Jump to content

महाराष्ट्र संस्कृती/प्रस्तावना

विकिस्रोत कडून







प्रस्तावना


 या ग्रंथात इ. पू. २३५ ते इ. स. १९४७ या सुमारे बावीसशे वर्षांच्या काळातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विवेचन केले आहे. या प्रदीर्घ काळाचे चार विभाग पडतात. सातवाहन ते यादव ( इ. पू. २३५ ते इ. स. १३१८ हा पहिला विभाग. १३१८ ते १६४७ हा मुस्लिम सत्तेचा काळ म्हणजे दुसरा विभाग. हाच बहामनी काल होय. १६४७ ते १८१८ हा मराठा काल म्हणजे तिसरा विभाग आणि १८१८ ते १९४७ हा ब्रिटिश सत्तेचा काळ म्हणजे चवथा विभाग होय.
 धर्म, राजकारण, समाजरचना, अर्थकारण, विज्ञान, कला, साहित्य व शिक्षण अशी संस्कृतीची आठ प्रधान अंगे आहेत. प्रत्येक कालखंडातील या आठही अंगांचे विवेचन उपलब्ध माहितीच्या आधारे केलेले आहे.
 लो. टिळक, डॉ. भांडारकर, म. म. मिराशी, डॉ. आळतेकर, चिं. वि. वैद्य, डॉ. केतकर, वि. का. राजवाडे, गो. स. सरदेसाई, डॉ. शं. दा. पेंडसे, डॉ. काणे, डॉ. धनंजयराव गाडगीळ, श्री. जावडेकर, सेतुमाधवराव पगडी, डॉ. मुनशी, डॉ. गोपालाचारी, नीलंकठ शास्त्री, डॉ. सेन, यदुनाथ सरकार, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, कृष्णस्वामी आयंगार, ह्यांसारख्या विख्यात पंडितांच्या ग्रंथांच्या आधारे हे सर्व विवेचन केलेले आहे. पण मते आणि दृष्टिकोण सर्वस्वी माझा आहे. त्यामुळे ग्रंथातील गुणदोषांची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे.
 ह्या पंडितांच्या आधारे विवेचन केले असले तरी ग्रंथात त्रुटी अनेक राहिलेल्या असणे पूर्ण शक्य आहे. काही महत्त्वाच्या घटना, काही थोर कर्ते स्त्रीपुरुष यांचा निर्देश राहून गेला असेल, काही मांडणी मागे-पुढे झाली असेल, काही मते कोणाला एकांगी वाटतील. असे अनेक दोष ग्रंथात सापडतील याची मला जाणीव आहे. पण मी आपल्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत एवढेच येथे मी नमूद करतो.
 माझ्या आधी महाराष्ट्र संस्कृती या विषयावर तीन-चार पंडितांनी पुस्तके लिहिलेली आहेत. डॉ. शं. दा. पेंडसे यांनी 'महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास' हे पुस्तक लिहिले आहे. पण त्यांनी वेदवाङ्मयापासून प्रारंभ करून समर्थ रामदास यांच्यापर्यंतच लिहिले आहे, आणि वेद, उपनिषदे, सूत्रग्रंथ, स्मृतिग्रंथ यांच्या विवेचनावरच जास्त लक्ष दिलेले आहे. शिवाय संस्कृतीच्या धार्मिक अंगाच्या विवेचनावरच त्यांचा भर आहे. प्रा. वि. पां. दांडेकर (बडोदे) यांनी 'महाराष्ट्र' हे पुस्तक १९४७ साली लिहिले आहे. ते अगदी त्रोटक असून केवळ ११४ पृष्ठांचेच आहे. संस्कृतीच्या सर्व अंगोपांगांचा विस्तृत परामर्श घेणे एवढ्या लहान जागेत शक्यच नव्हते. प्रा. द. वा. डिकसळकर