महाराष्ट्र संस्कृती/धर्मक्रांती
Appearance
३५.
धर्मक्रांती
धर्माचा अर्थ
धर्म हे संस्कृतीचे सर्वात श्रेष्ठ अंग होय. येथे धर्म या शब्दाचा प्राचीन ऋषिमुनी- प्रणीत धर्म असा अर्थ अभिप्रेत आहे. ईश्वरभक्ती, मानवतेचे प्रेम, सत्य, न्याय, दया, क्षमा, शांती, त्याग, परोपकार, समाजसेवा, सत्त्व, स्वाभिमान, प्रवृत्तिवाद, वैभवाच्या, अभ्युदयाच्या, स्वराज्यसाम्राज्याच्या आकांक्षा, निर्लोभ वृत्ती, निर्मळ, विशुद्ध जीवन, औदार्य हा सगळा धर्माचा अर्थ आहे. श्रीकृष्ण, व्यास, संत, समर्थ, शिवछपती यांनी हाच अर्थ मानला होता, हे मागे अनेक प्रकरणांतून सांगितलेलेच आहे. त्याचे विवेचनही तेथे केलेले आहे. असा हा जो परम श्रेष्ठ धर्म, त्याचा हिंदुस्थानातून मराठ्यांच्या काळाच्या अखेरीस संपूर्ण लोप झाला होता. हेमाद्रीपासून या काळापर्यंत जे शास्त्रीपंडित झाले, त्यांचा धर्म म्हणजे कर्मकांड, व्रतवैकल्ये, श्राद्धपक्ष, उपास- तापास, सोवळे ओवळे, नाना प्रकारचे अर्थहीन आचार हा होता. खरा धर्म म्हणजे काय हे जाणण्याची पात्रताच त्यांच्या ठायी नव्हती.
पण मराठेशाहीचा अंत होऊन पाश्चात्य विद्येचा प्रसार येथे होताच धर्माचा खरा अर्थ येथल्या नेत्यांना अत्यंत अल्पावधीत कळू लागला आणि प्रथम बंगालमध्ये आणि मग महाराष्ट्रात धर्मसुधारणेची चळवळ सुरू झाली.
१८४८ साली लोकहितवादी यांनी 'प्रभाकर' पत्रात जी 'शतपत्रे' लिहिली, त्यांत धर्मसुधारणेची, खऱ्या धर्माची सर्व तत्त्वे सांगितली आहेत. पण त्याच्याही आधी बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग यांनी धर्मसुधारणेची चळवळ सुरू केली होती. तिचा परामर्श घेऊन मग लोकहितवादींचा विचार करू.
बाळशास्त्री
बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातल्या सर्वच सुधारणांचे आद्य प्रवर्तक होते. १८३२ साली त्यांनी 'दर्पण' हे पाक्षिक सुरू केले आणि ते बंद पडल्यावर १८४० साली 'दिग्दर्शन' या मासिकातून तेच कार्य पुढे चालविले. राजा राम मोहन राय यांचे ते अनुयायी असून पाश्चात्य विद्येचे पुरस्कर्ते होते. तिच्या प्रसाराने, या देशात फार दिवस व्यापून राहिलेला अज्ञानांधकार नाहीसा होईल, अशी त्यांची खात्री होती. ते आपल्या शिष्यांना शिकवीत की आपले पूर्वकाळचे ऋषिजन विद्यासंपन्न असून, सर्व जन्म विद्यादानात चालवीत. त्यांचेच अनुकरण करून आपण येथील प्रजेत स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान रुजविला पाहिजे. बाळशास्त्री केवळ उपदेश करूनच थांबले नाहीत. धर्मांतरितांची शुद्धी करून त्यांना स्वधर्मात परत घेतले पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्याप्रमाणे श्रीपाद शेषाद्री या ख्रिश्चनांनी बाटविलेल्या तरुणास शुद्ध करून त्यांनी स्वधर्मात घेतले. यासाठी त्यांना त्या वेळच्या शास्त्रीपंडितांचा कडवा विरोध सहन करावा लागला; पण तो सोसून त्यांनी महाराष्ट्राच्या बुद्धीला नवे वळण लावण्याचे महत्कार्य केले.
मिशनरी
ख्रिश्रन मिशनऱ्यांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न दीर्घकाळ चालू होते. प्रारंभी कंपनी सरकारने आपल्या हद्दीत त्यांना बंदी घातली होती. कारण त्यामुळे लोकांत प्रक्षोम माजेल व राज्याला धोका निर्माण होईल, अशी त्याला भीती वाटत होती. पण १८१३ साली ब्रिटिश पार्लमेंटने मिशन यांना धर्मप्रसाराचे कार्य करण्यास परवानगी दिली. त्यामुळे त्यांचे कार्य दुप्पट जोमाने सुरू झाले. लोकांना औषधोपचार करणे व शाळा स्थापून त्यांना शिकविणे ही त्यांची धर्मप्रसाराची साधने होती. त्यांचे कार्य विशेषतः दीनदलितांत, हीनजातीयांत चाले. हे कार्य पाहून येथल्या सुशिक्षितांवरही त्याचा फार प्रभाव पडला. कारण रंजल्या गांजलेल्यांना आपले म्हणविणे, अशी संतांची शिकवण असूनही, प्रत्यक्षात हिंदुधर्मीयांनी ती कधीच अमलात आणली नव्हती. त्यामुळे लोकसेवेचा हा अभिनव प्रकार पाहून, हिंदूधर्म अत्यंत हीन आहे, त्याच्या ठायी असे उदात्त काही नाही, असे त्यांना वाटू लागले व त्यांच्यापैकी काहींनी प्रत्यक्ष धर्मांतरच केले. ते पाहून ख्रिचन मिशनऱ्यांना व मेकॉलेसारख्या पंडितांनाही, पाचपन्नास वर्षात येथे एकही मूर्तिपूजक शिल्लक राहणार नाही, असे वाटू लागले. पण आता हिंदू नेते सावध होऊन आत्मनिरीक्षण करू लागले होते. त्यामुळे त्यांनी हिंदुधर्माचे खरे स्वरूप लोकांना दाखवून तो अनर्थ टाळण्याचे यावत् शक्य प्रयत्न चालविले.
