भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म/महाभारतातील प्रवृत्तिधर्मं
प्रवृत्तिधर्म
इहलोकात जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाचे मोक्ष किंवा आत्मकल्याण हे अंतिम साध्य आहे असा भारतीय तत्त्ववेत्त्यांचा सिद्धांत आहे. मनोनिग्रह, तप व ज्ञान या साधनांनी प्रत्येक सुबुद्ध मानवाने मोक्ष प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणे हेच त्याचे श्रेष्ठ कर्तव्य होय असे एकमुखाने या पुरुषांनी सांगितले आहे. त्यांच्या मते मोक्षसुख किंवा ब्रह्मानंद हा सर्वांत उच्चप्रतीचा आनंद असून त्याच्या प्राप्तीने मानव हा जन्ममरणाच्या दुःखद चक्रातून सुटून जातो व त्याला पुन्हा दुःखाचा स्पर्शही होत नाही. म्हणून ते अतिशय श्रेष्ठ प्रकारचे सुख दीर्घ प्रयत्नाने प्राप्त करून घेऊन प्रत्येकाने आपल्या आत्म्याचे कल्याण साधून घेणे हेच कर्तव्य होय, हा परमधर्म होय असे भारतीय तत्त्ववेत्त्यांचे
निश्चित मत आहे.
मोक्षाचे स्थान
मोक्ष हे प्रत्येक मानवाचे अंतिम साध्य आहे हा सिद्धांत भारतीय तत्त्ववेत्त्यांचा म्हणून सांगितला जातो हे सर्वथैव युक्त असेच आहे. पण त्याबरोबरच या मोक्षसाधनेसाठी संन्यास घेणे, संसार सोडणे, बायकामुलांचा पाश तोडून टाकणे, प्रपंचाच्या उलाढालीतून अलिप्त राहाणे हे अवश्य आहे, असे भारतीयांचे मत आहे, असेही प्रतिपादन केले जाते. हे प्रतिपादन मात्र सर्वथैव प्रमाणशून्य असून समाजाच्या ऐहिक व पारमार्थिक उत्कर्षालाही विघातक आहे. भारतीयांच्या विनाशाला व दुर्गतीला जी काही अनेक कारणे झाली त्यांत ही संसारविन्मुखता, वैयक्तिक व राष्ट्रीय प्रपंचाबद्दलची अनास्था हे एक प्रमुख कारण आहे हे निर्विवाद होय.
महाभारतात प्रवृत्तिधर्म हाच प्रामुख्याने सांगितलेला आहे हे मत लो. टिळकांनी गीतारहस्यात सिद्ध करून दाखविलेले आहे. त्याविषयी येथे चर्चा करण्याचा उद्देशच नाही. तात्त्विक दृष्ट्या केलेली ती सर्व चर्चा जिज्ञासूंनी गीतारहस्यातील 'विषयप्रवेश' व 'संन्यास आणि कर्मयोग' या प्रकरणात (पृ. ९, १०, ३११, ३२२) अवश्य पहावी. प्रवृत्तिधर्माची महती महाभारतात वर्णिलेली आहे की नाही हा प्रश्न माझ्या मते आता वादातीत आहे. तेव्हा येथे आता त्याची चर्चा करावयाची नाही. त्या प्रवृत्तिधर्माचे प्रतिपादन महाभारतात कसे केलेले आहे हे येथे सांगावयाचे आहे. महाभारत हा मुख्यतः ऐहिक उत्कर्षाची प्रेरणा देणारा, त्याचे मार्ग सांगणारा व त्या ऐहिक वैभवावाचून सर्व व्यर्थ होय असे निक्षून प्रतिपादन करणारा राष्ट्रीय ग्रंथ असल्यामुळे त्यांत प्रवृत्तिधर्माचे विवरण अगदी सविस्तर केलेले आहे. प्रवृत्तिधर्मच का श्रेष्ठ, मोक्षधर्म त्यावाचून कसा पंगू ठरतो, त्या प्रवृत्तिधर्माला धन, ऐश्वर्य यांचे किती महत्त्व आहे, तो गृहस्थाश्रमावाचून कसा अशक्य होईल, इत्यादी विवेचन विपुल तपशिलासह महाभारतात केलेले आढळते. भारतीय तत्त्ववेत्त्यांच्या या धर्मात दुबळ्या दैववादाला थारा नाही. 'संतोष, समाधान हेच सुख', असले रडवे प्रतिपादन नाही, षड्रिपूंची संतमंडळींच्या तोंडची ठराविक निंदा नाही, अज्ञान, भोळेपणा, यांतच भूषण मानण्याची जी घातकी प्रवृत्ती तिला आसरा नाही. तर ऐहिक ऐश्वर्य, वैभव, दिगंतभूमीचे साम्राज्य, त्रिखंडात दुमदुमणारी कीर्ती यांच्या आकांक्षा मानवी चित्तात निर्माण करून त्यासाठी मरणमारणाचा संग्राम करण्याची प्रेरणा देणारा संदेश या भव्य ग्रंथात आहे. 'सर्पाच्या दाढा उपटण्याचा प्रयत्न करीत माणसाने तडकाफडकी मरून जावे पण पराक्रमहीन राहू नये.' 'श्येनपक्ष्याप्रमाणे आकाशात गिरक्या घेत राहून शत्रूवर झेप घालावी', 'तृप्ती आणि दया यांनी वैभवाचा नाश होतो', 'मोडून पडावे पण वाकू नये अशी चैतन्याने रसरसलेली वचने या ग्रंथात आहेत. आणि नुसती वचने आहेत असे नव्हे तर श्रीकृष्ण, अर्जुन, भीम इत्यादी नरपुंगवांनी आपल्या असामान्य बाहुबलाने व अचाट बुद्धिबलाने ही वचने सत्यसृष्टीत आणण्यासाठी जो विशाल उद्योग आरंभिला व प्रचंड पराक्रम केला त्याची अत्यंत स्फूर्तिप्रद वर्णनेही या ग्रंथात आहेत.
यथा समुद्रो भगवान् यथाहि हिमवान् गिरिः
ख्यातावुभौ रत्ननिधी तथा भारतमुच्यते ।
- १८/५/६५.
'जसा भगवान समुद्र आणि जसा पर्वतराज हिमालय हे रत्ननिधी म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच महाभारत हेही रत्नांची खाण म्हणून प्रसिद्ध आहे.' असे जे महाभारताबद्दल म्हटले आहे
ते यासाठीच. असो. अशा या ग्रंथात प्रवृत्तिधर्माचे जे प्रतिपादन केलेले आढळते ते प्रस्तुत प्रकरणात आता द्यावयाचे आहे.
मोक्षालाही पराक्रम अवश्य
मोक्ष हे जरी अंतिम ध्येय असले तरी मोक्ष ही मनाची एक अति उन्नत अशी अवस्था असल्यामुळे ती समाजाच्या अत्यंत वरच्या व प्रगत अशा अवस्थेतच शक्य आहे. ज्या समाजातील लोकांचे आचार शुचिर्भूत आहेत, विचार प्रगल्भ व पवित्र आहेत, जेथे उत्तम राज्यव्यवस्था असून लोकव्यवहार सरळपणे चालतात, जो समाज विद्यासंपन्न व पराक्रमी असून परकीय आक्रमणापासून आपले रक्षण करण्यास समर्थ असतो. अशाच समाजात मोक्षकल्पनेचा उद्गम व परिणती आणि मोक्षसाधनाचे प्रयत्न शक्य आहेत असा महाभारतीय तत्त्ववेत्त्यांचा पहिला सिद्धान्त आहे. यस्यैवबलमोजश्च स धर्मस्य प्रभुर्नरः । -(शां. १५२।१८) अज्ञानात खितपत असलेला, रानटी, भुकेकंगाल हीन, दीन, दरिद्री, पराक्रमशून्य, परतंत्र अशा समाजाचा व मोक्ष या अत्यंत उदात्त कल्पनेचा काहीएक संबंध नाही. एखादी व्यक्ती अशाही समाजात मोक्षसाधन करील, नाही असे नाही. पण एका व्यक्तीच्या मोक्षासाठी धर्मप्रवृत्ती झालेली नाही. अखिल समाजाला मोक्षधर्माची जर शिकवण द्यावयाची असेल -आणि तेच भारतीय तत्त्ववेत्ते आपले कर्तव्य समजतात -तर त्या समाजाची अवस्था वर सांगितल्याप्रमाणे सुसंस्कृत अशी असलीच पाहिजे.
क्षुधा निर्णुदति प्रज्ञां धर्मबुद्धिं व्यपोहति
क्षुधापरिगतज्ञानो धृतिं त्यजतिचैव ह ।
- १४/९०/९१.
क्षुधेमुळे माणसाचा बुद्धिभ्रंश होतो आणि त्याच्या धर्मनिष्ठेचाही लोप होतो. त्याचप्रमाणे क्षुधा माणसाचे ज्ञान नष्ट करून त्याचे धैर्यही हिरावून घेते -हे कठोर सत्य या प्रज्ञावंत पुरुषांना चांगले माहीत आहे. त्यामुळे धर्माच्या प्रसारासाठी राष्ट्रात सुस्थिती असणे अवश्य आहे असे त्यांचे निश्चित मत आहे. (धर्म हा शब्द असल्या संदर्भात पारमार्थिक मोक्षधर्म अशा अर्थाने घ्यावयाचा.) आणि राजधर्मात दण्डनीतीचे माहात्म्य सांगताना त्यांनी याचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
राजधर्म सर्वश्रेष्ठ
सुस्थिती असेल, शांतता असेल, माणसांचे व्यवहार नियंत्रित असतील, तरच धर्माकडे प्रवृत्ती होत असते हे जाणून धर्मव्यवस्थेत भारतीय तत्त्ववेत्त्यांनी राजधर्माला अग्रस्थान दिलेले आहे. राज्यव्यवस्था उत्तम टिकवून धरणे याइतके पुण्यप्रद त्यांच्या मते दुसरे काहीच नाही. कारण पुढील सर्व इमारतीचा तो पाया आहे. म्हणून प्रथम प्रत्येकाने सर्व कर्तव्ये बाजूस सारून त्यासाठी सर्वस्व अर्पण केले पाहिजे. भीष्म म्हणतात -
यथा राजन् हस्तिपदे पदानि, संलीयन्ते सर्व सत्त्वोद्भवानि ।
एवं धर्मान् राजधर्मेषु सर्वान् सर्वावस्थान् संप्रलीनान् निबोध ॥
-शांति ६३।२५.
'हे राजा, ज्याप्रमाणे एकट्या हत्तीच्या पावलात इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो त्याप्रमाणे एका राजधर्मात इतर सर्व धर्माचा सर्वप्रकारे अंतर्भाव होतो, हे तू पक्के समज.'
