Jump to content

भारतीय लोकसत्ता/सामाजिक पुनर्घटना-अस्पृश्य व आदिवासी

विकिस्रोत कडून
आणि आमच्या चुका आम्ही निस्तरणार आहों अशा रगदार, व स्वाभिमानी भावनेची जोपासना त्यांच्या ठाय निश्चित होईल; आणि मग ब्राह्मणब्राह्मणेतरवादाचें मूळच उपटल्यासारखे होऊन आपला समाज एकसंघ होण्याची आशा धरतां येईल. यायोगे आणखीहि एका दृष्टीने प्रगति होण्याचा संभव आहे. जातिभेद नष्ट व्हावा व सर्व महाराष्ट्रीय समाज एक रक्ताचा व्हावा अशा तऱ्हेचें तत्त्वज्ञान सध्यां प्रसृत होत आहे. ब्राह्मणब्राह्मणेतरांतील कटुता कमी होऊन हे दोन समाज जवळ आले तर त्या तत्त्वज्ञानाला जोर व वेग प्राप्त होऊन कदाचित् ते प्रत्यक्षांत येण्याची आशा निर्माण होईल.
 ब्राह्मणब्राह्मणेतर या विषयाचे विवेचन येथे संपले, आपला सर्वच समाज, त्याचे सर्वच घटक विषमतेच्या, संकुचित दृष्टीच्या रोगानें ग्रस्त आहेत आणि येथल्या प्राचीन काळच्या व आतांच्याहि उत्कर्षाची व अधःपाताची जबाबदारी सर्वांवरच आहे, श्रेयाप्रमाणे अपश्रेयाला सर्वच भागीदार आहों, अशी या विवेचनामागली भूमिका आहे. ती मान्य झाल्यास येथले बरेचसे प्रश्न सुटतील आणि भारतीय लोकसत्ता यशस्वी होण्याची शक्यता निर्माण होईल असे वाटते.



प्रकरण तेरावें
सामाजिक पुनर्घटना
अस्पृश्य व आदिवासी

 स्वातंत्र्याच्या उत्तरकाळांत एकंदर भारतीय जीवनाची पुनर्घटना करण्याचे प्रयत्न काँग्रेसनें व इतर कार्यकर्त्यांनी सुरू केले. त्यांपैकी राजकीय व आर्थिक पुनर्घटनेच्या प्रयत्नांच्या यशापयशाचे मोजमाप आपण प्रथम केले आणि त्यानंतर आतां सामाजिक पुनर्घटनेचा प्रश्न विचारार्थ घेतला आहे. मागें जागोजागी अनेक वेळां हे सांगितले आहे कीं, धर्म, पंथ, जाति, वर्ण, प्रांत, वर्ग इ. जेवढीं म्हणून भेदकारण अस्तित्वांत असू शकतात, ती सर्व आपल्या या भूमीत जारी आहेत आणि त्यामुळे हा भारती समाज भेदजर्जर व म्हणून दुबळा होऊन गेलेला आहे. या अनेक भेदांपैकी तीन प्रमुख भेदांचा विचार करण्याचें आपण ठरविलें होतें. ब्राह्मणब्राह्मणेतर, स्पृश्यअस्पृश्य व हिंदुमुसलमान हे ते भेद होत. यापैकी पहिल्या प्रश्नाचा विचार करून झाला. आतां अस्पृश्य व आदिवासी यांच्या प्रश्नांचा विचार करावयाचा आहे.
 या दोन समाजांची नुसती लोकसंख्या पाहिली तरी हा प्रश्न केवढा प्रचंड व किती बिकट आहे याची कल्पना येईल. हिंदुस्थानांत एकंदर अस्पृश्यांची लोकसंख्या पांच ते सहा कोटीपर्यंत आहे आणि नाग, भिल्ल, गोंड, संताळ इ. आदिवासी लोकांची संख्या दोन ते तीन कोटी आहे. १९५१ च्या गणतीप्रमाणे भारताची लोकसंख्या ३५ कोटी ६८ लक्ष आहे. यावरून असे ध्यानांत येईल की, भारताच्या एकंदर लोकसंख्येपैकी एकचतुर्थांश लोक असे आहेत की ज्यांचा सुसंस्कृत जीवनाच्या प्राथमिक अवस्थेशीहि अजून परिचय झालेला नाहीं. आज हजारों वर्षे हे कोट्यवधि लोक हिंदुसमाजाच्या सरहद्दीच्या आसपास रहात आहेत; पण त्यांना आपल्यांत घेऊन आत्मसात् करून सर्व मिळून एक अभंग हिंदुसमाज करून टाकण्यांत येथील नेत्यांना यश आलेले नाहीं. पूर्वीच्या समाजधुरीणांनी या बाबतींत काय प्रयत्न केले हे पाहणें केवळ ऐतिहासिक दृष्टीनेंच नव्हे तर आजचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनेंहि उद्बोधक होईल. तसा थोडासा प्रयत्न पुढे करावयाचाहि आहे; पण आपण एवढे मनांत निश्चित ठेविले पाहिजे की, हे आठनऊ कोटी लोक त्यांच्यावर अनंत प्रकारचे संस्कार होऊन नागरिक या पदवीप्रत येईपर्यंत आपल्या लोकसत्तेला व्यवहारांत कसलाहि अर्थ निर्माण होणार नाही. त्यांना त्या पदवीला आणून पोचविण्यासाठी अर्वाचीन काळांत पूर्वसूरींनीं व काँग्रेसच्या नेत्यांनी कोणचे प्रयत्न केले याचा प्रथम आपण आढावा घेऊ व नंतर पुढील विवेचन करूं.
 ब्रिटिशांचे राज्य या देशांत प्रस्थापित झाल्यानंतर या देशांत थोर पुरुषांची जी पाहेली पिढी निर्माण झाली तिच्या असें ध्यानांत आले कीं, आपली समाजरचनेचीं सर्व तत्त्वें अगदीं निखालस चुकीची असून ती नष्ट केल्यावांचून आपल्या समाजाची उन्नति होणार नाहीं. चातुवर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता हीं तत्त्व विषमतामूलक असून त्यामुळे जन्मावरून मनुष्याची योग्यता ठरविण्याचें घातक तत्त्व आपण रूढ करून ठेविले आहे. त्याचा त्याग करून, समतेच्या पायावर आपल्या समाजाची पुनर्रचना केल्यावांचून आपण समर्थ व बलशाली होणार नाहीं. राजा राममोहन रॉय यांच्यापासून आजच्या धर्मनिर्णयमंडळापर्यंत शेकडो सुधारकांनी भारती समाजाच्या बुडाशी असलेले विषमतेचें तत्त्वज्ञान नष्ट करून त्या जागी नवें तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्याचे प्रयत्न कसकसे केले हें मागल्या प्रकरणांत व त्याच्या आधींच्याहि प्रकरणांत सविस्तर सांगितले आहे. आज आतां अस्पृश्यता- निवारणाच्या क्षेत्रांत प्रत्यक्ष कार्य काय झाले त्याचा आढावा घ्यावयाचा आहे.