परमहंस सभा
बाळशास्त्री जांभेकर यांच्या नंतर धर्मसुधारणेचा प्रयत्न करणारे मोठे पंडित म्हणजे 'मराठीचे पाणिनी' म्हणून प्रसिद्ध असलेले दादोबा पांडुरंग हे होत. त्यांनी प्रथम सुरतेला १८४४ साली 'मानवधर्म सभा' नावाची संस्था स्थापन केली. ईश्वर एक असून तो निराकार आहे, नीतिपूर्वक ईश्वरभक्ती हाच खरा धर्म होय, नित्यनैमित्तिक कर्मे विवेकास अनुसरून करावी, सर्वांस ज्ञानशिक्षा असावी, प्रत्येक मनुष्यास विचार- स्वातंत्र्य आहे, अशी या सभेची मुख्य तत्त्वे होती. मूर्तिपूजा त्यांना वेडगळ वाटे व रविवारी एकत्र जमून ते ख्रिश्चन लोकांप्रमाणे निराकार परमेश्वराची प्रार्थना करीत. ही सभा फार दिवस टिकली नाही. तेव्हा १८४९ साली दादोबांनी 'परमहंस सभा' म्हणून दुसरी सभा स्थापन केली. हिची तत्त्वे पहिल्यासारखीच होती. शिवाय जातिभेद मोडण्याचे प्रत्यक्ष काम ते आरंभी करीत. म्हणजे प्रत्येक सभासदास ख्रिस्त्याच्या हातचा पाव, अस्पृश्याने शिजविलेले अन्न व मुसलमानाने आणलेले पाणी प्यावयास देत. हे स्वीकारल्यावाचून कोणासही सभासद होता येत नसे.
त्या काळच्या मानाने पाहता हा विचार व ही कृती अत्यंत क्रांतिकारक होती. तीत वैगुण्य एवढेच की हे सर्व काम गुप्तपणे चाले. वास्तविक ज्याला समाजसुधारणा करावयाची आहे त्याने मोठ्या धैर्याने पुढे येऊन समाजाला नवी तत्त्वे सांगितली पाहिजेत आणि त्यांचे आचरण केले पाहिजे. पण हे धैर्य यांपैकी कोणाच्याही अंगी नव्हते. दादोबांनी या सभेसाठी 'पारमहंसिक ब्राह्मधर्म' असे नाव देऊन वीस ओव्यांची एक पोथी रचली होती.
विश्वकुटुंबी जो । सर्वादिकारण । बापा त्या शरण । जावे तुम्ही
बंधूच्या नात्याने । वागा मानवाशी । उदार मनासी । ठेवूनिया
भूतदयेने । करा देवपूजा । हीच अधोक्षजा । आवडते
करा किंवा टाका । बाह्य धर्म साेंग । ठेवा अंतरंग । शुद्धतरी
दया भक्तिशील । मनाचे मवाळ । करिली हळहळ । देशाचिया
म्हणोनिया दावा । सदाचरणास । ज्ञानाचा तो अंत । दादोबा म्हणे
नवी धर्मतत्त्वे
दादोबांच्या नंतरचे मोठे धर्मसुधारक म्हणजे लोकहितवादी हे होत. त्यांचा निर्देश वर केलाच आहे. नव्या धर्मतत्त्वांची सविस्तर मांडणी प्रथम त्यांनीच केली. ब्राह्मण हे त्या वेळी हिंदुधर्माचे गुरू मानले जात. पण ते अत्यंत हीन अशा कर्मकांडात्मक धर्माला कवटाळून बसले होते आणि त्यांच्या मनावर पुराणातील भाकडकथांचे फार वर्चस्व असे. वास्तव जगाकडे पाहण्याची कुवतच त्यांच्या ठायी नव्हती. पूर्वी अवतार घेऊन परमेश्वराने पृथ्वीचा भार हरण केला, तसाच आता इंग्रजांचा संहार करून तो करील, अशा जुनाट कल्पनांचे ते दास होते. त्यामुळे त्यांचे गुरुत्व नष्ट करण्यासाठी लोकहितवादींनी त्यांस विद्याशून्य, मूर्ख, बैल अशा कडक शिव्या देऊन त्यांची कमालीची निर्भत्सना केली. विचारस्वातंत्र्य, ईश्वरभक्ती, स्वदेशसेवा, स्त्रीपुंरुष समता, प्रवृत्तिमार्ग, गुणनिष्ट वर्णभेद, सत्याचरण, विद्यार्जन, सर्व मनुष्ये सारखींच आहेत, अशी त्यांची प्रमुख धर्मतत्त्वे होती. पाश्चात्य विद्येचा त्यांस फार अभिमान व संस्कृत विद्येचा त्यांना अत्यंत तिटकारा होता. प्राचीन काळच्या ऋषिमुनींना ते वंद्य मानीत. पण त्यांचे ग्रंथ प्रमाण मानावे, हे त्यांस मुळीच मान्य नव्हते. ते प्राचीन ब्राह्मण धर्मसुधारणेचा व लोकहिताचा विचार अहोरात्र करीत. पण तशा तऱ्हेचा एक तरी ब्राह्मण आज काशीपासून रामेश्वरापर्यंत आहे काय, असे ते विचारतात. रामशास्त्री प्रभुणे हे त्यांच्या मते खरे ब्राह्मण. ते होते तोपर्यंत राज्य कृतयुगासारखे चालले, असे ते म्हणतात. प्राचीन काळी असे ब्राह्मण होते. ते खरे विद्येचे व धर्माचे उपासक होते. पण पुढचे ब्राह्मण मूर्ख झाले व पाठांतर हीच विद्या असे मानू लागले. त्यामुळे हिंदुधर्माचा अधःपात झाला. लोकहितवादींनी कडक टीका केली आहे ती या ब्राह्मणांवर.
एक गोष्ट या धर्मप्रकरणी ध्यानात येते. स्वदेशसेवा हा धर्म आहे, हे बाळशास्त्री यांच्यापासून प्रत्येकाने सांगितले आहे. ब्रिटिश विद्या येऊन पुरती दहापंधरा वर्षे झाली नाहीत तोच पाश्चात्य विद्याविभूषितांना राष्ट्रधर्माची जाण आली. हे मागल्या कित्येक शतकांत घडले नाही. म्हणूनच या काळातला प्रत्येक पंडित हा पाश्चात्य विद्येचा महिमा गाताना दिसतो. 'देश ही मातोश्रीच आहे' असे 'स्वदेशप्रीती' या पत्रात लोकहितवादींनी म्हटले आहे. 'जसे आपण मातोश्रीस वंद्य मानतो, व तिच्या पोटी आलेले सर्व बंधू प्रीतीने वागतात, तद्वत् या जमिनीवर जे आपण आहोत, ते सर्व एकमेकांचे बंधू आहाेंत व हा देश आपणा सर्वांना मातोश्री आहे.' 'स्वदेशहितास झटावे,' हीच लोकहितवादींच्या मते खरी धर्मसुधारणा आहे. युरोप याच सुधारणेमुळे उन्नत झाला, हे सांगताना ते म्हणतात, 'आपले देशाचे हित करावे, हा मुख्य धर्म युरोपात समजतात.' लोकहितवादींच्या सर्व सुधारणांचे सारभूत तात्पर्य या उताऱ्यात आले आहे.
