महाबळेश्वर/महाबळेश्वर गांव
या क्षेत्रांत ब्राह्मण, कुणबी, कोळी, धनगर, वगैरे लेकांचीं मिळून घरें सुमारें ५० आहेत, त्यांत नुसती ब्राह्मणांचीं घरे ३२ आहेत. या गांवांत ब्राह्मणांची वस्ती जशी ज्यास्त आहे, तशी दुस-या जवळपासच्या मैलांतील केाणत्याही खेडय़ांत सांपडणें कठीण. हे बहुतेक सर्व ब्राह्मण भिक्षुकीचा धंदा करून पोट भरणारे आहेत. भिक्षुकीशिवाय व्यापार किंवा उत्पन्न असणारे लोक सुमारें आठ किवा दहा असामीपेक्षां ज्यास्त नाहींत. बाकी राहिलेल्या कुटुंबांचा निर्वाह
नुसते भिक्षुकीवर चालतो. येथील सर्व बाह्मण मंडळी एक गोत्री असल्यामुळे, एकमेकांचा गांवचे मिळकतीत फायदा होण्याचा संभव नाहीं. तेव्हां यांचा आणि गावांतील दुस-या १०,१२ गुरव कुटुंबांचा निर्वाह देवांच्या यात्रेकऱ्यांंकडून होणा-या मिळकतीवर अवलंबून आहे हें वाचकांच्या सहज लक्षांत येईल. या करितां या देवळासंबंधीं विशेष माहिती देणें अवश्य वाटल्यावरून त्याबद्दल वर्णन पुढे दिलें आहे.
या क्षेत्रांत महाबळेश्वर, अतिबळेश्वर, कोटेश्वर व कृष्णाबाई यांचीं देवळे फार जुनाट आणि काळ्या दगडांनीं बांधलेलीं आहेत. ही बांधून निदान ५०० वर्षोवर वर्ष झाली असावींं असें अनुमान केलें आहे. तथापि त्यांस अद्याप पावेतों मुळींच भंग नाहीं. ह्या जुन्या देवळांची दुरुस्ती सुमारें २०० वर्षामागें सातारचे परशराम नारायण अनगळ यांनीं केली होती. या शिवाय सन १८७५ साली श्रीमंत जमखिंडीकर साहेब यांनीं १५००० रू खर्च करून कृष्णाबाईचे देवळास पत्रा घातला आणि जीर्णोद्धार केला. कृष्णाबाईचे देवळाच्या पिछाडीस मारुतीचे एक दगडी देऊळ बांधलेलें आहे. हा मारुती श्री रामदास स्वामीनीं स्थापन केलेला आहे असे श्रींचे चरित्रावरून समजतें. त्यांत असें लिहिलें आहे कीं रामदास स्वामी शके १५५६ तारणनाम संवत्सरे या सालांत वैशाख मासीं कृष्णास्नानाकरितां महाबळेश्वरीं राहिले होते. त्यावेळीं ग्रामस्थ मंडळी त्यांचे पूर्णभक्त बनल्यामुळे त्यांची निरंतर सेवा आपले हातून व्हावी ह्मणून त्यांनीं स्वामींस विनंती केली, तेव्हां जातेवेळी स्वामींनीं मंडळींच्या आग्रहास्तव या मारुतीची स्थापना करून त्याची सेवा करून राहणेबद्दल त्यांस अनुग्रह दिला. श्रीकृष्णाबाईंचे देवळानजिक प्रसिद्ध अहिल्याबाई होळकरीण हिनेंही एक उत्तम देवालय बांधून ठेविलें आहे व त्यांस उत्पन्नही करून दिलें आहे. त्यास रुद्रेश्वर असें ह्मणतात. याशिवाय येथें तीर्थे आहेत, तीं रुद्रतीर्थ, चक्रतीर्थ, हंसतीर्थ, पितृमुक्तितीर्थ, अरण्यतीर्थ, मलापकर्षतीर्थ, वगैरे पाहून ही करवीर किंवा काशीक्षेत्राच्या तोडीची पुण्यभूमिका आहे अशी खात्री होते. हल्ली ह्यांत शेवाळ व झाडाचा पाला पडून हीं
अस्वच्छ झालीं आहेत. येथें उतारू लोकांच्या सोयीसाठीं कोल्हापूर संस्थानचे माजी कारभारी कै. महादेव वासुदेव बर्वे यांनी कृष्णाबाईचे देवळानजीक एक मोठी धर्मशाळेची इमारत सन १८८७|८८ सालीं बांधून ठेविली आहे. तिचे कांहीं भागांत येथील सरकारी शाळा असते त्यामुळे कित्येक प्रसंगीं उतारू लोकांची मोठी अडचण होते. याकडे सरकारचें लक्ष्य जाऊन येथें शाळेकरितां सरकारी इमारत झाल्यास उतारू लोकांवर फार उपकार होतील.
