महाराष्ट्र संस्कृती/स्वराज्य आणि स्वधर्म

विकिस्रोत कडून


१८.
स्वराज्य आणि स्वधर्म
 


 महाराष्ट्र राज्य किंवा स्वराज्य हे समर्थांच्या महाराष्ट्रधर्माचे सहावे लक्षण होय. स्वराज्य आणि स्वधर्म यांचा अभेद प्राचीन काळी भारतात मानलेला होता. वेद आणि महाभारत यांत धर्मकारणात राजकारण म्हणजेच स्वराज्य, साम्राज्य यांचा नेहमीच समावेश केलेला आढळतो. महाभारतात तर राजधर्मातच सर्व धर्मांचा समावेश होतो असे सांगितले आहे, याचा निर्देश वर केलेलाच आहे. ही थोर प्राचीन परंपरा मध्यंतरी लुप्त झाली. शास्त्रीपंडितांनी तर धर्म म्हणजे कर्मकांड असाच सिद्धान्त केला आणि मोठमोठ्या पीठांचे आचार्य आणि संत यांनी निवृत्तीच्या अंगावर सर्व भर दिला. त्यामुळे या देशाचे स्वातंत्र्य लुप्त झाले आणि त्याची चिंता कोणीच वाहीनासे झाले. समर्थांना हा अधःपात स्पष्ट दिसू लागला, म्हणूनच त्यांनी मराठ्यांना संदेश दिला - 'महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥' लोकसंघटना, शक्तीची उपासना, प्रयत्न, साक्षेप, सावधता ही सर्वसिद्धता अंतिम प्राप्तव्यासाठीच होती.

मराठ्यांचा राजा
 महाराष्ट्र राज्य करावयाचे असेल तर त्यासाठी प्रथम मराठ्यांचा राजा असला पाहिजे. त्या वेळचे सर्व मराठे सरदार यवन सेवेतच धन्यता मानीत होते. पण भारत भ्रमण संपवून, महाराष्ट्रधर्माचे तत्त्वज्ञान मनाशी निश्चित करून समर्थ महारष्ट्रात आले. त्यावेळी एका थोर राजाचा उदय होण्याची चिन्हे त्यांना दिसू लागली होती. उष:काल झाला होता आणि सूर्योदय निश्चित होणार, अशी आशा निर्माण झाली होती. म्हणून समर्थांनी आपल्या रामवरदायिनी मातेला, तुळजाभवानीला प्रार्थना केली

येकची मागणे आता । द्यावे ते मजकारणे
तुझा तू वाढवी राजा । सीघ्र आम्हांचि देखता ॥

हे मागणे मागताना समर्थांनी मातेला थोडे परखडपणेच बजावले की अनेक दुष्टांचा तू संहार केलास, असे आम्ही पुराणांतरी ऐकले आहे. पण तो तुझा पराक्रम आता आम्हांला प्रत्यक्ष दिसायला हवा आहे. मागल्या कथांवर आम्ही संतुष्ट नाही. ते सामर्थ्य आता प्रत्यक्ष दाखव आणि शिवरायाची राजमुद्रा प्रतिपदेच्या चंद्ररेखेसारखी वर्धिष्णू आणि विश्ववंदिता होऊ दे.

शिवकल्याणराजा
 महाराष्ट्राचा राजा कसा असावा याविषयीचा एक महान आदर्श समर्थांच्या मनात होता. शिवछत्रपतींच्या रूपाने तो प्रत्यक्षात अवतरत आहे, हे दिसताच त्यांना मोटा हर्ष झाला आणि १६४९ साली या शिवकल्याणराजाला एक पत्र लिहून त्यात त्यांनी हे चित्र उभे केले. 'नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती । पुरंदर आणि छत्रपती । शक्ती पृष्ठभागी ॥' पायदळ, घोडदळ, गजदळ, किल्ले, आरमार, सरदार, सेनापती अशी शक्ती या छत्रपतींच्या मागे उभी असावी. या बळावरच तो यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत होतो. त्याच्या राजसभेत पंडित, पुराणिक, कवीश्वर, याज्ञिक, वैदिक आणि धूर्त, तार्किक असे सत्तानायक असावे. शिवछत्रपतींनी हा सर्व संभार जमविण्यास प्रारंभ केला होता. आणि 'कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांस धाक सुटले' अशी त्यांची कीर्ती झाली होती. म्हणून समर्थांनी 'या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा (दुसरा कोणी) नाही ! महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हा करिता ॥' असा गौरव करून शेवटी धर्मस्थापनेची ही कीर्ती संभाळली पाहिजे, असा त्यांना आशीर्वाद दिला.
 श्रेठ कर्त्या राजाची आणखी काही लक्षणे समर्थांनी इतर काही प्रकरणातून सांगितली आहेत. महाराष्ट्राचा राजा स्वयंप्रज्ञ आणि खबरदार असला पाहिजे. तो लोकांच्या गोष्टीने वर्तता कामा नये. 'जो सिकवल्या बोले वर्ततो तो म्हैसमंगळू होय.' अशा राजाच्या राज्यात, 'धणी तो राहिला मागे, कारबारीच नासती.' असा राजा असणे हे लोकांचे पापच होय. 'या लागी सर्व सांभाळी तोचि साहेब नेटका.' आपल्या हुकमतीत त्याने सर्वांना ठेविले पाहिजे. तेणे सौख्य बहूजना.

कार्यकर्ते
 राजाने भोवताली उत्तम कार्यकर्ते जमवून त्यांच्या हातून कामे करवून घेतली पाहिजेत. 'आधी मनुष्य ओळखावे, योग्य पाहून काम सांगावे.' अशा कार्यकर्त्यांच्या गुणे कार्यभाग होतो. शिवछत्रपती स्वतःच दर वेळी सैन्याच्या आघाडीवर असत. समर्थांचा सल्ला असा की 'धुरेने युद्धास जाणे । अशी नव्हेत राजकारणे । धुराच करोनि सोडणे । कित्येक लोक ॥' छत्रपतींनी तान्हाजी, नेताजी, मोरोपंत, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, अण्णाजी दत्तो अशा अनेक धुरा निर्माण केल्या. म्हणूनच त्यांना अल्पावधीत हिंदवी स्वराज्याचा प्रचंड व्याप साधता आला. हे सर्व लोक जिवास जीव देणारे होते. समर्थांनी म्हटले आहे, 'मोहरा पेटला अभिमाना । मग तो जिवास पाहेना । मोहरे मिळवून नाना । वरी चपेटे करी ॥'
 या सर्व उपदेशात समर्थांचे एक महत्त्वाचे सूत्र आहे. 'लोक राजी राखणे.' 'मनुष्य राजी राखणे । हीच भाग्याची लक्षणे.' संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हेच वारंवार सांगितले आहे. 'राजी राखता जग । मग कार्यासी लगबग !' असे लोक पाठीशी असले म्हणजे 'आधी गाजवावे तडाखे । मग भूमंडळ धाके' हे शक्य होते. 'बहुत लोक मेळवावे, एक विचारे भरावे, कष्टे करोनि घसरावे, म्लेंच्छावरी.' आणि या मार्गाचा अवलंब करून 'महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे.'
 हे राजधर्माचे विवेचन झाले. याबरोबरच समर्थांनी क्षात्रधर्म, ब्राह्मणधर्म आणि सेवकधर्म यांचेही विवरण केले आहे. कारण 'मराठा तेवढा मेळवावा' हे त्यांचे अंतिम साध्य होते. सर्व महाराष्ट्र, अखिल जनता त्यांना जागी करावयाची होती. येथे त्यांना राष्ट्र निर्मावयाचे होते. म्हणून सर्वांनाच त्यांनी आपापला धर्म काय ते विवरून सांगितले आहे.

क्षात्रधर्म
 'क्षात्रधर्म' हे त्यांचे एक स्वतंत्र प्रकरणच आहे. क्षत्रियाचा पहिला श्रेष्ठ धर्म म्हणजे प्राणपणाने रणात झुंजणे हा होय. समर्थ म्हणतात, ज्याला जिवाचे भय वाटते त्याने क्षात्रधर्म करू नये, दुसरा काही उद्योग करून पोट भरावे. खरा क्षत्रिय कसा असतो ? 'जैसा भांड्याचा गलोला.' जसा तोफेचा गोळा ! तो जसा निर्भयपणे शत्रुसैन्यावर आदळतो- 'तैसा क्षत्रिय रिचवला । परसैन्यामध्ये.' अशा प्रकारे जिवावर उदार होऊन, 'मारता मारता मरावे । तेगे गतीस पावावे । फिरोनि येता भोगावे ।महद्भाग्य ॥' स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद हा समर्थांच्या मनात किती ठसला होता हे या 'क्षात्रधर्म' प्रकरणावरून दिसून येईल. हे जे युद्ध करावयाचे ते कशासाठी ? धर्मसंस्थापनेसाठी ! हा हलकल्लोळ करावयाचा तो देव मस्तकी धरून करावयाचा. 'देवद्रोही जितुके कुत्ते । ते मारूनि घालावे परते । देवदास पावती फत्ते । यदर्थी संशय नाही ॥' समर्थांनी आपल्या मनाची खंत अनेक परींनी प्रगट केली आहे. 'देवमात्र उच्छेदिला जित्यापरीस मृत्यु आला ॥' अशी सगळ्या देशाची स्थिती झाली आहे. बरे घरी राहून काय मरण चुकणार आहे काय ? 'मरणहाक तो चुकेना । देह वाचविता वाचेना ॥' मग रणांगणात पडलेला देह काय वाईट ? म्हणून 'युद्ध करावे खणखणारे सीमा सांडूनी ॥' आणि 'आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा ॥'