महाभारतात राजधर्माची महती दुसऱ्या एका ठिकाणी अशीच वर्णन केली आहे. कोसल देशाचा राजा वसुमन्त याने बृहस्पतीला पुढीलप्रमाणे प्रश्न केला, 'हे देवगुरो, प्राण्यांचा अभ्युदय होण्याचे साधन कोणते ? कोणत्या कर्माच्या योगाने त्यांचा नाश होतो, आणि कोणाचे आराधन केले असता त्यांना अविनश्वर म्हणजे शाश्वत सुखाची प्राप्ती होते ?' यावर बृहस्पतीने जे विवेचन केले ते फार महत्त्वाचे आहे. शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी ऐहिक धनवैभवांचा त्याग केला पाहिजे असे न सांगता प्रथम राज्यव्यवस्था उत्तम पाहिजे हे बृहस्पतीने बजावले हे विशेष आहे.
बृहस्पती म्हणाला— 'हे महाप्राज्ञ, राजा हाच लोकांच्या धर्माचे मूळ आहे असे दिसून येते. राजाच्या भीतीमुळेच प्रजा परस्परांना भक्षण करीत नाहीत. मर्यादा सोडून वागणाऱ्या व परस्त्रीवर आसक्त होणाऱ्या सर्व लोकांना, धर्माच्या अनुरोधाने शिक्षा करून राजाच ताळ्यावर आणतो. राजाने पालन केले नाही तर बलवान लोक निर्बलांच्या धनाचा अपहार करतील. कोणालाही ही वस्तू माझी आहे असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. राजा नसेल (म्हणजे शासन व्यवस्थित नसेल) तर स्त्री, पुत्र, द्रव्य व परिवार ही सर्व नाहीशी होऊन सर्वत्र शून्य होऊन जाईल. धर्माचरण करणाऱ्या लोकांवर नानाप्रकारे शस्त्रप्रहार होतील. अधर्माला आधार मिळेल. सर्व लोक दरवडेखोर बनतील. ब्राह्मण अध्ययन करणार नाहीत. कृषी व वाणिज्य यांचा नाश होईल, धर्म रसातळास पोचेल व वेदत्रयाचे अस्तित्वच नाहीसे होईल. यज्ञविधी चालणार नाहीत, विवाहाचे अस्तित्व रहाणार नाही व समाज
नष्ट होईल.
राजा रक्षण करीत असला म्हणजे लोक स्वछंदपणे घराची दारे उघडी टाकून निर्भयपणे झोप घेतात. स्त्रिया सर्व प्रकारच्या अलंकारांनी भूषित होऊन पुरुष मनुष्य बरोबर घेतल्यावाचून, निर्भयपणे मार्गावरून जाऊ शकतात. लोक धर्माचाच अंगीकार करतात, परस्परांना क्लेश देत नाहीत, इतकेच नव्हे, तर एकमेकांवर अनुग्रह करतात. राजा, शेती व व्यापार यांवर सर्व जग अवलंबून असते व राजा नीट पालन करीत असेल तरच यांची व्यवस्था नीट राहते. सारांश ज्याचे अस्तित्व नसल्यास कोणत्याही प्राण्याचे अस्तित्व रहाणार नाही व ज्याचे अस्तित्व असेल तरच सर्व समाजाचे अस्तित्व असते त्या राजाचा बहुमान कोण करणार नाही ! (यस्याभावेन भूतानामभावः स्यात् समन्ततः । भावे च भावो नित्यं स्यात् कस्तं न प्रतिपूजयेत् । – शांति ६८।३७)
राजा ही एक व्यक्ती नाही. ती तशी आहे असे समजून राजाचा अवमान करणे अश्लाघ्य होय. राजा हा प्रजेचे प्रौढ असे अंतःकरणच होय. जो मनुष्य राजाचे प्रिय व हित करण्याविषयी उद्युक्त होतो व जो सर्व लोकांत त्याचा दरारा उत्पन्न करण्याचा कार्यभार आपल्या शिरावर घेतो त्याला इहपरलोकांची प्राप्ती होते.' -(शांति अ. ३८)
समाजाचे अस्तित्व टिकविणे हा प्रत्येक मानवाचा श्रेष्ठधर्म होय हे महाभारती तत्त्ववेत्त्यांनी किती ठामपणे सांगितले आहे हे यावरून दिसून येते. मोक्ष हे जरी अंतिम साध्य असले तरी समाजाच्या सुस्थितीकडे दुर्लक्ष झाले तर समाजाचे अस्तित्वच नष्ट होईल व मग सर्वच धर्म उत्सन्न होतील ही जाणीव फार प्रखरपणे या थोर पुरुषांच्या मनांत होती व म्हणूनच प्रवृत्तिधर्माचा त्यांनी जोराने पुरस्कार केला आहे. राजधर्म हा सर्व धर्मांत श्रेष्ठ होय या म्हणण्यातले रहस्य हेच आहे. आणि हा धर्म सांभाळून समाजाची सुस्थिती टिकवून धरणे याची जबाबदारी जरी राजावर असली तरी त्याचे एकट्याचेच ते काम नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीचे ते कार्य आहे, कोणीही यातून सुटू शकत नाही, असे त्यांना सांगावयाचे आहे. म्हणूनच राजाचे हित करणारा, त्याच्या शासनाचा दरारा सर्वत्र पसरणारा यालाही इहपरलोकांची प्राप्ती होते असे बृहस्पतीने सांगितले आहे. मोक्षासाठी एकटा प्रवृत्तिधर्मच पुरेसा आहे, काही काल प्रवृत्ति स्वीकारली तरी पुढे निवृत्ती स्वीकारणे अवश्य आहे, असे मुळीच नाही असे महाभारतकारांचे मत तर आहेच, पण निवृत्तिवादी लोकही या प्राथमिक धर्मातून सुटू शकत नाहीत असे त्यांचे स्पष्ट मत आहे. एकाददुसरा माणूस संसार सोडून गेला तर निराळे. त्यामुळे समाजाचे काही बिघडणार नाही. पण अनेकांची अशी प्रवृत्ती होऊ लागली किंवा निवृत्ती श्रेष्ठ आहे, असा नुसता विचार प्रबळ झाला तर समाजच नष्ट होईल आणि मग प्रवृत्ति नाही, निवृत्ति नाही आणि त्यांनी प्राप्त होणारा मोक्षही नाही अशी अनर्थकारक स्थिती प्राप्त होईल. हा विचार महाभारतात राजधर्मप्रकरणी अनेक वेळा सांगण्यात आला आहे. ब्राह्मण यज्ञयाग करीत असले, तपश्चर्या करीत असले म्हणजे त्यातून जे पुण्य निर्माण होईल त्याच्या बळावर सर्व व्यवस्था ठीक होईल असे महाभारतकारांना मुळीच वाटत नाही. कारण राज्यव्यवस्था ठीक नसेल तर वेदत्रयांचे अस्तित्वच नष्ट होईल, ब्राह्मण यज्ञ करीनासे होतील व तपश्चर्या त्यांना करता येणार नाही. असे असल्यामुळे प्रथम सर्व सामर्थ्य माणसांनी राज्य स्थापणे, त्याचे स्वातंत्र्य टिकविणे, त्यात शांतता प्रस्थापित करणे यासाठी खर्च केले पाहिजे असे भारतात पुन्हा पुन्हा सांगितले आहे.
भीष्म म्हणतात, 'जर या लोकात शासनकर्ता राजा नसेल तर बलिष्ठ लोक दुर्बलांना भक्षण करून टाकतील. जो पुरुष दास नसेल त्याला दास केले जाईल (दासाला प्रवृत्ती किंवा निवृत्ती कशाचेच स्वातंत्र्य नाही) व स्त्रिया बलात्काराने हरण केल्या जातील. म्हणून या भूतलावर ज्या लोकांना कल्याणाची इच्छा असेल त्यांनी समाजावर अनुग्रह करण्यासाठी राजा निर्माण केलाचे पाहिजे.' -(शांति ६७).
सत्य, त्रेता, द्वापर, कलि इत्यादी युगे राजाच निर्माण करतो असे जे महाभारतात पुन्हा पुन्हा सांगितलेले आढळते त्याचे, मर्म हेच आहे, 'जेव्हा राजा योग्यप्रकारे व पूर्णपणे दण्डनीतीच्या अनुरोधाने वागतो तेव्हा श्रेष्ठ अशा कृतयुगाची प्रवृत्ती होते. त्या कृतयुगात केवळ धर्मच अस्तित्वात असतो.' असे सांगून राजा दण्डनीतीचे अवलंबन जसजसे कमी करीत जातो तसतशी त्रेता, द्वापर ही युगे निर्माण होतात व जेव्हा राजा दण्डनीतीचा सर्वथैव त्याग करतो तेव्हा कलियुग निर्माण होऊन सर्वत्र अधर्म पसरतो असे भीष्मांनी सांगितले आहे. – (शां. ६९).
राज्याच्या व समाजाच्या सुव्यवस्थेची जबाबदारी फक्त राजावरच असते असे नाही. राजा जर प्रजेचे पालन योग्य प्रकारे न करील तर तो चोर होय, असे समजून लोकांनी त्यास दूर करावे किंवा वेळ पडल्यास ठारही मारावे व दुसरा कर्ता, प्रजेचे पालन करणारा राजा सिंहासनावर आणावा असे महाभारतात अनेक वेळा सांगितले आहे.
अरक्षितारं हर्तारं विलोप्तारं अनायकम् ।
तं वै राजकलिं हन्युः प्रजाः संनह्य निर्घृणम् ॥
- १३ । ६१ । ३२.
अहं वो रक्षितेत्युक्त्वा यो न रक्षति भूमिपः |
स संहत्य निहन्तव्यः श्वेव सोन्माद आतुरः ॥
- १३ । ६१ । ३३.
प्रजेचे रक्षण न करिता तिजपासून जो कर घेतो, व प्रजेला सन्मार्गाला न लावता जो लुबाडतो तो राजरूपी कली प्रजेने सज्ज होऊन निष्ठुरपणे ठार मारावा. 'मी तुमचे रक्षण करीन' असे म्हणून जो राजा त्याप्रमाणे प्रजेचे रक्षण करीत नाही त्याला, सर्वांनी एक होऊन, सडक्या, पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे ठार करावे.
प्रजाही जबाबदार
यावरून राष्ट्राची सुस्थिती, शांतता व परचक्रापासून रक्षण याची सर्व जबाबदारी केवळ राजावर नसून ती सर्व प्रजेवर आहे हे स्पष्ट होते आणि म्हणूनच राष्ट्ररक्षण हा प्रत्येकाचा आद्यधर्म होय असा भारतीय तत्त्ववेत्त्यांचा स्पष्ट सिद्धान्त आहे हे निर्विवादपणे ठरते.