यांच्या 'महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास' या पुस्तकात यादव कालापर्यंतच इतिहास दिलेला आहे. संस्कृतीच्या सर्व अंगांचा परिचय करून देणारे पुस्तक म्हणजे प्रा. शेणोलीकर व प्रा. देशपांडे यांनी लिहिलेले- 'महाराष्ट्र संस्कृती' हे पुस्तक होय. हा ग्रंथ डेमी चारशे पृष्ठांचा म्हणजे तसा विस्तृत आहे. पण तो केवळ संकलनात्मक असून एम्. ए. च्या विद्यार्थ्यासाठी पाठ्यपुस्तक म्हणून लिहिलेला आहे, असे त्यांनीच प्रस्तावनेत म्हटले आहे. यावरून महाराष्ट्र संस्कृतीच्या सर्व अंगोपांगांचे संशोधन करून त्यांचा विस्तृत परामर्श घेणाऱ्या ग्रंथाची उणीव होती हे दिसून येईल. ती या ग्रंथाने भरून निघेल अशी आशा आहे. या ग्रंथात येणाऱ्या प्रत्येक विषयाचे अत्यंत बारकाईने संशोधन करून मी विस्तृत विवेचन केले आहे. विशेषतः सातवाहन ते यादव ही सर्व घराणी महाराष्ट्रीय राजघराणी होती की नाही या अत्यंत वादग्रस्त विषयाचे प्रदीर्घ विवेचन करून, त्याविषयी निघणाऱ्या सर्व आक्षेपांना उत्तर देऊन, ही सर्व घराणी महाराष्ट्रीयच होती असा सिद्धान्त मी मांडला आहे. वाचकांनी त्याकडे बारकाईने लक्ष द्यावे अशी माझी विनंती आहे.
 हा ग्रंथ लिहिण्यास मी १९६८ साली प्रारंभ केला. 'वसंत' मध्ये ओळीने सात लेख आले. पण पुढे काही कारणाने खंड पडला. पण हाती घेतलेली इतर कामे संपल्यानंतर १९७५ साली जूनपासून मी पुन्हा 'वसंत'- मध्ये लेखन सुरू केले. १९७८ च्या ऑक्टोबरमध्ये शेवटचा लेख आला व ग्रंथ पुरा झाला. एवढी दीर्घ माला 'वसंत' मध्ये स्वीकारल्याबद्दल, माजी संपादकमित्र श्री. दत्तप्रसन्न काटदरे व सध्याचे संपादक श्री. बालशंकर देशपांडे यांचा मी ऋणी आहे.
 ग्रंथात प्रारंभापासून १९४७ पर्यंतचा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास दिला आहे. तरी शेवटच्या विभागातील प्रकरणांत १९४७ नंतरच्या घटनांचा व भिन्न क्षेत्रांतील थोर स्त्री-पुरुषांचा निर्देश केलेला आहे. एखाद्या देशाचा नकाशा काढताना त्याच्या भोवतालचा काही भाग दाखवितात. तसेच हे आहे; पण हे फक्त निर्देश आहेत हे वाचकांनी कृपया ध्यानात ठेवावे. १९४७ नंतरचा इतिहास देण्याचा हेतू नाही, हे ध्यानात ठेवले की बरेचसे गैरसमज दूर होतील. हे निर्देश करताना क्वचित कोठे संक्षेप जास्त तर कोठे विस्तार जास्त असे झाले असेल, पण अगदी काटेकोर प्रमाण संभाळता येत नाही, हेच त्याचे कारण आहे; त्यात मुद्दाम कोठे भर द्यावा वा कोठे दुर्लक्ष करावे असा मनात हेतू नाही. त्यातूनही मूळ ग्रंथातल्याप्रमाणे या निर्देशातही काही महत्त्वाच्या व्यक्ती किंवा घटना यांचा उल्लेख राहून गेला असणे शक्य आहे. त्याविषयी मी एवढेच सांगू शकतो की, एकंदर ग्रंथातल्या त्रुटींकडे ज्याप्रमाणे, त्याचप्रमाणे याही त्रुटींकडे वाचकांनी उदार दृष्टीने पाहावे. कितीही प्रयत्न केले तरी दोष, उणीवा, चुका, प्रमादसुद्धा राहतातच, तसेच याही ग्रंथात राहिले असतील हे मी जाणतो. पण दोन हजार वर्षांचा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास स्पष्टपणे ग्रंथात उभा राहिला आहे की नाही एवढे वाचकांनी पाहावे अशी माझी विनंती आहे.
