Jump to content

भावार्थ रामायण/बालकाण्ड/अध्याय १०

विकिस्रोत कडून
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय दहावा ॥
राजा जनक व शुकाचार्य यांचा संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

विश्वामित्र उवाच –
न राघव तवास्त्यन्यज्ञेयवतां वर ॥
स्वयैव सूक्ष्मया बुद्ध्या सर्वं विज्ञातवानसि ॥१॥

विश्वामित्र म्हणे रघुनाथा । तूं सूक्ष्मबुद्धि अति तीक्ष्णता ।
ज्ञान ज्ञेय परमार्था स्वभावता परिपूर्ण ॥१॥
ज्ञात्यांमाजी ज्ञानवरिष्ठ । त्यांचा अनुभव जो चोखट ।
तो तुजमाजी दिसे प्रकट । वैराग्य उद्‌भट ज्ञानगर्भा ॥२॥
वैराग्य जें ज्ञानसगर्भ । तोचि ज्ञानाचा समारंभ ।
वैराग्येंवीण ज्ञान दुर्लभ । तें तुज सुलभ स्वभावता ॥३॥

भगवद्‌व्यासपुत्रस्य शुकस्येव मतिस्तव ।
विश्रांतिमात्रमेवैतज्ज्ञाता ज्ञेयमपेक्षते ॥२॥

जैसा शुक व्याससुत । जन्मापासोनि स्वभावमुक्त ।
तैसाचि तूं रघुनाथ । प्राप्त परमार्थ स्वन्हावें ॥४॥
त्या शुकाचा ज्ञानार्थ । विकल्पें पावला घात ।
तोचि गुरुवाक्यें निश्चित । निजपरमार्थ पावला ॥५॥

श्रीराम उवाच भगवन्व्यासपुत्रस्य शुकस्य भगवन्कथम् ।
ज्ञेयेऽप्यादौ न विश्रांतं विश्रांतं च भिया पुनः ॥३॥

राम म्हणे ऋषिवर्या । ऐकिलें वाक्य परमाश्चर्या ।
ज्ञात पावोनि शुकवर्या । विकल्प् धरावया काय कारण ॥६॥
त्या शुकाची समूळ कथा । मज सांगावी स्वामिनाथा ।
ज्ञान पावोनि विकल्पता । शुकाच्या चित्ता बाणली कैसी ॥७॥
तोचि विकल्प पुढती । कैसेनि मावळलां चितीं ।
कैसेनि पावला विश्रांती । हें मजप्रति सांगावें ॥८॥

विश्वामित्र उवाच -
आत्मोदंतसमं राम कथ्यमानमिदं मया ॥
श्रृणु व्यासात्मजोदंतं जन्मनामंतकारणम् ॥४॥

विश्वामित्र म्हणे श्रीरामा । व्यापुत्राची ज्ञान गरिमा ।
अगाध विचाराची महिमा । नाहीं सीमा अनुपम्य ॥९॥
त्या श्रीशुकाचा निजविचार । त्याही विचाराचें निजसार ।
तुज मी सांगेन साचार । सविस्तर अवधारीं ॥१०॥

शुकाख्यान :

जन्मस्वभावें शुक मुक्त । विवेकवैराग्यपूर्ण भरित ।
तो श्रीव्यासास न पुसत । स्वेच्छा वनांत निघता झाला ॥११॥

यं प्रव्रजंतमनुपेतमपेतकृत्यं
द्वैपायनो विरहकातर आजुहाव ॥
पुत्रेति तन्मतया तरवोऽभिनेदुः
तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि ॥५॥

