Jump to content

भारता'साठी/'भारता'च्या मानगुटी नेहरूवादाचे भूत

विकिस्रोत कडून


'भारता'च्या मानगुटी नेहरूवादाचे भूत


 २३मे रोजी जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी देशभर साजरी झाली. नेहरू-गांधी घराण्यातील एकामागोमाग एक तीन पंतप्रधान झाले. त्या तिघांपैकी प्रत्येकाची जयंती आणि पुण्यतिथी असे दोन दिवस पाळले जातात. त्याखेरीज मोतीलाल नेहरू आणि संजय गांधी यांच्या नावेही आकाशवाणी, दूरदर्शन यांवर एक कोणतातरी दिवस पाळला जातोच. म्हणजे, नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तींकरिता एकूण आठ दिवस पाळले जातात.
 तीन पंतप्रधानांच्या जन्मदिनी आणि मृत्युदिनी यमुनाकाठच्या त्यांच्या शांति आणि शक्तीस्थलांवर सगळ्या अतिविशिष्ट व्यक्तींची रीघ लागते; राष्ट्रपतींपासून सुरुवात करून ते शेवटी वसंतराव साठ्यांसारख्या माजी मंत्र्यांपर्यंत. पुष्पमाला अर्पण करण्याचा हा कार्यक्रम सर्व बातमीपत्रांत दिवसभर दाखविला, ऐकविला जातो. नंतर कुठेतरी अगदी सात्त्विक स्वरूपाचा भजन इत्यादींचा कार्यक्रम होतो. त्यालाही अतिविशिष्ट मंडळी मोठी आवर्जून उपस्थित राहातात. दिवसभर मोठ्या मोठ्या शहरांत पक्षांतर्फे सभा घेतल्या जातात. त्यांना थोडीफार निष्ठावान आणि पुष्कळशी आशाळभूत मंडळी हजर राहतात. आणि मग या नेत्यांच्या गुणवर्णनाला काही धरबंधच राहात नाही.
 गेल्या २३ मे च्या कार्यक्रमात पंडित नेहरूंच्या स्मृतीवर अशाच स्तुतिसुमनांचा ढीग घालण्यात आला. भारताचा जवाहर, लोकांचे लाडके, स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते, देशाकरिता अमिरी फेकून देऊन वनवास हसत हसत पत्करणारे असे गुणवर्णन सर्वसामान्यपणे सहजच होते; पण त्यापलीकडे, समाजवादी औद्योगीकरणाचे द्रष्टे, भारतीय निधार्मिकतेचे आधारस्तंभ, भारतीय लोकशाही परंपरांचे जनक आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील तटस्थ राष्ट्रांच्या चळवळीचे अध्व! अशीही त्यांची भलावण मागील वर्षांपेक्षाही अधिक धूमधामीने करण्यात आली.
जवाहरलाल नेहरूंशी प्रत्यक्ष परिचय असलेली काही मंडळी मग

 "पंडितजींचे कैंचें बोलणे,

 पंडितजींचें कैंचें चालणे,

 पंडितजींची सलगी देणे,

 कैंचें असें'

 या सुरावर त्यांच्या शुभ्र वेषापासून मोहक हास्यापर्यंत आणि छातीवरील लाल गुलाबापासून गालावरील रक्तिम्यापर्यंत वर्णन करण्यात रंगून गेली होती.

 जन्मतिथी, पुण्यतिथी असली म्हणजे त्या दिवसाच्या नायकाविषयी सत्य असो, कल्पित असो - चांगले बोलायचे असा शिष्टाचार आहे आणि तो सुसंस्कृतपणास धरूनही आहे. विशेषतः, मृताविषयी काही कोणाच्या मनाला लागेलसे बोलू नये, हे योग्यही आहे; पण तरीही, वास्तवाचे काही भान सुटले तर स्तुतिपर भाषणेसुद्धा हास्यास्पद वाटू लागतात. कोणी उठून म्हणू लागले की पंडित नेहरू बारा फूट उंच होते आणि त्यांनी एकट्यांनी उत्तरेतील सरहद्दीवर जाऊन चिनी सैन्याचा पराभव केला तर ते गुणवर्णन नाही, कुचेष्टाच होईल. शिष्टाचारालाही वास्तवाचे काहीसे कुंपण असलेच पाहिजे.

