Jump to content

बलसागर/स्वातंत्र्य जेव्हा मिळाले

विकिस्रोत कडून

 
 स्वातंत्र्य जेव्हा मिळाले

 



 भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास म्हणजे दोन-चार विभूतींच्या प्रयत्नांचे व पराक्रमांचे गौरवगान, असे समीकरण आज जवळजवळ रूढ आहे. मग कोणी आपापल्या पूर्ववयातील संस्कारांमुळे वा अनुभवांनी झालेल्या मतांप्रमाणे 'वासुदेव बळवंत ते सुभाषचंद्र' या सशस्त्र क्रांतिकारकांची गीते गातील, तर कोणी साबरमतीच्या संताला मनोभावे शरण जातील. जणु समाज म्हणजे एक निर्जीव मातीचा गोळा होता आणि जो आकार त्याला देण्याचा या विभूतींनी प्रयत्न केला, तो आकार त्याने निमूटपणे बिनतक्रार धारण केला. या व्यक्तिप्रधान विभूतिपूजक मांडणीमुळे इतिहासाची चाके पक्षपाताच्या व वैयक्तिक गुणदोषदिग्दर्शनाच्या ठराविक चाकोरीत रुतून बसतात व विशिष्ट घटनेपासून जो काही बोध वा समज भावी पिढ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा असते, ती सफल होत नाही.
 गांधी, नेहरू, वल्लभभाई या व इतर व्यक्तींचा मोठेपणा व त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात बजावलेली कामगिरी कमी लेखण्याचा मुळीच हेतु नाही. परंतु एक गोष्ट जाणवते की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या त्या आणीबाणीच्या व महत्त्वपूर्ण कालखंडांत या व्यक्ती व एकंदरीत त्यावेळचे आमचे सर्वच नेतृत्व अगतिकपणे, येईल त्या परिस्थितीचा स्वीकार करीत होते. तसे पाहिले, तर देशाची फाळणी यांपैकी कोणालाच नको होती. नेहरू, गांधीजींनी शेवटपर्यंत तिला विरोधच केला. मग मनापासून नको असलेली फाळणी या नेत्यांना को मान्य करावी लागली ? जीनांनी दिलेले यादवी युद्धाचे आव्हान स्वीकारून, फाळणीची योजना धिक्कारून टाकण्याचे धैर्य या नेत्यांना त्या ऐतिहासिक क्षणी का दाखविता आले नाही ?  इथेच नेत्यांच्या वैयक्तिक गुणावगुणांपेक्षा त्यांच्या मागच्या सामाजिक शक्तींचा मागोवा घेण्याची गरज भासू लागते. कारण गांधी, नेहरू जसे फाळणीच्या भवितव्यतेला अगतिकपणे शरण गेले, तसेच देशातील इतर पक्ष, त्यांचे नेते व अनुयायी, या सर्वांना फाळणी अमान्य असूनही, कोणीही तिच्याविरुद्ध ब्र काढला नाही, ही वस्तुस्थिति आहे. देशात त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाची क्रांतिकारक संघटना होती; अखंड भारताचा उद्घोष करणा-या हिंदुत्वनिष्ठ संघटनाही चांगल्याच जोरावल्या होत्या. मग यांपैकी कोणी फाळणीविरुद्ध आवाज उठवू नये, आंदोलने, सत्याग्रह, सशस्त्र प्रतिकार इत्यादी मार्गांनी आपला विरोध व्यक्त करू नये, याचा अर्थ काय ? आमचे बेचाळीसचे क्रांतिवीर आणि प्रतिसरकारांचे संस्थापक त्यावेळी कोठे होते ? काँग्रेस नेत्यांच्या अगतिक शरणागतीएवढीच काँग्रेसेतर संघटनांची ही निष्क्रीयताही दोषास्पद नाही का ?
