बिना कपाशीनं उले

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही, हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही

नही वाऱ्याने हालल त्याले पान म्हनू नही, नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही

पाट येहरीवाचून त्याले मया म्हनू नही, नही देवाच दर्सन त्याले डोया म्हनू नही

निजवते भुक्या पोटी तिले रात म्हनू नही, आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही

ज्याच्यामाधी नही पानी त्याले हाय म्हनू नही, धावा ऐकून आडला त्याले पाय म्हनू नही

नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही, जिले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही

अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हनू नही, एके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हनू नही

दुधावर आली बुरी तिले साय म्हनू नही, जिची माया गेली सरी तिले माय म्हनू नही

इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही, जलमदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही

ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नही, ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हनू नही


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg