Jump to content

भावार्थ रामायण/बालकाण्ड/अध्याय ६

विकिस्रोत कडून
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय सहावा ॥
श्रीरामजन्मप्रसंग

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामाचा जन्मकाळ :

श्रीरामाचा जन्मप्रभाव । अजन्मा जन्मेल रामराव ।
पाहूं आला सुरनरसमुदाव । तो नवलाव पाहूं आले ॥ १ ॥
प्रसूतिसमय कौसल्येसी । तंव अयोध्येच्या चौपासीं ।
विमानें दाटलीं आकाशीं । विबुध वेगेंसी पैं आले ॥ २ ॥
सूर्यवंशा येईल रघुनाथ । यालागीं मध्यान्हीं आला आदित्य ।
लग्नीं साधिला अभिजित । जन्ममुहूर्त राघवा ॥ ३ ॥
वक्री अतिचर होऊन । वेगीं चालोनि आपण ।
केंद्री आणि उच्चस्थान । तेथे ग्रहगण स्वयें आले ॥ ४ ॥
शुद्धसुमनीं वसंत ऋतु । मधुमास अति विख्यातु ।
शुक्ल पक्ष नवमी आंतु । जन्म रघुनाथ पावला ॥ ५ ॥

सुखरूप प्रसूती व श्रीरामांचे प्रकटन :

श्रीराम स्वयें अयोनी । तो स्पर्शना नाहीं जन्मयोनी ।
कौसल्या सन्मुख देखे नयनीं । आश्चर्य मनीं विस्मित ॥ ६ ॥
नाहीं लागली वेण उद्‌भट । नाहीं दुखिंनलें गर्भपोट ।
स्वयं राम जाला प्रकट । अति उद्‌भट निजतेज ॥ ७ ॥
स्वप्रकाशें स्वलीला । निजतेजें अति सोज्वळा ।
घवघवित घनसावळां । दें डोळां कौसल्या ॥ ८ ॥
जेणें निजतेज विलासे । मीतूपणाचा ठावचि पुसे ।
जग आत्मत्वें प्रकाशे । सोहळा उल्लासे परमानंदे ॥ ९ ॥
ज्या तेजाचे निजनिर्धारें । अहं सोहं समूळ विरे ।
त्रैलोक्य ब्रह्म्त्वें अवतरे । सर्वांगी भरे स्वानंद ॥ १० ॥
ज्या तेजाचे निजनिष्ठे । विषयांचें विषयत्व आटे ।
बंधमिक्षाचे बिरडें फिटे । स्वयं कोंदाटे परब्रह्म ॥ ११ ॥
ज्या तेजाचिये दीप्ती । रवि चंदू हे स्वयें हरपती ।
ते तेज प्रकाशे ब्रह्मस्फूर्ती । निर्विषयस्थिती सुख कोंदे ॥ १२ ॥
देखे ठकराचें निजठाण । दों हातीं धनुष्यबाण ।
करावया राक्षसनिर्दळण । ओढी काढोनि विन्यांसें ॥ १४ ॥
करावया बंदिमोचन । सुरनरग्रहां अभयदान ।
अभयहस्तें संपूर्ण । विराजमान रघुवीर ॥ १५ ॥
करितां रामनामस्मरण । जीवांस करावया ब्रह्मपूर्ण ।
स्वयें कृपाळू आपण । वरदहस्तें पूर्ण आश्वासीत ॥ १६ ॥

सामुद्रिक चिन्हें :

