Jump to content

युगान्त/ शेवटचा प्रयत्न

विकिस्रोत कडून




एक



शेवटचा प्रयत्न




 भीष्मपर्वापासून भारतीय युद्धाची पर्वे सुरू झाली, असे समजतात. पण हे पर्व जसजसे वाचावे तसतशी खात्री पटते की, हे पर्व म्हणजे युद्धाची सुरवात नसून युद्ध थांबवण्यासाठी केलेला शेवटचा प्रयत्न होता. तो प्रयत्न करणारी व्यक्ती भीष्म होती. भीष्माचे सर्व आयुष्य निष्फळ त्याग करण्यात गेले. आयुष्याचे हे शेवटचे दिवस म्हणजे त्याच्या त्यागमय जीवनाची पराकाष्ठा होती. आणि आयुष्यातील इतर सर्व त्यागांप्रमाणे त्याचा हाही त्याग निष्फळ ठरला. ज्या भीष्माने स्वतःचे हक्काचे म्हणून होते त्याचा त्याग केला होता, त्याच भीष्माने वृद्धपणी-अति वृद्धपणी कौरवांच्या सेनेचे सेनापतिपद स्वीकारले तरी कसे, हाही प्रश्न मनाला टोचतो. पण भीष्माच्या सर्व आयुष्याचा विचार केला म्हणजे कळते की, भीष्माचे हे शेवटचे कृत्य सुसंगत नव्हे, तर अटळ होते.
 मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलच असायचे, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते. मानवांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री- सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडवलेल्या पाचोळ्यासारखी क्षुद्र, फोलकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात. प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तीलाही तो जाणवला असला पाहिजे. हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते की, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वतःची व्यथा होते. त्या व्यक्तीच्या द्वारे सबंध मानवतेचे दुःख आपल्याला खुपत राहते.

 भीष्माचे आयुष्य असेच होते. विरोधाने भरलेले होते, निदान वरून तरी तसे दिसत होते. सुसंगती होती, ती भीष्माच्या मनाची व कृत्यांची. भीष्म जन्माला आला, तो एक शापित जीव म्हणून. त्याच्या बरोबरीच्या इतरांची सुटका गंगेने केली; पण तो मात्र जगात अडकून पडला.

 गंगेला मृत्यूलोकात जाण्याचा काही कारणामुळे प्रसंग आला. त्याच सुमारास अष्टवसूंना वसिष्ठांच्या शापामुळे मृत्यूलोकात जन्म घेणे भाग झाले होते. "गंगे, आम्ही तुझ्या पोटी जन्म घेतो. जन्मल्या-जन्मल्याच तू आम्हांला मारून टाक व आमची सुटका कर," अशी त्यांनी गंगेची प्रार्थना केली. गंगेने त्यांना तसे वचन दिले व हे 'स्वर्गीय' प्राणी पृथ्वीवर निघाले. गंगा स्वर्गातील बाई होती, चिरयौवना होती. तिच्या वयाचा विचार करण्याचे कारणच नाही. ती 'स्वर्गीय' होती, म्हणून तिला मृत्युलोकातील नियमही लागू नव्हते! ही बाई पृथ्वीवर आली आणि थेट राजा प्रतीपाच्या मांडीवर जाऊन बसली, व 'मला तुझ्याशी लग्न करू दे' म्हणून म्हणू लागली. राजा म्हणाला, “बाई, बायको व्हायचे, तर डाव्या मांडीवर बसायचे. तू बसली आहेस उजव्या मांडीवर. ती असते मुलाची, नाही तर सुनेची. तेव्हा आता मला मुलगा होऊ दे; त्याला तुझ्याशी लग्न करायला सांगतो." गंगेने ते ऐकले. प्रतीपाला शंतनू झाला. प्रतीप राज्य त्याच्या स्वाधीन करून निघून गेला. शंतनू शिकार करण्यात गुंग असे. कुरुवंशात व इतरही राजघराण्यांत शिकार करणे हा क्षत्रियांचा एक मोठा छंद असे. एकदा त्याला गंगेच्या काठी एक अप्रतिम रूपवती स्त्री दिसली व त्याचीच शिकार झाली. ती गंगा होती. शंतनूची लग्नाची बायको होण्यास तिने रुकार दिला, पण इतर स्वर्गीय स्त्रियांप्रमाणे - उर्वशीप्रमाणे - तिने विचित्र अटी घातल्या. “राजा, मी वाटेल ती कृत्ये करीन. तुला अयोग्य वाटेल असेही करीन; पण तू मला अडथळा आणता कामा नये, वा नावे ठेवता कामा नये. ज्या दिवशी तसे करशील, त्या दिवशी मी तुला सोडीन." कामी शंतनूने सर्व मान्य केले व गंगा त्याच्याजवळ राहिली. गंगेने शंतनूला सर्व प्रकारचे सुख दिले, असे महाभारत म्हणते. मूल झाले रे झाले, की ती त्याला गंगेत नेऊन बुडवायची. शंतनू इतका तिच्या आधीन होता की, त्याला काही म्हणवले नाही; पण आठव्या मुलाला जेव्हा ती बुडवायला निघाली तेव्हा त्याला राहवले नाही. “ह्याला तरी मारून टाकू नकोस! काय अघोरी कृत्य करणारी स्त्री तू आहेस !" असे तो म्हणाला. गंगेला तेवढेच निमित्त पुरे होते. हा मुलगा मी जिवंत ठेवते, पण आपल्या अटीप्रमाणे मी आता तुला सोडून देते.” असे म्हणून मुलाला घेऊन ती अंतर्धान पावली.
 ना मूल, ना बायको; शंतनू परत मृगया करीत रानात वणवण फिरत राहिला. एक दिवस सर्व शास्त्रे शिकलेला, मोठा झालेला असा त्याचा मुलगा गंगेने त्याच्या स्वाधीन केला. शंतनूने त्याला राजधानीत आणून यौवराज्याभिषेक केला. हा देवव्रत आपल्या गुणांनी सर्वांचा आवडता झाला. मृत्यूने सुटका न होता हा जीव येथेच अडकला; एका प्राचीन राजघराण्याचा तो युवराज झाला.

 अशी चार वर्षे गेली. शंतनूचा शिकारीचा नाद कायमच होता. ह्या वयात परत एकदा तो एका सुंदर स्त्रीच्या आहारी गेला. तिने नाही, पण तिच्या बापाने ह्या वेळी लग्नाच्या अटी घातल्या. अटी सर्वस्वी मानवी लोकव्यवहाराला धरून होत्या. पण त्यामुळे देवव्रताच्या आयुष्याला परत एकदा कलाटणी मिळाली.