प्रार्थना समाज
दादोबा पांडुरंग यांच्या प्रारंभीच्या दोन सभा अपयशी झाल्या तरी त्यांनी चिकाटी सोडली नाही. १८६७ साली 'प्रार्थना समाजा'ची स्थापना झाली. तीत ते व त्यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांनी पुढाकार घेतला होता. न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर ही थोर मंडळी मागून येऊन त्यांस मिळाली. दादोबांनी सांगितलेलीच तत्त्वे बव्हंशी प्रार्थना समाजाला मान्य होती. परमेश्वर निर्गुण निराकार आहे, सत्य, सदाचार, भक्ती यांनीच तो प्रसन्न होतो, अशा तऱ्हेची विवेचने रानडे, भांडारकर यांनी केली आहेत. प्रार्थनासमाज निराकार परमेश्वराला भजत असला तरी तो समाज सभेत तुकारामाचे अभंग म्हणत असे. ब्रिटिश कालातील धर्मसुधारणांत प्रार्थनासमाजाला महत्त्वाचे स्थान आहे. पण ते, रानडे, भांडारकर, असे थोर पुरुष त्याला येऊन मिळाल्यामुळे आणि त्यांनी केलेल्या तात्त्विक विवेचनामुळे प्राप्त झाले होते. एरवी प्रत्यक्षात काही वरिष्ठ सुशिक्षित वर्गापलीकडे त्याचा प्रसार झाला नाही आणि पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर, मुंबई अशा शहरांपलीकडे तो गेला नाही.
सत्यशोधक समाज
'प्रार्थना समाजा'चा जसा सुशिक्षित वर्गात प्रसार झाला तसा महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या (१८७३) 'सत्यशोधक समाजा'चा बहुजनसमाजात प्रसार झाला. ब्राहाणी वर्चस्व आणि कर्मकांडात्मक ब्राह्मणी धर्म यांवर बहुजन समाजातील धर्मसुधारकाने, इतका प्रखर हल्ला यापूर्वी कधी कोणी केला नव्हता. परमेश्वर आणि मनुष्य यांमध्ये भटजी हा जो दलाल त्याचा जोतिबांनी कडकडून निषेध केला आहे. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्थी ॥ असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वीच जोतिबांनी स्त्रिया व अस्पृश्य यांसाठी शाळा स्थापून समाजक्षेत्रात मोठी क्रांती केली होती. त्यामुळे त्यांना सर्वत्र मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. त्यामुळे आणि ब्राह्मण- विरोधामुळे सत्यशोधक समाजाचा प्रसार त्या वेळी वेगाने झाला.
प्रतिक्रिया
याच सुमारास विष्णुबुवा ब्रहाचारी- गोखले- यांचा उदय झाला. हे ब्रह्मचारी संन्यासी असून त्यांना दत्ताचा साक्षात्कार झाला होता. प्राचीन परंपरा व वेद यांचा त्यांना कडवा अभिमान होता. लोकहितवादी, रानडे, भांडारकर यांना भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान नव्हता असे नाही. पण हे सर्व लोक इंग्रजांचे राज्य हे एक वरदान मानीत असत आणि त्यांच्या सभा, प्रार्थनापद्धती हे सर्व ख्रिस्ती वळणावर जात असे. प्रत्येक धर्मात काही तरी व्यंगे असतातच. पण ख्रिश्चन लोक हिंदुधर्मातील व्यंगावर बोट ठेवून त्याची निंदानालस्ती करीत. त्याला वरील लोकांनी कधीच उत्तर दिले नाही. ब्राह्मो समाजाचे केशवचंद्रसेन हे तर संपूर्णपणे ख्रिस्तमय होऊन गेले होते. जोतिबांनी तर, महाराष्ट्रात प्रत्येक खेड्यात दोन मिशनरी ठेवावे, अशी इंग्रज सरकारला सूचना केली होती. या सर्वांमुळे हे लोक हिंदी समाजाला परके वाटत. याची प्रतिक्रिया म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी ही होय. ख्रिश्चन धर्मातील व्यंगे शोधून काढून, त्यावर ते कडाडून हल्ला चढवीत. त्यामुळे मुंबईच्या चौपाटीवर त्यांच्या सभा फार गाजत व ख्रिश्रनांच्या धर्मप्रसाराला तोडीस तोड मिळे. पण असे असले तरी विष्णुबुवांचा स्वधर्माभिमान आंधळा नव्हता. जन्मनिष्ठ जातिभेद व वर्णभेद त्यांना मान्य नव्हते. मनुष्य वयात आल्यावर त्याचे गुण पाहून त्याप्रमाणे त्याचा वर्ण ठरवावा व लग्ने त्या वर्णाप्रमाणे व्हावी, असे ते सांगत असत. दुसरा एक त्या काळच्या दृष्टीने अत्यंत आश्चर्यकारक असा विचार त्यांनी आपल्या 'सुखदायक राज्यप्रकरणी' या पुस्तकात सांगितला आहे. 'सर्व प्रजेने सर्व क्षेत्रांत कष्ट करावे आणि जे अन्नधान्य, कपडे निर्माण होतील ते राजाने एका कोठारात साठवून ठेवावे व तेथून ज्याला जो लागेल तो माल प्रत्येकाने न्यावा, सोन्यामोत्यांच्या दागिन्यांची सुद्धा अशीच व्यवस्था असावी.' हा अगदी अस्सल मार्क्सवादी विचार आहे. तो या संन्याशाने मार्क्सचा काडीमात्र अभ्यास नसताना येथे सांगितला होता, हे मोठे विस्मयजनक आहे. विष्णुबुवांच्या कोणत्याच विचाराचा समाजांत प्रसार झाला नाही, हे खरे. पण अगदी सनातनी म्हणविणाऱ्या मनातसुद्धा त्या वेळी धर्मक्रांती झाली होती. हे त्यांच्या उदाहरणावरून दिसून येईल.
थिऑसफी
'थिऑसफी' या धर्मपंथाचाही विचार जाता जाता केला पाहिजे. मॅडम ब्लॉव्हाट्स्की या रशियन बाईने १८७५ मध्ये अमेरिकेत 'थिऑसफी' पंथाची स्थापना केली आणि कर्नल ॲल्काट यांनी १८७९ साली हिंदुस्थानात येऊन मुंबईला पहिली 'थिऑसफिकल सोसायटी' स्थापन केली. या संस्थेत प्रमुख मंडळी महाराष्ट्रीय होती. श्री. मावळंकर, लोकहितवादी, डॉ. कुंटे, डॉ. भाटवडेकर, न्या. मू. गाडगीळ इ. प्रतिष्ठित लोक प्रारंभीच संस्थेला मिळाले. १८८२ साली मद्रासजवळ अड्यार येथे या संस्थेचे कार्यालय नेण्यात आले.
थिऑसफीची मूलतत्त्वे हिंदुधर्मासारखीच आहेत. परब्रह्म, आत्म्याचे अमरत्व, पुनर्जन्म, हे सर्व थिऑसफीला मान्य आहे. कर्मविपाकाचे तत्त्वही मान्य आहे. त्याचबरोबर विश्वबंधुत्वाचा प्रसार हे व्यापक अधिष्ठान संस्थेला असल्यामुळे हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, फारशी, बौद्ध अशा सर्व धर्मीयांचा समावेश या पंथात होतो.
थिऑसफीला भारतात विशेष उजळा मिळाला तो डॉ. ॲनी बेझंट या बाईंच्यामुळे. 'भरतभूमी ही माझी खरी मायभूमी' असे त्या मानीत. थोर महात्मे जगाला मार्गदर्शन करीत असतात, अशी थिऑसफिची श्रद्धा आहे. त्याच कारणामुळे बेझंटबाईंनी तेरा वर्षीच्या एका मुलाला, 'जगद्गुरूचा अवतार' असे मानून, त्याचा संभाळ केला व शिक्षण केले. सध्याचे जे. कृष्णमूर्ती ते हेच होत. ते आता थिऑसफीतून बाहेर पडले आहेत आणि, ज्याचा त्याने स्वतंत्र विचार करावा, असे सांगतात. थिऑसफीला जसे सुशिक्षित वर्गात अनेक निष्ठावंत अनुयायी मिळाले, तसे कृष्णमूर्तीनांही मिळाले आहेत. पण एवढे खरे आहे की काही मर्यादित सुशिक्षित वर्गापलीकडे या दोन्ही पंथांचा प्रसार महाराष्ट्रात केव्हाच झाला नाही.
बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, प्रार्थनासमाजातील रानडे, भांडारकर, सत्यशोधक म. फुले या सर्वांना हिंदुधर्माचे पुनरुज्जीवनच करावयाचे होते. पण त्यांपैकी बरेचसे पुरुष सरकारी नोकर होते. इंग्रजांचे राज्य हे दैवी वरदान असे ते मानीत असत. ख्रिश्चन धर्म अनेक कृष्णकारस्थाने करीत असूनही ते त्यांचा गौरव करीत असत. यामुळे सर्व भारतात नवचैतन्याची लाट निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले नाही. ते कार्य केले ते स्वामी विवेकानंदांनी. भरतभूमीच्या सुदैवाने हा महापुरुष त्या वेळी उदयाला आला आणि चित्कलेचा स्पर्श व्हावा तसा प्रकार होऊन सर्व भारतात नवचैतन्य निर्माण झाले व त्याची कोमेजलेली अस्मिता पुन्हा प्रफुल्ल झाली.
नवचैतन्य
ब्रिटिशांनी हिंदी लोकांना रणात पराभूत केले होते. त्यांच्या विज्ञानामुळे हिंदी लोक दिपून गेले होते. ख्रिश्चन लोक त्यांच्या धर्माची सारखी निंदा करीत होते. पाश्चात्य विद्येच्या अभ्यासामुळे आपल्या धर्मातील, समाजातील व एकंदर जीवनातील अनेक उणिवा त्यांना स्वतःलाच दिसू लागल्या होत्या. या सर्वांमुळे आपण, आपला समाज, आपला धर्म, हीन आहे, आपण हीन पातळीवरचे लोक आहोत, असा एक न्यूनगंड त्यांच्या ठायी निर्माण झाला होता. पण १८९३ साली शिकागो येथील सर्व-धर्मपरिषदेत भाषण करून, स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म हा सर्व जगातील धर्मापेक्षा श्रेष्ठ धर्म आहे, असे सिद्ध केले आणि पाश्चात्य विद्वानही, त्यांना परमेश्वरी अवतार मानून, त्यांचे शिष्यत्व पत्करण्यास सिद्ध झाले, तेव्हा हिंदी लोकांच्या मनावर आलेले मालिन्य क्षणार्धात नष्ट झाले, त्यांचा न्यूनगंड नाहीसा झाला आणि त्यांच्या मनाला नवा जोम प्राप्त झाला. सर्व हिंदुस्थानवर त्याचा परिणाम झाला, तसा महाराष्ट्रावरही झाला; आणि येथील आधीच्या धर्मसुधारणांना तितकेसे महत्त्व राहिले नाही.
आपला माणूस
स्वामी विवेकानंद केवळ अध्यात्मवादी नव्हते. ते प्राचीन परंपरेचे अंध भक्त नव्हते. भौतिक विद्येचे महत्त्व त्यांनी पुरेपूर जाणले होते. त्याचप्रमाणे आपल्या समाजातील अनंत उणीवांचीही त्यांना जाणीव होती. पण शिकागो येथील भाषणामुळे, संन्यास घेऊन धर्मसुधारणेला त्यांनी सर्वस्वी वाहून घेतल्यामुळे, आणि ते प्राचीन ऋषिमुनींच्या भाषेत बोलत असल्यामुळे हा आपला माणूस आहे, अशी हिंदू लोकांची मनोमन खात्री झाली आणि मग त्यांनी केलेली टीका ते आनंदाने ऐकण्यास तयार झाले.
आत्मनिरीक्षण
स्वामींनी हा विषय मोठ्या कौशल्याने हाताळला. त्यांच्या 'कोलंबो अल्मोरा व्याख्यानमालेवरून हे दिसून येईल. प्रारंभी प्राचीन परंपरेची, उपनिषद्धर्माची मुक्तकंठाने स्तुती करून नंतर ते भौतिक विद्येकडे वळले आणि आपण जगाचे गुरू आहाेत, हा वृथाभिमान आपण बाळगू नये, आपल्यालाही पाश्चात्यांकडून शिकण्यासारखे पुष्कळ आहे, असे सांगण्यास त्यानी प्रारंभ केला.
ते म्हणत, भौतिक ज्ञान, संघटनकौशल्य, सत्ता खेळविण्याचे सामर्थ्य हे गुण आपण पाश्चात्यांकडून घेतले पाहिजेत. असा प्रारंभ करून स्वामीजींनी आपल्या गेल्या हजार वर्षांच्या अधःपाताचे चित्र श्रोत्यांपुढे उभे केले. 'आमच्यावर मुसलमानांचे आक्रमण झाले, ख्रिस्त्यांचे झाले, आमच्यापैकी कोट्यवधी लोक धर्मच्युत झाले. पण आम्ही यावर काय उपाययोजना केली ? आमच्यांत जे दीनदलित होते त्यांना आम्ही निवृत्तीचे धडे देत बसलो. आमच्या पंडितांनी सगळा धर्म सोवळ्याओवळ्यात आणून ठेवला आणि ऐहिक वैभवाकडे दुर्लक्ष केले. त्याचे हे परिणाम आहेत. येथे पाश्चात्यांकडून भौतिकवाद आला आहे. त्याने आपला उद्धारच होईल. त्याच्यामुळे जन्मनिष्ठ उच्च- नीचता नष्ट होईल, बुद्धिप्रामाण्य निर्माण होऊन धर्मग्रंथांची ठेव सर्वांच्या हाती येईल व सुखी जीवनाचे दरवाजे सर्वांना खुले होतील. पश्चिम ही धनिकांच्या टाचेखाली चेंगरली असली तर पूर्व ही धर्ममार्तंडांच्या टाचेखाली चिरडली आहे, हे ध्यानात ठेवा. आता एकीने दुसरीवर नियंत्रण ठेवून समतोल राखला पाहिजे. केवळ अध्यात्माने जगाची प्रगती होणार नाही.'