म्लेंच्छसंहार
 आपल्या कार्याच्या प्रारंभी समर्थांनी आपले जे स्वप्न बोलून दाखविले होते त्यातही प्रामुख्याने क्षात्रधर्माचाच उपदेश केलेला आहे. 'त्रैलोक्य चालिल्या फौजा । सौख्य बंदविमोचने । मोहीम मांडीली मोठी । आनंदवनभुवनी ॥ सुरेश उठिला अंगे । शूरसेना परोपरी । विकटे, कर्कशे याने । शस्त्रपाणी महाबळी ॥ कल्पांत मांडला मोठा । म्लेंच्छ दैत्य बुडावया । कैपक्ष घेतला देवी । आनंदवनभुवनी ॥' या मोहिमेचे फळ काय मिळाले? 'बुडाले सर्वही पापी । हिंदुस्थान बळाविले । अभक्तांचा क्षयो झाला । आनंदवन भुवनी ॥ बुडाला औरंग्या पापी । म्लेच्छ संहार जाहला ॥' 'मोडली मांडली क्षेत्रे'– फोडलेली देवळे पुन्हा उभारली. आणि 'उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया.' समर्थांचा यातील अभिप्राय स्पष्ट आहे. मराठ्यांनी संघटित व्हावे, प्रचंड सेना जमवाव्या, मोठमोठ्या मोहिमा काढाव्या आणि म्लेंच्छसंहार करून महाराष्ट्रधर्म वाढवावा, धर्मस्थापना करावी. क्षत्रियांचा क्षात्रधर्म तो हाच ! महाभारतात म्हटलेच आहे की शत्रूचा संहार हाच क्षत्रियाचा धर्म. 'क्षत्रियस्य सदा धर्मो नान्यः शत्रुनिवर्हणात् ।'

राजनीती
  पण क्षत्रियाच्या या बलाला राजनीतीचीही जोड असणे अवश्य असते. या राजनीतीलाच समर्थांनी युक्ती म्हटले आहे. शक्तीलाच प्राधान्य आहे हे खरे. पण शक्ति- युक्ती मिळे जेथे तेथे श्रीमंत नांदती' असा त्यांचा सिद्धांत आहे. म्हणूनच क्षात्रधर्माप्रमाणेच त्यांनी राजनीतीचाही उपदेश केला आहे.
 भारतात राजनीतीची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वेदांत तिचे प्रतिपादन आहे. महाभारतात तर सविस्तर विवेचन आहे. पुढे चाणक्याचे अर्थशास्त्र, शुक्रनीती, कामंदकीय नीतीसार. इ. ग्रंथांतून या राजनीतीचे विवेचन आढळते. पण दहाव्या शतकानंतर ही परंपरा खंडित झाली. डॉ. पां. वा. काणे यांनी म्हटले आहे की यादवांचे मंत्री हेमाद्री, तत्कालीन इतर पंडित यांसारख्यांनी राजनीतीवर ग्रंथ लिहावयास हवे होते. पण ते व्रतवैकल्ये लिहीत बसले. पुढच्या शास्त्री- पंडितांना धर्म म्हणजे काय हे कळण्याचीच पात्रता नव्हती. मराठा सरदारांना राजधर्म, क्षात्रधर्म यांचा विसरच पडला होता. संत हे ऐहिक ऐश्वर्याविषयी उदासीन होते. त्यांना ते सर्व वमनाप्रमाणे त्याज्य होते, म्हणून त्यांनी राजनीतीचे प्रतिपादन कोठेही केले नाही. त्यांच्या भागवत धर्मात ते कोठेच बसले नसते. सुदैव असे की तो राजधर्म, तो क्षात्रधर्म ती राजनीती सांगणाऱ्या समर्थासारख्या पुरुषाचा महाराष्ट्रात उदय झाला.

अविश्वास
 कोणाचा कधीही विश्वास न धरणे हे सर्व राजनीतीचे सार आहे- 'संक्षेपो नीतिशास्त्राणां अविश्वासः परो मतः ।' असे महाभारतात सांगितले आहे. सावधता प्रकरणात समर्थांनी हेच तत्त्व सांगितले आहे. 'कोणाचा भरवसा न धरावा । आपुला आपण विचार पहावा ॥' समर्थ म्हणतात कार्यकर्ते जवळ करावे, पण 'शोधोनि पहावे कपटाविषयी ॥' 'परांतर नित्य पहात जावे. कारण लोकांची मने क्षणोक्षणी बदलत असतात. म्हणून 'पहिलेच पहावे । शोधिलेचि शोधावे । राजकारण ॥'
 राजकारणात धूर्त माणसेच टिकतात, विजयी होतात. येथे भोळेभाबडे, ढिले, गहाळ यांचे काम नाही. महाभारतात निरनिराळी उदाहरणे देऊन हे स्पष्ट केले आहे. घारीसारखी दृष्टी असावी, बगळ्याप्रमाणे निश्चल राहावे, कावळ्याप्रमाणे साशंक असावे आणि सर्पाप्रमाणे वक्रगतीने वागावे. लांडग्यासारखा अचानक हल्ला करावा आणि सशाप्रमाणे निसटून जावे आणि एकंदर सिंहासारखा पराक्रम करावा. तात्पर्यार्थ असा की सिंहाच्या क्षात्रधर्माला कोल्हा, लांडगा, बगळा, सर्प यांच्या राजनीतीची जोड पाहिजे. समर्थांनी निरनिराळ्या ठिकाणी हीच राजनीती सांगितली आहे.
 'ही धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, भोळ्या भावार्थे संभ्रमे, कैसे घडे ।' (दास १९.७) ही धूर्तपणाची कामे आहेत. म्हणून 'राजकारण करावे नेमे, ढिलेपणाच्या संभ्रमे, जाऊ नये ॥' 'दुर्जन प्राणी समजावे । परी प्रगट न करावे । सज्जनापरीस आळवावे । महत्त्व देऊनी ॥' दुर्जनास मनोमन ओळखावे, पण आपण ओळखले आहे, हे यांना कळू देऊ नये. मात्र डाव असा मांडावा की 'तयास देखता दुर्जन धाके । बैसती प्रचीतीचे तडाखे । बंड पापांडाचे वाखे । सहजचि होती ॥' (दास १९.९) अशा लोकांना अद्दल घडविलीच पाहिजे, पण ती गुप्तपणे 'करणे असले जरी अपाय । तरी बोलोनि दाखवू नये । परस्परेची प्रत्ययो । प्रचीतीस ॥'

गुप्तरूपे
 राजकारणात धूर्तपणासारखेच गुप्ततेलाही महत्त्व आहे. 'धूर्तासि धूर्तपण कळले । तेणे मनासि मन मिळाले । परी हे गुप्तरूपे केले । पाहिजे सर्वे ॥' यासाठी 'वेष धरावा बावळा । अंतरी असाव्या नाना कळा ।' धूर्ताशी मैत्री केली तरी ती गुप्तपणे करावी, त्याचप्रमाणे 'उदंड समुदाय करावे । परी गुप्तरूपे ।' संघटना बांधाव्या त्याही गुप्तपणे. आपली बाजू कमजोर असेल तेव्हा नमते घ्यावे. प्रतिपक्षीयांत मिसळावे, पण ते गुप्तपणे, आणि वेळ येताच उलटावे. 'मिळोनि जाऊनि मेळवावे । पडी घेऊनि उलथावे । काहीच कळो नेदावे । विवेक बळे ॥'

धटासि धट
 जशास तसे, हेही राजनीतीचेच एक तत्त्व आहे. परमार्थात ते अगदी वर्ज्य आहे. तेथे गाय आणि वाघ यांशी समबुद्धीनेच वागले पाहिजे. दिव्याने घरच्याप्रमाणे परावीयालाही उजेड दिला पाहिजे. पण ते परमार्थात. व्यवहारात, राजकारणात या धोरणाने सर्वनाश ओढवतो. राजकारणात अवश्य तेथे विश्वासघात केलाच पाहिजे. 'इंद्राने नमुचीशी मैत्रीचा तह करून वेळ येताच त्याला ठार केले' असे सांगून महाभारतकार म्हणतात, हीच 'रिपौ वृत्तिः ।' शत्रूशी वागण्याची नीती सनातन आहे. श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिरा, 'मायावी मायया वध्यः ।' कपटी मनुष्याचा कपटानेच वध केला पाहिजे. पूर्वी देवांनी असुरांना मायेने, कपटानेच जिंकले होते. समर्थांनी म्हटले आहे, तेच- पूर्वी जे मारिले होते- असुर दैत्य आज पुन्हा आले आहेत. तेव्हा, 'धटासि आणावा धट । उद्धटासि उद्धट । खटनटासि खटनट । अगत्य करी ॥ जैशासि तैसा जेव्हा भेटे । तेव्हा मजालसी बरी धाटे ॥' (दासबोध १९.९)
 समर्थांनी उपदेशिलेली राजनीती ही अशी आहे. क्षत्रियांच्या बाहुबलाला या राजनीतीची जोड दिल्यावाचून शत्रूवर विजय मिळविता येत नाही. म्हणून शक्ती आणि युक्ती या दोन्हींचा योग झाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