चरणांतरी आरक्त शोभा । लोपित बाळसूर्याचा प्रभा ।
जगातें भुलवी जगदंबा । तेही चरणरंगा भूलली ॥ १७ ॥
माया अतर्क्य सर्वांसी । वेदशास्त्रीं प्रसिद्धी ऐसी ।
तीही भुलली चरनांसी । जाली दासी सर्वदा ॥ १८ ॥
सनकादिक आणि विरक्त । तेही चरणारविंदी आसक्त ।
भ्रमर होवोनियां संतत । आमोद घेत स्वानंदें ॥ १९ ॥
चरणांचिया सामुद्रिका । न वर्णवे वेदेंशेषादिकां ।
ध्वजवज्रांकुश ऊर्ध्व रेखा । पायीं पद्म देखा यवांकित ॥ २० ॥
चरणांतळी आरक्त शोभा । बरवंटी शुद्ध श्याम प्रभा ।
। इंद्रधनुष्य मिरवे नभा । तैसी शोभा शोभत ॥ २१ ॥
उपासका यंत्र पूर्ण । तैसी घोंटी पैं त्रिकोण ।
दोहीं पायी नीळवर्ण । विरामजामन् शोभती ॥ २२ ॥
यंत्रपीठीं वर्ण प्रबळा । तैशा पोटरिया सकळा ।
अक्षररूपें त्या निसळा । अति निर्मळा सकुमारा ॥ २३ ॥
जानुचक्रें अति वर्तुळ । जैसे आरसे निज निर्मळ ।
निजात्मरूप सकळ । तेथें तत्काळ प्रतिविंब ॥ २४ ॥
कर्दळीस्तंभाचे शुद्ध सार । त्याहूनि मांडिया सुकुमार ।
लागतां खुपती चंद्रकर । ऐसें अरुवार जघनद्वय ॥ २५ ॥
श्रुति आणि स्मृति । दोहीं पायीं वांकी गर्जती ।
अंदुवा जाण निश्चिती । उपवेद स्थितिविभागें ॥ २६ ॥
वेदांत शुद्ध शास्त्र थोर । चरणीं गर्जती तोडर ।
धन्य दैत्यांचे शरीरभार । चरणीं निरंतर रुळती तोडरी ॥ २७ ॥
जगाचें गुह्य श्रीराम पूर्ण । त्या गुह्याचें गुह्य लक्षण ।
तेथें पावों शके कोण । तें सुख संपूर्ण जानकी भोगी ॥ २८ ॥
स्वयें अछिद्रत्वें मनोहर । आणि पुढिलांचे आच्छादी छिद्र ।
तोचि कांसेसीं पीतांबर । तेजें दुर्धर देदीप्यमान ॥ २९ ॥
पीतांबर श्रीराम कांसेसीं । लागला निजभावेसी ।
तेणेचि तो अनायासीं । गुह्यगुह्यासीं पावला ॥ ३० ॥
नाभी सोल अतिशयेसीं । सहस्राब्द बुडतां ब्रह्मासीं ।
ठावो न निघे रयासी । होवोनि कासाविसी वरता आला ॥ ३१ ॥
तेव्हां श्रीरामें आश्वासोनी । बैसविला कमळासनीं ।
त्यासी चतुःश्लोकी उपदेशूनी । श्रेष्ठ करोनि स्थापिला ॥ ३२ ॥
तें श्रीरामाचें नाभिस्थान । बैसला देखे कमळासन ।
त्याचे हृदयीचें महिमान । बोलतां मौन श्रुतिशास्त्रां ॥ ३३ ॥
ज्याचे हृदयचिदाकाशीं । आकाश हरपे स्वकार्येंसी ।
सिद्ध पावले त्या ठायासी । चिदंशासी एकत्वें ॥ ३४ ॥
तेथें अनन्यत्वें मुनिजन । जडोनि जाले अभिन्न ।
तेअंचि हृदयीं पदक पूर्ण । गुणेंवीण ल्यालासे ॥ ३५ ॥
सूक्ष्म माजाची जी अति थोरी । अभिमान होता केसरीं ।
देखोनि राममध्यकुसरीं । लाजें रामभरी ते जाले ॥ ३६ ॥
पहावया श्रीराममध्यरचना । अभिमानत्याग पंचानना ।
मेखळा अंगवूनि अंगवणा । मध्यभागीं जाणा चित्रत्वें जडले ॥ ३७ ॥
जो अपरंपार अनंत । त्यास अनुभवी आकळित ।
तेवी मेखळेमाजि रघुनाथ । दिसे समस्त आकळिला ॥ ३८ ॥
जालिया निजवस्तुप्राप्ती । सकळ वृत्ति उपशमती ।
तेवीं क्षुद्रघंटिकांची पंक्ती । जे मेखळेप्रती अधिमुख ॥ ३९ ॥
नाना मतांचा जितमेळा । त्याची किंकिणी ज्वाळमाळा ।
यापरी विचित्र लीळा । कटीं मेखळा शोभत ॥ ४० ॥
पीतांबराचे उभय भाग । दोन्ही भांगी मुक्तलग ।
तेणें अंगाचा फिटला पांग । अंगींच अव्यंग निजांगशोभा ॥ ४१ ॥
ज्याचें पाहतां वक्षस्थळ । सबाह्य भरित समूळ ।
तेथें वसती विजनशीळ । जन वन सकळ समसाम्य ॥ ४२ ॥
