भारता'साठी/मुंबईकर, मुंग्या आणि मधमाश्या

विकिस्रोत कडून


मुंबईकर, मुंग्या आणि मधमाश्या


 ११ जुलै २००६ रोजी मुंबईत एकामागोमाग एक असे सात बाँबस्फोट झाले. सातही बाँबस्फोट पश्चिम रेल्वेच्या उपनगरी लोकल गाड्यांमध्ये वेगवेगळ्या स्टेशनांवर झाले. त्याच दिवशी श्रीनगर येथेही एका बाँबस्फोटात अनेक माणसे मरण पावली.
 श्रीनगरच्या रहिवाशांना बिचाऱ्यांना वर्षानुवर्षे बाँबस्फोटांची आणि हल्ल्यांची सवय झाली आहे. त्यांच्या दृष्टीने ११ जुलैचा बाँबस्फोट हा शेकडो बाँबस्फोटांच्या मालिकेतील एक. थोड्याच कालावधीत त्याकडे दुर्लक्ष करून ते आपापल्या कामाला लागले. बाँबस्फोटात ज्यांच्या घरची माणसे जखमी झाली किंवा मरण पावली त्यांच्या नातेवाइकांपुरतेच काय ते दुःखाचे सावट राहिले; बाकीचे सारे श्रीनगर आपल्या नेहमीच्या कामधंद्याला, उद्योगाला लागले.

 मुंबईच्या बाबतीत मात्र बाँबस्फोट हा इतका अंगवळणी पडण्यासारखा प्रकार नाही. १९९३ साली झालेल्या प्रचंड बाँबस्फोटानंतर वर्षादोनवर्षांनी एखादा बाँबस्फोट होत राहिला, पण तो मुंबईतील वेगवेगळ्या जागी. त्यांचा परिणामही स्थानिक. परंतु, १९९३ सालानंतर १३ वर्षांनी पहिल्यांदा सगळ्या मुंबईला व्यापून टाकणारा दहशतवादाचा हा प्रकार घडला.

 स्फोट झाल्याझाल्या त्यात प्रत्यक्षात जखमी न झालेल्या लोकांनी डब्यामध्ये अडकलेल्या, रुळांवर पडलेल्या लोकांना ताबडतोब वाचवायला सुरुवात केली. आजूबाजूच्या इमारतींतील नागरिकांनीही अंथरुणे, पांघरुणे, साड्या जे काही हाती लागले ते जखमींच्या मदतीकरिता ताबडतोब देऊ केले. सगळे लोक एकदिलाने कामाला लागले. ज्यांना जखमा झालेल्या नव्हत्या अशा लोकांनाही घरी जाण्याकरिता रस्त्याने जाणाऱ्या सर्व वाहनचालकांनी – छोट्या गाड्या, मोठ्या ट्रक, सर्वांनीच – मदत केली.

 दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लंडनवर हिटलरच्या विमानांनी प्रचंड विध्वंसक बाँबहल्ले एकामागोमाग एक केले. प्रतिदिनी. एवढेच नव्हे तर, प्रत्येक तासादोनतासांनी विमानांचे थवेच्या थवे लंडनवर येत आणि मोठ्या प्रमाणावर बाँबचा वर्षाव करून निघून जात. लंडनवासियांनाही सवय झाली आणि त्यांनी ज्या शिस्तीने बाँबहल्ल्यांना तोंड दिले, एवढेच नव्हे तर आपले नेहमीचे दिनक्रम चालू ठेवले आणि, त्याहीपलीकडे जाऊन, युद्धासाठी लागणाऱ्या शस्त्रांच्या, दारुगोळ्यांच्या, रणगाड्यांच्या कारखान्यांची चाके फिरत ठेवली त्याचे जगभर कौतुक झाले.

 मुंबईकरांनीही लंडनवासियांना शोभेल अशाच तऱ्हेची वर्तणूक दाखवली. बाँबस्फोट झाल्यानंतर २४ तासांच्या आत मुंबईच्या उपनगरी लोकल गाड्यांची वाहतूक सुरू झाली आणि बहुतांश मुंबईकर हा आपापल्या कामाला तत्परतेने लागला.