शुके न करितां पाणिग्रहण । न घेता संन्यास संपूर्ण ।
व्यासासी न पुसतांचि जाण । निघाला आपण सर्वस्व त्यागे ॥१२॥
त्या शुकाची पूर्ण स्थिती । देखोनि व्यासासी अति प्रीती ।
तेणें सुखें शुकाप्रती । पुत्रासक्ती धांविन्नला ॥१३॥
पुत्रप्राप्तीचें व्यासासी सुख । त्यांचे पहावया मुख ।
व्यासासी अत्यंत हरिख । ये गा आवश्यक शुकासी म्हणे ॥१४॥
मी शुक नव्हें एकेदशी । तो मी सर्वभूतनिवासी ।
हे प्रचीती यावया व्यासासी । वृक्ष त्यासी ओ देती ॥१५॥
व्यास बोभाये पुत्रवचनीं । वृक्ष वदती प्रतिवचनीं ।
तेणें व्यास सुखावोनि । पुत्रगमनीं उद्यम ॥१६॥
शुका म्हणतांचि जाण । वृक्ष ओ देती आपण ।
तेणें शुकाचें पूर्णपण । व्यासासी पूर्ण कळों आलें ॥१७॥
ऐसें असतां पूर्णपण । त्यामाजी विकल्पाचें विंदान ।
मुख्यत्वें स्त्रीवाक्याचें श्रवण । तेणें विकल्प पूर्ण श्रीशुकासी ॥१८॥
शुकें स्त्रियां नाहीं देखिल्या दृष्टी । नाहीं स्त्रियांची घेतली भेटी ।
त्यांची अन्योक्ति ऐकतां गोष्टी । विकल्प पोटीं शुकाच्या ॥१९॥
प्रमदा परमार्थ पुसों आली । हे गुरुत्वा भुली पडली ।
प्रमदा केवळ प्रमादीं घाली । तिचे बोलीं विकल्प ॥२०॥
प्रमदांप्रति परमार्थ । हा गुरत्वा अति अनर्थ ।
त्या अनर्थाचा निजघात । श्रीशुकांत विकल्पू ॥२१॥
परमार्थ गुरुत्वाचा अति अनर्थ । त्या अनर्था अति घात ।
तो श्रीशुकाआंत । असे नांदत सावकाश ॥२२॥

जलाशयावर स्नानासाठी शुक आणि व्यास गेले असता अप्सरांची झालेली वेगवेगळी मनस्थिती :

सिद्धसरोवराप्रती । नग्न अप्सरा स्नान करिती ।
शुक जातां आत्मस्थिती । त्या स्वइच्छा खेळती निर्लज्ज ॥२३॥
मागूनि व्यास येतां देखती । अप्सरा अति सलज्ज होती ।
एकी वस्त्र आड करिती । एकी बैसती उदकांत ॥२४॥
शुक तरूण नग्नगती । जातां अप्सरा न लाजती ।
मी वृद्ध यांचे आज्याचे स्थिती । मज का लाजती देवांगना ॥२५॥
शुकाचे ठायीं त्यांची आसक्ती । त्यासी निर्लज्ज अवयव दाविती ।
मी वृद्ध नावडें चित्तीं । यालागीं लाजती स्वर्गांगना ॥२६॥
हा अप्सरांचा भावों । हे त्यांचे पासीं पुसों जावों ।
हा व्यासाचा अभिप्रावो । तो प्रश्नपर्याव पूसत ॥२७॥
श्रीशुकासी कां नाहीं लाजल्याती । मज लाजल्याती कोण्या अर्थीं ।
हे प्रमाण निश्चितार्थीं । माझी प्रश्नोक्ती सांगावी ॥२८॥

अप्सरांचे व्यासांना उत्तर :

ऐकोनि व्यासाची प्रश्नोक्ती । हांसोनि अप्सरा बोलती ।
जैसी ज्याची अंतरावृत्ती । तैसें त्याप्रती वर्तों आम्ही ॥२९॥
मुने तुझें ज्ञान भेदानुवृत्ती । शुकासी सदा अभेदगती ।
अभेदी लाजेची अप्राप्ती । भेदा प्राप्ती सलज्ज ॥३०॥
शुक अभेद कैसा कळला । माझा भेद कोठे देखिला ।
जेव्हां लज्जेचा प्रश्न केला । तेणेचि दाविला भेद तुझा ॥३१॥
तुज स्त्रीपुरुषभेदव्यक्ती । यालागीं तू केली प्रश्नोक्ती ।
शुकाची सूक्ष्म अभेदगती । स्त्रीपुरुषव्यक्ती देखेना ॥३२॥