येथील कृष्णाबाईचें देऊळ वाडयाचे चौकाप्रमाणें बांधलेलें आहे. त्याचे चोहोबाजूस जे चार सोपे आहेत, त्यालाच खण पाडलेले असून प्रत्येक खणाला कमानी केल्या आहेत. यांतील नद्यांच्या उगमाची बाजू बाकीचे बाजूंपेक्षां उंच आहे. या शिवाय सर्व बाजूंच्या सोप्यांना फक्त सुमारें ३ फूट उंचीचे जोतें आहे. हें सर्व काम घडीव काळ्या दगडांचें केलेलें आहे. मधील चौकाचा भाग प्रशस्त आहे, यामुळे हें देऊळ एकाद्या सभामंडपाप्रमाणें लांबट झालें आहे. यांतील गायमुखाशेजारचें कुंड सुमारें ०५ फूट खोल आहे, त्यास खालीं उतरण्यास
पाय-या केल्या आहेत आणि तळास फरशी केली आहे. यांत ब्राह्मण व शूद्र लोकांस मात्र स्नान करण्यास हरकत नसते. यापेक्षां कनिष्ठ जातींच्या लोकांस आंत येऊ देत नाहींत. त्यास बाहेर नेऊन पाणी घालतात. याचे शेजारीं दुसरें एक विष्णुकुंड आहे. या देवळामध्ये कृष्णाबाईचा उत्सव फाल्गुन वद्यांत दरसाल होते व तो पांच दिवस चालतो. दररोज पुराण आणि कीर्तनही त्या प्रीत्यर्थ होत असतात. त्याकरितां जावली, वांईकडील ब्राह्मण वगैरे लोक येतात. याचे ब्राह्मणभोजन पांच दिवस होतें. या उत्सवास उत्पन्न सुमारें नव्वद रूपयांचें आहे. पैकीं १६ रूपये श्रीमंत पंतसाहेब संस्थान भोर यांजकडून मिळतात व श्रीमंत प्रतिनिधीसाहेब यांनीं येथील ब्राह्मणांस खरशीगांवचें अग्राहार उत्पन्न रुपये ७४चें दिलें, तें त्यांनीं भाऊबंदकीचे पुष्कळ हिस्सेदार असल्यानें त्यापासून विशेष फायदा होणार नाही, असें जाणून श्रीकृष्णाबाईचे उत्सवास मोठया औदार्यानें लावून दिलें आहे. यांतून खर्च भागत नसल्यामुळे लोकांवर पट्टी बसवून उत्सवाचे बेगमीची तयारी करितात. एकंदर २९० पासून ३०० रुपयेपावेतों खर्च होतो. शिवाजीमहाराजांनीं महाबळेश्वरासारखें कृष्णाबाईस उत्पन्न कां दिलें नाहीं तें समजत नाहीं. या कृष्णाबाईंचे देवालयांत मुख्य गंगेच्या बाजूकडील भागांत कोळी लोकांकडे झाडलोट करण्याचें काम असतें. कृष्णाबाईचे कुंडांत जे कोणी यात्रेकरी धर्मादाय पैसा टाकतील तो या कोळ्यांस मिळतो. तसेंच कृष्णाबाईस कोणी नैवेद्य आणिला, तरी तो सुद्धां त्यांस मिळतो; अशी दुसरीकडे कोठेही कोणतेही देवस्थानांत वहिवाट नाहीं. येथें कोळी लोकांचीं घरें ८।१० आहेत.