वरील विवेचनाचा तात्पर्यार्थ असा होतो. मोक्ष हे प्रत्येक मानवाचे अंतिम साध्य आहे. पण या मोक्षासाठी निवृत्तिधर्माचीच आवश्यकता आहे असे नाही. प्रवृत्तिधर्माने संसारात आमरण राहूनही मोक्ष मिळविता येतो. येथपर्यंत प्रवृत्ती व निवृत्ती हे दोन्ही धर्म सारख्याच योग्यतेचे आहेत असे दिसते. पण पुढील कारणामुळे तसे म्हणता येत नाही. मोक्ष ही अति उन्नत अशी मानसिक अवस्था आहे. ती मानवांना प्राप्त व्हावयाची असेल तर त्या समाजाची स्थिती फार उत्तम असणे अवश्य आहे. राष्ट्र बलवान, धनसंपन्न, स्वतंत्र व पराक्रमी असे असल्यावाचून त्यातील माणसांना स्थितप्रज्ञाची अवस्था अथवा मनाची ब्राह्मीस्थिती प्राप्त करून घेणे शक्य नाही. राष्ट्र बलसंपन्न व्हावयाचे तर प्रजेतील प्रत्येक मनुष्याने त्यासाठी कष्ट करण्यास, त्याग करण्यास सिद्ध असले पाहिजे. शरीर, मन, बुद्धी यांची सामर्थ्य प्रथमतः त्याने या कार्यासाठीच अर्पिली पाहिजेत. राष्ट्रातील कर्त्या पुरुषांचा निवृत्ति धर्माकडे कल होऊ लागला तर हे साधणार नाही व समाज उत्सन्न होईल व मग माणसे धर्माचरणास असमर्थ होतील. तेव्हा मोक्षाच्या दृष्टीने विचार केला तरी समाजाचे रक्षण करणे, हाच प्रत्येक मानवाचा आद्यधर्म आहे असा सिद्धान्त होतो.
अर्थाची महती
राष्ट्ररक्षण हा आद्यधर्म असा सिद्धान्त ठरल्यानंतर त्या राष्ट्राची उन्नती मुख्यतः ज्या अर्थावर, धनावर अवलंबून आहे त्या अर्थाला धर्मव्यवस्थेत फार महत्त्वाचे स्थान प्राप्त होणे हे क्रमप्राप्तच आहे. आणि महाभारतकारांनी धनाचे हे महत्त्व जाणून त्याला योग्य तें स्थान दिलेलेही आहे.
पितामह भीष्मांनी धनाचे महत्त्व पुढीलप्रमाणे वर्णन केलेले
आहे :
राज्ञः कोशबलं मूलं, कोशमूलं पुनर्बलम् |
तन्मूलं सर्व धर्माणां धर्ममूलाः पुनः प्रजाः ॥
-शां. १३०। ३६.
एवं कोशस्य महतो ये नराः परिपन्थिनः
तानहत्वा न पश्यामि सिद्धिमत्र परंतप ॥
-शां. १३०। ४३.
धनेन जयते लोकंमिमं चामुं च भारत
सत्यं च धर्मवचनं यथा नास्त्यवनस्तथा ॥
-शां. १३०। ४४.
कोश (खजिना) व सैन्य हे राजाचे मुख्य बल होय. त्यांतील सैन्य हे कोशावर अवलंबून असते. सैन्य हेच सर्व धर्माचा आधार असून धर्म प्रजेचा आधार असतो. म्हणजे पर्यायाने सर्व धर्माचा आधार कोश (धन) हाच होय. सर्व धर्माचा आधार असा जो कोश त्याची प्राप्ती करून घेतांना जे आड येतील त्यांचा वध केला पाहिजे. कारण त्यावाचून धनप्राप्ती होईलसे दिसत नाही. राजा, धनाच्याच साह्याने इह व परलोक प्राप्त होतात हे धर्मवचन सत्य आहे. हे युधिष्ठिरा, धनहीन पुरुष हा असून नसल्यासारखाच होय."
बारा वर्षे वनवासात राहून आल्यानंतर युधिष्ठिराला सुद्धा धनाशिवाय सर्व व्यर्थ आहे हे ध्यानी आले. तो श्रीकृष्णाला म्हणाला, 'कृष्णा, निर्धन पुरुष जिवंत असून मेल्यासारखाच आहे. धन हाच श्रेष्ठ धर्म आहे असे म्हणतात. सर्व काय ते धनावरच अवलंबून आहे. धनहानी झाली की तीबरोबर पुरुषाचे धर्म, काम हे ठार होतात आणि मग ते जिणे कसले ? मनुष्य जोपर्यंत लक्ष्मीच्या कृपाछत्राखाली आहे तोपर्यंतच तो पुरुष या संज्ञेस पात्र होतो व त्याची धर्मनिष्ठा अढळ राहाते, त्याच्या अंतःकरणाची चलबिचल होत नाही. आपले कार्य त्याला पार पाडता येते. अधर्माकडे त्याचे मन जात नाही. हे मधुसूदना, आमचे राज्य गेले व अनेक वर्षे आम्ही हालात काढली. तेव्हा आता कोणत्याही न्यायाने पाहिले तरी आम्हांस संपत्ती घालविणे योग्य नाही. म्हणून आता प्राणव्ययानेही संपत्ती मिळविण्यास आम्ही कमी करणार नाही.' -(उद्योग अ. ७२)
महाभारतात धर्म, अर्थ व काम यांची महती अनेक ठिकाणी गाइलेली आहे. आणि ती वाचताना एक गोष्ट सहज ध्यानात येते ती ही की या तीनही पुरुषार्थांचे भारतीय तत्त्ववेत्ते सारखेच महत्त्व मानतात. धर्माचे (शुद्ध, सत्य, प्रेम, अहिंसा यांचे) महत्त्व अतिशय आहे. याबद्दल वादच नाही. पण त्याकडे जास्त लक्ष देऊन अर्थ व काम यांची हानि कोणी करू लागला तर त्याचा नाश झाल्याखेरीज राहणार नाही असे भारतात अनेक वेळा अनेक विचारी पुरुषांनी सांगितलेले आहे.
बलरामाने एका प्रसंगी असे उद्गार काढले आहेत-
धर्मार्थौ धर्मकामौच कामार्थी चाप्यपीडयन्
धर्मार्थकामान् योऽभ्येति सोत्यन्तं सुखमश्नुते ।
- शल्य ६०। २२.
"जो मनुष्य विषयवासनेने धर्मार्थास धक्का लागू देत नाही, अर्थ साधण्यासाठी धर्मकाम बुडवीत नाही, आणि केवळ धर्माच्या पाठीस लागून अर्थकामावर पाणी सोडीत नाही तर धर्म, अर्थ व काम (ऐहिक विषयाबद्दलच्या वासना ) या तिहींचे एकसमयावच्छेदेकरून समसमान सेवन करतो तोच आत्यंतिक सुख भोगतो."
धृतराष्ट्राला उपदेश करताना कणिकानेही हाच अभिप्राय व्यक्त केला आहे. कणिक म्हणाला, 'राजा, धर्म, अर्थ व काम या तिन्हींपैकी एक दुसऱ्यास उपसर्ग करणार नाही, अशाप्रकारे त्यांचा उपभोग घ्यावा. म्हणजे पीडा न होता सुखोत्पत्ती होईल. कोणी धर्माकडेच विशेष लक्ष देईल तर त्यास अर्थहानी व कामनाश ही दुःखे प्राप्त होतील. कोणी अर्थाकडेच सर्व लक्ष देईल तर धर्म व काम यांच्या हानीमुळे त्याला क्लेश होतील व कोणी केवळ कामासक्तच झाला तर धर्मार्थाची हानी होईल. यास्तव या तीनही पुरुषार्थांचे सेवन एकमेकांस उपसर्ग न पोचेल अशा रीतीने केल्यास त्यापासून इष्ट ती सुखे मिळून दुःखापासून अलिप्त राहता येईल.'
याशिवाय अर्जुन, भीम, द्रौपदी यांनी युधिष्ठिराशी संभाषण करताना आपले अनुभवसिद्ध रोकडे व्यवहारी बोल त्यास अनेक वेळा ऐकविले आहेत. कौरवांना जिंकल्यावरही युधिष्ठिर जेव्हा पुन्हा अरण्यात जाण्याची भाषा बोलू लागला तेव्हा अर्जुन त्यास म्हणाला, 'राजा, अर्थ असेल तरच धर्म, काम आणि स्वर्ग यांची प्राप्ती होते. लोकांची जीवितयात्राच अर्थावाचून चालणार नाही. हे नरश्रेष्ठा, धनाच्या योगाने कुळाचा उत्कर्ष होतो व धन असेल तर धर्माची वाढ होते. निर्धनाला ना इहलोक वा परलोक. द्रव्य नसता धर्मकृत्ये यथासांग करता येत नाहीत. पर्वतापासून जशी नदी तसा द्रव्यापासून धर्म उत्पन्न होतो. (धनात् हि धर्मः स्रवति शैलादपि नदी यथा) राजा, लोक पातकी मनुष्यासंबंधी हळहळतात, आणि निर्धनाच्यासंबंधीही हळहळतात. मला तर पातकी व दरिद्री यांच्यामध्ये काही भेद दिसत नाही. -(शांति ८).
अरण्यात राहात असताना भीमानेही धर्माला अर्थाचे महत्त्व पटवून देण्याचा परोपरीने प्रयत्न केला होता. तो म्हणाला, 'हे पुरुषश्रेष्ठा, आपल्या अंगी इतर सर्व गुण असले तरी अर्थ नसल्यास धर्माचे आचरण करणे शक्य नाही. राजा धर्म हे सर्व जगताचे मूळ असून धर्माहून श्रेष्ठ असे दुसरे काही नाही हे खरे, पण हा धर्म, विपुल अर्थ असेल तरच, आचरण करता येणे शक्य आहे. सारांश जरी धर्माची इच्छा असली तरी प्रथम अर्थ संपादन केला पाहिजे. म्हणून हे राजा, तू आपल्या पराक्रमाने प्रथम अर्थ संपादन कर. कारण ऐश्वर्यरूपी अभ्युदय हाच धर्म होय असे ज्ञानी लोकांनी सांगितले आहे.' -(वन अ. ३३).
दुसऱ्या एका प्रसंगी अर्जुनाने अर्थाच्या महत्त्वासंबंधी पुढीलप्रमाणे आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. 'हे राजा, ही पृथ्वी म्हणजे कर्मभूमी आहे. म्हणून या ठिकाणी कृषी वाणिज्य व गोरक्षण आणि नानाप्रकारची कलाकौशल्ये हीच प्रशस्त होत. या सर्व गोष्टी म्हणजे अर्थच होत. या अर्थावाचून धर्माचे किंव कामाचे अस्तित्वच राहणार नाही अशी श्रुती आहे. (निवृत्तेर्थे न वर्तेते धर्मकामाविति श्रुतिः । -शांति. १६७। १२) अर्थप्राप्ती झाली असता हे दोन्ही पुरुषार्थ संपादन करता येतात. धर्म व काम यांच्यासाठी जो अर्थाचा विनियोग करतो तो पुरुष श्रेष्ठ होय. हे राजा, जटा व कृष्णाजिने धारण करणारे, किंवा शिरोमुंडन केलेले यती, नैष्ठिक ब्रह्मचारी, विद्वान इ. प्रकारचे लोक अर्थाचाच अभिलाष करितात. तेव्हा अर्थशास्त्राच्या श्रेष्ठत्वाचे ज्ञान होणे हाच खरा प्रकाश असून ते न होणे हाच अंधकार होय. हे ज्ञानसंपन्न श्रेष्ठा, जो पुरुष आपल्या सेवकांना ऐश्वर्यसंपन्न करून शत्रूंना दंड करतो तोच खरा अर्थवान होय असे माझे मत आहे.'
