Jump to content

भारता'साठी/खोटा निधर्मवाद आणि दुष्ट राष्ट्रवाद

विकिस्रोत कडून


खोटा निधर्मवाद आणि दुष्ट राष्ट्रवाद



 भारतीय जनता पार्टी आणि लालकृष्ण अडवाणी मोठ्या विचित्र पेचात सापडले आहेत. १९८४ मध्ये त्यांच्या पक्षाची धूळधाण उडाली. पुऱ्या लोकसभेत फक्त दोन खासदार निवडून आले. पक्षाला देशाच्या राजकारणात पुन्हा स्थान मिळावे यासाठी 'घटम् भिद्यात्, पटम् छिन्द्यात्' एवढेच नव्हे तर अगदी 'रासभरोहण' करून का होईना. येन केन प्रकारेण पन्हा एकदा सत्ता मिळविणे हे त्यांचे उद्दिष्ट राहिले. त्यासाठी आत्यंतिक जातीयवादी संस्थांनी हाती घेतलेले रामाच्या अयोध्या मंदिराचे प्रकरण त्यांनी उचलून धरले. शिलापूजनाच्या कार्यक्रमाने इ.स. १९८९ च्या निवडणुकीत फायदा झाला तर रथयात्रेने इ.स. १९९१ च्या निवडणुकीत भरभराट झाली. लोकसभेत १२३ खासदार निवडून आले भारतातील सर्वांत प्रचंड राज्य उत्तर प्रदेश हाती आले; पण एवढे होऊनही भारतीय जनता पार्टीच्या गोटात वातावरण फारसे आनंदाचे नाही.
 सोळा महिन्यांपूर्वीच ज्या राज्यांत भारतीय जनता पार्टीचे शासन आले त्या राज्यांतच त्यांची पीछेहाट झाली. उत्तर प्रदेशातील सत्ता पुढच्या निवडणुकीत हातात राहीलच याची काहीच खातरी नाही. ज्या राममंदिराच्या नावाने गदारोळ माजवला ते राममंदिर बाबरी मशिदीच्या जागीच बांधणे हे काही केंद्र शासन हाती आल्याशिवाय शक्य नाही. अयोध्येतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी भाजपावर; पण बाबरी मशिदीला धक्का लावल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची निश्चिती आणि स्वतःच उभी केलेली आणि उत्तेजन दिलेली विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना अशी भुतावळ थयथयाट करीत असलेली! प्रसिद्ध पुरुष होण्यासाठी गाढवावर बसणे सोपे आहे; पण एखाद्या हिंस्र श्वापदावर आरूढ झाले तर मांड ठेवावी तरी पंचाईत आणि उतरू पहावे तरी जीवाशी गाठ अशा परिस्थितीत भाजपाची मंडळी सापडली आहेत. निवडणुकीतील यशानंतर इ.स. १९८४ च्या पराभवाचे दुःख शमले तरी या यशाकरिता आपण काय करून बसलो आहोत याची थोडीफार जाणीव भाजपाच्या नेत्यांना होऊ लागली आहे. यांपैकी अनेक शिवसेनेच्या बाळ ठाकरे यांचे वर्णन,खाजगीत, "हलक्या कानाचा. छोट्या मनाचा, फाटक्या तोंडाचा-इ.इ." असे करतात; पण या दुष्कर परिस्थितीत जोडलेल्या दोस्तांचा बंदोबस्त कसा करावा याची त्यांना चिंता लागली आहे. राममंदिराबद्दल दिलेल्या बेफाट आश्वासनातून थोडीफार सुटका कशी करून घ्यायची ही त्यांची आज मोठी चिंता आहे.

 पण त्यांनी पाय हळूहळू मागे घ्यायला सुरुवात केली आहे. असे करण्यापलीकडे त्यांना काही गत्यंतरही नाही. दूरदर्शनवर दिलेल्या मुलाखतीत अडवाणी म्हणाले,

 "राममंदिर ही काही महत्त्वाची गोष्ट नाही; पण राममंदिराच्या निमित्ताने खोटा निधर्मवाद उजेडात आणण्याचे काम आम्ही साध्य केले आहे."

 भारतीय घटनेत महत्त्वाचे स्थान असलेला निधर्मवाद हा दिखावू आहे? खोटा आहे? फाळणीनंतर पाकिस्तान मुसलमान राष्ट्र झाले पण, भारताने मात्र निधर्मवाद स्वीकारला याचे कारण भारत बहुसंख्य हिंदू आणि म्हणून सहिष्णू आहे हेच होय. हिंदूवाद हाच खऱ्या अर्थाने निधर्मवाद आहे आणि हा हिंदूवाद देशाच्या परंपरेशी, इतिहासाशी व संस्कृतीशी सुसंगत आहे. याउलट, घटनेतील निधर्मवाद हा पाश्चिमात्य तोंडवळ्याचा आहे. राजकीय क्षेत्रात धर्माला स्थान नाकारण्याची एक युरोपीय परंपरा आहे. राजसत्ता व धर्मसत्ता यांच्यात शतकानुशतके चाललेल्या भीषण संघर्षाचा, युरोपीय निधर्मवाद हा परिणाम आहे. या पाश्चिमात्य निधर्मवादाऐवजी हिंदुराष्ट्रवाद स्वीकारला जावा कारण तो एतद्देशीय आहे, लोकांच्या प्रवृत्तीस जुळणारा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताच्या ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरेस जुळणारा आहे.

 हिंदुराष्ट्रावादाची गंभीर मांडणी अशाप्रकारे केली जाते. आपल्याला हीच मांडणी विचारात घ्यायची आहे. निरर्गल आणि अश्लील भाषा वापरणाऱ्या अनभ्यस्त हृदयसम्राटांची नाही.

 पहिला महत्त्वाचा मुद्दा, भारतीय घटनेतील निधर्मवाद पाश्चिमात्य तोंडवळ्याचा आहे काय? याचे स्पष्ट उत्तर नाही असे आहे. निधर्मवादाच्या शब्दकोशीय अर्थातही धार्मिक सत्याविषयी केवळ उदासीनताच नव्हे तर काहीशी कुत्सितताही गृहित धरली आहे. भारतीय राजकारणात मध्य प्रवाहातील नेतेमंडळीत तरी धर्माविषयी जाहीररित्या अनादर दाखविणारासुद्धा महापुरुष कुणी झाला नाही. अगदी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उद्घोष करणारे आणि एकविसाव्या शतकाची

तुतारी वाजविणारे नेतेसुद्धा मोठे तोलून मापून शब्द वापरतात. विज्ञानाबरोबर आध्यात्मिक अंगाकडे पुरेपूर लक्ष देणे आवश्यक आहे अशी निदान तोंडदेखली, सारवासारव करतात. शासकीय आकाशवाणी आणि दूरदर्शन यांवर सर्व धर्मांच्या संबंधीचे भजनकीर्तनांचे कार्यक्रम होतात. खुद्द पंतप्रधानही वेगवेगळ्या प्रार्थनामंदिरांत आणि वैष्णोदेवी, तिरुपती अशा मंदिरांत विशेष भक्तिभावाने जातात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भवानी मातेची आणि पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा मोठ्या थाटामाटाने पार पाडतात. बहुतेक उद्घाटन इत्यादी प्रसंगी काही ना काही धार्मिक विधी होतातच आणि आजपर्यंत चार आजी आणि दोन माजी पंतप्रधानांचे हिंदू अंत्यविधी अगदी विस्तारा-विस्ताराने रेडिओ आणि दूरदर्शनवर दाखविण्यात आले आहेत. भारतीय राज्यव्यवस्था धर्माविषयी उदासीन नाही. ती गांधीवादी तोंडवळ्याची आहे. सर्व धर्मांना समान मानण्याची आहे. किंबहुना, भारतीय घटनेतील निधर्मवाद खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभावच आहे. घटनेतील निधर्मवाद खरा नाही; पण अडवाणी म्हणतात त्या अर्थाने नव्हे तर त्याच्या नेमक्या उलट्या अर्थाने.

 या सर्वधर्मसमभावात अल्पसंख्याकांच्या अनुनयाची एक प्रवृत्ती आहे काय? शहाबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय राजीव गांधी शासनाने फिरवला हे मुस्लिम अनुनयाचे एक मोठे उदाहरण म्हणून सांगितले जाते. ख्रिस्ती किंवा पारशी यांचा अनुनय होत असल्याची तक्रार कुणी करीत नाही. पंजाबातील बहुसंख्य शेतकरी असलेल्या शिखांची, त्यांचे शोषण होत असल्याची उलट तक्रार आहे.

 शहाबानो प्रकरणी राजीव गांधींची भूमिका फारशी समर्थनीय होती असे मला वाटत नाही; पण ती भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. मध्यपूर्वेतील संघर्षमय सामाजिक वातावरणात लिहिले गेलेले इस्लामचे सामाजिक नियम स्त्रियांना काही बाबतीत मोठे जाचक आहेत. बदललेल्या परिस्थितीत यातील अनेक नियम अगदी दुष्ट आणि विक्राळ वाटतात; पण सामाजिक परिवर्तन काही केवळ कायद्याने होत नाही. उलट, समाजाच्या विरोधात केलेले कायदे निष्फळ ठरतात; एवढेच नव्हे तर त्याचे दुष्परिणामही होतात. शहाबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पोटगीसंबंधी भारतीय दंडविधानाचा स्पष्ट अर्थ लावला या निर्णयाबद्दल मुस्लिम सनातनी पुरुषांनी आरडाओरड सुरू केली यात काही आश्चर्य नाही. आश्चर्याची गोष्ट ही की मुसलमान स्त्रियाही अन्यायकारक कुराणप्रणीत नियमच आम्हाला हवेत, असे बोलू लागल्या. असे अनेकदा होते. राजस्थानातील देवराला

येथील सतीप्रकरणानंतर अगदी आंग्लविद्याविभूषित राजस्थानी हिंदू स्त्रियाही सती परंपरेची महती गाऊ लागल्या होत्या. मुसलमान स्त्रियांची परिस्थिती तर त्याहून बिकट. स्त्रियांची दुःखे दारूण खरी, पण समाजावर हल्ला होत असेल तर त्या दुःखाबद्दल धिटाईने बोलणेही शक्य नाही.

 मुस्लिम पुरुषांची हृदये काय सगळी दगड आहेत काय? मुस्लिम स्त्रियांची 'पण लक्षात कोण घेतो?' स्थिती त्यांनाही समजते; पण, त्याबद्दल काही करता येत नाही. आजच्या मुसलमान समाजातील धुरिणांचीही स्थिती ८० वर्षांपूर्वीच्या लोकमान्य टिळकांच्या परिस्थितीसारखीच आहे. अल्पवयीन मुलींची लग्ने समजाच्या अंतःकरणाला स्पर्श करीत होती. देवलांच्या शारदेच्या 'मूर्तिमंत भीती उभी' या पदाने डोळ्यातून पाणी आले नाही असा माणूस त्या काळी विरळा; पण संमतीवयाचा कायदा करण्याचा प्रस्ताव आल्यावर लोकमान्य टिळकांनीही त्याला कडाडून विरोध केला. आमच्या समाजातील दोष आम्ही दूर करू, परकीय शासनाने त्यात ढवळाढवळ करण्याचे काही कारण नाही; म्हातारी मेल्याचे दःख नाही. काळ सोकावतो अशी लोकमान्य टिळकांची भूमिका होती. आजच्या मुसलमान मुल्लांची हीच भूमिका आहे.