 तसे पाहिले, तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी आपल्या देशासमोर काही जगावेगळी भयंकर संकटे उभी होती असे म्हणवत नाही. आफ्रिकेतील नवस्वतंत्र राष्ट्रांना कोणत्या दिव्यातून पार पडावे लागत आहे ते आपण आज पाहतच आहोत. एवढासा चिमुकला अल्जेरिया ! जगाच्या इतिहासात तोड नाही एवढा प्रखर व रक्तरंजित स्वातंत्र्य संग्राम या शूर देशाने लढवला ! पण स्वातंत्र्यप्राप्तीच्या ऐन क्षणीच यादवीयुद्धाचे सांवट त्यावर पसरले गेले. इतके की, आपला पहिलावहिला स्वातंत्र्योत्सवही बिनघोरपणे या देशाच्या नागरिकांना साजरा करता आला नाही. आठ दिवस साजरा होणारा विजयोत्सव दुसऱ्याच दिवशी बंद ठेवावा लागला. आणि एकदा स्वातंत्र्य मिळाल्यावर पुढेही अशा तऱ्हेची संकटे देशासमोर येत नाहीत असे थोडेच आहे ? शंभर वर्षे स्वातंत्र्याचा उपभोग घेणा-या अमेरिकेसमोर १८६७ साली अंतर्गत यादवीचे अरिष्ट उभे राहिलेच ना ? त्यावेळी दक्षिणेकडील संस्थानांच्या बंडाळीला शरण जाऊन अमेरिकेची फाळणी करण्यात आली असती, तर आजची अमेरिका जगाला दिसली असती काय ? जो विवेक जे धैर्य लिंकन दाखवू शकला, ते, आमचे गांधी, नेहरू का दाखवू शकले नाहीत असा प्रश्न आहे. कायदेआझमांनी पिस्तुल चालवण्याची धमकी दिली. प्रत्यक्षात कलकत्त्याचे हत्याकांड पेटवून आपण काय करू शकतो याचे प्रात्यक्षिकही त्यांनी काँग्रेसनेत्यांसमोर ठेवले. पंजाबमधील परिस्थिती तर इतकी भयानक होती की, ती पाहून पंडितजी हतबलच झाले व पंजाबची फाळणी मागण्याशिवाय त्यांना काही पर्यायच सुचला नाही. एकदा पंजाबची फाळणी मागितल्यावर त्याच नात्याने देशाची फाळणी त्यांच्या-काँग्रेसच्या-गळ्यात बांधणे जिना-माउंटबॅटन यांना मुळीच जड गेले नाही. एवढ्या घिसाडघाईने व तडकाफडकी हे चिरफाडीचे काम उरकण्यात आले की, साधा शिंपीदेखील एखादा सूट बेतून फाडताना यापेक्षा अधिक काळजीपूर्वक हात चालवतो. सिमल्याच्या व्हाइसरीगल लॉजमध्ये व्हिस्कीची एक जोरदार चषक ठोकून चार तासात व्ही. पी. मेनन फाळणीची योजना कागदावर उतरवतात काय, माऊंटबॅटन घाईघाईने योजनेला नेहरूंची संमती घेतात काय आणि अॅटलीसाहेब अवघ्या पाच मिनिटात तिच्यावर शिक्कामोर्तब चढवतात काय ? आकाशातून भगवान् शंकराच्या मस्तकावर, तेथून हिमालयावर, तेथून सपाट भूप्रदेशावर, तेथून अनेक मुखांनी सागराकडे वहात जाणाऱ्या भागिरथीप्रमाणेच, आमच्या पूज्यस्थानी असणाऱ्या या नेत्यांचा ‘राष्ट्रीय अधःपात' टाळण्याची एकच संधी व वेळ हीच होती. पेटलेल्या कलकत्त्याचे आणि धुमसणाऱ्या पंजाबचे आव्हान स्वीकारणे ! स्वातंत्र्य कोठेही जात नव्हते. ब्रिटिश सरकार पेचात सापडले होते. स्वातंत्र्य देण्याशिवाय त्यांना गत्यंतरच नव्हते. ही परिस्थिती त्यावेळच्या सर्व मुत्सद्यांना पूर्णपणे समजलेली होती. हुकमाचे पान काँग्रेस नेत्यांच्या हातात पडण्यास फार तर थोडा अवधी लागला असता एवढेच ! परंतु फाळणी आणि त्यामुळे घडून आलेल्या कत्तली निश्चित टाळता आल्या असत्या. 'भारताने अहिंसेने स्वराज्य मिळविले' या आत्मप्रौढीला सत्याचा थोडा तरी आधार मिळाला असता !