महाभारतातील कर्त्या पुरुषांना अर्थाची महती किती वाटत होती हे वरील विवेचनावरून कळून येईल. धर्माची महती त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलेली आहेच. धर्म हेच पुरुषाचे साध्य होय. धर्मावाचून मनुष्य पशूसारखा होईल असे अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे व ते योग्यच आहे. कर्तव्यनिष्ठा, ध्येयनिष्ठा यांचे महत्त्व कधीच कोणी कमी करू शकणार नाही. पण त्याबरोबरच तो श्रेष्ठ धर्म साध्य होण्यासाठी अर्थ हे अत्यंत प्रभावी साधन असून त्यावाचून धर्मनिष्ठा ही टिकू शकत नाही म्हणून अर्थाकडे केव्हाही दुर्लक्ष करू नये असे भारतीय तत्त्ववेत्त्याचे सांगणे आहे.
दारिद्र्य हे पातक होय
धर्मनिष्ठेच्या भरात अनेक वेळा धनाची निंदा व दारिद्र्याची स्तुती केली जाते. भावनेच्या भरात काही विशेष उद्देशाने तसे करणे केव्हा केव्हा युक्त ठरते. पण ते परमार्थाने घेणे हा अविचार आहे. आणि हा अविचार आपल्या देशात पुढे पुढे फार प्रबळ झाल्यामुळे लोक ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाले. वास्तविक पाहता दारिद्र्याची स्तुती कधीही कोणी करू नये असे भारतकारांनी बजाविले आहे. ते म्हणतात-
अभिशस्तं प्रपश्यन्ति दरिद्रं पार्श्वतः स्थितम् ।
दरिद्रं पातकं लोके न तत् शंसितुमर्हति ॥
--शांति
दरिद्री मनुष्य जवळ उभा राहिला असता एखाद्या पातकी मनुष्याप्रमाणे लोक त्याच्याकडे पाहतात. या लोकात दारिद्र्य हे एक पातकच आहे ! म्हणून त्याची प्रशंसा करणे योग्य नाही.
क्षात्रतेज
धन हे जसे राष्ट्राचे बल आहे, त्यावर जसे राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे त्याचप्रमाणे प्रखर असे जे क्षात्रतेज त्यावरही ते अवलंबून आहे. तेही राष्ट्राचे बल आहे किंबहुना तेच प्रधानबल होय असे महाभारतकारांचे मत आहे. पण अनेक मानवांत स्वार्थ प्रबल असतो आणि त्यांच्या अंगच्या क्षात्रतेजालाही जागृती आणण्यास व ते कायमचे टिकविण्यास ऐश्वर्याचे विलोभन अवश्य असते म्हणून धनाची महती गावी लागते. सारासार विचार केला तर ही दोन्ही बले परस्परावलंबी आहेत असे दिसते. धन, ऐश्वर्य यांच्या प्राप्तीमुळे व त्याच्या रक्षणासाठी, माणूस आपले क्षात्रतेज प्रगट करतो, त्याचप्रमाणे पुष्कळ वेळा क्षात्रतेजाने माणूस लक्ष्मीला वश करून घेतो. पण एवढे खरे की धन असूनही क्षात्रतेज नसेल तर सर्व व्यर्थ होते. त्यामुळेच क्षात्रतेजाची भारतीय तत्त्ववेत्त्यांनी फार महती गाइली आहे आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही वगैरे सिद्धान्त बाजूला ठेवून रणात छातीवर वार घेत मृत्यू पावणाऱ्या वीराला योगयुक्त संन्याशाचीच गती मिळते असे सांगितले आहे.
वनवास संपवून पांडव परत आले तरीही दुर्योधन त्यांना त्यांचे राज्य देईना. तेव्हा युद्ध हे टळत नाही असे युधिष्ठिरालाही दिसू लागले. तरी पण धर्माधर्माच्या अनिश्चयामुळे त्याचे मन शंकाकुल होतच होते. 'आम्हांला पाच गावे दिलीस तरी आम्ही संतुष्ट आहो, मग आम्ही राज्य मागणार नाही.' असा त्याने दुर्योधनाला निरोप पाठविला. आणि 'क्षत्रियधर्म म्हणजे मूर्तिमंत पापच आहे, युद्ध हे एकंदरीत वाईटच, जय मिळाला तरी, शत्रूला मारला, ही गोष्ट मनाला खातच राहाते, शत्रूच्या पाया पडून आपला राज्यभाग मागून घेण्याने जर युद्ध टळत असेल, शांती मिळत असेल, तर तेच श्रेयस्कर' वगैरे तत्त्वज्ञान तो सांगू लागला. त्या वेळी त्याची ती युद्धविन्मुखता नष्ट करण्यासाठी श्रीकृष्णांनी पुढील स्फूर्तिदायक भाषण केले. ते म्हणाले, 'हे राजा क्षत्रियाने रणांगणांत उभे राहावे हाच त्याचा शाश्वतधर्म होय. युद्धात जय झाला किंवा न झाला तरी त्याने युद्धच केले पाहिजे. दीनासारखी याचना करणे हा क्षत्रियाचा धर्म नाही. हे महाबाहो, तू पराक्रमी असून असा दीन का होतोस ? ऊठ, तरवार गाजव आणि वाटेल तर सर्वच राज्य घे. तुझी समेटाची आशा व्यर्थ आहे. दयेस्तव, दैन्यास्तव किंवा धर्मार्थास्तव तुझी इच्छा कौरव पूर्ण करणार नाहीत. अशांची तू कीव काय करीत बसला आहेस ? अरे, वाटेल त्याने खेटर चढवावे अशा लायकीचे ते लोक आहेत आणि 'त्यांना मी कसा मारू' हा मंत्र तू घोकीत बसला आहेस. ऊठ आणि त्यांना ठेचून टाक. हत्यार उचलण्यास तुला नवे निमित्त नको आहे. जुनी पुष्कळ आहेत.' -(उद्योग अ. ७३).
द्रौपदीचा संताप
युधिष्ठिराने समेटाचा आग्रह धरला आहे व श्रीकृष्ण त्याप्रमाणे कौरवांशी समेट करण्यास जात आहे हे ऐकून द्रौपदी अत्यंत संतापून गेली. सूडाच्या भावनेने ती तेरा वर्षे सारखी जळत होती. वैरवन्ही तिच्या चित्तात अहोरात्र प्रज्वाळलेला होता. आणि त्याचा उपशम न करता आपले पती पुन्हा याचकासारखी समेटाची इच्छा करू लागले ही कल्पना तिला असह्य झाली आणि अशा स्थितीत श्रीकृष्ण दिसताच ती विजेसारखी कडकडकड करू लागली. ती म्हणाली, 'कृष्णा, माझा अवमान करून क्षणभर तरी दुर्योधन जिवंत राहातो त्याअर्थी अर्जुनाच्या धनुर्विद्येला धिक्कार असो आणि त्या भीमाच्या सामर्थ्याचाही धिक्कार असो. कृष्णा, तू संधी करू पाहत आहेस; पण दुःशासनाने आसडा मारलेला माझा हा केशपाश तुझ्या लक्षात असू दे. हे भीमार्जुन आज याचकासारखे संधी करू पाहत आहेत ! तरी चिंता नाही. माझे वृद्ध पिताजी व माझा महारथी बंधू हे माझ्यासाठी लढतील. शिवाय माझे महाबलशाली असे पाच पुत्र आहेत. अभिमन्यूला नायक करून ते माझ्यासाठी लढतील. सख्या कृष्णा, माझ्या वेणीला ज्याने आसडा मारला तो दुःशासनाचा हात छिन्नभिन्न होऊन रक्ताने व धुळीने भरलेला असा जोपर्यंत माझ्या दृष्टीला पडला नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. पेटलेल्या अग्नीप्रमाणे हा संताप पोटात ठेवून प्रसंगाची वाट पाहात असता आज तेरा वर्षे लोटली आणि आज माझ्या प्रिय भीमराजालाहि धर्म आठवला आहे.'
असे बोलून ती विशालनयना, द्रौपदी अश्रूंनी कंठ दाटून येऊन सकंप व गद्गद स्वराने रडू लागली. तेंव्हा द्रवीभूत अग्नी प्रमाणे तिच्या डोळ्यांतील कढत अश्रू तिच्या परस्पर संलग्न पुष्ट स्तनांवर अविरत पडू लागले व शोकाने व संतापाने तिच्या काळजाचे पाणी होऊन तेच नेत्रावाटे लोटत आहे की काय असा भास होऊ लागला. -(उद्योग ८२).
शिष्टाई संपवून हस्तिनापुराहून श्रीकृष्ण परत फिरले त्या वेळी कुंतीने आपल्या पुत्रांना पुढीलप्रमाणे निरोप पाठविला. 'केशवा, त्या धर्मवेड्या युधिष्ठिराला सांग की, अर्थज्ञानरहित वेदाची केवळ घोकंपट्टी करणाऱ्या ब्राह्मणाची बुद्धी जशी मद्दड होऊन जाते व तो जशी वेदाची नुसती वटवट करीत बसतो त्याप्रमाणेच तू धर्म, धर्म करीत बसला आहेस. तुझी बुद्धी मंद झाली आहे आणि तू एक गौबाई झाला आहेस. अरे, हा कसला धर्मसंचय? असले धर्माचे खूळ घेऊन बसू नको. धर्माच्या भ्रमाखाली भलते काही तरी करू नको. शत्रुमर्दन करणे व प्रजेचे पालन करणे हा क्षत्रियाचा धर्म होय. युधिष्ठिरा, सांप्रत तू जी वृत्ती धरिली आहेस ती धारण करण्यासाठी मी तुला जन्म दिला नव्हता. तुझ्या या शत्रुहिततत्परतेमुळे पुत्रवती होऊनही मला घासभर अन्नासाठी दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहावे लागत आहे. मला कोणीच वाली उरला नाही.'