 देशातील सर्व समाजांना एकच कायदा, एकाच तहेचे नीतिनियम लागू असावेत याबद्दल दुमत नाही; पण समान कायदे सक्तीने लादून काही उपयोग नाही; समजुतीसमजुतीने, धीमेपणाने, पावलापावलाने बदल घडवून आणायचा अशी भारतीय घटनेची भूमिका आहे. समान कायद्याला मुसलमानच विरोध करतात असे नाही, हिंदू समाजही करील. आज बहुसंख्य हिंदुत्वनिष्ठांची अशी कल्पना आहे की समान नागरी कायद्यातील तरतुदी या जवळजवळ हिंदू पद्धतीतील तरतुदीच असणार आहेत. किंबहुना, समान नागरी कायदा म्हणजे इतर समाजांवर हिंदू कायदा लादणे अशी त्यांची गैरसमजूत आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की न्याय्य आणि आदर्श समान नागरी कायद्यातील स्त्रियांविषयीच्या तरतुदींचा तोंडवळा हा मनुस्मृतीपेक्षा शरीयतीशी अधिक मिळताजुळता असण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, विवाह हा संस्कार आहे की कल्पना हे कोणताही नागरी कायदा मानू शकणार नाही; विवाह झाला म्हणजे मुलगी मेली हे 'एकच प्याला' तत्त्वज्ञान नागरी कायदा मानू शकणार नाही. आईबापांची मुलीबद्दलची जबाबदारी अखेरपर्यंत कायम राहते असे कायद्याने सांगितले तर हिंदू समाजही काही कुरबूर केल्याखेरीज ते मान्य करील अशी शक्यता दिसत नाही.

 पण, गंमतीची गोष्ट अशी की स्त्रियांच्या दुःखाचा प्रश्न बाजूलाच राहिला;

वाद सुरू झाला वेगवेगळ्या धर्मातील पुरुषांचा! हिंदू धर्ममार्तंड समग्र स्त्रीसमाजाचे कैवारी असल्याचा आव आणून बोलू लागले. संख्याशास्त्रीय सत्य हे आहे, की हिंदू समाजातच व्यापक प्रमाणावर नव्याने लग्न लागून सासरी आलेल्या मुली जाळल्या जातात. सत्य हे आहे की, दर हजारी लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण हिंदू समाजात जितके कमी आहे तितके दुसऱ्या कोणत्याही समाजात नाही. सर्वांत स्त्रीदुष्ट समाज कोणता असेल तर तो हिंदू समाजच आहे.

 मग, अल्पसंख्यचा अनुनय होतो की नाही? होतो. अपरिहार्यपणे होतो. लोकशाहीच्या आणि निवडणुकीच्या गणिताच्या सोयीसाठी अपरिहार्यपणे होतो; पण असा अनुनय मुसलमानांचाच होतो असे नाही. देशमुखांचा होतो, मराठ्यांचा होतो, माळ्यांचा होतो, कोष्टी, साळी बुद्ध - प्रत्येक समाजाचा असा अनुनय होतो. लोकशाहीच्या व्यवस्थेतील ही एक मर्कटप्रवृत्ती आहे, तिच्याकडे थोडे उदारतेने पाहावे, कुचेष्टेने पहावे आणि मामला सोडून द्यावा. हे बुद्धिमंतांना शोभेल. । घटनेतील निधर्मवाद ही काही एक निश्चित बांधीव विचारसरणी नाही. तो एक प्रवास आहे. उद्दिष्ट थोडेफार स्पष्ट आहे; पण वाट मात्र वेडीवाकडी, चढउतारांची आणि सर्व तहेच्या अडचणींनी भरलेली आहे.

 भारतीय राज्यघटनेतील निधर्मवादाच्या या सर्व त्रुटी सर्वमान्य आहेत; पण या त्रुटींबद्दल सहानुभूतीची आवश्यकता आहे; कुचेष्टेची नाही. कारण या मोडक्यातोडक्या का होईना निधर्मवादाला काही पर्याय संभवत नाही. अडवाणी आणि इतर हिंदुत्ववाद्यांना हिंदुत्व हा पर्यायी मार्ग दिसतो. या राष्ट्राचे स्वरूप हिंदू आहे, राष्ट्राची परंपरा आणि इतिहास हिंदुत्वाचा आहे आणि त्यामुळे हिंदू झेंड्याखाली एक सामर्थ्यशाली आणि स्वाभिमानी राष्ट्र उभे राहील अशी त्यांची कल्पना आहे.

 हिंद धर्म हा खरोखर एकसंध धर्म असता आणि इतर धार्मिकांशी सहिष्णतेने वागणारा समाज असता तर हिंदुत्ववाद्यांची ही कल्पना सहज मान्य होऊ शकली असती; पण ही कल्पना मान्य होऊ शकली नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भगवा झेंडा हा ‘एकमय लोकांचे प्रतीक नाही. खरी अडचण ही आहे.

