रुणझुणत्या पाखरा/फुलता मळा सतत बहरत राहो

विकिस्रोत कडून
 १९६८-७२ च्या काळातले दिवस. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात मी नव्यानेच रुजू झाले होते. मी मराठी वाङ्मयाचे समीक्षक आणि चिकित्सक समीक्षेचे अभ्यासक वा. ल. कुलकर्णी, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. प्रभाकर मांडे, प्रा. पानतावणेसर यांचे तास... प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य, वा. ल. कुलकर्णीच्या सहृदयतेमुळे अडीच तीन महिने मला लाभले. लेखनाची आवड शाळेपासून होतीच. पण अर्थशास्त्र हा विषय इंग्रजीमधून घेऊन बहिस्थ विद्यार्थी म्हणून मार्गदर्शन मिळणे अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात शक्य नव्हते. अशावेळी माहेरी गेले असतांना माझ्या लेखनावर प्रेम करणारे प्रा. म. वि. फाटक यांनी मला बजावले "चुकलेलं कोकरु परत कळपात येऊ दे. मराठी विषयात एम. ए. कर. वा. लं. ना माझे नाव सांग." मग गाडी वळणावर आली १९६६ ला प्रथमवर्गात उत्तीर्ण झालेलो आम्ही तिघेच. आणि मी एकटी बहिस्थ. १९६८ च्या दिवाळी नंतर महाविद्यालयात शिकविण्याची संधी मिळाली. भरून आणलेले आषाढ धन. वर्षावायला आसुसलेले. तशीच मी. अवघे ज्ञान, अनुभवांना सोप्या शब्दात विद्यार्थ्यांवर बरसण्याची उमेद. वयही तरुणाईचं. आणि समोर अत्यन्त उत्सुक विद्यार्थी. भास्कर चंदनशिव, रामा मुळे सारखे. तेव्हा मराठी घेणारे विद्यार्थी बरेच असत. व्यावसायिक दृष्टिकोनातून भाषा विषयांकडे पाहण्याची नजर विद्यार्थ्यांच्यात आली नव्हती. हिंदी, मराठी आणि इंग्रजी या विषयांना अनेक विद्यार्थी असत ते नियमित आणि मनाची ओंजळ जुळवून येत.
 ...भास्कर. वयाच्या मानाने काहीसा पौढ घनगंभीर चेहेरा. तीक्ष्ण, खोलात शोध घेणारे, विचार मग्न डोळे. जे मला ऊर्जा देत. मला जे जे जाणवलं, मी अनुभवलं ते साहित्यविषयक सारं या सर्वांना सांगावं असं मला वाटे. प्रत्येक तास जणू सामूहिक नव निर्मितीचा असे..भास्कर, रामा, त्यांचे बंधू, इतरांची नावे स्मरणात नाहीत; पण ते प्रश्न विचारीत. हे असे कां, या मागे मानसिकता कोणती असे प्रश्न असत. ते दिवस सुरंगीच्या सुगंधी फुलांसारखे. गजरा सुकला तरी सुगंध देणारे. नेहमीच आठवणारे.
 भास्करचा हात त्याच काळात लिहिता झाला. 'जांभुळडोह' हा त्यांचा पहिला कथा संग्रह. भास्कर कळंब जवळच्या लहान खेड्यातला. अल्पभूधारकाचा मुलगा. भवतालचा परिसर, माणसे, त्यांचे दैनंदिन जगणे यांचे केवळ उत्सुकतेपोटी नव्हे तर 'त्यांच्यातलाच एक' या नात्याने चिकित्सकपणे न्याहाळणे. मनाच्या संवेदनक्षम टीपकागदावर टिपून घेणे. हा त्यांचा स्थायीभाव झाला. केवळ ग्रामीण भाषा, परिसर, त्यांचे प्रश्न... असा वरवरचा बुरखा न पांघरता त्यांची कथा जणू त्या जीवनाचा जिवन्त, झळझळीत तुकडा तळहातावर मांडावा इतक्या प्रत्यकारीपणे समोर येई. आकाराने लहान पण अंधारातल्या जगण्याचा वेध घेणारी, ठाव घेणारी कथा अशावेळी भाषेचा शोध घ्यावा लागत नाही. ती स्वतःच्या अनुभवाचे रूप घेऊन साकारते. साक्षात् होते.
 'वाळवी' ही कथा 'प्रतिष्ठान' या मराठवाडा साहित्य परिषदेच्या मुखपत्रात १९७१ साली प्रकाशित झाली. महाविद्यालयीन जीवनापासून ग्रामीण जीवनाचा अस्सल बाज त्याच्या कथांतून जाणवू लागला. मराठवाड्याच्या कपाळावर लिहिलेला, सातत्याने दर चार पाच वर्षांनी येणारा दुष्काळ. ओस पडत जाणारी खेडी, या परिसरातल्या अस्सल शिव्या, या भागातील स्त्री पुरुष... त्यांचे प्रश्न जनावरे...जमीन... शेती या साऱ्यांचे प्रखर चित्र त्यांच्या कथांतून जाणवते. 'मरणकळा' हा त्यांचा दुसरा कथा संग्रह. मृत्यूची कळा, केवळ व्यक्तींच्या नाही परिसरावरच घारीगत घिरट्या घालणारी. इथल्या शेतकऱ्यांचे, विशेषतः कोरडवाहू अल्पभूधारकांचे प्रश्न घेऊन 'अंगार माती' हा कथा संग्रह समोर येतो...
 प्रा. भास्कर चंदनशिव. मराठवाडी मातीचे अस्सल रंग, गंध, स्पर्श, रूप, अवकाश ज्यांच्या कथेतून साकारते असे समर्थ लेखक. माझे विद्यार्थी. त्यांनीही आज साठीचा उंबरठा ओलंडला आहे. पुण्या मुंबई, औरंगाबादच्या 'लेखकु मांदियाळीत' सामील न होता कळमला घर बांधले आहे. आपल्या मायबाप वडीलधाऱ्यांचा सन्मान ठेवा. आपण त्यांच्या खांद्यावर उभे आहोत. ही जाणीव ते आपल्या व्याख्यानांतूनही देत असतात. माझी आणि त्यांची गेल्या कित्येक वर्षात भेटही नाही. पण बातम्या, कथा यांतून भेट होतेच. आणि आपले विद्यार्थी ही आपली अनमोल ठेव. बँक बॅलन्स असते. ते नाते निरामय असते. त्यांना चिरंतन शुभेच्छा. हा फुलता मळा सतत बहरत राहो त्यांना चिरंतन शुभेच्छा.