महात्मा फुले

 याविषयींच्या तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांत राजा राममोहन, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी इ. सुधारक हे अग्रभागी असले तरी प्रत्यक्ष व्यवहाराच्या क्षेत्रांत अग्रपूजेचा मान महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे. तत्वज्ञानाची महती कितीहि असली तरी प्रत्यक्ष कृतीवांचून ते सर्व तत्त्वज्ञान फोल ठरतें. ती कृति-प्रत्यक्ष आचारानें अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य- या थोर पुरुषानें केली. १८५१ सालीं त्यांनी पुण्यास अस्पृश्यांसाठी पहिली शाळा उघडली. त्यासाठी त्यांच्यावर भयंकर गहजब झाला. त्यांना आपल्या पित्याचें घरहि सोडावे लागले. त्यांच्या पत्नीचा छळ झाला; पण त्यांनी आपले धैर्य सोडलें नाहीं. अस्पृश्य हाहि आपल्यासारखाच मानव आहे, हा समतेचा विचार हिंदुसमाजांत प्रसृत करून टाकण्याचा त्यांचा निर्धार रतिमात्र ढळला नाहीं. पुढे तर त्यांनी आपल्या घरांतला हौद अस्पृश्यांना खुला करून आणखी एक पाऊल टाकले. महात्मा फुले यांनी दहाबारा वर्षे अस्पृश्यांसाठी शाळा चालवून, त्यांच्यांत मिसळून, त्यांच्याबरोबर अन्न-पाण्याचा व्यवहार करून हिंदुधर्मावर असलेला हा कलंक नष्ट करण्याचा जो अत्यंत धडाडीने प्रयत्न केला त्यासाठी अखिल महाराष्ट्रच नव्हे, तर सर्व हिंदुस्थान त्यांचा ऋणी राहील.
 महात्मा फुले यांच्यासारखाच आचारानें अस्पृश्यता नष्ट करण्याचा दुसरा उपक्रम बंगालमधील शशिपाद बंदोपाध्याय यांनी केला. १८६६ साली त्यांनी ब्राह्मपंथाचा स्वीकार केला. व तेव्हांपासून ते अस्पृश्यांत सर्सहा मिसळून जेऊं खाऊं लागले. या वर्गात शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनीं शाळा काढल्या व वर्तमानपत्र चालविले. ते स्वत: त्यांच्यांत जाऊन कीर्तन करीत व त्यांनाहि कीर्तने करावयास शिकवीत. आरोग्य, स्वच्छता, मद्यपानबंदी या सुधारणा त्यांनी तेथील चांडालवर्गात घडवून आणल्या. इकडे महाराष्ट्रांत महात्मा फुले यांच्यानंतर महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी या क्षेत्रांत फार मोठे कार्य केले. त्यांनी आपले सर्व आयुष्यच या कार्याला वाहून टाकले होते. १९०६ सालीं 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि पुढील पंचवीसतीस वर्षात सर्व हिंदुस्थानभर तिच्या शाखा काढून अस्पृश्यांना शिक्षण देणें, त्यांच्यासाठी वसतिगृहे चालविणे, स्पृश्य हिंदूंत मतपरिवर्तन घडवून आणणे, अस्पृश्यांत राजकीय जागृति व संघटना घडविणे इ. अनेक मार्गांनी त्यांनी हे कार्य चालविले होतें. याशिवाय हिंदुस्थानांतील अनेक संस्थानिकांनी आणि त्यांतल्या त्यांत श्रीमंत सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे शाहू छत्रपति व म्हैसूरचे महाराज यांनी या अस्पृश्यतानिवारणाच्या कामीं बहुमोल कार्य केले आहे. हाती सत्ता असल्यामुळे यांनी शिक्षणप्रसार तर केलाच, पण त्याशिवाय आपल्या संस्थानांत त्यांनीं अस्पृश्यांना अधिकाराच्या जागा देणे, त्यांना वैदिक पद्धतीनें संस्कृत धर्मग्रंथांतून शिक्षण देणे, सर्व खात्यांतून व खुद्द राजवाड्यांतहि अस्पृश्यांना खुला संचार देणे व त्यांच्यासह भोजन करणे इ. मार्गांनींहि सुधारणा घडवून विषमतेचा हा रोग नष्ट करण्याचा फार जोराचा प्रयत्न केला.
 साधारण १९०० सालापासून अस्पृश्य वर्गात जागृति होऊन त्या वर्गातून त्यांचे स्वतःचे नेते व कार्यकर्ते निर्माण होऊं लागले. त्यांमध्ये शिवराम जानबा कांबळे यांचा प्रामुख्यानें उल्लेख केला पाहिजे, यांनी १९०३ साली सासवड येथें अस्पृश्यांची एक मोठी सभा भरविली व दीड हजार अस्पृश्यांच्या सह्या घेऊन सरकारकडे त्यांना लष्करांत व पोलिसखात्यांत नोकऱ्या द्याव्या असा अर्ज केला. स्वजातीच्या उत्कर्षासाठी अशा रीतीनें जमून चर्चा व विचारविनिमय करण्याचा पायंडा कांबळे यांनी घालून दिला म्हणून या सभेचे महत्त्व विशेष आहे. येथून पुढे अस्पृश्य वर्गात खूपच चळवळी झाल्या आणि १९२० च्या नंतरच्या काळांत रा. ब. राजा, श्रीनिवासन, डॉ. आंबेडकर असे त्या जातींतच थोर नेते निर्माण होऊन अस्पृश्योद्धाराचें कार्य झपाट्यानें प्रगत होऊं लागले.

नवें चैतन्य

 १९२० ते २२ या कालांत जी असहकारितेची चळवळ झाली, तिच्यामुळे या देशांत एक नवीन युग निर्माण झालें. सामाजिक सुधारणा व राजकीय सुधारणा यांचे प्रवाह या काळापर्यंत भिन्न पात्रांतून चालले होते व त्यांच्या गति एकमेकींस कांहींशा विरोधी होत्या. तो विरोध आतां नाहींसा झाला. महात्मा गांधी यांनीं आर्थिक उन्नति, अस्पृश्यतानिवारण, हिंदुमुसलमानांचें ऐक्य इ. भिन्न क्षेत्रांतल्या सुधारणांचे धागे स्वातंत्र्याच्या लढ्यांत गुंतवून दिल्यामुळे या सर्व चळवळींना एक नवें तेज व चैतन्य प्राप्त झाले आणि त्यांचें कार्य अत्यंत वेगाने सुरू झाले. आतांपर्यंतच्या सर्वच चळवळी, सर्व संघटना व तज्जन्य जागृति ही सुशिक्षित मध्यमवर्गीयांच्या कक्षेपर्यंतच मर्यादित राहिलेली होती. आतां याच मध्यमवर्गीय तरुणांनी महात्मा गांधींचा संदेश खेडोपाडी नेऊन पोचविण्याचे कार्य आरंभिल्यामुळे सुधारणांचे लोण बहुजनसमाजापर्यंत पोचले आणि भारताचा हा पुराण पुरुष जागा होण्याची चिन्हे दिसू लागलीं. पूर्वीच्या पाऊणशे वर्षात ब्राह्मसमाज, प्रार्थनासमान, सत्यशोधक समाज, आर्यसमाज, राममोहन रॉय, लोकहितवादी, महात्मा फुले, रानडे, आगरकर, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांच्या प्रतिपादनामुळे हिंदुसमाजांत रूढ झालेले जुने घातकी तत्त्वज्ञान जवळ जवळ उच्छिन्न झाले होते आणि समता, स्वातंत्र्य, व्यक्तित्व, धर्मपरिवर्तन, बुद्धिप्रामाण्य या महनीय तत्त्वांनीं विभूषित असें सामाजिक पुनर्घटनेचें नवें तत्त्वज्ञान मूळ धरूं लागले होते. महात्मा गांधींचा व काँग्रेसचा राजकीय संग्रामाचा संदेश घेऊन हिंदुस्थानच्या खेड्यांत संचारार्थ गेलेले हजारो तरुण या नव्या तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी विचाराने व आचाराने अस्पृश्यतेला या काळांत अक्षरशः सुरुंग लावला आणि या पुरातन संस्थेचा पाया निखळून टाकला. सर्व समाज कांहीं एका उदात्त ध्येयानें प्रेरित होऊन जेव्हां कार्याला लागतो त्यावेळी समाजांतल्या सर्वच प्रगतिकारक चळवळींना तेज प्राप्त होते आणि स्वातंत्र्याचा लढा हें अशा ध्येयांपैकी सर्वात श्रेष्ठ असे ध्येय आहे. धर्म, जाति, पंथ यांनी निर्माण झालेले क्षुद्र भेद या महान् यज्ञाच्या अग्नीनें वितळून जातात. स्वातंत्र्याच्या लढ्यांतूनच वांशिक, जातीय व धार्मिक भेद नष्ट होऊन इंग्लंड, जर्मनी, इटली, तुर्कस्थान, जपान, चीन इ. राष्ट्र निर्माण झालीं, हें इतिहासानें दाखविले आहे. भरतभूमीत १९२० ते १९४७ या काळांत हेंच घडून आले. अस्पृश्यता हा अन्याय आहे, तो हिंदुधर्मावरील कलंक आहे हा विचार गेल्या शंभर वर्षांत रूढ होऊन त्याअन्वयें वर निर्देशिलेली कार्ये सुरू झाली होतीं; पण मानवाचा स्वभावच असा आहे की केवळ सत्याच्या ज्ञानामुळे तो एकदम जागचा हलत नाहीं. अन्यायाच्या केवळ बौद्धिक जाणीवेमुळे तो परिवर्तनाला सिद्ध होत नाहीं; पण मरणमारणाच्या संग्रामांत उतरल्यानंतर तो सर्व क्षेत्रांत एकदम क्रांतीला सिद्ध होतो. जुनीं तत्त्वज्ञाने उध्वस्त करून टाकण्यास एरवीं त्याचें मन कचरते; पण या संग्रामाच्या प्रेरणेने त्याच्या उदात्त वृत्ति जागृत होतात आणि मग तो क्षुद्र भेदभाव विसरण्यास सिद्ध होतो. १९२० नंतरच्या वीस पंचवीस वर्षांच्या काळांत अस्पृश्यतानिवारणाचें कार्य अत्यंत वेगानें होऊन आज अखिल भारतीय समाजाने आपल्या जीवनाच्या मूळ घटनेंतूनच अस्पृश्यता काढून टाकली आहे. याचे कारण, महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या लढ्यांत अस्पृश्यतानिवारण हें एक अवश्य कलम करून टाकले हे आहे. त्या उदात्त ध्येयाशी ही कल्पना निगडित होतांच भारतीयांनीं ती मनोभावानें स्वीकारली आणि ती विषमता, तो अन्याय, तें लांछन नष्ट करून टाकण्याच्या कामीं यश मिळविलें.
 या कालांत अस्पृश्यता निवारणाच्या कार्यास केवढी उठावणी मिळाली याचे केवळ दिग्दर्शन केले तरी त्यावरून पूर्ण कल्पना येईल. शाळा, रस्ते, विहिरी, पाणवठे या ठिकाणी अस्पृश्यांना स्पृश्यांनी खुला प्रवेश दिला, एवढेच नव्हे तर मदुरेच्या मीनाक्षीसारखी शेकडों पुरातन देवालये त्यांच्यासाठी खुली केलीं. एकट्या हरिजनसेवकसंघाचे कार्य पाहिले तरी हिंदूंच्या पालटलेल्या वृत्तीचें प्रत्यंतर येईल. या संघाने शेकडों शाळा काढल्या आहेत. सर्व प्रांत मिळून अस्पृश्यांसाठी १२० वसतिगृह चालविलीं आहेत. औद्योगिक शाळा चालवून अस्पृश्यांना वीणकाम, सुतारी, लोहारी, शिवणकाम, चर्मकाम, पुस्तकवांधणी इ. व्यावसायिक शिक्षण देण्याची सोय केली आहे. मंदिरें, रस्ते, पाणवठे खुले करणे यासाठी संघाचे सारखे प्रयत्न चालू असत. सारांश या दलित समाजाच्या उन्नतीचा जो जो मार्ग दिसला तो या संघानें चोखाळला आहे. १९३७ साली काँग्रेस सत्तारूढ होतांच तिनें वरील सर्व गोष्टी कायद्यानेंच घडवून आणल्या. शिवाय अस्पृश्यांसाठी सहकारी संस्था काढल्या. पडीत जमिनी त्यांना लागवडीस दिल्या. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जागांपासून मंत्र्यांच्या जागांपर्यंत सर्व प्रकारच्या अधिकारांच्या जागा त्यांना देऊन त्यांच्या कर्तृत्वाला वाव करून दिला.

अस्पृश्यांच्या नेत्यांच्या दृष्टीनें

 अशा रीतीनें गेल्या शंभर वर्षात अस्पृश्यता नष्ट करून हिंदु समाजापासून अलग राहिलेला पांचसहा कोटींचा एक प्रचंड मानवसमूह त्याला जोडून टाकण्याचे जे प्रयत्न झाले ते युगपरिवर्तनाच्या दृष्टीनें बरेच समाधानकारक आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं. मतपरिवर्तन, प्रत्यक्ष आचार, शिक्षणाचा प्रसार, राजकीय जागृति व कायदा इ. यावच्छक्य मार्गानें स्पृश्य समाजानें व विशेषतः काँग्रेस आणि महात्माजी यांनी ही दुष्ट रूढी नाहींशी करण्याचे प्रयत्न केले व त्यानंतर स्पृश्य व अस्पृश्य हे समाज एकजीव होऊन जाणे हा केवळ कालावधीचा प्रश्न आहे असे सर्वत्र दिसू लागले. पण याच सुमारास वर सांगितल्याप्रमाणे अस्पृश्यांत डॉ. आंबेडकरांसारखे थोर नेते निर्माण झाले व अस्पृश्यांच्या या नेत्यांना तेव्हांपर्यंत झालेल्या कार्यामुळे मुळींच समाधान झाले नाहीं. आणि तें अगदी साहजिक होतें. अस्पृश्यांच्या रोजच्या जीवनांतील दुःखे व यातना इतक्या असह्य आहेत आणि थोडीशी जागृति आल्यानंतर त्या त्या यातनांची व स्पृश्यांकडून होणाऱ्या अवमानाची जाणीव इतकी भयंकर असते कीं, केवळ जुन्या युगाची दिशा बदलली एवढ्यामुळे त्या समाजाला एकदम समाधान वाटेल अशी आशा धरणे वेडेपणाचें ठरेल. आणि त्या दृष्टीनें, म्हणजे काम फार मंदगतीने चालले आहे अशा अर्थाची टीका अस्पृश्य नेत्यांनी काँग्रेसवर व स्पृश्यांवर केली असती तर ती सयुक्तिकच होती. पण तेवढ्यानें भागले नाहीं. डॉ. आंबेडकर, मद्रासकडचे भाग्यारेड्डी व इतरहि अनेक अस्पृश्य पुढारी यांनीं, काँग्रेसनें व स्पृश्य समाजानें या बाबतीत कांहींच हालचाल केली नाहीं, असें प्रतिपादन करण्यास सुरवात केली. वर सांगितलेले जे प्रयत्न, त्यांचें त्यांना मुळींच महत्त्व वाटेनासे झाले, इतकेंच नव्हे तर, अस्पृश्य समाजाला मागल्याप्रमाणेच गुलामगिरीच्या अवस्थेत डांबून टाकण्याचे काँग्रेसचें, महात्माजींचे व एकंदर स्पृश्य समाजाचे धोरण आहे, असे ते म्हणूं लागले. १९३१ साली गोलमेज परिषदेत व त्यानिमित्तानें हिंदुस्थानांतहि श्रीनिवास, रा. ब. राजा, एम् व्ही. भाग्यारेड्डी, डॉ. आंबेडकर प्रभृति अस्पृश्य पुढाऱ्यांचीं जीं भाषणे झाली त्या सर्वांचा हाच सूर होता. १९३१ सालापर्यंत अस्पृश्यांनी असा अविश्वास दर्शविला यांतहि एकवेळ नवल वाटण्याजोगे कांहीं नाहीं. कारण प्रत्यक्ष प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनें दृश्य अशी प्रगति त्यावेळपर्यंत थोडीच झाली होती. पण १९३७ साली काँग्रेसच्या हाती सत्ता आल्यानंतर तिनें या बाबतीत कायदे करून खरोखर फार मोठी प्रगति केली. तेवढ्यावरून स्पृश्यांच्या हाती सत्ता गेली तर येथे पुन्हां ब्राह्मणी राज्य सुरू होईल, पुन्हां चातुर्वर्ण्याची प्रस्थापना होईल, पुन्हां अस्पृश्यतेचे नियम कडक होतील ही अस्पृश्यांच्या मनांतली भीति नाहींशी व्हावयास हवी होती, पण आश्चर्य असे की १९४५ सालीं डॉ. आंबेडकरांनी 'व्हॉट काँग्रेस ॲंड गांधी हॅव डन् टु दि अनटचेबल्स्' हे पुस्तक लिहून काँग्रेसवर पुन्हां ब्राह्मणी राज्याचे आरोप पहिल्यापेक्षा जास्त कटुतेने व त्वेषानें केले आहेत. आणि त्यानंतर १९४८ सालीं स्वातंत्र्य- प्राप्तीनंतर नवी घटना स्वतः घडवीत असतांनाहि 'हू वेअर दि अनूटचेबल्स्' हे पुस्तक लिहून त्याच्या प्रस्तावनेंत तेंच मत प्रतिपादिलें आहे. 'आज सर्व पांडित्य, सर्व विद्याध्ययन ब्राह्मणवर्गांतच आहे व अस्पृश्यता व एकंदर विषमता कायम ठेवण्यात त्यांचा स्वार्थ असल्यामुळे तो वर्ग अस्पृश्यतानिवारणास व एकंदर क्रान्तिकारक विचार स्वीकारण्यास कधींच तयार होणार नाहीं.' असें या प्रस्तावनेंत त्यांनी म्हटले आहे. अर्थात् येथे केवळ ब्राह्मणांविरुद्ध कटाक्ष असला तरी आंबेडकरांचा दंश सर्वच सवर्ण हिंदूवर आहे. नेहरू, टिळक, परांजपे यांच्याच मापानें आपल्या पुस्तकांत त्यांनी गांधी, वल्लभभाई यांना मोजले आहे. महात्माजींबद्दल तर ते अत्यंत कडवटपर्णे लिहितात. आणि या सर्वांला प्रधान कारण एकच कीं अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाला महात्माजींनीं विरोध केला. वास्तविक डॉ. आंबेडकरांचेंहि मत एकदां मिश्र मतदारसंघाला अनुकूल होते. पुढे त्यांचे मत बदललें. पण तेवढयामुळे महात्माजींना त्यांनीं शत्रु लेखावें हें सयुक्तिक वाटत नाहीं. पण हा वाद आतां जुना झाला आहे. आणि त्यांतील कडवटपणा अस्पृश्यांच्या मनांत शिल्लक असला तरी त्याचा जोर कमी झाला असल्यामुळे त्याचा फारसा विचार करण्याचे कारण नाहीं.

