Jump to content

भावार्थ रामायण/बालकाण्ड/अध्याय ७

विकिस्रोत कडून
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय सातवा ॥
श्रीरामांची तीर्थयात्रा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

धन्य रामायण सृष्टीं । धन्य वाल्मीकाचे वाग्वृष्टी ।
अक्षरीं अक्षरपरिपाटी । दोष कोट्यनुकोटी नासती ॥ १ ॥
नासती महापातकें । नासती द्वंद्वेदुःखे ।
रामकथा ऐकतां हरिखें । सुख महासुखें थोरावे ॥ २ ॥
येथोनि श्रीरामचरित्र । अपवित्रा करी अति पवित्र ।
कथाकौतुक अति विचित्र । श्रोतीं सादर परिसावें ॥ ३ ॥

श्रीरामजन्माने लंकेत घडलेल्या अशुभसूचक घटना :

श्रीराम जन्मला अयोध्यापुरीं । तंव वीज पडे लंकेवरी ।
भूस्फोटन नगरद्वारीं । भूकंप नगरीं त्रिकेटेंसीं ॥ ४ ॥
रावण जंव भद्रीं चढे । तंव मुकुट पायरीवरी पडे ।
वायुघातें छत्र मोडे । सभेचे हुडे खचोनि पडती ॥ ५ ॥
कुंभकर्णाच्या घरावरी । दिवाभीत घूं घूं करी ।
इंद्रजित आरशाभीतरीं । देखे आशिर शरीर ॥ ६ ॥
मंदोदरीची गळसरी । तुटोनि पडे अग्निभीतरीं ।
तीतें काढी जंव सुंदरी । तंव भस्म करी हुताशन ॥ ७ ॥
ऐसा विघ्नांचा आवर्त । तेणें राणिवसां आकांत ।
येणें राक्षसकुळा घात । हाहाभूत निशाचर ॥ ८ ॥
रावण सांगें भयेंकरीं । दृढपणें असा रे नगरीं ।
येथोनिकोणीं न जावें दूरी । अहोरात्रीं सावधान ॥ ९ ॥
प्रधानादिक सभानायक । तिहीं थोर घेतला धाक ।
रावणा लागली धुकधुक । अरिष्ट आत्यंतिक देखोनि ॥ १० ॥

कुमारांचे व्रतबंधादि संस्कार व अध्ययन :

येरीकडे अयोध्येंसी जाण । श्रीवसिष्ठ आपण ।
चौघां कुमारांचे विधान । संस्कारपूर्व करवता झाला ॥ ११ ॥
जातकर्म नामाभिधान । कटिसूत्र अन्नप्राशन ।
चौलकर्म वायनदान । केले संपूर्ण विधियुक्त ॥ १२ ॥
ऐश्वर्याचे आविष्करें । व्रतबंधाचेनि गजरें ।
दानें सन्मानें सत्पात्रें । सुखी नृपवरें यापरी केले ॥ १३ ॥
रामाचा व्रतबंध । सुखी केले विप्रवृंद ।
स्वानंदे निघालें दोंद । डोलत परमानंद पावले ॥ १४ ॥
श्रीरामाचें व्रतबंधन । सुखी केले अकिंचन ।
वणवण निमाली पूर्ण । मागतेपण मुक्त जाले ॥ १५ ॥
जालिया व्रतबंधन । वसिष्ठापासीं चौघे जण ।
आरंभिले वेदाध्ययन । शास्त्रव्याख्यान वेदांत ॥ १६ ॥
श्रीराम वेदाचें जन्मस्थान । त्यासी संस्कारमंत्रें जाण ।
पठन जालें शास्त्र संपूर्ण । अगाधपण प्रज्ञेचें ॥ १७ ॥
यापरी रघुनाथासी जाण । जालीं षोडश वर्षें संपूर्ण ।
करावया तीर्थाभिरामन । रघुनंदन उद्यत ॥ १८ ॥
प्रार्थूनि वसिष्ठातें । त्या सद्‌गुरूच्या अनुमतें ।
आज्ञा मागोनि दशरथातें । श्रीराम तीर्थातें निघाला ॥ १९ ॥
मग पाहोनियां सुदिन । स्वस्तिवादु पुण्याहवाचन ।
सर्वें देवोनियां सैन्य । सुबुद्धिप्रधानसमवेत ॥ २० ॥
दिधलीं अक्षयी भांडारें । सवत्स गाईंची खिल्लारें ।
नाना प्रकारचीं वस्त्रें । तीर्थीं रघुवीरें वांटावया ॥ २१ ॥