पण या सर्वांपेक्षा क्षात्रधर्माचा खरा तेजस्वी संदेश महाभारतातील विदुला-पुत्रसंवाद या प्रकरणात आहे. संजय नावाचा राजपुत्र सिंधुदेशच्या राजाकडून पराभूत झाल्यामुळे दीन व निराश होऊन हातपाय गाळून बसला होता. राज्य परत मिळविण्याचा उद्योग करावा असे त्याच्या मनातच येईना. त्या विचाराने त्याला कापरेच भरे. त्याची आई विदुलाराणी ही अत्यंत मानी व क्षात्रधर्माभिमानी असल्यामुळे पुत्राचा हा मुर्दाडपणा तिला सहन होईना. असा पुत्र असण्यापेक्षा निसंतान झालेले पत्करेल असे तिला वाटे व त्यामुळे अगदी संतापून पण पुत्रासाठी तळमळून, जिवाची काहिली होत असताना तिने त्याला उपदेश केला आहे. विदुलेचा हा क्षात्रधर्माचा संदेश इतका प्रखर, इतका तेजस्वी व इतका हृदयभेदक आहे, स्वाभिमान, आवेश, चैतन्य यांनी तो इतका रसरसलेला आहे की, तो वाचीत असताना क्षात्रधर्माची अग्निमय मूर्तीच आपल्यापुढे उभी आहे की काय असा भास होतो. असा संदेश ज्या देशातील माता आपल्या पुत्रांना देतात त्या देशातच धैर्यशील, अजिंक्य, अपराजित व अमोघप्रराक्रमी असे पुरुष निर्माण होतात.
युधिष्ठिराचा दळेपणा नष्ट होऊन क्षत्रियाला शोभेसा पराक्रम करण्यास तो उद्युक्त व्हावा म्हणून कुंतीने मुद्दाम त्याला हा विदुलेचा उपदेश ऐकविला होता.
उद्योग-प्रयत्नवाद
धन आणि क्षात्रतेज यांच्याप्रमाणेच उद्योग हे प्रवृत्तिधर्माचे तिसरे साधन आहे. पौर्वात्य लोक आणि विशेषतः भारतातील लोक हे दैववादी झालेले होते व अजूनही बव्हंशी तसेच आहेत हे खरे. पण भारतीय तत्त्वज्ञानाचा जो राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे महाभारत त्यात तर ठायी ठायी प्रयत्नवादाचा इतका पुरस्कार केलेला आढळतो की हे लोक दैववादी का व्हावे हे कळेनासे होते. दैवच श्रेष्ठ आहे या अर्थाची काही वचने महाभारतात आहेत, नाही असे नाही. पण तशी कोणत्याही ग्रंथात सापडतील. एवढ्या मोठ्या राष्ट्रीय संसारात तशा मताची काही माणसे असणारच. पण या संसारातले श्रीकृष्ण, भीष्म, भीम, अर्जुन यांसारखे जे कर्ते पुरुष ते तर सदैव उद्योगाचीच प्रशंसा करताना आढळतात आणि तरी भारतीय लोक दैववादी झाले हे पाहिले म्हणजे पुढच्या काळात भारतीय तत्त्वज्ञानाचा येथल्या लोकांना विसर पडून प्रयत्नवादाला अत्यंत मारक असे कलियुगाचे व निवृत्तीचे तत्त्वज्ञान त्यांनी स्वीकारले असले पाहिजे यात शंका राहात नाही.
पण त्याबरोबरच या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करताच पुन्हा कृतयुग सुरू होईल असा पूर्ण आत्मविश्वास वाटत असल्यामुळे या थोर पुरुषांची अमृतवचने येथे द्यावी असे ठरविले आहे.
विदुलेने आपल्या पुत्राला जो उपदेश केला त्याचा उल्लेख वर आलाच आहे. त्यात पुरुषप्रयत्नाचे तिने केलेले विवेचन अत्यंत मार्मिक आहे. आपल्या घरातील पुरुष- पती, पुत्र, बंधू -उद्योग सोडून स्वस्थ बसले म्हणजे स्त्रियांच्या चित्ताचा किती जळफळाट होत असेल ते त्यावरून चांगले व्यक्त होते. धर्मराज अरण्यात दुर्योधनाच्या प्रतिकाराचा विचार न करताच स्वस्थ बसलेले पाहून द्रौपदीलाही असाच उद्वेग वाटला व तिने त्यांना उद्देशून पुढीलप्रमाणे भाषण केले :
ती म्हणाली, 'राजा, आज आपल्यावर मोठा अनर्थ ओढवला आहे. पण तुम्ही जर प्रयत्न केला तर तो टळेल यात शंकाच नाही. प्रयत्न केल्यानंतरही जर फलप्राती झाली नाही तर पांडवांच्या हातून कार्यसिद्धी होत नाही, असे तरी एकदा ठरेल. दुसऱ्याच्या, अर्थात शत्रूंच्या प्रयत्नास फल येते का आपले प्रयत्न यशस्वी होतात हे प्रयत्न केल्यानंतर जे फल येईल त्यावरूनच कळेल. तो केल्यावाचून कसे कळणार? 'दुसऱ्या पुरुषाने जे जे केले असते ते सर्व मी केले आहे, असे असताही जर त्याचे फल मला मिळाले नाही तर त्याचा दोष माझ्याकडे नाही.' असे समाधान धैर्यसंपन्न पुरुषाने मिळविले पाहिजे. प्रयत्न करूनही जर फल मिळाले नाही तर मग खेद वाटणार नाही. कारण कार्यसिद्धीला प्रयत्नाप्रमाणेच इतरही कारणे असतात. प्रयत्न केला म्हणजे सिद्धी होईल किंवा एखादे वेळी न होईल. पण प्रयत्नाकडे प्रवृत्तीच नसणे हे अगदी अश्लाघ्य आहे. प्रयत्नच केला नाही तर सिद्धी मिळणार की नाही हे कळण्यास मार्ग नाही.
प्रयत्न केला तरीही एखादे वेळी कार्यसिद्धी होत नाही याचे कारण असे की कार्यसिद्धीला इतर पुष्कळ गोष्टी जुळून याव्या लागतात. त्या जुळून आल्या नाही तर फल कमी मिळते किंवा एखादे वेळी मुळीच मिळत नाही. पण तेवढ्यामुळे उद्योगच करू नये हे म्हणणे चुकीचे आहे. कारण कार्याविषयी उद्योगच केला नाही तर सिद्धिरूपी फल निश्चितच मिळणार नाही हे एक आणि दुसरे म्हणजे आपल्या अंगी असणारे शौर्यादि गुण कळूनच येणार नाहीत. देश, काल इत्यादी कार्यसिद्धीची अंगे आहेत हे खरे आणि म्हणूनच सुज्ञ मनुष्य आपला उत्साह आणि सामर्थ्य यांच्या बरोबरच देश, काल, सामादिक उपाय व आपले कल्याण यांचा विचार आपल्या बुद्धीने करीत असतात. पण देश, काल व हे उपाय यांनी कार्यसिद्धी होईलच असे नाही. पराक्रम हाच काय तो कार्यसिद्धी कशी होते हे ठरवितो. यश हे मुख्यत्वेकरून पराक्रमावरच अवलंबून आहे. युधिष्ठिरा, शत्रूचा पराजय करण्याची संधी आलेली दिसताच त्याविषयी उद्योग करू लागणारा मनुष्य, उद्योग जरी सफल झाला नाही, तरी कर्तव्य बजवल्यामुळे आपल्या व दुसऱ्याच्या ऋणातून मुक्त होतो. राजा, काल व स्थिती यांच्या मानाने प्रयत्न करणे हेच सिद्धीचे मूळ कारण आहे. हे भरत- कुलश्रेष्ठा, पूर्वी माझ्या पित्याने एक पंडित ब्राह्मण घरी ठेवून घेतला होता. त्याने ही बृहस्पतिप्रोक्त नीती माझ्या पित्याला सांगितली व बंधूंना शिकविली. त्या वेळी त्यांच्याकडून मी ती घरामध्ये ऐकिली होती. -(वन. अ. ३२).
पुरुषप्रयत्न
श्रीकृष्ण शिष्टाईला जाण्यापूर्वी त्यांचे व भीमसेनाचे बरेच बोलणे झाले. त्या वेळी त्यांनी दैव व पुरुषप्रयत्न याविषयी जे विवेचन केले आहे ते अत्यंत शास्त्रीय व सारगर्भ असे असून श्रीकृष्णाच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अत्यंत रेखीव असे आहे. ते म्हणाले, 'वृकोदरा, या लोकात दैव आणि पुरुषप्रयत्न यांपैकी कोण बलवान हा निर्णय समजावा अशी सर्वांना जिज्ञासा असल्यामुळे त्याचा निर्णय करण्याविषयी पुष्कळ पंडित प्रयत्न करीत असतात. पण तो विषयच असा संशयात्मक आहे की त्याचा निभ्रांत व समाधानकारक उलगडा कोणाच्याने करवत नाही. कारण, जगात पहावे तो जी कृती एक वेळ पुरुषाच्या कार्यसिद्धीला कारण होते तीच दुसरे वेळी कार्यहानीला कारण होते. एवंच, पुरुषयत्न सफल होतोच असे म्हणण्याला संदेह आड येतो. बरे, कोणत्याही गोष्टीतील दोष पूर्वी जाणणारे लोक, असे असे होईल, म्हणून भाकित करून ठेवितात आणि पुढे पहावे तो वायूच्या गतीप्रमाणे ती गोष्ट भलत्याच दिशेला जाते. मोठ्या विचाराने व न्यायाने एखादे कर्म पुरुषाने आरंभून ते मोठ्या काळजीने चालविले असताही दैवांच्या फटकाऱ्याने पालथे पडते. बरे, त्याचे उलट सहजसिद्ध दैवकृत कर्माचा पुरुषप्रयत्नानेही प्रतिकार घडतो. म्हणजे दैव किंवा संचित यांचाही जोर पुरुषप्रयत्नापुढे सदा चालतोच असे नाही. शिवाय, हे पंडुनंदना, पुरुषप्रयत्न सोडून नुसत्या दैवाच्या हवाल्यावर बसल्याने मनुष्याचा उदरनिर्वाहही होणार नाही. तेव्हा दैव व पुरुषप्रयत्न या दोघांचे आनुकूल्याने सिद्धी प्रात होते असे दिसते. हा विचार मनात ठेवूनच पुरुषाने कार्यास प्रवत्त व्हावे. आणि असा ज्याचा बुद्धिनिश्चय झालेला असतो तोच कोणत्याही कामाला बेधडक हात घालतो. कारण त्याने त्यातली गोम पूर्वीच ओळखिली असल्यामुळे काम फसले तरी तो दुःख मानीत नाही व झाले तरी हर्ष मानीत नाही. आणि हे भीमसेना हाच सिद्धान्त प्रस्तुत प्रकरणीही अनुमत आहे. म्हणजे आपण शत्रूंशी -कौरवांशी -युद्ध केल्यास जय प्रात होईलच असे म्हणता येत नाही. आणि नाहीच होणार असेही म्हणता येत नाही. सारांश, माझ्या बोलण्याचा मथितार्थ असा की पुरुषाने प्रयत्न करीत असावे. केवळ दैव फिरले असे म्हणून निस्तेज, विषण्ण किंवा म्लान होऊन बसू नये.' -(उद्योग अ. ७७).