 “ह्या मुलीच्या मुलाला राजपद मिळत असेल तर मुलगी देतो.” ह्या दाश-राजाच्या मागणीला शंतनूला रुकार देववेना. तो खिन्न मनाने राजधानीत आला. त्याची मनःस्थिती जाणून घेण्याचा देवव्रताने प्रयत्न केला. शंतनूचे उत्तरही मोठे मजेदार आहे. “अरे, मला कसली काळजी? तुझ्यासारखा गुणी मुलगा राज्य संभाळायला आहे. भीती वाटते ती एवढीच की, तू एकटाच आहेस. तुला काही झाले, तर राज्याचे होणार कसे?" राजपुत्र इतर राजपुरुषांकडे गेला व त्याने सर्व बातमी काढून घेतली. मग शंतनूला न सांगताच अमात्य व इतर कुलवृद्ध बरोबर घेऊन तो दाश-राजाकडे गेला व त्याने शंतनूसाठी सत्यवतीला मागणी घातली. दाश-राजाने आपली अट सांगितली, तेव्हा सर्व माणसांपुढे देवव्रताने प्रतिज्ञा केलीः “मी राज्यावर बसणार नाही." पण तेवढ्याने दाश-राजाचे समाधान होईना. "ते सर्व ठीक; पण तुझी मुले राज्यासाठी माझ्या मुलीच्या मुलांशी भांडतील, त्याचे काय?” राजपुत्राने दुसरी पहिल्या पेक्षाही अवघड अशी प्रतिज्ञा केली : “मी यावज्जीव ब्रह्मचारी राहीन!" ह्या कठीण प्रतिज्ञेमुळे देवव्रताला 'भीष्म' हे नाव पडले. दाश-राजाचे समाधान झाले. त्याने गंधकालीला-आपल्या मुलीलादेवव्रत भीष्माच्या स्वाधीन केले. “आई चल," ह्या शब्दांनी भीष्माने तिला रथात घेतले व सर्व परिवारासह राजधानीत येऊन तिचे शंतूनशी लग्न लावून दिले.

 ह्या असामान्य त्यागाने संतुष्ट होऊन बापाने भीष्माला इच्छामरणाचा वर दिला. म्हाताऱ्या बापासाठी पुरूने वार्धक्य पत्करले होते, पण तो त्याग कायमचा नव्हता व त्याचे फलही पुरूला उत्तम मिळाले. पुरू सर्वांत धाकटा मुलगा, पण वरच्या सर्व भावांचा (यदू, तुर्वसू, अनू ह्यांचा) हक्क हिरावून घेऊन ययातीने राज्य पुरूला दिले. भीष्माला त्यागाच्या मोबदल्यात काय मिळाले, तर इच्छामरण! भीष्माचा त्याग मोबदल्यासाठी नव्हताच. तो एक शापित जीव होता, हे त्याला स्वतःला माहीत नव्हते; पण गंगेने शंतनूला ते सांगितले होते. त्याला पूर्वायुष्याचे स्मरण नसूनही पूर्वायुष्यावर आधारलेल्या काही प्रवृत्ती असणार अशी कल्पना केली, तर ह्या प्रसंगाची एक निराळीच संगती लावता येईल. जन्मल्याबरोबर जगातून सुटणार, या आशेने आलेल्या पण अडकून पडलेल्या ह्या जिवाने जगाच्या पसाऱ्यात न अडकण्याची ही संधी साधली, असे तर नाही? राज्य नाही, लग्न नाही, आणि इच्छामरण. ह्या तिन्ही गोष्टींमुळे भीष्म जगातून निघून जाण्यास मोकळा झाला. पिंजऱ्यात अडकलेल्या पाखराला सुटकेचा मार्ग दिसला. पण भीष्माच्याबरोबर जन्माला आलेल्या त्याच्या नशिबाने त्याला परत खोड्यात टाकले.

 शंतनूला सत्यवतीपासून दोन मुले झाली, व ती मुले मोठी होण्याच्या आतच तो मेला. ह्या लहान मुलांना व त्यांच्या तरुण आईला टाकून जाणे भीष्माला अशक्य झाले, व तो परत जगाच्या कटकटीत गुंतला. राजा नसूनही त्याने अडीच पिढ्या विचित्रवीर्य, पांडू, ते दुर्योधन वयात येईपर्यंत, म्हणजे कमीत कमी चाळीस वर्षे राज्य संभाळले, अधिकार गाजवला. स्वतः लग्न करून न घेता दोन पिढ्यांच्या लग्नाच्या खटपटी त्याला कराव्या लागल्या. सत्यवतीला रथातून आणून तिचे बापाशी लग्न लावले, ही जशी काय त्याच्या पुढच्या आयुष्याची नांदीच झाली. विचित्रवीर्य, धृतराष्ट्र, पांडू व विदुर ह्यांची लग्ने भीष्माच्या पुढाकारानेच झाली. स्वतःचे मूल नसलेल्या ब्रह्मचाऱ्याचे सबंध आयुष्य दुसऱ्याची मुले संभाळण्यात गेले. ह्या गुंत्यात तो जो पडला, तो शेवटपर्यंत. त्यातून त्याला सुटताच आले नाही.

 सत्यवतीच्या थोरल्या मुलाला राज्यावर बसवले. पण तो एका भांडणात मारला गेला. दुसरा मुलगा विचित्रवीर्य लहान असतानाच गादीवर बसला. त्याचे लौकर लग्न झालेले बरे, असे वाटून भीष्माने त्यासाठी काशिराजाच्या तीन मुली स्वयंवर मंडपातून पळवून आणल्या. थोरली अंबा म्हणाली, "मी शाल्वला मनाने वरले आहे." त्याने तिला शाल्वाकडे पाठविले व तिच्या बहिणी अंबिका व अंबालिका ह्यांचे विचित्रवीर्याशी लग्न लावले. काशीहून मुली हस्तिनापुराला आणल्या, तो प्रवास काही दिवस चालला असणार. हस्तिनापुराला आणल्यावर. ‘मी मनाने दुसऱ्याची आहे’ हे सांगेपर्यंत काही दिवस गेले असणार व शाल्वाकडे जाण्यास आणखी काही दिवस लोटले. म्हणजे स्वयंवर मंडपातून शाल्वाकडे जाईपर्यंत काही आठवडे मध्ये गेले असणार. ‘इतके दिवस परक्याकडे राहिलेल्या मुलीचा मी स्वीकार करणार नाही,’ असे शाल्वाने सांगितल्यावर अंबा भीष्माकडे आली व म्हणू लागली, “ज्या अर्थी तू मला स्वयंवर मंडपातून जबरदस्तीने आणले आहेस, त्या अर्थी तू आता माझ्याशी लग्न केले पाहिजेस" ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेमुळे भीष्माने तिला नाकारली व अपमानित झालेल्या, धिक्कारलेल्या, कुठेही आसरा नाही अशा परिस्थितीत असलेल्या अंबेने स्वतःला जाळून घेतले.
 ह्या प्रसंगापर्यंतचे भीष्माचे आयुष्य निरुपक्रोश, निरागस असे गेले होते. त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाचे नुकसान झाले नव्हते. कोणाचा तळतळाट झाला नव्हता. तो ह्या प्रसंगाने झाला व पुढेही असे प्रसंग बरेच आले.