रमा धर्मसमागमे
 समर्थांनी राजधर्माचे विवेचन केले (राजाची कर्तव्ये असा येथे अर्थ आहे. मागे महाभारतातील राजधर्माचा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ सर्व राजकारण असा आहे.) क्षात्रधर्माचे विवेचन केले आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मणधर्म आणि सेवकधर्म यांचेही प्रतिपादन त्यांनी केले आहे (ते पुढे सविस्तर दिले आहे). पण वर्णाश्रमधर्माचा पूर्ण अभिमान असूनही त्यांनी वैश्यधर्माचे विवेचन कोठे केलेले नाही. त्या काळी क्षत्रिय आणि ब्राह्मण हेच दोन वर्ण समाजात प्रमुख होते, म्हणून समर्थांनी त्यांनाच आवाहन केले, असे विद्वान लोक सांगतात. पण समर्थांनी सेवकधर्माचे जसे विवेचन केले, तसेच वैश्य धर्माचेही करणे अवश्य होते. वैश्यवर्ण त्या काळी अग्रभागी नव्हता, हे खरे. पण ही दुर्दैवाची गोष्ट होती. इ. सनाच्या पहिल्या हजार वर्षात वैश्यवर्ण फारच पुढारलेला होता आणि समाजात त्याला फार मोठी प्रतिष्ठा होती. महाभारतात राजाचे मंत्रिमंडळात चार ब्राह्मण, आठ क्षत्रिय आणि एकवीस वैश्य असावे, असे सांगितले आहे. तीन मंत्री शूद्र वर्णाचे असावे, असेही तेथे आहे. तेव्हा वैश्यधर्माचे प्रतिपादन अवश्य होते यात शंकाच नाही. पण समर्थांनी ते केलेले नाही. मात्र कोश, लक्ष्मी, संपत्ती यांचे स्वराज्याच्या दृष्टीने महत्त्वच त्यांनी जाणले नव्हते असे नाही. 'प्रपंची पाहिजे सुवर्ण' असे त्यांनी सांगितलेच आहे. त्यांनी स्वतःचे स्वप्न जे 'आनंदवनभुवन' या काव्यात सांगितले आहे तेथील वचन जास्त उद्बोधक आहे. म्लेंच्छदैत्य बुडाले, अभक्तांचा क्षयो झाला, आणि मग काय झाले ? तेथुनि वाढल धर्मू- आणि 'रमा धर्मसमागमे !' या वचनाला फार महत्त्व आहे. धर्म आणि रमा म्हणजे लक्ष्मी, संपत्ती यांचा निवृत्तिपंथीय लोक नेहमी विरोध मानतात. पण धर्माबरोबरच लक्ष्मीही वाढली, असे समर्थ म्हणतात. यावरून त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. शिवाय लोकांनी लक्ष्मीवंत व्हावे, असे त्यांनी अधूनमधून सांगितले आहेच. पण वैश्यधर्माचे सविस्तर विवेचन नाही, हे मात्र खरे आहे. (दुर्दैव असे की मराठ्यांना व्यापार, वैश्यधर्म, पेढ्या यांचे महत्त्व त्यांच्या सर्व कारकीर्दीतच कधी नीटसे उमगले नाही. याचा फार मोठा वाईट परिणाम मराठी रियासतीवर झालेला आहे. पण ते विवेचन पुढे येईल.)
 असो. राजधर्म आणि क्षात्रधर्म यांचे समर्थांचे विवरण आपण पाहिले. आता 'ब्राह्मणी करावा स्वधर्म' असे त्यांनी म्हटले आहे त्याचे स्वरूप काय ते पाहू.

नवे नेतृत्व
 ऐहिक ऐश्वर्याची आकांक्षा, प्रपंचाचे महत्त्व, लोकसंघटना, शक्तीची-बलाची उपासना, प्रयत्नवाद, स्वराज्य हे जे महाराष्ट्रधर्माचे तत्त्वज्ञान येथवर सांगितले त्याच्या प्रसारासाठी, ते लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी समर्थांनी महाराष्ट्रात नवे नेतृत्व निर्माण केले, हे त्यांचे अनन्यसामान्य असे कार्य होय. हे नेते म्हणजेच महंत. समर्थांनी केवळ हे नेते तयार केले असे नाही तर त्यांच्याकरवी सर्व महाराष्ट्रभर अनेक मठ स्थापन करून तेथून या नव्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याची व्यवस्था करून ठेवली. भारतात प्राचीन काळी गौतमबुद्धांनी धर्मप्रसाराचा असा संघटित प्रयत्न केला होता. त्याच्या आधी रामाच्या काळी आर्य ऋषी दक्षिणेत जाऊन आश्रम स्थापून वैदिक धर्माचा असाच प्रयत्न करीत असत. पण ती इतिहासपूर्व काळातली गोष्ट होय. तिची तपशिलवार माहिती आपल्याला नाही. ऐतिहासिक काळातला प्रयत्न म्हणजे भगवान गौतम बुद्ध यांचाच होय. त्यानंतर दीडदोन हजार वर्षात असा प्रयत्न झाल्याचे आढळत नाही. सतराव्या शतकात समर्थांनी प्राचीन आर्य ऋषींच्या त्या आश्रमसंस्थेचे पुनरुज्जीवन केले. मठ-महंत ही त्यांची संस्था या स्वरूपाची होती.

मठांचे जाळे
 नवे नेतृत्व निर्माण करण्याचे हे प्रयत्न समर्थांनी अतिशय पद्धतशीरपणे केले. दिनकरस्वामी, गिरिधरस्वामी, आत्मारामस्वामी असे काही महंत त्यांना मिळताच, त्यांनी अनेक ठिकाणी मठस्थापना केली आणि महंतांना एक आज्ञापत्र काढले व त्यांना सांगितले की आपल्या सोयऱ्याधायऱ्यांची, निकटवर्तीयांची, बुद्धिमान, चलाख मुले आपल्या भोवती जमवा. त्यांच्या सुखदुःखाशी एकरूप व्हा, त्यांची परीक्षा करा आणि त्यांतली निवडक मुले आमच्याकडे पाठवा. 'मग तयाचा सकळ गोवा आम्ही घेऊ' (श्री सांप्रदायिक विविध विषय, खंड १ ला, शं. श्री. देव). 'महंते महंत करावे, युक्ति बुद्धीने भरावे, जाणते करूनि विखरावे, नाना देसी ॥' अशी ही योजना होती. एका महंताने आणखी महंत तयार करावयाचे व सर्व देशभर मठांचे जाळे विणावयाचे. गिरिधरस्वामींनी समर्थप्रतापात दिलेल्या माहितीप्रमाणे, हे बहुतेक काम काम गुप्तपणे चालत असे. वरून दिसायला ही संघटना धार्मिक स्वरूपाची होती, पण प्रत्यक्षात ती राजकीय संघटना होती. कारण मुस्लिम सत्तेचा प्रतिकार करण्याची शक्ती समर्थांना जागृत करावयाची होती.

प्रचंड योजना
 समर्थांनी भारतात एकंदर ११०० मठ स्थापिले होते असे म्हणतात. हे अनेकांच्या मते शंकास्पद आहे. पण महाराष्ट्रात ११० मठ स्थापिले होते याविषयी वाद नाही. डोमगाव येथे कल्याणस्वामींचा मठ होता. कण्हेरी- वासुदेवस्वामी, शिरगाव- दत्तात्रय, चाफळ- भास्कर, नगरप्रांत देवदास, तिसगाव- दिनकर, इंदूरबोधन- उद्धव, पाली- रंगमूर्ती इत्यादी मठांची आणि मठपतींची यादी उपलब्ध आहे. प्रा. श्री. म. माटे यांनी 'रामदास- स्वामींचे प्रपंचविज्ञान' या ग्रंथात ती दिली आहे. ही यादी आणि भारतातील इतर प्रांतातील मठांची यादी : सुरत- जनार्दन, काशी- रामचंद्र, कांची- बगवंत, हरिद्वार- जयकृष्ण, अयोध्या- रामकृष्ण (समर्थप्रताप, गिरिधरस्वामी) पाहिली म्हणजे अखिल भारतभर मोगली सत्तेविरुद्ध लोकजागृती करण्याची व लोकांत राष्ट्रभावना निर्माण करण्याची प्रचंड योजना समर्थांनी आखली होती, असे स्पष्ट दिसून येते.

जाणतेपण
 राष्ट्रभावना ही फार मोठी क्रांती आहे. समाजाच्या उत्कर्षापकर्षाची जबाबदारी माझ्या शिरावर प्रत्येक व्यक्तीच्या शिरावर आहे ही जाणीव, हे तिचे पहिले लक्षण होय. पश्चिम युरोपातही ती अजून सार्वत्रिक झालेली नव्हती. हिंदुस्थानात तर ती कोणाच्या स्वप्नातही नव्हती. अशी ही राष्ट्रनिष्ठा समर्थांना येथे निर्मावयाची होती. त्यासाठी लोकशिक्षण हा त्यांचा मार्ग होता. कारण ही क्रांती प्रामुख्याने वैचारिक क्रांती असते. म्हणूनच समर्थ म्हणत, 'बहुत लोक मेळवावे, एक विचारे भरावे.' सर्वज्ञ संग निरूपण या समासात (दास. १८-२) ते म्हणतात, 'नेणतेपण जाले ते जाले' -इतके दिवस अडाणी राहिलो- 'जाले ते होऊनि गेले', पण 'आता तरी जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त.' हा जाणतेपणा कसा येईल ? 'जाणत्याच्या कथा सिकाव्या । जाणत्याच्या युक्ती समजाव्या ॥ जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचा साक्षेप घ्यावा, तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख (मर्म) समजावा, न बोलताचि ॥ जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे धूर्तपण, त्याच्या नाना कल्पना, याची विवंचना, समजोनि घ्यावी ॥
 समाजात असा जाणतेपणा यावा, लोकांना राजकारण कळावे म्हणूनच महंतांना ते सारखे सांगतात, 'जितुके काही आपणासि ठावे, तितुके हळूहळू सिकवावे, शहाणे करूनि सोडावे, सकळ जन ॥' 'संकेते लोक वेधावा, येवून येक बोधावा ॥' 'मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनासि सिकवावे, हळूहळू ॥' आणि अशी सिकवणे देऊन करावयाचे काय ? 'रामकथा ब्रह्मांड भेदूनि पैलाड न्यावी ॥'

