महाराष्ट्र संस्कृती/स्वातंत्र्ययुद्ध : प्रेरणांची मीमांसा

विकिस्रोत कडून


२५.
स्वातंत्र्ययुद्ध : प्रेरणांची सीमांसा
 


विषम संग्राम
 औरंगजेबासारख्या महाबलाढ्य शत्रूशी उणीपुरी पंचवीस सव्वीस वर्षे मराठ्यांनी जो संग्राम केला त्याचे वर्णन मागल्या प्रकरणात केले. केवळ मराठ्यांच्याच नव्हे, तर अखिल भारताच्या इतिहासातसुद्धा हा संग्राम अद्वितीय ठरतो, असे इतिहातपंडित सांगतात. त्यांचे ते मत अगदी यथार्थ आहे, असे वाटते. सेतुमाधवराव पगडी यांनी म्हटल्याप्रमाणे, मोगलांचे आक्रमण हे एका बादशहाचे आक्रमण होते, तर मराठ्यांचा लढा हा जनतेचा लढा होता. मोगलांचे सर्व सेनापती, सरदार, हे मोठ्या खानदानी घराण्यातले होते, तर मराठ्यांचे सेनापती, सरदार हे मराठा, ब्राह्मण, प्रभू येथपासून रामोशी, बेरड, कोळी येथपर्यंत सर्व जाती-जमातीतून आलेले होते. म्हणजे हा संग्राम मुळापासूनच विषम संग्राम होता. म्हणूनच मोगलांना त्यात संपूर्ण अपयश आले आणि त्यांच्या साम्राज्यसत्तेला पायापासून हादरा बसला.
 अशा या स्वातंत्र्य-संग्रामाचा अवश्य तो सर्व तपशील मागल्या प्रकरणात दिला आहे. आता येथे त्याची सर्व दृष्टींनी मीमांसा करावयाची आहे.

नेतृत्व
 प्रथम या पंचवीस वर्षातल्या काळातल्या मराठ्यांच्या नेतृत्वाचा विचार करू. येथे नेतृत्व या शब्दाचा अर्थ केवळ युद्धनेतृत्व असा नाही, तर सर्व राष्ट्रीय नेतृत्व अशा व्यापक अर्थाने येथे विचार करावयाचा आहे. देशाच्या उत्कर्षाला अवश्य अशी अर्थव्यवस्था काय असावी, याच दृष्टीने धर्माचे स्वरूप काय असावे, समाज- रचनेच्या दृष्टीने आपल्या राष्ट्रात कोणत्या उणिवा आहेत, जनतेच्या राजकीय आकांक्षा कोणत्या असाव्या, अनेकविध विद्यांचे महत्त्व काय, या सर्वांचा विचार, या दृष्टीने समाजाला प्रेरणा देणारे नेतृत्व ते व्यापक नेतृत्व होय. शिवछत्रपतींचे नेतृत्व तसे होते; हे त्यांच्या कर्तृत्वाचे विवेचन मागे केले त्यावरून दिसून येईल. त्या दृष्टीने पाहिले तर असा नेता या पंचवीस वर्षात आणि पुढेही महाराष्ट्राला मिळाला नाही हे। स्पष्ट दिसते. या काळात छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम, महाराणी ताराबाई या राजघराण्यातील व्यक्ती आणि रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी, परशुराम त्रिंबक, खंडोजी बल्लाळ, असे मंत्री, सरदार हे मराठ्यांचे नेते होते. यांच्यात शिवछत्रपतींच्या तोडीचा तर कोणी नव्हताच, पण तसे त्या जातीचे सर्वांगीण नेतृत्व करणाराही कोणी नव्हता, हे ध्यानात घेतले पाहिजे. शिवछत्रपतींच्या- सारखा युगपुरुष वरचेवर होत नसतो. पण त्या जातीचे थोडे कमी दर्जाचे नेतृत्वही मराठ्यांना लाभले नाही. त्यांनी असामान्य शौर्य गाजवून स्वातंत्र्ययुद्ध जिंकले, याबद्दल त्यांचा गौरव केला पाहिजे, यात शंका नाही. पण राष्ट्रीय नेतृत्वाच्या दृष्टीने ते कोठे उणे पडले याचीही चिकित्सा केली पाहिजे.

नवे कर्तृत्व
 यांतील शंभुछत्रपतींच्या नेतृत्वाविषयी वर विचार केलाच आहे. त्यांनी चौफेर नजर राखून सर्व आघाड्यांवर औरंगजेबाशी लढा दिला, ही त्यांची कर्तबगारी फार मोठी होय. शिवाय, एकदा ते मोगलांना मिळाले होते, तसा मोह त्यांना पुन्हा झाला नाही, हे महाराष्ट्राचे महद्भाग्य म्हटले पाहिजे. तसे झाले असते तर सगळाच ग्रंथ आटोपला होता. पण तसा विचार त्यांच्या स्वप्नातही आला नाही. राज्यारोहण केल्यापासून मृत्यू येईपर्यंत, अत्यंत निर्धाराने, त्यांनी मोगलांविरुद्ध लढा केला आणि स्वराज्याचे रक्षण केले. पण याच्याही वर जाऊन राष्ट्रधर्माची प्रेरणा देऊन नवे कर्ते पुरुष त्यांना निर्माण करता आले नाहीत. जुन्यापैकी अनेक कर्ते पुरुष त्यांनी मारून टाकले आणि हंबीरराव मोहित्यांसारखे जे त्यांच्याशी एकनिष्ठ होते ते कालवश होताच मराठ्यांचा लढा ढिला पडला. आणि १६८६ सालापासून एकेक गड ढासळू लागला. मोगलांनी पुढल्या दोन-तीन वर्षात बहुतेक गड फितुरीने घेतले. राष्ट्रधर्माची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य छत्रपतींच्या ठायी असते तर असे घडले नसते. पण याहीपेक्षा एक गोष्ट मनाला खटकते ती ही की त्यांच्या वधानंतर रामचंद्रपंत अमात्यादी जे पाचसहा थोर नेते उदयास आले ते, शिवकालापासून स्वराज्यकार्य करीत असूनही, शंभुछत्रपतींच्या वेळी पराक्रम करू शकले नाहीत. शंभुछत्रपती हे उग्रप्रकृती होते, असे इतिहास सागतो. त्यांच्या या प्रकृतीमुळे शिवकालात उदयास येत असलेले कर्ते पुरुष दबकून राहिले, असे दिसते. आणि त्या स्वभावामुळेच नवे कर्तृत्व त्यांना निर्माण करता आले नाही.