 लग्न झाल्यावर विचित्रवीर्य लौकरच मेला. मागे वंश न ठेवता मेला. स्वतःची मुले राज्यावर बसावी, ही सत्यवतीची इच्छा तर धुळीला मिळालीच; पण सबंध घराणेच नष्ट होण्याच्या मार्गाला लागले. तेव्हा तिने दीनपणे भीष्माची प्रार्थना केली की, ब्रह्मचर्याची शपथ सोड, राज्यावर बैस व कुरुवंशाचा उद्धार कर. निदान ह्या तुझ्या भावजयींना संतती दे. भीष्माने ह्या सर्व गोष्टींस नकार दिला. सत्यवतीला कुंवारपणी झालेला मुलगा व्यास हाही विचित्रवीर्याचा भाऊच. म्हणून त्याच्या राण्यांचा दीर. तेव्हा त्याच्याकडून संतती निर्माण करवावी, असे सत्यवतीने भीष्माच्या अनुमतीने ठरविले. “मुली, आज रात्री तुझा दीर येणार आहे," असे मोघमपणे बोलल्यामुळे भीष्म येईल की कुलातील दुसरा कोणता कुरुयोद्धा येईल, असा विचार करीत असलेल्या थोरल्या राणीला एकाएकी एक काळा, लाल डोळ्यांचा, केसांच्या जटा असलेला असा पुरुष दिसला व ती बेशुद्ध पडली. ह्या संबंधापासून निपजलेला मुलगा धृतराष्ट्र हा जन्मांध झाला. म्हणून दुसऱ्या राणीकडे व्यास गेला. त्याचे रूप पाहून ती भीतीने पांढरी पडली व तिला एक पांढरा-फटक मुलगा झाला. तो पांडू. त्या दोघी राजघराण्यात वाढलेल्या क्षत्रिय बायांना केवढी घृणा उत्पन्न झाली, हे पुढील गोष्टींवरून स्पष्ट दिसते. तिसऱ्या वेळेला ह्या भयंकर, कधी केस न विंचरलेल्या ब्राह्मणाला पाठवणार असे कळले मात्र, त्यांनी आपल्याऐवजी आपल्या दासीलाच त्याच्या स्वागताला उभी केली. तिला मुलगा झाला, तो विदुर.
 भीष्माने आंधळ्या धृतराष्ट्राला लांब देशीची राजकन्या बायको म्हणून आणली. आपला नवरा आंधळा आहे हे कळल्याबरोबर तिने आपले डोळे फडक्याने कायम बांधून टाकले. कुंती जाडजूड (पृथा) व निबरच होती. पण तिला व रूपवती माद्रीला ज्याच्या गळ्यात बांधले, त्याला स्त्री-संग शक्य नव्हता. बिचारी माद्री नवऱ्याच्या मृत्यूला कारण, म्हणून तरुणपणी सती गेली. ह्या पाच बायकांचा आत्मा किती तळमळला असेल! भीष्मामुळेच त्यांची विटंबना झाली. भीष्म कुरुकुलातील कर्ता, अधिकारी पुरुष होता. त्यानेच आपल्या वंशाच्या वृद्धीपायी ह्या कुलस्त्रियांची मानहानी व विटंबना केली होती. गांधारी, कुंती, व माद्री ह्यांच्याबद्दल महाभारतात त्या वेळी लोक काय म्हणत होते, ते कळत नाही; पण काशिराजाच्या मुलींवर जे प्रसंग ओढवले, त्यांवरून भीष्माची भयंकर निर्भत्सना शिशुपालाच्या तोंडी आलेली आहे.

 प्रसंग होता धर्माच्या राजसूय यज्ञाच्या वेळी अग्रपूजा देण्याचा, सर्व थोर-थोर राजांना आमंत्रणे होती. पाहुण्यांना अर्घ्य देऊन त्यांचा सत्कार करायचा होता. पहिल्याने अर्घ्य कृष्णास द्यायचे, असे पांडवांनी भीष्माच्या सल्ल्याने ठरवले. त्याप्रमाणे तो अर्घ्य देणार, तो शिशुपालाने हरकत घेतली. "इतर कोणी नाही, तरी तुमच्या कुळातील सर्वांत वृद्ध जो भीष्म त्याला अर्घ्य देणे योग्य," असे शिशुपाल म्हणाला, कृष्णालासुद्धा बोलता येऊ नये, असा हा मुद्दा होता; व तो बोललाही नाही. भीष्माने स्वतःच उठून, कृष्णच सर्व दृष्टींनी कसा योग्य हे बोलून दाखविले, तेव्हा शिशुपालाने चिडून उत्तर दिले, “भीष्मा, तुझे सर्व चरित्रच क्षत्रियाला काळिमा लावणारे आहे. अंबेने शाल्वाला वरले आहे, ही गोष्ट जगजाहीर होती, तरी तू तिचे हरण केलेस. विचित्रवीर्य धार्मिक राजर्षी. त्याने तिच्याशी लग्न केले नाही; ती तुझ्या आश्रयाला आली, तर तू तिला झिडकारलेस; तुझा भाऊ मेल्यावर त्याच्या राण्या तुझ्या होत्या. एका ब्राह्मणाने गुपचूप (मिषतः) त्यांच्या ठायी संतती निर्माण केली. तू ब्रह्मचारी नव्हेस, षंढ आहेस. आता अर्घ्य देऊन तुझा मान राखायची वेळ, तर तू कृष्णाचीच स्तोत्रे गात बसला आहेस.”

 धर्म-दुर्योधनांच्या पिढीत घरच्या पुरुषांसाठी बायका आणण्याचा भीष्माचा उद्योग थांबला, त्यामुळे कोणा बाईचा छळ झाला नाही. पण तो ज्या राजसभेत सर्वांत वडील म्हणून बसे, तेथे झालेली एका स्त्रीची विटंबना थांबवण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. द्रौपदीला सभेत ओढून आणली तेव्हा अति झाले, म्हणून विदुर मध्ये पडला. विदुर धृतराष्ट्राचा धाकटा भाऊ होता. शिवाय दासीपुत्र होता. त्याच्याऐवजी भीष्माला अधिकारवाणीने हा लाजिरवाणा प्रकार बंद करता आला असता. त्याऐवजी तो धर्म काय, अधर्म काय, ह्याचीच चर्चा करीत बसला.

 कुटुंबात म्हणा, राज्यात म्हणा, जे कोणी सर्वांत दुबळे असते, ज्याला अन्यायाविरुद्ध झगडता येत नाही, त्याला सौजन्याने वागवणे ह्यात खरा मोठेपणा असतो. देव अनाथांचा नाथ. म्हणून त्याचा मोठेपणा. अगदी हाच अभिप्राय तुकाराम महाराजांनी मराठीत सांगितला आहे. ‘दया करी जे । पुत्रांसी । तेचि दासां आणि दासी । तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।' स्वत:च्या मुलाला कोणीही नीट वागवील. घरच्या गडी-मोलकरणीचे जो हित बघेल, त्याच्याच मनात देवपणा असतो. अशा घरात देव राहतो. जवळजवळ हेच शब्द मनूने उपयोजले. मनुस्मृती महाभारतामागून लिहिलेली; पण आचाराचे नियम-सदाचाराचे नियम-दोन्ही काळी सारखेच होते. पितृप्रधान कुटुंबात पुरुषाचे वर्चस्व असे. बायकांना- विशेषतः सासुरवाशिणींना-काही हक्क नसत. म्हणून अशांबद्दल मनूने आवर्जून सांगितले आहे, “ज्या कुळात वधूंना (सासुरवाशिणींना) अश्रू गाळावे लागतात, जेथे त्यांचा तळतळाट होतो, त्या कुलाचा नाश होतो. ह्याच्या उलट बायकांना जेथे सन्मानाने वागविले जाते (पूज्यन्ते) त्या घरी देवता वास करतात- ‘देव तेथेचि जाणावा.' " कुरुकुलाने बायकांची भयंकर विटंबना केली. त्यांची शरीरे व मने दोन्ही चुरगळून टाकली. ते कुल नाशालाच योग्य झाले होते. आणि दुर्दैव असे की, हे सर्व पाप भीष्माच्या हातून झाले होते.