आजचे मनु- डॉ. आंबेडकर

 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अस्पृश्यता निवारणाच्या दृष्टीने काँग्रेसनें एक महत्कृत्य केले. डॉ. आंबेडकरांनाच पंडित नेहरूंनी भारताची घटना तयार करण्याचे काम सांगितलें. हे सांगतांना पंडितजींनी जणूं अशीच भूमिका घेतली होती: 'यापूर्वी आम्हीं सवर्णीयांनी समाजरचनेचे सिद्धांत ठरविले, नियम केले व त्याच्या आधारे तुमच्यावर घोर अन्याय केला, आतां त्याचे परिमार्जन करण्याची संधि आम्हांला आली आहे. ती आम्ही घेत. आतां समाजरचनेचे सिद्धांत तुम्ही ठरवा, नियम तुम्ही करा. आम्ही नियम केले, आणि ते तुम्हांला उत्कर्षकारक व सुखप्रद असे असले तरी त्यांत संशयाला जागा राहील, तेव्हां नवी समाजरचना तुम्हीच करा. त्या चौकटींत बसण्यास आम्ही तयार आहोत.' स्पृश्य समाज, त्यांतहि ब्राह्मण व त्यांतहि स्मृतिकार मनु यांवर आंबेडकरांचा भयंकर कटाक्ष आहे. तेव्हां त्याच स्पृश्य समाजाने मूर्धस्थानी अधिष्ठित केलेले ब्राह्मण महामंत्री नेहरू यांनी नव्या काळच्या मनूचेंच कार्य करावयास एका थोर अस्पृश्य पंडिताला विनंति करावी हे नव्या काळाला सर्वथैव उचित असे झाले आहे. या कृत्याने काँग्रेसनें युगायुगांचीं घोर पापें तत्त्वतः तरी धुवून टाकलीं आहेत. यासाठी तिला द्यावें तितके धन्यवाद थोडेच आहेत.
 स्वातंत्र्य प्राप्त होतांच येथें पुन्हां ब्राह्मणी राज्य सुरू होईल आणि अस्पृश्यांचा पूर्वीसारखाच छळ सवर्णीय करूं लागतील ही त्यांच्या मनांतील भीति, एका अस्पृष्टाकडेच नवी घटना तयार करण्याचे काम देण्यांत आलें हें पाहून कमी झाली असेल असें वाटतें. डॉ. आंबेडकरांचें मात्र त्यांनी स्वतःच ती घटना तयार केली असूनहि, समाधान झालेले नाहीं असे दिसतें. मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, काँग्रेसनें अस्पृश्यांसाठी कांहींहि केलेले नाहीं, हे प्रतिपादन ते करीतच राहिले आहेत. आणि आतां तर आपण केलेली घटना जाळून टाकण्याच्या लायकीची आहे असे ते सांगू लागले आहेत. पण स्वत: नव्या समाजरचनेचे नियम केल्यानंतरहि ते असें म्हणत राहिले तर त्यांचें समाधान कोणी कधीं करूं शकेल असे वाटत नाहीं. पण सुदैवाने एकंदर अस्पृश्य समाज अशा मनःस्थितींत राहिला आहे असे वाटत नाहीं. काँग्रेसच्या आतांपर्यंतच्या सेवेमुळे व या शेवटच्या कृतीमुळे अस्पृश्यांच्या मनांतली भीति नष्ट झाली असून त्यांचा काँग्रेसवरचा व सवर्णीयांवरचा विश्वास बराचसा वाढला असावा असें, गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला जो एकमुखी पाठिंबा दिला त्यावरून, म्हणावेसे वाटते. सवर्णीयांवरचा विश्वास वाढला नसला तरी, निदान आतां येथून पुढे स्वराज्यांत आपल्या सर्व प्रकारच्या गुणांना व कर्तृत्वाला जास्त अवसर मिळेल इतकें त्यांना वाटू लागले असले तरी जुनें युग काँग्रेसनें पालटले असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं.
 स्पृश्य व अस्पृश्य हीं हिंदुस्थानचीं दोन शकले सांधून देण्याचें महाकार्य काँग्रेसने केले आहे. आतां हीं शकले एकजीव होऊन हा समाज अभंग होऊन जाणे, हे केवळ कालावधीचे काम आहे. अर्थात् तेहि सोपे आहे असें नाहीं. त्यासाठी दोन्ही समाजांना फार मोठीं पथ्ये पाळावी लागतील, फार विवेकानें व संयमाने॑ वागावें लागेल; पण हे घडून येईल अशी आशा वाटते.
 अस्पृश्य समाजाविषयींचें बहुतेक विवेचन येथे संपले. आणखी कांहीं विचार सांगावयाचे आहेत. पण आदिवासी व अस्पृश्य या दोघांनाहि ते साधारण असल्यामुळे प्रथम आतां आदिवासी समाजाविषयीं विवेचन करावयाचे आहे.

आदिवासी

 भरतभूमीत प्राचीन काळापासून आजपर्यंत भिन्न वर्णांच्या, भिन्न रक्तांच्या, भिन्न धर्मांच्या, भिन्न परंपरांच्या, भिन्न संस्कृतींच्या शेकडों जमाती येऊन स्थायिक झालेल्या आहेत. येथल्या अगदी मूळच्या रहिवाशांना आज आदिवासी किंवा आदिद्रवीड असें म्हणतात. त्यांचा संसार येथे चालू असतांना द्रवीड लोक येथे आले व त्यांच्यामागून आज ज्यांचा विशेष बोलाबाला आहे ते आर्य लोक आले. हा ठोकळ हिशेब झाला. पण या भूमीच्या चित्रपटाकडे पाहिले तर येथे वरच्याशिवाय आणखी असुर, दास, यवन, चीन, शबर, किरात, पुलिंद, बर्बर, यक्ष, गंधर्व, किन्नर, विद्याधर, वानर इ जमाती वेदकाळीं होत्या असे दिसतें. आणि आजचें संशोधन असें सागते की, त्यांच्यापैकी कांहीं जमाती आर्याइतक्याच सुधारलेल्या होत्या, तर कांहीं अगदी रानटी होत्या. यानंतर ऐतिहासिक काळाकडे पाहिलें तर शक, युएची, कुशान, हूण, मग, ग्रीक अशा अनेक जमाती, लाखांच्या संख्येने येथे येऊन शेकडो वर्षे स्थिर झालेल्या दिसतात. शिकंदराच्या काळापासून हर्षाच्या काळापर्यंत या जमातींची नऊ आक्रमणें भरतभूमीवर झालीं व तेवढीं सर्व येथील वीरपुरुषांनी मारून काढून या भूमीचें स्वास्थ्य अबाधित राखिलें, यानन्तर अर्वाचीन काळांत प्रथम मुसलमानांची आक्रमणे सुरू झालीं. हे येथे येणारे मुसलमानहि असेच भिन्न वंश, भिन्न परंपरा, भिन्न संस्कृति, भिन्न पंथ यामुळे परस्परांपासून विलग होते. अरब, तुर्क, मोंगल, इराणी, अफगाण असे अनेक वंश, शिया, सुनी, सूफी असे अनेक पंथ या प्रकारचे त्यांच्यांतहि अनेक भेद होते. त्यांचा सहाशे सातशे वर्षे सहवास व राज्य येथे झाल्यामुळे मूळच्या भारती समाजाच्या वैचित्र्यांत व त्यामुळे येथील गुंतागुंतींत आणखी भर पडली. या मुसलमानांच्या नंतर पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज हे लोक येथे आले आणि विजेते म्हणून शेकडों वर्षे येथें स्थायिक झाले.
 अशा या शेकडों जमातींचा एकजीव करून त्यांच्यांतून एक समाज निर्माण करणे हें कार्य किती कठीण, किती दुःसाध्य आहे, याची कोणालाहि सहज कल्पना येईल. आणि ज्यांना येणार नाहीं त्यांनीं, अशा तऱ्हेच्या अनंत भिन्न जमाती ज्या भूभागांत एकत्र येऊन वसलेल्या आहेत, अशा भूभागांकडे दृष्टि टाकावी व तेथील नेत्यांना हें कार्य कितपत साधले याचा विचार करावा.

