Jump to content

महाराष्ट्र संस्कृती/मऱ्हाष्ट्र राज्य

विकिस्रोत कडून


२१.
'मऱ्हाष्ट्र राज्य '
 


(१) आम्ही मराठे
 वतनदारी, तर्फदारी, मिरासदारी यांमुळे महाराष्ट्राची आर्थिक प्रगतीच फक्त खुंटली असे नाही, तर त्यामुळे मराठा समाज हा समाजच राहिला नाही अशी अवस्था झाली. बहुतेक सर्व देशमुख, सरदार, वतनदार यांचे एकमेकांत पिढ्यान पिढ्यांचे हाडवैर असे. आणि त्यांच्यात रक्तपात, कत्तली ही नित्याचीच स्थिती झाली होती. त्यामुळे सर्व समाज मिळून, मराठे काही कार्य करतील, त्यांच्यांत काही संघशक्ती निर्माण होईल हे शक्यच नव्हते.

वतनदारीचा रोग
 पण याहीपेक्षा एक वाईट गोष्ट होती. दोन भिन्न तर्फदार किंवा देशमुख घराण्यामध्येच असे रक्तपात किंवा खून होत असे नाही. एकाच घराण्यातील भावाभावातही असेच प्रकार चालत. भिन्न घराण्यांतील हाडवैराची एकदोन उदाहरणे मागे दिलीच आहेत. आता भाऊबंदांच्या हाडवैराची उदाहरणे पाहा. मसूरच्या जगदाळे देशमुख घराण्यातील जगदेवराव यास चार मुलगे. बाबाजीराव हा पहिल्या बायकोचा आणि रामाजी, विठोजी व दयाजी हे तीन दुसऱ्या बायकोचे, जगदेवांनी केलेल्या मिळकतीच्या वाटण्या या भावांना पसंत पडल्या नाहीत; त्यामुळे एकमेकांवर मारेकरी घालणे सुरू झाले. त्यात रामाजी व दयाजी यांचे खून पडले, विठोजी पळून गेला. बाबाजीरावाच्या मुलांच्यावर हीच आपत्ती आली. त्यात त्याच्या एका मुलाचा खून पडला. त्याची बायको लपून राहिली म्हणून वाचली.

  जेथे घराण्यातील भाऊबंदकीची कथा अशीच आहे. खेळोजीचा नातू कान्होजी यास सात मुलगे. सर्वात धाकटा नाईकजी यास अदिलशहाने देशमुखीचे वतन दिले. त्यामुळे दोघा वडील भावांनी नाईकजीस ठार मारले. तेव्हा नाईकजीच्या लोकांनी त्या भावांना ठार मारले. मग आदिलशहाने नाईकजीची बायको अनसवा हिच्या नावाने देशमुखी करून दिली. पण तिला मुलगा झाल्यावर त्या दोघांना मारण्यासाठी नाईकजीचे दुसरे दोघे वडील भाऊ चालून आले. अनसवा मारली गेली. पण मुलाला दाईने वाचविले. हा मुलगा म्हणजेच शिवाजीला मिळालेला कान्होजी जेधे होय.
 वतनदारी हा केवढा भयानक रोग महाराष्ट्र समाजाला जडला होता ते यावरून कळून येईल. या लोकांना नीती, धर्म, आईबाप, स्त्री, बाल यांपैकी कशाचीच जाण राहिली नव्हती. फलटणच्या मुधोजी निंबाळकराला त्याच्या दोघा मुलांनीच ठार मारले. कारण त्याने त्यांच्या धाकट्या भावाला देशमुखी देण्याचा विचार केला होता. स्त्रीहत्या, पितृहत्या ही भारतीय संस्कृतीने महापातके मानली आहेत. पण वतनदार असा भेदाभेद मानीत नसत. सत्य, अहिंसा, दया हा धर्म संत तीनशे वर्षे या समाजाला शिकवीत होते. पण त्याचा कसलाही संस्कार वनतदार आपल्यावर होऊ देत नसत.
 इत्यर्थ असा की महाराष्ट्र समाज हा समाजच राहिला नव्हता. माणसामाणसांमध्ये काहीतरी नीतिनियम, काही कर्तव्यबुद्धी, काही बंधने, कोठला तरी कायदा चालत असेल तरच त्या समूहाला समाज म्हणता येईल. तशी कसलीही बंधने, कसलीही नीती या समाजात राहिली नव्हती.

पातशाही किताब
 देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी यांच्या या कथा झाल्या. यांच्या वरच्या पायरीवर असणारे जे मनसबदार, जहागीरदार, सरदार यांच्या कथा यांहून फारशा निराळ्या नाहीत. छत्रपतींच्या पूर्वी दोन-अडीचशे वर्षांच्या काळात, विशेषतः बहामनी राज्याची पाच शकले झाल्यानंतर, मोठमोठ्या अधिकारपदांवर अनेक मराठा सरदार चढले होते. कंवरसेन, अचलोजी जाधव, संभाजी चिटणीस (निजामशाही), मुरारराव जगदेवराव, रामराव, कदमराव, मादण्णा, आक्कण्णा (कुतुबशाही), मुरार जगदेव (आदिलशाही) ही नावे प्रसिद्धच आहेत. यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करून अनेक मराठ्यांना मोठ्या पदावर चढविले होते. यांतील काही इतके पराक्रमी होते की सुलतानाशी जरा बिनसताच ते बंडाळ्या माजवीत व सुलतानाला हैराण करीत. जगदेवरावाने तीनही पातशहांना त्रस्त केले होते आणि वाटेल त्यास राजपदावरून काढण्याची व स्थापण्याची त्याच्या ठायी शक्ती होती असे सरदेसायांनी म्हटले आहे. मनात प्रश्न असा येतो की यांनी ही शक्ती मराठा सरदार राज्यपदी आणण्यासाठी, स्वराज्यस्थापनेसाठी का उपयोगात आणली नाही ? जावळीचे वतन मूळ शिर्क्यांचे. गुजर, मोहिते, महाडिक यांच्या मदतीने ते आदिलशहाला जुमानीनात. त्या वेळी मोरे कर्नाटकात होते. पातशाही हुकमावरून त्यांनी शिर्क्यांवर चालून जाऊन त्यांचा बंदोबस्त केला. पण शिर्के, गुजर, मोहिते, महाडिक यांनाच आपण मिळावे आणि सुलतानाला पदच्युत करून आपले राज्य स्थापावे असे त्यांच्या मनात आले नाही. 'आम्हांस पातशहाने राज्य दिले आहे' असा दिमाख ते मिरवीत. मोरे यांच्याप्रमाणेच घाटगे, घोरपडे, या घराण्यांतील पराक्रमी वीरांनी सर्जेराव, प्रतापराव, हिंदुराव, अमीर-उल-उमराव असे किताब निरनिराळ्या सुलतानांकडून मिळविले होते. या किताबात त्यांना भूषण वाटे आणि ते मिळविण्यासाठी ते स्वकीयांवर चालून जात, कत्तली करीत, जाळपोळ, विध्वंस करीत.
 आणि इतके करून मिळविलेले किताबच नव्हे तर ती वतने, त्या मनसबी, आणि त्या मनसबदारांचे जीवितही सुलतानाच्या लहरीवर अवलंबून असे. लहर फिरताच आदिलशहाने मुरार जगदेवास ठार मारले. कुतुबशहाने रामरावास ठार मारले. त्यानेच कदमरावास ठार मारले. लखूजी जाधवरावांचा शेवट असाच झाला. पण त्यांना मारल्यावर, तशाच प्रकारे, त्यांच्या भाऊबंदांनी त्या सुलतानांवर कधी सूड उगवला नाही. त्या सुलतानांना मुसलमान सरदार केव्हाही पदच्युत करीत, ठार मारीत. पण मराठा सरदारांनी हे पाप कधी केले नाही. वतनासाठी आपल्या भाऊबंदांवर ते सूड उगवीत, त्यांच्या बायकामुलांची हत्या करीत. त्यात पाप नव्हते. पण मुस्लिम सुलतान किंवा कोणी सरदार यांवर ते कधी सूड उगवीत नसत.
 अशा या समाजातून शिवछत्रपतींना आदिलशाही, पोर्तुगीजशाही, मोगलशाही या शाह्यांच्या विरुद्ध धैर्याने उभी टाकेल, त्यांच्यावर मात करील, अशी संघशक्ती उभी करायची होती. या समाजातून त्याना राष्ट्र निर्माण करावयाचे होते.