पाहतां ज्याचा कंबुकंथ । वेदांची ते वाहती वाट ।
तेथोनियां होती प्रकट । स्वरवर्ण वरिष्ठ मर्यादा ॥ ४३ ॥
ॐकारामाजी वर्णव्यक्ती । तेवीं मुखामाजीं दंतपंक्ती ।
चौकीचे चारी मिरवती । चिदानंददीप्ती सोलींव ॥ ४४ ॥
जीव शिव विभाग जनीं । तैसे देखा अधर दोनी ।
ऐक्या आले श्रीराम वदनीं । मिनले मिळणीं एकत्वें ॥ ४५ ॥
निवटोनियां नास्तिक्य । अवक्र जें का आस्तिक्य ।
तेंचि श्रीरामचे नासिक । शोभेचे बिक शोभवी ॥ ४६ ॥
चालता जितुका वाय जाण । तोचि श्रीरामाचा मुख्य प्राण ।
तेंचि वेदाचें जन्मस्थान । त्रिकांड पूर्ण प्रतापें ॥ ४७ ॥
चैतन्याचे देखणेपण । त्याच्या डोळां आले शरण ।
देखणें देखे देखणा होऊन । देखणेपण सबाह्य ॥ ४८ ॥
स्वानंदे निडारली दृष्टी । चिनात्रैक देखे सृष्टी ।
देखणेपणा आणिली पुष्टी । दृश्य पाठी पोटी द्रष्टाच देखे ॥ ४९ ॥
दीपामागें पडसाई । तैशा डोळ्यांमागें भोवई ।
व्यंकटी सांडोनिया पाहीं । श्रीरामदेही विनटल्या ॥ ५० ॥
जयाची विक्षेपभ्रुकुटी । रची ब्रह्मांडाच्या कोटी ।
तेथेंचि राहे व्यंकटी । अगाध दृष्टो श्रीरामाचा ॥ ५१ ॥
पूर्व उत्तर मीमांसा पूर्ण । तेंचि मुख्य श्रीरामश्रवण ।
श्वरणें श्वरणाचें भूषण । जें निज मंडण वेदांता ॥ ५२ ॥
कुंडलें म्हणती साकार । एक म्हणती मकराकार ।
परी ते सत्यत्वें निर्विकार । श्रवणें विकार नासती ॥ ५३ ॥
श्रवणासी संपूर्ण । सावधानता निजभूषण ।
सावधानतेवीण जाण । भूषण तें दूषण श्रवणासी ॥ ५४ ॥
श्रीरामाचें निजश्रवण । वेदशस्त्रांसी निज भूषण ।
तेथे रिघों न शके दूषण । पावना पावन श्रीराम ॥ ५५ ॥
जैसें अधिष्ठान निर्मळ । तैसे देखा विशाळ भाळ ।
ज्याच्या कपाळावी वेळ सर सकळ वांछित ॥ ५६ ॥
उगाळोनि अहंपण । सोहं काढिलें शुद्ध चंदन ।
तेंही केले रामार्पण । चंदनाचर्चन लल्लाटी ॥ ५७ ॥
आधींच तो घनसावळां । वरी टिळक रेखिला पिंवळा ।
शोभा शोभली कपाळा । सुरांसकळां स्वानंद ॥ ५८ ॥
सच्चिदानंद एकमेळीं । तैसी लल्लाटींची त्रिगुण त्रिवळी ।
बोधचंदनाचे परिमळीं । पूजिला निर्मळीं निजसज्जनीं ॥ ५९ ॥
वानूं मुकुटाची महिमा । कैंची उपमा निरुपमा ।
मुकुटमणींची गरिमा । नेणे ब्रह्मा आकळूं तो ॥ ६० ॥
राम मिरवी लेवूनिइ लेणें । तो श्रीराम लेणियांचे लेणें ।
जेवीं सोन सरे सोनटकेपणें । कीं सोनटका सोनेपणें सर्वत्र असे ॥ ६१ ॥
लेणें मिरवे सगुणपण । निर्गुण भूषणाहि भूषण ।
मुळीं निर्गुणे शोभे सगुण । जेवीं लेणें सुवर्ण एकत्वें ॥ ६२ ॥
ऐसिया श्रीरामाच्या पोटीं । रामरूप देखें सृष्टी ।
सृष्टी सबाह्य संपुटी । देखे सृष्टी श्रीराम्ं ॥ ६३ ॥
ऐसिया देखोनि श्रीरामा । कौसल्येसी आला प्रेमा ।
त्या सुखाच्या सुखसंभ्रमा । देहधर्मा विसरली ॥ ६४ ॥
अंग सर्वांगीं रोमांचित । स्वेदबिंदू रवरवीत ।
चित्त चैतन्यीं विरमत । नेत्रीं स्रवत आनंदाश्रू ॥ ६५ ॥
स्वानंद न समाये पोटीं । सुखोर्मि बाष्प दाटे कंठीं ।
उन्मीलित जाली दृष्टी । पडली सृष्टी मूर्छित ॥ ६६ ॥
जेंवि केळीतें झगटे पवन । तैसें शरीर कंपायमान ।
वाचेसी पडिले महामौन । देहाभिमान विसरली ॥ ६७ ॥
सत्वगुणाचें भरितें भरे । तें आपोआप ओसरे ।
होवोनि सावध चमत्कारें । रामनिर्धारें निर्धारीं ॥ ६८ ॥

