महाराष्ट्र संस्कृती/यशापयश - मीमांसा

विकिस्रोत कडून


२३.
यशापयश-मीमांसा
 


 महाराष्ट्र-संस्कृतीच्या दृष्टीने आपण शिवछपतींच्या कार्याचे अवलोकन करीत आहोत. त्यांनी केलेले धर्मपरिवर्तन, त्यांची नवी अर्थव्यवस्था, त्यांचे राष्ट्रनिर्मितीचे प्रयत्न आणि त्यांची युद्धविद्या यांचे विवेचन येथवर केले. आता त्यांच्या प्रशासन- पद्धतीचे म्हणजेच राज्यकारभार- पद्धतीचे स्वरूप पहावयाचे आहे; आणि मग समाज- प्रबोधनाच्या दृष्टीने या सर्वाची चिकित्सा करावयाची आहे.

अष्टप्रधानमंडळ
 त्यांच्या प्रशासन पद्धतीतली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे अष्टप्रधान- मंडळ ही होय. भारतात प्राचीन काळी राजाचे प्रधानमंडळ ही संस्था दीर्घकालपर्यंत रूढ झालेली होती. रामायण, महाभारत, कौटिल्याचे अर्थशास्त्र, मनुस्मृती, शुक्रनीती या ग्रंथांत या प्रधानमंडळाचे सविस्तर वर्णन आहे आणि त्याचे महत्त्वही विशद केलेले आहे. त्या प्राचीन परंपरेचेच छत्रपतींनी अनुकरण केले हे उघड आहे. अलीकडे याविषयी काही वाद निर्माण झाले आहेत. मुस्लिमांचे अनुकरण करून महाराजांनी आपले अष्टप्रधान मंडळ बनविले असे कोणी म्हणतात. स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नास लागताच त्यांनी काही प्रधानांची नेमणूक केली होती आणि त्यांना पेशवा, डबीर, सुरनीस, वाकनीस, सरनोबत अशी फारशी नावे त्यांनी दिली होती. त्यामुळे मुस्लिमांच्या अनुकरणाने त्यांनी अष्टप्रधान मंडळ केले कसा कोणाचा तरी समज झाला असावा. पण तो केवळ गैरसमज होय, हे प्राचीन ग्रंथांतून या परंपरेचे जे वर्णन आहे, त्यावरून स्पष्ट होईल. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी ही नावेही काढून टाकली आणि पंतप्रधान, पंत अमात्य, पंतसचीव, मंत्री, सुमंत अशी संस्कृत अभिधाने प्रधानांना दिली. आणि त्याच वेळी रघुनात भट्ट उपाध्ये चंदावरकर- पंडितराव यांच्याकडून राज्यव्यवहार कोश करवून घेऊन सर्व राज्यव्यवहारच संस्कृतभाषी करून टाकला. प्राचीन परंपरेचा असा अभिमान ज्याच्या ठायी होता तो त्या परंपरेकडे दुर्लक्ष करून, प्रशासनाला प्राणभूत असलेल्या संस्थेसाठी मुस्लिमांचे अनुकरण करील, हे अगदी असंभव आहे. तेव्हा या वादाचा क्षणभर मुद्धा विचार करण्याचे कारण नाही.

लोककल्याण उद्दिष्ट
 छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली ती राज्यकारभाराच्या सुकरतेसाठी हे उघडच आहे. 'अत्यंत अल्प कार्यसुद्धा एकट्या एक माणसाला साधणे कठीण असते. मग राज्यासारखे सर्वश्रेष्ठ कार्य एकट्या माणसाला- तो कितीही थोर असला तरी कसे साधणार ?' असे शुक्रनीतीत म्हटले आहे. हे ध्यानात घेऊन महाराजांनी प्रारंभापासूनच एकेका मंत्र्याची नेमणूक करण्याचा उपक्रम केला होता. पण कारभाराची सुकरता याच एका दृष्टीने अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व होते असे नाही. त्याची स्थापना करून, महाराजांनी फार मोठे सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणले, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. सरदेसायांनी त्याचे उत्तम विवेचन केले आहे.
 राज्य हे लोकांच्या सुखासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी असते, हे प्राचीन महातत्त्व महाराजांना पुन्हा प्रस्थापित करावयाचे होते. मुसलमानी राज्यात हे उद्दिष्ट कधीच नव्हते. सरदेसाई म्हणतात, 'मुसलमानांच्या अनेक राजघराण्यांत प्रजेच्या सुखाची परवा करणारे राजघराणे फक्त मोगलांचे झाले. त्यातही अकबर व शहाजहान या दोनच कारकीर्दी नावाजलेल्या आहेत. परंतु या बादशाहीचे स्वरूप लष्करी बाण्याचे होते. म्हणजे केवळ लष्करी जोरावर देश जिंकून त्याचे संरक्षण करावयाचे, यापलीकडे राज्यव्यवस्थेची मजल फारशी गेलेली नव्हती. उलटपक्षी शिवाजीच्या राज्याची मजबुती, मोगलांप्रमाणे लष्करी जोरावर रचलेली नसून, लोकसुखवृद्धीवर स्थापिलेली होती. शिवाजीचे मूळपासून धोरणच तशा प्रकारचे होते. केवळ स्वतःच्या अभिवृद्ध्यर्थ त्याने हे काम केलेले नाही. त्याचे प्रत्येक कृत्य सार्वजनिक हिताचे होते. लोक दांडगाई करू लागले तर पुष्कळशी फौज जमवून, मोगलांप्रमाणे केवळ तलवारीच्या जोरावर त्यास दाबात ठेवणे, शिवाजीस सहन झाले नसते. तो आपल्या देशाकरिता, राष्ट्राकरिता म्हणजे राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीकरता उद्योग करीत होता. शिवाजी व मोगल बादशहा यांजमधील हा महत्त्वाचा फरक होय.' (मराठी रियासत; पूर्वार्ध, पृ. ४५५) 'मुसलमानी राज्यपद्धतीत शिवाजीच्यासारखे प्रधानमंडळ नव्हते, असेच म्हणणे भाग पडते. अशा प्रधानमंडळाची योजना केवळ प्रजेच्या कल्याणासाठीच उत्पन्न होत असते.'(पृ. ४५४)

सत्तानियंत्रण
 लोकसुख, राष्ट्रहित, प्रजाकल्याण हा जसा अष्टप्रधान मंडळाच्या स्थापनेमागे एक हेतू होता तसाच दुसराही एक महत्त्वाचा हेतू होती. राजसत्तेवर नियंत्रण घालणे हा तो हेतू होय. सामान्यतः लोक जागृत झाले की राजसत्तेवर नियंत्रण येते. पण येथे छत्रपतींनी स्वतःहून प्रधानमंडळ नेमून स्वतःच्या सत्तेवर मर्यादा घातली होती. नानासाहेबांनी यासाठी छत्रपतींचा फार गौरव केला आहे. ते म्हणतात, असा स्वतःवर आपला आपण दाब ठेवून येणे, मनाचे विशिष्ट औदार्य असल्याशिवाय होत नाही. असे औदार्य एकाही मुसलमान बादशहात नव्हते. इंग्लंडच्या राजातही ते बेताचेच होते.' (वरील ग्रंथ, पृ. ४५९)

हत्तीचे अंकुश
 रामचंद्रपंत अमात्य यांनी प्रधानांचे महत्त्व सांगितले आहे. त्यात, 'प्रधान म्हणजे हत्तींचे अंकुश', असेच त्यांचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, 'प्रधान म्हणजे राज्यलक्षणगृहाचे स्तंभ आहेत. प्रधान म्हणजे नृपसत्ताप्रसारक, प्रधान म्हणजे प्रजापालन, धर्मसंरक्षणाचे अध्यक्ष, प्रधान म्हणजे राजमदजनित अन्यायसागराची मर्यादा, प्रधान म्हणजे हस्तीचे अंकुश, प्रधानापेक्षा राजेलोकांस इतर आप्त व अधिकोत्तर किमपि नाही; म्हणून प्रधानांची भीड राजांनी सर्वोपेक्षा अधिकोत्तर वागवावी आपले शासनाप्रमाणेच त्यांचे शासन सकळांवर चालवावे. समयविशेषे आपला आग्रह सोडून त्यांचा शब्द चालविलासा करावा.' स्वसत्तेला आपण होऊन मर्यादा घालण्याची ही वृत्ती ! यालाच संस्कृती म्हणतात.