 हिंदुस्थानभर, मुंबईवासीयांच्या या शिस्तबद्धतेची मोठी वाहवा झाली.

 प्रत्यक्ष बाँबस्फोटांच्या वेळी प्रचंड धैर्य दाखवणारा मुंबईकर नंतरच्या काळात मात्र पुष्कळ बावरलेला दिसला. जागोजागी बाँबस्फोटाच्या अफवा उडाल्या आणि त्या अफवांनी मुंबईकरांची त्रेधा उडून गेली.

 मुंबईकरांनी बाँबस्फोटांनंतर लगेच काम चालू ठेवण्यात जी शिस्त आणि धैर्य दाखवले ती शिस्त धैर्य हा पौरुषाचा प्रकार आहे का अगतिकतेचा परिणाम आहे?

 लहानपणापासून आम्हाला मुलांना सारी तरुण मंडळी, शिक्षक, आईबापे नेहमी मुंग्या आणि मधमाश्यांच्या उद्योगीपणाचे कौतुक सांगत असत. त्याच्या कितीतरी कथा पंचतंत्रापासून इसापनीतीपर्यंत विखुरलेल्या आहेत. हे छोटे प्राणी उद्योग करतात, श्रमाने पावसाळ्यासाठी बेगमी करतात म्हणून ते जगू शकतात आणि उनाड टोळ कष्ट न करता बागडल्यामुळे त्याला पावसाळ्याच्या दिवसात उपाशीतापाशी मरावे लागते.

 अन्नधान्याचे कण गोळा करण्याकरिता रांगेने धावणाऱ्या मुंग्या आणि फुलाफुलांमध्ये जाऊन मधाचे आणि परागांचे कणकण गोळा करून मधाचे पोळे तयार करणाऱ्या मधमाशा या सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय राहिल्या आहेत.

 लहानपणी खोडसाळपणे आम्ही या मुंग्यांच्या रांगांशी खेळत असू. रांगेने चालणाऱ्या मुंग्यांच्या त्या रांगेत एखादा पाण्याचा थेंब किंवा एखादा लहानसा खडा टाकला तर क्षणभरच, ज्यांच्याजवळ खडा पडला असेल किंवा पाण्याचा

थेंब पडला असेल, त्या तेवढ्याच मुंग्या बावरल्यासारख्या होतात, काही वेळ स्तब्ध होतात, काही वेळ मागे किंवा डावीउजवीकडे धावपळ करतात; पण थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा खडा किंवा थेंब पडलेल्या जागेला वळसा मारून रांगा धरून त्या चालू लागतात. हा त्यांचा मोठा गुण!

 मुंबईकरांची मागील महिन्यात झालेल्या स्फोटानंतरची वागणूक ही मुंग्यांप्रमाणे होती. वरून आघात झाला, काही वेळ गोंधळल्यासारखे झाले; पण, त्यानंतर लगेचच पुन्हा आपला कार्यक्रम चालू झाला.

 मुंबईकरांच्या या शिस्तीचे आणि धैर्याचे देशभर आणि जगभर मोठे कौतुक झाले. आणि, या कौतुक करणाऱ्यांच्या मनामध्ये एक भावना होती की, अशा तऱ्हेने जर हिंदुस्थानातील नागरिक आतंकवाद्यांच्या कारवायांना तोंड देऊ लागतील तर आतंकवादाचा काहीही परिणाम होणार नाही आणि आतंकवादाविरुद्धची आपली लढाई आपण सहज जिंकू शकू.

 मुंबईकरांच्या या शिस्तबद्ध वागण्यामुळे आतंकवाद्यांचा एक हेतू, जो देशामध्ये जातीय वैमनस्य आणि दंगली माजवणे आहे तो जरी सफल झाला नाही तरीसद्धा आतंकवादाविरुद्ध एक मोठी लढाई जिंकल्यासारखे होईल असे या कौतुक करणाऱ्या महात्म्यांचे म्हणणे!