 आणखी एक प्रश्न उद्भवतो. भीष्माने स्वतःसाठी काही केले नाही. ज्या दिवशी त्याने राज्याचा व स्त्री-संगाचा त्याग केला, त्या दिवशी त्याचे स्वतःचे असे कर्तव्यच राहिलेले नव्हते. त्याने जे केले, ते इतरांसाठी. त्या कृत्यांबद्दल त्याला जबाबदार धरता येईल का? हाच प्रश्न दुसऱ्या तऱ्हेने विचारता येईल. मानवी जीवन संपूर्णतया निरागसपणे घालवता येईल का? जगायचे ठरवले की, मनात असो वा नसो, हातून पाप घडणारच, अशी तर मानवी जीवनाची घडण नाही? अंबा ही शाल्वाची, हे माहीत असता तिला रथातून का आणले? भावाच्या बायका विधवा झालेल्या. स्वतःची शपथ तर पाळायची. पण त्यांच्यासाठी कुरूच्या घराण्यात तरुण पुरुषांची वाण पडली नव्हती. महाभारत स्पष्ट म्हणते की, राणीच्या मनात भीष्म व इतर कुरुपुंगव उभे राहिले. सर्वांना डावलून एक रानटी ब्राह्मणच का सापडला? ह्याला उत्तर असे संभवते की, राजसभेतील एखादा योद्धा निवडला असता, तर मुलांचा बाप म्हणून त्याला कायमचे स्थान मिळाले असते. त्यापेक्षा ज्याचा पुढे राजघराण्याशी संबंध येण्याचा संभव नाही असाच पुरुष बरा, असेही सत्यवतीला व भीष्माला वाटले असले पाहिजे. भीष्माच्या पत्रिकेत राजयोग नव्हता, पण अधिकारयोग मात्र भरपूर होता. ह्या अशा तऱ्हेच्या निवडीमुळे भीष्माच्या अधिकारालाही तडा गेला नाही व ब्रह्मचर्याची भूमिकाही शाबूत राहिली. हे झाले राजकारण. पण हे वर्तन मानवी मूल्यांच्या दृष्टीने गर्ह्य ठरते ते ठरतेच.

 शिशुपाल भीष्माला शिव्या घालताना ‘प्राज्ञमानिन्’- स्वतःला मोठा शहाणा समजणारा- असे विशेषण लावतो. सर्व स्वार्थ नष्ट झालेला. अत्यंत शहाणा, सत्यप्रतिज्ञ व दुसऱ्याची काळजी वाहणारा असा भीष्माचा लौकिक होता. स्वतः भीष्मही हीच भूमिका हिरीरीने पार पाडीत होता. मनुष्य स्वतःसाठी म्हणून जेव्हा काही करीत असतो, तेव्हा त्याच्या कृतीला मर्यादा असतात, त्याच्या कृतीचे मूल्यमापनही जोखून तोलून होत असते. पण एकदा का त्यागाची भूमिका घेतली, उपकाराची भूमिका घेतली, म्हणजे त्याच्या कृत्यांना सामान्य मर्यादा नाहीशी होते. एरवी चार लोकांचे दडपण असलेला माणूस बेफिकीर वागतो, जुलमी वर्तन करू शकतो. क्रांती करावी-पददलितांसाठी बंड म्हणून उभारावे व त्यात मानवांचा संहार व्हावा, असे कितीदा तरी घडले आहे. फ्रेंच किंवा रशियन राजांनी केला नसेल एवढा संहार फ्रेंच व रशियन राज्यक्रांतीत झाला. ही हत्या करणारे महात्मे होते, गरिबांसाठी लढत होते. मनुष्य स्वतःसाठी जे करीत नाही ते देशासाठी, समाजासाठी, इतरांसाठी करू शकतो. ध्येयवादी, स्वातंत्र्यवादी देशभक्त, देवभक्त लोक जेवढा अन्याय करू शकतात. तेवढा इतर करू शकत नाहीत. त्यातून तो ध्येयवादी ‘प्राज्ञमानिन्', केवळ कुळाच्या कल्याणाची चिंता वाहणारा असा असला, म्हणजे सदसद्विवेक राहत नाही. अशी तर अवस्था भीष्माची झाली नाही ना? आपल्या चांगुलपणाचा, प्रतिज्ञापालनाचा त्याला कैफ तर चढला नव्हता ना? कैफ चढण्याइतके आत्मविस्मरण भीष्माला झाले नाही, पण चार लोकांच्या देखत जी कठीण भूमिका त्याने घेतली व जी जबाबदारी विशेष कारण नसता मागाहून त्याने स्वीकारली, तीत तो प्रवाहपतितासारखा वाहत गेला, असे म्हणावेच लागते.

 आपल्याकडे ह्या तऱ्हेचा विचार दुसऱ्या गोष्टीच्या अनुषंगाने झाला आहे. ती म्हणजे मोक्ष मिळण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न. यमनियम, प्राणायाम, तप वगैरे साधनांनी मुमुक्षू पुढे जाता-जाता त्याला तपाचे फळ म्हणून ऋद्धि-सिद्धींची प्राप्ती होते. ही पायरी मोक्षमार्गावरच असते, पण ती मोक्षाला जायला एक मोठा अडसर ठरते. ऋद्धि-सिद्धी हे स्वतःच्या महातपाचे दृश्य फल असते व मनुष्य त्या चमत्कारात स्वतःला धन्य मानण्यात मोक्ष विसरून जातो. तशीच परिस्थिती ध्येयवादी माणसाची होते. एका विशिष्ट पायरीवर त्याला मानाचे स्थान व वाहवा मिळते व तो स्वतःला विसरतो. आपल्या हातून काही वाईट व्हायचे नाही, म्हणून तो जपत नाही. इतरांसाठी म्हणून तो धडाक्याने, अविचाराने कृत्ये करतो. तसेच भीष्माचे झाले.

 भीष्माने या सर्व प्रकारात सत्यवतीवर सूड उगवला, असे मात्र म्हणता येत नाही. एक तर महाभारतात ही कल्पना मुळीच आली नाही, व दुसरे म्हणजे ज्या गोष्टी घडल्या- विचित्रवीर्याचे मरण, एका राणीचा मुलगा आंधळा निपजणे, दुसरीचा रोगी निपजणे- त्यांचे काही भीष्माला अगोदर ज्ञान नव्हते. गोष्टी घडत गेल्या व भीष्म संसारात गुरफटत राहिला.

 धर्माच्या राजसूय यज्ञानंतर अग्रपूजेचा मान भीष्माचा, हा शिशुपालाचा दावा चुकीचा नव्हता. तेथेही भीष्म मागे सरला व त्याने मान कृष्णाला देववला. अशा भीष्माने सेनापतिपद स्वीकारलेच कसे ?

 लढाईच्या आधी सर्वनाश होणार, हे जाणून व्यासाने सत्यवतीला “सुनांबरोबर चतुर्थाश्रम घेऊन अरण्यात जा," असे सांगितले. त्या निघून गेल्या, भीष्म आपल्या सावत्र आईपेक्षाही वयाने मोठाच; त्यालाही हा मार्ग मोकळा होता. बलराम नाही का तीर्थयात्रेला गेला? मग भीष्मच मागे का राहिला?

 मोठा योद्धा म्हणून भीष्माचा लौकिक होता. महाभारतात भीष्मपर्वाच्या आधी भीष्माने कुठे लढाया मारल्याचे दिसत नाही. अंबेच्या बाबतीत परशुरामाशी झालेले युद्ध वास्तविक झालेलेच नसणार. रामाच्याही आधी होऊन गेलेला परशुराम दर युगात आणलेला आहे, इतकेच. महाभारतात परशुरामाचे कार्य दोन योद्धयांच्या पराभवाला कारण पुरवण्यापुरते ओढून-ताणून आणलेले, कथावस्तूला आवश्यक नसलेले असे आहे. हे कल्पित युद्ध सोडल्यास भीष्म लढल्याचा पुरावा नाही. पांडू वयात आल्यावर राजा झाला, व त्याने दिग्विजय केला. त्या वेळी भीष्म पांडूबरोबर गेला नाही. अशा ह्या भीष्माने म्हातारपणी सेनापतिपदाचा हव्यास का धरला? म्हातारपणी विराटाच्या गाई पळवण्याच्या कटात तो सामील होता, पण त्या वेळी एकट्या अर्जुनाने सर्वांनाच व त्याबरोबर भीष्मद्रोणांनाही- पळवून लावले होते.

 भीष्माचे वय भारतीय युद्धाच्या वेळी कमीत कमीत नव्वद ते एकशे-एक वर्षांचे होते. वयाचा हिशेब असा : भीष्माचा बाप शंतनू ह्याने मत्स्यगंधेशी लग्न लावले, तेव्हा भीष्म युवराज होता, धनुर्विद्या शिकलेला होता. तेव्हा तो सोळा वर्षांचा होता. त्याचा पहिला सावत्रभाऊ चित्रांगद काही वैयक्तिक भांडणात मारला गेला. त्याच्या खालचा भाऊ विचित्रवीर्य लग्नाच्या वेळेला निदान सोळा वर्षांचा होता असे धरले, आणि तो सत्यवतीला लग्नानंतर दोन वर्षांनी झाला असे धरले, तर विचित्रवीर्याच्या लग्नात भीष्माचे वय चौतीस वर्षांचे होते. लग्नानंतर लगेच विचित्रवीर्य मेला. कुरुवंशाचा उच्छेद होऊ नये म्हणून भीष्माने लग्न करावे, अशी इच्छा सत्यवतीने दाखवली. पण भीष्माने ते न जुमानल्यामुळे व्यासाचा विचित्रवीर्याच्या राण्यांशी व दासीशी संग होऊन धृतराष्ट्र वगैरे तीन मुले झाली. भीष्माचे वय धृतराष्ट्राच्या जन्माच्या वेळी पस्तीस, व पांडूच्या जन्माच्या वेळी छत्तीस तरी होते. पांडूचा राज्यभिषेक व लग्न ही दोन्ही सोळाव्या वर्षी झाली असे गृहीत धरले, तर भीष्माचे वय त्या वेळी बावन्न वर्षांचे होते. पांडू हिमालयात गेल्यावर त्याला धर्म झाला, तो लगेच एक वर्षाने असे धरून चालले, आणि त्यामागून एक वर्षाने भीम व त्यानंतर एक वर्षाने अर्जुन असे मानले, तर अर्जुनाच्या जन्माच्या वेळी भीष्माचे वय पंचावन्न असले पाहिजे.

 अर्जुनाचे वय लग्नाच्या वेळी बाप किंवा आजा यांच्याप्रमाणे सोळा वर्षांचेच नसावे, असे त्याने केलेल्या द्रुपदपराभव वगैरे गोष्टींवरून वाटते. पण तरीही ते सोळा वर्षांचे होते असे समजले, तर त्या वेळी भीष्माचे वय एकाहत्तर येते. द्रौपदी-स्वयंवरानंतर पांडव इंद्रप्रस्थाला गेले. तेथून अर्जुन पहिल्या वनवासाला गेला. वनवास सरता-सरता त्याने द्वारकेला जाऊन सुभद्रेशी लग्न केले आणि तो इंद्रप्रस्थाला आला. नंतर त्याचा मुलगा अभिमन्यू ह्याचा जन्म झाला. अर्जुनाचा हा पहिला वनवास बारा वर्षांचा होता, असे महाभारतात म्हटले आहे. त्याऐवजी तो बारा महिन्यांचाच होता असे धरून चालले, तर अर्जुनाला अभिमन्यू अठराव्या वर्षी झाला, असे समजावे लागेल. इंद्रप्रस्थात राजसूय यज्ञ झाला, त्या वेळी जे वैभवाचे प्रदर्शन झाले, त्यामुळे चिडून दुर्योधनानेही एक यज्ञ केला. तेवढ्याने समाधान न होऊन दुर्योधनाने पांडवांना द्यूतास बोलाविले व सर्वस्व गमावून वनवासाला गेले. त्या वेळी अभिमन्यू तीन-एक वर्षांचा असण्याची शक्यता आहे. वनवास व अज्ञातवास संपल्यावर अभिमन्यूचे उत्तरेशी लग्न लागले, त्यावेळी अभिमन्यू सोळा वर्षांचा, अर्जुन चौतीस वर्षांचा व भीष्म एकोणनव्वद वर्षांचा ठरतो. अभिमन्यूच्या लग्नापासून लढाईच्या सुरवातीपर्यंतचा काळ जेमतेम वर्षांचा होता असे धरले, तर युद्धाच्या वेळी भीष्माचे वय नव्वद वर्षांचे होते; अर्जुनाचा पहिला वनवास बारा वर्षांचा धरला, तर एकशे-एक वर्षांचे होते, ही कालगणना सगळीकडे कमीत कमी वर्षे धरून केलेली आहे. ह्याच्यापेक्षा भीष्माचे वय कमी धरणे शक्य नाही. सगळ्या कुरूंच्यामध्ये तो वयाने मोठा होता. कुरुवृद्ध आणि पितामह अशी त्याची दोन विशेषणे वारंवार येतात. एवढ्या म्हातारपणी सेनापतिपदाचा हट्ट धरणे हे भीष्माच्या लढाईपर्यंतच्या चरित्राशी विसंगत वाटते.

 भीष्माकडे दुर्योधन आला व म्हणाला, “आपण सर्वांत वडील; नामवंत योद्धे. आपण सेनापती व्हावे."