कान्होजी देशमुख
 अफजलखान शिवाजी महाराजांवर चालून येत होता. त्या वेळी, मावळखोऱ्यातील सर्व देशमुखांना, अफजलखानास सामील व्हावे, अशी आदिलशहाची फर्माने निवाली होती. सर्व देशमुखांच्या पुढे मोठा बिकट प्रश्न आला. त्या वेळी कान्होजी जेधे ते फर्मान घेऊन महाराजांच्या कडे आले व सल्ला विचारू लागले. महाराज म्हणाले, 'शेजारचे केदारजी खोपडे व खंडोजी खोपडे खानास मिळाले तसे तुम्ही मिळावे. न गेलात तर वतन जाईल आणि प्राणावरही बेतेल.' यावर कान्होजी म्हणाले, 'शहाजीमहाराजांनी तुमचे साह्य करण्याविषयी आमच्याकडून शपथ घेवविली आहे. त्या शपथेला आम्ही जागणार. मग वतनाचे काही होवो.' हे उत्तर ऐकून महाराजांना आनंद झाला. मग त्यांनी कान्होजींना इतर देशमुखांची बैठक घेऊन सर्वांचा विचार घेण्यास सांगितले. त्या बैठकीला बांदल, सिलीमकर, पासलकर, मारणे, ढमाले, मरळ, डोहार असे अनेक देशमुख वतनदार आले होते. त्यांना कान्होजी जेधे म्हणाले, 'मुसलमान बेइमान आहेत. आपले काम झाल्यावर नसते निमित्त ठेवून नाश करतील. महाराजांचे हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे, सर्वांनी हिम्मत धरून एकनिष्टेने सेवा करावी.' हे बोल ऐकून सर्वांना स्फूर्ती आली व ते महाराजांना मिळाले.
 छत्रपतींनी लोकांना कोणते नवे तत्त्वज्ञान शिकविले असेल याची यावरून कल्पना येईल. वर जी वतनासक्ती वर्णिली आहे तिच्याहून अगदी ध्रुवभिन्न अशी ही वृत्ती आहे. कान्होजीच्या वरील उद्गारांत काही निष्ठा आहे, काही कर्तव्यबुद्धी आहे, शपथेला जागणे आहे, आणि विशेष म्हणजे त्यागाची, वतनाच्या त्यागाचीही, सिद्धता आहे. यांपैकी कोणतेही नीतितत्त्व त्या वेळी वतनदारांच्या ठायी शिल्लक राहिले नव्हते. महाराजांच्या वाणीमुळे आणि प्रत्यक्ष आदर्शामुळे ही नीती या देशमुखांच्या ठायी जागी झाली. पण याहीपेक्षा पलीकडची एक गोष्ट झाली. जे राज्य आता व्हावयाचे आहे, जे होत आहे, महाराज जे स्वराज्य म्हणत आहेत ते मऱ्हाष्ट्र- महाराष्ट्र- राज्य आहे, हा विचार या देशमुखांच्या मनीमानसी ठसला होता.

राष्ट्र - अर्थ
 शिवछत्रपतींनी या भूमीत राष्ट्र निर्माण केले म्हणजे काय केले ? प्रथम काही थोर इतिहासपंडितांनी केलेले वर्णन देऊन मग त्याची थोडी मीमांसा करू. रियासतकार सरदेसाई म्हणतात, 'शिवाजीच्या राज्य स्थापनेचे स्वरूप अनेक दृष्टींनी ध्यानात ठेवण्यासारखे आहे. महाराष्ट्रीयांचे एक राष्ट्र बनून त्यास स्वतंत्रता प्राप्त झाली आणि जगाच्या इतिहासात मराठ्यांचे नाव प्रसिद्धीस आले. तसेच महाराष्ट्रीयांच्या अंगी असलेले गुण बाहेर प्रसिद्ध होण्याची संधी या राज्यस्थापनेने मिळाळी. तिसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रात परस्परविरोधी अनेक जाती असून शिवाजीचे पूर्वी लोक विस्कळित होते. शिवाजीने त्यांच्या ठिकाणी ऐक्य उत्पन्न केले, म्हणजे प्रत्येक इसमाचे स्वतःचे संबंधाने व समाजाचे संबंधाने असे दोन प्रकारचे कर्तव्य असून या दोन कर्तव्यांचा विरोध टाळून, दोन्ही कशी साधावी, हे शिवाजीने लोकांस शिकविले. ब्राह्मण, मराठे, प्रभू, वैश्य, शूद्र इत्यादी नाना जातींच्या लोकांनी, आपली जात, पाहिजे तर, आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत खुशाल पाळावी; परंतु बाहेर आल्यावर कोणत्याही सार्वजनिक कामात सर्व लोक सारखे, सर्वांनी एकदिलाने राष्ट्रहित, समाजहित, सार्वजनिक हित साधलेच पाहिजे, अशा प्रकारे स्वकर्तव्य बजावण्याची अपरिहार्य जबाबदारी शिवाजीने प्रत्येक इसमाच्या मागे लावून दिली.' (शककर्ता शिवाजी, पृ. २१७)
 या एका परिच्छेदात राष्ट्रीयत्वाचे सर्व घटक सांगून, राष्ट्रतत्त्वाची अतिशय सम्यक कल्पना नानासाहेबांनी दिली आहे. प्रत्येक व्यक्ती सार्वजनिक कार्यात सहभागी झाली पाहिजे. समाजहित, समाजाचा उत्कर्ष ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, हा त्यातला प्रधान घटक होय सर्व जातींना समप्रतिष्ठा आहे, हा दुसरा घटक होय. आणि या सर्व समाजाला मराठा म्हणून एक अस्मिता निर्माण झाली, हा तिसरा घटक होय.
 यदुनाथ सरकार यांनी महाराजांच्या बद्दल असेच धन्योद्गार काढले आहेत. ते म्हणतात, 'शिवाजी महाराजांपूर्वी मराठे हे अनेक दक्षिणी शाह्यांमधून पसरले होते. त्यांना एकत्र आणून त्यांनी त्यांचे एक प्रबळ राष्ट्र बनविले. मोगल, विजापूर, पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी यांच्या प्रतिकाराला न जुमानता त्यांनी ही गोष्ट घडवून आणली. मध्ययुगीन भारतात कोणाही हिंदूने अशी कर्तबगारी दाखविली नव्हती. विजापूर व दिल्ली यांच्या सत्तेला आव्हान देणारा शिवाजी हा पहिलाच वीर पुरुष होय. हिंदुसमाज राष्ट्र निर्माण करू शकतो, राज्य स्थापन करू शकतो, विद्या, कला यांना उत्तेजन देऊ शकतो, व्यापार, उदीम यांची भरभराट करू शकतो, या गोष्टी शिवाजी महाराजांनी सिद्ध करून दाखविल्या... त्यांच्या राज्यात सर्व धर्मांना समान वागणूक मिळाली, स्त्रियांचे रक्षण झाले, आणि प्रत्येक जातीच्या माणसास पुढे येण्यास वाव मिळाला. भारताची जनता अठरापगड जातीची आहे. महाराजांचे धोरण हेच अशा देशासाठी आवश्यक असलेले आदर्श धोरण होय.' (शिवाजी आणि त्याचा काल, सहावी आवृत्ती, पृ. ३८९, ३८५)
 सेतुमाधवराव पगडी यांनी 'छत्रपती शिवाजी' या आपल्या चरित्रग्रंथात असाच भावार्थ सांगितला आहे. ते म्हणतात, 'शिवाजी हा राष्ट्रपुरुष होता. त्याच्या आधी मराठ्यांमध्ये राष्ट्रभावना मुळीच नव्हती. हा समाज जातिभेद गुस्त आणि वतनासक्त असा होता. छत्रपतींनी आपल्या वाणीने व कृतीने या लोकांना ध्येयवाद शिकविला.' (पृ. २८, २९) 'छत्रपतींनी मराठ्यांच्या सुप्त शक्ती जागृत केल्या. त्यांनी त्यांच्या ठायी आत्मविश्वास निर्माण केला. हेकट, धर्मांध अशा परकी शत्रूशी लढून, आपल्या उच्च नीतिमूल्यांची जपणूक करण्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याइतके उदात्त असे काहीच नाही, ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. त्यांचे सेनादल सर्व जनसामान्यातून उभारलेले असून त्याच्या रोमरोमात राष्ट्रीयभावना भिनलेली होती. त्यांचे मंत्री, त्यांचे वकील, त्यांचे सेनापती, त्यांचे सर्व अधिकारी हे जनतेतून आलेले होते. असे हे छत्रपतींचे राष्ट्र राष्ट्रधर्मावर अधिष्ठित होते. न्याय, नीती, सहिष्णुता, प्रजापालन हा त्यांचा धर्म होता. यामुळेच भारताच्या महापुरुषांत छत्रपतींना अग्रमालिकेत स्थान मिळालेले आहे.' (पृ. ५२-५३)
 शिवछत्रपतींनी महाराष्ट्रात राष्ट्र निर्माण केले म्हणजे काय केले हे पाहण्यासाठी आपण सरदेसाई, यदुनाथ सरकार व सेतुमाधवराव पगडी या पंडितांनी त्यांच्या कार्याचे केलेले वर्णन पाहिले. आता प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासाच्या आधारे काही मीमांसा करू.

