Jump to content

युगान्त/परिशिष्ट

विकिस्रोत कडून
(युगान्त/ परिशिष्ट पासून पुनर्निर्देशित)

परिशिष्ट

महाभारतात उल्लेखिलेले काही समाज

  1. वैदिक समाज : मानववंशाबद्दल काही विशिष्ट कल्पना मनात बाळगल्या नाहीत, तर ह्या समाजाला 'आर्य' म्हणावयास हरकत नाही.
    ह्यात मुख्यत्वे तीन प्रकार : ब्राह्मण, क्षत्रिय व विश्. ब्राह्मण, क्षत्रिय व विश् ह्या तिघांचे चाकर, दास, दासी वगैरे, ते शूद्र. फक्त ब्राह्मण व क्षत्रिय यांचे परिचारक, पुष्कळदा क्षत्रियांना अति जवळचे असे, ते सूत (उदा. विदुर, संजय, सुदेष्णा वगैरे).
  2. वरील गटाशी मित्रत्वाचे वा शत्रुत्वाचे नाते असलेला गट नाग. त्याची मुख्य घराणी...
    तक्षक :- खांडववनाचा राजा : पांडवांशी तीन पिढ्यांचे वैर.
    ऐरावत कौरव्य :- ह्याचेच प्राकृत स्वरूप एलापत्त. अर्जुनाची एक बायको उलुपी ह्याच्याच कुळातली.
    वासुकी :- भोगावतीचा राजा. मुलगी जरत्कारू त्याच नावाच्या ब्राह्मणाला दिली. तिचा मुलगा आस्तिक ह्याने मातृकुलाला जनमेजयाच्या सर्पसत्रापासून वाचवले.
  3. दासराज :- गंगेवर नौका चालवणाऱ्या, मासे धरणाऱ्या लोकांचा राजा. ह्याची मुलगी काली-सत्यवती- मत्स्यगंधा हिचे लग्न शंतनूशी झाले. ही धृतराष्ट्र-पांडूची आजी.
  4. पक्षिकुलाची नावे असलेले नागेतर अरण्यवासी लोक. शार्ङ्गी नावाच्या बाईला ब्राह्मणापासून झालेल्या संततीला अर्जुनाने खांडवदाहाच्या वेळी जीवदान दिले.
  5. अरण्यवासी राक्षस (?)- हिडिंब, बक वगैरे.
    ह्यातील एका बाईशी- हिडिंबेशी भीमाचे लग्न झाले. त्यांचा मुलगा घटोत्कच लढाईत मारला गेला.
  6. मणिपुरचा राजा व प्रजा. मुलगी चित्रांगदा हिचे अर्जुनाशी लग्न झाले. ती व तिचा मुलगा तिच्या माहेरीच राहत होती. मातृप्रधान घराणे होते काय ते कळत नाही.

 यदुवंश संबंध वंश दिला नाही. मुख्य-मुख्य नावे दिली आहेत. वंश फार विस्तारलेला व पुराणात त्याबद्दल एकवाक्यता नाही असा आहे. महाभारतात कोठेही ह्या वंशाची संगतवार माहिती नाही. हरिवंशात फारच घोटाळ्याची व चुकीची माहिती आहे. वरील वंशावळ निरनिराळ्या पुराणांचा अभ्यास करून पार्गिटरने आपल्या 'जनरल सर्व्हे ऑफ एन्शंट इंडियन हिस्टॉरिकल ट्रॅडिशन', १९२२, ह्या पुस्तकात दिलेल्या वंशावळीवरून तयार केली आहे. जेथे बापमुलाचे नाते, तेथे उभी ओळ सलग काढली आहे. जेथे जास्त लांब वंशजाचे नाते, तेथे तुटक टिंबांनी दाखवली आहे. चेदी, विदर्भ, भोज, वृष्णी, अंधक, शैनेय हे सर्व पितृकुलाकडून नातेवाईक होते. त्यांची परस्परांत लग्नही होत होती. चेदी व विदर्भ ह्यांनी स्वतंत्र राज्ये स्थापिले. कदाचित मथुरा कंसाच्या मुलांच्या ताब्यात असावी. ह्या वंशावळीवरून कृष्णाची पैतृकनावे (माधव, यादव, सात्वत, वार्ष्णेय, शौरी व वासुदेव) समजतील.

मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलच असायचे, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते. मानवांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री-सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडविलेल्या पाचोळ्यासारखी क्षुद्र, पोरकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात. प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तिलाही तो जाणवला असला पाहिजे, हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते की, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वत:ची व्यथा होते. त्या व्यक्तीच्या द्वारे सबंध मानवतेचे दु:ख आपल्याला खुपत राहते.








 देशमुख आणि कंपनी
(पब्लिशर्स) प्रा. लि.