Jump to content

भावार्थ रामायण/बालकाण्ड/अध्याय २६

विकिस्रोत कडून
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥


॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय सव्विसावा ॥

श्रीरामपरशुरामएकात्मबोध निरूपणं

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लग्नाचे वर्‍हाड अयोध्येकडे निघाले :

चौधी बहिणींसहित जाण । जालें जानकीपाणिग्रहण ।
जनकें केली बोळवण । सुख संपूर्ण दशरथासी ॥ १ ॥
चौघे पुत्र चौघी सुना । कीर्ति न समाये त्रिभुवना ।
येव्हढे आल्हादें जाणा । अयोध्याभुवना निघाला ॥ २ ॥
संनद्ध केलिया दळभार । महामदें गर्जती कुंजर ।
घंटाकिंकिणीं सालंकार । पताकीं अंबर शोभत ॥ ३ ॥
घोदे नाचविती वीर । जी जी मा मा थीर थीर ।
तीपायीं असिवार । अति अरुवार नाचती ॥ ४ ॥
अढाऊ झेली साबळधर । कोयतेतकार धनुर्धर ।
चालती पायांचे मोगर । अलगाइत बाणाइत ॥ ५ ॥
वोढणिये थैकार देत । जेठिये तळपत चमकत ।
ऐसें सैन्य पुढें चालत । भाट गर्जत कैवारें ॥ ६ ॥
राजे मुकुटाचे वरिष्ठ । पाठीसीं चाले घनदाट ।
अतिरथी घडघडाट । सुख उद्भसट दशरथा ॥ ७ ॥

मार्गांतील अपशकुनांमुले राजा साशंक :

राजा वसिष्ठ सकळ जन । समानरथीं समसमान ।
चालती सुखसंपन्न । तो पुढें अपशकुन देखती ॥ ८ ॥
सव्य जाताति पैं तास । अपसव्य जाती वायस ।
मयूरें गाळिती पीस । सर्प मुंगुस भांडती ॥ ९ ॥
भालुवा भुंकिती सन्मुख । पक्षी करकरिती अग्निमुख ।
युद्ध होईल अचुक । थोर धुकधुक रायासी ॥ १० ॥
श्रीराम शकुन अपशकुन । दोनी देखे समसमान ।
नाहीं भय कंपायमान । नित्य सावधान निर्भयत्वें ॥ ११ ॥
राजा सांगे वसिष्ठासी । अपशकुन कां होती आम्हांसी ।
दिशा धुमधुमित चौपासीं । शशिसूर्यांसी प्रभा मंद ॥ १२ ॥
दिवसा ग्रहगण गगनस्थ । एक पूर्वे एक पश्चिमे जात ।
रवि चंद्र परिघ करित । अति उत्पातदायक ॥ १३ ॥
सन्मुख गगनाचे पोटीं । अंधकारलिया दिठी ।
वसिष्ठा तूं मर्मज्ञ दृष्टी । हे यथार्थ गोष्टी सांग मज ॥ १४ ॥

वसिष्ठांचे दशरथाला आश्वासन :

राया जीं जीं चिन्हे दिसती । तेणें दुसतर विघ्नप्राप्ती ।
परी आम्हांसवे चालती शांती । विघ्नें आम्हांप्रती विमुख ॥ १५ ॥
अपशकुन पूर्वे जात्यासी । शकुन पश्चिमेच्यासी ।
तेंवी भूतीं भगवद्धाव ज्यासी । विघ्नें त्यासी निजविजयो ॥ १६ ॥
येरवीं विघ्नांचें सूचक । युद्ध होईल ठाकठोक ।
विजयी होईल रघुकुळटिळक । हें आवश्यक निजभावीं ॥ १७ ॥
रामनामाच्या नामोक्तीं । विघ्नें चरणां शरण येती ।
तो श्रीराम असतां सांगाती । विघांची प्राप्ती निजविजयो ॥ १८ ॥

प्रचंड वावटळीतून परशुराम येतात :

ऐसे दोघे बोलत बोली । तं उठली वाहुटळी ।
नभ व्यापिलें धुळीं । संज्ञा मोडली सैन्याची ॥ १९ ॥
लागतां त्या वायूची झडप । सप्त सागर सप्त द्वीप ।
तेणेंसी पृथ्वी सकंप । सुटे चळकांप मेरूसी ॥ २० ॥
त्यामाजी उठली विकट हाक । सैन्य मूर्छित पडे निःशेष ।
दशरथें घेतला धाक । राम निःशंक निजनिधडा ॥ २१ ॥
विद्युत्प्राय जटा शिरीं । सतेज परशु खांद्यावरी ।
धनुष्यबाण घेवोनि करीं श्रीरामावरी चालिला ॥ २२ ॥