 भीष्माने स्वतःसाठी म्हणून जे होते, त्याचा त्याग केला; पण एक मोठी जबाबदारी शिरावर घेतली. ती म्हणजे कुरुकुलाचे रक्षण. हे रक्षण करताना त्याला कोणाशी लढाई द्यावी लागली नाही. पण दोन पिढ्यांचा संसार संभाळावा लागला. त्याने लहानांचा संभाळ केला, आंधळ्या अपंगांचीसुद्धा लग्ने लावून दिली. पांडव-धुतराष्ट्र लहान असताना, तीन पिढ्यांत पहिल्यांदाच हस्तिनापुराच्या राजघराण्यात बरेचसे तरुण राजपुत्र जन्माला आले असताना, त्यांना वाढवण्याची व शस्त्रविद्या शिकवण्याची व्यवस्था केली. दोन पिढ्या अव्याहत कर्तेपणा गाजवला. त्याच्या अधिकाराला पहिला शह शकुनीच्या येण्यामुळे उत्पन्न झाला. शकुनी आपल्या आंधळ्या मेहुण्याच्या व डोळ्यांवर कातडे ओढलेल्या बहिणीच्या हितास जपत होता. शकुनी नसता, तर भीष्माने आपल्या अधिकारात राज्याची वाटणी केली असती. पण मुले जशी मोठी झाली, तसतसे भांडण विकोपाला गेले, व शेवटी युद्धाशिवाय भांडण थांबत नाही, असे झाले. खरोखर भीष्माचीच मुले-नातवंडे असती, तर कदाचित ती सत्यवतीप्रमाणे वनात गेला असता. स्वतःसाठी म्हणून जो संसार मांडलेला असतो, त्यातून मन काढून घ्यावे, हा दंडक आहे. पण लोकांच्या जबाबदाऱ्या पत्कारल्या की मन त्यात जास्तच गुंंतून पडते. म्हातारे झाले की मुले बाजूला सारतात. तेव्हा आपण होऊनच बाजूला सरण्याचा शहाणपणा सुचतो. पण देशाला, संस्थेला, जनसेवेला वाहून घेतलेले लोक वानप्रस्थ स्वीकारताना फारसे दिसत नाहीत. स्वतःचा संसार सोडला नाही, तर लोक म्हणतात, म्हाताऱ्याला लोभ सोडता येत नाही; पण स्वतःच्या संसारावर पाणी सोडून इतरांच्या संसाराचा भार पत्करला, म्हणजे हे बंधन नाहीसे होतेसे दिसते. जिवात जीव असेपर्यंत कुटुंब संभाळलेच पाहिजे, अशी भीष्माची भूमिका होती व सेनापतिपद स्वीकारून, कर्णाला दुखवून बाजूला सारण्यातही हाच हेतू होता.

 स्वत:च्या न ऐकणाच्या मुलांना राजा शिक्षा करू शकत असे. भीष्माला ते शक्य झाले नाही. सत्यवतीची मुले मेली, तिने ‘प्रतिज्ञा सोडून लग्न कर व राज्यावर बैस,' अशी भीष्माला गळ घातली. कुरुकुलाचे एवढे प्रेम होते, तर त्याने ते का ऐकले नाही? शिशुपालाने अगदी हाच प्रश्न केला होता. मागे कर्तव्याबद्दल जे म्हटले, ते येथे लागू पडते. भीष्माने एक फार मोठी प्रतिज्ञा करून बापाकडून व इतरांकडून अतोनात प्रशंसा मिळवली होती. आपले असे एक व्यक्तिमत्त्व तयार केले होते. लोकांच्या मनात स्वतःबद्दल काही अपेक्षा निर्माण केल्या होत्या. त्या सर्व पूर्ण करणे त्याला प्राप्त होते. ब्रह्मचर्याची शपथ घेऊन कॅथॉलिकांच्या मठात शिरण्यासारखा तो प्रकार होता. मनात घेतलेली शपथ मोडता येते. चार-चौघांसमक्ष देखावा उभा केला की त्याला चिकटून बसावेच लागते. त्याचप्रमाणे आपली स्वतःची अशी एक भूमिका तयार झालेली असते, ती 'स्व'ला सोडता येत नाही. आतून व बाहेरून असे दोन्हीकडून भूमिका वठवण्याचे दडपण येते. ज्या कार्यासाठी भूमिकेचा स्वीकार केला. त्या कार्याचा परिपोष होत नाही, नव्हे, सर्वनाश होत आहे, हे दिसत असताही माणूस भूमिका सोडू शकत नाही. गांधरीचे डोळे बांधणे, भीष्माचे ब्रह्मचर्य, रामाचा वनवास ही व अशी अनेक उदाहरणे देता येतील. प्रतिज्ञापालन हा एक मोठा गुण होऊन बसला होता. प्रतिज्ञा कशासाठी केली, ह्याचा विचार सर्वस्वी मागे पडला होता. नवऱ्यामागे सती जाणाऱ्या कित्येकांच्या मागे असेच सामाजिक दडपण असणार. आचारांमागची भूमिका काय, तीत साधले काय, कोठल्या मूल्यांची जोपासना झाली, हा विचार मागून आलेल्या टीकाकाराला करणे सोपे. प्रत्यक्ष त्या काळात ती भूमिका वठवणाऱ्याला ते शक्य नसते. भूमिकांच्या ठामपणात एक प्रकारचे प्रवाहपतितत्त्व असते. तसे तर भीष्माचे झाले नसेल ना? अशा प्रसंगांमुळेच अतिमानुष व्यक्तीसुद्धा दुबळी वाटू लागते.

 दुर्योधनाला लढाईला प्रोत्साहन देणारे, त्याची बाजू घट्ट धरणारे असे तिघे : शकुनी, दुःशासन व कर्ण. पहिल्या दोघांना बाजूला करणे भीष्माला शक्य झाले नाही. पण त्याने युक्तीने कर्णाला बाजूला काढले व दहा दिवस तो लुटूपुटीची लढाई खेळला. कुलवृद्ध म्हणून पांडवांनी त्याला जो मान दिला नाही, तो देण्याचा उपचार दुर्योधनाने केला. भीष्म हा मान नाकारील, असे त्याला वाटले असले पाहिजे. पण भीष्माने ताबडतोब होकार देऊन सेनापतीपद स्वीकारले. भीष्म मरेपर्यंत दुर्योधनाचे हात बांधल्यासारखे झाले. भीष्म कुलवृद्ध म्हणून पांडवांनाही अवध्यच होता. त्याच्याशी लढणे कठीण नव्हते. पण त्याचे नाते व वय लक्षात घेता ते अशक्य झाले होते. दुर्योधनाला एका बाजूने पेचात टाकून, पांडवांना दुसऱ्या बाजूने पेचात टाकून शक्य तर युद्ध थांबवायचे, असा भीष्माचा प्रयत्न होता. भीष्माने खरोखरच मोठी मुत्सद्देगिरी लढवली होती. पांडव मला मारणे शक्य नाही, हा त्याचा कयास बरोबर होता. दुर्योधन, त्याची भावंडे, मुले, नातवंडे ह्यांना चोपून काढायला, पांडवाना काही वावगे वाटलेले दिसत नाही. अर्जुनापुढे मुख्य प्रश्न होता भीष्म-द्रोणांचा. 'कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन । इषुभिः प्रतियोत्स्यामि' हा त्याचा आक्रोश होता. कृष्णाने एवढी गीता सांगितली, ती ह्या एका बाबतीत फुकटच गेली. पांडवाना भीष्म अवध्य होता पण पांडवांच्या सोयऱ्यांना तो तसा नव्हता. भीष्माच्या वधासाठी शिखंडी जन्माला आला होता. व बापाचा पराभव करून त्याचे अर्धे राज्य हिरावून घेणाऱ्या द्रोणाचा सूड घ्यायला धृष्टद्युम्न जन्माला आला होता. दोघांनीही आपली ठरवलेली कामगिरी बजावली.