दिवाणी सत्ता
 अष्टप्रधानांची नेमणूक करून महाराजांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट साधली. 'सामान्यतः कोणत्याही देशाच्या कारभारात लष्करी व दिवाणी अशी दोन अंगे मुख्य असतात. प्रथमतः अंतर्बाह्य शांततारक्षणासाठी लष्करी अंगाची जरूर असते. पण हे अंग प्रधान नव्हे. लोकसुखाचे साधन दिवाणी कारभारावर अवलंबून असते. ज्या राज्यात लष्करी सत्ता दिवाणी सत्तेच्या ताब्यात असते, त्या राज्यात लोकसुखाची मर्यादा अत्यंत वाढलेली असते. मोगल बादशाहीचा कारभार बहुतेक लष्करी स्वरूपाचा होता. लष्करी जोरावर लोकांकडून पैसे वसूल करणे, हे प्रांताच्या लष्करी सुभेदाराचे मुख्य काम असे. परंतु शिवछत्रपतींनी राज्यकारभाराची व्यवस्था ठरविली, तेव्हा त्यांनी लष्करी धोरणास अगदी मागे ठेविले. आठ प्रधानांपैकी एकच प्रधान लष्करी ठेविला. इतर सहा प्रधानांस जरी लष्करी काम करावे लागत असे तरी, त्या प्रधानांचे मुख्य कार्य दिवाणी कारभारक्षेत्रातले होते. छत्रपती तेच आपले मुख्य कार्य समजत असत.' नानासाहेबांप्रमाणे डॉ. सेन यांनीही छत्रपतींच्या राज्यकारभाराचे हे वैशिष्ट्य सांगितले आहे. मुलकी कारभारात लष्कराला, खुद्द सरनोबताला- सेनापतीला- सुद्धा ढवळाढवळ करण्याचा मुळीच अधिकार नव्हता. छत्रपतींनी ते कधीच सहन केले नसते, असे ते म्हणतात. रामचंद्रपंत अमात्य यांनीही हेच तत्त्व सांगितले आहे. 'संपूर्ण राज्यभार, देशदुर्गाचा अखत्यार, सरकारकुनाचे (प्रधानाचे) हाती असावा. सेनानायक त्या अधीन करावे.'

कर्तबगार माणसे
 शिवछत्रपतींनी राज्याची आठ अंगे करून कारभाराची योजना आखली आणि ती पार पाडण्यासाठी अत्यंत लायक व कार्यक्षम असेच प्रधान नेमले. त्यांनी पुढीलप्रमाणे कार्यक्षेत्रे आखून दिली होती. (१) पंतप्रधान (पेशवा) याने सर्व राज्यकार्य करावे. राजपत्रावर शिक्का करावा. सेना घेऊन युद्धप्रसंग व स्वारी करावी. तालुका ताब्यात येईल तो रक्षून चालावे. (२) पंत अमात्य (मुजुमदार) याने सर्व राज्यातील जमाखर्चाची चौकशी करावी. फडनिशी पत्रावर निशाण करावे, युद्धप्रसंग करावे. सर्व लष्करी व मुलकी खात्यांचे हिशेब याने तपासावे. (३) सचीव (सुरनीस) याने सर्व राजपत्रांचा शोध घेऊन मजकूर शुद्ध करावा आणि एकंदर सर्व सरकारी दप्तराची व्यवस्था पहावी. (४) मंत्री (वाकनीस) याच्या ताब्यात अठरा कारखाने व बारा महाल यांचा कारभार असून खाजगीकडील दप्तर व पत्रव्यवहार याच्याचकडे असे. (५) सेनापती (सरनोबत) याचा अधिकार सर्व लष्करावर चाले. एकंदर फौजच्या शिस्तीची जबाबदारी त्याजवर असे. (६) सुमंत (डबीर) परराज्याशी होणाऱ्या सर्व व्यवहाराची कामे याच्याकडे असत. (७) न्यायाधीश - याच्याकडे सर्व न्यायखाते होते. (८) पंडितराव- शास्त्रार्थ सांगणे, देवस्थाने, दानधर्म यांची व्यवस्था याच्याकडे होती. या आठ पदांवर नेमलेले अधिकारी- मोरोपंत पिंगळे, रामचंद्रपंत अमात्य बावडेकर, अनाजी दत्तो प्रभुणीकर, दत्ताजी त्रिमल, हंबीरराव मोहिते, जनार्दनपंत हणमंते, निराजी रावजी, रघुनाथभट्ट उपाध्ये- हे सर्व कर्तबगार होते. महाराज माणसांची निवड अत्यंत कसोशीने व दक्षतेने करीत. कर्तृत्व, गुणसंपदा ही एकच कसोटी ते लावीत, वंशपरंपरेने कोणतीही जागा कधीही कोणालाही देत नसत, वतन किंवा जहागीरही देत नसत आणि नेमलेल्या अधिकाऱ्यांस भरपूर पगार देत असत. पंतप्रधान पेशवा याला पंधरा हजार होन म्हणजे सालीना ५२००० रु. मिळत. त्या वेळचे बाजारभाव ध्यानात घेता हा पगार आजच्या दसपट होता. या अष्टप्रधानांपैकी काही प्रधान समर्थ रामदासांचे शिष्य होते. आणि महाराजांच्यावर त्यांची अनन्यभक्ती होती. त्यामुळेच त्यांनी तनमनधनाने झिजून उत्तम राज्यकारभार केला आणि महाराष्ट्रात नवी सृष्टी निर्माण केली.

न्यायपद्धती
 छत्रपतींच्या राज्यकारभाराचे अंतिम उद्दिष्ट लोकसुख, लोककल्याण हे होते, हे वर सांगितलेच आहे. त्याच उद्देशाने त्यांनी सातवाहन, राष्ट्रकूट, यादव या महाराष्ट्रीय राजघराण्यांच्या शासनकाळातील ग्रामसंस्थेचे पुनरुज्जीवन केले. मागे एका प्रकरणात गोत, देशक या सभांचा उल्लेख केला आहे. मागील काळी गावचा बहुतेक कारभार त्यांच्यावर सोपविलेला असे. मुस्लिमांच्या काळात या सभा निर्जीव झाल्या होत्या. महाराजांनी स्वराज्यस्थापनेनंतर त्यांची पूर्वीची प्रतिष्ठा त्यांना प्राप्त करून दिली. पाटील, कुलकर्णी, बारा बलुतेदार, शेटे, महाजन यांची सभा ते गोत होय. गावातील कब्जांचा न्याय- निवाडा हे गोतच करीत असे. एखाद्या वादीला या गोताचा निवाडा मान्य झाला नाही तर दुसऱ्या गावाच्या गोतापुढे आपला खटला चालावा, अशी मागणी करण्याची त्यास मुभा होती. परगावच्या गोताला परस्थळ म्हणत. परस्थळाकडे असे खटले नेल्याची अनेक उदाहरणे मागल्या कागदपत्रांत सापडतात. गोताच्या वरची सभा म्हणजे देशक होय. देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन, गावचे पाटील यांची सभा ती देशक सभा होय. सर्वात वरचे न्यायपीठ म्हणजे अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश हे होय.

विज्ञानेश्वर
 छत्रपतींनी न्यायदानासाठी स्वतंत्र कायदे केलेले नव्हते. याज्ञवल्क्यस्मृतीवरील विज्ञानेश्वराची मिताक्षरा ही जी टीका तीच स्वराज्यात न्यायासाठी आधारभूत ग्रंथ म्हणून मानलेली होती. स. १६६३ सालचा एक न्यायनिवाडा प्रसिद्ध आहे. त्यात, प्राथमिक साक्षीपुरावे झाल्यानंतर, 'राजश्री नेताजी पासलकर यांनी महाबळेश्वरास मनुष्य पाठवून विज्ञानेश्वर आणविला आणि पंडित, विद्वंस यांच्या मुखांतरे विज्ञानेश्वरामध्ये वृत्तीच्या विशेष विवंचना ज्या होत्या त्या संपूर्ण मनास आणून हक्क निवाडा केला,' असे म्हटले आहे.