रामकथा
 रामकथा ब्रह्मांड भेदूनि नेण्याला त्या काळी विशेष अर्थ होता. समर्थांनी चाफळला आल्यावर गावोगावी मारुतीची देवळे उभी करण्याचा व रामनवमीचा उत्सव सुरू करण्याचा उपक्रम केला होता. हे मुस्लिम सत्तेला एक आव्हानच होते. इंग्रजांचे राज्य असताना देखील भारतातले मुस्लिम हे गणेशोत्सव, दुर्गा उत्सव यांवर हल्ले करून मूर्ती फोडण्याचा पराक्रम करीत असत. मग त्यांचीच सत्ता असताना ते काय करीत असतील, हे सहज समजण्याजोगे आहे. अगोदरच पूर्वीची मंदिरे पाडून त्यांच्या मशिदी करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. मग नवीन मंदिरे व उत्सव यांना ते विरोध करणार हे उघडच होते. हा विरोध मोडून काढण्याचे शिक्षण लोकांना देऊन त्यांच्या ठायी थोडे धैर्य, थोडा ताठरपणा, थोडी प्रतिकारशक्ती चेतवावी हा समर्थांचा हेतू होता. आणि मसूर, माहुली, बिदर या ठिकाणी ते त्यांनी घडवून आणले असे समर्थप्रताप व दासविश्रमधाम या ग्रंथांतील वर्णनांवरून दिसून येते. बिदरला राम, मसूरला मुसळ राम आणि माहुलीला उद्भव असे त्यांचे महंत होते. त्यांनी राम आणि मारुती यांचे उत्सव सुरू करताच स्थानिक मुस्लिम अधिकारी खवळले व त्यांनी या महंतांना छळण्यास सुरुवात केली. त्या वेळी समर्थांनी स्वतः लक्ष घालून या अधिकाऱ्यांना अद्दल घडविली. वरील ग्रंथांत या प्रसंगांचे वर्णन जुन्या संतचरित्रातल्यासारखे केले आहे. मारुतीने व समर्थांनी गुप्तरूपाने त्यांना शिक्षा केली, त्यामुळे ते घाबरून गेले, असे तेथे वर्णन आहे. पण 'परस्परेचि प्रत्ययो प्रचीतीस आणावा' या धोरणाप्रमाणे हे कार्य गुप्तरूपाने केले असावे, असे वाटते. डॉ. पेंडसे यांनी त्याचा खरा अर्थ विशद करून सांगितला आहे (राजगुरु समर्थ रामदास, पृ. ३२, ७६). यावरून मठ स्थापून या प्रकारचीही 'शिकवण' लोकांना देण्याची व्यवस्था समर्थांनी केली होती, असे दिसते. अर्थात याच्यामागे मुख्य शिकवण आहे ती मानसिक परिवर्तनाचीच आहे. आपल्या धर्माचे रक्षण आपण केले पाहिजे, त्यासाठी परकीय जुलमी सत्तेशी लढा दिला पाहिजे, त्यासाठी सर्वस्व त्यागाची तयारी असली पाहिजे, असा या शिकवणीचा सारार्थ होता.

लोकसेवा
 हे जे लोकशिक्षणाचे कार्य करावयाचे त्याचे मार्ग कोणते ? कीर्तने, प्रवचने, पुराणे हे सारे धोपटे मार्ग होतेच, पण खरा प्रभावी मार्ग म्हणजे लोकसेवा हा होय. ख्रिश्चन मिशनरी सर्वत्र तोच अनुसरतात. ते जेथे जातील तेथे शाळा, दवाखाने काढतात. लोकांची दुःखे निवारण करतात; आणि या मार्गांनी लोकांची भक्ती जडली की मग ख्रिश्चन धर्माचा उपदेश करतात. समर्थांनी आपल्या मठपतींना, महंतांना हाच मार्ग सांगितला होता.
 समर्थ म्हणतात, 'जो परोपकार करीतचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला । मग काय उणे तयाला । भूमंडळी ॥' लोकांना आकृष्ट करण्याचा, त्यांना वेढोनि घेण्याचा लोकसेवा हाच खरा उपाय होय. यालाच पूर्वी परोपकार म्हणत. महंताने अत्यंत नम्रपणे हे व्रत आचरावे. 'सकळांसि नम्र बोलणे । मनोगत राखोनि चालणे । अखंड कोणी, येकाचे उणे । पडोचि नेदी ॥' यापुढेही जाऊन समर्थ म्हणतात, 'उदंड मुले नाना- परी । वडिलांचे मन अवघ्यावरी । तैसी अवघियांची चिंता करी । महापुरुष ॥' प्रत्येक महंत असा महापुरुष असावा. मिशनऱ्यांना फादर म्हणतात ते याच अर्थाने. समर्थांचा तोच अभिप्राय. जो आपली चिंता वाहतो, आपल्याला आसरा देतो त्याचे तत्त्वज्ञान, त्याचा धर्म खरा, अशीच लोकांची भावना असते. हे जाणूनच, या मार्गाने महाराष्ट्रधर्माचा प्रसार करण्याचे समर्थांनी निश्चित करून, त्याप्रमाणे प्रथम आपल्या महंतांना शिकवण दिली.

जगमित्र
 दासबोधाच्या निरनिराळ्या समासांत त्यांनी पुनः पुन्हा हा उपदेश केला आहे. 'दुःख दुसऱ्याचे जाणावे । ऐकून तरी वाटून घ्यावे । बरे वाईट सोसावे । समुदायाचे.' (११.५) अशा रीतीने लोकांच्या दुःखाशी आपण समरस झालो की लोक 'वोढोनि येती.' 'याकारणे मनोगत । राखेल तो मोठा महंत । मनोगत राखता समस्त । वोढोनि येती.' लोक राजी राखणे, लोकांचे मनोगत राखणे हे लोकसंघटनेचे मर्म आहे. हे कार्य लोकसेवेमुळे साधते. म्हणूने प्रत्येक महंताने जगमित्र झाले पाहिजे. आणि त्याने सकळांचे हृदय निवविले पाहिजे. 'शरीर परोपकारी लावावे । बहुतांच्या कार्यास यावे । उणे पडो नेदावे । कोणी येकाचे ॥' ' आडले जाकसले जाणावे । यथाशक्ती कामास यावे । मृदुवचने बोलत जावे । कोणी येकासी ॥' ही समर्थांनी उत्तम पुरुषाची लक्षणे म्हणून सांगितली आहेत. अशा उत्तम पुरुषांनाच त्यांनी मठाधिकारी म्हणून जागजागी नेमले होते.

उत्कट निःस्पृहता
 सेवा, परोपकर हे जसे, तसेच निःस्पृह वृत्ती हेही महंताचे तितकेच महत्त्वाचे लक्षण आहे. सेवेने जशी लोकांची मनोगते राखली जातात, त्यांची मने जिंकली जातात, तशीच त्याग, निःस्पृहपणा, निःस्वार्थबुद्धी, वैराग्य यांनी जिंकली जातात. विद्वत्ता कितीही मोठी असली तरी, स्वार्थाची जर शंका आली तर, लोकांवर तिचा प्रभाव पडत नाही. समर्थ म्हणतात, 'स्वतः निःस्पृह असेना । त्याचे बोलणेचि मानेना । कठिण आहे जनार्दना (जनतेला) । राजी राखणे ॥' उलट 'उत्कृट निःस्पृहता धरिली । त्याची कीर्ती दिगंती फाकली ॥' असे आहे. म्हणून चारित्र्य, निःस्पृहता, त्याग यांवर समर्थांनी फार कटाक्ष ठेवला आहे (दास. १९.६). दासबोधाच्या चौदाव्या दशकातील पहिला समास 'निःस्पृह लक्षण' याच नावाचा आहे. त्यात समर्थ परोपरीने निःस्पृहता विवरून सांगत आहेत. 'आपण आसक्त होऊ नये, केल्यावीण सांगो नये, बहुसाल मागो नये, शिष्यवर्गासी ॥' द्रव्यासाठी कीर्तन करू नये. राजद्वारीचा कार्यकर्ता होऊ नये, कोणी इनाम दिले तरी घेऊ नये. राजाच्या आधीन होणे जसे निंद्य तसे लोकाधीन होणेही निंद्यच होय. लोकांना राजी राखणे अवश्य आहे. पण ते त्यांच्या आधीन होऊन नव्हे. म्हणूनच 'आशाबद्ध बोलो नये, अभिलाष धरू नये.'