व्याख्या
 राष्ट्र ही अर्वाचीन कल्पना आहे. चौदाव्या पंधराव्या शतकात पश्चिम युरोपात तिचा उदय झाला. त्या वेळी व त्यानंतर अनेक पंडितांनी राष्ट्राची व्याख्या केली आहे. एका भूमीवरील निष्ठा, एका समाईक प्राचीन परंपरेचा अभिमान, एक भाषा, एकवंशीयत्वाची जाणीव, सर्वांनी मिळून केलेल्या पराक्रमांच्या व भोगलेल्या आपत्तींच्या स्मृती व स्वतंत्र सार्वभौम राजसत्ता या गुणांनी इतरांपासून भिन्न झालेला व अंतरात एकात्म झालेला समाज - असा त्या भिन्नभिन्न पंडितांनी केलेल्या व्याख्यांचा सारार्थ आहे. अशा तऱ्हेची राष्ट्रसंघटना जगात कोणत्याच देशात त्या आधी निर्माण झालेली नव्हती. प्राचीन भारतीयांचा तसा काहीसा प्रयत्न होता. अखिल भारत हा एक देश आहे ही भावना त्यांनी निर्माण केली होती. रामायण, महाभारत व पुराणे यांनी सर्व भारतीयांची एक परंपरा घडविली होती हे खरे. पण हे सर्व ग्रांथिक व वैचारिक पातळीवरचे होते. अखिल भारतीय समाजाने– सिंध ते आसाम आणि काश्मीर ते कन्याकुमारी येथील जनतेने- सहभागी होऊन काही पराक्रम केला, सहकार्याने काही महत्कार्य साधले, किंवा समान आपत्तींना तोंड देऊन, त्यांचे दुःख सर्वांनी भोगले असे कधीच घडले नाही. प्रादेशिक पातळीवर अशी भावना कधी निर्माण झाली नाही. महाराष्ट्रापुरते बोलावयाचे तर यादवांचे राज्य सर्व महाराष्ट्रावर होते. पण आपण सर्व मराठे आहो, आपण मराठा तितुका मेळविला पहिजे, आमची एक स्वतंत्र प्राचीन परंपरा आहे, हे राज्य आहे ते मराठ्यांचे राज्य असून त्याच्या उत्कर्षापकर्षाची चिंता वाहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, अशा प्रकारची भावना यादवांच्या प्रजाजनात कधीही निर्माण झालेली नव्हती. मागे वापरलेल्या परिभाषेत बोलावयाचे तर या प्रजाजनांचे नागरिकांत रूपांतर झाले नव्हते. हे जे घडलेले नव्हते ते शिवछत्रपतींनी घडविले.

नवी अस्मिता
 आम्ही मराठे व आमचा देश महाराष्ट्र ही नवी अस्मिता शिवछत्रपतींनी या देशात निर्माण केली. कान्होची जेधे छत्रपतींच्या सहवासात राहिले होते. त्यामुळे त्यांना या नव्या अस्मितेचा बोध झाला होता. म्हणूनच मावळच्या देशमुखांना त्यांनी सांगितले की 'हे मऱ्हाष्ट्र राज्य' आहे. शेवटपर्यंत मराठ्यांना ही जाणीव कायम होती. छत्रपती राजाराम, शंकराजी नारायण सचीव, अनाजी जनार्दन सुभेदार, रामचंद्रपंत अमात्य, महादजी सामराज नामजाद व कारकून यांचे उतारे मागील एका प्रकरणात दिले आहेत. सर्वाचे उद्गार आहेत की हे महाराष्ट्र राज्य, हे मऱ्हाटे राज्य, हे देवाब्राह्मणांचे राज्य आहे. मराठी साम्राज्याच्या अखेरपर्यंत 'हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे' याचा विसर कोणाला पडला नव्हता.
 सभासदाने आवर्जून पुन्हा पुनः म्हटले आहे की 'मऱ्हाठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य जाली नाही.' (कलम ९४, राज्याभिषेक.) 'आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगलशाही ह्या चारी पातशाह्या व समुद्रातील बेवीस पातशाह्या असे जेर जप्त करून नवेच राज्य साधून मराठा पादशहा सिंहासनाधीश छत्रपती झाला.' (कलम ११६, राजा अवतारी) शिवछत्रपतींनी हिंदुत्वाचे रक्षण केले, हिंदूचा तिलक राखला, असा त्यांचा गौरव भूषण कवीने केला आहे. तो करताना हा मराठ्यांचा पराक्रम आहे हेही त्याने सांगून टाकले आहे. 'भूषण सुकवि जीति हद्द मरहट्टन की' असे तो म्हणतो.
 रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्रात 'शिवछत्रपतींनी नूतन सृष्टीच निर्माण केली' असे म्हटले आहे. ही नूतन सृष्टी कोणती ? राष्ट्र ही ती सृष्टी होय. अमात्यांनी 'नवे राज्य' असे तिचे वर्णन करून पुढे खूप तपशील दिला आहे. पण ते वर्णन त्या नूतन सृष्टीच्या बाह्यरूपाचे आहे. तिच्या अंतरातले चैतन्य म्हणजे मराठ्यांमध्ये छत्रपतींनी निर्माण केलेली राष्ट्रभावना हे होय. त्या चैतन्यावाचून यवनाक्रांत झालेला भारत संपूर्ण मुक्त करण्यात मराठ्यांना यश आलेच नसते.
 आम्ही कोण या प्रश्नाचे उत्तर जो समाज देऊ शकतो आणि प्राण पणाला लावून त्या उत्तरामागे उभा राहतो तोच समाज पराक्रम करू शकतो. तोच समाज स्वराज्य- साम्राज्य स्थापू शकतो. शिवछत्रपतींनी महाराष्ट्रातील लोकांना, येथील जनतेला, 'आम्ही मराठे' हे उत्तर देण्याचे सामर्थ्य प्राप्त करून दिले. म्हणजेच त्यांनी मराठ्यांचे राष्ट्र निर्माण केले.