तीर्थयात्रावर्णन :

सरें सरितां सिंधुसंगम । पुण्यभूमि पुण्याश्रम ।
केले प्रयागादि पंचग्राम । मार्ग दुर्गम हिमालया ॥ २२ ॥
बदरीमार्गीं पंचप्रयाग । वेदप्रयाग शिवप्रयाग ।
कर्णप्रयाग ब्रह्मप्रयाग । अतिगुप्तप्रयाग पांचवा ॥ २३ ॥
शरयू गंगा सुवर्णभद्रा तिन्हीं । हे पूर्व प्रयोग त्रिवेणी ।
कार्तिक मासीं कृष्णा वेणी । मुख्य त्रिवेणी माघस्नान ॥ २४ ॥
वनें तपोवनें शैलशिखरें । परम पावन जें जे उखरें ।
तीर्थादि तिन्ही पुष्करें । तीर्थक्षेत्रें विधियुक्त ॥ २५ ॥
नैमिषारण्य धर्मारण्य । चंपकारण्य ब्रह्मारण्य ।म
हापंथाचें वेदारण्य । ऋषी वेदज्ञ जेथें असती ॥ २६ ॥
मंदरादि आणि विंध्याद्रि । मूळपीठींचा सह्याद्रि ।
गंगातीरींचा ब्रह्माद्रि । लोकोत्तरीं अति श्रेष्ठ ॥ २७ ॥
प्राची सरस्वती बिंदुसर । धर्मालय कुरुक्षेत्र ।
ज्वाळामुखी ज्वाळा दुर्धर । अति पवित्र तीर्थोदकीं ॥ २९ ॥
केलें तिन्हीं गयेंचे दर्शन । धर्मस्तंभांचे स्पर्शन ।
ब्रह्मयोनीचें अवलोकन । गायत्रींचे ध्यान संध्यावटीं ॥ २९ ॥
ब्रह्मावर्त गोमतीतीर । हिरण्यासहित सागर ।
सागरावतीं शंखोद्वार । जेथें वेदोद्वार करी हरि ॥ ३० ॥
सप्तपुरी तीर्थमार्गें । केली बाराही ज्योतिर्लिंगें ।
प्रभासेंसी सोमनाथयोगें । पंचकृष्णाप्रयोगें मूळमाधव ॥ ३१ ॥
द्वारकेचा कल्याणकृष्ण । दुजा शंखनारायण ।
तिजा पिंडारकी काळकृष्ण चौथा तो जाण गडदामोदर ॥ ३२ ॥
मूळचें निज मूळस्थान । मूळमाधव पांचा कृष्ण ।
हें तंव यात्रामंडळगमन । पुण्यपावन सर्वांसी ॥ ३३ ॥
गंडकी यमुना सुरसरी । तापी नर्मदा मत्स्योदरी ।
कृष्ण भीमा गोदावरी । दरितें दुरी ज्याचेनी ॥ ३४ ॥
मत्स्यतीर्थ पक्षीतीर्थ । शिवकांची विष्णुकांचीयुक्त ।
त्रिकोण हस्ति तीर्थभूत । तीर्थ विख्यात कुंभकोण ॥ ३५ ॥
प्रतीची कावेरी ताम्रपर्णीं । कृतमाला पयस्विनी ।
या पंचनद्यांच्या स्नानीं । भगवद्‌भजनी दृढभाव ॥ ३६ ॥
कन्याकुमारी जनार्दन । शेषशायीं अनंत शयन ।
उभय कावेरी श्रीरंगस्थान । परम पावन अगस्त्याश्रम ॥ ३७ ॥
दर्शने मुक्ति चिदंबरीं पाहीं । जन्ममुक्ती कमलालयीं ।
मरणमुक्ति काशीच्या ठायीं । स्मरणें मुक्ति देई अरुणाचळ ॥ ३८ ॥

श्रीरामांचा लोकसंग्रह :