लोकसत्तेचा पाया
 या न्यायपद्धतीने सर्व लोकांना त्वरित व योग्य न्याय मिळण्याची व्यवस्था झाली आणि ग्रामीण जनतेचे जीवन पूर्वीपेक्षा जास्त सुखावह झाले. पण याहीपेक्षा विशेष म्हणजे राज्यकारभारात आपण सहभागी आहो, आपणच कारभार करीत आहो, हा भाव जनतेच्या मनात निर्माण होऊन तिचे कर्तृत्व अधिक विकसित होण्यास संधी लाभली. अष्टप्रधानमंडळाचे महत्त्व विशद करताना नानासाहेव सरदेसाई यांनी, 'काही संकुचित व विशिष्ट अर्थाने मराठ्यांचे राज्य लोकसत्तात्मक राज्य होते,' असे म्हटले आहे. 'कारण प्रत्येकाला देशसेवा करण्यास त्यात सवड होती. ज्याने त्याने स्वतःचे कल्याण करण्यास झटणे म्हणजे एकंदर राज्यात भर घालणे, असा प्रकार होता.' हेच विवेचन गोतसभा, देशकसभा यांनाही लागू पडण्यासारखे आहे. लोकांनी स्वतःचा कारभार स्वतः पाहणे याचेच नाव लोकसत्ता. या अर्थाने वरील सभा हा लोकसत्तेचा पायाच होता.

मोठा प्रश्न
 शिवछत्रपतींनी महाराष्ट्रात राष्ट्रनिष्ठा निर्माण केली, त्यांनी लोकशाहीचा पाया घातला, असे वर म्हटले आहे. अनेक इतिहासपंडितांनीही हा विचार मांडलेला आहे. त्यावरून मग मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. पश्चिम युरोपात चौदाव्या पंधराव्या शतकात याच निष्ठांचा उदय झाला होता आणि त्यामुळे हळूहळू तेथील देश, विशेषतः इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड हे देश समृद्ध, बलाढ्य झाले, आणि त्यांनी सर्व जगावर आपले प्रभुत्व स्थापन केले. तसे महाराष्ट्रात व भारतातील इतर देशांत का झाले नाही ?

प्रबोधन नाही
 याचे उत्तर असे की पश्चिम युरोपात त्या काळात जे समाजप्रबोधन झाले ते भारतात कोणत्याही प्रांतात झाले नाही. छत्रपतींनी कार्य केले त्यामागे प्रबोधनाची काही काही तत्त्वे होती. पण त्या तत्त्वांचे विवेचन करून, त्यावर ग्रंथ लिहून त्यांचा समाजात प्रसार करण्याचे जे कार्य शास्त्रीपंडितांनी करावयास हवे, ते येथे कोणीच केले नाही. एकटा एक नेता, तो महापुरुष असला तरी, शिवछत्रपतींनी जे कार्य केले त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. त्यांनी जे केले त्याच्या शतांशमुद्धा युरोपातल्या त्या वेळच्या राजांना करता आले नव्हते. राष्ट्रभावना, लोकसत्ता, धर्मसुधारणा, आर्थिक क्रांती या गोष्टी एका माणसाच्या नव्हेतच. शेकडो, हजारो पंडित, तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ, प्रवचनकार, वक्ते, कार्यकर्ते यांनी तनमनधन अर्पून हे कार्य करणे अवश्य असते. हा व्याप केवढा प्रचंड आहे याची सम्यक कल्पना यावी म्हणून पश्चिम युरोपातल्या समाजप्रबोधनाची थोडी माहिती देतो.

शास्त्रसंशोधन
  प्रबोधनाच्या श्रेयाचा फार मोठा वाटा त्या काळात उदयास आलेल्या शास्त्रज्ञांचा आहे. रॉजर बेकन हा तेराव्या शतकातला शास्त्रज्ञ. हा फ्रॅन्सिस्कन पंथाचा धर्मगुरू होता. तरी रूढ धर्ममते त्याला मान्य नव्हती. अवलोकन व प्रयोग यांनी स्वतंत्र बुद्धीने सत्याचा शोध घ्यावा, अशी ज्ञानपद्धती त्याने उपदेशिली. चाक्षुप विज्ञान, परावर्तनाचे नियम, इंद्रधनुष्य, गुरुदर्शक भिंग हे त्याच्या संशोधनाचे विषय होते. त्याची मते पोपच्या धर्मपीठाला पाखंडी वाटत. म्हणून त्याने या थोर शास्त्रज्ञाला चोवीस वर्षे कारागृहात बद्ध करून ठेविले होते. तरीही शास्त्रीय सत्यावरील आपली निष्ठा त्याने ढळू दिली नाही. यामुळेच हळूहळू युरोपात बुद्धि-स्वातंत्र्याचा परिपोष झाला. हे भारतात घडले नाही. रॉजर बेकननंतर कोपरनिकस, केप्लर, गॅलिलिओ, न्यूटन या थोर शास्त्रज्ञांनी तीच परंपरा पुढे चालविली. आणि फ्रॅन्सिस बेकन याने,   'ॲडव्हान्समेंट ऑफ नॉलेज', 'नोव्हम और गॅनम्' इ. ग्रंथ लिहून नव्या बौद्धिक संस्कृतीची प्रस्थापना केली. सत्यदेवता ही बायबलची कन्या नसून मानवी प्रज्ञेची कन्या आहे, असे त्याचे तत्त्वज्ञान होते.
 या शास्त्रज्ञांनी सूर्य, पृथ्वी, तारे यांचे जे रूप लोकांना प्रत्यक्ष दाखविले ते बायबलने वर्णन केलेल्या रूपापेक्षा अगदी निराळे होते; त्यामुळे बायबल, पोप, धर्मगुरू यांच्यावरील लोकांच्या अंधश्रद्धेला तडा गेला आणि त्या प्रमाणात त्यांची बुद्धी स्वतंत्र झाली.

जगप्रवास
 त्या युगातल्या जगप्रवासी लोकांनी त्या श्रद्धेला असाच आणखी एक धक्का दिला. मार्को पोलो हा प्रवासी तेराव्या शतकात आशिया खंड पाहून इटलीला परत गेला. त्याचा ग्रंथ वाचून पोर्तुगालचा राजा प्रिन्स हेन्री याच्या चित्तात समुद्रपर्यटनाची प्रबळ आकांक्षा निर्माण झाली. पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेला वळसा घालण्याचा प्रयत्न करू लागले. १४९२ साली कोलंबस अमेरिकेला जाऊन आला आणि १४९८ साली वास्को द गामा हिंदुस्थानापर्यंत पोचला. मॅगेलनच्या बोटींनी याच सुमारास पृथ्वीप्रदक्षिणा पुरी केली. यामुळे पृथ्वी, समुद्र, पाताळ, यासंबंधीचे बायबलचे सिद्धांत पार उद्ध्वस्त झाले. पोपच्या धर्मसत्तेला मोठा हादरा बसला. मानवी मन मुक्त होऊ लागले.