हिंदु समाजाचा जन्म

 आज हिंदु समाजाचा विचार करूं लागलों म्हणजे आपण चटकन् म्हणतों कीं, हा समाज एक समाज आहे या म्हणण्याला कांहीं अर्थ नाहीं. आणि जो हिंदुसमाज आपल्याला घडावयाचा आहे त्याच्या तुलनेने आपण विचार केला तर ते अगदी खरें आहे. पण आपण जरा दुसऱ्या बाजूने विचार करावा. वर सांगितल्याप्रमाणे तुलनेने पहाण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपली टीका जरा सौम्य करावी असे आपल्याला वाटेल. युरोप खंडाचा आपण विचार करूं या. या भूभागांत आज दोनतीन हजार वर्षे अशाच अनेक जमाती येऊन रहात आहेत. त्या जमाती भारतांतल्यासारख्या एकमेकांपासून पराकाष्ठेच्या भिन्नहि नाहींत. इसवी सनाच्या सातव्या आठव्या शतकापर्यंत या सर्व ख्रिस्ताच्या अनुयायी झालेल्या आहेत. असे असून, सर्व युरोप म्हणजे एक देश आहे आणि आपण सर्व युरोपी म्हणजे एक समाज आहों, ही कल्पना तेथे वातावरणांतहि उदित झाली नाहीं. आपण तुलना करावयास बसलों म्हणजे इंग्लिश समाज, जर्मन समाज हे डोळ्यांपुढे ठेवून हिंदुसमाजाचा विचार करतों. हिंदुसमाज व येथून पुढे भारती समाज तितका संघटित व पराक्रमी व्हावा ही आपली आकांक्षा असल्यामुळे त्या दृष्टीने ही तुलना करण्यास हरकत नाहीं. नव्हे, ती अवश्य आहे; पण आतांपर्यंत झालेल्या विशेषत: इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत झालेल्या- कार्याची चिकित्सा करतांना अशी तुलना करणे केव्हांहि युक्त होणार नाहीं. कारण इंग्लिश किंवा जर्मन समाज यांचा जीव अगदी लहान, आणि त्यांच्यांतील भेद फारच कमी. तेथे राष्ट्ररूपानें संघटित झालेले बहुतेक लोक एकधर्मी, एकभाषी, आणि विशेष म्हणजे जवळजवळ एकवंशी आहेत. तांत्रिकरीत्या त्यांच्यांत वंशभेद असला तरी अगदीं गोरे व अगदीं काळे, उंच नाकाचे व बसक्या नाकाचे, अत्यंत सुरेख व अत्यंत कुरूप, अत्यंत सुसंस्कृत व अत्यंत रानटी अशी भिन्नता त्यांच्यांत नव्हती; यामुळे इंग्लंड, जर्मनी या देशांत त्यांची संघटना झाली ही नवलाची गोष्ट नसून तितकी बलिष्ठ संघटना स्पेन, इटली, पोलंड व मध्य युरोपांतील देश, येथें होऊ शकली नाहीं, ही नवलाची गोष्ट आहे. तेव्हां अशी तुलना करून हिंदुसमाजाकडे पाहणे योग्य नाहीं. इतका विशाल भूखंड, इतक्या विविध जमाती व इतकी कमालीची संस्कृतिभिन्नता असा योग ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणच्या लोकांनीं, तेथल्या समाजधुरीणांनीं त्या मानवसमूहाला एकरूप देण्याचे काय प्रयत्न केले व ते किती यशस्वी झाले, ते पाहून मग तुलना करावी. तशी केली तर असें दिसेल कीं, अखिल भरतखंड हा एक देश आहे व आपण सर्व हिंदु मिळून एक समाज आहौ हा जो भाव भारतीयांच्या चित्तांत येथल्या आर्यद्रविडअसुर नेत्यांनी निर्माण केला त्याला जगाच्या इतिहासांत तुलना नाहीं. हा भाव केवळ भाव म्हणूनच राहिला. त्याला प्रभावी अशा निष्ठेचे रूप आले नाहीं, हे खरे; पण एवढ्या मोठ्या मानवसमूहांत एक भाव निर्माण करणे ही गोष्ट सुद्धां कांहीं लहानसहान नाहीं. अखिल हिंदुस्थानांत आपण एक आहोत ही मनोमन साक्ष नसती तर काय झाले असतॆ, याचा विचार करावा. आज आपण संघटना करावयास निघालों त्यावेळी अखिल भरतखंड एक आहे, हे गृहीत धरून पुढे चाललो आहो. ही पूर्वपुण्याची केवढी अलौकिक जोड आहे! भावी मंदिराचा आयताच बांधून मिळालेला हा पाया किती भव्य आहे ! त्याच्या अभावी आपली युरोपसारखी किंवा दक्षिण अमेरिकेसारखी किंवा पूर्वेकडील अनाम, सयाम, जावा, सुमात्रा, बोर्निओ या प्रदेशांसारखी स्थिति झाली असती. हा सर्व मिळून एक देश आहे व आपण सर्व मिळून एक समाज आहे, हा भाव- निष्ठा तर नाहींच- पण हा भावहि- त्यांच्या स्वप्नांत कधी आलेला नाही. त्यामुळे तेथें सर्व भिन्न देशच आहेत. आज सर्व युरोपखंड हा एक देश व्हावा व सर्व युरोपियांचा एक समाज व्हावा अशी निकड तेथील विचारी नेत्यांना वाटू लागली आहे; पण ते स्वप्न पहाण्यापलीकडे आपणांस जातां येईल अशी त्यांना मुळींच आशा नाहीं. पश्चिम युरोपांतील देशांची संस्कृति व तेथील नागरिकांचे रंगरूप हें पुष्कळसें सारखे आहे. पण तेवढ्यांचा सुद्धां एक देश व एक समाज घडविणे हें अशक्यप्राय म्हणून तेथील नेत्यांना सोडून द्यावे लागत आहे. फार पूर्वीच्या काळीच आर्यद्रविडअसुर नेत्यांनी अवधान राखून येथल्या अनंत भिन्न जमातींच्या भिन्न अहंकारातून, अस्पष्ट, अस्फुट, मंद असा का होईना, पण एक अहंकाराचा सूर निर्माण करण्याचे जसे प्रयत्न केले तसे तेथील नेत्यांनी केले असते तर ! आपण भारताची संघटना करण्यास उद्युक्त होतांच, अखिल भरतखंड एक आहे, व आपण सर्व एक समान आहो, ही गोष्ट गृहीत धरूनच निघालों. सर्वांच्या मनांत असलेली ही भावना आतां आपल्याला फक्त दृढ करावयाची आहे. पण युरोपमध्ये ती निर्माण करण्यापासून तयारी हवी आहे. आणि ते जमणे जवळजवळ अशक्य आहे. कारण आतां तेथील भिन्न अहंकार जास्त कठीण, नास्त निबर व जास्त विसंवादी होऊन बसले आहेत. हीच गोष्ट इस्लामी देशांची आहे. तुर्कस्थान इराण, अफगाणिस्थान, आरवस्थान, बलुचिस्थान, इजिप्त हे देश आज शेकडों वर्षे इस्लामचे अनुयायी, एकधर्मी, आहेत. पण एवढा प्रदेश मिळून एक देश, अशी भावना तेथील नेत्यांना निर्माण करता आली नाहीं. इजिप्त, अरेबिया, सिरिया, ट्रॅन्सजॉर्डन हे तर एकधर्मी व एकवंशी देश आहेत. पण त्यांनाहि एक अरबराष्ट्र, एक समाज करता आला नाहीं व अजूनहि येत नाहीं. या दृष्टीने तुलना करून पाहिले म्हणजे भारताच्या प्राचीन नेत्यांच्या कार्याची महती आपल्या ध्यानांत येईल.