कौसल्येची विनंती व श्रीरामाचे बालस्वरूप :

येणें स्वरूपें रघुनाथा । तुज येथें प्रगट होतां ।
माझा पुत्र तूं हे कथा । लोकीं सर्वथा मानेना ॥ ६९ ॥
होईन कौसल्येचा नंदन । तें आठवीं पूर्ववचन ।
ऐकोनि हांसे रघुनंदन । चमत्कारें पूर्ण तुष्टला ॥ ७० ॥
वचन ऐकोनि तत्काळ । श्रीराम स्वयें जाला बाळ ।
बालार्कप्रभा सुनीळ । सुखकल्लोळ जननयनां ॥ ७१ ॥
भक्त माझें ऐश्वर्यें वोसंडी । परी चरणामृतीं पडे उडी ।
तेथें कैसी आहे गोडी । ते आवडी चाखों गेला ॥ ७२ ॥
चरणकमळींचा अंगुष्ठ । करकमळीं धरोनि स्पष्ट ।
मुखकमळीं करितां प्रविष्ट । गोडी उद्‌भट लागली ॥ ७३ ॥
आपुली आपणियां गोडी । स्वभावें फावली धडफुडी ।
तोंडींचा अंगुष्ठ न काढी । चोखी वाफ़डी चुरदुरां ॥ ७४ ॥
माझ्या स्वरूपाची गोडी । भक्तीं भोगिली धडफुडी ।
चरणामृतीं सुखाच्या कोडी । चोखी आवडी अंगुष्ठ ॥ ७५ ॥
तेंचि लक्षण बालकाचे ठायीं । अद्यापि भासतसे पाहीं ।
निजांगुष्ठ मुखाचे ठायीं । चोखी लवलाही स्वानंदें ॥ ७६ ॥