(२) ग्रामाचे नव्हे, राष्ट्राचे घटक
 माणसे आपल्या मनानेच आपल्याभोवती लहान लहान परीघ निर्माण करतात आणि तेवढेच आपले जग, तेवढेच आपले कार्यक्षेत्र असे मानून मोठ्या जगाला, समाजाला विसरतात. समाजात विघटना होते, त्याची संघशक्ती क्षीण होते, तो या संकुचित परिघामुळेच होय. या संकुचित भावनेलाच कूपमंडूक वृत्ती म्हणातात. हिंदु- समाजाच्या नेत्यांनी ग्रामसंस्था, वतनदारी आणि जातिवर्णव्यवस्था असे परीघ किंवा कूप निर्माण करून सर्व हिंदुसमाज विस्कळित करून टाकला. राष्ट्र दृष्टीने तर नाहीच, पण धार्मिक दृष्टीने सुद्धा हा समाज संघटित राहिला नाही.

कूपमंडूक
 वास्तविक या देशात प्राचीन काळी भूमिनिष्ठेचा उदय झाला होता. आणि अखिल भारत ही एक भूमी आहे, अशी भावनाही येथे हळूहळू पोसत होती. शिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी येथे जी लहान लहान प्राजके (प्रजासत्ताक राज्ये) होती, त्यांच्या ठायी राष्ट्रभावनेचा उदय होत होता, असे इतिहासावरून दिसते. ग्रामसंस्था हा त्या काळी या प्राजकांचा पाया मानला जात असे. पण हळूहळू ग्रामसंस्थांना विकृत रूप आले. त्यातूनच सरंजामदारी निर्माण झाली आणि त्याच काळात जातिभेद, वर्णभेद, अस्पृश्यता या रूढी बळावल्या. या सर्वांमुळे या समाजात भिन्नभिन्न परीघ, भिन्न कूप निर्माण झाले. सर्व हिंदुसमाज कूपमंडूक होऊन गेला. यातील वतनदारी, सरंजामदारी यांचा विचार वर केला आहे. आता ग्रामसंस्थांचा विचार करू.
 भारतातील ग्रामसंस्थांचा खूप गौरव केला जातो, आणि एका काळी ग्रामसंरक्षण, ग्रामविकास या दृष्टीने या संस्थांनी चांगले कार्य केले यात शंका नाही. पण प्रारंभापासूनच विषय, भुक्ती, ग्राम अशा ज्या संस्था येथे होत्या, त्यांवरचे अधिकारी राजा नेमीत असे आणि तो अधिकारी वंशपरंपरेने नेमावा, असा शास्त्रकारांनी दण्डकच घालून दिला होता. या पद्धतीतूनच पुढे येथे सरंजामशाही सुरू झाली. शिवाय हळूहळू चातुर्वर्ण्य आणि जातिभेद यांचा जोर वाढू लागला, तेव्हा या संस्थांचे लोकायत्त रूप नाहीसे होऊन सभासदांत पराकाष्ठेची विषमता निर्माण झाली. न्यायाच्या दृष्टीने समता ही तर भारतात शास्त्रकारांनीच निषिद्ध मानली होती. अपराध तोच असला तरी शिक्षा वर्णाप्रमाणे व्हावी असे शास्त्र होते. त्यामुळे या संस्थांतून व्यक्तित्वाचा विकास कधीही झाला नाही आणि मग ग्रामापलीकडे दृष्टी नाही, आणि जातिपलीकडच्या हिताअहिताचा विचार नाही, आणि स्वतंत्र विचार करण्याचे सामर्थ्य नाही, असे होऊन भारतीय समाज हा समाजच राहिला नाही. (सातवाहन ते यादव या कालखंडाच्या विवेचनातील 'स्वायत्त संस्था व लोकसंघटना' या प्रकरणात, डॉ. आळतेकर, डॉ. वेणीप्रसाद, डॉ. रामशरण शर्मा यांच्या आधारे, या विषयाचे सविस्तर विवेचन केले आहे. म्हणून येथे तो अगदी संक्षेपाने सांगितला आहे.) यातच मुस्लिम कालात वतनदारीला अत्यंत घातकी रूप आल्यामुळे सामान्य माणूस ग्रामापलीकडे आणि देशमुख देशपांडे आपल्या वतनी मुलखापलीकडे पाहत नाहीसे झाले. अखिल समाज, अखिल देश, सर्व स्वधमींय समाज यांचे काही आपण लागतो ही भावनाच या भूमीतून नाहीशी झाली. अशा लोकांतून राष्ट्र ही संघटित शक्ती कशी निर्माण होणार ?

दिल्ली दर्शन
 शिवछत्रपतींनी प्रथम केले ते हे की त्यांनी या लोकांना आपण हिंदू, आपण मराठे, आपले महाराष्ट्र राज्य, असा विशाल विचार करावयास शिकविले. हिंदू तो आपला मित्र, मराठा तो मित्र आणि दुष्ट तुरुक आपला समान शत्रू असा समशत्रुमित्रभाव त्यांनी लोकमानसात निर्माण केला. या समशत्रुमित्रभावातूनच राष्ट्रतत्त्वाचा परिपोष होतो हे मागे सांगितलेच आहे. आपण म्हणजे केवळ ग्रामाचे, तेथल्या गोतसभेचे एक सभासद, त्यापलीकडे आपल्यावर जबाबदारीच नाही, असला संकुचित भाव नष्ट करून छत्रपतींनी 'आपण मराठे' ही दृष्टी त्यांना दिली. परमार्थात आत्मज्ञानाची जितकी आवश्यकता असते तितकीच, किंबहुना त्यापेक्षा जास्त समाजाच्या ऐहिक जीवनात असते. जो कूपमंडूक कूप हेच जग मानतो, मी कूपाचाच मालक असे समजतो, त्याला सर्व महाराष्ट्र, सर्व हिंदुस्थान हे तुझे जग आहे व या सर्व भूमीचा मालक तू आहेस, या सर्व भूमीची चिंता वहाणारा तू विशाल आत्मा आहेस, हे ज्ञान दिल्यावाचून महत् कार्य करण्याचे सामर्थ्य त्याला येणारच नाही. समर्थांनी अगदी लहानपणीच आईला, 'चिंता करितो विश्वाची' असे उत्तर दिले होते. अशीच विश्वाची चिंता पारमार्थिक व ऐहिक दोन्ही जीवनात करावयास त्यांनी महाराष्ट्रीयांना शिकविले. शिवछत्रपतींनी 'हिंदवी स्वराज्य' हा मंत्र त्यांना सांगून हेच विशाल ध्येय त्यांच्यापुढे उभे केले. प्रारंभापासूनच आपली मुद्रा विश्ववंदिता असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. केवळ आदिलशहा किंवा कुतुबशहा यांना संतुष्ट करण्यातच धन्यता मानणाऱ्या, आणि वतनाचे स्वामित्व हेच अंतिम उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवणाऱ्या मराठ्यांना हे विशाल दर्शन होताच त्यांना नवे स्फुरण आले; त्यांना दिल्ली दिसू लागली; आणि शेजारच्या वतनदारांची बायकामुले मारण्यात खरा पुरुषार्थ नसून दिल्लीवर चालून जाण्यातच तो आहे, हा भाव त्यांच्या मनात उदित झाला; आणि संतांची निवृत्ती, शास्त्रीपंडितांचे कलियुग यांनी क्षीण शक्ती झालेला हा समाज पराक्रमाच्या कोटी करण्यास सिद्ध झाला.