सहिष्णुता

 येथें ज्या अनेक जमाती होत्या व ज्या अनेक बाहेरून आल्या त्यांना, त्यांनी त्यांची धार्मिक वा सामाजिक मतें सोडली पाहिजेत असा, किंवा अमुक मते किंवा आचार पतकरले पाहिजेत असा, कसलाहि आग्रह न धरतां येथल्या समाजधुरीणांनी हिंदुत्वाच्या कक्षेत समाविष्ट करून घेतले. यासाठी त्यांनी कोणच्याहि लोकायत्त उदारमतवादी देशांत सांपडणार नाहीं इतकी परमतसहिष्णुता दाखविली आहे. नव्या समाजाने आपली सर्व धर्ममतें, श्रद्धा, आचार हीं सोडून जुन्या समाजांत विलीन होऊन गेलें पाहिजे असा आग्रह न धरतां, दोन्ही समाजाच्या मतांचें व आचारांचें कांहींसें मिश्रण घेऊन तें नवीन व्यापक रूप सर्वांनीं स्वीकारावें असें धोरण आर्यद्रविडादि नेत्यांनी स्वीकारल्यामुळे अनेक जमाती येथे परस्परांशेजारी राहून सलोख्याने नांदू लागल्या आणि मग कालांतरानें राजकीय, आर्थिक व कित्येक ठिकाणी वैवाहिक संबंधानेंहि त्यांच्यांतील अनेक जमाती एकरूप होऊं लागल्या. आर्य व असुर यांचे विवाह झाले. आर्य व द्रवीड यांचे तर सर्रास रक्तसंबंध होऊन नर्मदेच्या दक्षिणेस या दोन जमाती भिन्न राहिल्याच नाहींत. ज्या जति अशा रीतीनें एक झाल्या नाहीत त्या जातिव्यवस्थेत आर्थिक दृष्टीनें परस्परावलंबी होऊन राहिल्या. पण कोणचीहि जमात कशाहि स्वरूपांत येथें राहिली तरी हिंदुत्वाच्या सूत्रांत तिची गुंफण झाल्यावांचून राहिली नाहीं. आणि एकदां या कक्षेत आल्यानंतर आपल्या गुणकर्माप्रमाणे कोणच्याहि उच्च पायरीवर जाण्यास सर्वांना मुभा होती. रजपूत हे कोणाच्या मतें बाहेरून आलेले आहेत. पण क्षत्रिय वर्णाच्या उच्च पदवीवर त्यांना सहज जातां आले. 'मग' जमातीचे लोक येथे आल्यावर ब्राह्मणवर्णीय झाले. वन्य जमातींचे इतिहास लिहिणाऱ्यांपैकी अनेकांनी त्या जमाती हिंदुत्वांत समाविष्ट झाल्यावर क्षत्रिय म्हणून मान्य झाल्याची उदाहरणे दिली आहेत. इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत ही एकीकरणाची, सहिष्णुतेची, संग्रहाकतेची व उदारतेची परंपरा चालू होती असें दिसते. त्या काळाच्या आधींच्या आठदहा शतकांत शक, युएची, कुशान, हूण इ. सातआठ जमातींचे प्रचंड लोंढेच्या लोंढे भारतांत आले व लक्ष लक्ष संख्येने येथे स्थायिक झाले; पण ते आपल्या भिन्न रूपानें हिंदुस्थानांत आज कोठेंहि दिसत नाहींत. ते कोट्यवधि लोक हिंदुसमाजानें आत्मसात् करून टाकले. इतका जिवंतपणा त्या वेळेपर्यंत हिंदुसमाजांत होता. पुढे मात्र याविषयींचें तत्त्वज्ञान, घोरण, आचार- सर्वच बदलून गेले. भेद टिकवून धरण्याचीच प्रवृत्ति आपल्या समाजांत बळावली व त्यांतच लोक भूषण मानूं लागले. त्यामुळे तोपर्यंत चालत आलेली एकीकरणाची प्रक्रिया थांबून जुने भेद सांधले गेले नाहीत आणि नवीन ज्या मुसलमान जमाती येथे आल्या त्यांना आत्मसात् करण्याचे कार्य कोणी प्रारंभिलें सुद्धां नाहीं. या विपरीत धोरणामुळे आजच्या हिंदुसमाजापुढे अनेक बिकट प्रश्न येऊन उभे राहिले आहेत.
 हा जुना इतिहास थोड्याशा विस्ताराने देण्याचा हेतु असा कीं सातव्या शतकांत थांबलेली समाजाच्या एकीकरणाची ही प्रक्रिया आपण नुसती पुढे चालू केली तर अस्पृश्य, आदिवासी व मुसलमान यांच्यासह म्हणजे यांना संगृहीत करून घेऊन नवा भारती समाज निर्माण करणे आपणांस सुलभ होईल हे आपल्या ध्यानी यावें.
 पण हा इतिहास पहाण्यांत आणखी एक हेतु आहे. अलीकडे मागले इतिहास वेदकाळापर्यंत चाळून त्यांतून जुने अन्याय व जुनीं वैरें उकरून काढून त्या अन्वयें भावी धोरणे आखावीं असे प्रयत्न चालू आहेत. ब्राह्मण- ब्राह्मणेतर वादाचे विवेचन केले त्यांत असली उदाहरणे भरपूर दिली आहेत. त्याच ग्रंथांतून अस्पृश्यसमाजाविषयीं अशाच तऱ्हेचे प्रतिपादन केलेले आढळते. त्याशिवाय 'हू वेअर दि अन्टचेबल्स' अशासारखे ग्रंथाहि याच हेतूने लिहिले जात आहेत. आतां आदिवासी जमाती पुढे येऊं लागल्या की त्यांच्यांतून नवे पंडित निर्माण होऊन तेहि याच तऱ्हेचे ग्रंथ लिहूं लागतील. केवळ सत्यसंशोधन किंवा इतिहासजिज्ञासा एवढयाच बुद्धीने हे प्रयत्न झाले तर त्यांचे कोणीहि स्वागतच करील. पण सध्यांची प्रक्रिया निराळी आहे. जुन्या काळच्या अन्यायाच्या जाणीवा चेतवून नवा संताप त्या त्या जमातीत निर्माण करावा आणि प्रत्येक जमातीने आपल्याला स्वतंत्र स्थान या भरतभूमीत मागावें, अशा वळणानें हें पांडित्य चाललेलें दिसते. द्रविडीस्थानची मागणी, शिखीस्थानची मागणी, स्वतंत्र नागराष्ट्राची मागणी, या मागण्या याच जातीच्या आहेत. या मागण्या प्रबळ झाल्या, त्या त्या बाबतींत त्यांचा प्रभाव पडून त्यांना त्या जमातीचे पाठबळ मिळालें, तर हिंदुस्थानचीं अनंत शकले होऊन येथे युरोपांतल्याप्रमाणे नित्य युद्धे, मारामाऱ्या, आक्रमणे यांचे खैदान सुरू होईल. आणि त्यांमध्ये, ज्यांनी अन्याय केला त्यांचीच नव्हे तर आतांपर्यंत अन्यायानें जे पीडिले गेले त्यांचीहि आहुति पडून, हा भारती समाज पूर्वीपेक्षांहि छिन्नभिन्न होऊन, पुन्हां त्याला गुलामगिरी प्राप्त होईल.
 या जुन्या इतिहासाच्या संशोधनाविषयीं एक महत्त्वाचा विचार सांगावासा वाटतो. भारतीय व पाश्चात्य पंडितांनी या प्राक्- कालीन घडामोडींविषयीं इतकीं परस्पर भिन्न मतें सांगितलीं आहेत, इतक्या वेगळाल्या उपपत्ति बसविल्या आहेत आणि जुन्या घटनांचे इतके वेगवेगळे अर्थ केले आहेत की, त्यांच्या आधारें आज अन्यायाचे खापर किंवा कल्याणबुद्धीचें श्रेय अमक्या एका जमातीस देणें सर्वथा अशक्य आहे हें कोणाच्याहि सहज ध्यान येईल. आणि त्यावरून आजचे धोरण ठरविणे हें तर अगदीच वेडेपणाचें होईल, येथें बाहेरून कोण आले व मूळचे येथले कोण, हें निश्चित झालेलें नाहीं. आर्य म्हणजे नेमके कोण, असुर, दास, दस्यु, शूद्र, हीं अभिघाने मागल्या काळी नेमकी कोणाला उद्देशून लाविलीं होतीं हे नक्की सांगता येत नाहीं. चातुर्वर्ण्य ही आज अन्याय्य वाटणारी संस्था आर्यानीं निर्माण केली की द्रविडांनी, हेहि निश्चित ठरवितां येत नाहीं. आश्रमधर्माची स्थापना तर प्रल्हादपुत्र कपिलासुर या असुराने केली, असे कोणाकोणाचे मत आहे. वेदकाळीं व त्यानंतरच्या काळांत येथे अनेक लढाया झाल्या. त्यांत उभयपक्ष नेमके कोणचे होते, म्हणजे त्या लढाया आर्यअनार्यांत होत्या की आर्याआर्यांत होत्या, का आर्य व दस्यु, आर्य व असुर यांच्यांत होत्या, याविषयीं पंडितांत एकमत नाहीं. अस्पृश्यता नेमकी केव्हां निर्माण झाली, कां निर्माण झाली, आणि अस्पृश्य हें मूळचे कोण याविषयीं तर एखादी उपपत्ति सांपडली आहे असं वाटण्याइतकेहि समाधान मिळालेले नाहीं. असा एकंदर मागील संशोधनाचा डोलारा अनिश्चित व डळमळीत पायावर उभा असतांना त्याच्या आधारे आजचीं परस्परांविषयीची धोरणे ठरविणें असमंजसपणाचें होईल. भारती समाजाच्या एकीकरणाविषयी एवढे प्रास्ताविक विचार सांगून आदिवासींच्या प्रश्नाविषयी थोडक्यांत निरूपण करतो आणि मग अस्पृश्य व आदिवासी या दोन्ही समानांविषयीं कांही सामान्य कल्पना सांगून हें विवरण संपवितों.
 अस्पृश्यतेच्या प्रश्नाप्रमाणेच आदिवासींच्या प्रश्नाकडे काँग्रेसने स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वीपासून लक्ष पोंचविलेले आहे. १९३७ सालीं सत्ता हात आली तेव्हांपासून बहुतेक प्रांतिक सरकारांनी आपापल्या प्रांतांत आदिवासी मंडळे स्थापून कातकरी, वारली, भिल्ल, गोंड, संताळ, नाग, भूईया, भिनवर, महातोस, कोरकू, होस, कोल, मुंडा, इ. जमातींच्या उत्कर्षासाठी प्रयत्न आरंभिले. त्याच्याहि आधी इंग्रज मिशनऱ्याप्रमाणे या वन्य जमातीच्या वस्तीत जाऊन राहून त्यांना सुसंस्कृत जीवनाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न अनेक समाजसेवकांनी केला होता. आतां स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी भारताच्या घटनेंतच योजना केली असून तिच्या अन्वयें अध्यक्षांनी लक्ष्मीदास श्रीकांत या त्याकामी आतांपर्यंत सर्व आयुष्य ज्यांनीं वेचले आहे अशा, गृहस्थांची नेमणूक केली आहे. सात जून १९५२ रोजीं दिल्लीला या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची व सरकारी अधिकाऱ्यांची परिषद् भरली होती. अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, महामंत्री नेहरू, उपाध्यक्ष राधाकृष्णन् हेहि या परिषदेला जातीने उपस्थित होते. यावरून या प्रश्नाचे अस्पृश्यांच्या प्रश्नाइतकेच महत्त्व आहे याची पुरेपूर जाणीव भारतीयांना झाली आहे असे वाटते.
 या लोकांना जमिनी द्याव्या, सावकारादि आक्रमकांपासून त्यांना संरक्षण द्यावें, त्यांच्यासाठी शाळा, आरोग्यभुवने, वसतिगृहे, शिष्यवृत्या, अधिकाराच्या जागा यांची सोय करावी, आणि हजारों कार्यकर्ते तयार करून भारताच्या नागरिकत्वाची पदवी या वन्य जमातींना त्वरेनें प्राप्त करून द्यावी, असा सरकारचा संकल्प आहे. त्याप्रमाणे आतां कार्याला सुरवात होऊन हळूहळू या जमातींची प्रगति होऊं लागेल. ही प्रगती होऊं लागतांच अस्पृश्याप्रमाणेच त्यांच्या जमातींविषयहि अनेक तात्त्विक प्रश्न निर्माण होतील. त्यांचा विचार करण्यास व या जमातींविषयीं धोरण ठरविण्यास सोपे जावें म्हणून कांहीं तात्त्विक व ऐतिहासिक चर्चा येथे करावयाची आहे.
 गेली साठसत्तर वर्षे या देशांत दशवार्षिक शिरगणति होत असते. त्यावेळी या शिरगणतीवरून मिळालेल्या माहितीच्या आधारें येथील सामाजिक प्रश्नांचे तात्त्विक मंथन करण्यासाठी मोठमोठे तज्ज्ञ अधिकारी नेमलेले असतात. बेनस्, शूबर्ट. डॉ. इटन, सर हर्बर्ट रिसले, ड्रॅकप, लेसी, रॉय, बसू, मुजुमदार ही या क्षेत्रांत अभ्यास करणारी प्रमुख विद्वान् मंडळी होत. त्यांनीं त्या त्या वेळीं जी विवेचनें करून ठेवली त्यावरून मिळणारी माहिती व त्यांनी सांगितलेले विचार आपल्या समाजाच्या घडणीच्या दृष्टी प्रत्येक सुशिक्षित भारतीय नागरिकास माहीत असणे अवश्य आहे असे वाटल्यावरून ते येथे दिले आहेत.

मूळचे कोण ?