सार्वत्रिक आनंद व श्रीरामांचे जातक :

यापरी रघुनंदना । देखोनि बाळभावना ।
कौसल्येसी आला पान्हा । जीवीं निंबलोणा करूं पाहे ॥ ७७ ॥
सुरीं दुंदुभी त्राहाटिल्या भेरी । देव गर्जती जयजयकारी ।
वर्षती सुमनांच्या हारी । चराचरी आल्हाद ॥ ७८ ॥
आनंदाचे लवडसवडीं । नारदाची पडे उडी ।
सनकादिकांची आडाडी । स्वानंदें तांतडी नाचती ॥ ७९ ॥
सिद्ध आले श्रेष्ठ श्रेष्ठ । ऋषी आले झडझडाट ।
वेद होवोनियां भाट । अति उद्‍भट वानिती ॥ ८० ॥
योगी संन्यासी घनदाट । पुण्यकाळाचे दाटले थाट ।
तीर्थासी तेथें न फुटे वाट । तिहीं शरयूतट वसविलें ॥ ८१ ॥
अयोध्येच्या हाटविदी । स्वये झाडिती महासिद्धी ।
रंगमाळा घालिती सिद्धी । गुढिया समाधी स्वानंदें उभविल्या ॥ ८२ ॥
महासामें सुरस गाणीं । चारी मुक्ति त्या नाचणी ।
साही शास्त्रांची पेंखणी । शब्दश्रेणी स्वपक्षें ॥ ८३ ॥
धर्माची पहिली पहाट । स्वानंदाची मोकळी वाट ।
सुखाची पिकली पेंठ । समयो श्रेष्ठ साधूनी ॥ ८४ ॥
कौसल्येसी पुत्र जाला । स्वधर्में वाधावा आणिला ।
राजा हर्षें निर्भर जाहला । वोसंडला स्वानंदें ॥ ८५ ॥
त्राहाटिल्या निशाण भेरी । गगन गर्हे मंगळतुरीं ।
त्रैलोक्य गर्जे जयजयकारी । घरोघरीं उल्लासु ॥ ८६ ॥
मंगळजळीं निजनिवाडें । राजा स्नान करी वाडेंकोडे ।
तो शिंतोडा लागे जिकडे तिकडे । पूर्वज तिकडे सुखरूप होती ॥ ८७ ॥
पूर्वज स्वयें सुखी होती । हेंचि आश्चर्य सांतों किती ।
तेणें जळे त्रिजगती । उल्लासती स्वानंदे ॥ ८८ ॥
पुत्रानंदे उदार दृष्टी । सवत्स गोधनांच्या थाटी ।
अश्व रथ गज धन कोटी । वांटित्आ सृष्टी मागता सरे ॥ ८९ ॥
जन्म पावला रघुनाथ । उदार दानें दे दशरथ ।
मागते मागणें हरपत । होवोनि कृतार्थ मागणें विसरे ॥ ९० ॥
दशरथ म्हणे ये समयीं । जो जें मागेल ते देईन पाहीं ।
तंव मागतेचि जाले नाहीं । याचकां देहीं संतृप्ति ॥ ९१ ॥
ऐसे श्रीरामपुत्र मुख । देखता रायासी परम हरिख ।
द्विज निर्भर केले देख । तृप्त याचक अति दानें ॥ ९२ ॥
श्रीरामाचे जातक । दशरथ करी अलोलिक ।
तंव द्वितीय पुत्राचा हरिख । सद्‌भावें देख आणिली गुढी ॥ ९३ ॥