वसिष्ठांकडून स्वागत, दशरथ भयभीत, त्याची परशुरामास प्रार्थना :

परशुरामातें देखून । वसिष्ठें केले पूजन ।
तें पूजा भार्गवें अंगीकारून । चालिला आपण श्रीरामावरी ॥ २३ ॥
अत्यंत पराक्रम देखोन । दशरथ जाला कंपायमान ।
घालोनियां लोटांगण । दीनदानव बोलत ॥ २४ ॥
परशुरामा तुझी थोरी । तीन सप्तकें पृथ्वी निःक्षत्री ।
करून दिधली द्विजकरीं । शस्त्र त्वां करीं संन्यासिलें ॥ २५ ॥
तू क्षत्रियांचा कर्दनकाळ । हें तुझिया ब्रीदाचे शीळ ।
श्रीराम माझें केवळ बाळ । त्यावरी प्रबळ क्रोध न करी ॥ २६ ॥
श्रीरामातें मारिसी । तेचि मरण आम्हां सर्वांसी ।
येव्हढे करावया कदनासी । उचित तुम्हांसी नव्हे स्वामी ॥ २७ ॥
मी पुत्रार्थीं अति दीन । पुत्रभयें अति कृपण ।
मज द्यावें पुत्रदान । घाली लोटांगण नृपनाथ ॥ २८ ॥

परशुरामाचे श्रीरामांना आव्हान व दोघांचा संग्राम :

ऐसें दशरथभाषित । तें उपेक्षोनियां समस्त ।
जेथें होता रघुनाथ । भार्गव तेथें स्वयें आला ॥ २९ ॥
रामा श्रीरामा झुंजारी । श्रीराम रामाते निवारी ।
रामा श्रीरामा प्रीति पुरी । ऐक्य करी निजबोध ॥ ३० ॥
त्या दोघांचा निजसंग्राम । सुरवरवीरां अति दुर्गम ।
युद्धीं पावोनि निजवर्म । उपरभ निजबोधें ॥ ३१ ॥
देखोनियां रघुनंदन । भार्गव सोडी दारुण बाण ।
श्रीरामें सांडिलें तोडून । क्रोधें परिपूर्ण जामदाग्न्या ॥ ३२ ॥
परशुराम सोडी दिव्यास्त्रें । श्रीराम निवारी क्षणमात्रें ।
कोपें सोडिलीं निर्वाणशस्त्रें । तींही रघुवीरें निवारिलीं ॥ ३३ ॥
रेणुका दिधल्या भार्गवहातीं । दोनी आपुल्या निजात्मशक्ती ।
सकळ शस्त्रास्त्राम्च्या अंतीं । त्या निर्वाणार्थीं सोडाव्या ॥ ३४ ॥
त्या काळी कराळी उभय शक्ती । जाणोनि राहिल्या रामाप्रती ।
तिहीं ओवाळून रघुपती । श्रीरामभात्याप्रती प्रवेशल्या ॥ ३५ ॥

श्रीरामाच्या सामर्थ्यापुढे परशुराम निष्प्रभ ठरल्यामुळे उद्विग्न :

भार्गव म्हणे नवल आतां । माझ्या शक्ति याव्या माझे हाता ।
त्या प्रवेशल्या श्रीरामभात्या । साह्य रघुनाथा त्या जाल्या ॥ ३६ ॥
माझ्या निर्वाण निजशक्ती । जावोनि राहिल्या श्रीरामाप्रती ।
हें आश्चर्य मानोनि चित्तीं । छळणें वचनोक्ती बोलत ॥ ३७ ॥
जीं जीं शस्त्रें म्यां प्रेरिलीं । तीं तीं स्वयें त्वां निवारिलीं ।
परी आपुली नाहीं सोडिलीं । हे उणीव आली रघुनाथा ॥ ३८ ॥
जाणसी शस्त्रांचे निवारण । परी नेणसी शस्त्रांचे प्रेरन ।
हेंचि तुज उणेपण । शौर्य संपूर्ण तुज नाहीं ॥ ३९ ॥
ऐकोनि परशुराम वचन । श्रीरामें केले नमन ।
ब्राह्मणापुढें उणेपण । सर्वथा जान आम्हांसी ॥ ४० ॥

श्रीराम उवाच -
अयं कठः कुठारस्ते कुरु राम यथोचितम् ।
निहंतुं हंत गोविप्रान् न शूरा राघवा वयम् ॥ १ ॥