धर्मसत्तेशी लढा
 आकाशस्थ ग्रहगोलतारे आणि पृथ्वीवरचे भूखंड आणि समुद्र यांचे हे जे संशोधक त्यांनी चालविलेला लढा हा अप्रत्यक्ष लढा होता. त्यांच्या साथीला पोपच्या अंध, हेकट, दुराग्रही, भ्रष्ट, आणि उन्मत्त सत्तेला आव्हान देऊन पोपशी प्रत्यक्ष लढा करणारे थोर पुरुषही याच सुमारास उभे राहिले. ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. जॉन वायक्लिफ हा अशा लोकांत अग्रगण्य होता. मनुष्य व परमेश्वर यांमध्ये मध्यस्थ म्हणून पोप, कार्डिनल, बिशप, प्रीस्ट अशा धर्माचार्यांची मुळीच गरज नाही, मनुष्याने स्वतंत्रपणे भक्ती, प्रार्थना, नामस्मरण करून मोक्ष मिळवावा, असे तो निर्भयपणे प्रतिपादन करीत असे. बायबल हा ग्रंथ त्या वेळी लॅटिन भाषेत होता. त्याचे पठण व अध्ययन लोकांनी स्वतः करण्यास पोपची सक्त मनाई होती. अशा लोकांना तो देहदंडाची शिक्षा सांगे. आपल्याकडे शूद्रांना वेदपठणासन बंदी होती. तसाच हा प्रकार होता. वायक्लिफने पोपचा हा दण्डक उपमर्दून बायबलचे इंग्रजीत भाषांतर केले, त्याच्या हस्तलिखित प्रती देशभर पसरून दिल्या आणि बायबल पठणाचा प्रत्येकास अधिकार आहे असा सिद्धांत मांडला. शिवाय पोपचे ऐहिक ऐश्वर्य व त्याचे भोगविलास यांवरही त्याने कडक टीका केली. बोहेमियातील प्रागच्या विद्यापीठातील प्राध्यापक जॉन हस याने वायक्लिफची हीच परंपरा पुढे चालविली. पोपने त्याला पकडून धर्मन्यायासनापुढे उभे केले. तेथे 'मी फक्त परमेश्वर व माझी विवेकबुद्धी यांनाच प्रमाण मानतो. तुम्ही म्हणता, शेकडो धर्माचार्यांचे मत माझ्या विरुद्ध आहे. असेल, लाखांचे असेल ! मी माझ्या विवेकाची साक्ष त्याहून मोठी मानतो' असे सांगून जॉन हसने, जिवंत जाळून मारण्याची पोपने दिलेली शिक्षा शांतपणे सोसली. पुढच्या शतकांत लूथर, कालव्हिन, क्रॅनमर, लॅटिमर यांनी अशाच धैर्याने ही चळवळ पुढे चालविली आणि जवळजवळ निम्मा पश्चिम युरोप पोपच्या अंध सत्ते- पासून मुक्त केला.

व्यक्तित्वाचे तत्त्वज्ञान
 समाजप्रबोधनाची ही चळवळ म्हणजे भौतिकविद्येची, इहवादाची, व्यक्तिस्वातंत्र्याची, बुद्धिप्रामाण्याची चळवळ होती, हे वरील वर्णनावरून ध्यानात येईल. तसे व्यक्तिस्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान सांगणारे तत्त्ववेत्तेही या वेळी युरोपला लाभले. पदुआ नगरीचा पंडित मार्सिलिओ (१२७० - १३४०) हा या पंडितांचा मेरुमणी होय. तो पोपच्या सत्तेचा अगदी हाडवैरी होता. सर्व ख्रिस्ती जगातील लोकांच्या सार्वमताने पोपची निवड व्हावी व लोकांच्या सार्वमताचे त्याच्यावर पूर्ण नियंत्रण असावे, तो कर्तव्यच्युत, भ्रष्ट झाला तर त्याला पदच्युत करण्याचा अधिकार लोकांना असावा, असे मत त्याने मांडले. आणि ऐहिक क्षेत्रात पोपला कसलाही अधिकार असू नये, असा विचारही आपल्या ग्रंथात त्याने प्रतिपादिला. इंग्लंडमधील ओखॅमचा विल्यम हा असाच दुसरा तत्त्ववेत्ता होता. पोप हा नास्तिक आणि पाखंडी आहे, असे त्याने निर्भयपणे जाहीर केले. महाकवी डांटे आणि फ्रान्समधील पियरी डुबाईस हे असेच इहवादी, व्यक्तिवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी पंडित होते. कायदा व राजसंस्था या गोष्टी परमेश्वरप्रणीत नसून परिस्थिती व गरज याप्रमाणे त्या निर्माण होतात, म्हणून त्या पूर्ण मानवकृत आहेत, असे डुबाईस सांगत असे. तो प्लेटोचा अनुयायी असून स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणेच शिक्षण मिळाले पाहिजे, असा त्याचा आग्रह असे.

ग्रीक विद्या
 पश्चिम युरोपात हे समाजप्रबोधन झाले त्याच्यामागची मूळ प्रेरणा म्हणजे ग्रीक विद्या ही होय. मार्सिलिओ, विल्यम, डुबाईस हे सर्व ॲरिस्टॉटलचे शिष्य होते. पण ग्रीक विद्येच्या अभ्यासाला खरी चालना दिली ती इटालियन कवी पेट्रार्क (१३०४-७४) याने. त्याने व त्याच्या शिष्यांनी शाळा - महाशाळातून वर्ग चालवून, व्याख्याने देऊन, ग्रंथशाळा स्थापून या प्रभावी विद्येचे संस्कार सर्व पश्चिम युरोपीय देशांत लोकमानसावर करण्याचे अखंड प्रयत्न चालविले. मॅन्युएल क्रिसो लोरास, गाझा, लॉरेंझो, जोहान मुल्लर, इ. नावे यासाठी प्रसिद्ध आहेत. पंधराव्या शतकाच्या अखेरीस उदयास आलेले प्रसिद्ध मानवतावादी पंडित इरॅसमस, कॉलेट, थॉमस मूर यांनी ग्रीक विद्याप्रसाराचे हेच व्रत पुढे चालविले आणि तमोयुगातून युरोपला मुक्त केले. मुक्त प्रज्ञा, स्वतंत्र निर्णयशक्ती, इहवाद, याच्या जोडीला सहिष्णुता, उदारमतवाद, समता, सामजिक न्याय, सर्वधर्मसमानत्व, प्रवृत्तिवाद, आशावाद यांचाही ते जोराने पुरस्कार करीत. या पंडितांत इरॅसमस हा मुकुटमणी असून सर्व पश्चिम युरोपाने त्याला गुरू मानले होते.

छापखाना
 पेट्रार्कपासून इरॅसमसपर्यंत ग्रीक विद्येच्या प्रसाराचे जे कार्य सर्व पंडितांनी चालविले होते त्याला मोठा वेग आला तो मुद्रणकलेच्या शोधामुळे. जोहान गटेंबर्ग (१३९४- १४६८) या जर्मन तरुणाने हा शोध लावला. जर्मन मुद्रकांना छापखाना ही मोठी शक्ती आहे, क्रांतिकार्यात तिचे स्थान निस्तुळ आहे, असे वाटत असल्यामुळे मिशनऱ्यांच्या कर्तव्यबुद्धीने त्यांनी सर्व युरोपभर आपली कला पसरून दिली आणि पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत ९० लक्ष पुस्तके छापून काढली.

पाश्चात्यांपुढे !
 बाराव्या तेराव्या शतकात फ्रेंच, जर्मन, इटालियन, इंग्लिश या भाषा प्रौढरूपाला आल्या आणि त्यातूनच आपण फ्रेंच, आपण जर्मन अशी स्वतंत्र राष्ट्रीय अस्मिता निर्माण झाली. या राष्ट्रभावनेचा परिपोष ग्रीक विद्येतील व्यक्तिवाद, बुद्धिस्वातंत्र्य, समता या तत्त्वांनी होऊन पश्चिम युरोपीय देश बलाढ्य व ऐश्वर्यसंपन्न झाले. भारतात त्याच सुमाराला प्रांतीय भाषा प्रौढ झाल्या होत्या. तरीही येथे स्वतंत्र राष्ट्रीय अस्मिता निर्माण झाली नाही. महाराष्ट्रात शिवसमर्थांच्या कार्यामुळे ती काही प्रमाणात उदयास आली होती. पण ग्रीक विद्येसारख्या भौतिक विद्यांचा प्रसार येथे झाला नाही. येथे शास्त्रज्ञ निर्माण झाले नाहीत, येथे जगप्रवास कोणी केला नाही, इहवादी तत्त्वज्ञान येथे कोणी सांगितले नाही, व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य, समता यांची प्रवचने येथे कोणी केली नाहीत. शिवसमर्थांच्या कार्यामुळे जे चैतन्य, जी प्राणशक्ती येथे निर्माण झाली होती तिच्यामुळे मुस्लिम सत्तेचे निर्मूलन करण्याचे सामर्थ्य मराठ्यांना प्राप्त झाले. पण वरील गुणांनी संपन्न असे जे पाश्चात्त्य लोक त्यांच्याशी गाठ पडताच त्यांचा टिकाव लागला नाही, लागणे शक्यच नव्हते.