ते उत्तर ऐकून "मी ज्ञाता" असा शुकास अभिमानस्पर्श :

ऐसें ऐकतां स्त्रियांचे वचन । मी जाता व्यास अज्ञान ।
ऐसा शुकासी ज्ञानाभिमान । हृदयीं संपूर्ण प्रविष्टला ॥३३॥
बाप स्त्रीवाक्याची ख्याती । ब्रह्मज्ञानाची केली शांती ।
विकल्प वाढविला चित्तीं । उठली स्फूर्ति मी ज्ञाता ॥३४॥
मी ज्ञाता तो अज्ञान । ऐसें जेथें स्फुरें स्फुरण ।
तेथोनि पळे ब्रह्मज्ञान । ज्ञानाभिमान उरे देहीं ॥३५॥
हिंग पडतांचि रांजणीं । गोडवाणी होय हिंगवणी ।
तेवीं विकल्प् प्रवेशतां ज्ञानीं । ज्ञानाभिमानीं उडे ज्ञान ॥३६॥
दुग्धीं कांजीचा थेंबू पडे । तेणें दुग्धाचे होती कवडे ।
तेविं ज्ञानीं विकल्प वाढे । तैं ज्ञान उडे ज्ञानाभिमानें ॥३७॥
सावध कनकबीज खाय । तो क्षणार्धें भ्रमित होय ।
तेंवि विकल्पाच्यानि अन्वयें । ज्ञात्या होय ज्ञानाभिमानु ॥३८॥
व्यास अज्ञान भेददृष्टी । मी सज्ञान ऐक्यपुष्टी ।
ऐसा विकल्प शुकाचे पोटीं । स्त्रीवाक्यासाठीं दॄढ झाला ॥३९॥
दीप मालवल्यापाठीं । काजळीची पोहणी उठी ।
तेंवि ज्ञान जातांचि शेवटीं । अति गर्व उठी ज्ञानाभिमानें ॥४०॥

गुरुवाक्याशिवाय ज्ञान व्यर्थ होय :

स्वयंबुद्धीचें विवेकज्ञान । विकल्पमात्रें होय क्षीण ।
गुरुवाक्यें अति निपुण । तें ज्ञान पूर्ण निश्चयें ॥४१॥
जो ज्ञानानुभव गुरुचे ठायीं । तें ज्ञान अति अक्षयी ।
विकल्प न रिघे ते ठायी । अति अनपायी गुरुज्ञान ॥४२॥
गुरुवाक्येंवीण जें ज्ञान । तें क्षयरोगी जन्मलें जाण ।
विकल्पमात्रें सांडी प्राण । अति क्षीण अपायी ॥४३॥
आचार्यवान् पुरुषो वेद । हें वेदवाक्य प्रसिद्ध ।
गुरुवाक्यें ज्ञानविशुद्ध । प्रजा प्रबुद्ध गुरुवाक्यें ॥४४॥
गुरुवाक्येवीण सर्वथा । ज्ञान नासे विकल्पता ।
हेचि शुकाची व्यवस्था । व्यासासी सर्वथा कळों आली ॥४५॥
शुकाचे ब्रह्मज्ञान । विकल्प वाक्यें जाले क्षीण ।
शुक जाहला ज्ञानहीन । तें व्यासासी चिन्ह कळो सरले ॥४६॥
व्यास जाणें भेदज्ञान । तोचि भेदि अभेद सर्वज्ञ ।
हें शुकासी न कळे चिन्ह । तेणें विकल्प पूर्ण दृढ धरिला ॥४७॥
व्यास शुकालागीं अति आसक्त । क्षणाक्षणां म्हणे परत ।
तोचि जालिया विकल्पयुक्त । त्यावरी परत न म्हणे व्यास ॥४८॥
व्यास अंतर्यामी आपण । जाणोनि शुकाचें ज्ञान ज्ञानें क्षीण ।
जेणें पावे ज्ञान संपूर्ण । तो कृपेनें आपण सत्संग सांगे ॥४९॥