हे एका हिंदू संन्याशाचे उद्गार आहेत, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. स्वामी भौतिकवादी, जडवादी कधीच नव्हते. पण भौतिकवादाचे, ऐहिक वैभवाचे स्वराज्य- स्वातंत्र्य याचे महत्त्व त्यांनी पुरेपूर जाणले होते. आधीच्या सुधारकांनी सांगितलेल्या सर्व सुधारणा त्यांना मान्य होत्या. ते म्हणतात, 'सुधारकांनाही झेपणार नाही इतकी सुधारणा व्हावी, अशा मताचा मी आहे. पण स्वकीयांचा तेजोभंग करून काही साधणार नाही. सुधारकांच्या अपयशाचे हे कारण आहे. त्यांनी अतिरिक्त आत्मनिर्भत्सना केली. अशा तेजोभंगाने कार्यभाग होत नसतो.'
त्या काळी आपल्या जुन्या रूढी, लोकभ्रम, कर्मकांड यांचे, नव्या शास्त्रीय ज्ञानातील कोठला तरी सिद्धांत घेऊन, समर्थन करण्याची चाल थोडी सुरू झाली होती. या प्रकाराची स्वामींना अत्यंत चीड असे. ते म्हणतात, 'या प्रकारे जुन्या रूढींचे समर्थन करणे हे अत्यंत लजास्पद आहे. असे भोळसट होण्यापेक्षा तुम्ही नास्तिक झाला तरी चालेल. कारण नास्तिक मनुष्य हा खरा जिवंत मनुष्य असतो. निरीश्वरवादात एक प्रकारचे सामर्थ्य आहे. अंधश्रद्धा हा मात्र मृत्यू आहे. म्हणून कुजट रूढींच्या समर्थनापेक्षा नास्तिकतेनेच राष्ट्र वर येण्याचा जास्त संभव आहे.'
त्यांच्या सर्व प्रतिपादनाचे तात्पर्य त्यांच्या पुढील उद्गारांवरून ध्यानात येईल. 'आम्ही हिंदुस्थानातील संन्याशांनी गरिबांसाठी काय केले ? आम्ही त्यांना अध्यात्म शिकविले ! भुकेल्या माणसाला परमार्थ सांगणे ही धर्माची शुद्ध चेष्टा आहे. आज लक्षावधी लोक अनान्न करीत आहेत. ही जनता हा परमेश्वर नव्हे काय ? भारताचे भवितव्य या जनतेवर अवलंबून आहे. तिला समतेचा व स्वातंत्र्याचा संदेश दिला पाहिजे. असे करताना आपण कट्टरांतले कट्टर पाश्चिमात्य झाले पाहिजे. मात्र त्याच वेळी आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या श्रेष्ठ धर्माचा आपणांस कधीही विसर पडता कामा नये.' धर्मक्रांतीचे स्वरूप यावरून स्पष्ट होईल.
बुद्धिवादाचे जनक
महाराष्ट्रात आगरकरांचे समाजसुधारणेच्या क्षेत्रातले स्थान अनन्यसाधारण असे आहे. ते बुद्धिवादाचे निःसीम पुरस्कर्ते होते. रानडे, भांडारकर इ. पंडित धर्मसुधारणेसाठी जुन्या वचनांचा आधार घेत. अशा रीतीने एका ऋषीविरुद्ध दुसरा ऋषी उभा करणे, हे आगरकरांना मान्य नव्हते. आजच्या इहवादाचा सर्व भावार्थ त्यांनी आपल्या प्रतिपादनात सांगितला होता. त्यामुळेच त्यांना, 'बुद्धिवादाचे जनक' असे सार्थतेने म्हणता येते. 'मनुष्यतेचे ऐहिक सुखवर्धन' हाच भावी काळात सार्वत्रिक धर्म व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. हा विचार जुन्या परंपरेच्या अगदी विरुद्ध आहे. त्याचप्रमाणे विषयसुखाचे त्यांनी जे महत्त्व वर्णिले आहे तेही जुन्या परंपरेत मुळीच बसत नाही. विषयसुखाची निंदा हेच जणू प्राचीन काळच्या सर्व धर्मवेत्त्यांचे प्रमुख तत्त्व होते. आगरकरांनी त्याला अत्यंत जोराने धक्का दिला. असा मनुष्य पूर्णपणे प्रवृत्तिवादी असेल यात कसलीच शंका नाही.
आगरकरांनी 'हे परम अमंगल अशा हिंदुधर्मा' अशी हिंदुधर्मावर टीका केली आहे; पण कर्मकांडात्मक विकृत धर्मावर, ध्येयवाद, सदाचार, नीतिनिष्ठा, लोकसेवा, सत्यनिष्ठा- ज्यामुळे समाजाचे धारण होते- तो धर्म, हे त्यांना पूर्णपणे मान्य होते. आणि तसे त्यांनी अनेक ठिकाणी म्हटलेही आहे.
कर्मयोग
अर्वाचीन कालातील महाराष्ट्रातील व भारतातील सर्वश्रेष्ठ धर्मसुधारक म्हणजे लो. टिळक हे होत. त्यांचा 'गीतारहस्य' हा ग्रंथ आणि त्यातील कर्मयोगाचे प्रतिपादन यामुळे जे धर्मपरिवर्तन झाले ते दुसऱ्या कशानेही झाले नसते. हजारबाराशे वर्षे शंकराचार्यांच्या संन्यासवादाची जी पकड हिंदुमनावर बसली होती ती तोडून टाकण्यास तितकाच समर्थ पुरुष हवा होता. तो टिळकांच्या रूपाने अवतरला. गीतेतले प्रतिपादन सर्वश्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी सर्व पाश्चात्य तत्त्ववेत्यांचे आलोडन करून जो मोठा ग्रंथ लिहिला त्याला तोड नाही. समर्थ, शिवछत्रपती यांना जे सांगावयाचे होते तेच टिळकांनी सांगितले. 'देश आणि देव हे दोन मानणारे जे लोक आहेत, ते सर्व प्रकारचे धर्मभ्रष्ट आहेत, असे मी समजतो,' असे ते म्हणत. समर्थांच्या प्रतिपादनाचे विवेचन करताता त्यांनी हे जास्त स्पष्ट केले आहे. 'घराचे दार बंद करून उपासना केली की संपले, घराबाहेर कोणाचेही राज्य असो, बाहेर वाटेल त्या आपत्ती येवोत त्यांचा धर्माशी काही संबंध नाही, असा एक पूर्वी समज होता. पण रामदासांनी हिंदुधर्माचे पुनरुज्जीवन केले. या धर्मात असे तत्त्व आहे की ज्याला मोक्षप्राप्ती पाहिजे असेल त्यास, आपल्या देशबांधवांची काळजी घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. जे आपल्या देशाकडे पाहात नाहीत, ' रंजले गांजले' यांना आपले म्हणत नाहीत, आपले हजारो देशबांधव विपत्तीत असताना, जे नाक वरून घरात बसतात, ते ढोंगी आहेत, अशा प्रकारची बुद्धी लोकांत उत्पन्न करणे, म्हणजे राष्ट्र जिवंत करणे आहे.'