 मुंबईत राहणारे माझे अनेक नातलग, स्नेही, मित्र आहेत. त्यांच्यापैकी काहींची मी विचारणा केली, त्यांचे कौतुक केले; पण त्यांना त्या कौतुकाने फारसे काही गोंजारल्यासारखे वाटले नाही. उलट, असे कौतुक करणाऱ्यांच्या मनामध्ये काही एक मोठा डाव आहे असेच त्यांचे मत दिसले. "नाही तर आम्ही काय करणार होतो?" त्यांनी विचारले. मुंबईकरांना सकाळी उठून कामावर जाणे आणि संध्याकाळी कामावरून परत येऊन विश्रांती घेणे यापलीकडे आयुष्य माहीत नाही. काहीही विपरीत घडले की पुन्हा एकदा, शक्य तितक्या लवकर, आपल्या 'हापिस गोईंग मुंबई'च्या कार्यक्रमात ते मशगूल होऊन जातात. यात काही फार मोठे शौर्य आहे असे नाही, ही केवळ एक गतानुगतिकता आहे, असे त्यांचे मत दिसले.

 जमिनीवर रांगा धरून चालणाऱ्या मुंग्यांच्या पद्धतीने मुंबईकर शिस्तीने वागले हे खरे; पण, याच मुंग्यांचे एक दुसरे दर्शनसुद्धा आहे. जमिनीवर दिवसाउजेडी त्यांच्यावर हल्ला झाला तर त्या अहिंसेच्या परमभक्त असल्यासारख्या वागतात. हल्ला कोठून आला त्याची चौकशीही करीत नाहीत; ते हल्लेखोरावर प्रतिहल्ला करून प्रत्युत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; पण याच मुंग्या, जेव्हा त्यांच्या वारुळामध्ये किंवा बिळामध्ये कोणी बाहेरचा प्राणी शिरतो तेव्हा अगदीच वेगळ्या

तऱ्हेने वागतात. बिळात शिरलेल्या अगदी सापालासुद्धा त्या मुंग्या चावून चावून खलास करून टाकतात. मुंबईत घर आणि ऑफिस या रस्त्यावर बाँबहल्ला झाला तर मुंबईवर मुंग्यांच्या आचारसंहितेप्रमाणे वागतात.

 अशी वेळ न येवो, पण दुर्दैवाने त्यांच्या घरावर जर का आंतकवाद्यांचे हल्ले झाले तर मुंग्यांच्या निर्धाराने ते आक्रमकांना बेजार करून हाकून देतील अशी शक्यता फारशी वाटत नाही. पूर्वी मुंबईत दंगे झाले आहेत. मुंबईच्या गोदीतील प्रचंड बाँबस्फोट ज्यांना आठवत असेल त्यांना हेही आठवत असेल की त्यावेळी मुंबईकर मोठ्या संख्येने मुंबई सोडून आपल्या गावांकडे निघून जाण्याच्या धावपळीत होते. मुंबईकरांनी मुंग्यांच्या उद्यमशीलतेची एक पद्धत अंगी बाणवली आहे, पण मुंग्यांमध्येही असलेली कडव्या प्रतिकाराची प्रेरणा त्यांना झेपेल असे काही वाटत नाही.

 १९९३ साली मुंबईत बाँबस्फोट झाले त्यावेळी ज्या संघटनांनी प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न केला त्या संघटना यावेळी घरगुती भांडणे मिटविण्यात इतक्या गढून गेल्या होत्या की १९९३ चा इतिहास पुन्हा एकदा गिरवण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात आला नाही.