जनको नाम भूपालो विद्यते वसुधातले ॥६॥

शुकाला जनकाकडे जाण्यास व्यास सांगतात :

व्यास म्हणे श्रीशुकासी । तूं तंव स्वंइच्छा जातोसी ।
अवश्य जाई नजकापासीं । निश्चय पावसी त्याचेनी ॥५०॥
जनक राजा पृथिवीचे ठायीं । राज्य करोनि तो विदेही ।
ज्ञान विज्ञान त्यासी सर्वही । परिपूर्ण पाहीं पूर्णत्वें ॥५१॥
जो संदेह निजमानसीं । त्याचेनि निःसंदेह होसी ।
समाधान जनकापासीं । परमार्थासी परमार्थ ॥५२॥
आपण ज्ञान सांगावें त्यासी । व्यास अज्ञान हें शुकाचे मानसीं ।
यालागीं धाडी जनकापासीं । श्रीशुकासी निश्चयार्थ ॥५३॥
श्रीशुकाची मनोवृत्ती । म्हणे कळली व्यासाची ज्ञानस्थिती ।
आतां जनकाची ज्ञानोक्ती । तेंही निश्चिती पाहूं पां ॥५४॥
ऐसें विचारोनि मनीं । मेरुगिरी उतरोनी ।
जनकगिरी ठाकोनी । तत्क्षणीं तो आला ॥५५॥
नग्न नगरात जातां । होईल लोहोपहासकता ।
पर्थी चीरांची तत्वतां । लोकलज्जार्थ कौपीन केली ॥५६॥

रिक्तहस्तेन नोपेयाद् राजानं देवतां गुरुम् ॥७॥

जनकप्रसादात शुकाचा प्रवेश :

केवळ रिक्तहातेंसी । भेटों नये रायासी ।
तैसेचि देवालयासी । रिते हस्तेंसी न जावें ॥५७॥
सद्‌गुरु जो कां कृपामूर्ती । त्यासीही भेटूं नये रिते हातीं ।
हेंचि वृद्ध वृद्ध शिकविती । धर्मशास्त्रीं नीति निश्चयें हेची ॥५८॥
जनक गुरुत्वें जगद्‌गुरू । तोचि नरेंद्रां नरेंद्रु ।
त्यांसी रिक्त हस्ते नमस्कारू । करी तो नर स्वधर्ममंद ॥५९॥
जनक निर्लोभद्रव्यदृष्टी । ऐसा निश्चय धरोनि पोटीं ।
हातीं घेतली राखोटी । जनकभेटीलागोनी ॥६०॥
चीर कटीं सूत्र कंठी । कौपीन हातीं राखोटी ।
राजद्वारा आला उठाउठी । द्वारपाळें देखिला ॥६१॥
ब्रह्मसूत्रेंवीण नव्हे ब्राह्मण । संन्यासी नव्हे दंडेवीण ।
दिगंबर नव्हे हा संपूर्ण । अति विलक्षण वेषधारी ॥६२॥

शुकाला ’संगत्यागा’चा जनकाचा संदेश :

