Jump to content

माहेर - बापाजीच्या हायलींत येती ...

विकिस्रोत कडून

बापाजीच्या हायलींत
येती शेट शेतकरी
दारी खेटराची रास
घरीं भरली कचेरी

गांवामधी दबदबा
बाप महाजन माझा
त्याचा कांटेतोल न्याव
जसा गांवमधीं राजा

माय भीमाई माऊली
जशी आंब्याची साऊली
आम्हाईले केलं गार
सोता उन्हांत तावली

तुझे भाऊ देवा घरीं
नहीं मायबाप तुले
तुले कशाचं माहेर
लागे कुलूप दाराले

भाऊ 'घमा' गाये घाम
'गना' भगत गनांत
'धना' माझा लिखनार
गेला शिक्याले धुयांत

आम्ही बहीनी 'आह्यला'
'सीता, तुयसा, बहीना'
देल्या आशीलाचे घरीं
सगेसाई मोतीदाना

लागे पायाले चटके
रस्ता तापीसनी लाल
माझ्या माहेरची वाट
माले वाटे मखमल

जीव व्हती लाही लाही
चैत्र वैसागाचं ऊन
पाय पडतां 'लौकींत'
शीन जातो निंघीसन

तापीवानी नही थडी
जरी वाहे थोडी थोडी
पानी 'लौकी'चं नित्तय
त्याले अम्रीताची गोडी

माहेरून ये निरोप
सांगे कानामंधि वारा
माझ्या माहेराच्या खेपा
'लौकी' नदीले विचारा !


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.