 मुंग्यांच्या बरोबरीने उद्यमशीलतेबाबत कौतुक होते ते मधमाश्यांचे. याखेरीज, मधमाश्यांच्याच वर्गातील गांधीलमाश्यांचा उल्लेख कोणी उद्यमशीलतेकरिता करीत नाहीत; पण, मधमाश्यांच्या मधाच्या पोळ्यावर कोणी नजर ठेवली आणि त्या पोळ्याला नुसता खडाजरी मारला तर आपली नेहमीची उद्यमशीलता सोडून सगळ्या मधमाश्या ज्याने कोणी एवढे धाडस दाखवले असेल त्याच्यावर तुटून पडून त्याला अगदी रक्तबंबाळ करून टाकतात. एकदा का मधमाश्यांचे पोळे असे उठले की आजूबाजूला निव्वळ बघ्याच्या भूमिकेत असलेल्या लोकांनासुद्धा त्यांचा प्रसाद मिळाल्याखेरीज राहत नाही. गांधीलमाश्या नेमका काय उद्योग करतात हे स्पष्ट नाही; पण, त्यांचीही पोळी असतात आणि त्या पोळ्यांना कोणी धक्का लावल्यास किंवा धक्का लावेल असा त्यांना संशय आल्यास गांधीलमाश्यातर प्रचंड त्वेषाने अतिक्रमणकाऱ्यावर तुटून पडतात.

 मुंगी आणि मधमाश्या - दोन्ही प्राणी उद्योगप्रिय. मुंगी निदान बाहरेच्या जगात अहिंसेने वागते पण, घरावर हल्ला झाल्यास निकराने प्रतिकार करते. मधमाश्यां उद्योगी खऱ्या, पण त्यांची वागणूक ही इस्राईलमधल्या नागरिकांप्रमाणे आहे. युद्ध नसेल तेव्हा प्रचंड परिश्रमाने शेती फुलवणारे, कारखानदारी वाढवणारे इस्रायली नागरिक युद्धप्रसंगी सैनिक बनतात आणि शत्रूवर तुटून पडून आठ-

दहा दिवसातच, संख्येने आणि ताकदीनेही प्रचंड क्षमतेच्या शत्रूलाही नामोहरम करतात. मुंबईकरांची वागणूक ही मधमाश्यांसारखी नाही हे स्पष्ट आहे.

 याची कारणे काय? मधमाश्यांना एक विशेष इंद्रिय आहे. त्यांच्या पोळ्यावर कोणी हल्ला केला तर तो कोणी केला हे हेरण्याचे त्यांना एक सहावे इंद्रिय आहे. आणि त्यांचे एकमेकांतील संदेशवहन कसे होते कोणास ठाऊक, पण एकदम पोळे जे उठते ते एकाच दिशेने जाऊन खोडी काढणाऱ्याच्या अंगाला भिडते.

 मुंबईकराला हे शक्य नाही. पहिले कारण असे की, मुंबईकरांवर होणारा हल्ला हा कोठून बाहेरून होत नाही, तर त्यांच्याच पोळ्यामध्ये एरवी उद्योगात असल्याचे दाखविणाऱ्या काही माश्या पोळ्यात उत्पात करण्याचा प्रयत्न करतात. त्या माश्यांना या उत्पाती माश्या कोण हे ठाऊकजरी असले तरी त्याविषयी बोलणे हे अनैतिक आहे, गैर आहे, एवढेच नव्हे तर, ते देशद्रोहासारखे आहे अशी, वर्षानुवर्षे एका विशिष्ट विचारसरणीमुळे मुंबईकरांची, मनाची घडण झाली आहे. त्यामुळे, हल्ला कोठून आला हे कळणे किंवा त्याबद्दल काही प्रतिकाराची कार्यवाही करणे हे संभवतच नाही.