रामचंद्रपंत
 त्यानंतर छत्रपती राजाराम गादीवर आले. त्यांच्या ठायी फारसे कर्तृत्व नव्हते, पण आपल्या उदार व त्यागी वृत्तीमुळे कर्ती माणसे एकठाय आणून त्यांची जूट काही काळ टिकविण्यात त्यांना बरेच यश आले. पण वरील काळात, लोकांत खरे चैतन्य निर्माण झाले ते शंभुछत्रपतींच्या अलौकिक आत्मबलिदानामुळे, हे मागे सांगितलेच आहे. यावेळी ज्या पाचसहा पुरुषांनी देशाची धुरा सांभाळली त्यांच्यांत रामचंद्रपंत अमात्यांचे स्थान मोठे आहे. या काळाचा खरा शास्ता हाच होता. स्वराज्यरक्षणाच्या सर्व योजनांची आखणी करावयाची आणि सर्व गुणी माणसे एका बंधनात ठेवून त्यांना कार्यान्वित करावयाचे हे शासकाचे फार मोठे कार्य रामचंद्रपंताने या वेळी केले. शिवछत्रपतींचे तत्त्ज्ञान व धोरण काय होते हे त्याने पुरे आत्मसात केले होते. त्यावर तर 'आज्ञापत्र' हा छोटासा ग्रंथच याने लिहिला होता. ते सर्व तत्त्वज्ञान त्याला त्या परिस्थितीत प्रत्यक्षात आणता आले नाही. पण ते पुढे ठेवूनच त्याने राज्यकारभार चालविला. यामुळेच मोगलांना कडवा प्रतिकार करण्यात मराठ्यांना यश आले. राजाराम महाराजांनी त्यांचा हाच गौरव केला आहे. 'त्यांनीही- रामचंद्रपंतांनी- निष्ठापूर्वक वर्तोन स्वामींचे राज्य तांब्राक्रांत झाले होते ते संपूर्ण यथापूर्व हस्तगत केले,' असे त्यांनी म्हटले आहे.
 शासकीय कारभारात याच प्रकारचे कार्य शंकराजी नारायण व परशुराम त्रिंबक यांनी केले. मावळ भाग आणि औंध पन्हाळा भाग ही यांची कार्यक्षेत्रे होत. हे दोघेही रामचंद्रपंत अमात्य याच्याच हाताखाली प्रारंभी होते आणि आताही त्याच्याच हाताखाली काम करीत होते. परशुराम त्रिंबकाविषयी लिहिताना, 'परशुरामपंताने लोकांचे ठिकाणी स्वराज्याभिमान जागृत करून मिरजेपासून रांगण्यापर्यंतचा प्रदेश मोगलांपासून सोडविला,' असे नानासाहेब सरदेसाई यांनी म्हटले आहे. याविषयी अधिक तपशील मिळता तर बरे होते. असो. हे दोघे प्रशासनाप्रमाणेच रणांगणावरही मर्दुमकी गाजवीत. यामुळे त्या काळी त्यांचा उपयोग विशेष झाला.

संताजी
 रणांगणावरचा अग्रेसर नेता म्हणजे संताजी घोरपडे हा होय. त्याच्या पराक्रमाचे वर्णन मागे केलेच आहे. त्याच्या योग्यतेविषयी लिहिताना नानासाहेब म्हणतात, 'विस्तीर्ण भूप्रदेशावर प्रचंड फौजा नाचवून शत्रूस हटकून गोत्यात आणणारा संताजी- एवढा कुशल सेनानी बहुधा क्वचित आढळतो. त्याचे हुकूम असंदिग्ध व सुटसुटीत असत. अवज्ञा करणारास तो निष्ठुर शासन करी. तो शिवाजीच्या शिस्तीत मुरलेला असून, तिचेच अनुकरण करण्याचा तो प्रयत्न करी. परंतु त्याचे चीज करणारा शिवाजीसारखा धनी त्यास मिळाला नाही ही दुःखाची गोष्ट आहे.'

धनाजी
 धनाजी जाधव हा असाच मोठा सेनापती होता. औरंगजेब मराठ्यांचे किल्ले घेण्याच्या उद्योगात असताना, मोगलांची रसद तोडणे, त्यांचा खजिना लुटणे, त्यांच्या वाटा रोखणे, त्यांच्या लहान लहान तुकड्या गारद करणे, त्यांना हुलकावीत नेऊन शेकडो कोसांची धावपळ करावयास लावणे, असे गनिमी युद्ध करून त्याने मोगलांना दे माय धरणी ठाय करून टाकले. संताजीच्या मृत्यूनंतर दहा वर्षे पर्यंत धनाजीनेच आपल्या रणकौशल्याने मराठ्यांना जय मिळवून दिला.
 नेमाजी शिंदे, हणमंतराव निंबाळकर या दोन सरदारांनीही या स्वातंत्र्ययुद्धात संताजी- धनाजींच्या खालोखाल पराक्रम केला आहे. नेमाजी शिंदे, खानदेश, वऱ्हाड, माळवा या भागात सतत संचार करून, मोगली लष्करावर हल्ले चढवीत असे. सय्यद हसन अलीखान, शर्जाखान असे सरदार त्याने पाडाव केले आणि १७०४ मध्ये नर्मदा ओलांडून सिरोंजपर्यंत धडक मारली. हणमंतराव निंबाळकर प्रथम मोगलांच्या पदरी होता. १६९२ साली तो मराठ्यांना मिळाला. पण मग त्याने मोठाच पराक्रम केला. त्याचा मोगलांना इतका धाक होता की त्याचा मृत्यू (१७०५) हे मोगलांचे महद्भाग्य होय असे त्या काळचा इतिहासकार भीमसेन सक्सेना याने म्हटले आहे.

वतन लोभ
 मराठ्यांनी असा हा असामान्य पराक्रम केला आणि स्वातंत्र्यसंग्राम जिंकला, याचा गौरव आपण वर केलाच आहे. पण आता याची दुसरी बाजू पाहिली पाहिजे. मराठ्यांनी हा जो पराक्रम केला त्याच्या मागे वतनाचा लोभ ही फार मोठी प्रेरणा होती. शिवछत्रपतींचे वतनाविषयी काय धोरण होते हे मागे सांगितलेच आहे. त्यांनी जुनी वतने फारशी खालसा केली नाहीत. पण नवा वतनदार वर्ग निर्माण होऊ द्यावयाचा नाही, असा कटाक्ष ठेवला होता. आणि त्यांनी केलेले बहुतेक कर्ते पुरुष रोख पगार घेऊनच कार्य करीत असत. स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रभक्ती हे भाव जागृत करून शिवछत्रपतींनी त्यांना वतनलोभ जिंकावयास शिकविले होते. पण या भावनांचा आदर्श समोरून नाहीसा होताच मराठ्यांच्या ठायींची सुप्त वतनासक्ती उफाळून वर आली. आणि राष्ट्रभक्ती वाऱ्यावर सोडून देऊन अनेक मराठे वतने वाचविण्यासाठी व मिळविण्यासाठी मोगलांना जाऊन मिळाले.
 याविषयी लिहिताना सेतुमाधवराव पगडी म्हणतात, मोगलमराठा संघर्षकाळात देशमुख, देसाई, पाटील, कुळकर्णी इ. वतनदारांनी मोगलांच्या समोर माना वाकवून आपली वतने टिकविली; इतकेच नव्हे तर वतनापायी ते स्वकीयांशी लढलेही. मराठ्यांची सरशी झाली की त्याच्याकडे जाऊन आपल्या वतनाच्या सनदा ते बहाल करून घेत. आणि मोगलांची सरशी झाली की त्यांच्याकडून सनदा घेत. त्यांच्या कैफियती पाहता, त्यांना फक्त आपल्या वतनाची काळजी होती, असे वाटल्यावाचून राहात नाही.