यालागीं श्रीशुकासी । द्वारपाळ निवारी त्यासी ।
तो म्हणे सांग रायापायीं । मी शुद्ध भेटीसी आलों सें ॥६३॥
त्या श्रीशुकाचें मनोगत । मी आलों असें ब्रह्मसुत ।
राजा सामोरा येईल येथ । सन्मानयुक्त नेईल ॥६४॥
ऐशा ज्ञानाभिमानें थोर । श्रीशुकामाझारी बांधले घर ।
तें कळलें रायासी अंतर । शुकविकार हृदयस्थ ॥६५॥
शुकाची स्वयें घेतां भेटी । तो विकल्प धरील पोटीं ।
व्यास बोलिला जे गोष्टींसाठी । त्या विकल्पपुष्टी शुक नांदे ॥६६॥
आपण न घेत भेटी । जेणें विरे चिकल्पाची गांठी ।
त्या त्यागाची सांगू गोष्टी । जेणें निजात्मदृष्टी शुक पावे ॥६७॥
भेटी न घेतां आपण । शुक पावे समाधान ।
ऐसें साधोनि विंदान । द्वारपाळासी वचन राव बोले ॥६८॥
द्वारी उभा महानुभाव । संग त्यक्वा सुखी भव ।
हा त्यासी सांगावा अभिप्राय । तो निजानुभव पाहील ॥६९॥

’संगत्यागे सुखप्राप्ती’ असा जनकाचा दुसरा संदेश :

द्वारपाळ म्हणे श्रीशुकासी । संगत्यागें सुखी होसी ।
हें रायें सांगितलें तुम्हांसी । येरू निजमानसीं क्षोभला ॥७०॥
मी काय राजभारू वाहे । मज काय स्त्रीसंग आहे ।
मी निःसंग निजनिर्वाहें । सांग जाय पाहें रायअसी ॥७१॥
हातींची टाकिली राखोटी । तोडोनि टाकिली लंगोटी ।
निःसंग मी एक सृष्टीं । मज पहावया दृष्टी येऊं दे राजा ॥७२॥

जनकाचे देहममत्वाविषयी प्रश्न व शुकाची तटस्थावस्था :

द्वारपाळें रायाप्रती । सांगितल्या शुकोक्ती ।
राजा तेंचि सांगे तयाप्रती पुढती । संगत्यागस्थितीं सुखी होय ॥७३॥
संगत्यागें सुखाप्राप्ती । द्वारपाळ सांगे राजोक्ती ।
आतां कोण संग मजप्रती । ते येऊनि नृपति पाहो सुखें ॥७४॥
संगत्याग पुढपुढती । राजा सांगे कोण्या अर्थीं ।
कोण संग आहे मजप्रती । तें पाहूं निश्चितीं आदरिलें ॥७५॥
मी शुक तों येथें कोण । माझ्या शुकत्वा काय कारण ।
वस्तु नामरूपातीत पूर्ण । शुकीं शुकपण देहत्वें ॥७६॥
देहाचे माथां शुकपण । तो देह येथें किंलक्षण ।
देह पाचभौतिक पूर्ण । माजी मी कोण तें शोधूं पां ॥७७॥
देह पंचभूताआभास । त्या पंचभूतांचा विलास ।
विवंचू पा सावकाश । स्वस्वरूप साधावया ॥७८॥
पृथ्वी नव्हें मी जडत्वें । जळ नव्हें मी अधोगमनत्वें ।
तेज नव्हें मी दाहकत्वें । मी चंचळत्वें वायु नव्हें ॥७९॥
रितें दिसे तेथें जेथें । तें नभ नव्हे मी शुकत्वें ।
मी नव्हें पंचभूतें । त्याहूनि परतें तें मी स्वयं ॥८०॥
अहं नव्हें मी देहममत्वें । सोहं नव्हें मी मायिकत्वें ।
अहंसोहंहूनि परतें । तें मी निश्चितें निजरूप ॥८१॥
ऐसी विवंचितां उपपत्ती । स्वरूपीं पावली वृत्ती ।
तेणे तटस्थ जाली स्थिती । इंद्रियवृत्ति निचेष्टित ॥८२॥
ऐसा निचेष्टित सात रात्री । उभा होता राजद्वारीं ।
दंश मशक मत्कुणांमाझारी । सत्परात्री अचंचळ ॥८३॥
शुकासी निर्विकप्लसमाधी । द्वारपाळ रायासी सांगती आधीं ।
शुक पूर्ण जाला त्रिशुद्धी । अहंबुद्धी हारपली ॥८४॥