येथें दुसरें महाबळेश्वराचें देऊळ आहे, त्याचें सर्व काम काळ्या दगडाचें आहे. यांत दोन भाग आहेत. त्यांपैकीं आंतील गाभा-यांत महाबळेश्वराचें मोठं थोरलें आणि रुद्राक्षाकृती असें स्वयंभू लिंग आहे. याचेवर पांच ठिकाणीं पांच खळगे आहेत, ते नेहमीं पाण्यानें भरलेले असतात. या पांच खळग्यांतून असणा-या कृष्णा, वेण्या, कोयना, गायत्री, आणि सावित्री ह्याच पांच नद्या आहेत. पूर्वी एका दीर्घ शंकेखोर मनुष्यानें ह्या पांच खळग्यांतील
पाणी भिक्षुकांनीं उगीच वरून घालून ठेवून धार्मिक लोकांस भाळण्याचें कौसल केलें आहे, अशी कुशंका काढून, त्यांतील पाणी चिरगुटानें वरचेवर पुसून काढण्याचा उपक्रम आरंभिला. बरेचवेळ पाणी पुसून काढलें पण ते खळगे कोरडे तर झाले नाहीतच. परंतु त्यांतून शेवटीं रक्त येऊं लागलें, अशी आख्यायिका आहे. हे कोणास खरें वाटत नसलें, तरी त्यांतील पाणी आटत नाहीं, ही गोष्ट मात्र खरी आहे. याकरितां देवाला पूजा बांधतांना जीं वस्त्र वगैरे घालावीं लागतांत तों भिजून जाऊन खराब होऊं नयेत म्हणून खळग्यावर घालण्यासाठीं तांब्याचीं झांकणें केलेलं आहेत तीं त्यावर घालून ठेवितात. हल्ली देवाजवळ अहोरात्र नंदादीप जळत असतात. त्यांपैकीं एक पेशवाईतील शूर सरदार बापू गोखले यांजकडून चाललेला आहे. त्याचे खर्चीची रकम इंग्रज सरकारचे खजिन्यांतून मिळते. व दुसरा वाठारचे सोनी यांनी ठेविला आहे. यासही सुमारे ५० वर्षे झालीं आहेत, देवळाच्या आंत बाहेरून उजेड पडण्यास कांही जाळी वगैरे नसल्यामुळे सर्वकाळ अंधार असतो; त्यामुळे या नंदादीपांचा चांगला उपयोग होतो. गाभाऱ्याच्या बाहेरील अंगास शेजघर असून त्या ठिकाणीं काळभैरवाचें स्थान आहे, तेथें दररोज बहुतकरून पुराण वगैरे चालतें; यांचे पलीकडे एका मोठा काळे पाषाणाचा नंदी करून बसविलेला आहे. त्यावरील सभामंडप तांबडे दगडाचा बांधलेला आहे. यावरून तो मात्र अलीकडे केला असावा असें दिसतें. या नंदीचा डावा कान फोडलेला आहे. त्याची हकीकत अशी सांगतात कीं, अवरंगजेब दिल्लीचे मोंगल बादशाहा याचेवेळीं हिंदूंचीं सर्व देवळे फोडून देवांच्या मूर्ती वगैरे नाहिंशा कराव्या, हिंदूचे मुसलमान करावे, वगैरे प्रकार चोहोंकडे चालला होता, ती मूर्तिभंगाची लाट महाबळेश्वरापर्यंत येऊन पोंचली होती. तेव्हां एके वेळी मोंगल देवळांत शिरले आणि त्यांनीं प्रथम नंदीवर प्रहार करून त्याचा कान तोडला. इतकें होतांच देवळांतून मोठमोठे भुंगे निघून, त्यांच्या मागे लागले आणि त्यांस त्यांनीं पुरे पुरे करून सोडिले. हे पाहून या दैवताबद्दल त्यांच्या मनामध्यें
पूज्यबुद्धि उत्पन्न झाली आणि त्यांनीं या देवास हल्लींं जें उत्पन्न चालू आहे तें करून दिलें. पुढें मराठी राज्य झाल्यावर त्या मराठी राजांनीही हें उत्पन्न तसेंच चालविलें. हल्लींं या देवळांत पलंग व सताल (मुसलमानी घाटाचें भांडें) या मोंगलाकडून मिळालेल्या देणग्या आहेत. या सर्व गोष्टींवरून असें होतें की हे महाबळेश्वरचें देऊळ मोगलाईंचे कारकीर्दीचे अगोदरपासून आहे तसेंच आहे. आणि हें दैवत इतकें जागृत आहे कीं मोंगलासारख्या हिंदुधर्मद्वेष्ट्या बादशाहांनीसुद्धां यास पूज्य मानून उत्पन्न करून दिलें आहे. येथें श्री रामदासस्वामींनीं स्थापन केलेल्या मारुतीसही छत्रपती शिवाजी यांनी दरसाल २१ रुपयांचें उत्पन्न करून दिलें आहे.
या क्षेत्राचें शिवार पुष्कळ विस्तृत आहे. यांतील बहुतेक जमिनीत जरी पिके वगरे फारशीं येत नाहींत, तरी त्यांतील जंगलाचें उत्पन्न देवास येतें. या जमिनी छत्रपति शिवाजी महाराज यांनीं या देवाला इनाम दिल्या आहेत. या शिवाय इनाम गावें हीं देवाकडे पुरातनचींच आहेत. या सर्व जमिनीचा
वसूल व फारेष्ट खात्यांत ज्या देवाच्या जमिनी भाडयानें घेतल्या आहेत, त्यांचें उत्पन्न मिळून एकंदर दोन अडीच हजार रुपयांचें आहे. हें एक लहानसें स्वतंत्र संस्थान आहे. याची वहिवाट पिंगळे आडनांवाचे वंशाकडे आहे. या संस्थानचे नोकर लोक सर्व गुरव आहेत. रोजची पूजा नैवेद्य व चौघडा वाजविणें वगैरे सर्व कामें त्यांजकडूनच होतात. त्यांची येथें सुमारें १२ घरें आहेत. त्यांत पाळीपाळीनें हें काम जातें. यावर देखरेख ठेविण्याकरितां एक कारकून ठेविलला आहे. या देवास रोजचा अभिषेक आहे त्याबद्दल ब्राह्मणास वर्षांचें वेतन ठरविलेलें आहे.