 पहिली महत्त्वाची गोष्ट अशी कीं, या भूमतले अगदीं मूळचे रहिवासी कोण हे निश्चितपणे सांगणे शक्य नाहीं. आर्यांच्या आधीं, द्रविडांच्याहि आधी आलेल्या म्हणून आदिवासी किंवा आदिद्रवीड असें म्हणून सध्यांच्या वन्य जमाती या मूळच्या रहिवासी असे आपण समजतों; पण या पंडितांच्या मतें भिल्ल, गोंड, संताळ, महतोस, भूईया या वन्य जमाती सुद्धां येथें बाहेरून आलेल्या असण्याचा संभव आहे. कोणाच्या मतें येथें त्यांच्यापूर्वी निग्रोवंशाचे लोक असावे. दुसरें असें की भिल्ल, गोंड, इ० जमाती आज जेथे राहतात तेथेंच त्या पहिल्यापासून राहिलेल्या आहेत असें नाहीं. एक आदिवासी जमात दुसरीवर आक्रमण करून तिला देशोधडीला लावते व आपण तेथे वस्ती करते, हा प्रकार मागें सारखा चालू होता. कोल या जमातीनें भूईया जमातीला उठविले. गोंड व कामर यांनी महतोस, कोरव, भिंजवर यांना उठवून विलासपूर हद्दीत हाकलून लावले. तात्पर्यार्थ असा की, आम्ही या अमक्या भूमीचे पहिले वारसदार, असा इक्क इतिहासाच्या आधारें सांगून नसते कलह निर्माण करण्याची जी आज प्रवृत्ति निर्माण होत आहे तिला या पंडितांचा मुळींच आधार नाहीं.
 दुसरी गोष्ट- हिंदु समाजाने आजपर्यंत या वन्यजमातींच्या उद्धारार्थ कसलेच प्रयत्न केले नाहीत, त्यांची केवळ उपेक्षा केली, असा समज आहे, तो अगदी भ्रामक आहे असे या संशोधकांचे मत आहे. वर ज्या अनेक जमाती सांगितल्या त्यांपैकी प्रत्येक जमातीचे पुष्कळसे लोक हिंदुधर्माच्या कक्षेत समाविष्ट करून घेण्यांत आलेले आहेत. आणि अशा हिंदूकरणामुळे त्या आदिवासी जमातींची सर्वतोपरी प्रगति झालेली आहे असा या पंडितांनीं निर्वाळा दिला आहे. (दि ॲबोरिजिनस्- सो कॉल्ड- अँड देअर फ्यूचर - डॉ. जी. एस्. घुर्ये- या पुस्तकाच्या पहिल्या तीन प्रकरणांतून ही माहिती व विचार संकलित केले आहेत.) मात्र हें हिंदूकरण वर सांगितलेल्या पद्धतीने झालेले आहे. या जमाती हिंदुत्वाच्या कक्षेत आल्या; पण त्यांच्यावर सक्तीनें कसलेच आचारविचार लादले गेले नाहींत. हिंदूचीं दैवतें, आचार, विचार, तत्त्वज्ञान त्यांनी स्वीकारले. त्याचप्रमाणे ज्यांच्याशेजारी या जमाती राहू लागल्या त्या हिंदूंच्या धर्ममतांवर व आचारांवर त्यांच्या मतांचा व आचारांचाहि परिणाम झालेला आहे. या लोकांचा हिंदुत्वांत समावेश झाला तो सर्वस्वी खालच्या थरांत झाला असेंहि नाहीं. भिल्ल, गोंड, कोरकू यांच्यांतील कांहीं शाखांनी आपली खूपच प्रगति करून घेतली व आपण क्षत्रिय आहोत, रजपूत आहोत असा हक्क सांगून त्याला मान्यताहि मिळविली आहे. त्यांतील कांहीं मोठमोठे जमीनदार व कांहीं मोठ्या दर्जाचे शेतकरी झाले आहेत. श्री. विल्स यांच्या मतें पैक्रा कानवार ही जमात म्हणजे हिंदूकरणामुळे होणाऱ्या प्रगतीचा आदर्शच होय. कानवाराप्रमाणेच कुरमी महतोस या जमातीने आपल्या क्षत्रियत्वास मान्यता मिळविलेली आहे. यांची लोकसंख्या सुमारे सात लक्ष आहे.
 हिंदूंच्या संसर्गानें आदिवासी जीवनावर कसलेच वाईट परिणाम झाले नाहींत असें नाहीं. ब्रिटिश राज्यपद्धति रूढ झाल्यावर हिंदूंच्या सरहद्दीवर रहाणाच्या वन्य जमातीमध्ये दारूचे मक्तेदार व सावकार यांनी अगदीं अनर्थ करून सोडला होता. त्याचप्रमाणे जुना धर्म सुटला व नवीन आत्मसात् करता आला नाहीं यामुळे कित्येक जमातींचा अधःपात झाला आहे. पण हे समाजव्यवस्थेच्या मूलतत्त्वांचे दोष नव्हत. आपण त्या मूलतत्त्वांच्या दृष्टीने विचार करीत आहोत. आणि त्या दृष्टीने पहातां, ज्या जमाती मागें राहिल्या त्या स्वतःच्या अंगचा आळस, नाकर्तेपणा, व्यसनाधीनता या दुर्गुणांनीं राहिल्या, असेच या विद्वान् संशोधकांनी आपले मत दिले आहे.

स्वतःची जबाबदारी

 हिंदु समाजरचनेचा व भारती समाजाच्या नव्या घडणीचा विचार करतांना हें सामाजिक निगमन अत्यंत महत्त्वाचे आहे असे मला वाटते. अस्पृश्य समाजाची सध्यांची स्थिति, त्याचा पूर्वेतिहास व त्याची भावी काळांतील प्रगति याविषयीं यावरून कांहीं महत्त्वाचे विचार सुचतात. आज अस्पृश्यांतील कांहीं पंडित, पूर्वकाळी आम्ही येथले राजे होतों, शास्ते होतों, असे सांगतात. 'हू वेअर दि अनटचेबल्स' या आपल्या पुस्तकांत डॉ. आंबेडकरांनीं, सध्यांचे अस्पृश्य म्हणजे भिन्नभिन्न जमातींतून सांडलेले, तुटून निघालेले, फुटलेले असे गांवाच्या सरहद्दीवर गुजारा करून रहाणारे पण सध्यांच्या सवर्णीयांच्याच रक्तामांसाचे लोक होत, असें म्हटले आहे. हीं मतें जर खरी असतील तर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. सध्यांची हीन स्थिति या लोकांना कां प्राप्त झाली, हा तो प्रश्न होय. या प्रश्नाचा अर्थ असा या लोकांवर सवर्णीयांनी जुलूम केला, अत्यंत अन्यायानें व दुष्टपणानें त्यांना वागविलें, त्यांच्या सर्व जीविताचा कोंडमारा करून त्यांना माणुसकीतूनहि खाली ओढले, याविषयी कसलीहि शंका नाहीं. आणि हा घोर अन्याय असून तो हिंदुधर्मायर कलंक होय याविषयींहि दुमत नाहीं. अशी वस्तुस्थिति असल्यामुळे अस्पृश्यांनी स्पृश्यहिंदूवर कितीहि भयंकर टीका केली तरी ती त्यांनी सोसली पाहिजे, असेच माझं मत आहे. पण या तऱ्हेची स्पृश्यांवर जहरी टीका केल्यानंतर अस्पृश्यांनी स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे. आणि तोच प्रश्न आदिवासी जसजसे समंजस होतील तसतसा त्यांनीही आपल्या मनाला विचारला पाहिजे. तो प्रश्न असा- स्पृश्य हिंदूंनीं व त्यांतील श्रेष्ठवर्णीयांनी आपल्यावर जुलूम केला, आपल्याला खाली दडपले हे सर्व खरे असले तरी आपल्या दीन दशेचें, अधःपाताचें, नाशाचं खापर सर्वस्वी त्यांच्या माथ फोडून चालेल का? आपल्या अवनतीला आपण मुळींच जबाबदार नाहीं हे खरे आहे काय ? अशा तऱ्हेचे आत्मानिरीक्षण अस्पृश्य करीत नाहीत; पण ते करणें अवश्य आहे असे वाटते.