भिक्षामिसे
 यासाठीच समर्थांनी भिक्षेचे कडक दण्डक घालून दिले आहेत. महंताने आपला उदरनिर्वाह भिक्षेवरच करावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. पण नियम असा की 'बहुत आणिता येक मुष्टीच फक्त घ्यावी.' भिक्षामिषाने लोकपरीक्षा करावी, परिस्थितीचे अवलोकन करावे आणि जगाचे ज्ञान करून घ्यावे, असा भिक्षा सांगण्यात समर्थांचा हेतू आहे. म्हणून बरेच दिवसांची भिक्षा एकदम जमवून ठेवणे हे महंताला वर्ज्य आहे. 'आठा दिवसां धान्य मिळविले । तरी ते कंटाळवाणे जाले । प्राणी येकायेकी चेवले । नित्यनूतनेपासूनी ॥' रोज नवीन प्रदेश, नवीन वस्ती पाहणे हे त्यात साधत नाही. म्हणून, 'कुग्रामे अथवा नगरे । पहावी घरांची घरे । भिक्षामिसे लहान थोरे | परीक्षून सोडावी ॥' भिक्षा सांगण्यात समर्थांचा असा हेतू असल्यामुळे व तिचे स्वरूप वर वर्णिल्याप्रमाणे कडक असल्यामुळे भिक्षा हे निःस्पृहतेचे लक्षण म्हणूनच त्यांनी सांगितले आहे. 'सुखरूप भिक्षा मागणे । ऐसी निःस्पृहतेची लक्षणे ॥' (दास. १४-२, १५-६)

वाग्विलास
 लोकसेवा, परोपकार आणि निःस्पृह वृत्ती या गुणांप्रमाणेच महंताचा आवश्यक असलेला तिसरा गुण म्हणजे वक्तृत्व हा होय. समर्थांना नवे नेतृत्व निर्माण करावयाचे होते आणि लोकांच्या मनात दृढपणे बसलेले जुने तत्त्वज्ञान पालटून तेथे राष्ट्रधर्माचे तत्त्वज्ञान रुजवावयाचे होते. यासाठी अमोघ वक्तृत्वाचे महत्त्व किती आहे, ते सहज ध्यानात येईल. 'वाग्विलासे सकल सृष्टी वेधिली तेणे' असे त्यांनी महंताचे वर्णन केले आहे. हा वक्ता सकळांची अंतरे जाणतो, लोकांच्या मनात अनेक मतमतांतरे असतात, शंका असतात, आक्षेप असतात, त्यांना स्वानुभवाच्या व ग्रंथांच्या आधारे चोख उत्तरे देऊन तो सपाट करतो. प्रसंगमान पाहून, नेमकी भेदक वचने बोलून लोकांवर इतका प्रभाव पडतो की लोक 'नाना मार्ग सांडून त्याला शरण येती.' त्याच्या निरूपणाचा त्यांना वेध लागतो, सृष्टीमध्ये सकळ लोक त्याला धुंडीत येतात आणि या वेदसामर्थ्यामुळेच त्याला उदंड समुदाय करण्यात यश येऊन 'लोकी लोक वाढविले, तेथे अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले, गुप्तरूपे' असा अधिकार प्राप्त होतो (दास. १५.२).

शांत वृत्ती
 वाणीच्या या गुणांबरोबरच शांतपणा, विवेक, आर्जवी वृत्ती, मृदू वाणी हे गुणही वक्त्याला अभ्यासावे लागतात. कारण त्याला समुदाय करावयाचा आहे, लोकमानसात क्रांती करावयाची आहे, काही रूढ समज नष्ट करावयाचे आहेत. असे करताना नाना प्रकारचे तुंड, हेकांड आडवे येणारच, विरोधी शक्ती उभ्या राहणारच. त्यांशी शांतपणे, संताप येऊ न देता, मुकाबला करणे अवश्य असते. म्हणून समर्थ म्हणतात, 'उदंड धिक्कारूनि बोलती । तरी चळो नेदावी शांती ॥' निंदा, कठोर ताडण हे सर्व महंताने सोमले पाहिजे. 'जो बहुतांचे सोसीना । त्यास बहुत लोक मिळेना ॥' म्हणून 'दोष देखोनि झाकावे । अवगुण अखंड न बोलावे । दुर्जन सापडोनि सोडावे । परोपकार करूनी ॥', 'लोकी बरे म्हणावया कारणे । भल्यास लागते सोसणे । न सोसिता भंडावणे । सहजची होते ॥' एखादे वेळी दुर्जन फारच सतावून सोडतात, त्यांचे बोलणे असह्य होते. अशा वेळी त्याला दुरुत्तरे करण्याऐवजी 'खळ दुर्जन भेटला । क्षमेचा धीर बुडाला । तरी मौनचि स्थळ त्याग केला । पाहिजे साधके ॥' जोपर्यंत या महंताचे उत्तम गुण, त्याची योग्यता लोकांना कळत नाही तोपर्यंत असेच धोरण ठेवले पाहिजे. एकदा त्याची योग्यता कळली की 'उत्तम गुण देखता निवळे । जगदांतर ॥' जगदांतर निवळले की विश्वजन ओळखतात. आणि 'जनी जनार्दन वोळला । मग काय उणे तयाला ?'
 सगळ्याचे सूत्र हे आहे. लोक वळणे, लोक वळणे आणि लोकशक्ती संघटित करणे.

ब्राह्मण तरुण
 राष्ट्रधर्माचा प्रसार करण्यासाठी, लोकांना शहाणे करण्यासाठी रामकथा ब्रह्मांड भेदून पैल्याड नेण्यासाठी, तरुणांनी महंत व्हावे, मठ चालवावे आणि समुदाय करावे यासाठी समर्थांनी जे आवाहन केले ते प्रामुख्याने ब्राह्मण तरुणांना. समर्थांची वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था यांवर, वारकरीपंथांच्या संतांप्रमाणेच दृढ श्रद्धा होती. 'वर्णानां ब्राह्मणो गुरुः ।' हा सिद्धांत त्यांना मान्य होता. या व्यवस्थेप्रमाणे विद्याव्यासंग करणे, श्रुतिस्मृतींचा, पुराणांचा अभ्यास करणे आणि त्या आधारे लोकांना धर्मोपदेश करणे, कीर्तन, प्रवचन करणे, पुराण सांगणे हा उद्योग ब्राह्मणांचा होता. क्षत्रियांनी क्षात्रधर्म करावा व ब्राह्मणांनी ब्राह्मणधर्म पाळावा हे सांगताना हा वरील ब्राह्मण धर्म समर्थांना अभिप्रेत होता. म्हणून त्यांनी राष्ट्रधर्माचा लोकांना उपदेश करण्यासाठी ब्राह्मण तरुणांना आवाहन केले. सोयऱ्याधायऱ्यांची मुले लहानपणीच हाती धरून त्यांना पुढे महंत करावे, अशी त्यांची योजना होती, हे मागे सांगितलेच आहे.

ब्राह्मण्य
 पण ब्राह्मण तरुणांना आवाहन करताना, त्यांचा त्यांच्या ब्राह्मणत्वावर भर नसून तो त्यांच्या ब्राह्मण्यावर होता. भक्ती-वैराग्य, ज्ञान, स्वाध्याय, तपश्चर्या, शुचिता, शांती या गुणांना समर्थ ब्राह्मण्य म्हणतात. (टाकळीला लिहिलेले पत्र, डॉ. पेंडसे, राजगुरू समर्थ रामदास, पृ. २९८) दासबोधात त्यांनी हाच भावार्थ सांगितला आहे. 'करिती ब्राह्मण्य निरुपण । जाणती ब्रहा संपूर्ण । तेचि जाणावे ब्राह्मण । ब्रह्मविद ॥' (६-४-२४) त्यांच्या काळच्या ब्राह्मणांच्या ठायी हे ब्राह्मण्य नव्हते, म्हणून समर्थांनी त्यांच्यावर कडक टीका केली आहे. ते म्हणतात, 'सध्याचे ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले । गुरुत्व सांडून जाले । शिष्य शिष्यांचे ॥' त्या ब्राह्मणांचा इतका अधःपात झाला होता की त्यांपैकी कित्येक आपल्या देवता टाकून मुसलमानाच्या देवतांना भजू लागले होते. 'कित्येक दावल मलकास जाती । कित्येक पीरासचि भजती । कित्येक तुरुक होती । आपल्या इच्छेने ॥' आणि असे असून त्यांना आपण श्रेष्ठ असा अभिमान मात्र मोठा होता. अशा ब्राह्मणांना समर्थांनी मूर्ख म्हटले आहे, याहीपुढे जाऊन मागच्या अनेक पिढ्यांचे ब्राह्मण भ्रष्ट होते अशीही टीका समर्थांनी केली आहे. ते दुःखाने म्हणतात, आम्ही त्याच जातीचे ब्राह्मण आहो- 'आम्हीही तेच ब्राह्मण । दुःखे बोलीले हे वचन । वडिल गेले ग्रामणी करून । आम्हा भोवते ॥' पण या पूर्वज ब्राह्मणांना बोलावे तरी कसे ? ब्राह्मणांचे नशीब असे, म्हणून गप्प बसावे हेच खरे (दास. १४-८).
 असे म्हणून, पुढच्याच समासात ते म्हणतात, हे झाले ते होऊन गेले, पण आता तरी ब्राह्मणांनी शहाणपणाचा मार्ग धरावा. तो मार्ग कोणता ? तर प्राणिमात्राच्या ठायी जो परमेश्वर आहे त्याची भक्ती, त्याची पूजा करावी. 'देव वर्ततो जगदंतरी । तोचि आपुले अंतरी । त्रैलोकीचे प्राणिमात्री । बरे पहा ॥' असे सांगून येथे पुन्हा ब्राह्मण्याची लक्षणे समर्थांनी सांगितली आहेत.

आगंतुक गुण
 वर्ण व जाती समर्थ मानीत असले तरी, प्रयत्नाने अंगी गुणसंपदा आणता येते, अशी त्यांची श्रद्धा होती. आणि गुणसंपदेने जो श्रेष्ठ कार्य करील तो श्रेष्ठ, हीन कार्य करील तो हीन, असे त्यांनी म्हटले आहे. काळा मनुष्य गोरा होऊ शकत नाही, मुका बोलू शकत नाही, कुरूप पालटता येत नाही; पण 'उत्तम गुण अभ्यासता येती, शहाणपण सिकता येते, कारभार करिता उमजते, सर्व काही.' असा अनुभव नित्य येत असताना, तुम्ही स्वहित का करीत नाही ? अंतर्कळा का शृंगारीत नाही ? कष्ट करून, प्रयत्न करून संपदा मिळवा आणि मग सावकाश तिचा उपभोग घ्या. प्रयत्नांनी मिळविलेल्या या गुणांनाच समर्थ 'आगंतुक' गुण म्हणतात. यांनाच ते चातुर्य म्हणतात. आणि ' चातुर्येवीण उंच पदवी कदापि नाही' असे बजावतात. (दास. १४.६) 'श्रेष्ठ कार्य करी तो श्रेष्ठ । कृत्रिम करी तो कनिष्ठ । कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले.' (दास. १५.१) असा त्यांचा सिद्धांत होता.