 देशाच्या इतर थोर नेत्यांबाबत, स्वातंत्र्यसेनानींबाबत, अगदी महात्मा गांधींबद्दल बोलतानासुद्धा वास्तवाचे कांही किमान भान ठेवले जाते. मौलाना आझादांविषयी बोलतांना अखेरच्या वर्षांत त्यांच्या मनात जी कटुता निर्माण झाली होती तिचा तिरकस तरी उल्लेख होतोच. सरदार वल्लभभाईंच्या तथाकथित जातीय दृष्टिकोनाविषयी अगदी उघड उघड लिहिले, बोलले जाते. “देशाच्या शतूचा शतू तो आपला मित्र, गुलाम देशाला परराष्ट्रीय धोरण एवढेच असते." या भूमिकेतून स्वतःच्या आयुष्याची होळी करणाऱ्या सुभाषबाबूंवरसुद्धा त्यांना नेहरूंसारखी आंतरराष्ट्रीय दृष्टी नव्हती अशी टीकाटिप्पणी होतेच आणि महात्माजींवर तर त्यांच्या चरख्यापासून नौखालीतील ब्रह्मचर्याच्या प्रयोगांपर्यंत अनेक गोष्टींवरून हल्ले चढविले जातात.

 आश्चर्याची गोष्ट अशी की आज सगळा नेहरूवाद कोसळून पडला आहे आणि तरीदेखील नेहरूंच्या शुभ्र अचकनीवर कुठे एक डाग पडलेला नाही.

 नेहरू पद्धतीच्या नियोजनाने देशाचे दिवाळे निघाले आणि आजची आर्थिक दुरवस्था उभी ठाकली. नेहरूप्रणित इंग्रजी मुखवट्याची संसदीय लोकशाही कशीबशी लंगडत चालली आहे. देशातील वेगवेगळ्या धर्मां-जातींच्या अस्मितांना मान्यतेची तहान आहे तोपर्यंत युरोपियन तोंडवळ्याची निर्धार्मिकता निरर्थक आहे. अयोध्या, काश्मीर, पंजाब, आसाम, मंडल आयोग यांप्रश्नी उफाळलेले

उद्रेक हेच स्पष्ट करतात आणि समाजवादी रशियाचे सगळे साम्राज्यच कोसळून पडल्यामुळे समाजवाद या संकल्पनेलाच काही प्रतिष्ठा राहिली नाही; एवढेच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय संघर्षातील एक पक्षच नाहीसा झाल्यामुळे तटस्थता या शब्दालाही काही अर्थ उरला नाही. नेहरूंनी ज्याला ज्याला हात लावला त्याची त्याची आज माती झालेली आहे. अशी वास्तव परिस्थिती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जयंती असो वा पुण्यतिथी असो, इतर काही प्रयोजन असो नसो, नेहरूंचे सर्व क्षेत्रातील कर्तबगारीबद्दल गुणगान असा मोठा विचित्र व्यतिरेक दिसून येतो.

 इतिहासाने ज्यांना सर्वस्वी खोटे पाडले अशांच्या नशिबी नेहरूंचे हे भाग्य सहसा येत नाही. जुनी गाडलेली प्रेते उकरूनसुद्धा त्यांच्यावर रागरोष व्यक्त केला जातो. गेल्या दोन तीन वर्षांतच पूर्व युरोपातील अनेक देशांत हे घडले. स्टॅलिनचे पुतळे केव्हाच उखडले गेले. लेनिनचे पुतळे आता खाली येत आहेत. त्यांची नावे दिलेली गावे, संस्था इत्यादींची नावे बदलून पुन्हा नवीन नावे दिली जात आहेत; पण भारतात असे काही घडताना दिसत नाही. नेहरूंनी हात लावलेली प्रत्येक संकल्पना इतिहासाने भली खोटी पाडलेली असो, अजून कोठे नेहरूंचे पुतळे पाडल्याचे किंवा उतरविल्याचे ऐकिवात नाही. उलट, नव्या नव्या विमानतळांना, बंदरांना आणि प्रतिष्ठेच्या संस्थांना नेहरूंचे नाव नव्याने देण्याची पद्धत अजून चालूच आहे.

