भाग 3 रा-संपत्ति म्हणजे काय ?

विकिस्रोत कडून
भाग तिसरा.
संपत्ति म्हणजे काय?

 अर्थ, धन, संपत्ति हे किंवा असेच दुसरे पुष्कळ शब्द सामान्य व्यवहारांत लोक समानार्थक म्हणून वापरतात. व यांचा अर्थ काय असें विचारलें असतां घरेंदारें, जमीनजुमला, पैसाअडका, कपडालत्ता, धान्यधुन्य, मालमसाला, जिन्नसपान्नस, ही सर्व संपति आहे, व हाच संपत्तीचा अर्थ असें व्यावहारिक माणुस उत्तर देईल, परंतु साक्रेतिसानें एके ठिकाणीं म्हटल्यांप्रमाणें हीं सर्व संपत्तीचीं उदाहरणें झालीं. व संपत्ति हजारों वस्तूची झालेली असल्यामुळे आणखीही हजारों वस्तूंचीं नांवें सांगून हा संपत्तीचा अर्थ असें कोणी म्हणल; परंतु आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या संपत्तीचा अर्थ ठरवावयाचा आहे. म्हणजे संपत्तीची व्याख्या करावयाची आहे, व शास्त्रीय व्याख्या ही गुणवाचक असली पाहिजे हें मागल्या भागांत स्पष्ट करून सांगितलें आहे. ज्या हजारों वस्तू संपत्ति या नांवाखालीं मोडतात, त्या निरनिराळ्या वस्तूंमध्यें असे कोणते सामान्य गुण आहेत कीं ज्यामुळे त्या सर्वांना संपत्ति हें सामान्य नांव मिळतें?
 ज्या ज्या वस्तूला संपत्ति म्हणतात, ती ती वस्तु मनुष्यापासून भिन्न व अलग राहणारी असली पाहिजे. मानवी प्राण्यापासून स्वतंत्र राहण्याची शक्ति हा एक गुण सर्व संपत्तीमध्यें असला पाहिजे. यावरून मनुष्य किंवा त्याचे गुण ही संपत्ति होऊं शकत नाहीं. ज्या ठिकाणीं गुलामगिरी कायदेशीर पद्धति आहे, तेथें एक मनुष्य दुस-या मनुष्याचां संपत्ति होऊं शकेल. परंतु आपली स्वतःची संपत्ति होऊ शकणार नाहीं. तसेच त्याचे गुणही संपत्तींत मोडणार नाहीत. मनुष्याचे गुण हे संपत्तीच्या उत्पत्तीचीं कारणें असूं शकतील. जसें एखादा मनुष्य आपल्या बौद्धिक गुणानें पुष्कळ संपत्ति मिळवील किंवा एखादा आपल्या गाण्याच्या गुणावर श्रीमंत होईल. परंतु हा त्याचा गुण म्हणजे संपत्ति नव्हे. तो संपत्ति उत्पन्न करणारा झरा  होय. वाङ्मयांत विद्याधन, सामर्थ्यधन, आरोग्यधन, असे शब्दप्रयोग येतात. परंतु हे प्रयोग अलंकारिक आहेत हें उघड आहे. येथें निरानराळ्या गुणांवर रुपक केलेलें आहे.
 संपत्ति या नांवावालीं मोडणा-या वस्तूंमधला दुसरा सामान्य गुण म्हणजे त्यांची मानवा वासनांची तृप्ति करण्याची शक्ति होय. याला वस्तूची उपयुक्तता म्हणतात. अर्थ या शब्दानें व्युत्पत्तिदृष्ट्या हा गूणच व्यक्त केला जातो. जें मनुष्याकडून प्रार्थिलं अगर इच्छिलें जातें तो अर्थ. म्हणजे धन, संपत्ति किंवा अर्थ यांमध्यें मनुष्याचा इच्छा वासना किंवा त्याचें काम भागविणारी शक्ति असलीच पाहिजे हें उघड-होतें. ज्या वस्तूंमध्यें मनुष्याची कोणतीच वासना भागावण्याच सामथ्य नाहीं ती वस्तू संपत्ति किंवा धन या पदाप्रत पावणारच नाही. मनुष्याच्या वासना नीतिवर्धक आहेत किंवा अनीतिप्रवर्तक आहेत; त्या स्वाभाविक आहेत किंवा कृत्रिम आहेत, या गोष्टीचा विचार अर्थशास्त्रामध्यें येत नाहीं. यामुळें ज्या ज्या वस्तूंना लोकांत मागणी आह किंवा त्यांचा खप लोकांत होतो, त्या त्या सर्व वस्तू संपत्ति या पद प्रत पावतात. म्हणूनच दारू, तंबाखू वगैरेसारख्या वस्तूंचें सेवन अनीतिकारक असलें तरी अर्थशास्त्रदृष्ट्या त्या संपत्तींतच मोडतात.