राजकारणात बहुतजन
 वारकरी संतांप्रमाणेच परमार्थात, भक्तिमार्गात भेदाभेद मानणे अयुक्त होय. असेच समर्थांचे प्रतिपादन होते. 'ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे । शूद्राचे ब्रह्म ते वोवळे । ऐसे वेगळे आगळे! येथे असेचिना ॥' या मार्गात - 'उंचनीच नाही परी । राया रंका एकचि सरी । जाला पुरुष अथवा नारी । एकचि पद ॥ उंच ब्रह्म ते रायासी नीच ब्रह्म ते परिवारासी । ऐसा भेद तयापासी । मुळीच नाही ॥' (दास. ७-२) वर्ण- व्यवस्था, जातिव्यवस्था यांवर समर्थांची श्रद्धा असली तरी, भक्तिमार्गात त्यांचा विचार येता कामा नये, हे इतर संतांच्याप्रमाणे रामदासांनी सांगितलेच. पण आणखी पुढे जाऊन, राजकारणातही हा भेदाभेद नाही, असा सिद्धांत त्यांनी केला. म्हणून 'एक विचारे भरावे सर्व लोक', 'लोक राजी राखावे', 'जनी जनार्दन पहावा', 'कट्ट घालूनि राजकारणा लोक लावी', 'जग तिकडे जगन्नायक', 'राखावी बहुतांची अंतरे' असा घोष त्यांनी चालविला होता. त्यांना जो समुदाव करावयाचा होता, त्यात सर्वांना प्रवेश होता. 'शहाणे करावे बहुत जन' हे याच अर्थाने त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रधर्माचे वैशिष्ट्य ते हेच. 'यारे यारे भलते जन' अशी हाक त्याने ऐहिक ऐश्वर्याच्या मार्गातही, राजकारणातही दिली. कारण समर्थांना राज्य हवे होते ते व्यक्तीचे नसून महाराष्ट्राचे - महाराष्ट्र राज्य हवे होते. हाच राष्ट्रधर्म होय, मूलगामी क्रांती ती हीच. प्रत्येक व्यक्तीला, सामान्यातल्या सामान्य जनालाही चेतना देणे हेच राष्ट्रसंघटनेचे आद्य तत्त्व होय. 'बहुजनास मानला, बहुजनात शोभला', 'सर्वोसि राखणे राजी', 'सर्वत्र वोढती तेथे', 'सर्वासि नीववू जाणे, धन्य तो जाणता गुणी, जनाचे मन हे राखी, युक्तीने काम चालवी'- या वचनांतून समर्थांच्या मनातला हा भावार्थ स्पष्ट होतो. हा भावार्थ मनात असल्यामुळे, म्हणजे राष्ट्रसंघटनेची ही नवी विद्या सर्व जनतेत पेरावयाची असल्यामुळेच, परंपरेने विद्येची उपासना करणारे जे ब्राह्मण त्यांना समर्थांनी या कार्यासाठी आवाहन केले. 'ब्राह्मणी करावा स्वधर्म' असे म्हणताना ब्राह्मणांचा हा स्वधर्म त्यांना अभिप्रेत होता.

सेवकधर्म
 महाराष्ट्र राज्य अथवा स्वराज्य व्हावयाचे तर समर्थांच्या मते राजांनी राजधर्म, क्षत्रियांनी क्षात्रधर्म, ब्राह्मणांनी ब्राह्मणधर्म आचरणे जितके आवश्यक तितकेच सेवकांनी सेवकधर्म आचरणे हेही आवश्यक होते. म्हणून त्यांनी 'सेवकधर्म' असे दोन समासी प्रकरण लिहून सेवकधर्माचे स्वरूप स्पष्ट केले आहे.
 हा सेवक वर्ग म्हणजे पुन्हा बहुजन समाज आला. पाटील, चौगुला, कुळकर्णी, चिटणीस, फडणीस, खजिनदार, सामलेदार, सर्व प्रकारचे कारकून, पहारेकरी, टेहळे, हेजीब, कमाविसदार, तालुकदार, महालकरी, देशमुख, देशपांडे, सबनीस, कारखाननीसदार, हवालदार, जुमलेदार, सुभेदार, नालबंद, भिस्ती, बारगीर, शिलेदार, भोई, रामोशी, चौकीदार, नाकेदार, खलाशी, नावाडी, सुतार, लोहार, पाथरवट, गवंडी असा हा सेवक वर्ग बहुजनातूनच येतो, पण त्याच्यावर त्याच्या विशिष्ट कामाची जबाबदारी असल्यामुळे व राज्यकारभारात तो प्रत्यक्ष सहभागी असल्यामुळे त्याला त्याचा स्वधर्म समर्थांनी समजावून दिला आहे.

आज्ञापालन
 हा सेवक प्रथमतः अतिशय आज्ञाधारक, नम्र, दक्ष आणि प्रामाणिक असला पाहिजे. 'पुढे पुढे निघू नये । आज्ञावेगळे वर्तू नये । न मनिता अपाय । नेमस्त आहे ॥' 'स्वामींनी जे जे बोलावे । तेचि सेवकी प्रतिष्ठावे ॥', 'समर्थांचे मनोगत । तैसेचि वर्तणे उचित । तेथे चुकता आघात । नेमस्त आहे ॥' अनेक सेवक फार गर्विष्ठ असतात. स्वामींना काय कळते, असे त्यांना वाटते. 'आम्हांप्रमाणे काय जाणे । प्रभू होय, परी काही नेणे । आम्हांवेगळे कोण शहाणे । आहे येथे !' असा तोरा ते मिरवतात. आणि प्रसंगी स्वामींनाच बुद्धी शिकवू लागतात. अशा सेवकांचा समर्थांनी कडक शब्दात निषेध केला आहे.

काही न मागे
 काही सेवक स्वार्थी, लाचखाऊ असतात. त्यामुळे कामाचा नाश होतो. 'आपस्वार्थ उदंड करणे । आणि स्वामिकार्य बुडविणे । ऐसी नव्हेत की लक्षणे । सेवकाची ॥' थोडी बहुत लालूच करणे । आणि महत्कृत्य बुडविणे । महत्त्व जाता लाजिरवाणे । जनांमध्ये ॥' असे सेवक राज्याचा घात करतात. 'कार्य करिता काही न मागे । तयाची चिंता प्रभूसि लागे । ऐसे जाणूनि विवेक जागे । म्हणजे बरे ॥' अशा वृत्तीचा सेवक असला पाहिजे. असा सेवकच मोठा कार्यकर्ता होऊ शकतो. सेवक तोचि अडेना- तो कोठे अडत नाही. स्वतःची बुद्धी चालवून 'काम चुकले हे घडेना, कदा काळी ॥' अशी काळजी घेतो. 'धूर्तपणे अंतरसाक्षी । नानाप्रकारे परीक्षी । दूरी गेला तरी लक्षी । सर्व काही ॥' सेवकांमुळेच राज्यकारभार उत्तम चालतो.

स्वामिनिष्ठा
 सेवकाचा सर्वात महत्त्वाचा स्वधर्म म्हणजे स्वामिनिष्ठा. आणि सर्वात मोठा दुर्गुण, सर्वात मोठे पाप म्हणजे फितुरी. समर्थ म्हणतात, सेवक विश्वास दाविती, वैरियाकडे मिळोनी जाती, त्या चांडाळासि गती, कोठेचि नाही ॥ त्या काळात सर्वत्र मुस्लिम सत्ता होती. आणि लोकांत राष्ट्रभावना नव्हती. त्यामुळे फितुरी करण्यात काही पाप आहे, असे त्यांना वाटतच नसे. एक स्वामी सोडून दुसऱ्या स्वामीकडे जाणे इतकाच अर्थ ते मानीत. पण हा राष्ट्रद्रोह आहे, मुस्लिम हे शत्रु आहेत, हे समर्थांना लोकांना शिकवावयाचे होते. 'अमर्याद फितवेखोर,' 'फितव्याने बुडती राज्ये', 'बुडाले भेदवाही ते,'- असा फितुरांचा उल्लेख समर्थ वारंवार करतात. सर्वच वर्गात असे फितवे त्या काळी होते. तसेच सेवकांतही. समर्थ म्हणतात, 'हे सेवक कठिण, वेळेसि मिळोनी जाती शत्रुकडे ॥'
 राष्ट्रसंघटना याचा अर्थ मागे सांगितला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला राष्ट्राच्या उत्कर्षापकर्षास आपण जगाबदार आहोत अशी भावना असणे हा या संघटनेचा पाया आहे. म्हणूनच समर्थांनी राजा, सरदार, ब्राह्मण यांच्याप्रमाणेच राज्यातील सेवकांनाही स्वधर्माचा उपदेश केला आहे. कारण महाराष्ट्रराज्य व्हावे ही त्यांची आकांक्षा होती.