युद्धातून राष्ट्र
 आग्र्याहून सुटून आल्यानंतर दोनतीन वर्षांत सर्व सिद्धता करून छत्रपतींनी पुन्हा १६७० साली रणसंग्राम सुरू केला व एका मागोमाग अभूतपूर्व असे विजय मिळविले. त्यांचे वर्णन करताना रियासतकार सरदेसाई लिहितात, 'याच युद्धात मराठ्यांचे राष्ट्र तयार झाले. या राष्ट्राचा मध्यवर्ती खांब शिवाजी होता. राष्ट्रावर जेव्हा असे चोहोंकडून आघात होऊ लागतात, तेव्हाच त्याचे ऐक्य होऊन त्याची संघशक्ती वाढत जाते. मराठे, ब्राह्मण, प्रभू, वगैरे शेकडो इसम जिवावर उदार होऊन राष्ट्रकार्य करू लागले, आपण सर्व या राष्ट्राचे घटक आहोत, राष्ट्रसेवेकरता सर्वस्व खर्ची घालणे हे आपले कर्तव्य आहे, अशा भावनेने त्या वेळी सर्वांनी उद्योग केला; म्हणूनच चारही दिशांस शिवाजीचे राज्य वृद्धिंगत झाले. विजापूर, गोवळकोंडा येथील सुलतान शिवाजीस खंडण्या देऊ लागले आणि बऱ्याच मोगल प्रदेशांतून त्यास चौथाई मिळू लागली. अशा प्रकारे शिवाजीचे राज्य व मराठ्यांचे राष्ट्र लौकिक दृष्ट्या सिद्ध झाले.' (शककर्ता शिवाजी, पृ. १४९, १५०)

उत्तम गमक
 मराठ्यांचे राष्ट्र सिद्ध झाले याचे एक उत्तम गमक रियासतकारांनीच दिले आहे. छत्रपती आग्र्याला कैदेत असताना त्यांना ठार करावे असा औरंगजेबाचा विचार होता. त्याबद्दल जयसिंगाने त्याला लिहिले की 'शिवाजीला कैदेत टाकून किंवा ठार मारून आपणास काहीएक फायदा नाही. तो एकटा नाहीसा झाल्याने मराठयांचे राज्य मोडेल अशातला प्रकार बिलकुल नाही. इतकी त्याची व्यवस्था इकडे परिपूर्ण

झाली आहे.'
 हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे, एका शिवाजीचे किंवा भोसले घराण्याचे हे राज्य नाही, याचा भावार्थ यावरून स्पष्ट होईल.

(३) विशाल ध्येयवाद
 शिवछत्रपतींनी येथे राष्ट्र निर्माण केले याचा अर्थ विशद करताना सरदेसाई, यदुनाथ सरकार व सेतुमाधवराव पगडी यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. 'महाराष्ट्रीयांच्या अंगच्या गुणांच्या विकासास संधी मिळाली,' 'प्रत्येक जातीच्या माणसास पुढे येण्यास वाव मिळाला,' 'मराठ्यांच्या सुप्त शक्ती जागृत झाल्या,' ही ती गोष्ट होय. ग्राम, वतन, जाती या कूपात अडकून पडलेल्या मंडुकांच्या ठायी अशा शक्ती जागृत होत नाहीत. राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा असा विशाल ध्येयवादच थोर कर्तृत्वाला प्रेरणा देऊ शकतो. छत्रपतींच्या प्रेरणेने असा विशाल ध्येयवाद मराठ्यांना लाभला आणि भिन्न भिन्न क्षेत्रांत येथे थोर पुरुष निर्माण होऊन त्यांच्या रूपाने राष्ट्रभावना मूर्त रूपाला आली.

विशाल अहंकार
 बाजी प्रभू, मुरार बाजी, तान्हाजी मालुसरे यांनी केलेला आत्मयज्ञ हा आधीच्या तीनशे वर्षांत केव्हाही दिसला नव्हता. वतनासाठी खून, रक्तपात, आणि सुलतानांच्या सेवेत राहून हिंदुराज्यांचा नाश एवढाच देशमुख, देशपांडे, मनसबदार, सरदार यांचा उद्योग होता. हेच लोक आता वतनापलीकडे पाहू लागले होते. मावळातले एखादे खोरे, खानदेशातला एखादा परगणा यांवरून त्यांची दृष्टी अखिल महाराष्ट्रात, अखिल हिंदुसमाज येथपर्यंत पोचू लागली. अहंकार व्यापक करणे हेच परमार्थात उद्दिष्ट असते. 'अहं' म्हणजे मी एक व्यक्ती ही भावना टाकून 'अहं ब्रह्मास्मि' असा भाव मनात बाणवावा, असे तत्त्ववेत्ते सांगतात. राजकारणात हेच व्हावे लागते. मुरारबाजीला मी म्हणजे एक व्यक्ती, एका कुटुंबाचा प्रमुख, जावळीच्या मोऱ्यांच्या पदरी असलेला मोठा अधिकारी, एवढाच प्रथम अहंभाव होता. छत्रपतींच्या सेवेत आल्यावर त्याचा अहंकार विशाल होऊ लागला. आणि मऱ्हाष्ट्र राज्याशी तो एकात्म झाला. दृष्टी अशी अत्यंत व्यापक झाल्यावाचून, राष्ट्रीय अस्मितेशी वैयक्तिक अस्मितेचे तादात्म्य झाल्यावाचून, आत्मार्पण हा जो परमोच्च त्याग त्याला माणसाचे मन सिद्ध होत नाही. अशा त्यागाला मराठ्यांची मने छत्रपतींनी सिद्ध केली, हीच त्यांनी केलेली राष्ट्रीय किंवा राजकीय क्रांती होय.
 मोरोपंत पिंगळे, अनाजी दत्तो, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, हरजी राजे महाडिक, रघुनाथपंत हणमंते, बाजी पासलकर, रामाजी पांगेरा, येसाजी कंक, बाळाजी आवजी, संभाजी कावजी, रघुनाथ बल्लाळ कोरडे, कान्होजी जेधे, दादाजी नरस प्रभू, प्रल्हाद निराजी, आनंद मकाजी, आबाजी सोनदेव, रामचंद्र नीळकंठ अमात्य, त्र्यंबक भास्कर, दौलतखान, मायनाक भंडारी, निराजी रावजी, पंताजी गोपिनाथ, फिरंगोजी नरसाळा, बहिर्जी नाईक, भिमाजी पंडित, जिवा महाला या पुरुषांचे कर्तृत्व पाहून मन थक्क होते.