शुकाची निश्चल स्थिती :

शुकाला जनानखान्यांत नेणे ऐसे सांगता द्वारपाळ ।
विदेही हरुषला प्रबळ ।
सामोरा जावोनि तत्काळ । अंतरगृहासी आणी ॥८५॥
रायें उचलोनियां त्यासी । ठेविला पैं राणिवसीं ।
श्रीशुकाची दशा कैसी । पुसे राणियांसी स्वयें राव ॥८६॥
नाना भोगविलासीं । शुकासी निर्द्वंद्व राणिवसीं ।
विदेहत्व बाणलें त्यासी । ऐसा रायासी निश्चयो जाला ॥८७॥
ब्रह्मत्व बाणलें योगिराजा । जाणोनि उल्लास भूभुजा ।
सिंहासनीं बैसवोनि वोजा । श्रीशुकाची पूजा ब्रह्मत्वें केली ॥८८॥
स्वमुखें सांगे श्रीशुकासी । मी जनक आलोंसे भेटिसी ।
वचनें शुक जाला उल्लासी । सर्वभावेंसी नृप नमियेला ॥८९॥
नमूनियां श्रीरायाचे चरण । शुक तटस्थ झाला संपूर्ण ।
त्याचें दखोनिया लक्षण । तें ज्ञान अपूर्ण नृप मानी ॥९०॥
सर्वेंद्रियीं निरत । ज्ञान नाहीं नित्यमुक्त ।
तें ज्ञान साशंकित । पूर्णत्व तेथें असेना ॥९१॥
आंब्यां पाड लागल्या झाडीं । सेजेनें न मुरता न ये गोडी ।
निःशंक ज्ञान न होतां जोडी । तटस्थ गाढी अपक्वता ॥९२॥
दधि मंथूनि काढिजे लोणी । तें ठेविता धरी खवट घाणी ।
तेंचि अग्निसंगे तावूनी । सुगंधपणीं सुस्थिर ॥९३॥
तेंवी तटस्थ अति संपूर्ण । तेचि मुख्यत्वें अपक्वता जाण ।
सर्वेंद्रियीं चित्तसमाधान । तें ज्ञानविज्ञान अति शुद्ध ॥९४॥
शुकाची तटस्थता मोडे । त्यासी शुद्ध ज्ञान जोडे ।
ऐसें विचारोनि धदफुडें । निजनिवाडें नृप बोले ॥९५॥
राजा म्हणे तटस्थ स्थिती । शुका कोठे आहे तुझी वृत्ती ।
येरु म्हणे आत्मप्रतीती । वृत्ति निश्चितीं सुखरूप ॥९६॥
ऐसी आत्मस्थिती आहे । त्याची स्थिति डोळां पाहे ।
तेव्हां दृश्य द्रष्टा चिन्मात्र होय । हा अनुभव पाहें आत्मत्वाचा ॥९७॥
शुक जंव आत्मस्थिती पाहें । विस्मयें चाकाटला ठायें ।
निजदेह नाहीं होये । वश्यत्वें राहे ब्रह्मपूर्णत्वें ॥९८॥
जें जे देखों जाय ठिठीं । तें तें आत्मत्वेंचि उठी ।
बाप गुरुवाक्याची कसवटी । दृश्याचिये पोटीं परब्रम्ह नांदे ॥९९॥
स्त्रीपुरुषाचिये व्यक्ती । पूर्णब्रह्मत्वें प्रचीती ।
पशु पक्षी नाना जाती । आत्मस्थिती जग नांदे ॥१००॥

शुकाला आलेली सद्‌गुरूमहिम्याची प्रचीती :