पितामह भीष्मांचे मत शेवटी देऊन हे 'पुरुषप्रयत्न' प्रकरण संपवू. ते म्हणाले, 'वत्सा युधिष्ठिरा, तू सदैव उत्साहाने प्रयत्न करीत जा. कारण, उत्साहावांचून राजांना त्यांचे दैवच फलदायक होत नाही. दैव व उद्योग हे दोन्ही सारख्याच प्रकारचे आहेत तरी उद्योग हा श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे. तेव्हा जरी तुझ्या उद्योगाला पुष्कळ संकटे आली, तरीही अंतःकरणाला ताप न होऊ देता सदोदित तू उद्योगच करीत रहा. कारण हे राजा, असे करणे हीच श्रेष्ठ राजनीती आहे.' -(शांति अ. ५६).
गृहस्थाश्रम
धन, ऐश्वर्य यांची आकांक्षा व त्यासाठी प्रयत्न, क्षात्रवृत्तीचे अवलंबन व पुरुषप्रयत्नावर दृढ निष्ठा ही प्रवृत्तीधर्माची लक्षणे येथवर सांगितली. या सर्वांचा परिपोष होण्यास गृहस्थाश्रम हा अत्यंत अवश्य आहे, संन्यासप्रवृत्ती ही याला निश्चित मारक होईल हे न सांगताही कळण्याजोगे आहे. महाभारतात चारही आश्रमांचे वर्णन आलेले आहे. संन्यासधर्माचे महत्त्वही काही ठिकाणी सांगितलेले आहे. पण गृहस्थधर्माची अतिशय महती गाऊन तो आश्रम सर्वश्रेष्ठ होय असे जे अत्यंत आग्रहाने अनेक ठिकाणी सांगितले आहे त्याचे कारण हेच होय. कारण गृहस्थाश्रमावाचून
प्रवृत्तीधर्माला अर्थच नाही.
पराशर मुनींनी मोक्षधर्मप्रकरणीसुद्धा गृहस्थाश्रमाचे महत्त्व
पुढीलप्रमाणे सांगितले आहे.
यथानदीनदाः सर्वे सागरे यान्ति संस्थितिम्
एवमाश्रमिणः सर्वे गृहस्थे यान्ति संस्थितिम्
—(शांति २९५/३९).
'ज्याप्रमाणे सर्व नद्या व मोठाले नद हे सागराच्या आश्रयाने राहतात त्याचप्रमाणे इतर आश्रमातील लोक गृहस्थाश्रमी पुरुषावर अवलंबून असतात.'
याचप्रमाणे वेदव्यासांनीही आपले मत दिले आहे.
गृहस्थस्त्वेष धर्माणां सर्वेषां मूलमुच्यते ।
-(शां. २३४।६).
गृहस्थाश्रमी पुरुष हा सर्व धर्मांचा आधार आहे असे ते म्हणतात. युधिष्ठिराला उपदेश करतानाही व्यासांनी हाच अभिप्राय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'गृहस्थाश्रमी मनुष्याच्याच आधाराने देव, पितर, अतिथी आणि पोष्यवर्ग आपली उपजीविका चालवीत असतात. यास्तव हे पृथ्वीपते तू त्यांचे पोषण कर. हे प्रजाधिपते पक्षी, पशू आणि इतरही सर्व प्राणी यांचे पोषण गृहस्थाश्रमी करीत असतो. म्हणूनच गृहस्थाश्रमी श्रेष्ठ होय. गृहस्थाश्रम हा चारही आश्रमांमध्ये आचरण्यास कठीण आहे. यास्तव दुर्बलांना दुःसाध्य अशा या गृहस्थाश्रमाचा तू अंगीकार कर."
गृहस्थाश्रमाची ही महती सर्वांनाच मान्य आहे. निवृत्तिवादी लोकसुद्धा याला विरोध करू शकत नाहीत. पण त्यांचे म्हणणे असे असते की, इहलोकीचे सर्व व्यवहार व्यवस्थित चालून समाज सुस्थितीत राहावा, तो ऐश्वर्यसंपन्न व्हावा यासाठी गृहस्थाश्रम हा अवश्य हे खरे. पण ही कर्तव्ये मनुष्याने पार पाडल्यानंतर मोक्षासाठी त्याने संन्यास घेणेच अवश्य आहे. महाभारतात काही मुनींनी या तऱ्हेचे मतही दिलेले आहे. पण ते काही मुख्य भारतीय तत्त्वज्ञान नव्हे. श्रीकृष्ण, व्यास, भीष्म हे थोर भारतीय पुरुष याचा पुरस्कार करीत नाहीत. श्रीकृष्णांनी तर मोक्षासाठी संन्यासधर्माची मुळीच जरूर नाही असे स्पष्ट मत दिले आहे. भगवद्गीतेचा मथितार्थ असाच आहे हे गीतारहस्यात स्पष्ट झालेलेच आहे, पण त्याशिवाय अन्य ठिकाणीही श्रीकृष्णांनी आपले हे मत निःसंदिग्धपणे मांडलेले आढळते.
ते म्हणतात, 'कोणाचा द्रोह न करिता पवित्र राहून शुद्ध अशा स्थली वेदाध्ययन करीत कुटुंबातच राहावे' अशी या कामी शास्त्राज्ञा स्पष्ट आहे. तरी ज्ञानी ब्राह्मणांतही याविषयी निरनिराळी मते रूढ आहेत. कोणी म्हणतात कर्मानेच परलोकप्राप्ती होते, कोणी म्हणतात कर्मत्यागपूर्वक ज्ञानानेच होते. असे आहे तरी ही गोष्ट कोणालाही कबूल करणे भागच आहे की, विद्वान झाला तरी भक्ष्यभोज्य पदार्थ खाल्ल्यावाचून त्याची काही तृप्ती होत नाही. आणि ब्रह्मवेत्ते संन्यासी झाले तरी त्यांना गृहस्थाकडे भोजन शास्त्रानेच विहित आहे. तेव्हा कर्म आणि संन्यास हे दोन्ही जरी विहित असले तरी कर्माधार जो गृहस्थाश्रम तोच संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण संन्यासादि अन्य आश्रमात साधणारे जे ज्ञान ते गृहस्थाश्रमातही साध्य होते हे जनकादिकांच्या उदाहरणारून स्पष्ट होते. परंतु गृहस्थाश्रमात साधणाऱ्या स्वतःचे, पितरांचे व अतिथींचे पोषण या गोष्टी संन्यास, ब्रह्मचर्य या आश्रमांत साध्य होत नाहीत. अतएव कर्म व ज्ञान या उभयतांचा साधक जो गृहस्थाश्रम तोच श्रेष्ठ आहे हे सिद्ध आहे.' -(उद्योग २९).
प्रजापालन हाच मोक्ष
गृहस्थाश्रम हाच सर्व आश्रमात श्रेष्ठ असून मोक्षासाठीही संन्यासधर्माची जरूर नाही असे वरीलप्रमाणेच इतर ठिकाणीही बरेच वेळा सांगण्यात आलेले आहे. भीष्म युधिष्ठिराला सांगतात, 'हे राजा सर्व आश्रमांमध्ये गृहस्थाश्रमाचेच धर्मसिद्धत्व अत्यंत उज्ज्चल असून तो अत्यंत पवित्र आहे असे म्हटलेले आहे. आम्हीही त्याच धर्माचे सेवन करीत आहो. हे नरश्रेष्ठा अंतःकरणाचा निरोध करून अत्यंत प्रसन्नचित्ताने जो राजा प्रजापालनामध्ये मग्न होऊन राहतो त्याला वेदाध्ययननिष्ठ व सत्कर्म करणारे असे जे ब्राह्मण त्यांच्या धर्माची प्राप्ती होते. सर्व प्राण्यांचे पालन व स्वराष्ट्ररक्षण यांच्या योगाने राजाला संन्यासाश्रमाच्या फलाची प्राप्ती होते. प्राणांचे केवल द्यूतच असा जो संग्राम त्यामध्ये एक स्वतःचे रक्षण किंवा मृत्यू या दोनच गोष्टी घडावयाच्या असा ज्या राजाचा निश्चय असतो त्याला संन्यासाश्रमाचे फल मिळते. -(शांति ६६) संग्राम हाच क्षत्रियांचा धर्म होय. शत्रुनाशावांचून श्रेष्ठ असे दुसरे त्याचे कोणतेही कर्तव्य नाही. दान, अध्ययन आणि यज्ञ हे क्षत्रियांनी संपादन केलेल्या संपत्तीच्या रक्षणाचे उपाय आहेत. राजाने सर्व प्रजांना आपापल्या धर्माप्रमाणे वागावयास लावून धर्माच्याच योगाने शांतिसंबंधीची सर्व कर्मे करावी. प्रजेचे पालन केल्यानेच राजाच्या इतिकर्तव्याची परिसमाप्ती होते. मग तो दुसरे काही करो वा न करो. -(शांति ६०).
किं तस्य तपसा राज्ञः किं च तस्याध्वरैरपि
सुपालितप्रजो यः स्यात् सर्व धर्मविदेव सः ।
- शां. ६९। ७३.
जो राजा प्रजेचे उत्तम पालन करतो तो सर्व धर्म जाणणाराच होय. अशा राजाला तपाची जरूर काय आणि यज्ञाची तरी व्याला गरज काय ?
वरील विवेचनावरून क्षत्रियांनाच फक्त संन्यास अनवश्य आहे पण ब्राह्मणांना मात्र त्यावाचून गती नाही, मोक्षप्रातीसाठी त्यांनी संन्यास घेणे अवश्य आहे, असे भारतीयांचे मत आहे, असा गैरसमज होण्याचा संभव आहे. पण तो खरा नाही. संन्यास अगदी अवश्यच आहे, त्यावाचून मोक्ष मिळणारच नाही असा दण्डक कोणाच्याच बाबतीत नाही. शुकाला ब्राह्मणधर्माचे स्वरूप कथन करताना व्यास म्हणतात-
आचार्येणभ्यनुज्ञातश्चतुर्णामेकमाश्रमम्
आविमोक्षात् शरीरस्य सोऽवतिष्ठेद् यथाविधि ॥
-शां. २३४.
(गुरुकडून ज्ञान संपादन झाल्यावर) गुरूची अनुज्ञा घेऊन चार आश्रमांपैकी कोणत्याही एकाचा स्वीकार करून त्याचे आमरण यथाशास्त्र आचरण करीत राहावे.