संघभावना
 मुस्लिम सुलतानांची सत्ता, त्यांची राज्ये ही सुलतानी राज्ये, राजांची राज्ये होती. ती लोकांची नव्हती हे खरे. पण मुस्लिम समाजात संघभाव जास्त होता. आपल्या बादशहाची सत्ता ही इस्लामची सत्ता आहे. सर्व काफरांना इस्लामची दीक्षा देणे हे तिचे उद्दिष्ट आहे. त्याला साह्य करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे आद्य कर्तव्य आहे, अशी भावना प्रत्येक मुस्लिमात असते. त्या वेळी होती व आजही आहे. शिवाय ऐहिक ऐश्वर्य, सत्ता, धन, स्त्री यांचा आपल्या राज्यामुळे आपल्याला लाभ होतो, हेही मुस्लिमांना दिसत होते. त्यामुळे बादशाही सत्तेच्या मागे ते उभे असत. तशी स्थिती हिंदूंची नव्हती. वर्णव्यवस्थेमुळे, जातिव्यवस्थेमुळे क्षत्रियेतर लोकांना राज्यकारभाराशी आपला काही संबंध आहे, असे वाटतच नसे. त्यांच्या स्वधर्मात ते बसतच नसे. वर्णव्यवस्थेचे तत्त्वज्ञानच तसे होते. त्यात संत आणि आचार्य यांच्या निवृत्तिवादाची भर पडली. त्यामुळे स्वराज्याविषयी सर्व समाज उदासीन झाला आणि संघभाव जास्त दृढपणे जोपासणाऱ्या मुस्लिम आक्रमणाला बळी पडला. या समाजाला धर्म प्रिय होता. पण त्याचा स्वराज्याशी काही संबंध आहे अशी कल्पनाच त्याला नव्हती. हिंदुसमाजाच हा घातकी दोष जाणूनच त्याला राष्ट्रधर्माची दीक्षा द्यावयाची, स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद आहे हे तत्व त्याला शिकवावयाचे आणि ऐहिक ऐश्वर्याची आकांक्षा जागृत करून आपल्या राज्याचा मागे उभे राहण्याची प्रेरणा द्यावयाची, हे समर्थांनी ठरविले आणि नवे नेतृत्व निर्माण करून या कामी, राजकारणाच्या कामी, सर्व लोकांना वोढोनि आणिले. संतांनी परलोकाची, परमार्थाची, मोक्षाची द्वारे खुली करून सर्व मराठेजनांना ज्याप्रमाणे धर्माच्या कक्षेत वोढोनि आणिले, त्याप्रमाणे समर्थांनी राजकारणात, राष्ट्रकार्यात म्हणजेच राजकार्यात सर्वांना वोढोनि आणिले. यामुळेच महाराष्ट्रात समाजाचे सर्व थर जागे होऊन स्वराज्याभिमुख झाले. आणि त्यामुळे मराठ्यांच्या ठायी एक अद्भुत शक्ती निर्माण होऊन अखिल भारत यावनी आक्रमणापासून मुक्त करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले.

शेकडो रामदास !
 समर्थांच्या कार्याच्या महत्त्वाबद्दल सध्या खूप वाद चालू आहेत. शिवछत्रपतींना हाताशी धरून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे समर्थांच्या अंध भक्तांनी लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे प्रामुख्याने हा वाद माजलेला आहे. समर्थांच्या या भक्तांना शिवछत्रपतींच्याच नव्हे, तर समर्थांच्याही कार्याचे आकलन करण्याची पात्रता नव्हती. 'या परमार्थिकांनी समर्थांचा पराभव केला,' असे प्रा. माटे यांनी लिहिले आहे, ते याच अर्थाने. लोकजागृती, लोकसंघटना, राष्ट्रधर्माचा प्रसार हे समर्थांचे जे कार्य त्याचे त्यांना आकलन झाले असते तर शिवछत्रपती हे काय तेज आहे, हा केवढा स्वयंप्रभ महापुरुष आहे, ते ईश्वराचे कसे देणे आहे, हे त्यांना कळले असते, आणि मग समर्थांना कर्ते वारस लाभून युरोपप्रमाणेच भारतात, सर्व प्रदेशांत राष्ट्रधर्माचा प्रसार झाला असता. मराठ्यांच्या यशापयशाची मीमांसा करताना, मराठा साम्राज्यात शेकडो रामदास व्हावयास हवे होते, असे राजवाडे यांनी म्हटले आहे, त्याचा भावार्थ हाच आहे. पण दुर्दैव असे की समर्थांना शेकडो काय, एकही तशा योग्यतेचा खरा वारस लाभला नाही आणि त्यामुळे राष्ट्रधर्माची तत्त्वे महाराष्ट्रात सुद्धा दृढमूल झाली नाहीत. समर्थ या भूमीत अवतरले हेच भाग्य, असे तो इतिहास पाहताना म्हणण्याची पाळी येते.

प्रथम भेट
 शिवछत्रपती आणि समर्थ यांची प्रथम भेट केव्हा झाली, हाही एक वादविषय आहे. १६४९ च्या सुमारास भेट झाली असे मान्य केले तर स्वराज्याची प्रेरणा छत्रपतींना त्यांनी दिली, ते त्यांचे प्रारंभापासूनच राजकीय गुरू होते, हा पक्ष बलवत्तर होतो. म्हणून त्यांची १६७२ पर्यंत भेटच झाली नव्हती असा पक्ष मांडण्यात येतो. पण प्रा. माटे, डॉ. पेंडसे यांनी प्रतिपादिल्याप्रमाणे या दोन विभूती स्वयंप्रभ होत्या, हे मान्य केल्यानंतर, वादातला दंशच नाहीसा होतो. आणि हे प्रतिपादन आता सर्वमान्य झालेले आहे. तेव्हा या वादाचा निकाल केवळ कागदोपत्रीचा पुरावा पाहून करणे हे आता शक्य आहे. पण मला या बाबतीत अगदी निराळा विचार मांडावा असे वाटते. शिवछत्रपती अत्यंत जागरूक, अत्यंत सावध होते. महाराष्ट्रातच काय, पण दिल्लीपर्यंत कोठे काय चालले आहे, याची खडान् खडा वार्ता नित्य आणविण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. अशा परिस्थितीत महाराष्ट्रभर मठस्थापना, मंदिरस्थापना करून समर्थांनी जी चळवळ चालविली होती तिचा त्यांना पत्ता नसेल, आणि पत्ता असूनही आपल्या उद्दिष्टांना इतकी साह्यभूत होणारी चळवळ करणाऱ्या पुरुषाशी प्रारंभापासून त्यांनी संपर्क साधला नसेल, असे समजणे हे अत्यंत हास्यास्पद आहे. सिद्धेश्वर भट ब्रह्मे यांसारख्या केवळ पारमार्थिक अधिकारी असलेल्या सत्पुरुषाचा छत्रपती परामर्श घेतात आणि 'स्वामींच्या अनुष्ठानबळे राज्याधिकारी झालो' असे त्यांना नम्रपणे लिहितात (पत्र ता. १७– ७- १६५३). मग इह आणि पर या दोन्ही क्षेत्रांत ज्यांचा अधिकार त्यांना स्पष्ट दिसत होता त्या समर्थांची भेट त्यांनी प्रारंभीच्या काळात घेतली नसेल ही कल्पना टिकणे कसे शक्य आहे ? असो. पण हा विचार गौण वाटतो. शिवछत्रपतींच्या हातून स्वराज्य स्थापना करणे हे रामदासस्वामींचे कार्य नव्हतेच. त्यांनी महाराष्ट्रात लोकसंघटना केली व लोकांत राष्ट्रधर्माचा प्रसार करून लोकमानसात क्रांती घडवून आणली हे त्यांचे महत्त्वाचे कार्य होय. आणि ते त्यांनी कसे घडवून आणले याचेच विवेचन येथवर केले आहे.
 [ समर्थांच्या ज्या साहित्याच्या आधारे त्यांच्या कार्याचे विवेचन आपण करतो त्याच्या विषयी एकदोन विचार येथे सांगणे अवश्य आहे असे वाटते. समर्थांनी प्रवृत्ति- धर्म सांगितला, शक्ती, धन, ऐहिक ऐश्वर्य यांचे महत्त्व सांगितले, त्यांनी राजकारण केले हे सर्व अगदी खरे आहे. पण त्यांनी निवृत्तिपरही पुष्कळ लिहिले आहे. त्यांनी भागवतधर्मीय संतांप्रमाणेच संसाराची अतिरेकी निंदाही केली आहे. प्रपंच आणि मोक्ष यात विरोध आहे, असे विचारही मांडलेले आहेत. आणि हे प्रतिपादन करणारे जे त्यांचे साहित्य त्याचे प्रमाणही कमी नाही. यामुळे इतर संतांहून ते निराळे कसे, असा पुष्कळांना प्रश्न पडतो. पण त्या प्रकारचे त्यांचे वाङ्मय विपुल प्रमाणात असले तरी संभ्रम पडावा अशी मात्र स्थिती नाही. कारण प्रवृत्तिधर्मीय जे विचार, जे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले आहे ते अगदी स्पष्ट आणि अगदी निर्णायक आहे. त्याविषयी, त्यांच्या ऐहिक तत्त्वज्ञानाविषयी शंका घेण्यास अणुमात्र जागा नाही. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की मठस्थापना करून व महंताची संघटना घडवून समर्थांनी सर्व महाराष्ट्रात त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याची व्यवस्था केली. त्यांना ऐहिक प्रपंचाचे जे विज्ञान सांगावयाचे होते त्याविषयी त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे प्रमाण थोडे असले तरी, शतमुखांनी जे प्रपंचविज्ञानाचे तत्त्वज्ञान त्यांनी वदविले त्याचे प्रमाण शतसहस्रपटीने जास्त आहे. तेव्हा लिखित साहित्याच्या त्यांच्या प्रवृत्तिधर्माच्या प्रतिपादनाचे प्रमाण कमी असले तरी, मौलिक साहित्याच्या दृष्टीने पाहता ते निवृत्तीच्या प्रतिपादनाच्या तुलनेने अनंतपटीने जास्त आहे. आणि म्हणूनच समर्थाच्या प्रवृत्ति परतेविषयी शंका घेण्यास जागा राहत नाही.
 निवृत्तीचे अगदी उत्कट प्रतिपादन आणि प्रवृत्तीचेही तितकेच उत्कट प्रतिपादन असे करणे ही फार मोठी विसंगती आहे हे खरे आहे. पण अलीकडच्या डॉ. पेंडसे, प्रा. माटे इ. विद्वानांनी या विसंगतीचा परिहार करण्याचा कसा प्रयत्न केला आहे ते मागे सांगितलेच आहे. देशभर भ्रमंती करताना समर्थांना हिंदूंची जी दारुण अवस्था दृष्टीस पडली तिच्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन झाले असले पाहिजे, असे या पंडितांनी म्हटले आहे. अर्थात हे केवळ अनुमान आहे. पण आहे या स्थितीत तेच जास्तीत जास्त समाधानकारक आहे, असे मला वाटते.
 दुसरा विचार समर्थांच्या साहित्याच्या रचनेविषयीचा आहे. हे साहित्य अत्यंत विस्कळित असे आहे. दासबोधातील समासाचे नाव व आतला विषय यांचा पुष्कळ वेळा मेळ बसत नाही. समसातील एका ओवीचा अनेक वेळा दुसरीशी संबंध नसतो. इतकेच नव्हे, तर एकाच ओवीतील पूर्वार्धाचा उत्तरार्थाशी संबंध नसतो. त्यांच्या इतर स्फुट प्रकरणांत इतका गोंधळ नाही. पण तरी ते सुव्यवस्थित, निर्वाचित, चांगले बांधलेले आहे, असे म्हणता येत नाही. समर्थांच्या वाङ्मयात हा फार मोठा दोष आहे यात शंका नाही आणि त्यामुळे त्यांच्या वचनांचा आधार घेताना मागचा पुढचा संदर्भ पाहणे याला काही अर्थच राहात नाही. पण असे असले तरी, त्यांच्या महाराष्ट्रधर्माचे जे सिद्धात येथे सांगितले आहेत, त्यांविषयी मात्र यतकिंचितही गोंधळ नाही. कारण त्या त्या समासातील व प्रकरणातील सिद्धान्त वादातीत आहेत. या सिद्धांताचे विवरण करताना इतर जी अनेक वचने दिलेली आहेत त्यातील काही विषयी संदर्भाच्या प्रश्नावरून वाद करता येईल हे खरे; पण त्यामुळे समर्थांच्या मूळ तत्वज्ञानाविषयी संदेह घेण्यास जागा निर्माण होते, असे मात्र नाही.
 समर्थांच्या कार्याचे प्रस्तुततेचे विवेचन वाचताना हे दोन विचार वाचकांनी नित्य ध्यानात वागवावे अशी विनंती आहे. ]
 समर्थांच्या महाराष्ट्रधर्माचे गेल्या व या प्रकरणात सविस्तर विवेचन केले. गेल्य प्रकरणात या महाराष्ट्रधर्माची चारपाच लक्षणे सांगितली. आणि 'स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद' हे जे सहावे लक्षण ते या प्रकरणात सांगून त्याचा सविस्तर ऊहापोह येथे केला. कारण स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद हा महाराष्ट्रधर्माचा आत्माच आहे. बाकीची लक्षणे ही त्याचीच अंगभूत लक्षणे होत. या लक्षणांवरून वारकरी संतांचा भागवतधर्म व समर्थांचा महाराष्ट्रधर्म यात काय भेद आहे हे स्पष्ट होईल.