पारडे फिरले
 मोरोपंत पिंगळे हा उत्तम प्रशासक तर होताच, पण तसाच मोठा सेनापतीही होता. आणि प्रतापगडाची उत्तम बांधणी करावी हे कसबही त्याच्याजवळ होते. तसाच अनाजी दत्तो. जमीन महसुलाची व्यवस्था त्याने बांधून दिली पण पन्हाळा, कोंडाणा काबीज करण्यातही तो अग्रभागी होता. अष्ट प्रधानांना भिन्न भिन्न खाती दिली होती, पण रणविद्या प्रत्येकाला आलीच पाहिजे असा महाराजांचा दंडक होता. आणि एक पंडितराव वगळता बाकीच्यांनी अनेक रणक्षेत्रांत तलवार गाजविलेलीही आहे. हंबीरराव मोहिते तर सेनापतीच होता. त्याने कोप्पळला जो संग्राम केला त्यावरून मुस्लिम आणि मराठे यांच्या सामर्थ्याचे, पराक्रमाचे पारडे कसे समूळ फिरले हे दिसून येते. कोप्पळला हुसेन मियाना हा मोठा कजाख विजापुरी सरदार होता. त्याची जमियत (सेना) मोठी होती. हंबीररावाची फौज थोडी होती. पण जसे वेणीचे केस दुभागून स्त्री वेणी घालते तशा रीतीने हंबीररावाने हत्यार चालविताच फळी फुटोन दुभांग केले. आणि मग मराठ्यांनी लांडगेतोड केली ती इतकी भयंकर होती की विजापुरी मुसलमानी फौज अल्लाची प्रार्थना करू लागली - 'मराठ्यांचे लढाईची गाठ पुहा घालू नको !'
 आतापर्यंत मुसलमानी फौजांनी हिंदूंची दैना करावी असा इतिहासाचा रिवाज होता. आता युग पालटले. दोनशे दोनशे मराठे लाख दीड लाख फौजेच्या तळात मध्यभागी असलेल्या शायस्ते खानावर तुटून पडतात आणि त्याला नामोहरम करून दिल्लीला हाकलून देतात. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर हे विजेसारखे कोकणातून घाटावर, बाटावरून बागलाणात, तेथून वऱ्हाडात, तेथून अकस्मात विजापुरावर असे चकाकत हिंडत असतात, आणि मुस्लिम सत्तेचा पाया हादरून टाकीत असतात !
 रघुनाथ नारायण हणमंते हा प्रथम शहाजीचा आणि नंतर व्यंकोजीचा कारभारी. व्यंकोजीने तंजावरास राज्य स्थापिले. पण ते विजापूरचे मांडलीक राज्य होते. छत्रपतींचा उदय झालेला ऐकून, रघुनाथपंतांना तसेच स्वराज्य कर्नाटकात व्हावे, अशी उभारी आली. व्यंकोजीला ते मानवेना. तेव्हा नोकरी सोडून हा गृहस्थ गोवळकोंड्यास गेला आणि मादण्णाशी खलबत करून छत्रपतींच्या दक्षिण दिग्विजयाचे सर्व कारस्थान याने रचले आणि कर्नाटक प्रांत स्वराज्यात आणण्यात महाराजांना अनमोल साह्य केले. महाराजांना त्याच्याबद्दल किती आदर होता ? ते लिहितात, 'आपण आम्हां (शहाजी-) महाराजांचे ठायी. आम्ही चुकलो असता शासन करून सन्मार्गास लावणार, अशी योग्यता व उपमा दुसरियास येणे नाही.' पण हे सर्व मोठेपण छत्रपतींच्या प्रेरणेनेच निर्माण झाले होते. ते नसते तर रघुनाथपंत व्यंकोजीचे, व फार तर आदिलशाहीचे, एक मोठे दिवाण म्हणून गाजले असते ! छत्रपतींनी निर्माण केलेल्या ध्येयवादामुळे ते राष्ट्रनिर्मितीच्या कार्यातील एख प्रमुख शिल्पकार म्हणून गाजत राहिले.

नवे चैतन्य
 वर जी नावे दिली आहेत ती त्यातल्या त्यात ज्यांनी विशेष कर्तबगारी केली त्यांची आहेत. पण या प्रत्येकाच्या मागे शेकडो, हजारो सामान्य जन उभे होते. त्या सर्वाच्याच ठायी काही नव्या चैतन्याचा संचार झाला होता. आणि यातच शिवछत्रपतींचे अनन्यसामान्यत्व आहे. हा राजा आपल्या धर्माचा आहे, हा आपल्या रामकृष्णशिवादी दैवतांचे, त्यांच्या देवळांचे रक्षण करील, या विचाराने बहुतजन आनंदले होते हे तर खरेच. शिवाय याच्या राज्यात आपल्या जमिनीचे, भाकरीचे, मुलाबाळांचे, बायकांचे रक्षण होईल असा दिलासा मिळाल्यामुळे ते छत्रपतींच्या पाठीशी उभे राहिले हेही खरे. पण यासाठी लढा करायला, प्राणपणाने झुंजायला, आत्मार्पण करायला ते इतके दिवस सिद्ध नव्हते. ती वृत्ती त्यांच्या ठायी महाराजांनी निर्माण केली होती. राष्ट्रीय वृत्ती ती हीच.

सर्व वर्ण, सर्व जाती
 वरील नामावळींतून आणखी एक गोष्ट दिसून येते. छत्रपतींच्या अनुयायांत सर्व वर्णांचे, सर्व जातींचे, स्पृश्य, अश्पृश्य सर्व सर्व लोक होते. आणि प्रत्येक माणूस अंगावर येईल ते, साधेल ते, कोणत्याही वर्णाचे वा जातीचे, काम करीत होता. लढाईत तर जाति- वर्णनिरपेक्ष प्रत्येक मराठा उभा होता. तसा महाराजांचा दंडकच होता. पण कारभार, महसूल, जमीन मशागत, किल्ल्यांची बांधणी, जहाजांची उभारणी, जमिनीवरील व समुद्रावरील वाहतूक, परकी दरबारातील वकिली, हेरगिरी या सर्व क्षेत्रांत सर्व वर्णाचे व जातीचे लोक नेमलेले असत. आणि या सर्व नेमणुका अंगचे गुण पाहून केलेल्या असत. अनुवंशावर महाराजांचा मुळीच विश्वास नव्हता. बापाची जागा मुलाला मिळायची असा त्यांच्या राज्यात रिवाज नव्हता. मुलगा गुणी असला तरच त्याला ते पद प्राप्त होई. पण मुलगा गुणी निघेलच अशी केव्हाच खात्री नसते. वतनदारीविरुद्ध हाच तर फार मोठा आक्षेप होता. हे अमात्यांनी आज्ञापत्रात सांगितल्याचे मागे निर्देशिले आहेच. 'मिलिटरी सिस्टिम ऑफ दि मराठाज' या आपल्या ग्रंथात डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी आरंभीच हे स्पष्ट केले आहे, आणि तुकोजी, माणकोजी दहातोंडे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते या छत्रपतींच्या पाच सरनोबतांचे- सेनापतीचे- उदाहरण दिले आहे. एक सरनोबत गेला किंवा बडतर्फ केला की त्याच्या जागी त्याचा मुलगा किंवा नातेवाईक केव्हाही नेमलेला नाही. दुसरा गुणी माणूस त्याच्या जागी नेमलेला आहे. तान्हाजीच्या जागी सूर्याजी आला तो त्याच्या गुणांमुळे, भाऊ म्हणून नव्हे, हे डॉ. सेन यांनी आवर्जून सांगितले आहे. (पृ. १८, १९) यावरून महाराजांची दृष्टी पूर्णतया राष्ट्रीय होती, हे दिसून येईल तशी ती असल्यामुळेच सर्व जातींच्या गुणविकासाला संधी मिळून राष्ट्रीय प्रपंचाला अवश्य ते सर्व कर्तृत्व उपलब्ध झाले.