’गो-ब्राह्मण क्षत्रिय हे अवध्य’ असे श्रीरामांचे परशुरामास उत्तर :

भार्गवा परशु तुझ्या हाती । म्यां कंथ ओपिलासे तुजप्रती ।
जें करणें असेल तुझे चित्तीं । तें त्वां निश्चितीं करावें ॥ ४१ ॥
गाई ब्राह्मण करावया घात । स्वप्नीं नुपजे मनोरथ ।
त्यांवरी उचली शस्त्रहात । ऐसा सूर्यवंशात शूर नाहीं ॥ ४२ ॥
गाई आणि ब्राह्मणांपुढें । आमुचें शौर्य बापुडें ।
तुझें निवारावया कुर्हामडे । धनुष्यबाण पुढें म्यां धरिले ॥ ४३ ॥

विष्णुचाप सज्ज करण्याचे श्रीरामांना आव्हान :

ऐकोनि श्रीरामाचें वचन । परशुराम हास्यवदन ।
परिसोनि हरचापभंजन । तुज ठाकूनि जाण मी आलों ॥ ४४ ॥
असो युद्धाची अटाटी । सांडिली शत्र धरावयाची गोष्टी ।
विष्णुचाप आहे माझे मुष्टीं । ते तूं जगजेठी सज्जीं पा ॥ ४५ ॥
जरी तूं हें सज्जिसी संपूर्ण । तरी तुवां मज जिंतिलें जाण ।
श्रीराम म्हणे हे भाषण । मज दूषण द्विजविषयीं ॥ ४६ ॥
तूं अगाध ब्राह्मण ब्रअह्मचारी । पितृसेवेची परम थोरी ।
तुझी आज्ञा वंध्य शिरीं । विष्णुचाप करीं करिता जाला ॥ ४७ ॥
श्रीराम म्हणे भार्गवरामा । तुझेनि तीर्थें प्रताप आम्हां ।
तेणें प्रतापें द्विजोत्तमा । धनुर्वर्मा सज्जीन ॥ ४८ ॥
शिवचापापरीस भारी । विष्णुचापाची पैं थोरी ।
श्रीरामें धरोनि करीं । क्षणामाझारीं सज्जिलें ॥ ४९ ॥
भार्गवाचे दृष्टीपुढां । श्रीरामें सज्जिला विष्णुमेढा ।
ठाण मांडोनि निधडा । बाण गाढा जोडिला ॥ ५० ॥
जैसा अंतका अंतक । समूळ कळिकाळा घातक ।
देखोनि भार्गवें घेतला धाक । अलोलिक श्रीराम ॥ ५१ ॥
श्रीरामाच्या प्रतापप्रौढीं । तेजें भार्गवा पडे झांपडी ।
धनुष्य ओढितां कानाडी । चाप कडाडी वैष्णवी ॥ ५२ ॥

श्री रामांचा प्रताप पाहून परशुरामांना त्यांच्या खर्याी स्वरूपाचे ज्ञान :

परशुरामें अति तांतडी । लागवेगें घालोनि उडी ।
श्रीराम धरिला लवडसवडी । चाप न मोडीं वैष्णवी ॥ ५३ ॥
शिवचाप मोडिलें क्षणामाझारी । तैसें विष्णुचापा क करीं ।
तुझ्या पराक्रमाची थोरी । चराचरीं अतुल्य ॥ ५४ ॥
तुझें बळ अति अद्भुरत । कळिकाळ तुझे नित्यांकित ।तूं
अवतार श्रीरघुनाथ । मज निश्चित मानलें ॥ ५५ ॥
मी तुझा करूं आलों छळ । तुजेह् पाहतां स्वभावशीळ ।
माझी निमाला खळबळ । तू केवळ परमात्मा ॥ ५६ ॥
ऐसें वोलोनियां आपण । प्रेमें दिधलें आलिंगन ।
दोघां जाहले समाधान । मुळींची खूण पावोनि ॥ ५७ ॥

परस्परांचे अभिनंदन :