देशसेवा
देश, जनता यांची सेवा हा जसा धर्म, तसाच राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रीय जागृती हाही ते धर्म मानीत. एके ठिकाणी ते म्हणतात, 'उच्च कल्पना, अत्युच्च कल्पना लोकांस शिकवून जातीजातींतील भेद नाहीसे करून, आपण सारे एक आहो, असे वाटावयास लावणे, हे खरे धर्मशिक्षण होय. इंग्रजी तत्त्ववेत्त्यांनी ही तत्त्वे सांगितली आहेत; आणि ती आपल्या उपयोगाची आहेत. ही तत्त्वे पूर्वी आपल्यात होती. पण ती आपण विसरलो आहो.'
समता
टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवाजी उत्सव सुरू केले ते राष्ट्रीय ऐक्य या धर्मासाठीच. गणेशोत्सवात साळी, माळी, सुतार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी, चांभार या सर्व जाती एकत्र मिसळतात, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तेच शिवाजी उत्सवाविषयी. 'शिवाजी महाराजांनी मराठे, ब्राह्मण, प्रभू, शेणवी असा भेद न करता सर्वास एकराष्ट्रीयत्वाच्या जाळ्यात आणले. त्यामुळे त्यांचे स्मरण सर्वास विशेष श्रेयस्कर होईल यात शंका नाही.'
होमरूल - धर्म
राष्ट्रीय चळवळीचे मुख्य उद्दिष्ट राष्ट्रीय ऐक्य हेच होय. म्हणून ती चळवळ हाच खरा धर्म होय, असे त्यांनी सांगितले आहे. 'बरीच वर्षे चळवळ करूनही यश येत नाही, तेव्हा या चळवळीत भगवंताचे अधिष्ठान नाही, हे तर कारण नसेल ना !' असे त्यांच्या एक-दोन मित्रांनी विचारले. तेव्हा लोकमान्य म्हणाले, 'चळवळीच्या कचेरीत एखादी मूर्ती बसविली म्हणजे भगवंताचे अधिष्ठान होते असे नाही. आमची होमरूलची चळवळ ही हिंदुस्थानची भूमी परकीय जुलमातून सोडविण्यासाठी व सनातन धर्म रक्षिण्यासाठी आहे. म्हणून तीत भगवंताचे अधिष्ठान आहेच आहे. ही चळवळ म्हणजे परमेश्वराची आराधनाच आहे. ईश्वरचिंतनात असताना जे सुख, जी शांती मिळते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला या चळवळीत घ्यावयास सापडतो.' पंढरपूरच्या वारकऱ्यांना 'तुम्ही राष्ट्रोन्नतिरूप मोक्ष मिळवा' असा उपदेश करीत. कोणत्याही धर्मकृत्याचे, लोकांचे दुःख अल्पांशाने तरी दूर करणे हे उद्दिष्ट असले पाहिजे, असा टिळकांचा आग्रह असे. साखरेबुवांना ते एकदा म्हणाले, 'तुम्ही आपल्या प्रवचनात ब्रहा सत्य जगन्मिथ्या, अशी नुसती बडबड केल्याने, पारतंत्र्याच्या दुःखात होरपळत असलेल्या हिंदुस्थानातील लोकांस त्यापासून यत् किंचित तरी गारवा येईल का ?'
बुद्धीला आवाहन
टिळकांना कोणते धार्मिक परिवर्तन, धार्मिक पुनरुज्जीवन अपेक्षित होते, ते यावरून कळून येईल. राष्ट्रधर्म हाच त्यांचा खरा कर्मयोग होता. आणि त्याचीच प्रवचने सर्वांनी करावी, असे ते सांगत असत. मात्र ही धर्मप्रवचने नव्या, शास्त्रीय, पाश्चात्य पद्धतीने झाली पाहिजेत, असे त्यांचे कटाक्षाने सांगणे असे. जुनी पद्धत केवळ सिद्धांतच सांगण्याची आज्ञा करण्याची होती. गीतारहस्याच्या उपसंहारात त्यांनी म्हटले आहे की 'मन्वादी स्मृतींतून, उपनिषदांतून, सत्य, अहिंसा याविषयीच्या आज्ञा स्पष्टपणे नमूद केलेल्या आहेत. पण मनुष्य हा ज्ञानवान प्राणी असल्यामुळे, वरच्यासारख्या नुसत्या विधानांनी त्याचे समाधान न होता, हे नियम घालून देण्याचे कारण काय, हे समजून घेण्याची त्याची स्वभावतःच इच्छा असते.' शिकलेल्या लोकांपुढे पाश्चात्य पद्धतीने धर्माचे विवेचन करून आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व त्यांच्या बुद्धीला पटवून दिले पाहिजे, असे त्यांनी पुनः पुन्हा सांगितले. जगद्गुरू शंकराचार्य यांच्या जागी हल्लीच्या काळी इंग्रजी शिकलेला मनुष्य आला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता, तो यासाठीच.
नवी मांडणी
१९०६ साली भारत धर्ममहामंडळापुढे त्यांचे जे व्याख्यान झाले, त्यात त्यांच्या सर्वधर्मविचारांचा भावार्थ आला आहे. ते म्हणतात, 'भारत धर्ममहामंडळ हे नाव केव्हा सार्थ होईल ? हिंदुधर्मातील सर्व शाखा, पंथोपपंथ यांचे दृढ ऐक्य मंडळ करील तेव्हा. धर्माची व्याख्याच मुळी, धारण करणारा तो धर्म, अशी आहे. सध्या आपल्या धर्माला वाईट कळा आली आहे. दुही, फूट, भेद, विभक्तता यांनी आपल्याला ग्रासले आहे. आपण अत्यंत आळशी व मूर्ख झालो आहो. हे सर्व दोष नष्ट करून आपल्या प्राचीन धर्माचे पुनरुज्जीवन धर्ममहामंडळाने केले पाहिजे. त्या धर्माची तच्चे किती उज्ज्वल होती हे, ऑलिव्हर लॉज, मेयर यांसारखे शास्त्रज्ञ आज सांगत आहेत. हे ध्यानी घेऊन आपण आपल्या प्राचीन धर्माचे नव्याने संपादन केले पाहिजे आणि विज्ञानाच्या नव्या प्रकाशात त्याची मांडणी केली पाहिजे.'
लो. टिळकांच्यानंतर महात्माजींचे आगमन झाले. विवेकानंद, टिळक यांच्या प्रमाणेच ते अखिल भारताचे गुरू होते. तेव्हा त्यांच्या धर्मविचारांची छाप मराठी मनावर बसावी, यात नवल असे काहीच नाही.