निवृत्ती
 वरील प्रकारचे समाजप्रबोधन येथे झाले नाही याचे प्रधान कारण म्हणजे निवृत्ती. आद्य शंकराचार्यापासून पुढील सर्व आचार्य आणि भारतातल्या सर्व प्रदेशांतले संत यांनी, जग हे असार आहे, माया आहे, क्षणभंगुर आहे, हा संस्कार शतकानुशतके भारतीयांच्या मनावर करण्याचे व्रतच घेतले होते. या थोर पुरुषांनी संसाराची जी भयानक वर्णने केली आहेत, ती कानी पडल्यावर, या संसाराबद्दल कसलीही उभारी लोकांच्या मनात राहणे शक्यच नव्हते. संसारात राहावे, वनात जाऊ नये, असे यांतील अनेकांनी सांगितले आहे हे खरे. पण, धर्मशाळेत घडीभर राहातो तसे राहावे, त्याबद्दल कसलेही प्रेम मनात ठेवू नये, स्त्रीपुत्रांबद्दल कसलीही माया चित्तांत येऊ देऊ नये, त्यांच्याबद्दल घृणाच मनात असावी, मोक्ष, परलोक यांच्या मार्गात येणारे हे आपले वैरी आहेत हे सतत ध्यानी बाळगावे, असा उपदेश त्यांनी केला आहे. तो मनात ठसल्यावर, वीस वीस वर्षे ताऱ्यांचे वेध घेत राहावे, तपेच्या तपे वनस्पतींचे संशोधन करण्यात घालवावी, अनेक कागदपत्रे पाहून, दीर्घ अभ्यास करून आपल्या देशाचा इतिहास लिहावा, उत्तरधृवावर जावे, दक्षिण धृवाचा शोध घ्यावा, ही उभारी लोकांच्या चित्तांत कशी राहावी ? कारण हा सर्व अभ्यास या जगाचा आहे आणि ते जग तर क्षणभंगुर आहे, क्षणिक आहे, त्याचा घडीचाही भरंवसा नाही, त्याच्याबद्दल अगदी उत्तम ज्ञान झाले तरी त्याचा उपयोग काय ? स्त्रीपुत्रांचा अंतसमयी जसा उपयोग नाही, म्हणून त्यांची चिंता वाहणे हा जसा मूर्खपणा होय, तसाच या ज्ञानाचा अंतसमयी उपयोग नसल्यामुळे त्याचा हव्यास धरणे हा मूर्खपणाच होय. शाश्वत असा जो आत्मा, चिरंतन असे जे हरिचरण त्यांचे ज्ञान हेच मानवाचे प्राप्तव्य होय. म्हणून या जगाचा, तेथील ऐश्वर्याचा सर्व मोह सोडून, हरिनामस्मरण करीत कालक्रमणा करावी, यातच जन्माला आल्याचे साफल्य आहे, हे तत्त्वज्ञान पुराणे, कीर्तने, प्रवचने यांतून अहोरात्र ज्या लोकांच्या मनात बिंबवले जाते, त्यांच्या हातून ऐहिक ऐश्वर्याच्या कसल्याही क्षेत्रात पराक्रम होणे शक्य नाही. भारतात अनेक शतके हेच घडत होते. सातव्या आठव्या शतकाच्या आधी, भारतात ऐहिक ऐश्वर्याचे सर्व उद्योग होत होते. गणित, रसायन, पदार्थविज्ञान, वैद्यक इ. सर्व भौतिक विद्यांचा अभ्यास येथे होत होता. राज्य, साम्राज्य, व्यापार, उद्योग, कला, या क्षेत्रांतले सर्व उद्योग लोक करीत होते. आणि त्यामुळे भारत हा ऐश्वर्यसंपन्न झाला होता. तेथून पुढे या सर्वांना हळूहळू उतरती कळा लागली त्याचे प्रधान कारण निवृत्ती हे होय.

मध्यम वर्ग नाही
 राष्ट्रभावना जोपासणे, लोकांच्या मनात ती रुजविणे, तिच्या सर्व अंगोपांगांचे विवेचन करणे, हे सर्व बुद्धिजीवी मध्यम वर्गाचे कार्य होय. वर सांगितलेले शास्त्र- संशोधक, ग्रंथकार, तत्त्ववेत्ते, मानवतावादी पंडित हे सर्व या मध्यम बुद्धिजीवी वर्गात येतात. राष्ट्रसंघटनेच्या सर्व कार्यात हा वर्ग नेतृत्व करीत असतो. पण हे उद्योगच भारतात कोणी न केल्यामुळे हा वर्ग येथे निर्माणच झाला नाही आणि त्याच्या अभावी काही काळ उदयास अलेली राष्ट्रभावना येथे मूळ धरू शकली नाही.

इतिहास- उपेक्षा
 एक साधी गोष्ट पाहा. प्राचीन परंपरेचा, त्या परंपरेतील मानवी कर्तृत्वाचा अभि मान हा राष्ट्रनिष्ठेचा आत्मा होय. पण दुर्दैव असे की इतिहास लिहून या परंपरेचे ज्ञान जतन करून ठेवावे, हा उद्योगसुद्धा भारतात कोणी केला नाही. चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, विक्रमादित्य, हर्ष, सातवाहन असे महापराक्रमी राजे भारतात होऊन गेले, याचा उल्लेख, अकराव्या बाराव्या शतकानंतरच्या वाङ्मयात चुकून सुद्धा केलेला आढळत नाही. वेरूळ, अजंठ्याची लेणी सातव्या आठव्या शतकात पूर्ण झाली होती. पण इंग्रज येथे येईपर्यंत अशी काही लेणी आहेत, याचा भारतीयांना पत्ताच नव्हता. तीर्थे कोठे आहेत, देवळे कोठे आहेत, साधुसंन्यासी यांचे मठ कोठे आहेत, याची बारीकसारीक माहिती सर्व भारतीयांना होती. कारण त्यांचा मोक्षाशी, परलोकाशी संबंध होता. त्यामुळे अंतसमय मुखाचा होणार होता. चंद्रगुप्त, समुद्रगुप्त किंवा वेरूळ अजंठा यांच्यामुळे तो लाभ होणार नव्हता. त्यांच्यामुळे ऐहिक सुखाचा लाभ कदाचित झाला असता, पण ते तर विषवत् त्याज्य होते. मग त्या प्राचीन परंपरेचा इतिहास जतन करून ठेवण्याचे प्रयोजन काय ? राष्ट्रभावनेच्या परिपोषासाठी इतिहासाप्रमाणेच, राजनीतिशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, या विषयांवर ग्रंथ व्हावे लागतात. युरोपात तेराव्या शतकापासून असे ग्रंथ होऊ लागले होते. पण भारतात तसे झाले नाहीत. येथील लोकांना तशी प्रज्ञाच नव्हती असे नाही. ते याविषयी उदासीन होते. याचे महत्त्वच त्यांना वाटत नव्हते; कारण ते ऐहिक विषय होते. ते लिहून मोक्ष मिळणार नव्हता. त्या वेळचे शास्त्रीपंडित कशात गुंतले होते, हे मागे सांगितलेच आहे. व्रतवैकल्ये, श्राद्धपक्ष, प्रायश्चित्ते, हे त्यांचे आवडते विषय होते. हे बहामनी काळाविषयी झाले. पुढे शिवकाल आला. समर्थांनी ग्रंथ लिहून आणि छत्रपतींनी प्रत्यक्ष कार्य करून नव्या प्रेरणा दिल्या. पण शास्त्रीपंडितांच्यावर त्याचा काही परिणाम झाला काय ? गागाभट्ट, नीलकंठ चतुर्धर, रघुनाथ गणेश यांनी कोणते ग्रंथ लिहिले? मीमांसा कुसुमांजली, दिनकरोद्योत, आचारप्रदीप, भोजन- कुतूहल, धर्मामृतमहोदधी हे त्यांचे ग्रंथ. यांचे विषय वरील विषयांपेक्षा फारसे निराळे नाहीत. यांतले बहुतेक पंडित तीर्थयात्रा, शास्त्रचर्चा या निमित्ताने भारतभर भ्रमण करीत असत. पण मुस्लिमांचा, रजपुतांचा, विजयनगरचा इतिहास लिहावा, परकीय आक्रमकांचे स्वरूप, त्यांचे बलाबल या विषयावर लिहावे, असे त्यांना कधी वाटले नाही. मुस्लिम पंडितांनी असले लेखन केले आहे. इंग्रज प्रवाशांनी केले आहे. पण भारतीय पंडितांना ही बुद्धी झाली नाही, कारण या विषयांचा इहलोकाशी संबंध आहे, म्हणून हे विषय त्यांना वर्ज्य होते. निवृत्ती, मायावाद, परलोकनिष्ठा यांमुळे समाज कसा मृतवत होऊन जातो हे यावरून कळेल असे वाटते.