फितुरी
 मसूरच्या जगदाळ्याचे उदाहरण प्रसिद्ध आहे. १६८७ साली महादजी जगदाळे याने संभाजी महाराजांच्याकडून मसूरची देशमुखी कायम करून घेतली. १६८९ साली त्या भागात मोगल येताच त्याने मोगलांची ताबेदारी पतकरली. १६९० साली संताजी घोरपडे याने महादजीला पकडले. पण तेथून सुटल्यावर त्याने जिंजीला जाऊन राजाराम महाराजांकडून देशमुखीची सनद परत मिळविली. आणि १६९९ साली अशाच कारणाने तो परत मोगलांना मिळाला. जेध्यांची गोष्ट अशीच आहे. १६८३ मध्ये बाजी सर्जेराव जेधे वतनरक्षणासाठी मोगलांना मिळाला. त्यावर संभाजी महाराजांनी रागावून त्याला पत्र लिहिले. तेव्हा तो परत नीळकंठ मोरेश्वर पेशवे यांपाशी रुजू झाला. पण महाराजांच्या मृत्यूनंतर खोपडे व वतनदारामागोमाग जेधेही मोगलांना मिळाला. नंतर १६९० साली पुन्हा मराठ्यांना आणि १७०२ साली पुन्हा मोगलांना मिळाला. म्हसवडचा नागोजी माने हा १६८३ पूर्वीच मोगलांना मिळाला. नंतर काही काळ मराठ्यांच्याकडे येऊन पुन्हा तो मोगलांकडे गेला.
 वतनासक्तीमुळे झालेल्या फितुरीची ही ठळक उदाहरणे झाली. कान्होजी व गणोजी शिरके, यशवंतराव दळवी, रायभानजी भोसले, सखाजी डफळे, शंकराजी मल्हार ही अशीच आणखी उदाहरणे आहेत. १६८६ नंतर साल्हेर, रामसेज हे किल्ले मोगलांनी घेतले ते बहुतेक फितुरीने घेतले हे मागे सांगितलेच आहे या सर्वावर कळस चढविला तो सूर्याजी पिसाळाने. त्याने महाराणी येसूबाई, बालराजे शाहू यांसकट रायगड ही राजधानीच मोगलांच्या स्वाधीन केली आणि नंतर तो स्वधर्मत्याग करून मुसलमानही झाला.

विडी पेटते
 पण फितुरीची ही साथ अशा ठळक उदाहरणांपुरतीच मर्यादित नव्हती. ती खोलवर भिनत गेली होती. औरंगजेबाचा मुक्काम तुळापुरास असताना त्याच्या महसूल अधिकाऱ्यांनी देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी इ. वतनदार मंडळींचा, दवंडी पिटून, जमावच छावणीत जमविला. खेड्यांचे, परगण्यांचे, प्रांतांचे वसुलीचे कागद, हक्कासंबंधीचे कागद, जमाबंदीचे कागद हे सर्व घेऊन ही वतनदार मंडळी बादशहाकडे आली आणि आपापले हक्क, वतने यांच्या सदना त्यांनी बादशहाकडून घेतल्या. याचा अर्थ असा की या वतनदारांनी मराठी राजाची सत्ता टाकून औरंगजेबाची सत्ता मान्य केली. आणि याच वेळी, याच छावणीत महाराणी येसूबाई व शाहू यांना कैद करून आणण्यात आले होते. त्या महाराणीची व बालराजांची- त्यांच्यावरील आपत्तीची- कसलीही लाज यांना नव्हती. म्हणूनच सेतुमाधवराव पगडी यांनी या मजकुराच्या परिच्छेदाला 'यांची पेटते विडी' असा मथळा दिला आहे. (इतिहासाच मागोवा, पृ. ५१)

अंदाधुंदी
 बहुसंख्य वतनदारांची ही निष्ठाहीन स्वत्वशून्य वृत्ती पाहताच, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण आणि स्वतः छत्रपती राजाराम यांनी वतनाविषयीचे शिवछत्रपतींचे धोरण नाइलाजाने सोडून दिले. कारण या पेटत्या विडीने सर्व स्वराज्याचीच राख होण्याची वेळ येऊन ठेपली होती. म्हणून, जो पराक्रम करील त्याला वतन मिळेल, असे त्यांनी जाहीर करून टाकले. मराठ्यांनी पुढे जो पराक्रम केला त्याच्यामागे ही प्रमुख प्रेरणा होती. शिवाजी महाराजांनी ज्यांची वतने खालसा केली होती त्यांना ती रामचंद्रपंताने परत दिली आणि 'जो कोणी वतनदार एकनिष्ठा धरून गडकोट हस्तगत करून देईल, या राजाचे ठायी दृढनिष्ठा धरील आणि स्वामीकार्य करून देईल, त्यास इसाफती व वतनभाग चालला असेल तेणे प्रमाणे दुमाला करून लिहोन पाटविणे' असे धोरण ठेविले. यवोदरप्रमाण भूमीसुद्धा कोणाला वतन म्हणून देऊ नये, असे 'आज्ञापत्रा'त रामचंद्रपंताने लिहिले आहे. पण परिस्थितीपुढे त्यास वाकावे लागले. मराठ्यांच्या पराक्रमास उत्तेजन देण्यास तोच एक मार्ग होता. मोगल मुलखातील जो परगणा जो मराठा गडी जिंकील तो त्याला इनाम मिळेल, असे जाहीर झाल्यामुळे शेकडो, हजारो मराठे हातात तलवार घेऊन, घोड्यावर मांड टाकून, धावू लागले. असे करून, त्यांनी मोगलांना धुळीस मिळविले, हे खरे. पण स्वराज्यनिष्ठा ही त्यामागची प्रेरणा नसून वतनलोभ ही असल्यामुळे, प्रचंड गोंधळ उडाला आणि मराठी राज्यातली शिस्त, व्यवस्था कायमची नष्ट झाली.

शिस्त संपली
 थोडी कोठे धनलाभाची अशा दिसू लागली तर लोक किती अनन्वित कृत्ये करतात, फसवणुकी, लबाड्या आणि अत्याचार करतात हे सर्वांना माहीतच आहे. येथे तर वंशपरंपरा मिळणाऱ्या वतनाचा प्रश्न होता. आणि कडक असे शासन कोठेच नव्हते. प्रत्यक्ष कारभार विशाळगडावरून रामचंद्रपंताने करावयाचा आणि वतने जागिरी, पदव्या यांच्या सनदा, फर्माने राजाराम महाराजांनी जिंजीहून द्यावयाची. त्यामुळे सर्वत्र अंदाधुंदी माजली. सरदेसाई लिहितात, कोणाची कोणास दाद राहिली नाही. पाहिजे त्याने उठावे, घटकेत बादशहाकडे जावे, घटकेत रामचंद्रपंत, शंकराजी नारायण यांच्याकडे, तर घटकेत जिंजीला ! खरे बोलावे, खोटे बोलावे, अडचण दाखवून कागद करून घ्यावे, स्वार्थ साधताना कोणतेही अपकृत्य करण्यास कचरू नये, असा अव्यवस्थित कारभाराचा मामला दहावीस वर्षे सारखा चालला. त्यामुळे जी शिस्त मराठी राष्ट्रात शिवाजीने निर्माण केली ती या अंदाधुंदीच्या काळात पार नाहीशी झाली.


