Jump to content

राखेखालचे निखारे/नेत्यांची उत्पत्ती काय?

विकिस्रोत कडून




नेत्यांची उत्पत्ती काय?


 अंगारमळ्यात १९७७ मध्ये मी शेतीच्या कामाला सुरुवात केली. साहजिकच पहिले काम म्हणजे इतस्तत: पडलेले मोठमोठे दगड म्हणजे टोळ बाजूला काढणे. प्रत्येक वेळी एक दगड बाजूला केला की त्याच्याखालून एक नवे विश्व समोर येई. श्री समर्थ रामदासांनी एक टोळ फोडून आत जिवंत असलेल्या बेडकीचे दर्शन घडवून छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण सर्व कामगारांचे पोशिंदे असल्याचा गर्वहरण केला होता, अशी एक कथा आहे. प्रत्येक वेळी दगड बाजूला केला की मला असेच अनुभवास येई. प्रत्येक दगडाखाली थोडीफार ओल शिल्लक राहिलेली असे आणि त्या ओलीच्या आसऱ्याने अनेक प्राणिमात्र जीव धरून राहिलेले असत. त्यात विंचू, साप, सापसुरळ्या, किडेकीटक, मोड आलेल्या बिया वगैरे दिसून येत. जवळजवळ सर्वच- जारज, अंडज, उद्भिज, स्वेदज विश्वाचे एक छोटेसे प्रदर्शन प्रत्येक दगडाखाली भरलेले असे. हे सारे प्राणी येथे आले कोठून, असा प्रश्न मला साहजिकच पडे.
 अलीकडे महाराष्ट्रात जी वेगवेगळी पुढारीमंडळी फिरत आहेत, जागोजागी सभा घेत आहेत त्यांच्याविषयी वाचल्यानंतर मला पुन्हा एकदा ही सारी मंडळी उपजली कोठून? असा प्रश्न पडतो. यांचे विश्व वेगळे, यांची भाषा वेगळी- अश्लाघ्य आणि प्रसंगी अर्वाच्यही. सर्वसाधारण माणसांच्या जगामध्ये ते पुढारी कोठेच बसत नाहीत. यांची उत्पत्ती काय, हा प्रश्न डार्विनला पडलेल्या प्रश्नाइतकाच गहण आहे.
 पुढाऱ्यांच्या उत्पत्तीचा सोपपत्तिक विचार करू गेले तर पुढाऱ्यांचा एक वर्ग असा आहे, की ज्या क्षेत्रात पुढे ते काम करतात किंवा त्यांचे पुढे नाव गाजते त्याच क्षेत्रात त्यांचा जन्म झालेला असतो आणि त्यांचे बालपण गेलेले असते. उदाहरणार्थ, जॉर्ज फर्नाडिस मोठे कामगार नेते. त्यांचा जन्म कामगार वस्तीत झाला आणि बालपणही तेथेच गेले. त्यामुळे त्यांना कामगारांच्या वास्तव परिस्थितीचा सहज अभ्यास करता आला हे खरे, पण कामगारांचे नेतृत्व करण्याआधी त्यांनी काही वेगवेगळ्या समाजांचा तौलनिक अभ्यास केला होता असा काही पुरावा सापडत नाही, किंबहुना कामगार क्षेत्र त्यांनी जाणीवपूर्वक कार्यक्षेत्र म्हणून निवडले असेही काही दिसत नाही. जन्माच्या अपघाताने त्यांना कामगार क्षेत्र मिळाले व तेच त्यांनी जोपासले. याच पुढारीवर्गात हिंदुत्व, मराठीपण किंवा आपापल्या जातीचा अभिमान जोपासण्याचा बाणा हे सर्व धरले पाहिजे. राष्ट्राची प्रगती झाली तर आपल्या समाजाची उन्नती होते किंवा नाही, होत असली तर ती त्याच प्रमाणात आणि दिशेने होते किंवा नाही, असा विवेचक अभ्यास करणारे पुढारी अपवादानेच सापडतील. हिंदू जन्माला आलो मग 'गर्व से कहों हम हिंदू हैं'ची घोषणा द्यावी आणि कोणत्याही एखाद्या प्रदेशात या आरोळीला प्रतिसाद देणारे पुरेसे लोक असले की त्यांचा बऱ्यापैकी जयजयकारही होतो. आजकाल महाराष्ट्रात मराठीपणाचे खूळ आहे, त्याहीपलीकडे मराठापणाचेही खूळ आहे. कदाचित या मंडळींना आपला आपला समाज काही विवक्षित सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीमुळे मागे राहतो आहे असे प्रामाणिकपणे वाटतही असेल, परंतु त्यावरील त्यांची उपाययोजना ही दुसऱ्याच्या पायावर पाय ठेवून त्याच्या हातातली भाकरी हिसकावून घेण्याची आहे. महाराष्ट्रातील आणि भारतातील सध्याची नोकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर आजमितीस रोजगारविनिमय केंद्रांमध्ये नोंद असलेल्या तरुणांनासुद्धा पन्नास ते शंभर वर्षांपर्यंत नोकरी मिळण्याची काहीही शक्यता नाही. सारी सरकार ही संस्थाच दिवाळखोर बनली आहे. त्यामुळे एकेकाळी 'शिका आणि नोकऱ्या करा' असा आदेश देणाऱ्या महान पुढाऱ्यांचेही सूत्र आता लागू पडणारे नाही.
 हिटलरच्या आयुष्यातील तरुणपणाचा कालखंड पाहिला तर तोंडाला फेस येईपर्यंत आवेशाने बोलणे, डोक्यावरील केसांचे झुबके वरखाली करणे आणि इतर सर्व समाजांतील लोकांना शिवीगाळ करणे हेच त्याचे तंत्र होते. आजचे पुढारी हेच हिटलरी तंत्र वापरतात. कोणत्याही एका समस्येला जबाबदार सगळा समाज नसून एक विवक्षित वर्ग आहे, अशी मांडणी हिटलरने करून ज्यू लोकांविरुद्धचा द्वेष जोपासला. तोच प्रकार आजही आपल्या डोळ्यांसमोर घडत आहे. ज्यू समाज निदान अनेक क्षेत्रांत प्रगती करून बसलेला होता. बुद्धीच्या क्षेत्रापासून बँकिंग क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रे त्यांनी काबीज केली होती. ज्यूंविरुद्ध जोपासलेली विद्वेषाची भावना झोपडपट्टीत कसेबसे जीवन कंठणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहार येथून आलेल्या लोकांना कितपत लागू पडेल याचा विचारही या नेत्यांच्या डोक्यात येत नाही. दिङ्मूढ झालेल्या समाजाच्या एका घटकाची भरपूर गर्दी जमते आणि टाळ्या मिळतात यातच त्या नेत्यांना समाधान आहे. शेतकरी संघटनेने जन्माच्या अपघाताने मिळालेल्या सर्व विचारसरणीवर 'क्षुद्रवाद' असा ठप्पा मारला आणि 'महाभारतातील कर्णाच्या शब्दांत 'दैवायत्तं कुले जन्मे: मदायत्तं तू पौरुषम' अशी मांडणी केली, पण सारे राष्ट्रच मुळी सरकारकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपांतील भिक्षांवर जोपासले जात असताना ही पौरुषाची भाषा कोणाला रुचणार?
  समर्थ रामदासांनी चळवळीच्या यशाचे एक मोठे मार्मिक गमक सांगून ठेवले आहे.
 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे
 परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे'
 समर्थांची ही उक्ती सध्याच्या परिस्थितीस कशी लागू पडते हे पाहू...
 प्रत्येक व्यक्तीस निसर्गाने एक संवेदनापटल दिले आहे. ते अध्यात्मात सांगितलेल्या आत्म्याचेच एक रूप आहे. वेदान्ताप्रमाणे हा आत्मा प्रत्येक व्यक्तीत म्हणजे पिंडातही असतो आणि सर्व ब्रह्मांडातही असतो. त्यामुळे व्यक्तिवादावर आधारलेल्या चळवळी खुल्या व्यवस्थेच्या चळवळी म्हणून यश पावल्या, ब्रह्मांडाची आण घेणारे मात्र हजारो वर्षे झाली तरी आपापल्या संस्था आणि प्रथा टिकवून आहेत, परंतु पिंड आणि ब्रह्मांड यांच्या मध्ये मराठापण किंवा मराठीपण असा काही थांबा नाही. म्हणजे मराठीपणाला किंवा मराठापणाला स्वयंभू आत्मा नाही तेथे भगवंताचे अधिष्ठान कोठून असणार? मग त्याकरिता चळवळी करून भडकावणारी भाषा वापरून, प्रसंगी अश्लाघ्य व अर्वाच्य विनोद करूनही मराठेपणाला किंवा मराठीपणाला भगवंताच्या अधिष्ठानाचे स्थान प्राप्त करून देण्याची सगळ्यांची धडपड सुरू आहे. पुढाऱ्यांनी असे प्रयत्न करावेत यात वावगे काहीच नाही. ज्याला त्याला त्याच्या मतीप्रमाणे जिथे भगवंताचे अधिष्ठान वाटेल तिथे तिथे तो आपले कार्यक्षेत्र निवडतो. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, यातील पुढाऱ्यांना भगवंताच्या अधिष्ठानाची जाणीव तर सोडाच, पण नेमकी याउलट विपरीत जाणीव झालेली दिसते. त्याची कारणे अनेक असू शकतात, कोणाला आपल्या हातून घडलेल्या एखाद्या गुन्ह्याचे प्रकरण लपवायचे असते, कोणाला आपल्या पूर्वायुष्यातील एखादा भाग लपवायचा असतो.
 याचे एक चांगले उदाहरण आहे. जगाचा इतिहास 'सिफिलिस' या आजाराने मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. हा लैंगिक आजार व त्याचे जंतू हळूहळू मेंदूपर्यंत पसरतात आणि रोग्याच्या मनात त्यामुळे विनाकारणच काही तरी भव्यदिव्य करून दाखवावे अशी बुद्धी तयार होते. त्याकरिता आवश्यक तर हजारो नाही, लाखो लोकांचेही मुडदे पाडायला तो सहज तयार होऊन जातो. इतिहासात रशियातील पहिले तीन झार आणि अलीकडच्या इतिहासातील माओ त्से तुंग वगैरे पुढारी या वर्गात मोडतात. भारतातल्याही एका नामवंत पुढाऱ्याची गणना यातच होते. आपण अकबराचे अवतार आहोत अशी भावना करून घेऊन त्यापोटी सगळा देश लायसेन्स-परमिट-कोटा-इन्स्पेक्टर राज्यात बुडवणारे आणि इंग्रजांनी प्रस्थापित केलेली कायदा आणि सुव्यवस्था संपवून टाकणारे नेतेही या वर्गातलेच.
 या नेत्यांची आणखी एक उपपत्ती लावता येते. भारतीय परंपरेत युगांची कल्पना आहे. युग हा एक कालखंड असतो. सध्याचे युग हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये माणसे धर्मतत्त्व सोडून वागू लागतात, द्रव्य हीच केवळ श्रेष्ठत्वाची निशाणी ठरते. द्रव्य आणि सत्ता यांची साखळी जमली म्हणजे टगेपणाचाही खुलेआम अभिमान काही मंडळी बाळगतात हे आपण पाहिलेले आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, या कालखंडामध्ये काही पुढारी विनाकारणच प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करून जातात. 'पंडित नेहरू महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत' अशी उघडउघड घोषणा करणारे यशवंतराव चव्हाण आता सर्वकालीन थोर मंडळीत जाऊन बसले आहेत. त्यांच्या समाधिस्थानापुढे कोणी नाही तरी अजितदादांना तरी जाऊन आत्मचिंतन करावेसे वाटले यावरून कलियुगातील सत्ता आणि यश यांचे माहात्म्यही लक्षात येऊन जाईल. सध्याच्या पुढारी मंडळींत कोणीही आपले कार्यक्षेत्र विचारपूर्वक निवडल्याचे दिसत नाही. जन्माच्या अपघाताने जे हाती आले ते त्यांनी जोपासले. हे करताना आपल्या समाजाच्या विकासाचा तौलनिक अभ्यास न करता त्यांनी आरक्षणासारख्या मलमपट्टीचा पुरस्कार करून इतर समाजांत विनाकारण विद्वेष तयार केला. हा परस्परविद्वेषाचा कालखंड जोवर सत्तेतून पैसा मिळतो आणि पशातून गुंडशक्ती आणि सत्ताही मिळते तोपर्यंत चालूच राहील, असे देशाच्या दुर्दैवाने दिसते आहे.

(दै. लोकसत्ता दि. २९ मे २०१३ )