रुणझुणत्या पाखरा/तू ऐल राधा

विकिस्रोत कडून

 दैनिकात बातमी छापून आली होती. 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी एकत्र फिरणाऱ्या तरुण-तरुणींना अडवून एका संघटनेने त्यांना चक्क उठ - बशा काढायला लावल्या होत्या. सेंट व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ हा 'प्रेमळ' दिवस पाश्चात्त्य देशात साजरा केला जातो. आपल्या आवडत्या 'प्रिय'ला आपल्या मनोभावना कवितेतून वा पत्रातून या दिवशी कळविल्या जातात. तो 'खास', याने की 'स्पेशल' दिवस संघटनांनी केलेला विरोध पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यासाठी होता की, ज्या अतिरेकी व आचरटपणाने प्रेम व्यक्त करण्याच्या आचाराला वा कृतीला होता? की आपण किती 'देशप्रेमी' आहोत हे समाजाला दाखविण्यासाठी होता.
 इसवी सन २७०चा काळ; म्हणजे सुमारे १ हजार ७३७ वर्षापूर्वीचा काळ रोमवर तेव्हा क्लॉडियस नावाचा दुष्ट राजा राज्य करीत होता. त्याला 'क्लॉडियस द क्रुअेल' असे म्हणत असत. त्याच्या राजवाड्याजवळ अतिशय सुंदर मंदिर होते. त्यात व्हॅलेंटाईन नावाचा अत्यंत मायाळू धर्मोपदेशक राही. रोमची जनता त्याच्यावर खूप प्रेम करी. राजा क्लॉडियस रोम मधील तरुणांना सातत्याने होणाऱ्या यादवी युद्धावर पाठवी. आपल्या लाडक्या जीवनसाथीला सोडून जाणे तरुणांना अगदी नकोसे वाटे. पण राजाज्ञा पाळावीच लागे. जेव्हा लढणारे सैनिकच कमी राहिले; तेव्हा राजाने फर्मान काढले की कोणीही विवाह करायचा नाही आणि ज्यांचे साखरपुडे पार पडले आहे ती लग्ने मोडून टाका. त्यामुळे अनेक प्रेमी स्त्रियांनी मृत्यू स्वीकारला. अनेक तरुण दुःखी झाले.
 सेंट व्हॅलेंटाईनला जेव्हा हे कळले तेव्हा त्याला दुःख झाले. मंदिरात येणाऱ्या तरुणांची तो गुपचूपपणे प्रिय व्यक्तींशी भेट घडवून आणी व ईश्वरसाक्षीने विवाह लावी. पण हे गुप्त नाट्य जेव्हा दुष्ट सम्राटाला कळाले, तेव्हा त्याने धर्मोपदेशक व्हॅलेंटाईनला अंधार कोठडीत टाकले. व्हॅलेंटाईनने दृष्ट राजाची क्षमा मागितली नाही. तो मरण पावला तो दिवस १४ फेब्रुवारीचा होता. तेव्हापासून हा दिवस पाश्चात्य देशात साजरा केला जातो. अर्थात ही माहिती वाचलेली वास्तविक प्रेमी ही भावना वैश्विक आहे. रामायण, महाभारत या भारतीय महाकाव्यांत प्रीतीच्या विविध छटा, त्यातील व्यक्तिरेखांमधून व्यास महर्षींनी रंगविल्या आहेत. रुक्मिणी-कृष्ण किंवा सत्यभामा-कृष्ण यांच्या प्रीतीपेक्षा राधा-कृष्णाचे निरामय, सतेज प्रेम हजारो... शेकडो वर्षांपासून भारतीयांना मोहवते. सामान्य माणसापासून ते कलावंतापर्यंत सर्वांना ऊर्जा देते. ते प्रेम अमेय असते आणि पाश्चात्त्यांच्या इ. स. २७०पेक्षा किती तरी आधीपासून ते समाजमान्यता पावलेले आहेत. आम्ही भारतीयांनी ते एका विशिष्ट दिवसात बंद केले नाही. भारतीय प्रेमात सात्त्विकता आहे. ते केवळ शरीरसुखात अडकलेले नाही. त्यात मानसिक उत्कटता आहे. प्रीतीचा वैश्विक आदिबंध 'राधे'च्या प्रेमातून वा 'मिरे'च्या प्रेमातून व्यक्त होतो.
 मला नेहमीच असे वाटते की, संपूर्ण समर्पणात्मक निरामय प्रीती स्त्रीच करू शकते. क्वचित पुरुषही! अर्जुन, त्याला दिलेल्या शिक्षेच्या काळात ईशान्येकडील सप्त भगिनींपैकी मणिपूर राज्यात गेला. त्या भागात तेव्हाही स्त्रिया स्वतंत्रपणे निर्णय घेत. तेथील राजकन्या चित्रांगदा अर्जुनाच्या प्रेमात पडली. सहवासातून बब्रुवाहनाचा जन्म झाला. शिक्षा पूर्ण झाल्यावर अर्जुन परत गेला. मात्र युद्धाच्या वेळी तिने बब्रुवाहनाला अर्जुनाकडे पाठविले. परंतु ती मणिपुरताच राहिली. दमयंती अत्यंत देखणी होती. ती नलराजात मनाने गुंतली होती. तिच्या विवाहप्रसंगी सगळे देव नलाचे रूप घेऊन तेथे आले. पण तिने अचूकपणे नलराजाच्या गळ्यात वरमाळा टाकली. पुरुष अधिक करुन शारीरिक प्रेमात अडकतात; त्यामुळे तृप्ती झाली की ते मोकळे होतात. तिथे समर्पण नसते. दमयंतीने प्रेमाचा संदेश हंसाबरोबर पाठविला. इंद्राच्या शापाने दग्धावस्थेत तळमळणाऱ्या यक्षाने, प्रेमाचा संदेश रामगिरी पर्वतावरून उत्तरेकडे जाणाऱ्या मेघासोबत पाठविला. शकुंतलेने दृष्यांत राजावर प्राण- शरीर ओवाळून टाकले भरताला जन्म देण्यात धन्यता मानली.
 कवी अनिलांनी ही म्हटले आहे...

वाटेवर काटे वेचित चाललो,
चाललो जसे फुलाफुलांत चाललो किंवा
...जवळ तसे काहीच नव्हते फक्त हाती हात होते.

 (कुसुमावती आणि अनिल दोघांची या वर्षी जन्मशताब्दी आहे.)
 ... आपणही निरामय, वैश्विक प्रीती, भावनेची प्रतिष्ठा अबाधित ठेवूनच विरोध करावा आणि प्यार व्यार करनेवालोने भी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण विकृत पद्धतीने कशाला करायचे? आपल्याकडे काय कमी प्रेमगीतं आहेत प्रियाला पाठवायला? आणि निरामय प्रेमात (प्लेहॉनिक... अशारीरिक नव्हे हं ) हाती आलेले काटेही फुलासारखेच जपायचे असतात. 'प्यासा' काय म्हणतो?

हमने तो जब कलियाँ मांगी
काटों का हार मिला
जाने वो कैसे लोग थे
जिनके प्यार को प्यार मिला...

 राधेचे प्रेम कधीच 'म्हातारे' होत नाही. ते ताजेच राहते. तनामनाने एकरूप होण्याची क्षणैक तृप्तीही नेहमीच चिरतरुण असते. म्हणूनच कवी म्हणतो-

तू ऐल राधा, तू पैल संध्या
जीवनाच्या संध्यासमयीही तू,
चैतन्यमयी ऊर्जा देणाऱ्या
बहराच्या बाहूंची... असतेस.