फक्त स्वार्थ
 पण एवढ्याने भागले नाही. शंकराजी नारायण, सुंदर तुकदेव, संताजी घोरपडे, धनाजी जाधव हे सरदार या वतनांच्या बाबतीत मन मानेल तशी ढवळाढवळ करू लागले, एकाच वतनासाठी ते परस्परविरोधी पक्ष घेऊ लागले. त्यामुळे त्यांच्यात तट पडले. कलह माजले, काही वेळा तर खऱ्याखोट्याची लाज लोकांनी इतकी सोडली की एकाच वतनाच्या अनेकांना सनदा मिळू लागल्या. रामचंद्रपंतास काही सुचेनासे झाले. जिंजीहून सनदा येत, त्यांचा त्याला मेळच चालता येईना. बरे, छत्रपतींचा हुकुम तर मानला पाहिजे. मग काही तरी करून तो निभावणूक करू लागला. मिळून काय तर जागीर कोणास तोडून द्यावयाची नाही, असा शिवाजीचा कडक नियम लयास जाऊन, मराठी राज्याचे नुकसान झाले. मराठ्यांनी आपत्प्रसंगी बादशहात विरोध केला. पण तेवढ्याने खरी राष्ट्रीय भावना लोकांच्या मनात उत्पन्न झाली असे नाही. जो तो स्वार्थाकरिता धडपडत होता. महाराष्ट्रीयांचा हा स्वभावच बनला. लालुचीशिवाय ते हलत नाहीत. स्वदेश, स्वराज्य यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे, असे एकाच्याही मनात येत नव्हते. मोबदला घेतल्याशिवाय एकही इसम हालत नव्हता. शिवाजीच्या वेळची राष्ट्रीय भावना यावेळी अगदी मावळली. (स्थिरबुद्धी राजाराम, पृ. ९२- १००)

भालेराई
 आणि यातूनच महाराष्ट्रात भालेराई म्हणतात ती निर्माण झाली. मोगलांनी एखादे ठाणे हस्तगत केले की चार मराठा गड्यांनी जमून, भाले घेऊन जमाव करावा आणि ते ठाणे परत घेऊन लूट करावी आणि पोट भरावे. ना कोणी विचारता, ना नियंता. या अरेरावीमुळे मोगलांस तात्पुरता आळा बसला, पण देशात निर्यायकी निर्माण झाली. रामचंद्रपंत, प्रल्हाद निराजी हे नेते मराठ्यांचा जम बसवू लागले, तेव्हा त्यांच्याच पक्षातील या बिनशिस्ती उपटसुंभांचा त्यांना मोठा उपद्रव होऊ लागला. भालेराई ती हीच. भालेराई म्हणजे अव्यवस्था, अराजक. वतनलोभामुळे ज्याप्रमाणे समाज विघटित झाला तसाच या भालेराईमुळेही झाला.

दुही-यादवी
 वतनलोभ, त्यामुळे स्वत्वशून्यता, त्यातूनच उद्भवलेली फितुरी आणि बेशिस्त असे फार मोठे दुर्गुण मराठ्यांच्या ठायी या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात निर्माण झाले व मूळचे दबलेले फिरून उफाळून वर आले. पण याहीपेक्षा जास्त घातक असा दोष म्हणजे दुही आणि तीतूनच निर्माण झालेली यादवी हा होय वतनलोभावर छत्रपतींनी त्वरित उपाययोजना केली. वतने सर्रास देऊन त्यांनी मराठ्यांना प्रतिकाराला सिद्ध केले. हा उपाय दोषलिप्त होता हे खरे. पण त्यामुळे सर्व महाराष्ट्र मोगलांविरुद्ध उभा ठाकला आणि त्याने स्वराज्य जिवंत ठेवले हा लाभ काही थोडा झाला नाही. पण दुहीमुळे आणि यादवीमुळे मराठ्यांचा प्रतिकारच मोडून पाडण्याची वेळ आली होती.

दुही हीच प्रकृती
 जगाचा एकंदर इतिहास पाहता दुही, फुटीरपणा, विघटनवृत्ती हीच समाजाची मूल प्रकृती आहे असे दिसते. त्यामुळे जो समाज एकजूट, संघटना करतो तो सर्वत्र विजयी होतो. युरोपात ब्रिटन परमोत्कर्ष पावले त्याचे एक कारण म्हणजे त्याने केलेली एकतेची उपासना. ब्रिटनचे हे यश इतके अपूर्व आहे की इतिहासपंडित जगातला तो एक चमत्कार मानतात. अलीकडच्या काळात जपान हे तसे राष्ट्र आहे. पण एकंदर इतिहासात हे अपवादच मानावे लागतात. आपल्या चालू मध्ययुगीन काळातल्या भारताचा विचार केला तर काय दिसेल ? रजपूत एवढे पराक्रमी, ध्येयवादी, तेजस्वी; पण त्यांना संबंध राजस्थान संघटित करणे कधीही साध्य झाले नाही. त्यामुळे त्यांचे सर्व सद्गुण मातीमोल झाले. शिखांची तीच अवस्था. त्या मानाने विजयनगरला पुष्कळच यश आले. शिवछत्रपतींच्या आधी तीनशे वर्षे मराठे छिन्नभिन्न स्थितीत होते. छत्रपतींनी या समाजाला संघटित करताच महाराष्ट्रात स्वराज्य आले. ती संघटनवृत्ती त्यांच्या मागे त्या प्रमाणात टिकली नाही. म्हणून मराठ्यांना अपेक्षेइतके उज्वल यश आले नाही.