व्यापारी वर्ग
 समाजप्रबोधन करणे हे प्रामुख्याने मध्यमवर्गाचे कार्य. तो वर्गच येथे निर्माण झाला नाही. त्यामुळे राष्ट्रनिष्ठेचा परिपोष येथे झाला नाही. राष्ट्रनिष्ठेचा आणि ऐहिक ऐश्वर्याचा परिपोष करणारा दुसरा वर्ग म्हणजे व्यापारी वर्ग होय. प्रोटेस्टंट पंथाच्या उदयानंतर पश्चिम युरोपातील व्यापारी वर्ग संघटित व प्रबळ झाला; आणि त्याने राजसत्तेवर वर्चस्व स्थापून सर्व जीवनातच क्रांती घडविली. हे व्यापारी केवळ व्यापारी नव्हते, ते राजकारणी होते, लढवय्ये होते, साम्राज्यकर्ते होते. त्यांनी आपल्या देशाच्या संरक्षणाला अवश्य ते धन निर्माण केले, शस्त्रास्त्रे उभारली व धनोत्पादनाला अवश्य ते विज्ञान पैदा करण्यासाठी विद्यापीठांना चालना दिली. म्हणजे त्यांनी एक नवी अभिनव अशी व्यापारी संस्कृतीच निर्माण केली. पोपच्या धर्माविरुद्ध बंड करण्यातही ते प्रमुख होते. सरंजामदारांचा पाडाव त्यांनीच केला आणि राष्ट्रीय राजसत्तेला त्यांनीच पाठिंबा दिला.

मराठा वैश्य ?
 प्राचीन काळी भारतात व्यापारी वर्ग हा फार प्रबळ व संपन्न असा होता. पण पुढे त्यालाही उतरती कळा लागली आणि महाराष्ट्रातला व्यापारी वर्ग तर बहामनी काळात, दुर्गादेवीच्या दुष्काळात समूळ नाहीसाच झाला. या काळात सर्वच वर्ग उत्सन्न झाले होते. पण वतनदार, सरदार पुन्हा सावरले, शेतकरी पूर्ववत शेती करू लागला. पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही की या वेळी मराठा वैश्य जो नाहीसा झाला तो कायमचा ! त्यानंतर गुजराथी व मारवाडी वैश्ववाणीवर्ग महाराष्ट्रात आला आणि त्याने येथला सर्व व्यापारधंदा चालविला. तसाच उद्योग मराठा वैश्यवर्गालाही करता आला असता. पण तो वर्ग खचला तो खचलाच, आणि तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्राचा व्यापार आणि उद्योग हा सर्व अमहाराष्ट्रीय लोकांच्या हाती गेलेला आहे.

साहुकार
 शिवछत्रपतींनी व्यापाराला उत्तेजन देण्याचे पराकाष्ठेचे प्रयत्न केले होते. रामचंद्रपंत अमात्य यांनी 'आज्ञापत्रा'त छत्रपतींच्याच धोरणाचे विवेचन केले आहे. त्यावरून हे दिसून येईल. ते साहुकारांचे महत्त्व सांगतात. पण त्या वर्णनावरून स्वच्छ दिसते की साहुकार म्हणताना त्यांच्या मनात व्यापारीच आहेत. 'साहुकार म्हणजे राज्याची शोभा. त्यांच्या योगे राज्य अबादानसमृद्ध होते. न मिळे त्या वस्तुजात राज्यात येतात. संकटप्रसंगी कर्जवाम मिळते. याकरिता साहुकारांचा बहुमान चालवावा. पेठापेठात दुकाने, वखारी घालवून हत्ती घोडे, रेशमी वस्त्रे, जरीची वस्त्रे, लोकरी वस्त्रे, आदिकरून वस्त्रजात, तसेच रत्ने, शस्त्रे आदिकरून अशेष वस्तुजात यांचा उदीम व्यापार चालवावा. हुजूर बाजारामध्येही थोर थोर साहुकार आणून ठेवावे.' हे वर्णन केवळ व्याजबट्टा करणाऱ्या सावकाराचे नाही. व्यापारी सावकरांचे आहे. पुढे नवव्या प्रकरणात आरमाराचे महत्त्व सांगताना, समुद्रावरील व्यापाऱ्यांना असेच उत्तेजन संरक्षण द्यावे, असे अमात्यांनी सांगितले आहे. 'कोळी साहुकारांचे वाटेस जाऊ नये. प्रायोजनिक वस्तू परस्थळीहून आणावी तेव्हा येते. यात राज्याचा भ्रम काय उरला. ?'

संरक्षक जकात
 महाराजांनी लढाऊ गलबताप्रमाणेच व्यापारी गलबतेही बांधली होती आणि ती मस्कत, बसरा, इराण येथपर्यंत जात असत हे मागे सांगितलेच आहे. पण यापेक्षाही विशेष म्हणजे एकुणिसाव्या शतकात जर्मनीमध्ये फ्रेडरिक लिस्ट याने जे संरक्षक जकातीचे तत्त्व सांगितले ते महाराजांनी सतराव्या शतकात प्रत्यक्षात आणले होते. संगमेश्वर, पेण, पनवेल, कल्याण, भिवंडी येथे मोठमोठी मिठागरे होती. तेथील मीठ देशावर येत असे. पण पोर्तुगीजांच्या गोवा प्रांतात होणारे मीठ स्वस्त मिळत असे. त्यामुळे पेण पनवेलकडील मिठाचा व्यापार बसण्याची वेळ आली. त्या वेळी कुडाळचा सरसुभेदार नरहरी आनंदराऊ याला पत्र लिहून महाराजांनी गोव्यातील मिठावर जबर जकात बसवावी अशी आज्ञा केली. 'संगमेश्वराहून बारदेशचे मीठ महाग पडेल ऐसा जकातीचा तह देणे' असे त्यांचे शब्द आहेत.
 या सर्वावरून व्यापार वाढवावा, त्यायोगे मराठा समाज समृद्ध व्हावा व स्वराज्याचा आर्थिक पाया भक्कम व्हावा, याची छत्रपतींना किती तळमळ होती हे दिसून येईल. पण येथल्या वैश्यवाणी समाजाने त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला नाही. आणि राजश्रीची ही शोभा जी नष्ट झाली ती झालीच. मराठी स्वराज्यातही ती परत आली नाही. पेशवे कायमचे कर्जबाजारी असत. त्या वेळी साहुकार होते. पण ते व्याजबट्टा करणारे होते. व्यापारी नव्हते. महाराष्ट्राचे हे अंग तेव्हापासून लुळे झालेले आहे; त्यात पुन्हा जीव भरलाच नाही.