 याचे एक कारण नेहरूंचे व्यक्तिगत भाग्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील राजबिंडेपणा हे आहे. सुवेज कालव्यावरील आक्रमण फसले आणि इंग्लंडचे पंतप्रधान अँथनी ईडन यांना चोवीस तासांत पंतप्रधानाची खुर्ची खाली करून चालते व्हावे लागले. ईशान्य सरहद्दीवर भारतीय सैन्याला मोठी अपमानास्पद शरणागती स्वीकारावी लागली. चीनसंबंधीचे सर्व धोरण पंडित नेहरूंनी व्यक्तिशः आखलेले होते; पण संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांना जावे लागले. पंडित नेहरूंना त्याचा धक्का बसला नाही. एवढेच नव्हे तर उलट लोकांची उदंड सहानुभूती मिळाली. मोठे भाग्य असल्याखेरीज हे शक्य नाही!

 नेहरूंचा राजबिंडेपणाही त्यांचे स्थान अबाधित राहण्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यांच्या हातून कितीही मोठ्या चुका घडल्या असोत, अनेक वेळा त्यांच्या मनाचा कोतेपणाही उघड झाला; पण त्यांच्या चेहऱ्यावर कधी विक्राळ भाव आला नाही एवढेच नव्हे तर चेहऱ्यावरचे हसूही कधी मावळले नाही. भारतीयांची ही एक विशेषता आहे; कोणा राजबिंड्याने हंसत हंसत कितीही मोठी गफलत केली तरी लोकक्षोभ होत नाही. रौद्र मुद्रा असल्याखेरीज ते कोणाला खलपुरुष

मानायला तयार होत नाहीत. भारतीय चौकटीत एखाद्या लोहियाला मान्यता मिळणे दुष्कर पण जवाहराची मान्यता अबाधितच राहते.

 स्वातंत्र्याच्या आंदोलनात दरिद्री अडाणी, शोषित-पीडित कोट्यवधी जनतेला इंग्रजांविरुद्ध उभे करण्यासाठी गांधीजींनी सत्य, अहिंसा इत्यादी धर्माधिष्ठित नैतिकतेचा वापर केला. या नैतिकतेच्या आधाराने लोक इंग्रजांविरुद्ध लढायला तयार झाले यात काही तथ्य आहे; पण इंग्रजांची भीती चेपण्याकरिता इंग्रजाइतका गोरा, त्याच्यासारखेच इंग्रजी बोलणारा जवाहरलाल अगदी तुरुंगातसुद्धा चहाचा डबा फेकून देतो आणि जेलरच्या घरून चहाचा ट्रे मागवतो या प्रतिमेचेही महत्त्वाचे स्थान होते.

 चंपारण्यातील न्यायालयात जबाब देताना गांधीजींनी एकदा म्हटले होते की, "खेड्यापाड्यांतील गरीब जनतेवर गोरे इंग्रज आणि एतद्देशीय शहरवासी जे अन्याय करताहेत त्याचा त्यांना ईश्वराच्या दरबारात एकदा जाब द्यावा लागेल." महात्माजींनी हे म्हटले खरे पण स्वातंत्र्याचे आंदोलन चालवताना हे शहरवासी स्वातंत्र्याचा मंगल कलश पळवून नेणार नाहीत याची त्यांनी काही खबरदारी घेतली नाही. जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्याच्या आंदोलनातील या एतद्देशीय 'इंग्रजांचे प्रतिनिधी होते. त्यामुळे सुशिक्षित भद्र लोकांत त्यांची लोकप्रियता मोठी उदंड; इतकी की देशाच्या आर्थिक भवितव्यासंबंधी नेहरूंशी पराकोटीचे मतभेद असतानाही महात्माजींना त्यांनाच आपले राजकीय वारस म्हणून जाहीर करणे भाग पडले.

 स्वातंत्र्य अगदी उंबरठ्यावर आले असताना महात्माजींनी स्पष्टपणे सांगीतले,

 “जवाहरला आज पर्याय नाही, इंग्रजांकडून सत्तेचे हस्तांतरण होत असताना तरी नाही. तो हॅरोत शिकला आहे. केंब्रिजचा पदवीधर आहे बॅरिस्टर आहे. इंग्रजांशी वाटाघाटी करायला त्याची गरज आहे."

 अशा राजबिंड्याच्या स्मतीचा अवमान करण्याचे कोणाला काय कारण आहे? त्याचे पुतळे पाडण्याची काय आवश्यकता आहे? त्याच्या नावाची स्मारके उधळण्याची काय गरज आहे?