 आणि फाळणी पत्करून कोणते प्रश्न सुटले ? कोणत्या समस्या हातावेगळया केल्या ! काश्मिरच्या सीमेवर पाकिस्तानी आक्रमण थोपवून धरण्यासाठी देशाच्या तिजोरीतून रोज काही लाख रुपये खर्ची पडत आहेत. महाराष्ट्राच्या तृतीय पंचवार्षिक योजनेला केन्द्रीय सरकार जेवढी मदत करणार आहे, त्यापेक्षा अधिक रकमेचा-पाचशे कोटी रुपयांचा भूर्दड पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी भारताला सहन करावा लागला आहे. देशात मुस्लिम लीगचे भूत जिवंत आहे ते आहेच. भारतातील कोट्यवधी मुसलमानांचा भारताच्या निधर्मी राजवटीवर विश्वास नाही तो नाहीच. सिंधू नदीचे पाणी द्या, वर कोट्यावधी रुपयांची दक्षिणा द्या; मंगला धरणाखाली गावे जाऊ द्यात, त्रिपुरात पन्नास हजार पाकिस्तान्यांचे तळ पडू द्यात-आणि तरीही फाळणीने हिंदु-मुसलमानांचा प्रश्न मिटला, या समाधानात आम्हाला राहू द्या! तेव्हा भेडसावणारे सर्व प्रश्न आजही कायम आहेत, ही गोष्ट कोणालाही नाकारता येत नाही. मग तेव्हाच हा सारा पुढचा विवेक पाहून फाळणी धिःकारली का गेली नाही ? जे लिंकनला साधले, ते आम्हाला का साध नये ! शीखांच्या स्वतंत्र भाषिक राज्याची मागणी फेटाळून लावताना नुकतेच पं. नेहरू गरजले, " देश यादवी युद्धाच्या खाईत लोटला गेला तरी चालेल, पण देशाचे यापुढे तुकडे मी होऊ देणार नाही." हीच भाषा, पंडीतजी, १५ वर्षापूर्वी उच्चारली असतीत तर ! तर साक्षात् नगाधिराज हिमालयालाही आपल्या उत्तुंग महिमानाचा हेवा करावासा वाटला असता !  पंधरा वर्षांपूर्वी देशातील राष्ट्रवादी शक्ती कमजोर होत्या, हेच या ऐतिहासिक पराभवाचे मूळ सामाजिक कारण आहे. राष्ट्रवाद हे आधुनिक काळातील उदयोन्मुख भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे राजकीय तत्त्वज्ञान आहे. या तत्त्वाच्या यशासाठी जे संघर्ष खेळावे लागतात, त्यासाठी जुन्या सरंजामशाही युगातील धार्मिक व जातीय निष्ठांना मागे टाकून शुद्ध राष्ट्रीय जाणीवा धारण करणारा नवा वर्गच समाजात प्रभावी व्हावा लागतो. हा औद्योगिक क्रांतीमुळे पुढे आलेला, स्वदेशी कारखानदारीवर वाढलेला व पोसलेला नवा वर्गच प्रसंगविशेषी कणखर राष्ट्रीय नीती आचरू शकतो व जुन्या निष्ठांच्या उद्रेकांशी समोरासमोर सामना देण्यास समर्थ असतो. औद्योगिक क्रांतीतून जन्मास आलेला समाजच राष्ट्रवाद समजू शकतो, पेलू शकतो, त्याच्या यशासाठी झगडू शकतो. कारण त्या समाजाच्या भौतिक विकासाआड जुन्या, धार्मिक व जातीय निष्ठा येत असल्याने त्यातून बाहेर पडण्याकडे त्याची स्वाभाविक अंतःप्रवृत्तीच असते. लिंकनच्या मागे उत्तर अमेरिकेची औद्योगिक क्रांती व त्यानुषंगाने पुढे आलेला कारखानदारवर्ग व पांढरपेशा समाज उभा होता. म्हणूनच तो निग्रोंच्या गुलामगिरीवर जगणाऱ्या अमेरिकेतील दक्षिण संस्थानांच्या यादवीला तोंड देऊ शकला, तिचा बीमोड करून अमेरिकेतील नवी औद्योगिक क्रांती स्थिरावू शकला.
 आमच्या गांधी-नेहरूंच्या किंवा सरदारांच्या मागे कोण होते ? भांडवलदार जरूर होते; पण औद्योगिक क्रांती नव्हती. खरी भांडवलशाही अर्थव्यवस्थाही नव्हती. औद्योगिक क्रांती घडून येण्यास देशातील साधनसामुग्री गतिमान करणारा कल्पक, धाडसी व कष्टाळू असा कारखानदारवर्ग पुढे यावा लागतो. भारत ही ब्रिटिशांची एक वसाहत असल्याने येथे अशा प्रकारची स्वदेशी कारखानदारी वाढूच शकलो नाही. कच्चा माल परदेशी पाठवून पक्क्या मालाची आयात करणारा व दोन्ही बाजूंनी नफा उकळून केवळ धनाची रास वाढविणारा एक पूंजीपती मध्यस्थ दलालवर्गच येथे अस्तित्वात येऊ शकला. यामुळे जुनी अर्थव्यवस्था कोलमडली हे खरे; पण नवी आली ती उपरी, अर्धवट व अंधानुकरणावर आधारित,म्हणून दुबळी होती. तिच्याजवळ या भूमीची स्वयंप्रेरणा नव्हती. त्यामुळे येथे पुंजीपती निर्माण झाले, उद्योगपती अस्तित्वातच नव्हते. आर्थिक परिवर्तन झाले, क्रांती येऊ शकली नाही.