देवाचा मुख्य उत्सव माघ वद्य १४ पासून फाल्गुन शुद्ध ३ पावेतों पांच दिवस होतो. या उत्सवांत दररोज्ञं कीर्तन असून प्रयोजन मात्र एकच दिवस होतें त्यांत सर्व जातीच्या लोकांचें मिळून सुमारे ३००|४०० पान होतें. या उत्सवात बाहेरील लोकही येतात. उत्सवाचा खर्च सुमारें २०० रूपये पावेतों होतो.
याच देवळांत आश्विन महिन्यांत नऊ दिवस शारदानवरात्राचाही उत्सव होतो. तेव्हांही सर्व व्यवस्था वरील उत्सवाप्रमाणेंच होते. परंतु सुमारे १०० रुपये खर्चास पुरतात. याप्रमाणें दरसाल १२०० रुपये खर्च होऊन बाकीचें उत्पन्न शिल्लक राहतें.
याशिवाय येथें एक कमलजा नामक श्री देवीचें देऊळ आहे. याची अशी गोष्ट आहे कीं, या डोंगराचे पूर्वेच्या बाजूस जोर खोरें आहे त्यांतील वेदगंगा इचे तीरास घोर जंगलांत हिचें मूळपीठ आहे. तेथें कोळी वगैरे लोक जाऊन तिची फार उपासना करीत असत. हें पाहून हे कोळी लोक आपल्यास अनुकूळ होण्याकरितां येथें कोणी चंद्रराव मोरे म्हणून विजापूर बादशाहाचा सरदार छत्रपति शिवाजीचे पूर्वी येऊन राहिला होता, त्यानें या देवीचे स्थानास बरेंच महत्व आणिले. हा मोरे विजापूर बादशहाच्या पदरचा म्हणून म्हणावीत असे.परंतु तो त्याला भीक घालीत नव्हता. त्याचा वाडा जवळच जावली गांवांत होता तो वाडा शिवाजीनें, हा मोरे मराठा असून मोंगलाच्या ओंजळीनें पाणी पिणारा आहे असें पाहिल्यावर, पाडून जमीनदोस्त केला
आणि त्याचा मालमसाला प्रतापगडच्या किल्ल्यावर नेऊन तटाचे कामी लावला. पुढें मोरे याचा स्वतःचाही युक्तीने निकाल लावल्यावर दुसरा माणिकचौकाचा वाडा जोर गांवांत असलेला पाडून नाहींसा केला. त्याच्या भिंतीच्या खुणा अद्यपि येथें आहेत. पुढें महाबळेश्वर येथील ब्राह्मण लोकांस देवीचा कांहीं दृष्टांत होऊन गूण आल्यावर त्यांनी या ठिकाणी हें तिचें देऊळ बांधिलें आणि तेव्हांपासून ही देवी येथील सर्व महाबळेश्वरकरांचें कुलदैवत होऊन राहिली आहे. याशिवाय या क्षेत्री तीर्थे व कुंडेही बरीच आहेत.
या क्षेत्राचे ठिकाणींं नेहमी कोणीना कोणीतरी कृष्णास्नान किंवा वंदन करण्यास येतच असतात. त्यामुळे त् यांचेकडून तेथील भिक्षुक ब्राह्मण लोकांस फायदा होतो. अलीकडे या क्षेत्रापासून सुमारें ३ मैलांवर नहर ऊर्फ मालकमपेठ हे हवा खाण्याचे ठिकाण पहिले प्रतीचें झाल्यामुळे तर चोहीकडून तेथें हवेकरितां येणारे पुष्कळ श्रीमंत हिंदुलोक येथें येऊन ब्राह्मणभोजन, गंगास्नान, पूजन वगैरे करितात. त्यामुळे यांस रोजची नवी प्राप्ति आहे. येथील सर्व ब्राह्मण क्षेत्रोपाध्ये आहेत. हा त्यांचा मुख्य धंदा असोन असल्यामुळे वंशपरंपरेनें चालला आहे. कांहींसे कुलकर्णीपणाचे व देशपांडेपणाचे हक आहेत. यात्रेकऱ्यांंकडून आपल्यास उपाध्या केल्याबद्दलचा लेख लिहून घेण्याची यांची वहिवाट आहे. असे लिहून घेतलेले लेख सुमारें ४०० वर्षांचे यांजपाशों आहेत.