दोन पक्ष
 शिवछत्रपती जाताच प्रथम सोयराबाई व संभाजी असे दोन पक्ष पडले. त्यामुळे अनेक कर्ती माणसे व्यर्थ प्राणास मुकली. संभाजी महाराजांनी फार अल्पावधीत प्रतिपक्ष निष्प्रभ करून टाकला. त्यामुळे पुष्कळच सावरले. पण ध्येयवाद, राष्ट्रभावना ही जी संघटनेची प्रेरक तत्त्वे त्यांचे संस्कार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नसल्यामुळे अल्पावधीतच विघटनेला सुरुवात झाली. पुढे त्यांच्या धीरोदात्त मृत्यूमुळे आणि महाराणी येसूबाई व छत्रपती राजाराम यांच्या विवेकी त्यागवृत्तीमुळे ऐक्यबंधन पुन्हा सजीव झाले. आणि रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी या कर्त्या पुरुषांनी एकजुटीने कार्य करून स्वराज्याचे रक्षण केले. १६९० ते १६९५ या सहा वर्षात मराठ्यांनी जो अद्भुत पराक्रम केला त्याचे श्रेय या नेत्यांच्या ऐक्यवृत्तीलाच आहे. पण दुर्दैवाने या ऐक्याला तडे जाऊ लागले आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होऊ लागले. संताजी व धनाजी हे जे स्वराज्याचा गाडा ओढणारे नरपुंगव, त्यांच्यांतच भेद पडला आणि या दोघा वीरांचे सामर्थ्य शत्रूच्या निर्दाळणास उपयोगी पडावयाचे ते एकमेकांशी झुंजण्यात वाया जाऊ लागले.
 या दोघांमधे वितुष्ट येण्याचे मुख्य कारण म्हणजे सेनापतिपदाविषयीची दोघांची आकांक्षा हे होय. धनाजीला ते पद हवे असताना, राजाराम महाराजांनी ते संताजीला दिले आणि येथूनच दुराव्याला सुरुवात झाली. दुसरे कारण म्हणजे त्या दोघांचे स्वभाव. संताजी हा शिस्तीचा कडक भोक्ता होता. लष्करातली शिवछत्रपतींची स्त्रियांविषयीची, लुटीविषयीची शिस्त काटेकोरपणे पाळली पाहिजे, असा त्याचा कटाक्ष होता. बेशिस्त माणसाला तो कडक शिक्षा करी, केव्हा केव्हा हत्तीच्या पायाशी देई. या उलट धनाजी होता. तो शूर, पराक्रमी व कुशल सेनानी होता. पण शिस्तीच्या बाबतीत ढिला असे. याचा परिणाम असा झाला की संताजीचे लोक त्याच्यावर रुष्ट असत व त्याला सोडून धनाजीकडे येत. यामुळे वैमनस्य आणखी वाढे. वतने देण्याच्या बाबतीत संताजी व धनाजी पुष्कळदा दोन भिन्न वतनदारांचे पक्ष येत. त्यावरून वाकडेपणा जास्तच होई.
 हे प्रकरण विकोपाला गेले. त्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे संताजीचा एककल्ली व काहीसा उद्धट स्वभाव. राजाराम महाराजांशी सुद्धा तो भांडण करी, मतभेद तीव्रतेने बोलून दाखवी. 'स्वामींच्या समोर मुद्दे घालू नयेत' असे शंकराजी नारायण याने त्याला परोपरीने समजावून सांगितले, तेवढ्यापुरता तो दबे. पण पुन्हा मूळपदावर येई. राजाराम महाराजांना त्याचे ते वर्तन अगदी असह्य झाले आणि शेवटी त्यांनी त्याचे सेनापतिपद काढून धनाजीला दिले. यावेळी राजाराम महाराजांच्या मनात धनाजीने भरवून दिले की संताजी उद्दाम झाला आहे. त्याला मृत्यूची शिक्षा दिली पाहिजे. रामचंद्रपंताला लिहिलेल्या पत्रात राजारामांनी स्वच्छच लिहिले आहे की 'संताजी घोरपडे यांनी स्वामीचे पायाशी हरामखोरी केली आहे. यास्तव त्यास सेनापतिपदावरून दूर केले आहे.'

यादवी
 याच प्रकरणाचा शेवटी विपरीत परिणाम होऊन संताजी व धनाजी यांची जिंजीच्या उत्तरेस आयेवारकुटी येथे प्रत्यक्ष लढाईच झाली. पुढे संताजीचे लोक त्याला हळू- हळू सोडून गेले. आणि तो रानोमाळ भटकू लागला. आणि अशातच नागोजी माने याने त्याचा खून केला. आणि त्याचे शिर बादशहाकडे पाठवून शाबासकी मिळविली. नागोजी मान्यांचा मेहुणा अमृतराव निंबाळकर याला संताजीने हत्तीच्या पायी दिले होते. म्हणून त्याचा त्याने असा सूड उगवला. पण या प्रकरणात एकटा तोच दोषी होता असे नाही. संताजीला पकडून आणावे असा राजारामांनी हुकूमच दिला होता. आणि संताजीचा धनाजी पाठलाग करीत होता. काही कागदपत्रातले उतारे देऊन सरदेसाई यांनी असे दाखवून दिले आहे की संताजीला नाहीसा करण्यात छत्रपती, धनाजी व इतर काही सरदार यांचाही हात होता.
 मुकर्रबखान, लुत्फुल्लाखान, सर्जाखान, कामिमखान, झुल्फिकारखान, अलोमर्दाखान अशा मोठमोठ्या मोगल सेनापतींना ज्याने नामोहरम केले, मोगली लष्कर अनेकवार धुळीस मिळविले, औरंगजेबाचे सारे मनोरथ ढासळून टाकण्याचे बव्हंशी श्रेय ज्याला आहे, त्या थोर सेनापती संताजीचा स्वकीयांकडून खून व्हावा यापेक्षा दुर्दैव ते काय ? मराठ्यांना ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट झाली. याचे कारण पाहता एक गोष्ट स्पष्ट दिसते की या वेळी राष्ट्राला एक शास्ता असा नव्हता. सगळे मालक व सगळे नोकर अशी स्थिती होती. आणि राष्ट्रीय उत्कर्ष हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून कोणी वागत नव्हते. मानापमान, खाजगी द्वेष, सूडभावना, मत्सर, स्वार्थ याच प्रेरणांनी प्रमुख माणसे वागत होती. मोठ्या ध्येयासाठी या भावनांना आवर घालावा, आणि राष्ट्रीय ऐक्य अभंग राखावे हे संस्कार मराठी मनात कधी खोल रुजलेच नाहीत.
 यामुळेच एक लढाई व खून होण्यावर हे प्रकरण संपले नाही. संताजीचे पुत्र, बंधू पुतणे यांचा धनाजीशी दावा चालूच राहिला. इ. स. १७०० साली घोरपडे व धनाजी यांची ब्रह्मपुरीनजीक लढाई होऊन घोरपड्यांचा मोड झाला. पुन्हा एक लढाई १७०१ साली नीरेजवळ होऊन तीत धनाजीचा पराभव झाला. सुदैव असे की या लढाईनंतर धनाजीने घोरपड्यांची भेट घेऊन सख्य केले. त्यामुळे मग संताजीचे पुत्र राणोजी व पिराजी यांनी पुढे स्वराज्यात चांगली कामगिरी केली.

मूळ स्वभावधर्म
 पण विवेक, समंजसपणा, राष्ट्रहितबुद्धी यांचा प्रभाव पडून दुही सांधण्याचे असले प्रकार अपवादात्मकच होत. खालच्या बाजूला वाहात जाणे हा जसा पाण्याचा स्वभावधर्म तसाच विघटित होणे, फुटणे हा बहुतेक सर्व मानवी समूहांचा स्वभावधर्मच होय. या काळात मराठ्यांची तीच स्थिती होती. घोरपडे आणि जाधव यांनी आपली वैरे विसरून परस्परांत स्नेहभाव प्रस्थापित केला. पण त्याच सुमारास राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. आणि वारसाच्या प्रश्नावरून महाराणी ताराबाई यांनी भोसल्यांच्या राजघराण्यात दुहीची बीजे पेरून मराठ्यांच्या स्वराज्याची एकता कायमची भंगून टाकली. शाहूराजांचा गादीवर कसलाही हक्क नाही, माझा मुलगा शिवाजी यालाच गादी मिळाली पाहिजे, असा हट्टाग्रह तिने मांडला व त्यामुळे रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक, धनाजी यांच्यातच दोन तट पडले, हे मागे सांगितलेच आहे. धनाजी व रामचंद्रपंत यांना हे मान्य नव्हते. पण शंकराजी व परशुराम त्रिंबक यांना ताराबाईंनी आपल्या पक्षाला वळवून घेण्यात यश मिळविले. सुदैव एवढेच की रामचंद्रपंत व धनाजी यांनी सवतासुभा मांडला नाही, आणि राज्यरक्षणाच्या कामातून अंगही काढून घेतले नाही. पण रामचंद्रपंताचे कर्तृत्व पहिल्यासारखे पुन्हा केव्हाही दिसले नाही हे खरे आहे.