श्रीरामें रामा समाधान । श्रीरामें राम सुखसंपन्न ।
श्रीरामें रामा आमंद पूर्ण । चैतन्यघन श्रीरामें राम ॥ ५८ ॥
श्रीरामें रामा अति आल्हाद । श्रीरामें रामा परमानंद ।
श्रीरामें रामा निजात्मबोध । जाला अभेद रामें रामा ॥ ५९ ॥
मी एक राम दाशरथी । हें नाथवे श्रीरामप्रती ।
मी एक भार्गव भृगुपती । नाठवे चित्तीं परशुरामा ॥ ६० ॥
ऐसें पडिलें आलिंगन । निघोट कोंदलें चैतन्य घन ।
खुंटला बोल तुटलें मौन । जाले परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ६१ ॥
अवतारकृतकार्यार्थ । साधावया श्रीराम सावचित्त ।
भार्गवातें श्रीरघुनाथ । उद्‌बोधित निजबोधें ॥ ६२ ॥
तो जंव होय सावधान । सावध करितां रघुनंदन ।
देखोनि विस्मयसंपूर्ण । शिरोरत्न। श्रीराम ॥ ६३ ॥
कर्मब्रह्मस्थिति समसमान । श्रीराम अवतार शिरोरत्न ।
भार्गवे जाणोनि संपूर्ण । सुखसूपूर्ण श्रीरामें ॥ ६४ ॥

सुसज्ज केलेल्या बाणाचा उपयोग :

श्रीराम म्हणे अमोघ बाण । धनुष्यीं करविला आरोपण ।
तो मागें काढितां नये जाण । कोठें प्रेरण करूं स्वामी ॥ ६५ ॥
ऐसें पुसतां रघुनाथ । परशुराम अति विस्मित ।
बाणाचें लक्ष सावचित्त । विचारितां अनुलक्षी ॥ ६६ ॥
श्रीरामाचा निजशर । अतिशयेंसी अति दुर्धर ।
तेणें निवटीं माझें गत्यंतर । ऐसें परशुराम सांगत ॥ ६७ ॥
श्रीरामाचा निजबाण । जेथें पडे तेथें अक्री कंदन ।
येणें निवटावा माझा अभिमान । गमनागमन मग कैंचें ॥ ६८ ॥
मी तपस्वी अति श्रेष्ठ । तपें जिंकिले लोक वरिष्ठ ।
तें लोकांतराची वाट । करीं सपाट येंएं बाणें ॥ ६९ ॥
मी वीर धीर महाशूर । रणांगमीं अति दुर्धर ।
शत्रुदलनीं एकांगवीर । हाही अहंकार निर्दाळीं ॥ ७० ॥
माझा निवटल्या अहंकार । कैंचें लोकलोकांतर ।
सहजें खुंटलें गत्यंतर । हें करी साचार श्रीरामा ॥ ७१ ॥
जुंझार बाह्य शत्रू संहारी । श्रीराम निवटी अंतरवैरी ।
अहंममता जीवें मारी । धनुर्धारी श्रीराम ॥ ७२ ॥
श्रीरामाचें अनुसंधान । वीरा शूरां न कळे जाण ।
शिव चाप धरी आपण । त्यासी संपूर्ण लक्षेना ॥ ७३ ॥
अहंकारातें छेदिता । आणिक नाहीं रघुनाथा ।
येणें बाणें तूं आतां । अहंममता छेदावी ॥ ७४ ॥
मी अख्यपास पृथ्वी दिधली दान ।तेथें मी वसेन निरभिमान ।
लोकलोकांतर अभिमान । त्याचें छेदन करीं श्रीरामा ॥ ७५ ॥
निरभिमान वसतां क्षितीं । दोष नाहीं गा रघुपती ।
लोकलोकांतरगती । माझी निश्चितीं निर्दाळी ॥ ७६ ॥
ऐसें बोलिला परशुराम । तेंचि करूं पाहे श्रीराम ।
कैसें आश्चर्य केले परम । गत्यंतराचें वर्म श्रीराम छेदी ॥ ७७ ॥
अलक्ष लक्षोनि श्रीरामचंच्रें । बाण जोडोनि निजनिर्धारें ।
अर्धमात्रा अर्धचंद्रशरें । अहं रघुवीरें निवटिलें ॥ ७८ ॥
जेव्हां गुण वाहिला विष्णुचापासी । तेव्हांचि बोळवण अहंकारासी ।
मागुन येईल भार्गवापासीं । तो अर्धमात्रेंसीं निवतिला ॥ ७९ ॥
निवटितांचि अहंकार । कैचें लोकलोकांतर ।
कैचें गतिगत्यंतर । केला स्थिर परशुराम ॥ ८० ॥
यापरी श्रीरामचंद्र । सोडोनियां निजशर ।
सुखी केला परशुधर । स्वर्गादि गत्यंतर खुंटोनी ॥ ८१ ॥
कथांतरीं निरूपण । भार्गवाचें स्वर्गगमन ।
श्रीरामें खुंटिलें आपण । विंधोनी बाण क्षणमात्रें ॥ ८२ ॥
श्रीरामें स्वर्गवाटेसी । काये कूड घातला बाणेंसी ।
कां भिंती घातली चौपासीं । स्वर्गगति खुंटली ॥ ८३ ॥
ऐसियां पाहतां सूक्ष्म गतीं । तेथींची न कळे अंतर्वृत्ती ।
बाह्य लौकिक पंडितयुक्ती । रामें स्वर्गगती खुंटविली ॥ ८४ ॥
बाणे खुंटे स्वर्गगती । हे लौकिक कथावदंती ।
अहं निवटून रघुपतीं । लोकांतरगती खुंटविली ॥ ८५ ॥
ज्यासी अनुलक्षी रामचंद्र । त्याचा गळे अहंकार ।
सहजें खुंटे गत्यंतर । यापरी रघुवीर स्वर्गगती खुंटी ॥ ८६ ॥
श्रीरामें ऐसिया रीतीं । परशुरामाची स्वर्गगती ।
खुंटविली यथार्थ निश्चितीं । हें ग्रंथार्थीं निजगुह्य ॥ ८७ ॥
श्रीरामें जिंतिला परशुधर । गगनीं सुरवरांचा गजर ।
भूतळीं गर्जती ऋषींश्वर । विजयी रघुवीर निजात्मवीर्यें ॥ ८८ ॥
शिवचाप आणि विष्णुचाप । दोहीं चापांचा दुर्धर दर्प ।
राघवें केला निर्वीर्यरूप । श्रीरामप्रताप निजविजयी ॥ ८९ ॥