 भीष्माचा वध अर्जुनाने करावा, म्हणून कृष्णाने पराकाष्ठा केली. महाभारतात असे दाखवले आहे की, तो दोनदा (तिसऱ्या दिवशी व नवव्या दिवशी) स्वतः भीष्मावर चालून गेला. दोन प्रसंगापैकी पहिला उघड-उघड मागाहून घुसडलेला आहे. नवव्या दिवशी हातात चाबूक घेऊन कृष्ण धावून गेला. अर्जुनाने त्याच्या पायाला मिठी मारून त्याला परतवले व 'मी भीष्माला मारणार नाही, पण रथातून खाली पाडीन,' असे वचन मोठ्या मिनतवारीने धर्म व कृष्ण ह्यांना दिले व दहाव्या दिवशी खरोखरच तसे केले. भीष्माचा योद्धा म्हणून लौकिक होता. आपण पडलो, ते मोठ्या वीराच्याच हातून, हा लौकिक त्याला हवा होता. तो मोठा वीर अर्जुन होता, व हेच नेमके अर्जुनाला नको होते. पण शेवटी नऊ दिवसांच्या कंटाळवाण्या लढाईनंतर तो मोठेपणा त्याला भीष्माला द्यावा लागला. शिखंडीबरोबर भीष्मावर शरसंधान करावे लागले आणि "मला हे जे तीक्ष्ण बाण लागत आहेत ना, ते शिखंडीचे नव्हेत, अर्जुनाचे आहेत," हे म्हणण्याची संधी त्याला द्यावी लागली.

 युद्ध अठरा दिवस झाले. त्यांतील पहिले दहा दिवस खरे युद्ध झालेच नाही. हे दहा दिवस भीष्म लढाई थांबवायचा प्रयत्न करीत होता, हे त्या दहा दिवसांच्या हकीकतीवरून स्पष्ट होते. प्रतिदिवसाची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे :

 पहिला दिवस : कौरवांचे अफाट सैन्य पाहून धर्माला निराशा वाटते. अर्जुन त्याला धीर देतो. पण स्वतःच ऐन सुरवातीला हातपाय गाळतो. कृष्ण गीता सांगून त्याला धीर देतो. धर्म कौरवसैन्यात जाऊन भीष्मद्रोणांना नमस्कार करून येतो. युयुत्सू पांडवांना मिळतो. मोठे युद्ध होते. उत्तर मारला जातो. पहिल्या दिवशी विजयाचे पारडे कौरवांकडे.

 दुसरा दिवस : अर्जुन-भीष्म, द्रोण-धृष्टद्युम्न वगैरेंची युद्ध होतात. कलिंगराज व त्याचा मुलगा ह्या दोघांना भीष्म मारतो. पांडवांना दिवस चांगला गेला.

 तिसरा दिवस : भीम दुर्योधनाला बेशुद्ध पाडतो. सारथी दुर्योधनाला रथातून पळवून नेतो. कौरवांचे सैन्य माघार घेऊ लागते. दुर्योधन शुद्धीवर येऊन सैन्याला सावरतो व भीष्माला दोष देतो. भीष्म सांगतो, ‘पांडव अजिंक्य आहेत, पण मी शिकस्त करीन.' भीष्म त्याप्रमाणे करतो. कृष्ण अर्जुनाला दोष देऊन, रथातून उडी मारून चक्राने भीष्माला मारू पाहतो. अर्जुन त्याला परत आणतो. एकंदर दिवसात पांडवांचा जय.

 चौथा दिवस : दोन्हीकडचे वीर निकराने लढतात. एकंदर दिवस पांडवांना बरा जातो. रात्री दुर्योधन भीष्माला दोष देतो. पांडवांचे- विशेषतः कृष्णार्जुनांचे- दैवी अजिंक्यत्व भीष्म वर्णन करून युद्ध पुरे कर, असे दुर्योधनाला सांगतो.

 पाचवा दिवस : नेहमीप्रमाणे युद्धे होतात, कोणाचाच मोठा विजय होत नाही.

 सहावा दिवस : पाचव्याप्रमाणेच जातो.

 सातवा दिवस : सुरुवातीसच दुर्योधन भीष्माला खूप बोलतो. 'पांडव अजिंक्य आहेत, पण मी शिकस्त करीन,' हे ठरलेले उत्तर भीष्म देतो. निकराची लढाई होते. धर्म 'अजून भीष्माला का मारले नाहीस?' म्हणून शिखंडीला बोल लावतो. हाही दिवस सहाव्या दिवसाप्रमाणेच जातो.

 आठवा दिवस : निकराचे युद्ध होते. कौरवांकडचे शकुनीचे मुलगे व पांडवांकडचा इरावत मारले जातात. भीम धृतराष्ट्राचे पंधरा-सोळा मुलगे मारतो. निकराचे युद्ध चालले असताच संध्याकाळ होते. रात्री दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण ह्यांची मसलत होते. भीष्माला युद्धातून काढून लावण्यास कर्ण सांगतो. दुर्योधन भावांबरोबर भीष्माकडे जातो व निर्वाणीची भाषा बोलतो. भीष्म परत एकदा पांडवांच्या अजिंक्यत्वाचा पाढा वाचतो, पण निकराने लढण्याचे वचन देतो.

 नववा दिवस : भीष्म पराक्रमाने लढतो. अर्जुनाचे चालत नाही, असे पाहून कृष्ण रागारागाने चाबूक घेऊन भीष्मावर चालून जातो. अर्जुन त्याला परतवतो. युद्ध संपते. एकंदर दिवस कौरवांना बरा जातो. रात्री पांडव मसलत करून भीष्मालाच 'तुझे मरण कसे होईल?' असे विचारतात व ‘शिखंडीला पुढे करा' हा उपदेश ऐकतात. कृष्ण अर्जुनाचे मन वळवतो. भीष्माला मारू नकोस, नुसते रथातून पाड, असे तो सांगतो. अर्जुन लाजेने व प्रयासाने कबूल होतो.

 दहावा दिवस : शिखंडी भीष्मावर शरवर्षाव करतो. त्याच्या मागून अर्जुन बाण सोडून भीष्माचे कवच फोडतो. शेवटी डोक्याला बाण लागून भीष्म रथाखाली बाणांच्या खचावर पृथ्वीला अंग न लागता पडतो. भीष्माच्या रथात किंवा रथाजवळ दुःशासन असतो, व भीष्म शेवटपर्यंत त्याच्याशी बोलत असतो.

 लढाई तात्पुरती थांबते. भीष्म परत दुर्योधनाला सांगतो, 'माझ्या मरणाने तुमचे वैर मिटव. तह कर' शेवटी सर्व गेल्यावर कर्ण भीष्माकडे येतो. भीष्म कर्णाला पांडवांकडे जाण्यास सांगतो, पण कर्ण ते नाकारतो.