 हिंदुत्वाचा इतिहास नेमका कोणता? हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने सर्व भारतखंडामध्ये राजेरजवाडे गुण्यागोविंदाने नांदत होते, एकमेकांविषयी सहिष्णुता होती, दूधमधाच्या नद्या वाहत होत्या आणि एकदम वायव्येकडून मुसलमानांचे हल्ले चालू झाले. कत्तली, जाळपोळ, लुटालूट, बलात्कार यांचे जंगली युग चालू झाले ते इंग्रज प्रवेश करीपर्यंत! इंग्रज गेल्यानंतर आता पुन्हा इतिहासात मागे जाऊन प्राचीन

परंपरा पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे.

 सर्व विनम्रता बाळगून असे आग्रहाने म्हटले पाहिजे की भारतीय इतिहासाचा हा ब्राह्मणी किंवा सवर्ण अर्थ आहे. मुसलमानी आक्रमणाच्या आधीही अनेक आक्रमणांच्या लाटा वेगवेगळ्या दिशांनी आल्या आहेत. अगदी रामायणकाळापासूनसुद्धा वेगवेगळे राजे परस्परांत सतत लढाया करीत असत, लूट करीत असत. एवढेच नव्हे तर बलात्कारही करीत असत. बौद्ध-ब्राह्मण संघर्षात व हिंदू राजा-राजांतील लढायांतही हे सर्व प्रकार घडले. अगदी मंदिरांचासुद्धा विद्ध्वंस झाला; पण या लढाया म्हणजे काही खराखुरा इतिहास नव्हे. खरा इतिहास या कागदोपत्री नोंदल्या गेलेल्या सनावळींच्या पलीकडे आहे. समाजातील सर्व उत्पादनाचे काम जातिव्यवस्थेच्या आधाराने बहुसंख्य समाजावर लादले गेले. राज्यव्यवस्था आणि राजा-राजांतील लढाया या कष्टकरी शेतकरी, बलुतेदार, व्यापारउदीम करणारे यांच्या श्रमाचे फळ हिरावून नेण्याच्या दृष्टीनेच होत असत. बहुसंख्य समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, मंदिरात जाण्यास बंदी होती, धर्मग्रंथ पाहण्याचीही मनाई होती; इतर समाजाशी रोटीचाही संबंध नाही मग बेटीचा दूरच. आयुष्यभर गुलामासारखे राबणे एवढेच त्यांचे भविष्य आणि ही फलनिष्पत्ती त्यांच्या पूर्वजन्मी केलेल्या पापांमुळे ही धर्माची शिकवण!

 ज्याला आज हिंदू धर्म म्हटले जाते त्याला दक्षिणपूर्वेतील कंबोडिया, थायलंड यांसारख्या देशांत सरळसरळ ब्राह्मणधर्मच म्हटले जाते. तेथील इतिहासात वर्णने आहेत ती बौद्ध विरुद्ध ब्राह्मण लढायांची. तेथील देवळांमध्ये शंकराच्या मूर्तिऐवजी बुद्धाच्या मूर्ती आणि बुद्धाच्या मूर्तीऐवजी शंकराच्या मूर्ती असे आळीपाळीने कित्येकवेळा घडले आहे. आपल्याकडेही त्याचे नावच वर्णाश्रमधर्म असे आहे. पुनर्जन्म आणि कर्मसिद्धान्त यांच्या आधाराने तयार करण्यात आलेली ही समाजव्यवस्था होती.