जें जें पाहे तें तें आत्मस्थिती । तंव तंव सर्वेंद्रिया ब्रह्मप्राप्ती ।
गुरुवाक्याची परम ख्याती । सभाग्य पावती स्वानंदे ॥१॥
अगाध सद्‌गुरुगरिमा । ब्रह्मत्व आलें इंद्रियकर्मा ।
सहज भेटी परब्रह्मा । देहधर्म चिदत्वें ॥२॥
निद्रेचें निजशेजार । तळी घरा ना वरी अंबर ।
पहुडणें अति अरुवार । चिदचिन्मात्रस्वभें ॥३॥
विसरोनि शेष निमाला । आठवाचा ठावो पुसिला ।
सहज सुखें सुखाळु जाला । दुष्काळ पडिला देहभावा ॥४॥
जागृती आली ब्रह्मपूर्ण । स्वप्न जालें चैतन्यघन ।
सुषुप्ती जाली सुखसंपन्न । हा प्रताप पूर्ण गुरु आज्ञेचा ॥५॥
गुरु आज्ञेचा चमत्कार । श्रवणीं पडताचि अक्षर ।
सुखरूप जाला संसार । चराचर ब्रह्ममय ॥६॥
गुरुवाक्याचा गौरवो । शुकासी जाला सहजानुभवो ।
तेणें अति आल्हादें पहा हो । साष्टांगी राव सद्‌भावें नमिला ॥७॥
रायें दिधलें आलिंगन । दोघांचे गेलें दोनीपण ।
मुसावलें चैतन्यघन । पूर्णत्वें परिपूर्ण जाला ॥८॥
पूर्णत्वें पावोनि समधान । सहज अंगी सुटले आलिंगन ।
तरी न दिसे दोनीपण । अखंडत्वें पूर्ण आत्मत्वा ॥९॥
शुक म्हणे जनकाप्रती । नकळोनि हे सहजस्थिती ।
म्यां विकल्प् धरिला चित्तीं । मुख्य पूज्य मूर्तिं श्रीव्यास ॥११०॥
व्यासासी स्त्रीपुरुषभेद भिन्न । ऐसें अप्सरांचे वचन ।
ऐकोनि विकल्पें भरलें मन । व्यास अज्ञान निश्चयें मानीं ॥११॥
ऐसिया विकल्पाचा समूळ दाहो । तुझेनि वचनें केला पाहाहो ।
धन्य ज्ञानाचा अनुभवों । निःसंदेहो भवव्दाक्यें ॥१२॥
द्वारपाळाच्या निरोपावरी । माया अविद्या विकल्पा बोहरी ।
तुझ्या वैभवाची थोरी । वंद्य सुरवरीं सर्वत्र ॥१३॥
बाप वाक्याचे तिखट बाण । घायेंवीण छेदिला प्राण ।
जीव मारोनिया संपूर्ण । पूर्णत्वीं पूर्ण मज केले ॥१४॥
ऐकोनि शुकाचें वचन । जनक जाला सुखसंपन्न ।
यथोनि शुक जाल सुखपूर्ण । संतोषोनि आपण काय बोले ॥१५॥

जनकाकडून शुकाला ज्ञानोपदेश :