तुलना
 भागवतधर्माहून महाराष्ट्रधर्म वेगळा असला तरी ज्ञानेश्वर, तुकारामांनी प्रतिपादिलेल्या तत्त्वाच्या पायावरच आणि त्यांच्या आधारेच समर्थांचा महाराष्ट्रधर्म उभा आहे यात शंका नाही. वैदिक धर्माचा अभिमान समाजात जागृत ठेवून तीनशे वर्षे संतांनी महाराष्ट्रीयांची अस्मिता जिवंत ठेवली. नीतिनिष्ठा, भूतसेवा, परमेश्वरावरील श्रद्धा ही श्रेष्ठ धर्माची तत्त्वे सांगून समाजाचे मन उन्नत करून ठेवले, म्हणूनच समर्थांना महाराष्ट्रधर्माचा प्रसार द्रुतगतीने करता आला. स्वतः समर्थ हे भागवतधर्मीय संत होते हे प्रा. श्री. म. माटे यांचे मत या अर्थाने खरेच आहे. तरीही त्यांचा महाराष्ट्रधर्म भागवतधर्मापेक्षा खूपच भिन्न होता हेही खरे आहे.

अनन्य साधारण
 ही भिन्नता कशात आहे हे डॉ. शं. दा. पेंडसे यांच्या शब्दांत प्रारंभीच सांगितले आहे. भागवतधर्माचे स्वरूप केवळ संरक्षक होते, ते धोरण टाकून देऊन महाराष्ट्रधर्माने चढाऊ व लढाऊ धोरण स्वीकारले, असे त्यांनी म्हटले आहे. दुसरे एक थोर पंडित साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांनी हा भेद जास्त विशद केला आहे. 'पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी' या आपल्या ग्रंथात (भाग १ ला प्रकरण १४ वे - श्री समर्थ रामदास) त्यांनी समर्थांच्या अनन्यसाधारण वैशिष्ट्यांचे स्वरूप चांगले स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, 'प्रत्यक्ष साऱ्या देशभर हिंडून व समाजनिरीक्षण करून लोकस्थितीचा अभ्यास करावा व नंतरच कार्याची पद्धती ठरवावी, असा सर्वंकष स्वरूपाचा विचार समर्थांपूर्वी, प्रत्यक्ष कोणाच्या आचरणातून तरी दिसत नाही.' (पृ. ३४४) 'परकीय यवन, पोर्तुगीजांसारखे लुटारू, स्वकीय पुंड, पाळेगार इ. तत्कालीन अत्याचाऱ्यांच्या अत्याचारांचे समर्थांनी जसे बारकाईने वर्णन केले आहे तसे कोणीही केलेले नाही.' (पृ. २४७) 'सामाजिक जीवनाची दुर्दशा व अधःपात थांबविता येत नसेल तर आपल्या साक्षात्कारी जीवनाचा व आध्यात्मिक विकसनाचा आपल्या राष्ट्राला लाभ कोणता, असे त्यांना (समर्थांना) वाटू लागले. प्रत्यक्ष निर्गुण निराकार परब्रहा सगुण साकार होऊन अवतार घेते तर ब्रह्मनिष्ठांना तरी संस्कृतीच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या अधःपतनाच्या काळात केवळ निजानंदात निमग्न होऊन कसे राहता येईल ? परमेश्वरी नियमाचे ते उल्लंघनच नव्हे काय ? समाजजीवनाच्या या एका तपावर केलेल्या मनन- निरीक्षणाने त्यांची (समर्थांची) अशी धारणा झाली की स्वराज्यावाचून स्वधर्म व स्वराष्ट्र यांचे संरक्षण व विकसन केवळ अशक्य होय. सामर्थ्याच्या पार्श्वभूमीवाचून अध्यात्माला महत्त्व नाही, जीवनाला प्रतिष्ठा नाही व नीतिमूल्यांना स्थिरता नाही.' (पृ ३५१) 'या राष्ट्राला व धर्माला वैभवशाली व सामर्थ्यसंपन्न कसे करता येईल या एकाच विचारात समर्थ गढून गेले होते.' (पृ. ३५७) 'त्यांच्यापूर्वी राष्ट्रपुनरुत्थानाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून व त्यासाठी वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा आश्रय करून योजनाबद्ध कार्याची उभारणी करणारा अन्य कोणी आढळत नाही.' (पृ. ३५८).
 समर्थांच्या अनन्यसाधारण कार्याचे स्वरूप असे विशद करून बाळशास्त्री यांनी श्री व्यासांनंतरचा महान लोकशिक्षक असा त्यांचा गौरव केला आहे.
 (१) ऐहिक ऐश्वर्याची उत्कट आकांक्षा (२) आधी प्रपंच (३) लोकसंघटना (४) शक्ती प्रमाण हे (५) प्रयत्नवाद आणि (६) स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद ही जी महाराष्ट्रधर्माची सहा लक्षणे या दोन प्रकरणांत सांगितली तीच निराळ्या शब्दांत हरदास यांनी संकलितरूपाने आपल्या ग्रंथात सांगितली आहेत हे वरील अवतरणांवरून ध्यानात येईल. समर्थांच्या कार्याच्या विवेचनाचा याहून निराळा समारोप करण्याची आता गरज आहे असे वाटत नाही.

महान् लोकशिक्षक
 'श्री वेदव्यासानंतरचा महान् लोकशिक्षक' यापेक्षा समर्थांचा जास्त गौरव काही असू शकेल असे मला वाटत नाही. समर्थांच्या सर्व कार्याचा आशय यात येतो. त्यांनी धर्मकारण व राजकारण लोकाभिमुख केले. स्वराज्य व स्वधर्म यांच्या संरक्षणाची व उत्कर्षाची जबाबदारी लोकावर आहे हे महान् सत्य त्यांनी मराठ्यांना शिकविले. यालाच राष्ट्रनिर्मिती म्हणतात.