 माझे असे ठाम मत आहे कीं, कोणच्याहि समाजाच्या अधःपाताला, त्याच्या दुर्गतीला, पारतंत्र्याला त्याचे आक्रमक, त्याला निर्दाळणारे, त्याला पायदळी घालणारे हे जितके जवाबदार असतात तितकेच किंबहुना त्याहून कांहीं अंशी जास्त त्या समाजाचे लोक जबाबदार असतात. इंग्रजांच राज्य येथे झाल्यावर येथल्या नेत्यांनी हे इंग्रज आमच्या सर्व अवनतीस कारण आहेत असा पुकारा केला. आणि तें चाजवीहि होतें. पण त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या समाजावरहि कमालीचा भडिमार केला. आणि आपल्या आजच्या स्थितीला वास्तविक आपणच जबाबदार आहों हा विचार अहोरात्र त्याच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. लोकहितवादी, विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर, महात्माजी यांचे लेख वरवर चाळले तरी हे दिसून येईल. मागल्या इतिहासाची चिकित्सा करणाऱ्या अस्पृश्यांनी ही कठोर आत्मनिरीक्षणाची भूमिका घेतली नाहीं तर, आपल्या अधःपाताला दुसरे लोकच सर्वस्वी कारण झाले, हा दुबळा विचार त्यांच्या उन्नतीच्या आड आल्याखेरीज रहाणार नाहीं. गोंड, कोरकू, कानवर अशा जाती मुळांत अगदीं वन्य असतांना त्यांनी आणि संताळ, नाग यांनींहि या भूमींत आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत खूपच उंच स्थान मिळविलें. जेथे लढे करावे लागले तेथें तेहि त्यांनी केले. पण खरे म्हणजे या तऱ्हेच्या अभिसरणास हिंदुसमाजाची कधींच हरकत नव्हती. अस्पृश्यांवर सवर्ण हिंदूंनीं व विशेषतः ब्राह्मणांनीं जुलूम केला असा इतिहास आहे, पण आतां असे ध्यानांत येत आहे कीं कित्येक अस्पृश्य जमातींनी ब्राह्मणांना कधींच गुरु मानले नाहीं. आणि ब्राह्मणहि अस्पृश्यांचे धर्मविधि करण्याचें काम बहुधा स्वीकारीत नसत. ब्राह्मण अस्पृश्यांना हीन लेखीतच. पण कित्येक ठिकाण अस्पृश्यहि ब्राह्मणांना हीन लेखीत व आपल्या वस्तीत पाऊल टाकूं देत नसत. डॉ. आंबेडकर ही गोष्ट अभिमानाने सांगतात, (हू वेअर दि अन्टचेबल्स पृ. ७४) आणि अस्पृश्य मूळचे बौद्ध होते असेहि म्हणतात. म्हणजे ज्या रक्ताचे आर्य त्याच रक्ताचे अस्पृश्य. पूर्वी ते एकदां राजसत्ताघीश होते. ब्राह्मणांचा तिटकारा करण्याइतकें मानसिक धैर्य व सामाजिक सामर्थ्य त्यांच्या ठायीं होते. असे असतांना युगानुयुगे अत्यंत भयंकर जुलूम, घोर अन्याय, अगदीं नरकवासाचें जिणे हे सर्व सहन करीत आपण कसे राहिलों, हा प्रश्न अस्पृश्यांनी स्वतःस विचारला पाहिजे. हिंदुस्थान हा १८ लक्ष चौरस मैलांचा देश, आणि सहा हजार वर्षांचा त्याचा इतिहास. एवढ्यामध्ये अर्वाचीन काळचा विचार केला तरी मुसलमान, पोर्तुगीज, इंग्रज यांनी ब्राह्मणांना व एकंदर स्पृश्य हिंदूंना अनेक वेळां नामोहरम केले होते. त्या संधीचा फायदा घेऊन आपण उठावणी करून सवर्णीयांचे हें किळसवाणे वर्चस्व कां नष्ट केले नाहीं, याचा विचार तरुण सुशिक्षित अस्पृश्यांनी केला पाहिजे. शंभर वर्षांपूर्वी पेशव्यांशीं लढून आम्हीं इंग्रजांना राज्य मिळवून दिलें, असें महारांचे नेते म्हणतात. म्हणजे इंग्रजांचे त्यांना अपरिमित साह्य त्याच वेळी झाले होते. त्यांचा आत्मविश्वास तेव्हांच जागृत झाला होता. असें असून गेल्या शंभर वर्षात महारांनी कोणची प्रगति करून घेतली? आज शंभर वर्षांनीं, इंग्रजांनी आम्हांला फसविले, आमचा फक्त उपयोग करून घेतला व मग आम्हांला तोंडघशी पाडले, अशी तरी भूमिका अस्पृश्य घेतात किंवा इंग्रजच आमचे तारक, ते गेले तर पुन्हां हे ब्राह्मण, क्षत्रिय व बनिये आम्हांला नरकांत घालतील, अशी भूमिका पत्करतात. दोन हजार वर्षांत एवढ्या वितीर्ण प्रदेशांत, हजारों उलथापालथी होत असतांना, कोणीहि कोणच्याहि थरांतून कोठेहि जात असतांना, परकीय आक्रमणामुळे, त्यांचा आश्रय करणाऱ्या अस्पृश्यांना शेकडों वेळां प्रगतीची, उच्च जीवन प्राप्त करून घेण्याची संधि मिळालेली असतांना, आज आपल्या हीन दशेचें कारण म्हणजे स्पृश्य हिंदूंचा जुलूम एवढेंच अस्पृश्यांनी म्हणत बसावे हे प्रचाराच्या दृष्टीने युक्त असले तरी आत्मनिरीक्षणाच्या दृष्टीने सर्वस्वी हानिकारक आहे. सवर्णीयांवर त्यांनी टीकेचा भडिमार अवश्य करावा. ते निःसंशय समर्थनीय आहे. कारण त्यांनीं घोर अन्याय केला आहे ही वस्तुस्थितीच आहे. पण त्यापेक्षां शतपट भडिमार त्यांनी स्वतःवर केला पाहिजे. ही भूमिका अस्पृश्यांनी व अदिवासी समाजांनी स्वीकारली तर पूर्व काळीं केव्हां तरी एकमेकांचे वैरी असलेले स्पृश्य, अस्पृश्य व आदिवासी हे समाजमनाच्या दिलदारीचा व उदारवृत्तीचा परिपोष करूं शकतील. आणि तसे झाले तरच भावीं काळांत त्यांच्या संघटनेंतून अभंग, एकसंघ असा भारती समाज निर्माण होऊ शकेल. जुन्या काळी वैरी म्हणून राहिलेले समाज जुन्या वैराचे दंश खेळी मेळीनें विसरतील तरच त्यांचे ऐक्य होऊं शकते. पण आपण पराभूत झालो त्याला आपले प्रमादहि अंशतः कारणीभूत आहेत, असें दोन्ही पक्षांना वाटल्यावांचून खेळीमेळीची भावना निर्माण होणे शक्य नाहीं. तेव्हां स्वतःच्या उत्कर्षाच्या दृष्टीने आणि भारती समाजाच्या पुनर्घटनेच्या दृष्टीनेहि अस्पृश्यांनीं आत्मनिरीक्षणाची भूमिका स्वीकारणे अवश्य आहे असे वाटते.

तारकमंत्र

 आणि ही भूमिका स्वीकारतांच उन्नतीचा एक राजमार्ग त्यांच्या दृष्टीस पडेल. केवळ अस्पृश्यांच्या जातीय उन्नतीच्या दृष्टीने पाहिले तरी अखिल भारताच्या उत्कर्षाची जबाबदारी आपल्यावर आहे हीच भावना त्यांना तारक ठरेल. त्या भावनेचा परिपोष झाला तरच त्यांच्यांतून मोठमोठे शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलाकार, मुत्सद्दी, पंडित, तत्त्ववेत्ते, इतिहासकार, शिक्षणशास्त्रज्ञ असे वैभवशाली पुरुष निर्माण होतील. जातीच्या उन्नतीच्या चळवळी त्यांनी थांबवाव्या असें मला म्हणावयाचें नाहीं. पण अखिल भारताचे चिंतन हा माझ्या मतें जातीय उन्नतीचाच मार्ग आहे. किंवा हे मुळींच पटत नसले आणि केवळ जातीय उन्नति हीच दृष्टि ठेवावयाची असली तरी, त्या हेतूने सुद्धां श्रेष्ठ राष्ट्रीय वैभवाची जोपासना करण्याचा मार्गच त्यांनी अनुसरणें अवश्य आहे. डॉ. आंबेडकरांनीं सुद्धां, आतां आपण राष्ट्रीय दृष्टीनेंच कार्याला लागले पाहिजे, असे उद्गार दिल्ली, हैदराबाद, येथील भाषणांत अनेक वेळां काढले आहेत. पण अस्पृश्य व आदिवासी यांनी कठोर आत्मनिरीक्षणाची भूमिका घेतल्यावांचून, आपल्या अधःपाताला अंशतः तरी आपण जबाबदार आहो ही जाणीव स्वसमाजांत निर्माण केल्यावांचून, ही अखिल राष्ट्रीय निष्ठा व केवळ तिच्यांतूनच निर्माण होणारे वैभव त्यांना प्राप्त होणार नाहीं.
 आजचा जगांतला कोणचाहि देश घेतला तरी पुरातन काळापासून तेथे एकच समाज नांदत होता असे म्हणता येणार नाहीं. मागल्या काळी शेकडों जमाती इतस्ततः भ्रमत होत्या. प्रत्येक देशांत पंधरावीस जमातींचे मिश्रण तर सहज झालेले आहे. या जमाती जेव्हां प्रथम एकत्र आल्या तेव्हांचे त्यांचे संबंध स्नेहाचे, मैत्रीचे, आपुलकीचे असे मुळींच नव्हते; तर शत्रुत्वाचे, जित-जेत्यांच्या वैराचे, भिन्न वंशीयांच्या द्वेषाचे, असेच होते. पण हळूहळू त्यांनी ते शत्रुत्व, ते वैर व द्वेष दृष्टीआड करून ऐक्यपोषक अशा घटकांकडे जास्त लक्ष दिले; व तसे घटक नसतील तर ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेच धोरण भरतभूमीतील आजच्या भिन्न घटकांनीं अवलंबिलें पाहिजे. निदान स्पृश्य हिंदुसमाजानें तरी या तत्त्वाचा कधींहि विसर पडूं देतां कामा नये. अस्पृश्य व आदिवासी यांच्या मनांतील संतापाचे व अन्यायाच्या निष्कृतीचे भाव एकाएकी शमतील असे नाहीं. तें कालगतीचें काम आहे. पण स्पृश्य समाजानें त्यांकडे दुर्लक्ष करून गेल्या शंभर वर्षातील धोरणच एकनिष्ठेने पुढे चालवावयाचे हे व्रत स्वीकारले व भारती समाज संघटित करावयाचाच अशा प्रतिज्ञेने पावले टाकलीं, तर लोकशाहीला अवश्य ती अभंगता आपल्या समाजांत निर्माण होणे अशक्य आहे असे नाहीं.