येथे ब्राह्मणाने संन्यासच घ्यावा असे सांगितलेले नाही. गृहस्थाश्रमही तितकाच योग्य आहे आणि ब्राह्मणाने आमरण गृहस्थाश्रमात राहिलेले चालेल असेही व्यास सांगत आहेत. पितामह भीष्मांनी एके ठिकाणी हेच सांगितले आहे. ब्राह्मणाने संन्यासाश्रमात कसे वागावे हे सांगितल्यानंतर ते म्हणाले, 'तसेच, वेदांचे अध्ययन केल्यानंतर जो ब्राह्मण ऋषींच्या धर्माने युक्त असणाऱ्या गृहस्थाश्रमरूपी कठीण धर्माचे एकाग्र अंतःकरणाने आचरण करतो त्यालाही त्या आश्रमास विहित असलेली कृत्ये करून व प्रजा निर्माण करूनं सुखोपभोग घेतल्यानंतर ब्रह्मपदाची प्राप्ती होते.' -(शांति अ. ६१). त्याच ओघात पुढे बोलताना भीष्म म्हणाले, 'याप्रमाणे जो यज्ञशील ब्राह्मण यथाविधी गृहस्थाश्रमाचा अंगीकार करून राहतो व गृहस्थाश्रमास योग्य व अत्यंत पवित्र अशीच उपजीविका संपादन करतो त्याला स्वर्गलोकी अत्यंत पवित्र अशा फलाची प्राप्ती होते. त्याने ज्या इच्छा मनात धरलेल्या असतात त्यांचा नाश होत नाही व म्हणूनच देहत्यागानंतर त्या सर्व ठिकाणी नेत्र, शरीर व मुख यांनी युक्त असणारे असे स्वरूप धारण करून अनंततत्व प्राप्तीच्या इच्छेने त्याच्याकडे येतात. अर्थातच मोक्षाची इच्छा असल्यास तो मुक्तही होतो.'-(शां. ६१).
मोक्ष हे जरी प्रत्येकाचे अंतिम साध्य आहे तरी त्यासाठी संन्यास अवश्यच आहे असे नाही. आमरण गृहस्थाश्रमात राहूनही मोक्षप्राप्ती करून घेता येते असे भारतीय तत्त्ववेत्त्यांचे मत होते, असे वरील वचनांवरून स्पष्ट दिसून येते.
यानंतर, काही ठिकाणी संन्यासाचेही गुणवर्णन केलेले आढळते, तेही आपण तपासून पाहिले पाहिजे. ते पाहता पहिली गोष्ट अशी दिसून येते की, संन्यास हा विहित आहे असे काही ठिकाणी जे सांगितलेले आहे ते फक्त ब्राह्मणांपुरते आहे. इतर वर्णीयांना संन्यासाची अनुज्ञा अगदी क्वचितच दिलेली आढळेल.
कौरव-पांडवांचे युद्ध झाल्यानंतर धर्मराजाला सर्व राज्य प्राप्त झाले होते. पण त्याचे मन एकाएकी फिरले. युद्धामध्ये आपल्या हातून फार हत्या झाली या कल्पनेने त्याला अत्यंत उद्वेग वाटू लागला. व आपण संन्यास घ्यावा असे त्यास वाटू लागले. तो म्हणाला, 'ज्या अर्थी संन्यास करणाऱ्या मनुष्यास जन्ममरणाची प्राप्ती होत नाही असे श्रुतिवाक्य आहे त्या अर्थी अंतःकरणाचा निश्चय करणारा तो संन्यासी योगमार्गाची प्राप्ती होऊन ब्रह्मस्वरूपी बनून जातो हे खास. म्हणूनच अर्जुना, आता शीतोष्णादिक द्वंद्वांचा त्याग करून ध्याननिष्ठ होऊन ज्ञानप्राप्तीच्या इच्छेने मी तुम्हा सर्वांचा निरोप घेऊन वनात जाणार.'
धर्मराजाचे हे बोलणे ऐकून भीम, अर्जुन, द्रौपदी यांना फार विस्मय वाटला व संतापही आला. शेवटी संन्यासच घ्यावयाचा होता तर मग हा युद्धाचा खटाटोप कशाला केला, असे ते सर्व त्याला म्हणू लागले व त्याची निर्भर्त्सना करू लागले. भीम म्हणाला, 'राजा, तुजवाचून दुसऱ्या कोणाही क्षात्रधर्माचरण करणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी क्षमा, दया, ही वास करीत नाहीत. जर तुझा असा विचार आहे हे आम्हांस पूर्वीच कळले असते तर आम्ही शस्त्रग्रहणही केले नसते आणि शरीरपतन होईपर्यंत भिक्षाच मागून राहिलो असतो. राजा, 'हा ज्येष्ठ आहे' असा विचार करत आम्ही तुज मंदबुद्धीच्या अनुरोधाने वागत होतो, याबद्दल आम्हीच निंदेस पात्र आहो. हे नरश्रेष्ठा, मी सांगतो याचा आता विचार कर. अरे, वार्धक्याने जर्जर होऊन गेलेल्या अथवा शत्रूंनी पीडित करून सोडलेल्या मनुष्याने आपत्काली संन्यास घ्यावा असे शास्त्र आहे. म्हणूनच बुद्धिमान लोक या संन्यासाचे नाव सुद्धा घेत नाहीत. इतकेच नव्हे तर सूक्ष्मदृष्टी लोक क्षत्रियाने संन्यास घेणे म्हणजे धर्माचा अतिक्रम आहे असे मानतात. अरे, जर संन्यासाच्या योगाने एखाद्या राजाला सिद्धी मिळाली असती तर पर्वतांना व वृक्षांनाही सत्वर सिद्धी मिळाली असती. कारण हे देखील नेहमी संन्यासी, निरुपद्रवी व निरंतर ब्रह्मचर्याने वागणारे असेच आहेत.' -(शांति. अ. १०).
भीमाप्रमाणेच द्रौपदीही युधिष्ठिरावर फार चिडून गेली होती. ती म्हणाली, "हे नरश्रेष्ठा, वनवासात असताना 'वनवास संपल्यावर आपण दुर्योधनाचा वध करू व पृथ्वीचा उपभोग घेऊ. असे तू म्हणाला होतास. आणि आज आता त्याच्या उलट वागून आमच्या अंतःकरणावर काय म्हणून प्रहार करीत आहेस ? हे राजा, सर्व प्राण्यांशी मित्रत्वाने वागणे, आणि दान, अध्ययन व तप करणे हा ब्राह्मणांचा धर्म असेल कदाचित्, पण तो क्षत्रियांचा धर्म नव्हे. दुष्टांना हाकून लावणे, सज्जनांचे पालन करणे व संग्रामातून पलायन न करणे हा क्षत्रियांचा धर्म होय. हे नृपश्रेष्ठा, तुझ्या ह्या वेडेपणामुळे सर्व पांडवही वेडे बनून गेले आहेत. कारण हे जर वेडे नसते तर इतर नास्तिकांसहवर्तमान त्यांनी तुला बद्ध करून स्वतःच पृथ्वीचे पालन केले असते." -(शांति, १४).
काही वेळाने इतर ऋषींनी युधिष्ठिराला उपदेश केल्यावर अर्जुन त्याला म्हणाला, 'हे नरश्रेष्ठा, तू क्षत्रियांचा धर्म लक्षात आण. तप आणि त्याग हे ब्राह्मणांच्या परलोकप्राप्तीस कारणीभूत होणारे धर्म आहेत. क्षत्रियांचा संग्रामामध्ये मरण हाच धर्म होय. यास्तव हे भरतकुलश्रेष्ठा, सर्व धर्म जाणणारा, धर्मात्मा, बुद्धिमान, चतुर आणि लोकांमध्ये निकृष्ट कोणते व उत्कृष्ट कोणते हे अवगत असलेला अशा प्रकारचा तू राजा संतापजन्य शोक सोडून दे व स्वकर्मे करण्याविषयी उद्युक्त हो.' (शां. २२).
याप्रमाणे अर्जुनाने विनविले तरी त्या कुरुकुलोत्पन्न कुंतीपुत्र युधिष्ठिराने उत्तर दिले नाही, तेव्हा व्यासमुनी त्याला म्हणाले, 'हे सौम्या युधिष्ठिरा, अर्जुनाचे हे भाषण अगदी खरे आहे. शास्त्रामध्ये दृष्टिगोचर होणारा जो श्रेष्ठ धर्म तो गृहस्थाश्रमाचेच अवलंबन करून राहिलेला आहे. यास्तव हे धर्मज्ञा, तू शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यथाविधी स्वधर्माचे आचरण कर. हे महाराजा, तप, मिक्षा, ध्यान एकांतवास हे व्यापार ब्राह्मणांनाच फलदायक होतात. क्षत्रियाचे हे व्यापार नव्हत. दण्डधारण हाच क्षत्रियाचा श्रेष्ठधर्म होय.' -(शां. २३).
क्षत्रियाला संन्यास विहित नाही, त्याने राज्यपालनच केले पाहिजे, त्यानेच त्याला मोक्षप्राप्ती होते असे भीम, अर्जुन, द्रौपदी यांनी युधिष्ठिरास अगदी निक्षून सांगितलेले आहे व त्यावर शेवटी व्यासांनी आपल्या संमतीचा शिक्का दिलेला आहे.
संन्यास हा भारतीय तत्त्ववेत्त्यांना कितपत इष्ट आहे हे यावरून कळून येईल. प्रथमतः मोक्षासाठी तो अवश्य नाही, गृहस्थाश्रमात राहूनही मोक्ष मिळतो असे त्यांनी सांगितले. नंतर विकल्पाने त्यांनी दिलेली सवलत हीसुद्धा फक्त ब्राह्मणांना आहे असे सांगितले. आणि यापुढे जाऊन संन्यासधर्माची ब्राह्मणांतही फाजिल प्रवृत्ती झाली तर समाज उत्सन्न होईल हे जाणून त्यांनी संन्यास हा फक्त म्हातारपणीच घ्यावा असा दण्डक घालून दिलेला आहे.
व्यास म्हणतात, 'जेव्हा गृहस्थाश्रमी पुरुषाला, आपले शरीर वृद्धपणामुळे पांढरे होऊन सुरकुतलेले आहे असे दिसून येईल व आपल्या मुलाला मूल झाल्याचे तो अवलोकन करील तेव्हाच त्याने वनाचा आश्रय करावा.' –(शांति अ. २४४). पितामह भीष्मांनीहि हाच अभिप्राय व्यक्त केला आहे. 'बुद्धिमान अशा गृहस्थाश्रमी ब्राह्मणाने वेदाध्ययन आणि षट्कर्माचरण ही करावी व गृहस्थाश्रमोचित सर्व कर्मे केल्यानंतर त्याने वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करणे प्रशस्त होय.' -(शां. अ. ६३).
महाभारतात क्वचित गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रम हे टाळून ब्रह्मचर्यातून एकदम संन्यासाश्रमात जावयास ब्राह्मणांना अनुज्ञा दिलेली आहे. (शांति ६१). त्याचप्रमाणे क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांनाही संन्यासाश्रमाची अनुज्ञा दिलेली आहे. (शांति ६३) पण एकंदर विवेचनाचा ओघ पाहिला तर पुढीलप्रमाणे भारतीय तत्त्ववेत्त्यांचे मत आहे असे स्वच्छ दिसून येते.