 संपत्तीच्या ठायीं वास करणारा तिसरा सामान्यगुण गुण म्हणजे तिची दुर्मिळता किंवा कष्टसाध्यता होय. जे पदार्थ इतके विपुल आहेत कीं, ते मिळविण्याकरितां कांहीं एक काम करावें लागत नाहा व ते कितीजणांनाही लागले तरी मुबलक असतात, अशा पदार्थाची कोणीही संपत्तीमध्यें गणना करणार नाहीं. या वस्तूच्या ठिकाणीं मनुष्याची वासना तृप्त करण्याची उपयुक्तता असेल, व मनुष्यापासून विलगपणाही असेल, परंतु तेवढ्यानेंच त्या वस्तू संपत्ति होणार नाहींत. संपत्तीमध्यें दुर्मिळता किंवा कष्टसाध्यता हा गुण असला पाहिजे. म्हणजे हवा, पाणी, नवीन वसाहतीमध्यें जमीन व लांकूडफांटें या वस्तू संपत्ति म्हणून समजल्या जात नाहींत. तर त्या सृष्टीनें मानवी प्राण्यास फुकट दिलेल्या देणग्याच समजल्या जातात. यांना कोणीही आपली संपत्ति अगर धन म्हणणार नाहीत; परंतु विशेष प्रसंगीं या वस्तूही संपत्ति होतात, म्हणजे जेथें जेथें ह्या दुर्मिळ तेथें तेथें त्यांना धनाचें स्वरूप येतें. मारवाडच्या रुक्ष प्रदशांत लोटाभर
 पाण्याला एक पैसा द्यावा लागतो. तेथें ज्याच्याजवळ मुबलक पाणी आहे तो मोठा श्रीमंत होतो. ज्याची स्वतःची विहीर आहे असा मनुष्य तेथें रहाटगाडग्यानें किंवा मोटेनें पाणी काढून विकतो व हा एक मोठा किफायतशीर धंदा होतो. तसेंच शहरांत पाण्याची दुर्मिळता असते म्हणून तेथें सुद्धां पाणी धन बनतें व त्याला किंमत द्यावी लागते.
 संपत्तीमधला शेवटचा व अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे संपत्ति असणारी वस्तू, कोणाच्या तरी खासगी मालकीची पाहिजे. ज्या वस्तू सर्वांना सामान्य आहेत व ज्यांवर एखाद्याचा अनन्यसामान्य ताबा नाहीं अशा वस्तू संपतिपदाप्रत पावणार नाहींत. उदाहरणार्थ, हवा, पाणी, जमीन, जंगल वगैरे. ज्या वस्तू आपल्याला स्वतःच्या ताब्यांत घेऊन मालकीच्या करितां येत नाहींत अशा वस्तूंना आपण आपली संपत्ति असें कधींच समजत नाहीं. तेव्हां मालकी व तिचा खरा निदर्शक गुण अनन्यसामान्य ताबा व उपयोग करण्याचा हक्क हे गुण संपत्तीमध्यें आवश्यक असले पाहिजेत. हा ताबा किंवा मालकी व्यक्तीचीच पाहिजे असा मात्र अर्थ नाही. ही मालकी एका व्यक्तीची असेल व व्यक्तिसमूहानें झालेल्या मंडळींची किंवा सभेची असेल किंवा देशांतल्या सरकारची असेल, परंतु कोणाच्या तरी ताब्यांत असण्याचा म्हणजे अधीनतेचा गुण सर्व संपत्तीमध्यें अवश्यमेव असलाच पाहिजे.