कपटपत्रे
 अमात्य आणि परशुराम त्रिंबक यांच्यात दुरावा निर्माण होण्याचे आणखी एक कारण म्हणजे औरंगजेबाची कपटविद्या. बादशहाने या दोघांना स्वातंत्रपणे पत्रे लिहिली. त्यांत, 'तुम्ही आमच्या पक्षाला येण्याची इच्छा प्रगट केली, याचा आम्हांला संतोष आहे, यासंबंधीच्या तुमच्याअटी आम्हाला मान्य आहेत', असा मजकूर लिहून, एकाचे पत्र दुसऱ्याच्या हाती पडेल, अशी व्यवस्था केली. यामुळे या दोघांची मने काही काळ कलुषित झाली होती. ताराबाईच्या योजनेला रामचंद्रपंतांनी विरोध केला, तेव्हा तिने त्याच्यावर औरंगजेबाला सामील असल्याचा आरोप केला होताच. त्यात या पत्राची आणखी भर पडून त्या दोघांच्या मनावरचे तणावे वाढतच गेले. तरीही ही माणसे स्वराज्यनिष्ठ राहिली, पुढल्या सात वर्षांच्या काळात महाराणी ताराबाई यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाला सर्वतोपरी साह्य केले. म्हणूनच मराठ्यांना ते युद्ध जिंकता आले. पण तो संग्राम संपला, औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि अजमशहाने मुक्त केल्यावर शाहूराजे परत आले, त्या वेळी मात्र राजघराण्यातील व कर्त्या पुरुषांतील दुही सांधण्यास कोणीच समर्थ झाला नाही आणि मराठ्यांचे स्वराज्य कायमचे पंगू होऊन बसले.

राष्ट्रभाव शून्य
 शाहू राजे परत आले, त्यानंतर मराठमंडळात जी दुही माजली ती फार भयंकर होती. तिच्यातून हे राज्य सावरेल असे त्या वेळी कोणासच वाटत नव्हते. कारण त्या दुहीतून फार घातक अशी फितुरी निर्माण झाली. धनाजी जाधवाच्या मागून त्याचा मुलगा चंद्रसेन जाधव हा काही काल ताराबाईकडे राहतोसे दाखवून पुढे मोगलांना जाऊन मिळाला. आणि त्याच्या मागोमाग दमाजी थोरात, रावरंभा निंबाळकर, घोरपडे, खटावकर असे बडेबडे मराठे सरदार मोगलांना जाऊन मिळाले. म्हणजे काही सरदार शाहूकडे व काही ताराबाईकडे अशा दुहीवर भागले नाही तर दोघांनाही सोडून सेनापतीसकट बहुतेक प्रमुख मराठे सरदार, स्वातंत्र्ययुद्ध जिंकलेले असतानाही, मोगलांना जाऊन मिळाले. आणि त्यांनी छत्रपतींनी निर्माण केलेली राष्ट्रभावना शून्यावर आणून ठेविली. स्वराज्य, स्वधर्म यांचे अद्वैत है समर्थांच्या व शिवछत्रपतींच्या धर्माचे मूलतत्त्व होते. त्याची अल्पसुद्धा, पुसटसुद्धा, जाणीव मराठ्यांना स्वातंत्र्ययुद्ध जिंकल्यावरही राहू नये ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होय. असो. हा पुढचा स्वातंत्र्ययुद्धानंतरचा इतिहास आहे. त्याचे सविस्तर विवेचन पुढच्या कालखंडात येईलच. येथे आता स्वातंत्र्ययुद्धाच्या कालखंडातील संस्कृतीच्या इतर एकदोन अंगांचे विवेचन करून हे प्रकरण संपवू.
 या युद्धकालातली मराठ्यांची युद्धविद्या आणि त्या वेळची वतनदारी व सरंजामदारी यांचे विवेचन वर सविस्तर केले आहे. आता त्या काळची राज्यव्यवस्था व धर्मव्यवस्था कोणत्या स्वरूपाची होती ते पाहू.

राज्यव्यवस्था
 शंभुछत्रपतींनी शिवछत्रपतींची अष्टप्रधान व्यवस्था उधळून देऊन सर्व कारभार कलुषाच्या स्वाधीन केला असा एक रूढ समज आहे. पण तो खरा नाही. त्यांनी राजद्रोही अशा प्रधानांना देहांत शासन दिले हे खरे. पण अष्टप्रधान व्यवस्था त्यांनी मोडून टाकली, असा याचा अर्थ नाही. ती व्यवस्था त्यांनी पहिल्याप्रमाणेच पुढे चालविली होती. मोरोपंत पेशव्यांचा मुलगा निळो मोरेश्वर यास त्यांनी पित्याचे पेशवेपद दिले. त्या पदावर तो शाहूच्या आगमनापर्यंत होता. रघुनाथ नारायण हणमंते कर्नाटकातून आला. त्याला त्यांनी अमात्यपद दिले आणि त्यांच्यामागून त्यांचा मुलगा नारोपंत याची त्यावर नियुक्ती केली. रामचंद्रपंतास सचिवपदी नेमले. प्रल्हाद निराजी यालाच न्यायाधीशाची जागा दिली. दत्ताजी त्रिमळ यास मंत्रिपद दिले. हंबीरराव मोहिते हे सेनापती होतेच. त्याच्या मागून महादजी पानसंबळ त्या जागी आला आणि तोही अल्पावकाशात मृत्यू पावल्यामुळे संताजी घोरपडे यांची तेथे नेमणूक झाली. खंडो बल्लाळ यास चिटणिशी सांगण्यात आली. अगदी नवीन असे प्रधानपद म्हणजे छंदोगामात्याचे. त्या पदी कविकलश याची नेमणूक करण्यात आली.