 मुंबईच्या बाँबस्फोटानंतर आणखी एक विचित्र प्रकार अनुभवास आला. बहुसंख्य जमातीच्या सर्व नागरिकांना हल्लेखोरांची नावे माहीत असतानासुद्धा त्यांच्याविषयी समुदायवाचक आरोप करणे त्यांना भावले नाही. याउलट, ज्या समाजातून आतंकवादाला पोसले गेले त्या समाजाचे लोकच बहुसंख्य समाजावर आरोप करताना दिसले – 'खबरदार, कोणी आमच्या समाजाने ही अनन्वित कृत्ये केली असे म्हटले तर! हे जे काही होते आहे ते सगळे बाबरी मशीद पाडल्यामुळे आणि गुजरातमध्ये झालेल्या दंग्यांचीच प्रतिक्रिया आहे. त्याबद्दल अल्पसंख्य समजाला दोष देणे योग्य होणार नाही. 'सिमी'सारखी संस्था जबाबदार आहे असे केंद्रातील गृहमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतरसुद्धा उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री त्या संघटनेच्या समर्थनार्थ पुढे आले. आणि राज्याराज्यातील त्या अल्पसंख्याक जमातीच्या मुखंडांनी 'सिमी'ला वर्तणुकीची प्रशस्तिपत्रके देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मुंबईला भेटीसाठी गेले असता त्यांनाच 'मुंबईत याला तर खबरदार' असा इशारा एका समाजवादी खासदारांनी दिला. 'उलटा चोर कोतवाल को डांटे' असा हा प्रकार मुंबई बाँबस्फोटानंतर दिसू लागला. 'असुनि खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला' अशी परिस्थिती पुन्हा एकदा तयार झाली आहे. थोड्याच दिवसांनंतर उत्तर प्रदेशात एक वेगळे मुस्लीम राज्य असावे अशी मागणी उघडपणे केली जाऊ लागली तर आश्चर्य

वाटायला नको.

 १९४५-४६ सालामध्ये, फाळणीपूर्व काळात मी चांगला जाणता विद्यार्थी होतो. त्यावेळचे वातावरण आठवून पुन्हा एकदा देशावर फाळणीचे ढग फिरू लागले आहेत अशी जाणीव मला होत आहे.

 सगळ्या हिंदुस्थानात कोठेही आतंकवादी प्रकार घडला आणि त्या प्रत्येक ठिकाणी सापडलेला गुन्हेगार हा एका विशिष्ट जमातीचाच असला तरीसुद्धा त्या सर्व जमातीला नावे ठेवणे योग्य होणार नाही हे तर्कशास्त्राला धरून आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ९९ शिखांनी मिठाई वाटली तरीसुद्धा १००व्या शिखाला मारण्याचा अधिकार कोणालाही पोहोचत नाही अशी भूमिका मी स्वतः मांडलेली होती; पण त्यानंतर दिल्लीतील शिखांचे शिरकाण होऊनही शिखांमध्ये सबंध देशाविषयीची द्वेषभावना पराकोटीला गेलेली मी पाहिलेली नाही.

 ढहंदुस्थान हे एक मधमाश्यांचे पोळे आहे असे समजले तर ते एकसंध राहिले नसून ६० वर्षांपूर्वी काही मधमाश्यांनी आपापल्या मधाच्या साठ्यासकट वेगळे होऊन नवे पोळे तयार केले आणि उरलेल्या पोळ्यातही काही अस्वस्थ मधमाश्यांनी वेगळे उपपोळे तयार केले आहे. या मधमाश्यांना आपल्या पोळ्यातील बाकीच्या मधमाश्यांची भाषा बोलायची इच्छा नाही, त्यांची लिपीही वापरायची नाही, स्वतःच्या धर्मग्रंथाखेरीज कोणतेही ज्ञान त्यांना मंजूर नाही आणि त्यांच्या धर्मसमजुतींना जराही हात लागलेला त्यांना सहन होत नाही. अशा तऱ्हेने स्वतःला कोंडून घेतल्यामुळे मधमाश्यांना या एकूण पोळ्यामध्ये एक अलगाववाद तयार झाला आहे. हा अलगाववाद बहुसंख्याकांच्या किरकोळ कडवेपणामुळे झाला आहे असे म्हणणे म्हणजे पुन्हा 'चोराच्या उलट्या बोंबा' असेच म्हटले पाहिजे. हा अलगाववाद अल्पसंख्यांक जमातीच्या कडव्या हट्टीपणामुळे तयार झाला आहे. त्यांनी जर का ज्ञानाकडे आणि प्रकाशाकडे अशा तऱ्हेने पाठ फिरवण्याचे ठरवले तर त्यामुळे त्यांचा तोटाच होईल आणि त्यांना त्याचा दोष दुसऱ्या समाजावर लादता येणार नाही. जे काही नवीन ज्ञान मिळेल त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाच्या विकासाकरिता, उद्धाराकरिता करण्याचे सोडून विस्फोटके आणि विद्ध्वंसाची हत्यारे तयार करण्यातच केला तर सारे जग त्यांच्याकडे संशयाने पाहू लागेल, याबद्दल जगाला दोष देता येणार नाही.

