रुणझुणत्या पाखरा/अनाघ्रात समुद्रानुभव
त्याचे पहिल्यांदा पाहिलेले रूप. नितान्त नीरव. निळसर राखाडी रंगाची किनार, उत्तर दक्षिणेकडे नजर पोचेपर्यंत पसरलेली. पश्चिमेलाही नजर हरवून जाईपर्यंत गडद होत जाणारा राखाडी रंग. आणि पूर्वेकडे झाडांत लपलेली कौलारू घरे. भोवताली हिरव्या झाडांची, नारळी पोफळी, चिकू, जामून यांची दाटी. तेव्हा मी असेन सहा सात वर्षांची. तेव्हापासून त्याचे रूप मनात ठसले. त्याची तऱ्हेतऱ्हेची रुपे न्याहाळण्याचा छंद लागला.
उंबरगावला माझ्या आत्याचे दुमजली कौलारू घर होते. समोर भले मोठे अंगण. त्यात दोन बाजूला चिकूचे चक्क वृक्ष. पायऱ्या चढून गेले की लांबलचक व्हरांडा. मग बैठक. भला मोठा पितळी कड्यांचा झोपाळा. घरातल्या कर्त्या पुरुषाची... काकांची खास बैठक. मधल्या खोलीतही झोपाळा. थोडा लहान. त्यावर घरातल्या स्त्रिया हुश्श करून विश्रांती घ्यायला बसणार. संध्याकाळी त्यावर राज्य असायचे लेकीबाळी, मुलांचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी आले की मला वेध लागत उंबरगावचे. मी नि पप्पा उंबरगावला जात असू. सकाळ संध्याकाळ समुद्रावर फिरायचे. भरती ओहोटीची आंदोलने डोळाभर पहायची. सुरूच्या घनदाट झाडीच्या मध्यातून मऊसूत वाळूतून, हातात चपला घेऊन पळायचे. एखादे दिवशी नावेतून खाडी ओलांडून नारगोळला जायचे. अर्थात बोट पलीकडच्या किनाऱ्याला लागे पर्यंत तोंडात राम... राम. देवाचे नाव. एक दिवस घाबरलेल्या मला आत्या म्हणाली 'अग नावाडी वाकबगार असतात. नाव उलटली तरी वाचवतात. अन् घाबरायचं कशाला? मी तुला रामरक्षा शिकवते. भीती वाटली की म्हणत जा. तुझी आई नि पप्पा तुला काय शिकवणार रामरक्षा ? संध्याकाळी शुभंकरोती म्हणशील तेव्हा माझ्या जवळ ये.' आणि मी रामरक्षा शिकले. आत्याबाईचे ५०० एकराचे आंब्याचे वाडीचे शेत गुजरातेत होते. कडेनी वाहणारी खाडी. प्रत्येक आंब्याला काका; आत्याबाई पासून ते लेकरंबाळं, मामा, मामी सगळ्यांची नावे देत. उन्हाळ्यात घरी आंबे आले की सांगत 'शैला हा तुझ्या बापाच्या नावाचा' 'मामावाळा हापूस'. खा.' त्या शेतात पुढे टीव्हीवरच्या रामायणाचे शुटींगही झाले. तेंव्हा घर महाराष्ट्रात होते आणि शेत गुजरातेत. गेल्या ५५/५८ वर्षांत उंबरगाव बदललेय. व्यापारी शहर झालेय. ...पण नीरव, सुशांत समुद्रकिनारा, रसदार चिक्कू, तांदळाची भाकरी, मेतकूट भाताची लहानांची पंगत आणि रामरक्षा यांनी नटलेलं उंबरगाव माझ्या मनात गोठून गोंदले गेलेय.
त्यानंतर गेल्या चाळीस बेचाळीस वर्षांत मी अनेक सागर, महासागर अनुभवले. किंबहुना प्रत्येक सागराचे वेगळेपण न्याहाळण्याचा छंद लागला. ओरिसात अखिलभारतीय पातळीवरची स्त्री - अभ्यास परिषद होती. भुवनेश्वरला. नोव्हेंबरचे दिवस. परिषद संपताच कोणार्कचे सूर्य मंदिर, पहाटे साडेपाचलाच पूर्वेला पसरणारी उगवत्या सूर्याची लालीमा, चांदीपूरचा चांदण्यात चमचमणारा किनारा, यांचे दर्शन घ्यायचे होते. आणि मग अनायसे आलोच आहोत तर जगन्नाथपुरीचे मंदिरही पहायचे.