जातिभेद
 येथे राष्ट्रभावना पोसली गेली नाही, लोकशाहीची तत्त्वे रुजली नाहीत, याचे दुसरे तितकेच महत्त्वाचे कारण म्हणजे जातिभेद हे होय. मराठी राज्यात व साम्राज्यात प्रत्यक्ष जातीय कलह झाले नाहीत, सर्व जातींतून सरदार सेनापती निर्माण झाले, त्यामुळे, जातिभेदामुळे स्वराज्याचे तसे काही नुकसान झाले नाही, असे काही पंडितांनी म्हटले आहे. पण हा फार मोठा गैरसमज आहे. कसा तो पाहा.

अंध बंधने
 जातिभेदामुळे भारतात व महाराष्ट्रात व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य यांचा उदयच झाला नाही. युरोपात पोपची धर्मसत्ता, राजसत्तेप्रमाणेच अगदी संघटित अशी होती. तशी पुरोहितशाही येथे नव्हती. पण जातींच्या पंचायतींची सत्ता येथे त्या पोपच्या सत्तेपेक्षा दसपट बलिष्ठ होती. पोप एका व्यक्तीला फार तर जाळून मारीत असे. पण या जातिपंचायती सर्व कुटुंब आणि गणगोत यांवर बहिष्कार घालून त्यांना जीवनातूनच उठवीत असत; आणि ही जातिबंधने केवळ रोटीबंदी आणि बेटीबंदी एवढ्यापुरतीच मर्यादित नसून, कोणत्या जातीने कोणत्या हाताने पाणी प्यावे, गंध कसे लावावे, धोतरे कशी नेसावी, स्त्रियांची वस्त्रे कशी असावी, येथपर्यंत जीवनाच्या सर्व व्यापारांपर्यंत ती आवळलेली असत. कुंभारात दोन जाती आहेत. लग्नामध्ये मिरवणुकीत बायकांनी डोक्यावर पाण्याने भरलेला घडा घेण्याचा अधिकार एका जातीला आहे, दुसरीला नाही. या नियमाचे उल्लंघन होताच मारामाऱ्या होऊन ते खटले पेशव्यांपर्यंत आलेले आहेत. वडाऱ्यांच्या काही जातीत स्त्रिया चोळी वापरीत नाहीत. तशी काही स्त्रियांनी वापरताच त्यांचे खून पडले. ही हकीकत पंचवीस वर्षापूर्वीचीच आहे. कोणत्या जातीने मांतीची भांडी, कोणत्या जातीने तांब्याची वा पितळची भांडी वापरावी हे ठरलेले आहे आणि ती बंधने पोपच्या बंधनांपेक्षा आजही जास्त बळकट आहेत.

व्यक्तित्व नाही
 अशी अविवेकी, अर्थशून्य, कार्यकारणहीन बंधने ज्या समाजात आहेत त्या समाजात व्यक्तिस्वातंत्र्य, विवेकनिष्ठा, बुद्धिप्रामाण्य यांचा उदय होणे शक्य नाही. आणि व्यक्तिस्वातंत्र्य नाही म्हणजे व्यक्तित्व नाही, व्यक्तीला पृथकपणा नाही. व्यक्तीच्या पृथक्-पणातूनच, व्यक्तित्वातूनच सर्व मानवी कर्तृत्वाचा उदय होत असतो. आणि अशा व्यक्ती याच राष्ट्रसंघटना व लोकसत्ता यांचा आधार असतात. कारण या व्यक्तीच नवे संशोधन करू शकतात, नवे तत्त्वज्ञान सांगू शकतात, नवे सिद्धात मांडू शकतात. असे स्वातंत्र्य मिळाल्यावाचून रसायन, पदार्थविज्ञान, जीवशास्त्र यांची प्रगती अशक्य आहे. युरोपात दीर्घकाळ ग्रीक वैद्यकच रूढ होते. पण प्रबोधन-युगात बुद्धिस्वातंत्र्य येताच मानवी शरीराचा नव्याने अभ्यास करण्याचे साहस लोक करू लागले. त्यासाठी स्मशानात पुरलेली प्रेते ते गुपचूप आणीत व त्यांची चिरफाड करीत. प्रेताची चिरफाड करणे हे ख्रिस्ती धर्माला मंजूर नव्हते. धर्मपीठे त्या गुन्ह्याला जबर शिक्षा करीत. पण तरीही लोकांनी ते साहस केले आणि आयुर्विद्येची प्रगती केली. पाश्चरला, जंतूमुळे रोग होतात, हे सांगण्याबद्दल शिक्षा होण्याची वेळ आली होती. आणि बायबलविरुद्ध विकासवाद प्रस्थापित करण्याबद्दल डार्विनवर भयंकर गहजब झाला होता. असे असूनही युरोपीय अभ्यासकांनी आपले विद्याप्रेम सोडले नाही. वाटेल त्या यातना, मृत्युदंडही सोसून सत्यसंशोधन चालवायचे असा निर्धार त्यांनी केला म्हणून युरोपला ऐश्वर्य प्राप्त झाले. भारतात हे साहस कोणी केले नाही. त्यामुळे या समाजात माणसाचे मन सदैव बद्ध, जखडलेले आणि त्यामुळे प्रज्ञाहीन असेच राहिले. कलियुग कल्पना, समुद्रगमननिषेध, पतितपरावर्तनाचा निषेध यांनी या समाजाची सर्व प्रगती खुंटली होती. शिवछत्रपतींनी या शृंखलांवर घाव घातला होता. पण यामुळे समाजाचा नाश कसा होतो ते दाखवून सर्व समाजात छत्रपतींच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य, ग्रंथ लिहिण्याचे कार्य, कोणी केले नाही. समुद्रगमनाला शास्त्रात त्या वेळी देहान्त प्रायश्चित्त होते. पण त्यापेक्षाही फार भयंकर असे जातिबहिष्काराचे प्रायश्रित्त होते. परदेशात मनुष्य इतर जातीबरोबर जेवणार, त्यांच्या हातचे खाणार, आणि त्यामुळे त्याची जात बाटणार, म्हणून जातिपंचायती त्या माणसावर बहिष्कार टाकीत. त्यामुळे परदेशात जाऊन राहणे, तेथे विद्या शिकणे, व्यापार करणे असले साहस करण्यास कोणी धजत नसे. जातिभेद हा या देशाला असा घातक ठरलेला आहे. त्यामुळे समाज व्यक्तिस्वातंत्र्याची जोपासना करू शकला नाही आणि प्रत्येक मनुष्य कळपातला एक घटक, असाच राहिला. तो व्यक्ती या पदवीला गेलाच नाही. त्यामुळे विद्या, कला, शास्त्रे, व्यापार, उद्योग, या सर्वाचा लोप होऊन अज्ञान, दारिद्र्य, पारतंत्र्य या नरकात तो दीर्घकाल पिचत राहिला.