महात्माजींच्या धर्मतत्त्वांचा विचार करताना सत्य, अहिंसा, आतला आवाज याला नेहमी महत्त्व दिले जाते. आणि ते योग्यच आहे. पण या बाबतीत त्यांची काही मते एकांतिक असली, तरी ज्या धर्मक्रांतीचा विचार आपण करीत आहो, ब्रिटिशकालातील ज्या धार्मिक परिवर्तनाचा मागोवा घेत आहो, त्या दृष्टीने पाहिले तर वरील दोन महापुरुषांच्या मतांहून महात्माजींची मते फारशी निराळी होती, असे दिसत नाही.
परमेश्वर दलितांमध्ये
परमेश्वराचा साक्षात्कार हे धर्माचे अंतिम उद्दिष्ट असले, तरी तो परमेश्वर दीन- दलितांच्या ठायी असतो आणि त्यांची सेवा हीच परमेश्वराची खरी सेवा, असे ते सांगत. ते म्हणत, 'हिमालयाच्या गुहेत देव आहे असे मला कळले तर मी तेथे जाईन. पण तो तेथे नाही. मानवाच्या ठायीच तो असतो. म्हणून आपल्या बांधवांची सेवा हाच खरा धर्म होय.'
देव, अध्यात्म यांचे महत्त्व महात्माजी नाकारीत नाहीत. पण, 'भुकेल्या, दीन- दरिद्री कोट्यवधी जनतेला अध्यात्म सांगणे हे व्यर्थ आहे. त्यांना प्रथम काम देऊन भाकरी मिळवून देणे हेच माझे पहिले कर्तव्य होय. भरल्या पोटी वेदान्त सांगणे मोठे सुखाचे असते. पण ते सांगणाऱ्याला ! भुकेल्यांना भाकरी हाच परमेश्वर होय.'
राजकारण-धर्म
'मी सत्याचा शोध घेणारा एक नम्र पाईक आहे. सामाजिक, आर्थिक, नैतिक, राजकीय सर्व क्षेत्रांत मी काम करतो तो या शोधासाठीच. माझे राजकारण यासाठीच आहे. येथे कोट्यवधी लोक गुलामगिरीत खितपत पडले आहेत. राजकारणात पडल्यावाचून त्यांची सेवा करणेच शक्य नाही. म्हणून माझे राजकारण ही मानवसेवाच आहे. म्हणजेच तो सत्याचा शोध आहे.'
धर्मावाचून राजकारणाचा विचार करताच येत नाही, असे आत्मचरित्रात महात्माजींनी लिहिले आहे. तसे तुम्हांला अजूनही वाटते का, असे कोणी विचारल्यावरून ते म्हणाले, 'निश्चित वाटते. धर्मापासून अलग असा राजकारणाचा मी विचारच करू शकत नाही. विश्वाच्या नियंत्यावर व त्याच्या नियमबद्धतेवर श्रद्धा, हा धर्माचा अंतिम अर्थ आहे. त्यामुळे हिंदुस्थानात अनेक धर्म असले तरी त्याची चिंता नाही. हे तत्त्व या सर्व धर्मात आहेच. त्यामुळे त्यांच्यांत भेद न माजता ऐक्यच होईल.'
व्यवहारी धर्म
महात्माजी नेहमी त्यागाचा उपदेश करीत व भोगविलासांचा निषेध करीत. पण मनुष्याला काही किमान सुखे व काही किमान वासनातृप्ती मिळालीच पाहिजे, असे त्यांचे मत होते. जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. तेव्हा त्यासाठी अन्न, वस्त्र, घर ही आवश्यकच आहेत. त्यांचाही त्याग करावा, असे धर्म सांगत नाही. धर्म आणि व्यवहार यांची सांगड सदैव असलीच पाहिजे. जो धर्म नित्याच्या व्यवहाराचा व त्यातील समस्यांचा विचार करीत नाही तो महात्माजींच्या मते धर्मच नव्हे. ते एकदा म्हणाले, 'मी काही आध्यात्मिक किंवा धार्मिक तत्त्व सांगितले आणि ते जर अव्यवहार्य ठरले तर ते माझे अपयश आहे. खरे धर्मतत्त्व हे संपूर्णपणे व्यावहारिक असले पाहिजे.'
महात्माजी अनेक वेळा अंतःसंदेशावर, आतल्या आवाजावर विसंबून असत. पण याचा अर्थ ते ग्रंथप्रामाण्य मानीत असत किंवा बुद्धिप्राणाण्याला त्यांचा विरोध होता असा नाही. त्यांनी स्वच्छ म्हटले आहे की 'जे बुद्धीला पटत नाही ते धर्मतत्त्व मी त्याज्य मानतो. बुद्धीलाही काही मर्यादा आहेत, हे मला मान्य आहे. त्या प्रत्येकाने ध्यानात घेतल्याच पाहिजेत. पण म्हणून प्रत्येक सिद्धांत आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून घेतला पाहिजे, हा आग्रह सोडता कामा नये.' (सर्व उतारे, सिलेक्शनस् फ्रॉम गांधी, निर्मलकुमार बोस)
हे सर्व पाहिल्यावर मोक्ष, ऐहिक उत्कर्ष, व्यवहार, ग्रंथप्रामाण्य, राष्ट्रधर्म, दलितसेवा, राजकारण आणि धर्म यांचे अद्वैत, इ. निनिरराळ्या धर्मतत्त्वांच्या बाबतीत लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्यांत भेद होता असे दिसत नाही. संन्यास, अध्यात्म, दीनदलितांची सेवा याविषयी स्वामी विवेकानंदांनीही अशाच तऱ्हेचे विचार मांडलेले आहेत, हे आपण वर पाहिलेच आहे.