यदुनाथ सरकार
 असे असताना, 'शिवाजीच्या राज्यात कर्मठपणा आणि जातिभेद वाढीस लागले, त्याचे स्वराज्याचे ध्येय कर्मठपणावर आधारले होते' असे यदुनाथ सरकार यांनी म्हणावे याचा विस्मय वाटतो. पण रवींद्रनाथ टागोर तर यापुढे जातात आणि समाजातले हे भेद, या चिरा टिकवून धराव्या असा शिवाजीचा हेतू होता, असे म्हणतात. 'शिवाजीने महाराष्ट्रात राष्ट्र निर्माण केले' असे यदुनाथांनीच म्हटले आहे. इतरही अनेक प्रकारे महाराजांचा गौरव त्यांनी केला आहे. आणि तरीही वरील प्रकारची विधाने ते करतात आणि त्यांच्या पुष्टीसाठी टागोरांचे अवतरण देतात ! हा सर्वच प्रकार अत्यंत उद्वेगजनक आहे. डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी हे मत खोडून काढले आहे, हे वर सांगितलेच आहे.

मुलाहिजा नाही
 आणि महाराजांची स्वतःची पत्रे या बाबतीत अगदी निर्णायक आहेत. १६७१ साली चिपळूण तालुक्यात लष्कराचा तळ पडला होता. तेव्हा जुमलेदार, हवालदार, कारकून यांनी एकंदर व्यवस्था कशी ठेवली पाहिजे, हे सांगण्यासाठी त्यांना महाराजांनी पत्र लिहिले, ते पत्र फार प्रसिद्ध आहे. त्यात सर्व तऱ्हेच्या ताकिदी देऊन झाल्यावर शेवटी बजावले आहे की 'या संबंधात ज्याचा गुन्हा होईल, येणेप्रमाणे वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल त्यास, मराठियाची तो इज्जत राहणार नाही. जास्ती (शिक्षा) केल्यावेगळ (केल्यावाचून) सोडणार नाही.'
 ब्राह्मणांच्या बाबतीतही छत्रपतींची हीच वृत्ती होती. आपण श्रेष्ठ वर्णाचे, आपण ब्राहाण. त्यामुळे आपल्याला गुन्हे माफ होतील, आपल्याला कोणी काही करू शकणार नाही, असल्या समजुती त्यांना नष्ट करावयाच्या होत्या. प्रभावळीचा एक कारकुन जिवाजी विनायक सुभेदार याने हुकमाप्रमाणे काही ऐवज पोचवावयाचा होता तो पोचविला नाही. त्यामुळे महाराजांनी त्यास लिहिले, 'ऐसे नादान थोडे असतील. हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हांला केले असतील ! त्याकरित ऐशी बुद्धी झाली असेल. ऐशा चाकरास ठीकेठीक केले पाहिजे.' अशी जरब देऊन शेवटी ते म्हणतात, 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहातो. गनीमाचे चाकर गनीम जालेस, ऐसे जाणून बरा नतीजा (शिक्षा) तुम्हांस पावेल.'

विषाराचा नाश
 जातिभेद, वर्णभेद, अस्पृश्यता हा भारताला मिळालेला शाप आहे. तो आहे तोपर्यंत हिंदुसमाज संघटित होणे शक्य नाही. हा रोग सर्वस्वी नष्ट करणे अजून कोणालाही शक्य झाले नाही. पण प्रत्येक युगात त्यातला विषार नष्ट करण्याचा प्रयत्न थोर पुरुष करीत आले आहेत. संतांनी धार्मिक क्षेत्रात या विषमतेला आळा घालण्याचा प्रयत्न केला. छत्रपतींनी राजकीय क्षेत्रात तसाच प्रयत्न केला. त्याला यश आले. म्हणूनच येथे राष्ट्रीय भावना रुजू शकली व सामान्य लोकांना गुणविकासाची संधी मिळून त्यांचे कर्तृत्व फुलारून आले. नव्या शक्ती, नवे सामर्थ्य, नवे तेज उदयास येणे हे क्रांतीचे एक फल म्हणून सांगितले जाते. महाराष्ट्रात तशी क्रांती छत्रपतींनी निश्चित घडविली होती. मराठा, ब्राह्मण, प्रभू, न्हावी, कोळी, भंडारी, कातकरी, हेटकरी सर्व जातींतून सर्व प्रकारचे कर्तृत्व बहरून आले. मायनाक भंडारी हा आरमाराचा अधिपती होऊ शकला, सामान्य कुणबी सरनोबत पदाला जाऊ शकला, याचा दुसरा अर्थ काय होतो ?

कुणब्याची चिंता
 यासाठीच लोकजागृती, लोकसंघटना हे उद्दिष्ट महाराजांनी सतत डोळ्यांपुढे ठेविले होते. वर सांगितलेली महाराजांची पत्रे पाहिली तर अहोरात्र ते लोकांची चिंता कशी वहात असत ते कळून येते. चिपळूणच्या लष्करी तळावरील जुमलेदार, हवालदार यांना लिहिलेले वरील पत्रच पाहा. परदेशातून लष्कर संचारू लागले की लोकांवर जुलूम व्हावयाचा हे ठरलेलेच होते. लोकांची उभी पिके कापून नेणे, त्यांच्या घरांतून दाणावैरण लुटून नेणे, माल घेऊन पैसे न देणे, हे नित्याचेच प्रकार होते. याविषयी महाराजांनी फार कडक ताकीद वरील पत्रात दिली आहे. ते म्हणतात, 'जे कुणबी घर करून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील, म्हणजे त्यांस ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही ! तेव्हा शिपाई हो, बहुत यादी करून वर्तणूक करणे. ज्यास जे पाहिजे ते विकावया येईल ते रास विकत घ्यावे. कोण्हावरी जुलूम ज्याजती करावयाची गरज नाही.' दुसऱ्या एका पत्रात, शायिस्तेखानाचे लष्कर सर्वत्र फिरत असताना, अधिकाऱ्यांनी अहोरात्र फिरत राहून रयतेचा संभाळ करण्याविषयी बजावले आहे. 'जेथे गनिमाचा आजार (त्रास) पहुचेना ऐशा जागियासी त्यास पाठविणे. गावाचा गाव हिंडून रातीचा दिवस करून लोकांना घाटाखाली जागा असेल तेथे पाठविणे. या कामात एक घडीचा दिरंग न करणे.'

मराठा तेवढा
 कुणबी, शेतकरी यांची अशी सतत चिंता वाहिली जात असल्यामुळेच, हे आपले राज्य आहे, असे महाराष्ट्र समाजाला जाणवू लागले. आणि महाराज स्वतः त्यांच्यांत मिसळून त्यांना हे त्यांचेच राज्य आहे अशी शिकवण देत राहिल्यामुळे हे 'मऱ्हाष्ट्र राज्य' आहे अशी अस्मिता त्यांच्या ठायी निर्माण झाली. हिंदुस्थानात ही अगदी असामान्य घटना घडली. आपण मराठे तेवढे निराळे, आपण मराठे तेवढे एक राष्ट्र, असा भाव भारतात अन्यत्र कोठेही निर्माण झाला नव्हता. बंगाली तेवढा मेळवावा, गुजराथी तेवढा मेळवावा, आपण पंजाबी, आपण आसामी, अशी पृथक् अहंकाराची जाणीव इतर प्रांतांत केव्हाही उदय पावली नाही. रजपूत येवढे पराक्रमी आपण रजपूत निराळे आहो, अशी भावनाही त्यांच्या ठायी होती. पण ती वंशनिष्ठा होती. भूमिनिष्ठा नव्हती. राजस्थानातील प्रत्येक माणूस रजपूत आहे असा आशय, 'आम्ही रजपूत' या भावनेत नव्हता. तेथल्या जोधपूर, जयपूर, चितोड अशा राजघराण्यांपुरतीच ती मर्यादित होती आणि तीही ऐक्यप्रेरक होऊ शकली नाही. कारण प्रत्येक घराणे दुसऱ्या घराण्याला तुच्छ लेखीत असे. मग सर्व जनतेला सम मानणे हे तर लांबच राहिले.

