस्वस्थ केले.

सासरचे बोल
तुझ्यासाठी गोड केले
स्त्रियांचा हा जन्म
रात्र ना दिवस
 कडू विषाचे ग प्याले
 मायबाई ।।
 नको घालू सख्या हरी
 परक्याची ताबेदारी
।।
 बहुदा त्या वयातच मनाची पाठराखण करणारा जीवनसाथी शोधण्याची ठिणगी मनात पेरली गेली असावी. आणि एका वेगळ्या वळणाची दिशा अस्फूटपणे मनाला दिसली असावी.
 देवीप्रसाद चटोपाध्यायांच्या 'लोकायत' या ग्रंथाचे वाचन करीत असतांना सर्व सामान्य लोकांनी अनुभवातून निर्माण केलेल्या, वास्तवाशी नाते जोडलेल्या इहवादी तत्वज्ञानाची ओळख झाली. एका नव्या खिडकीचे दार किलकिले होऊन समोर आले. चार्वाकाच्या 'ऋणं कृत्वा घृतं पिवेत्' चा विकृत अर्थ शाळेत असतांना सांगितला गेला होता. पण त्याचा नेमका संदर्भ, जो जीवनात श्रम.. कष्ट यांच्या आधाराने आर्थिक समृद्धीची दिशा दाखवतो, तो हाती आला. 'लोकायत' मधली 'गौरी' स्त्रीची स्वयंसिद्ध प्रतिमा घेऊन समोर आली. आणि व्यास महर्षींचे महाभारत वाचतांना स्त्रीची अत्यंत झळझळीत, अशी सतेज प्रतिमा हाती आली, द्रौपदींच्या रूपाने. द्रौपदीने भर दरबारात सिद्ध केले की, स्वत: द्यूतात हरलेल्या युधिष्ठिराला पत्नीला; मला पणाला लावण्याचा अधिकारच नाही. ती स्वत:च्या मनाने निर्णय घेत असे. ज्या अश्वत्थाम्याने तिची सर्व मुले मारली, त्या अश्वत्थाम्याच्या भळभळत्या चिरजखमेला शांतवण्यासाठी तिनेच त्यात तेल घालून दिलासा दिला. तिला व्यासांनी तीन विशेषणांनी गौरविले आहे. अग्नि कन्या, भाविनी आणि मन:स्विनी. अग्निसारखी तेजस्वी..स्पष्टवक्ती. दुसऱ्याच्या वेदना जाणणारी संवेदनशील भाविनी. आणि मनाचा कौल घेऊन कृती करणारी मनस्विनी.
 कोणत्याही विषयाच्या शोधयात्रेचा नाद लागला की त्यात व्यक्तीमनाचं अस्तित्व बुडून जातं. तसा नाद लागला. भारतीय जीवनप्रणालीत 'बाई' च्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा. मग गीता साने, आ.ह.साळुंके, पुष्पा भावे, गुरुवर्य प्रभाकर मांडे, स. रा. गाडगीळ अशा अनेकांच्या साक्षी. ग्रंथ.. प्रत्यक्ष चर्चा.. काळही बदलतच असतो.
 ..आणि १९९५ च्या बिजींगच्या जागतिक महिला परिषदेत इराणची ती सखी भेटली. भर उन्हात काळा बुरखा घालून फिरणारी. बरोबर पुरोगामी पुरूष होते. हसण्या इतपत ओळख झाली. आणि तिला एकटीला गाठून मी विचारलेच. खूप गोड हसून तिने उत्तर दिले.
 "जर मी हा बुरखा पांघरला नसता तर तुझी नी माझी.. एवढ्या महिलांची भेट झाली असती? आणि 'विमेन्स राईटस् आर ह्यूमन राईटस्' या घोषणेचे संदर्भ कळले असते? आपण कितीही दूर दूर असलो तरी हातात हात घट्ट धरून कडं करू या. बरोबरचे पुरूषही नव्या विचारांचे स्वागत करणारे प्रत्येक देशात, धर्मात आहेत. त्यांचे हात हाती घेतले तर जग आपल्याला 'माणूस.. स्वतंत्र परिपूर्ण व्यक्ती' म्हणून नक्कीच मान्यता देईल..."