धर्मनिर्णय मंडळ
ब्रिटिश कालात 'धर्मविचारमंथन झाले आणि सनातन हिंदुधर्मात परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न झाले त्यात लोणावळ्याचे 'धर्मनिर्णय मंडळ' याला महत्त्वाचे स्थान आहे. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे हे त्याचे प्रवर्तक व कार्यवाह होते. आणि म. म. पां. वा. काणे, श्रीधरशास्त्री पाठक, नारायणशास्त्री मराठे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, वाईचे दिवेकर शास्त्री, नागपूरचे डॉ. के. ल. दप्तरी, सदाशिवशास्त्री भिडे, हे थोर पंडित त्यांच्या पाठीशी होते. जुन्या परंपरांचा, धर्मग्रंथांचा, सर्व मान सांभाळून मानवी बुद्धीने धर्मात परिवर्तन घडवून आणणे, हे मंडळाचे उद्दिष्ट होते.(स्थापना १९३८) . विवाहसंस्थेत सुधारणा, अस्पृश्यतानिवारण, जातिसमता, सर्व धर्मी समानत्व, मंदिरप्रवेश इ. सुधारणांविषयी व्याख्याने, परिषदा, पत्रके, पुस्तके या साधनांनी लोकमत तयार करण्याचे बहुमोल कार्य मंडळाने केले आहे. रघुनाथशास्त्री कोकजे यांनी 'धर्मस्वरूप निर्णय' (१९३३) व 'हिंदूंच्या अवनतीची मीमांसा ' (१९४४) हे दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहून मंडळाच्या कार्याला स्थैर्य आणून दिले. वेदकालापासून आजपर्यंत वैदिक धर्मात कोणकोणती परिवर्तने झाली, कोणती तत्त्वे, कोणतं सिद्धांत, कोणते आचारविचार कोणत्या कालात प्रभावी होते आणि त्यांचे बरेवाईट परिणाम होऊन हिंदूंची उन्नती अवनती केव्हा कशी होत गेली, याचे साधार- सप्रमाण विवेचन या दोन ग्रंथांत कोकजेशास्त्री यांनी केले आहे. प्रस्तुत महाराष्ट्रसंस्कृतीच्या विवेचनात प्रत्येक कालखंडातील धर्मस्वरूपाचा विचार केलेला आहे. तशा स्वरूपाच्या धर्मविचारांचा सर्व इतिहास या वरील ग्रंथांत अखिल भारतासंबंधी आलेला आहे. पुढल्या काळात म. म. डॉ. काणे यांनी 'धर्मशास्त्राचा इतिहास' हा आपला प्रचंड ग्रंथ लिहिला. हिंदूंच्या उत्कर्षापकर्षाच्या इतिहासाच्या दृष्टीने या ग्रंथाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
ब्रह्मचर्याश्रम
विनायक महाराज मसूरकर यांनी मसूरला स्थापन केलेला 'ब्रह्मचर्याश्रम' याने धर्मजागराचे केलेले कार्य उल्लेखनीय आहे. धर्मांतराची लाट थोपवून पतितांची शुद्धी करणे यावर विनायक महाराजांचा फार भर होता. त्यांच्या शिष्यांनी आज गोरेगावच्या मसुराश्रमात तेच महत्त्वाचे कार्य चालविले आहे.
शेवटी स्वातंत्र्यवीर सावकार यांनी धर्मक्रांतीच्या क्षेत्रात जे विचार मांडले, जे कार्य केले, त्याचा परामर्श घेऊन हे विवेचन संपवू.
सावरकर
सावरकर क्रांतिकारक होते, असे सांगताना, त्यांच्या राजकीय क्षेत्रातल्या कार्याचेच विवेचन केले जाते. पण स्वतः सावरकरच सांगत की 'राजकारण, समाजकारण, धर्म ही समाजपुरुषाची अंगे अविभाज्य आहेत. एक दुसऱ्यावाचून नेहमीच पंगू राहणार.' मनाशी हा सिद्धांत निश्चित झालेला असल्यामुळे धर्मक्रांतीची अनेक तत्त्वे त्यांनी आपल्या निबंधांतून विवरिली आहेत. 'दोन शब्दांत दोन संस्कृती' या निबंधात त्यांनी हिंदूंच्या शब्दप्रामाण्यावर, श्रुतिस्मृतिपुराणोक्तावर कडक टीका केली आहे आणि हिंदुराष्ट्राला काळाच्या तडाख्यातून वाचायचे असेल तर श्रुतिस्मृतिपुराणोक्ताची ही बेडी तोडून टाकली पाहिजे आणि हिंदुधर्माला प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम व विज्ञाननिष्ठ असे रूप दिले पाहिजे, असा इशारा दिला आहे.
माकड-भाकड
अपरिवर्तनीयता हा आपल्या धर्मातला दुसरा महादोष. 'माकड महासंमेलन व भाकड महासंमेलन' या लेखात या दोषाचे स्वरूप त्यांनी स्पष्ट केले आहे. परिस्थिती- प्रमाणे आपले आचार आपण पालटले पाहिजेत, हे माकडांच्या संमेलनात मंजूर झाले. पण काशीच्या शास्त्रीपंडितांनी 'परिस्थिती, पालट हे लक्षात घेऊन धर्मात परिवर्तन घडविणे हे पाखंड होय,' असा ठराव केला. म्हणूनच त्याला सावरकरांनी भाकड महासंमेलन म्हटले आहे.
शुद्धी आणि संघटन यांना सावरकरांच्या हिंदुराष्ट्रवादात फार महत्त्वाचे स्थान होते. शुद्धिबंदीमुळे केवढा अनर्थ झाला आहे याचे त्यांनी अनेक ठिकाणी विवरण केले आहे. बाटलेल्या व परत स्वधर्मात येऊ इच्छिणाऱ्या हिंदूंना, हिंदुराज्यातसुद्धा, मुसलमान म्हणूनच राहावे लागे. हा हिंदुधर्म !' हे त्यांचे उद्गार अगदी भेदक असे आहेत.
सप्तशृंखला
सावरकरांचा सप्तशृंखलांचा सिद्धांत प्रसिद्धच आहे. वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धिबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी या त्या सात शृंखला- बेड्या होत आणि दुर्दैव असे की त्या आपणच आपल्या पायात ठोकून घेतल्या आहेत. याचा अर्थ असा की हिंदूंच्या अधःपाताला त्यांचे तेच जबाबदार आहेत आणि या बेड्या आपण होऊन तोडून टाकीत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, आणि मिळाले तरी ते टिकणार नाही, असे सावरकरांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
बाळशास्त्री जांभेकरांपासून सावरकरांपर्यंत महाराष्ट्रात धर्माच्या क्षेत्रात कोणी कोणती तत्त्वे सांगितली व काय कार्य केले त्याचे विवेचन येथवर केले. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होईल की या धर्मक्रांतीमुळे जो नवा जोम व सामर्थ्य भारतात निर्माण झाले, त्यामुळेच या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. या थोर नेत्यांनी याबरोबरच सामाजिक क्रांतीचे तत्त्वज्ञानही सांगितले व काही प्रमाणात तीही घडवून आणली. तिचे महत्त्व धर्मक्रांतीइतकेच आहे. वर सांगितलेच आहे की ही दोन्ही अंगे आणि तशीच राजकारण व अर्थकारण हीही अंगे अविभाज्य आहेत. विवेचनाच्या सोयीसाठी त्यांचा पृथकपणे विचार करावयाचा इतकेच. येथून पुढे क्रमाने तो करावयाचाच आहे. येथे धर्मक्रांतीचा समारोप करताना मनात येणारा एक विचार सांगतो. म. म. काणे, म. म. पाठक, तर्कतीर्थ जोशी, दिवेकर शास्त्री यांच्या योग्यतेचे काही पंडित मराठेशाहीच्या काळात किंवा त्या अगोदरच्या कालखंडात झाले असते तर महाराष्ट्राचे आणि भारताचेही स्वातंत्र्य गेले नसते आणि हिंदूंची अवनती झाली नसती. या शास्त्री पंडितांनी केलेल्या धर्मक्रांतीचे महत्त्व यावरून ध्यानात येईल.
■