जनक म्हणे धन्य धन्य । जें तुज जालें समधान ।
तेंचि गुह्याचें गुह्य ज्ञान । ब्रह्मसमाधान तया नांव ॥१६॥
पूर्वीच तूं ज्ञाननिधी । वस्तु आकळिली निजात्मबुद्धी ।
गुरुवाक्य तेचि त्रिशुद्धी । निजात्मसिद्धी निश्चित ॥१७॥
जे तूं पावलासी समाधी । यावरी ज्ञानसिद्धि ।
नाहीं नाहीं गा त्रिशुद्धी । निजात्मबुद्धी याचि नांव ॥१८॥
जे तुज जाली आत्मप्राप्ती । तेचि नाराणयाची ज्ञानोक्ती ।
तेंचि ज्ञान श्रीकृष्णनार्थी । तेचि स्थिती नारदाची ॥१९॥
तेचि स्थिती याज्ञवल्क्यासी । तेचि स्थिती व्यासासी ।
तेचि स्थिति मजपासीं । निश्चयेसीं निश्चित ॥१२०॥
स्नेहे सूत्रें दीप भिन्न । प्रभा एकत्वें अभिन्न ।
तेवीं ज्ञात्याचें विचित्र कर्मचिन्ह । परी ज्ञेय ज्ञान एकची ॥२१॥
नारदासी नित्य लंगोटी । कृष्ण वैभवें संपन्न सृष्टीं ।
दोहींची ज्ञानकसवटी । एकत्वें पुष्टीं समसाम्य ॥२२॥
जडभरत म्हणती जड । याज्ञवल्की ज्ञानारूढ ।
दोहींचे ज्ञान एकत्वें गोड । ज्ञानीं पडिपाड असेना ॥२३॥
देह देता दोष कोटी । आत्मत्वें पाहतां निदेष सृष्टी ।
यालागीं देहीं न ठेवावी दृष्टी । दोषांची कोटी देहात्मता ॥२४॥
ऐकोनि जनकाची गोष्टी । सुख जालें शुकाच्या पोटीं ।
संशय गेला उठाउठीं । स्वानंदपुष्टी सदादित ॥२५॥
यापरी जनकें श्रीशुकासी । सांगितलें शुद्ध ज्ञानासी ।
तेणें विश्रांति जाली रायासी । तें सुख वाचेसी न बोलवें ॥२६॥
सुख उलथले संपूर्ण । सकळ संशयां जालें दहन ।
वाचेसी पडिलें महामौन । भय शोक पूर्ण मावळले ॥२७॥
निमाली हृदयाची आधी व्याधी । इंद्रियें निवालीं सुखावबोधी ।
विश्रांति पावली त्रिशुद्धी । सुख सुखावबोधी संतुष्ट ॥२८॥

शुकाचे मेरुपर्वतावर गमन :

शुक म्हणे रायाप्रती । मज जाली परम विश्रांती ।
ते विश्रांती भोगावया एकांती । मेरुगिरीप्रति शुक गेला ॥२९॥
निर्विकल्प निरहंकारी । आसन घालोनि योगमुद्रीं ।
शुक बैसला समाधिवरी । मेरुशिखरीं स्वानंदे ॥१३०॥
स्नेहेंवीण प्रकाशरूप । निर्वातांचा जैसा दीप ।
तैसें शुकाचें समाधिस्वरूप । निर्विकल्प या नांव ॥३१॥
शुक म्हणे मी क्षणाभरी । सुखें बैसलों मेरुशिखरीं ।
बाहेर संख्या शास्त्रांतरीं । दशसहस्रीं जाली अब्दें ॥३२॥
एवं स्वरुपाचे ठायीं । मुळी उदय अस्त नाहीं ।
काळा तेथे अटक पाहीं । ठेविता ठायीं टिकेना ॥३३॥
ऐकें श्रीरामा कृपामूर्ती । यापरी शुकाची ब्रह्मप्राप्ती ।
जनकें आणिली यथास्थिती । आत्मप्रतीती समाधिस्थ ॥३४॥
समाधि आणि उत्थान । दोनी अवस्था बोळवून ।
करोनियां श्रीशुक जाण । जाला संपूर्ण पूर्णत्वें ॥३५॥
एका जनार्दना शरण । शुक सुखें जाला ब्रह्मसंपन्न ।
पुढें श्रीरामातें पूर्णपण । वसिष्ठ आपण निरूपील ॥१३६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
शुकजनकसंवादो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥
॥ श्लोक ७ ॥ ओव्यां १३६ ॥ एवं १४३ ॥

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.