पुराणवर्चस्व
 निवृत्ती आणि जातिभेद यांच्याइतकेच भारतीयांच्या अवनतीचे, तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या मनावरील पुराणवर्चस्व हे होय. या वर्चस्वामुळे वास्तव जगापासून मनाने हिंदुलोक फार दूर गेले. इतिहास भूगोल या कल्पनाच त्यांच्या मनातून नाहीशा झाल्या. पश्चात्य लोक जगप्रवास करीत असताना, नवखंड पृथ्वी व दहावे खंड काशी, असा भारतीयांचा भूगोल होता. आणि उन्नती, अवनती, जय, पराजय, उत्कर्षापकर्ष हे सर्व पापपुण्यामुळे, दैवयोगाने, परमेश्वरी इच्छेने घडत असते ही त्यांची ऐतिहासिक घडामोडींची मीमांसा होती. याच वेळी युरोपात कार्यकारणभावाचा अभ्यास चालू झाला होता आणि सर्व घडामोडींची त्याअन्वये मीमांसा होऊ लागली होती. भारतात लोकहितवादींच्या काळापर्यंत, पूर्वी रावण मातला होता तसेच आता इंग्रज मातले आहेत, रामाने अवतार घेऊन रावणाचा नाश केला तसा इंग्रजांचाही नाश परमेश्वर अवतार घेऊन करील, अशी लोकांची श्रद्धा होती. कारण पुराणांत तशी वर्णने आहेत. रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये मुळात खूपच वास्तववादी आहेत. 'मी मानवी प्रयत्नाने रावणाचा वध केला आहे,' असे रामचंद्र म्हणतात. राम, सीता, पांडव, द्रौपदी, श्रीकृष्ण, त्यांच्या स्त्रिया यांचे मूळ काव्यात अत्यंत दुःखद शेवट झालेले दिसतात. पण असे दुःखद शेवट होऊच द्यावयाचे नाहीत, असा पुराणांचा कटाक्ष आहे. त्यासाठी त्यांनी शंकरपार्वतीची योजना केली आहे. हरिश्चंद्र, श्रियाळ, मार्केंडेय यांच्यावर कसलीही संकटे येवोत, शंकर त्यांना शेवटी सोडवितात. अंबरीष, प्रल्हाद, ध्रुव यांना विष्णू सोडवितात. रामायण, महाभारत यांतील अनेक घटनांचे मूळ स्वरूप बदलून पुराणिकांनी आणि पुढे प्राकृतभाषांतील लेखकांनी त्यांना परमेश्वरी चमत्कारांचे रूप देऊन टाकले आहे. रामाने सेतू बांधला तो दगड, माती, झाडे आणून साध्या मानवी प्रयत्नांनी बांधला, असे रामायणात आहे. पण रामनामामुळे दगड तरले, असे त्यांचे पुराणात चमत्काररूप आहे. मूळ रामायण आणि महाभारत मराठीत किंवा इतर प्राकृत भाषांत कोणी आणलेच नाही. अनेक संस्कृत पंडितांनीच त्यांची पुराणे करून टाकली होती, रामकृष्णांच्या लीला असे त्यांना रूप दिले होते. मराठीत ती पुराणेच आली. महाभारताच्या शांतिपर्वात राजनीती, व्यापार, शेती, ऐतिहासिक घडामोडी यांचे वास्तव दृष्टीने, कार्यकारणभावाचा बोज राखून वर्णन केलेले आहे. पण त्याचे एक अक्षरही मराठी कवींनी किंवा संतांनी मराठीत आणलेले नाही. जे घडते ते रामकृष्णांच्या लीलांमुळे घडते, मानवी प्रयत्नामुळे नव्हे, असेच सांगण्याचा त्यांचा हेतू आहे. संत चरित्रकारांनी हेच केले आहे. सर्व संतांचा समाजाने छळ केला, पण प्रत्येक वेळी परमेश्वराने चमत्कार करून त्यांना सोडविले, अशीच सर्वत्र वर्णने आहेत. मराठी मनाचे पोषण अशा पुराण-कथांवर होत होते. असे मन नेहमीच दुबळे व कर्तृत्वहीन राहते. भारतातील अनेक प्रदेश दीर्घकाळ पारतंत्र्यात राहिले, त्याचे कारण चमत्कारनिष्ठ, दुबळे, भोळेभाबडे, असे हे मनच आहे. शिवसमर्थांच्यासारखे, विद्यारण्य हरिहरबुक्कांसारखे थोर पुरुष ज्या प्रदेशात निर्माण झाले, तेथे काही काळ मानव पराक्रमी झाला. 'पुरुष प्रयत्न बलवत्तर,' असे छत्रपती म्हणाले, 'केल्याने होत आहे रे,' 'शक्तीने मिळती राज्ये,' असे समर्थांनी सांगितले आणि लिहिलेही. तेवढ्यापुरते येथे चैतन्य निर्माण झाले. पण वर सांगितलेच आहे की हे एकट्यादुकट्याचे कार्य नाही. महाराष्ट्रात वा अन्यत्र जी कीर्तन, प्रवचने चालत ती सर्व पुराणकथांची, पुराणतत्त्वज्ञानाची चालत. ज्या वेळी पश्चिम युरोपात सर्व भाषांतील प्राध्यापक, पंडित, धर्मसुधारक ग्रीकविद्येची प्रवचने, कीर्तने करीत होते त्या वेळी भारतात, महाराष्ट्रात दौपदीला वस्त्रे नेसविली, खांब फोडून देव प्रगट झाले, भिंत चालविली, देऊळ फिरविले, अशी कीर्तने होत होती. अशा कीर्तनांतून समाजप्रबोधन होत नाही. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य, इहवाद, प्रयत्नवाद यांना चालना मिळत नाही. धर्मग्रंथांचा, सनातनशास्त्रांचा कितीही विरोध असला तरी, विवेकाला दिसले ते सत्य सांगण्याचे धैर्य मानवी मनाला लाभत नाही. तशा धैर्यावाचून राष्ट्रनिष्ठा, लोकसत्ता, यांची मूलतत्त्वे समाजात रुजविणे अशक्य असते.

अपयश का ?
 शिवछत्रपतींच्या कार्याचे मागील काही प्रकरणांत जे विवेचन केले आहे त्यावरून समाजप्रबोधनाची काही तत्त्वे त्यांनी आपल्या मनाशी निश्चित केली होती हे दिसून येईल. समर्थांनीही अशीच आणखी काही तत्त्वे जाणली होती आणि त्यांचे थोडे विवेचनही केले होते. त्यामुळेच येथे प्रयत्नवाद, स्वातंत्र्यप्रेम, विजीगिषा, ऐश्वर्याकांक्षा, प्रवृत्तिधर्म, यांचा उदय होऊन लोकांत राष्ट्रकल्पनेचा प्रादुर्भाव होत होता. त्यामुळेच स्वराज्यस्थापनेचे कार्य शिवछत्रपतींना यशस्वारीत्या करता आले. पण या दोन पुरुषांना, त्यांचे कार्य पुढे चालविणारे, समर्थ वारस लाभले नाहीत; आणि आमूलाग्र समाजपरिवर्तन होण्यासाठी जे समाजप्रबोधन अवश्य होते ते घडवून आणणारे शेकडाे शास्त्रज्ञ, प्रवासी, तत्त्ववेत्ते, प्रवचनकार, वक्ते येथे झाले नाहीत. त्यामुळे क्रांतीची बीजे या भूमीत पेरली तरी अवश्य ते खतपाणी न मिळाल्यामुळे ती रुजली नाहीत, त्यांना विरूढी फुटली नाहीत, त्यांना कोंब आले नाहीत. पश्चिम युरोपातल्या इंग्लंड, फ्रान्स या देशांप्रमाणे महाराष्ट्र बलसंपन्न आणि ऐश्वर्यशाली का झाला नाही याची कारणमीमांसा ही अशी आहे.
 महाराष्ट्र-संस्कृतीचा इतिहास सांगताना, बहामनी कालानंतर मराठा कालाच्या, मराठा युगाच्या विवेचनास आपण प्रारंभ केला. आणि प्रथम या युगाचे आद्यप्रवर्तक जे शिवछत्रपती त्यांच्या कार्याचे येथवर विवेचन केले. त्यावरून हे दिसून येईल की त्यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या इतिहासालाही नवे वळण लावले, त्या इतिहासातही नवे युग निर्माण केले. त्यांच्या नंतरच्या राज्यकर्त्यांच्या ठायी त्यांच्यासारखी प्रज्ञा नव्हती, तसे कर्तृत्व नव्हते. पण मराठा समाजात एक नवे चैतन्य निर्माण झाले होते यात शंकाच नाही. त्याच बळावर, आपल्या सर्वसामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाचे भारताच्या इस्लामीकरणाचे स्वप्न त्यांनी धुळीस मिळविले आणि माेगली सत्तेचा कणाच मोडून टाकला. आणि त्याच बळावर पुढे मराठ्यांनी आपल्या स्वराज्याचे साम्राज्य केले. अशा या पुढल्या काळातल्या महाराष्ट्रसंस्कृतीचा, तिच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक अंगांचा इतिहास आता पाहावयाचा आहे.