 या सर्व अल्पसंख्यांक समाजाची एक ऐतिहासिक ख्याती अशी आहे की त्यांना लोकशाहीच्या तंत्राने चालता येत नाही. आज जगात त्यांच्या समाजाचे एकही राष्ट्र असे नाही की ज्यामध्ये लोकशाही सुखाने नांदते आहे. याउलट,

हिंदुस्थानात मात्र मुसलमान राष्ट्राध्यक्ष, शीख पंतप्रधान आणि ख्रिश्चन काँग्रेस अध्यक्षा अशी सहिष्णुता उघडपणे नांदते. अल्पसंख्याकांचा कडवेपणा आणि बहुसंख्य समाजाची सहिष्णुता हे एकमेकांत सहज मिसळणारे नाही.

 याला उत्तर काय? याला उत्तर एकच आहे. स्वातंत्र्य आणि स्वतंत्र विचार ही एकमेव औषधाची गुरुकिल्ली आहे. जर का अल्पसंख्यांक समाजाने आपला हेकटपणा सोडला नाही आणि आपली वेगळी कडी करून त्यातच पुरुषार्थ मानण्याचे तत्त्वज्ञान सोडले नाही तर इतिहासात त्यांना स्थान मिळणार नाही. याउलट, जर का आपापल्या धर्माविषयी योग्य तो आदर बाळगून, पण मनाचे मोकळेपण, विचारांचे स्वातंत्र्य आणि ज्ञानाची देवघेव हे सिद्धांत त्यांनी मान्य केले आणि, त्याबरोबरच व्यक्तिमाहात्म्य आणि ग्रंथप्रामाण्य यांचाही त्याग केला तर या समाजाला भविष्यात पुढे येणाऱ्या खुल्या व्यवस्थेत प्रचंड वाव आहे. मुसलमान समाजावर अन्याय होतात ते आर्थिक; पण, हे आर्थिक अन्यायसुद्धा त्यांच्या स्वतःला कोंडून घेण्याच्या प्रवृत्तीतूनच तयार झाले आहेत; पण, या अन्यायाच्या काळामध्ये मुसलमान समाजातील तरुण माणसांनी काही मोठे गुण अंगी बाणवले आहेत. मुसलमान तरुण इमान मानतो, प्रामाणिकपणे काम करतो, एवढेच नव्हे तर, या जगात कायमची नोकरी आणि आश्वस्त भविष्य या कल्पना त्याला अनोख्या आहेत. एका दिवशी सकाळी एका कारखान्यात काम तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दुसऱ्या कारखान्यात अशा सतत उलाढाल आणि बदल घडणाऱ्या जीवनाची त्याला सवय आहे. एक तऱ्हेने उद्योजकतेला लागणारे गुण मुसलमान समाजाने आपल्या अंगी बाणवलेले आहेत.

 या गुणांचा उपयोग नव्या येणाऱ्या खुल्या व्यवस्थेमध्ये त्यांना आर्थिक, सामाजिक, राजकीय उन्नती करून देण्याकरिता करता येईल; पण, त्याच गुणांचा उपयोग रुढीनिष्ठ समाजांना मजबुती देत देत आणि सगळ्या जगाविरुद्ध भांडण करत करत केला तर सगळ्या जगभर पसरलेल्या इस्लामचे आणि आजही अनेक शोषित समाजांना ज्याचे आकर्षण वाटते, त्या इस्लामचे भविष्य काही फारसे उज्ज्वल राहणार नाही.

(६ ऑगस्ट २००६)

◆◆