कविकलश-वर्चस्व
 यांतील कविकलश किंवा कवजी याच्याबद्दल अनेक प्रवाद आजपर्यंत रूढ होते. तो मोंगलाच्या तर्फेच आलेला होता, त्यांना तो आतून फितूर होता, मद्य व स्त्री ही व्यसने त्यानेच संभाजीराजांना लावली आणि शेवटी त्यांना पकडून देण्याची कामगिरीही त्यानेच केली, अशी त्याची प्रतिमा बखरीमुळे जनमानसात इतके दिवस उभी होती. पण या त्याच्या वर्णनात सत्यांश मुळीच नाही, तो छत्रपतींचा एकनिष्ठ सेवक होता, असे अलीकडच्या संशोधकांनी कागदपत्रांच्या साह्याने सिद्ध केले आहे.
 पण अलीकडच्या संशोधकांनी त्याची केलेली वर्णने वाचून कविकलश हा कोणी विशेष कर्तबगार पुरुष होता, असे मुळीच दिसत नाही. मोरोपंत पिंगळे, अनाजी दत्तो, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर इ. पुरुषांचे कर्तृत्व ठळकपणे डोळ्यांत भरते, तसे कविकलशाचे भरत नाही. आणि अशाही स्थितीत त्याला मोठा अधिकार दिला गेल्यामुळे आणि हळूहळू त्याचे वर्चस्व राज्यकारभारात वाढत गेल्यामुळे, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी यांच्या कर्तबगारीला अवसर मिळाला नाही आणि इतर कोणी नवे कर्तबगार पुरुष उदयाला आले नाहीत. वर अनेक वेळा सांगितले आहे की शंभुछत्रपतींना नवे कर्ते पुरुष निर्माण करता आले नाहीत, त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक मोठे कारण असावे, असे निश्चित वाटते. वर निर्देशिलेले सर्व कर्ते पुरुष शिवछत्रपतींच्या हाताखाली होते. राजारामांच्या काळी त्यांनी फारच मोठा पराक्रम केला, हे महशूरच आहे. तरी शंभुछत्रपतींच्या काळी ते निस्तेजच राहिले याचे, कविकलशाचे अवाजवी वर्चस्व, हे कारण असले पाहिजे, असे सहज मनात येते.
 छत्रपती राजाराम यांनी अधिकारग्रहण केल्यानंतर जिंजीला अष्टप्रधानांची नव्याने नेमणूक करण्यात आली. त्यात प्रतिनिधी हे नवे पद निर्माण करण्यात येऊन ते प्रल्हाद निराजी याला देण्यात आले. रामचंद्रपंत याला हुकमतपन्हा हा फार मोठा किताब देण्यात आला. शंकराजी नारायण हा सचिव आणि संताजी घोरपडे हा सेनापती झाला. इतरही प्रधानपदे त्या वेळी भरण्यात आली.

धरबंध नाही
 व्यवहारात याप्रमाणे दोन्ही छत्रपतींच्या कारकीर्दीत अष्टप्रधानांच्या नेमणुका झाल्या, तरी प्रत्यक्ष राज्यकारभार व्यवस्थित चालणे त्या वेळी जवळ जवळ अशक्यच होते. कारण सर्व मुलूख मोगलांनी व्यापला होता आणि पंचवीस वर्षे सतत युद्ध चालू होत. शिवाय वतनलोभामुळे लोक वाटेल ती कृत्ये करीत असल्यामुळे कशाचाच काही धरबंध राहिला नव्हता आणि मुलखाचा राजा दूरदेशी जाऊन राहिला होता ! तेव्हा शेती, व्यापार यांचे संरक्षण, जीवितवित्ताचे रक्षण कायद्याचे पालन, न्यायदान, महसूल हा जो राज्यकारभार तो व्यवस्थित चालणे दुरापास्तच होते.

शुद्धी ?
 धर्माच्या राजकीय व्यवस्थेतही सर्वत्र हीच स्थिती होती. देवळे, मठ, उत्सव यांना दिलेल्या जमिनी, वर्षासने यांची वजावट नेहमीप्रमाणे घालणे कठीणच होते. या क्षेत्रातील एका गोष्टीकडे विशेष लक्ष वेधणे अवश्य आहे, ती म्हणजे शुद्धी किंवा धर्मांतरितांचे परावर्तन. छत्रपतींनी शुद्धीचा पुरस्कार करून बजाजी निंबाळकर, नेताजी पालकर यांना स्वधर्मात परत घेतल्याचे मागे सांगितलेच आहे. शंभुछत्रपतीं नीही शुद्धीसंबंधी आज्ञा दिल्याचे कागदपत्र सापडतात. पण औरंगजेबाने जे फार मोठ्या प्रमाणावर धर्मांतर चालविले होते त्याकडे लक्ष देऊन त्या सर्वांचे परावर्तन करण्याचा कटाक्ष, पंडितराव हा जो प्रधान, याने बाळगलेला दिसत नाही. हे ठळकपणे दिसून येते ते शाहूच्या ऐवजी औरंगजेबाने वाढविलेले प्रतापराव गुजराचे जे खंडोजी व जगजीवन हे मुलगे त्यांना स्वधर्मात परत घेण्याची व्यवस्था कोणीच केली नाही यावरून. त्यांचे वंशज अद्यापही मुसलमानच आहेत ! औरंगजेबाने नेताजीशिवाय साबाजी घाटगे, जानोजी राजे यांना आणि अनेक ब्राह्मणांना सक्तीने बाटविले होते, हे राजवाडे खंड १५ यातील कागदपत्रांवरून दिसून येते. आणि त्याची कडवी धार्मिक वृत्ती पाहता त्याने आणखी शेकडो, हजारो लोकांना बाटविलेले असणार हे उघडच आहे. पण या सर्वांना परत स्वधर्मात घेण्याची व्यवस्था त्या काळी छत्रपती किंवा प्रधान यांनी केली नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होय.

श्रींची इच्छा
 पण एवढ्यावरच हे दुर्दैव थांबले नाही. शिवछत्रपतींनी जी धर्मक्रान्तीची तत्त्वे प्रत्यक्षात आचरिली त्या सर्वांचीच त्यांच्या मागून उपेक्षा झाली. स्वराज्य सेवा हा धर्मच होय, दुष्ट तुरुक यांची सेवा हा अधर्म आहे, कलियुग किंवा कृतयुग हे राजाच्या कर्तृत्वावरच अवलंबून असते, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे ही जी संजीवनीदायक तत्त्वे त्यांचा अखंड प्रचार करणे, त्यांचे सतत संस्कार जनमनावर करणे हे अवश्य होते. पण तसा प्रयत्नसुद्धा कोणी केल्याचे दिसत नाही. मोगली आक्रमण येताक्षणीच अनेक सरदार वतनदार दुष्ट तुरुक यांची सेवा करण्यास सिद्ध झाले. श्रींच्या इच्छेचा त्यांनी विचारही केला नाही. श्रींची इच्छा !