श्रीराम तीर्थां तीर्थभूत । मोक्षा मुक्ति श्रीरघुनाथ ।
तोही तीर्थयात्रा करित । लोकसंग्रहार्थ स्वलीला ॥ ३९ ॥
जे तीर्थीं जे विधान । जे तीर्थीं जे स्नान ।
तैसें करोनि दान सन्मान । सुखी जन श्रीरामें केले ॥ ४० ॥
श्रीरामे सुखी केले महाऋषी । रामे सुखी केले संन्यासी ।
रामें सुखी केले तीर्थवासी । सुखी वनवसी श्रीरामें केले ॥ ४१ ॥
रामे सुखी केले त्यागी । रामें सुखी केले भोगी ।
रामें सुखी केले विरागी । सुख संभोगी श्रीराम ॥ ४२ ॥
रामे सुखी केले ब्रह्मचारी । रामें सुखी केले व्रतधारी ।
रामें सुखी केल्या नरनारी । राम सुखकारी सर्वांसी ॥ ४३ ॥
रामें सुखी केले तपी । रामे< सुखी केले जपी ।
रामें सुखी केले निर्विकल्पी । सुखरूप श्रीराम ॥ ४४ ॥
रामें सुखी केले दिगंबर । रामें सुखी केले वल्कलधर ।
रामें सुखी केले सदाचार । सुख साचार श्रीराम ॥ ४५ ॥
रामें सुखी केले अयाचित । रामें सुखी केले अति विरक्त ।
रामें सुखी केले धर्मासक्त । राम समस्तां सुखकारी ॥ ४६ ॥
रामें सुखी केले अकिंचन । रामें सुखी केले अति दीन ।
रामें सुखी केले अज्ञान । राम सकळसुजनसुखकारी ॥ ४७ ॥
रामें सुखी केले कापडी । रामें सुखी केली बापुडीं ।
रामें सुखी केली साबडीं । सुखाची कुळवाडी श्रीराम ॥ ४८ ॥
रामें सुखी केले सेवक । रामें सुखी केले केवळ रंक ।
रामें सुखी केले लोक । जे भावें सन्मुख भेटों आले ॥ ४९ ॥
रामें सुखी केले विवेकी । रामें सुखी केले एकाकी ।
रामें सुखी केले त्रैलोक्यी । यात्रानुलोकीं स्वलीला ॥ ५० ॥
यात्रा विधियुक्तप्रकारें । स्वलीला रघुवीरें ।
नाना जनां दानप्रकारें । चहू समुद्रीं सुखी केले ॥ ५१ ॥
द्वारका पश्चिम समुद्र । जगन्नाथ पूर्वसमुद्र ।
मानससरोवर उत्तर समुद्र । दक्षिणसमुद्र श्रीसेतुबंध ॥ ५२ ॥
यापरि समुद्र वलयांकित । तीर्थें करोनियां समस्त ।
अयोध्ये आला रघुनाथ । सुमुहूर्तें स्वानंदें ॥ ५३ ॥
नगर शृंगारिले नृपवरें । गुढिया तोरणें मखरें ।
गगन गर्जें जयजयकारें । आणिला गजरें रघुनाथ ॥ ५४ ॥
भाट गर्जती गहिरावचनीं । पुढें नाचती नाचणी ।
कीर्ति वर्णिजे बंदिजनीं । अयोध्याभुवनीं उल्लास ॥ ५५ ॥
पदोपदीं ओंवाळणी । पदोंपदी सुवासिनी ।
पदोंपदी अक्षयवाणी । मंत्रध्वनी स्वरयुक्त ॥ ५६ ॥
वसिष्ठासी घातलें लोटांगण । दशरथा साष्टांग नमन ।
चौघांसी दिधले आलिंगन । परम समाधान रायासी ॥ ५७ ॥
अभिवंदिल्या तिघी माता । हर्ष दशरथाचे चित्ता ।
उत्संगी बैसविले रघुनाथा । सुख समस्तां अपार ॥ ५८ ॥
चौघां करविले मंगळस्नान । दिव्यांबरे परिधान ।
दिव्यालंकार चंदन । सुमनीं सुमन शृंगारिले ॥ ५९ ॥
वसिष्ठवचन प्रमाण । केले व्रतविसर्जन ।
द्विजां दिधले भोजन । दानसन्मानसमारंभें ॥ ६० ॥
यापरी तीर्थाभिगमन । करूनि आला रघुनंदन ।
येथोनि वैराग्य पूर्ण । श्रीराम आपण विन्यासें दावी ॥ ६१ ॥
येथोनि कथा मनोहर । गुह्य ज्ञानें ज्ञानगंभीर ।
स्वयें निरूपील रघुवीर । वैराग्यविचार मुमुक्षुहेतु ॥ ६२ ॥
मुमुक्षु तारावया संसार । दावी वैराग्य निजसार ।
धर्मलक्षणीं अवतार । सत्य साचार श्रीराम ॥ ६३ ॥
एका जनार्दनीं एक । कवीश्वराचें अति रंक ।
त्या मूर्खाचेनि मुखें देख । कथा अलोलिक श्रीराम वदवी ॥ ६४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
श्रीरामतीर्थयात्रागमनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
॥ ओंव्या ६४ ॥

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.