 एकंदर लढाई अठरा दिवसांची झाली. त्यांतील पहिले दहा दिवस लुटूपुटीची लढाई झाली. लढाईतील बहुतेक दिवशी भीष्म लढाई थांबवण्याची विनंती दुर्योधनाला करीत होता. शेवटी त्याने आपल्या प्राणांचे मोल देऊन युद्ध थांबवण्याचा शेवटचा प्रयत्न केला. तोही व्यर्थ गेला.

 ह्या दहा दिवसांच्या वृत्तांतात काही ठळक विसंगती आहेत. शिखंडीची कथा धर्माला माहीत असली पाहिजे, कारण भीष्माशी शिखंडी दोनदा लढायला आला होता. भीष्म त्याच्याशी लढत नाही, हे सर्वांना माहीत झाले होते. आदल्याच दिवशी 'तू भीष्माला का मारीत नाहीस?' म्हणून धर्माने त्याला छेडले होते. अशा परिस्थितीत भीष्माकडे जाऊन 'तुझे मरण कशात?' हा पोरकट प्रश्न विचारण्याचे कारण नव्हते. भीष्म अजिंक्य आहे, हा समज शेवटपर्यंत टिकवण्यासाठी हा प्रयत्न होता. ह्या अतिवृद्धाला मारावयाचे सर्वांच्या जिवावर येत होते. मेलो, तर अर्जुनासारख्या पहिल्या प्रतीच्या योद्धयाच्या हातून मेलो, हा मोठेपणा भीष्माला हवा होता. कौरवांच्या बाजूने भीष्माला बाजूला टाकणे कठीण होते. पांडवांच्या बाजूने देखाव्यासाठी का होईना, अर्जुनाला भीष्माच्या विरुद्ध उभे करणे कठीण होते. दोन्ही बाजूंनी भीष्म एक अडचणच होऊन बसला होता.

 तिसऱ्या दिवशी कृष्ण रथातून उडी टाकून सुदर्शन हाती घेऊन धावला, हे प्रकरण मागाहून घुसडल्यासारखे वाटते. नवव्या दिवशी तो चाबूक घेऊन धावला, ते प्रकरण योग्य ठिकाणी आले आहे व सर्व प्रसंगही महाभारताच्या पद्धतीने रंगवलेला आहे. थोडक्यात, त्या वेळच्या परिस्थितीला अनुरूप असा. तिसऱ्या दिवशीचा प्रसंग काव्यमय, अतिशयोक्त व कृष्णाचे देवपण वर्णन करण्यात बराच भाग खर्च केलेला असा आहे. बरे, कृष्ण एवढा निकरावर आला, पण अर्जुनावर त्याचा परिणाम झाला नाही, असे म्हणावे लागते. कारण तो भीष्माविरुद्ध उभा राहिला, तो तेथून सहाव्या दिवशी! ही विसंगती नवव्या दिवशीच्या प्रसंगाने राहत नाही. मेल्याशिवाय गत्यंतर नाही, हे भीष्माला समजते. मारण्यास उभे राहिलेच पाहिजे. हे अर्जुनाला उमजते. दहाव्या दिवशी भीष्म पडतो.

 सर्व भीष्मपर्वच मोठे चमत्कारिक आहे. सुरवातीला भीष्म सेनापती झाल्यावर सर्व मिळून भीष्माला संभाळा, अशी आज्ञा दुर्योधनाने दिली.

 लढाईची जी वर्णने आहेत, त्यांवरून असे दिसते की, एका योद्ध्याचे दुसऱ्याशी असे एकास एक युद्ध जसे होत असे, त्याचप्रमाणे बऱ्याच योद्ध्यांचा समूह मिळूनही युद्ध होई. मुख्य लढणारे योद्धे दोन रथांत असत, आणि त्यांना संभाळणारे इतरही पुष्कळ असत. उदाहरणार्थ, शिखंडी लढत असताना त्याच्या संरक्षणार्थ खालीलप्रमाणे व्यवस्था होती :

 अर्जुनाच्या रथाच्या डाव्या चाकाशी युधामन्यू होता; उजव्या चाकाशी उत्तमौजा होता; आणि स्वतः अर्जुन शिखंडीचे रक्षण करीत होता. त्याचप्रमाणे इकडे सर्वांनी मिळून भीष्माच्या रथाचे रक्षण करावे, असे दुर्योधनाने दुःशासनाला बजावले. त्याने सांगितले, "भीष्माचे रक्षण करतील असे रथ तयार ठेवा, आणखी मुख्यत्वेकरून भीष्माचे रक्षण आणि ज्याच्यावर भीष्म शस्त्र चालवणार नाही, त्या शिखंडीचा वध हे तुमचे उद्दिष्ट राहू द्या." दुर्योधनाची मुले स्वतः भीष्माच्या मागच्या बाजूने रक्षण करीत होती, असे एका श्लोकात सांगितले आहे. त्यानंतर निरनिराळ्या देशांचे राजे व सैनिक भीष्माच्या भोवताली राहून त्याचे रक्षण करीत होते, असाही उल्लेख आहे. तेव्हा भीष्म रथात स्तब्ध असून त्याच्यावर शिखंडी बाण सोडतो आहे, किंवा शिखंडीच्या आडून अर्जुन बाण सोडतो आहे, आणि भीष्म त्या बाणांनी घायाळ होऊन प्रतिकार न करता पडला आहे, हे चित्र सर्व वर्णनांशी विसंगत आहे.

 शेवटच्या दिवशी भीष्माच्या रथाला आणि भीष्माला संभाळणारे कोणी दिसत नाही. भीष्म शेवटपर्यंत दुःशासनाशी बोलत होता. अशा वेळी दुःशासन काय करीत होता? सर्वांनाच भीष्म नकोसा झाला होता काय?

 भीष्म सर्वच दृष्टींनी दुर्दैवी. भीष्म मारला गेला नाही. जखमी होऊन पडला. एक, भीष्म इच्छामरणी होता. त्याला उत्तरायण लागल्याखेरीज मरावयाचे नव्हते. दुसरे कृष्णाने अर्जुनाला विनवले होते, 'भीष्माला मारायची जरूर नाही; अर्जुना, त्याला नुसते रथावरून खाली पाड' म्हणजे भीष्मावर जो शरवर्षाव झाला, तो निर्वाणीचा नसून त्याला पाडण्यापुरताच, असे होते.

 ज्या कुलाला जपण्याचा भीष्माने जन्मभर प्रयत्न केला, त्यातील अर्ध्या-अधिक कुलाचा नाश झालेला त्याला जिवंत राहून हालचाल न करता पहावा लागला.

 भीष्म अजिंक्य नव्हता, पण अवध्य होता. इतर शूरांप्रमाणे ताबडतोबीचे मरणही त्याच्या नशिबी नव्हते. शरशय्येवर पडून उघड्या डोळ्यांनी त्याला संहार बघावा लागला. उघड्या कानांनी कुरुस्त्रियांचे रडणे ऐकावे लागले. ही विटंबना पुरी वाटली नाही म्हणूनच की काय, महाभारतात भर घालणाऱ्या मागाहूनच्या लोकांनी शांतिपर्वाचे चऱ्हाट त्याच्या तोंडून वदवले.

 म्हणजे भीष्माने प्रतिज्ञापालनाने साधले काय, हा प्रश्न उरतोच.

 मे, १९६५