 वरील विवेचनावरून संपत्ति, धन किंवा अर्थ म्हणून जेवढी जेवढी वस्तू आहे ती पृथकता, उपयुक्तता, दुर्मिळता व अधीनता या गुणचतुष्टयानें अन्वित असलीच पाहिजे. या गुणचतुष्टयापासूनच दुसरें गुण निष्पन्न होतात. जसे संपत्ति ही मोलवान् वस्तू असते किंवा ती विकतां अगर खरेदी देतां येते म्हणजे तिला विनिमयमोल असतें. संपत्तीचा हा गुण प्राथमिक नाहीं. एखादा पदार्थ मनुष्याची वासना तृप्त करणारा असला, तो दुर्मिळ असला, तो मनुष्यापासून पृथक असला व तो कोणाच्या तरी मालकींचा असला म्हणजे ती मिळविण्याकरितां मनुष्य कांहीं स्वत: श्रम तरी करील किंवा तो पदार्थ दुस-यानें श्रमानें मिळविला असल्यास त्याच्या मोबदला कांहीं तरी देण्यास म्हणजे त्या पदार्थास विनिमयमोल देऊन घेण्यास तयार होईल.
 या विवेचनावरून संपत्ति किंवा धन याची खाली दिलेली व्याख्या
ठरते. मनुष्यापासून जो पृथक असतो, जो थोडया फार अंशानें दुर्मिळ असतो व जो एखाद्याच्या खासगी मालकीचा झालेला असतो असा मानवी वासना तृप्त करणारा पदार्थ म्हणजे संपत्ति होय.
 आतां जरी संपत्तीची वरील गुणवाचक कल्पना एकच असली तरी समाजाच्या निरनिराळ्या परिस्थितीप्रमाणें संपत्ति या सदरांत मोडणा-या वस्तू मात्र फार भिन्न भिन्न असतात. समाजाच्या बाल्यावस्थेंत मनुष्याच्या गरजा किंवा वासना फारच अल्प असतात व त्याच्या आयुष्यक्रमांत व उत्क्रांतितत्त्वाप्रमाणें त्याच्या खालच्या वर्गाचे जे पशु त्यांच्या आयुष्यक्रमांत फारसें अंतर नसतें. या समाजाच्या स्थितीला समाजशास्त्रकार मृगयावृत्ति म्हणतात. या स्थितीमध्यें मनुष्य शिकार करून आपली भूक भागवितो व झाडाच्या ढोलींत राहतो. या स्थितींत संपत्तीची वाढ शक्यच नसते. याच्या पुढची पायरी म्हणजे गोपालवृत्ति होय. यामध्यें लोकांची स्थाथिक अशी कोठेंच वसति नसते. त्यांचीं गुरेंढोरं व शेळ्यामेंढ्या यांच्यावर उपजीविका चालते व जेथें जेथें नवीं नवीं कुरणें सांपडतात तेथें तेथें लोक आपली राहण्याची जागा बद्लीत असतात. या स्थितीमध्यें गुरेंढोरें व शेळ्यामेंढ्या व त्यांचें दूधदुभतें व लोंकरकातडीं हेच संपत्तीचे जिन्नस असतात. ज्याच्याजवळ हीं पुष्कळ असतात ती श्रीमंत अगर सधन समजला जातो. या वृत्तीचा निदर्शक संस्कृतांतील दुहितृ हा शब्द आहे. दूध काढणें हें त्या काळीं मुलीचें काम असावें व म्हणूनच दुहिता-दुध काढणारी-या शब्दाचा पुढें मुलगी असा अर्थ झाला असावा. याच्यापुढील समाजाची पायरी म्हणजे कृषिवृत्ति होय. यामध्यें समाजांतील लोक एका प्रदेशांत स्थायिक होतात व तेथें शेतकीवर उपजीविका करून राहतात. या समाजाच्या पायरीमध्यें समाजाच्या पुष्कळ गरजा वाढलेल्या असतात; व त्या त्या गरजा भागविण्याकरितां पुष्कळ पदार्थ तयार केले जातात. तरी पण या पायरीवर समाज असतांना समाजांत वासनांची वाढ फार झालेली नसते; परंतु याची पुढील पायरी जी उद्योगवृत्ति तो समाजाच्या औद्योगिक पूर्ण वाढीचा काळ होय. यामध्यें समाजाच्या वासनांची पुष्कळ वाढ झालेली असते व ती ती वासना तृप्त करणयाकरितां हजारों धंदे निर्माण झालेले असतात; व यामुळे नानातन्हेची संपत्ति देशांत निर्माण होऊं लागते.
 याप्रमाणें मृगयावृत्ति, गोपालवृत्ति, कृषिवृत्ति व उद्योगवृत्ति अशा समाजाच्या चार अवस्था समाजशास्त्रज्ञ मानतात. समाजाची औद्योगिक प्रगति या क्रमानें झालेली दिसून येते व सुधारलेलीं युरोपांतील राष्टें हीं हल्ली शेवटच्या अवस्थेप्रत येऊन पोंचलेलीं असून त्यांची औद्योगिक बाबतीत सारखी प्रगति चाललेली आहे. युरोपांतील राष्ट्रें उद्योगवृत्तीच्या पूर्वीच्या सर्व वृत्तींमधून बाहेर आलेलीं आहेत.