 ग्रंथ साडेआठशे नऊशे डेमी पृष्ठांचा आहे. एवढी मुद्रिते तपासणे, प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मला अगदी अशक्य होते. पण माझे मित्र डॉ. चंद्रशेखर बर्वे यांनी ते काम आनंदाने स्वीकारले व कसोशीने पार पाडले. त्याचप्रमाणे सूचीचे काम त्यांचे वडील श्री. शं. ना. बर्वे यांनी आपण होऊन हौसेने पत्करले व त्यांच्या नेहमीच्या दक्षतेने पार पाडले, याबद्दल या पिता-पुत्रांचा मी शतशः ऋणी आहे. सूचीच्या कामात 'शं. नां.' ची मुलगी, माझी विद्यार्थिनी कु. नीला हिचाही वाटा मोठा आहे.
 लेखन करताना शेकडो ग्रंथ मला पाहावे लागले. पण माझे सुदैव असे की, मला ग्रंथांची उणीव कधीच पडली नाही. स. प. कॉलेज, पुणे विद्यापीठ, भारतीय संस्कृतिकोश मंडळ, नू. म. वि. प्रशाला, भांडारकर प्राच्यविद्यामंदिर या संस्थांतील ग्रंथपालांनी मला सर्व पुस्तके अगदी आत्मीयतेने पुरविली. कित्येक वेळा पत्र जाताच त्यांनी घरी पुस्तके पाठविली. हे बहुतेक सर्व ग्रंथपाल माझे विद्यार्थीच आहेत. त्यांचे आभार मानणे त्यांना आवडणार नाही, पण माझे ते कर्तव्य आहे. म्हणून एवढेच सांगतो की त्यांच्या या साह्यावाचून ग्रंथ पुरा झाला नसता. ग्रंथाचे मुद्रक श्री. लाटकर चित्रकार श्री. परसवाळे आणि नकाशे तयार करणारे श्री. गरसोळे व रेड्डी यांचे आभार मानणे आवश्यक आहे. ते मी मनःपूर्वक मानतो.
 मित्र श्री. अनंतराव कुलकर्णी आज वीस-बावीस वर्षे माझ्या पाठीशी उभे आहेत. माझे निबंधसंग्रह, माझे ग्रंथ बह्वंशी त्यांनीच प्रसिद्ध केले आहेत. उत्तरोत्तर महागाई वाढत चालली होती. पुस्तक प्रकाशन बिकट होत चालले होते. पण त्यांनी कधी माघार घेतली नाही. प्रकाशनाचे काम ते व्रताप्रमाणेच करतात. या वेळी तर त्यांची कसोटीच लागली. पण एवढा ग्रंथ कसा झेपेल असा विचार त्यांनी केला नाही उलट, ग्रंथ लवकर पुरा करून द्या अशी माझ्यामागे निकड लावली असा प्रकाशक भेटणे यापेक्षा सुदैव ते काय ? तो मला भेटला आणि त्याने अत्यंत साक्षेपाने व आपुलकीने ग्रंथ प्रकाशित केला. त्यांचे आभार मानण्याचा प्रयत्न करणेसुद्धा मला जमणार नाही. कारण ते कोठल्याच शब्दांत मावणार नाहीत.
 महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सम्यक दर्शन घडवावे, असा हेतू ग्रंथ लिहिताना मनाशी होता. ते घडले आहे की नाही ते वाचकांनी ठरवावयाचे आहे.

पु. ग. स.