... पहाटे साडेचार वाजता चक्क थंड पाण्यानी आंघोळ. अंगावरची शाल घट्ट लपेटून आम्ही मैत्रिणी समुद्रकिनारा गाठायला धावत होतो. घड्याळाचा काटा पाचच्या पुढे सरकणारा. पाण्यात पाय बुडवून पूर्वेच्या दिशेने स्थिरावलेले. डोळे. चंदेरी प्रकाश. लक्षात आले की काही ढग क्षितीजाला टेकून मस्त लोळताहेत. समुद्रात नाहून उगवणाऱ्या कोमल अरुणाचे दर्शन नशिबात नसावे असे वाटून मनात ढग दाटले. इतक्यात आव्या... आयगो... आछेन... आछी... उगवला अशा शब्दांचे तुकडे
आणि टाळ्या. जेमतेम पाच सहा सेकंदाचा काळ. सूर्य पहाता पहाता क्षितीजावर येऊन
... हजारो वर्षांपूर्वीच्या आदिमानवाचा ईश्वर चार भिंतीत, डब्याच्या चौकटीत बांधलेला नव्हताच! उगवत्या पहाटेचा स्पर्श अंगांगावरुन फिरवणारा तो सूर्योदय मी मनात जपून ठेवलाय. ...महाबलीपुरमच्या महाकाय खडकाळ किनाऱ्यावरची पुनवेची चांदणी रात्र. भरतीच्या उन्मत्त लाटांचा धिंगाणा नुकताच वीस बावीस वर्षांनंतर अजूनही शांतावला नाही.
समोर दाक्षिणात्य शैलीचे दगडाचे कोरीव मंदिर एकाकी उभे असलेले. हा किनारा पुढे पुढे येतोय असा तेथील लोकांचा गाढ समज. अशी सात मंदिरे या काठावर होती. पण आता एकच उरले आहे. पहाता पहाता काळ्याभोर खडकांच्या किनाऱ्यावरचे लाटांचे चुणीदार वस्त्र फिटत गेले. पूर्ण चन्द्रमाथ्यावर. निसर्गाच्या नग्न सौंदर्याची निरामय किमया. एक अनाघ्रात समुद्रानुभव मी पदरात बांधून घेतला.
रामेश्वरला तीन समुद्रांचा संगम आहे. पूर्वेकडील बंगालच्या उपसागरावर हिरवाईची छटा आहे. तर दक्षिणेला घनगंभीर हिंदी महासागराची निळाई आणि पश्चिमेच्या अरबी समुद्रात फिकटगुलाबी रंग विसावलेला. पण या सौंदर्याला कुबट वास आहे. कारण आमच्या परमेश्वराच्या श्रद्धाभक्तीमध्ये आणि अंतर्गत असोशी आंधळेपणात ... अंधश्रद्धांत अपार अस्वच्छताही मिसळलेली असते. कन्याकुमारीत मात्र हा कुबट वास येत नाही. बोटीने विवेकानंद स्मारकावर जातांना तीन समुद्र संगमातल्या एकमेकांत समरसलेल्या तीन छटा निरखताना, तो उधाणलेला वारा अंगभरुन झेलतांना, स्मारकावरून दिसणाऱ्या हिंदी महासागराचे दर्शन घेतांना, 'भाकरी हाच परमेश्वर आहे' हे सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या 'हिंदू' या शब्दातल्या विश्व कवेत घेणाऱ्या धर्मच्छटा मनात उगवत जातात. सर्वसामान्य माणसाला, दीन... दलित... वंचित, शेवटच्या पायरीवरच्या व्यक्तीला... ज्यात स्त्रियाही आल्याच; सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय देतो तो 'धर्म'. स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेल्या भाकरीरुपी परमेश्वराचा धर्म.
...आणि मग या त्रिसमुद्री संगमाने उजळलेले मन नेहमीच तरुण रहाते.
□