 मुसलमान येण्यापूर्वी सर्वजण गुण्यागोविंदाने, सुखासमाधानाने नांदत होते असे नाही. बहुजन समाज अन्याय आणि शोषणाखाली भरडून निघत होता. परिस्थिती इतकी दुःसह होती की, मुसलमान आक्रमकांनी येऊन स्थानिक राजांचा उच्छेद केला तरीही, बहुजन एतद्देशीय आणि तथाकथित स्वधर्मी राजांच्या मदतीस धावून गेले नाहीत. किंबहुना, त्यांनी, ज्योतिबा फुल्यांच्या शब्दांत, 'महंमदाच्या जवांमर्द शिष्यांचे विमोचक म्हणून स्वागत केले. हे असे नसते तर अल्पसंख्य मुसलमान आक्रमकाना इतक्या सहजपणे आसेतुहिमाचल देश पादाक्रांत करताही आला नसता व त्यावरील सत्ता इतक्या दीर्घकाळ टिकवून

ठेवताही आली नसती.

 अडवाणी आणि इतर हिंदुत्वनिष्ठांना मुस्लिम आक्रमणाचा प्रतिशोध घ्यायचा आहे. त्यासाठी ते आज सर्व जातीजमातीच्या हिंदूना भगव्या झेंड्याखाली आणू पाहत आहेत. अडचण ही आहे की, बहजन कष्टकऱ्यांच्या मनात इतिहासाचा आणखी एक प्रतिशोध घेण्याची एक सुप्त पण समर्थ इच्छा आहे. हिंदू हे राष्ट्र बनायचे असेल तर हिंदू व्यवस्थेतील शोषणाचे संबंध नष्ट करणे हे काम हिंदुत्ववाद्यांनी उत्साहाने हाती घेतले पाहिजे.

 भारताच्या इतिहासाला, संस्कृतीला, परंपरेला खरा धोका आहे तो इतिहासात पाडल्या गेलेल्या मंदिरांमुळे नाही. पाश्चिमात्य विचारांचे, शिक्षणाचे शहरांतील भद्र लोक आज भारताची संस्कृती उद्ध्वस्त करून इंडियाची संस्कृती लादू पाहाताहेत. हा लढा मोठा कठीण आहे, प्रतिकात्मक नाही. कोण्या एका जागी मंदिर उभारण्याने हा प्रश्न सुटणार नाही.

 अयोध्येचे राममंदिर हे एक प्रतिकात्मक आंदोलन आहे असे अडवाणी म्हणाले. हिंदुराष्ट्र एकसंध लोक म्हणून तयार करण्याच्या दृष्टीने राम हे चुकीचे प्रतीक आहे. शूद्र असूनही तपस्या करणाऱ्या शंबुकाचे शीर उडविणारा राम नव्या एकात्म राष्ट्राचे प्रतीक कसा काय होईल? अग्निदिव्यानंतरही गर्भारशी सीतेला वनवासात जावे लागले आणि बाळंतपणानंतर मूठभर गव्हासाठी अयोध्येच्या एकेकाळच्या महाराणीस भीक मागावी लागली. रामकथा ही जानकीची जीवनव्यथा आहे. त्या सीतेच्या मानसकन्यांच्या दृष्टीने राम हा एकात्म राष्ट्रांचे प्रतीक कसा काय होऊ शकेल? नवे एकात्मक राष्ट्र उभारण्याची ज्यांना खरोखर कळकळ असेल त्यांनी राममंदिराच्याही आधी शंबुकाचे मंदिर आणि सीतेचे मंदिर बांधायचा संकल्प सोडायला हवा होता.

 सर्व इतिहासात आणि अगदी प्राचीन काळीही हा देश कधी एकछत्री, एकमय लोकांचे राष्ट होते असे दिसत नाही. आजपर्यंतचा सर्व इतिहास लढायांचा. रक्तपातांचा, लुटालुटींचा, बलात्कारांचा, दुष्काळांचा, उपासमारीचा, रोगराईचा, निरक्षरतेचा राहिला आहे. राष्ट्र बनवायचे असेल तर त्याकरिता भविष्याकडे पाहावे लागेल, भूतकाळाकडे पाहून काय उपयोग? भविष्यकाळाकडे वाटचाल करण्याचा घटनेतील निधर्मवाद हा पुष्कळ त्रुटी असलेला पण सर्वांत श्रेयस्कर मार्ग आहे. तो निधर्मवाद खोटा असेल पण त्याला पर्याय दुष्ट हिंदुराष्ट्रवाद खचित होऊ शकत नाही.

(६ जुलै १९९१)

♦♦