गृहस्थाश्रम व संन्यास हे दोन्ही आश्रम मोक्षप्राप्तीस सारखेच योग्य आहेत. संन्यास अवश्य आहे असे मुळीच नाही. उलट गृहस्थाश्रमात राहिल्याने राष्ट्राची सेवा करता येते व त्यामुळे समाजाचे हित होते. म्हणून केवळ मोक्ष देण्यास तो समर्थ आहे म्हणून संन्यासाकडे कोणाचीच प्रवृत्ति नसलेली बरी. त्यातूनही संन्यास अवश्य वाटलाच तर ब्राह्मणांनी फक्त त्याचा स्वीकार करावा. पण तोही प्रपंचाची सर्व कार्ये यथासांग झाल्यावर, गृहस्थाश्रमाची सर्व कर्तव्ये पार पाडल्यावर, वृद्धापकाळी करावा हेच युक्त आहे. आणि संन्यासासंबंधी हे धोरण ठेवले तरच राष्ट्राचा उत्कर्ष होईल. परिपक्क बुद्धीच्या कर्तृत्वशील अशा पुरुषांपैकी जर संन्यासाकडे प्रवृत्ती होऊ लागली तर राष्ट्राचा नाश होईल.
महाभारताला राष्ट्रीय ग्रंथ का म्हणतात ते वरील विवेचनावरून ध्यानात येईल. राष्ट्राचा उत्कर्ष हाच मुख्य धर्म होय, असे त्यात मोठ्या आग्रहाने प्रतिपादन केलेले आहे. धन, बल, क्षात्रधर्म, संसारप्रेम यांवाचून राष्ट्र जगणे अशक्य आहे हे जाणून या तत्त्ववेत्त्यांनी त्यांचा पुरस्कार करून त्यांचे महत्त्व काय ते मोठ्या विस्ताराने वर्णिलेले आहे. आता शेवटच्या भागात प्रवृत्तिधर्माला कोणत्या प्रकारची मनोवृत्ती त्यांच्या मते अवश्य आहेत यासंबंधी त्यांनी जे विवेचन केले आहे ते सांगून हे प्रवृत्तिधर्मप्रकरण
संपवितो.
व्यक्तिधर्म व राष्ट्रधर्म
गृहनीती व परनीती असे नीतीचे दोन भाग करून भिन्न क्षेत्रात भिन्न धर्म कसे ग्राह्य असतात ते मागील प्रकरणी सांगितलेच आहे. तोच विचार येथेही केला पाहिजे. ज्यांना केवळ मोक्षाचीच इच्छा आहे, राष्ट्ररक्षणाची काळजी जे वाहत नाहीत किंवा जे ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध होऊन केवळ आत्मज्ञानाच्याच उपासनेत आहेत, किंवा विशिष्ट प्रकारच्या वृत्तीमुळे जे काही कारणाने जगाच्या प्रपंचाबद्दल उदासीन आहेत त्यांचा धर्म एक प्रकारचा होईल. पण ज्यांना पराक्रमाची आकांक्षा आहे, राष्ट्र वैभवास चढविण्याचा उद्योग ज्यांनी आरंभिला आहे, ज्यांच्या दुर्दम्य शक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत, जगताच्या उलाढाली पाहून, त्यात उडी टाकून वैभवाच्या शिखरावर आपण आरोहण करावे अशी ज्यांना प्रेरणा होत असते त्यांचा धर्म निराळा. निर्मत्सर वृत्ती, संतोष, भोळी वृत्ती, षड्रिपूंचा तिटकारा हा उपदेश पहिल्या प्रकारच्या लोकांना युक्त आहे. पण विजिगीषू, जयिष्णू परंतप वीरांना तो अगदी त्याज्य होय. म्हणून महाभारतात असंतोष, संताप, साहस, सावधानता, प्रतिकारबुद्धी यांची ठायी ठायी प्रशंसा केलेली आढळते.
क्षत्रियस्य हि धर्मोऽयं हन्यात् हन्येत वा पुनः ॥
-७।१९७।३८
एकतर मारावे नाही तर मरून जावे हाच क्षत्रियधर्म होय; 'परं विषहृते यस्मात् तस्मात् पुरुष उच्यते' ॥(५|१३३|३५) शत्रूचा प्रतिकार करतो म्हणून पुरुष ग्हणतात; 'न निर्मन्युः क्षत्रियोऽस्ति । लोके निर्वचनं स्मृतम्' -'ज्याला अपमानाची चीड नाही तो क्षत्रियच नव्हे.' (वन, २७, ३७) ; नामर्षं कुरुते यस्तु पुरुषः सोऽधमः स्मृतः ॥ (२,५०,१७); ज्या पुरुषाला (दुसऱ्याने अपमान केला तरी) क्रोध येत नाही, तो अधम समजावा; संतोषो वै श्रियं हन्ति (२, ४९, १४) असंतोषः श्रियो मूलम् ॥ असंतोष असेल तर वैभव प्राप्त होते, संतोषामुळे त्याचा नाश होतो. -(सभा ५५/११).
अशा तऱ्हेची जयिष्णू वृत्तीला प्रोत्साहक अशी शेकडो सुभाषिते महाभारतात विखुरलेली आहेत. सावधनाता, दक्षता, साहसी वृत्ती यांचीही महाभारतांत प्रशंसा अनेक ठिकाणी केली आहे.
न हि प्रमादात्, परमस्ति कश्चित् वधो नराणांमिह जीव लोके
प्रमत्तमर्था हि नरं समन्तात् त्यजन्त्यनर्थाश्च समाविशन्ति ।
- १०, १०, १९
भोळ्या भावाला, देवावर भार घालून स्वस्थ बसण्याला भक्तिमार्गात कितीही किंमत असली तरी संसारात त्याला मुळीच किंमत नाही, इतकेंच नव्हे तर तो घातुक ठरतो असे येथे सांगितले आहे. माणसांच्या नेहमी चुका होतात त्या याच एका प्रांतात सांगितलेले वचन ते दुसऱ्या प्रांतात आणून सर्वनाश करून घेतात.
नासम्यक्कृतकारी स्यात् अप्रमत्तः सदा भवेत् ।
कण्टको ह्यपि दुश्छिन्नो विकारं कुरुते चिरम् ।
- (शां. १४०, ६०).
निष्काळजीपणाने काही करू नये, नेहमी सावध असावे. कारण एकादा काटा सुद्धा जर अयोग्य रीतीने तुटला तर तो पुष्कळ काळपर्यंत विकार उत्पन्न करतो.
साहसी वृत्तीचा पुढील उपदेश प्रसिद्धच आहे.
न संशयमनारुह्य नरो भद्राणि पश्यति
सशयं पुनरारुह्य यदि जीवति पश्यति ।
-(शां. ४०, ३४).
ही वचने पाहिल्यावर भारतीय तत्त्वज्ञानाची चांगली कल्पना येते. राष्ट्राचा उत्कर्ष, वैभव, ऐश्वर्य, साम्राज्य या भव्य आकांक्षा त्या पुरुषांच्या चित्तांत होत्या. आपल्या लोकांनी यांसाठी अहोरात्र प्रयत्न करावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून जयिष्णू वृत्तीला पोषक अशीच अमृतवचने त्यांच्या मुखांतून नित्य येत असत. षड्रिपूंची निंदा करणे त्यांना मान्य नव्हते. संताप, क्रोध, द्रोह, ऐश्वर्याचा लोभ यांवाचून माणसाच्या हातून पराक्रम होणे शक्य नाही हे ते जाणून होते. साहसी वृत्ती, नित्य मरणमारणाच्या संग्रामाची सिद्धता यांवाचून ऐश्वर्य मिळणे अशक्य आहे हे त्यांना पक्के ठाऊक होते. बल, क्रौर्य, भेद यांवाचून शत्रू नमत नाही असा त्यांचा अनुभव होता. हा आपला सर्व अनुभव त्यांनी भारतीयांच्या कल्याणासाठी या राष्ट्रीय ग्रंथात ग्रथित करून ठेवला आहे. या सूर्यप्रकाशाच्या साह्याने आपण आपला मार्ग आखला तर भारताचे प्राचीन काळचे वैभव आजही प्राप्त करून घेणे आपल्याला फार कठिण नाही.
राष्ट्रधर्म व विश्वधर्म
महाभारतात सांगितलेला धर्म हा व्यवहारधर्म आहे, राष्ट्रधर्म आहे. ते प्रपंचविज्ञान आहे. राष्ट्रीय प्रपंच यशस्वी करावयाचा असेल तर त्याचाच अवलंब करणे अवश्य आहे. विश्वधर्म, मानवताधर्म हा याहून अगदी निराळा. त्याची तत्त्वे राष्ट्रीय प्रपंचात शिरली तर समाजाचा अधःपात होतो. नाश होतो. संतांच्या काळात हेच झाले, शिव-समर्थांनी त्यातून महाराष्ट्राला आणि पर्यायाने भारताला सोडविले. त्यानंतर ब्रिटिशांच्या राज्यात जो स्वातंत्र्य संग्राम झाला त्यात प्रारंभी धर्म हे साधन आहे, साध्य नव्हे, गृहनीती व परनीती या भिन्न आहेत हा विवेक जागरूक होता. पण महात्माजींच्या काळात आपल्या राजकारणात, आपल्या राष्ट्रीय प्रपंचात पुन्हा विश्वधर्म, मानवताधर्म यांतील तत्त्वे घुसली. पण महात्माजींनी पुढे स्वतःच त्यांना मुरड घातली आणि वल्लभभाई, सुभाषचंद्र, यांनी तर त्या तत्त्वांना क्षणमात्रही थारा दिला नाही. तरीही फाळणीच्या रूपाने त्या सत्यअहिंसेच्या व्यापक अराष्ट्रीय धर्माची किंमत आपल्याला द्यावीच लागली. आज स्वातंत्र्यानंतरच्या काळात आपल्या राष्ट्रीय प्रपंचावर पुन्हा विश्वधर्माची काळी छाया घनदाट पडू पहात आहे. पंचशील, जगत्कल्याण, विश्वशांती यांवरील पंडित जवाहरलालजी यांची स्वहितनिरपेक्ष निष्ठा, चीन-पाकिस्तान यांच्या नेत्यांच्या सद्भावने वरील त्यांची श्रद्धा, त्यांच्याविषयी भारतीयांच्या चित्तात अणुमात्र संताप येऊ न देण्याविषयीची त्यांची दक्षता, दरवेळी शत्रुपक्षालाच झुकते माप देण्याची त्यांची वृत्ती, लष्करी बळ आम्ही कधीही वापरणार नाही अशी शत्रूला त्यांनी दिलेली अभिवचने, लष्करी कराराने मित्रराष्ट्रे जोडून ठेवण्याला त्यांचा विरोध, ही सर्व विश्वधर्माची लक्षणे आहेत. त्यांनी विश्वाचे कल्याण किती होईल याविषयी शंका आहे. पण भारताचे अकल्याण होईल, होत आहे याविषयी शंका नाही. अशा वेळी महाभारतातील राष्ट्रधर्माच्या तत्त्वांचा आपण अभ्यास केला व त्याचा अवलंब केला तर विश्वधर्माच्या आपत्तीतून आपला देश मुक्त होईल अशी आशा करण्यास बराच आधार निर्माण होईल असे वाटते.
● ● ●