 आर्थिक क्रांती दुबळी म्हणून त्याबरोबर येणारी मानसिक व सामाजिक क्रांतीही तशीच निःसत्व व उपरी. औद्योगिक क्रांतीबरोबर येणारे देशाभिमान, व्यवसायनिष्ठा, उद्योगप्रवणता, धडाडी, वैज्ञानिक दृष्टी, हवकांची व कर्तव्यांची जाणीव हे मानसिक सद्गुण येथे वाढीस लागूच शकले नाहीत. येथे राष्ट्रवादाची भाषा होती. पण 'राष्ट्रीय समाज' येथे निर्माण होत नव्हता. त्यामुळे भाषा आणि कृती, निष्ठा आणि व्यवहार यात कुठेच कुणाचा मेळ बसण्याची शक्यता नव्हती. आणीबाणीच्या प्रसंगी आमचे नेते विशुद्ध राष्ट्रीय भूमिकेवर आरूढ होऊन तत्त्वशुद्ध निर्णय घेण्यास आणि कणखर कृती करण्यास असमर्थ ठरत होते; आणि जनताही नेत्यांच्या तत्त्वभ्रष्टतेबद्दल उदासीन होती. त्यांना जाब विचारण्याएवढी जागृत नव्हती. केवळ काँग्रेस नेत्यांच्याच बाबतीत हे घडत होते असे नाही. राष्ट्रनिष्ठेची जोपासना करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कृतीत आणि उक्तीत तरी कुठे मेळ होता ! सामाजिक प्रवाहांशी निष्ठेचा संबंध नसल्याने प्रवाहाला वळण देण्याची तिची शक्तीही ऐनवेळी सुप्तच राहिली. तीच दशा आमच्या साम्यवाद्यांची. चीनचा साम्यवादी हा प्रथम ‘चिनी' होता. रशियाचा साम्यवादी हा प्रथम 'रशियन' होता. आमचा साम्यवादी प्रथम केवळ मार्क्स-लेनिनचा भक्त होता. चांगला साम्यवादी प्रथम चांगला राष्ट्रवादी असतो. परंतु येथे औद्योगिक क्रांती, त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या राष्ट्रीय जाणीवा, या जाणीवा कामगारांपर्यंत पोहचविणारे वर्गलढे, ही सर्वच नैसर्गिक वाढ खुरटलेली असल्याने येथे 'भारतीय ' साम्यवादी पक्ष उभा होण्याऐवजी मॉस्को वा पेकिंगची एखादी शाखाच काम करीत असल्यासारखा सर्व प्रकार होता. रशिया महायुद्धात दाखल झाल्याबरोबर या साम्राज्यशाही युद्धाचे लोकशाहीयुद्धात रूपांतर होते, या गौड 'बंगाला' ची एरव्ही संगतीच लावता येत नाही.
 वैयक्तिक गुणदोष दिग्दर्शनाऐवजी ही सामाजिक कारणपरंपरा ध्यानात घेतली गेली असती, तर फाळणीच्या प्रमादानंतर तरी आम्ही सावध झालो असतो. गांधीजींची हत्या येथे घडली नसती आणि नवभारताच्या उभारणीला राष्ट्रीय जाणीवेचे भावनात्मक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा आम्ही प्रथमपासून प्रयत्न केला असता. स्वतंत्र झाल्यावर पंधरा वर्षांनी आम्हाला 'राष्ट्रीय एकात्मता मंडळ' स्थापावे लागावे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मग पंधरा वर्षे जे प्रकल्प रचले, योजना आखल्या त्यातून साधले काय ? समाज राष्ट्रीय दृष्ट्या संघटित होण्याऐवजी तो कमजोरच होत असेल, तर उभारणी पायाशुद्ध नाही हे स्पष्ट आहे. उभारणी म्हणजे देश आपल्या पायावर, आपल्या साधनसामुग्रीच्या बळावर स्वयंपूर्ण व स्वावलंबी करणे. या उलट आज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र उधारउसनवारीचा दिवाळखोर मामला सुरू आहे.
 विकास थोडा सावकाश चालेल, पण न पेलणारी व न पचणारी परकीय मदत घेऊन नवी आर्थिक गुलामगिरी पत्करणे धोक्याचे आहे. जुन्या परंपरागत संस्कार केन्द्रांना आवाहन करून नव्या काळाच्या प्रेरणा व विचार जनतेच्या अंत:करणामार्फत पोहोचविण्याचे प्रयत्न का होत नाहीत ? अराष्ट्रीय व असामाजिक प्रवृत्तींचा कणखरपणे बिमोड होत आहे का ! या दिशेने आमचे प्रयत्न झाले तरच निर्गुण, निराकार जनतेतून सगुण, साकार असा ‘राष्ट्रीय समाज' स्वाभाविकपणे विकसित होईल. असा स्वाभाविक विकास हाच आजच्या सामाजिक विघटनेवरील व राजकीय दौर्बल्यावरील एकमेव तोडगा आहे.


ऑगस्ट १९६२