 हिदुस्थानच्या पुराणप्रियतेमुळे म्हणा किंवा हिंदुस्थानांतील हिंदूंच्या जातिभेदानें म्हणा किंवा हिंदुस्थानच्या विस्तारामुळे म्हणा, परंतु हिंदुस्थान देशाचा हा एक विशेष आहे कीं, वर निर्दिष्ट केलेल्या व युरोपांत एकामागून एक झालेल्या समाजाच्या निरनिराळ्या अवस्था या येथें एकसमयावच्छेर्देकरून प्रत्यक्षपणें पहावयास सांपडतात. हिंदुस्थानामध्यें अनादि कालापासून मृगयावृत्तीनें राहणा-या जाती आहेत. अर्थात या जाती समाजाच्या पहिल्या अवस्थेपुढें आजतागाईत गेलेल्या नाहींत. अशा जाती म्हणजे हिंदुस्थानच्या निरनिराळ्या डोंगराळ प्रदेशांत राहणा-या कातवडी, भिल्ल वगैरेसारख्या आर्यलोक येथें येण्यापूर्वीच्या मूळ रहिवाशांच्या जाती होत. या जातींचें अजूनही मुख्य उपजीविकेचें साधन म्हणजे शिकार व रानांत अनायासें सापडणारीं फळेंमुळें होत. यांचीं शिकारीचीं हत्यारें म्हणजे तीरकामठा व गोफण हीं होत. या जाती काटक्याकुटक्यांच्या केलेल्या झोंपड्यांत राहतात. या लोकांना इंग्रज सरकारनें फुकट जमिनी देऊन शेतकी शिकविण्याचा प्रयत्न चालविला आहे व खानदेशासारख्या कांहीं ठिकाणीं तो थोडाफार यशस्वी होत चालला आहे; परंतु या जातीच्या स्वाभाविक आलस्यामुळे त्यांना औद्योगिक प्रगतीच्या वरच्या अवस्थेप्रत आणणें हें काम बरेंच कठीण असतें. वंशपरंपरेनें गोपालवृत्तीत राहणाच्या जातीही हिंदुस्थानांत पुष्कळ आहेत. युरोपामध्यें जीप्सी म्हणून जे गोपालवृत्तीनें राहणारे लोक होते हेही आशियांतीलच किंवा कदाचित हिंदुस्थानांतून गेलेले असतील. हिंदुस्थानांत वडारी, वैदू, धनगर वगैरे जाति अजून गोपालवृत्ति आहेत. या जातींना कायमचीं घरें करून राहणें आवडत नाहीं; गुरेंढोरें बाळगावीं, शेळ्यामेंढ्या पाळाव्या व आपआपल्या गुरांच्या सोईप्रमाणें व काम मिळेल त्याप्रमाणें प्रांतोप्रांती हिंडत राहावें हाच यांचा सतत क्रम. हिंदुस्थानांतील बहुजनसमाज अजून कृषिवृत्तीतच आहे. हिंदुस्थानांत शेंकडा ७५ लोक शेतकरी आहेत. या बाबतींत हिंदुस्थानाला ब्रिटिश अंमलाखालीं थोडेथोडें ओद्योगिक स्वरूप येत चाललें आहे खरें; तरी पण प्रमुखत्वेंकरून हिंदुस्थान अजूनही कृषिवृत्ति देश म्हणण्यास हरकत नाहीं. ब्रिटिश अंमलापासून व इंग्रजी शिक्षणानें लोकांच्या गरजा वाढत आहेत, अभिरुचि बदलत चालली आहे, संपत्तीचा उपभोग घेण्याची प्रवृत्ति होत आहे, तसेंच उद्योगधंद्यांचीं साधनें वाढत आहेत, यामुळे हिंदुस्थानांतील कांहीं शहरें उद्योगधंद्यांचीं आगरें बनू लागलीं आहेत. अशा शहरांमधील एखाद्या लक्ष्मीपुत्राच्या राजवाड्यासारख्या सुंदर बंगल्यांत व कातवाडयाच्या झोपडींत जमीनअस्मानचें अंतर दिसून येतें व यावरून मृगयावृत्ति व उद्योगवृत्ति या दोन अवस्थांमधल्या राहणींतील फरक दिसून येतो.

                    --------------------