परशुरामाचा गर्वपरिहार व क्रोधाचा त्याग :

श्रीरामपरशुरामांचे क्रीडित । ब्रह्मादिदेव विमानांत ।
कौतुक पाहूं आले समस्त । दोघे अद्भुित महावीर ॥ ९० ॥
ते देव गर्जती आंबरीं । श्रीराम निजविजयी निर्धारीं ।
वर्षती सुमनांच्या संभारी । ऋषि जयजयकारीं गर्जती ॥ ९१ ॥
परशुराम म्हणजे श्रीरघुनाथा । त्वां मज जिंतिलें तत्वतां ।
जे मज लाज नाहीं सर्वथा । अधिक श्लाघ्यता मज तुझेनि ॥ ९२ ॥
जेंवी मूळ गोडी द्विविधा नाम । परी स्वरूपीं नाहीं द्विविध धर्म ।
तेंवी मी तूं आत्माराम । लज्जा परम कोनाची ॥ ९३ ॥
देह लाजेना अवयवा । रूप लाजेना देहभावा ।
तेवीं मज तुज राघवा । असेना हेवा लाजेचा ॥ ९४ ॥
ऐसें बोलोनि तत्वतां । मग म्हणे गा रघुनाथा ।
धर्म रक्षण तुझे माथा । लोकपाळण त्वां कीजे ॥ ९५ ॥
होता जमदग्नीचा कोप । आणि आपुला निजसाटोप ।
तो श्रीरामीं केला निक्षेप । जाला सुखरूप परशुराम ॥ ९६ ॥
श्रीराम लागला रामचरनां । रामें श्रीरामा केली प्रदक्षिणा ।
रामनामें गर्जोंनि जाणा । गेला स्वस्थाना परशुराम ॥ ९७ ॥
श्रीराम विजयी अलोलिक । वसिष्ठासी आल्हाद अधिक ।
तेणें आलिंगिला रघुकुळटिळक । गेली धुकधुक दशरथाची ॥ ९८ ॥
श्रीरामें वसिष्ठासी लोटांगण । दशरथासी साष्टांग नमन ।
येरे दिधलें आलिंगन । निवालें मन रायाचें ॥ ९९ ॥
विजयी जाला श्रीरामचम्द्र । ऋषिरायांसी आल्हाद थोर ।
अवघे करिती जयजयकार । चालिले भार स्वानंदें ॥ १०० ॥
एकाजनार्दना सह्रण । जाली परशुरामाची बोळवण ।
आतां अयोध्याप्रवेशन । स्वानंदे गमन श्रीरामा ॥ १०१ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायने बालकांडे एकाकारटीकायां
श्रीरामपरशुरामएकात्मबोध निरूपणं नाम षड्‌विंशतितमोध्यायः ॥ २६ ॥
॥ ओंव्या १०१ ॥ श्लोक १ ॥ एवं १०२ ॥



बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.