 स्टॅलिन, लेनिनचे पुतळे खाली आले कारण स्टॅलिनवाद, लेनिनवाद खोटा पडला एवढेच नव्हे तर, त्या वादांच्या खोटेपणामुळे कित्येकांची आयुष्ये उजाड झाली आणि सर्वसामान्य माणसांना पावाच्या तुकड्यासाठी रात्र-रात्र थंडीत कुडकुडत रांगेत उभे राहण्याची वेळ आली.

 नेहरूप्रणित समाजवादी औद्योगीकरण फसले असेल पण त्याचे दुःख कोणाला?

कारखानदारांना दुःख होण्याचे कारण नाही. उलट, पुन्हा थोडे शब्दांचे जंजाळ उभे करून उद्योगधंद्यांच्या पदरात अधिक सवलती पाडून घ्यायला ते पुढे सरसावले आहेत, आणि त्यात त्यांना मोठे यश मिळत आहे. नेहरूंनी उभ्या केलेल्या सार्वजनिक उद्योगधंद्यांत लक्षावधी लोकांना नोकऱ्या मिळाल्या. त्यांचे उत्पादन काही नसले तरी त्यांना भरमसाठ पगार आणि भत्ते मिळताहेत. देशाचे काही झाले तरी नेहरूंमुळे त्यांना मिळालेली ही मिरासदारी अबाधित राहिली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे; आणि त्यापुढे सरकार मान तुकवीत आहे. 'इंडिया'तील मंडळींना नेहरू व्यवस्था म्हणजे मिळालेले घबाड आहे. देश जगो वा मरो, त्या घबाडाला कोठे धक्का लागणार नाही याची त्यांना खात्री आहे. त्या सगळ्या ऐतखाऊंचे दैवतच नेहरू आहे. नेहरूंचे पुतळे खाली ओढून विनाकारणच एक नवा वाद तयार करण्याची त्यांना काही आवश्यकता नाही.

 नेहरूंनी आखलेले धोरण पार अपयशी झाले. आता नवीन खुले आर्थिक धोरण स्वीकारले पाहिजे असा सगळीकडे गवगवा चालू आहे. खुली व्यवस्था कोठे कोठे येत आहे. नेहरूप्रणित समाजवादी नियोजनात, लायसेन्स-परमिटांच्या तटबंदीत गलेलठ्ठ झालेल्या कारखानदारांना खुल्या बाजारपेठेच्या झेंड्याखाली आणखी नवी मलई चारण्याडा कार्यक्रम अमलात येतो आहे. नेहरू इंडिया'वाल्यांचे पुढारी. मृत्यूनंतर पाव शतक होऊन गेले तरी ते 'इंडियाचे भले करतच आहेत.

 त्यांची दुष्मनी काय ती 'भारता'शी. शेतकरी, शेतीचे अर्थशास्त्र आणि शेतकऱ्यांच्या संघटना याबद्दल त्यांच्या मनात 'समाजवादी' तिरस्कार होता. शेतकऱ्यांची आंदोलने महात्माजींनी केली, वल्लभभाईंनी केली. नेहरू त्यावेळी स्पेनमधील यादवी, मेक्सिकोतील क्रांती आणि फॅसिझमचा उदय यांवरील आपली ब्रिटिश मते इंग्रजीत मांडीत होते. शेतकरी हे पोत्यात भरलेल्या बटाट्यांप्रमाणे आहेत हे मार्क्सचे मत त्यांनाही मान्य होते. कै. शंकरराव मोहिते यांनी महाराष्ट्रात शेतकरी संघटना काढली, हिरव्या गणवेशात तीसचाळीस हजार शेतकरी सोलापूरच्या मेळाव्यात उभे केले तेव्हा ती संघटना ताबडतोब बंद करण्याची सूचना पंडितजींनी शंकररावांना दिली. सहकारी शेती करण्याचा त्यांचा डाव चौधरी चरणसिंगांनी हाणून पाडला. गरिबी दूर करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमीनधारणेवर नेहरूंनी मर्यादा घातली. रफी अहमद किडवाईंनी सार्वजनिक वितरण व्यवस्था बंद करून टाकली होती ती नेहरूंनी पुन्हा चालू केली आणि शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी कडेकोट व्यूहरचना केली. सक्तीची वसुली, जिल्हाबंदी, राज्यबंदी, साठेबंदी, निर्यातबंदी, प्रक्रियांवर बंदी, परदेशातून भरमसाठ आयात असल्या वेगवेगळ्या