Jump to content

मलपृष्ठ

विकिस्रोत कडून

सभा-भाषणांतून मी केलेल्या त्यागाचा आता उल्लेख केला म्हणजे मला हसू येतं. संघटनेच्या कामात मी काही करुणेच्या प्रेरणेने पडलेलो नाही. कोणा तळागाळातील जनसामान्यांचा उद्धार करण्याची मनिषा ठेवण्याचा उद्धटपणा माझ्याकडे नाही. या कामात मला अपरंपार आनंद मिळतो म्हणून मी हे काम करतो. आजपर्यंत हजारो शेतकरी आंदोलनांत तुरुंगात गेले. कित्येकांनी लाठ्या खाल्ल्या. निपाणी भागात गेलो तर डझनभर शेतकरी लाठ्यागोळ्यांनी हातपाय गेलेले, कुबड्या खाड्खाड् वाजवीत भेटायला येतात. बावीस घरांतली तरुण कर्ती माणसं पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडली आहेत. एवढं होऊनसुद्धा या कामात मला आनंद - वाटतो. मग त्याग कसला? उलट माझ्याइतकं भाग्यवान कोण? त्याग काय आजपर्यंत थोड्यांनी केला? अनेकांची बलिदानं व्यर्थ गेली. त्यांच्या नजरेला काहीसुद्धा फळ पडलं नाही. मी शेतकऱ्यांच्या ना जातीचा, ना पातीचा, ना पेशाचा.

देशभरातील शेतकऱ्यांनी मला जे प्रेम दिले त्याला तोड नाही.