लोकांविषयी तुच्छता
 भारतातच काय, पण अतिशय प्रगत अशा पश्चिम युरोपातही, राज्य लोकांचे असते, जनतेचे असते, लोक ही एक शक्ती आहे, या तत्त्वाचा परिपोष, चौदाव्या, पंधराव्या शतकात, तेथे राष्ट्रभावनेचा उदय झाला असूनही, एक इंग्लंडचा अपवाद सोडता, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत झाला नव्हता. १८४८ साली जर्मनीत अडतीस भिन्न स्वतंत्र संस्थाने होती. त्या वेळी प्रशियाचा राजा फ्रेडरिक विल्यम ४ था हा चांगला प्रबळ होता. त्याच्या आधिपत्याखाली सर्व जर्मनीचे ऐक्य करावे अशी लोकांची इच्छा होती. फ्रॅकफुर्टच्या लोकसभेने तसा ठराव केला व फेडरिकला सर्व जर्मनीचे सम्राटपद देऊ केले. पण ते त्याने अत्यंत तुच्छतापूर्वक नाकारले. कारण काय ? तो म्हणाला, 'लोकांनी दिलेले राजपद मी तुच्छ मानतो. झालो तर मी माझ्या बळावर राजा होईन.' चौदाव्या लुईच्या कारकीर्दीत (१६६१ ते १७१५) फ्रान्सचा मोठा उत्कर्ष होत होता. पण समाजात कमालीची विषमता होती. लोकांना कसलेही स्थान नव्हते आणि त्यांची कमालीची पिळणूक होत होती. फ्रेंच राज्यक्रांतीचा स्फोट त्यामुळेच झाला. इटली, स्पेन या देशांत अजूनही लोकशक्ती जागृत नाही व संघटितही नाही.

निस्तुल गोष्ट
 अशा स्थितीत सतराव्या शतकात मराठ्यांच्या एका नेत्याच्या मनात लोकजागृतीची कल्पना उद्भवावी आणि त्याने लोकांत ती काही अंशी रुजवून त्यांच्या ठायी 'हे आपले मऱ्हाष्ट्र राज्य आहे' अशी अस्मिता निर्माण करावी ही एक अनन्यसामान्य, निस्तुल अशी गोष्ट आहे. त्या तत्त्वाचा परिपोष पुढे झाला नाही हे दुर्दैवच होय. तरी पण शंभर दीडशे वर्षांत सर्व भारतभर मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार करावा, एवढी प्रचंड शक्ती त्यातून निर्माण झाली असा इतिहासच आहे.

हिंदुपद पातशाही
 छत्रपतींनी मराठ्यांचे राष्ट्र निर्माण करण्याचा उद्योग जन्मभर केला असला तरी, अखिल हिंदुस्थान, अखिल हिंदुसमाज, हिंदुपद पातशाही हे व्यापक ध्येय त्यांच्या नजरेसमोरून केव्हाही ढळले नव्हते. गो. स. सरदेसाई यांनी याविषयी उत्तम विवेचन केले आहे. ते म्हणतात, 'गोब्राह्मणप्रतिपालनाचे ब्रीद, अष्टप्रधानादी संस्था, राज्याभिषेकशकाची निर्मिती, चौथाई, सरदेशमुखीचा अवलंब इत्यादी प्रकारांवरून शिवाजीने इतका मजबूद व विस्तृत पाया रचलेला दिसतो की त्यावर समस्त हिंदुपद पातशाहीची इमारत सहज उभारता यावी. शिवाजीची ही महत्त्वाकांक्षा मराठेशाहीच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रमंडळाच्या नजरेसमोर सारखी वावरत होती. बाजीराव, मुरारराव घोरपडे, महादजी शिंदे, माधवराव पेशवे, रघूजी भोसले इत्यादी पुरुषांनी याच हेतूच्या सिध्यर्थ कष्ट केले.' (शककर्ता शिवाजी, पृ. २२१) छत्रपतींनी राजा छत्रसाल, राजसिंह, मादण्णा, यांना जी कार्याची प्रेरणा दिली तीवरून त्यांची अखिल भारतीय दृष्टीच स्पष्ट होते. एका तत्कालीन कवीने त्यांना 'दिल्लीन्दपदलिप्सु', दिल्लीपती होण्याची आकांक्षा असलेला, असे म्हटले आहे. त्यावरूनही त्यांच्या हिंदुपदपातशाहीच्या भव्य कल्पनेचाच प्रत्यय येतो. तेव्हा मराठ्यांचे त्यांनी राष्ट्र घडविले, यावरून अखिल हिंदुसमाजाच्या संघटनेचे व त्याच्या उत्कर्षाचे त्यांचे उद्दिष्ट बाधित झाले होते, असे मुळीच नाही. त्या उद्दिष्टाच्या सिद्धीसाठीच त्यांनी ही संघशक्ती निर्माण केली होती.

जातिधर्मनिरपेक्ष
 हिंदुपदपातशाही हे महाराजांचे उद्दिष्ट असले तरी मुसलमानांचा उच्छेद करावा, असे त्यांच्या मनात मुळीच नव्हते. त्यांच्या मनातली राष्ट्र ही कल्पना अगदी शुद्ध स्वरूपातली होती. राष्ट्र ही जातिधर्मनिरपेक्ष संघटना आहे. महाराजांच्या मनातले मराठ्यांचे राष्ट्रही तसेच होते. अनेक पठाणांना त्यांनी लष्करात घेतले होते. दौलतखान हा मुसलमान त्यांच्या आरमाराचा अधिपती होता. मशिदी, कुराण ग्रंथ यांचा अवमान होऊ न देण्याची ते दक्षता बाळगीत. बाबा याकूबसारख्या मुसलमान साधुपुरुषावरही त्यांची भक्ती होती. तुलनेने पाहता जेथे राष्ट्रभावना प्रथम उदयास आली त्या पश्चिम युरोपातही त्या वेळी ती इतक्या शुद्ध स्वरूपात नव्हती. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली या देशांत प्रोटेस्टंट व कॅथॉलिक हे एकमेकांचे हाडवैरी होते. आणि प्रारंभी राज्यकर्त्यांनीही असहिष्णुतेचेच धोरण अवलंबिले होते. शिवछत्रपतींच्या मनाला धार्मिक असहिष्णुता कधीच शिवली नाही. या भूमीच्या, महाष्ट्राच्या सेवेला जे जे कोणी सिद्ध होते त्या सर्वांना जातिधर्मनिरपेक्ष दृष्टीने त्यांनी आपल्या कारभारात सामावून घेतले. त्यांचा मऱ्हाष्ट्र असा व्यापक होता.
 शिवछत्रपतींनी कोणती राजकीय क्रांती केली हे यावरून स्पष्ट होईल. 'आपण मराठे म्हणजे एक राष्ट्र आहो' ही भावना त्यांनी या लोकांत रुजविली व त्यांना जागृत आणि संघटित करून, पाचशे वर्षे भारताच्या मानेभोवती बसलेला मुस्लिम सत्तेचा फास तोडून टाकण्याइतके दुर्जेय सामर्थ्य या भूमीला प्राप्त करून दिले.
 सिकंदर, हानिबॉल, सीझर यांच्याशी पाश्चात्य लोक त्यांची तुलना करतात. पण ती केवळ एकदेशीय होय. युद्धनेतृत्वात फार तर ते महाराजांच्या तुलनेला येतील. पण आपल्या भूमीला त्यांनी सामर्थ्य प्राप्त करून दिल्याचे इतिहास सांगत नाही. 'तयाचे गुण महत्त्वासी तुलना कैची ?' हेच खरे.