सुमित्रेची प्रसूती व जन्मोत्सव :

सुमित्रा देखे स्वप्न । मज झालें पुत्ररत्‍न ।
जागृतीं पाहे सावधान । तंव पुत्र निधान सेजेसीं ॥ ९४ ॥
क्षीरसागरींहूनि निघाला । राम कौसल्यागर्भा आला ।
पाथीचा शेष पाठीं पावला । पाठीचा झाला सुमित्र ॥ ९५ ॥
श्रीरामासी सुष्ठु मैत्री । चालवील निजनिर्धारीं ।
सुमित्र म्हणणें यापती । सुमित्राउदरीं जन्मला ॥ ९६ ॥
कौसल्येसी सुष्ठु मित्रा । चालवी यालागीं सुमित्रा ।
हाही आला तिच्या उदरा । सुमित्र खरा येणेंही ॥ ९७ ॥
लक्ष्मण शेषावतार । अयोनि जन्मला निर्धार ।
तोही नातळे योनिद्वार । जन्मव्यवहार स्वलीला ॥ ९८ ॥
तें देखोनि पुत्रवदन । अष्टांगीं पावली समाधान ।
मन जालें आनंदघन । सुमित्रा संपूर्ण सुखरूप जाली ॥ ९९ ॥ ॥
यावरी आनंद चढोवढीं । हर्षाचिया लवडसवडीं ।
सद्‌भावें उभविली गुढी । रायासी आवडी पुत्रसुख सांगे ॥ १०० ॥
द्वितीय पुत्राचा प्रभाव । ऐकोनि सुखें सुखावे राव ।
घेवोनियां ऋषिसमुदाव । जातकार्था पाहों स्वानंदे आला ॥ १ ॥
फोडिलीं धनाचीं भांडारें । मुक्त केलीं धान्यकोठारें ।
त्यागिली गाईंचीं खिल्लारें । लुलु दानभारें मूर्छित जाली ॥ २ ॥
याञ्चा बुडाली दानसमुद्रीं । दरिद्र बुडालें दातृत्वपूरीं ।
माग त्यांचा दुष्काळ नगरीं । घरोघरी आनंद ॥ ३ ॥

कैकेयीस पुत्रप्राप्ती :

कैकेयी पुत्रवंती दो पुत्रीं । तिची प्रसूतीची थोरी ।
अतिशयेंसीं नवलपरी । निजनिर्धारीं अवधारा ॥ ४ ॥
कैकेयीसीं लागली सुषुप्ती । पुत्र जन्मले कैशा रीती ।
त्या पुत्रजन्माचे एख्याती । तिसीं तें स्थिती अलक्ष ॥ ५ ॥
एक श्रीरामाचा भाग । एक लक्ष्मणाचा विभाग ।
दोन्ही लीलाविग्रही सांग । योनीचें अंग नातळती ॥ ६ ॥
सख्या प्रबोधिती कैकेयीसी । दोघे पुत्र जन्मले कुशी ।
तुझी झोंप ऐसी कैसी । पुत्रसुखासी अनोळख ॥ ७ ॥
कैकेयी पाहे पुत्रमुख । हृदयीं वोसंडेना हरिख ।
सापत्‍नभावाचें सुख । लोकदृष्टी देख पावती जाली ॥ ८ ॥
पूर्ण कळवळा नाही मना । स्वानंदस्नेह नयेचि पान्हा ।
दाईच्यापरी स्तनपाना । लाविले स्तना पुत्र दोनी ॥ ९ ॥
सपिंडगर्भ तिचा नव्हे । परभाग गर्भें सापत्‍नमाये ।
तिचे स्तनपान पाहें स्वभावें दाही हे जाली ॥ ११० ॥
पुढें सहजचि सापत्‍न । पुत्र नायकती तिचें वचन ।
पुत्रांचे निजसमाधान । कैकेयी जाण पावेना ॥ ११ ॥
कैकेयीची गर्ब्घस्थिती । पुत्रद्वयाची उत्पत्ति ।
यापरि जाली प्रसूती । वाधावा रायाप्रति धाडिला तिणें ॥ १२ ॥
स्नेहाचिया लवडसवडी । सकामकामाचिया आवडी ।
पुत्रद्वयाची गर्वगोडी । कैकेयी धाडी रायापासी ॥ १३ ॥
पुत्रद्वयाचें प्रिय जन्म । तेणें रायासी सुख परम ।
उदार हस्तें करोनि धर्म । जातककर्म तेणें केले ॥ १४ ॥

पुत्रचतुष्टयाची दशरथाला प्राप्ती :

जेंवि कां चारी पुरुषार्थ । एके काळें घरा येत ।
तेंवि चारी पुत्र दशरथ । जाले प्राप्त समकाळें ॥ १५ ॥
चहूं मुक्तींचे सुख एक । तेचि चतुर्विध होवोनि देख ।
दशरथासी द्यावया सुख । चारी अलौलिक पुत्र जन्मल ॥ १६ ॥
सच्चिदानंद तिन्ही जाण । तिहींचे प्रकाशक वस्तु चिद्वन ।
तेंवि चारी पुत्र परिपूर्ण । आवला आपण स्वयें राव ॥ १७ ॥
प्रणव तेचि वेद चारी । तेवी एक वस्तु चौं प्रकारीं ।
पुत्रत्वें दशरथाचे घरीं । सुखकारी सर्वांसी ॥ १८ ॥
एक सुख नित्य निश्चिती । त्यासी बहुविध चतुष्ट्य म्हणती ।
तेचि हे चारी मूर्ति । पुत्र सुखार्थी दशरथ ॥ १९ ॥
जो सकळ जगाचा निज विश्राम । सकळ सुखाचा आराम ।
जो निष्कामाचा पूर्णकाम । तो श्रीराम दशरथात्मज ॥ १२० ॥
सकळ लक्ष्यां आलक्षण । जो सकळ लक्षणीं संपूर्ण ।
तोचि तो लक्ष्मण जाण । सुमित्रानंदन दशरथात्मज ॥ २१ ॥
ज्याने सकळही पदार्थ । सदासर्वदा संपूर्ण भरित ।
ते वस्तूसी म्हणती भरत । कैकेयीसुत दशरथात्मन ॥ २२ ॥
मनुष्य शत्रूचें हनन । त्करी तो अल्प शत्रुघ्न ।
भवशत्रूचे निर्दळण । करी तो शत्रुघ्न दशरथात्मज ॥ २३ ॥
कनिष्ठ कैकयीचे नंदन । त्यांचे नाम भरत शत्रुघ्न ।
वसिष्ठें केले नामाभिधान । चौघे जण दाशरथि ॥ २४ ॥

चारही पुत्रांचे नामकरण :

श्रीवसिष्ठें आवश्यक । केले चौघांचे जातक ।
जन्मपत्रिका केली देख । नामनिर्दोष जगद्वंद्य ॥ २५ ॥
यापरि श्रीराम आणि लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न ।
चौघे दशरथनंदन । नामाभिधान जगद्वंद्य ॥ २६ ॥
यापरी श्रीरामाचें जन्म । सांगितला अनुक्रम ।
निरूपिले जन्मकर्म । चरित्रानुक्रम अवधारा ॥ २७ ॥
येथोनि श्रीरामाचे चरित्र । अगाध अनुपम्य पवित्र ।
धन्य वाल्मीकीचें वक्त्र । कथा पवित्र शतकोटी ॥ २८ ॥
एका जनार्दना शरण । पूर्ण जालें जन्मकथन ।
पुढें स्वानंदनिरूपण । श्रोती अवधान मज द्यावें ॥ १२९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
श्रीरामजन्मप्रसंगनिरूपणं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
॥ ओंव्या १२९ ॥

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.