धार्मिक वतनदार
 जी गत छत्रपतींच्या तत्त्वांची तीच समर्थांच्या उपदेशाची. बुडाला औरंग्या पापी, म्लेंछसंहार जाहला, मारता मारता मरावे, कष्टेकरूनि घसरावे म्लेंछावरी, वन्ही तो चेतवावा रे, रामकथा ब्रह्मांड भेदूनि पैलाड न्यावी, ही समर्थांची वचने छत्रपतींच्या काळी लोकांच्या कानावर सारखी पडत होती. सेवकधर्माचा केवढा उत्तम उपदेश समर्थांनी केला होता. आपस्वार्थ करून स्वामीकार्य बुडविणे ही सेवकांची लक्षणे नव्हत. 'फितव्याने बुडती राज्ये,' 'बुडाले ते भेदवाही ते,' 'कार्य करिता काही न मागे, तयाची चिंता प्रभूसि लागे,' हे संस्कार समर्थ व त्यांचे महंत सारखे करीत होते. पण समर्थ जाताच सर्व समर्थ संप्रदाय निष्प्रभ झाला. एवढ्या शेकडो शिष्यांतून त्यांचे कार्य चालविणारा एकही कर्ता महंत निघू नये हे केवढे दुर्दैव. या महंतांनी महाराष्ट्रधर्माचे कार्य तर केले नाहीच, उलट द्रव्यलोभाने ते आपसात तंटे करू लागले. आणि या शिष्यगणांत समर्थांचा पट्टशिष्य उद्धव गोसावी हाही होता. द्रव्यलोभाने देवस्थानच्या व्यवस्थेत भानगडी करणाऱ्या उद्भव गोसावी, गोविंद गंभीर राऊ, जिजोजी काटकर यांसारख्या लोकांना जरब भरणारी संभाजी महाराजांची अनेक पत्रे उपलब्ध आहेत (शिवपुत्र संभाजी, पृ. ४४४). म्हणजे वतनदारांनी वतनासाठी ज्याप्रमाणे तंटे सुरू केले त्याचप्रमाणे महंत, मठपती, पुजारी यांनीही सुरू केले. धार्मिक क्षेत्रातले हे वतनदारच झाले.

तत्त्वलोप
 अशा रीतीने या स्वातंत्र्ययुद्धाच्या वीसपंचवीस वर्षांच्या काळात, राष्ट्रसंघटनेची जी नवी तत्त्वे शिवछत्रपतींनी प्रस्थापित केली होती, आणि ज्यांच्या बळावर त्यांनी नूतनसृष्टी निर्माण केली होती, त्या तत्त्वांचा मराठी मनातून बव्हंशी लोप झाला. हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे आणि त्यासाठी आपण प्राणार्पणासही सिद्ध झाले पाहिजे ही निष्ठा येथे राहिलीच नाही. बाजीप्रभू, मुरारबाजी, तान्हाजी मालुसरे, प्रतापराव गुजर यांच्यासारखे धारातीर्थी पुण्यस्नान केल्याचे उदाहरण एवढ्या दीर्घकाळात एकही घडले नाही. प्रसंग येताच किल्लेदार भराभर किल्ले मोगलांच्या ताब्यात देऊन मोकळे होऊ लागले. राष्ट्रभावना नष्ट झाल्यामुळेच, औरंगजेब दक्षिणेत उतरल्यावर, वतनाला धक्का लागेल अशी शंका येताच, मराठा वतनदार मोगलांना मिळू लागले, म्हणजे बादशहाची सत्ता एकदमच त्यांनी मान्य केली. यामुळेच शिवछत्रपतींचे आर्थिक तत्त्व सोडून देऊन मराठा नेत्यांना लोकांचा वतनलोभ पुरा करावा लागला. यामुळे फितुरीला काहीसा आळा बसला, वतनदार मोगलांऐवजी छत्रपतींसाठी लढू लागले. पण काही दिवस जाताच फितुरी पुन्हा बळावली. या फितुरीमुळे आणि वैयक्तिक मानापमान, लोभ, मत्सर, सूडभावना यांमुळे मराठा संघटना फुटली आणि सर्वत्र दुही माजू लागली. आणि मराठ्यांचे सामर्थ्य आणखी खच्ची झाले. म्हणून द्विरुक्ती करून सांगावेसे वाटते की शिवछत्रपतींनी स्वराज्यस्थापना करताना राष्ट्रसंघटनेची जी महान तत्त्वे या भूमीत नव्याने प्रस्थापित केली होती त्यांचा या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात मराठी जीवनातून बव्हंशी लोप झाला. आणि त्यामुळे स्वातंत्र्ययुद्ध जिंकल्यानंतरही महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल सर्वत्र निराशाच दिसू लागली.
 पण मग स्वातंत्र्ययुद्धाचे फळ अगदी शून्य झाले असे म्हणावयाचे की काय ?

फलश्रुती
 तसे नाही. औरंगजेबासारख्या शत्रूला मराठ्यांनी धुळीस मिळविले हे मराठ्यांचे या इतिहासात जमा राहीलच. मागल्या प्रकरणात पूर्वीच्या मुस्लिमांच्या आक्रमणाच्या वेळची हिंदूंची स्थिती आणि आताची स्थिती यांची तुलना केली आहे. तिचा निष्कर्ष हा अबाधितच आहे. दरवेळी पराभव आणि मुस्लिम सत्तेची स्थापना हा इतिहास आता पालटला. सर्वात बलाढ्य मुस्लिम बादशहा, पंचवीस वर्षे पाय रोवून आक्रमण करून बसला असूनही, मराठ्यांनी अखेर त्याला संपूर्णपणे पराभूत केले आणि मराठ्यांचे स्वराज्य अबाधित राखले याचे श्रेय त्या लढवय्या वीरांना दिलेच पाहिजे. पुढच्या काळात पेशव्यांनी मराठा साम्राज्य स्थापन केले आणि गुजराथ, माळवा, पंजाब, बंगाल, बिहार, कर्नाटक इ. भारतातल्या सर्व प्रदेशांतील मुस्लिम सत्तेची पाळेमुळे खणून काढली. हे कार्य त्यांना करता आले ते मराठ्यांनी हे स्वातंत्र्ययुद्ध जिंकले आणि स्वराज्याचा पाया मजबूत राखला म्हणूनच.
 शिवछत्रपतींनी प्रस्थापिलेली राष्ट्रनिष्ठेची तत्त्वे, धर्मक्रान्तीची तत्त्वे, नव्या अर्थव्यवस्थेची तत्त्वे, समाजपरिवर्तनाची तत्त्वे यांची त्यानंतरच्या काळात जोपासना झाली असती, ती तत्त्वे समाजात रुजली असती तर अखिल भारतात त्यांचा प्रसार झाला असता आणि मराठा साम्राज्याचे हिंदवी साम्राज्यात रूपांतर होऊन ते साम्राज्य अत्यंत दृढ पायावर उभे राहिले असते आणि मग त्याला पाश्चात्य आक्रमकांशीही यशस्वीपणे मुकाबला करता आला असता. पण त्या तत्त्वांची जोपासना स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात झाली नाही, इतकेच नव्हे, तर त्यांची सर्वांना विस्मृती झाली. त्यामुळे छत्रपतींचे भारतासंबंधीचे ते भव्य स्वप्न साकार झाले नाही.

परिवर्तन
 पण एवढे साधले नाही तरी जे साधले ते साधले असे म्हटले पाहिजे. शिवछत्रपतींच्या आधी मराठे पराक्रमी होतेच. पण त्यांचा पराक्रम मुस्लिमांची राज्ये रक्षून वतने मिळविण्यात खर्ची होत होता. आता स्वराज्याचे रक्षण करून वतने मिळविण्यासाठी मराठे पराक्रम करू लागले. हे मानसिक परिवर्तन, ही क्रान्ती काही उपेक्षणीय नाही.