फाटलेला पतंग (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

छे ! आतां कोठून मी धड व्हायला ! अशा फाटलेल्या स्थितीतच फडफड - रडरड - करीत मला किती काल कंठावा लागणार आहे, तें एका ईश्वरालाच ठाऊक ! - अहो ! नका ! त्या आकाशाकडे पाहूं नका ! हरहर ! हेंच निरभ्र आकाश निराशेची घरघर लागलेल्या प्राण्यालासुद्धा, गोड - सुंदर - अशीं मोठमोठीं स्वप्नें पाडून - बिचार्‍याला नादीं लावून - कधीं म्हणून लवकर मरुं देत नाहीं बरें ! अशा स्वच्छ आकाशांत, अमळ वारा आनंदानें खेळूं लागला कीं, अंतः करणांत गुंडाळून ठेवलेली - सदैव आनंदाश्रु व दुःखाश्रु यांनीं भिजलेली माणसाची कल्पनाशक्ति - जगाच्या दुर्लक्षपणानें हूं म्हणतांच - जिवाला इतक्या कांहीं उंचच उंच भरार्‍या मारीत घेऊन जाते कीं, शेवटीं पश्चिमेच्या अंकावर अर्धवट झोंपीं गेलेला सूर्य एकदम जागा होऊन विचारतो कीं, ' नभोमंडलांत माझ्यामागे इतक्या वैभवानें हा कोण बरें महात्मा तळपतो आहे ? ' - पण अरेरे ! तो वैभवाचा क्षण आत्म्याला मिळतो - न मिळतो - तोंच ' ओढा खाली ! खालीं खेंचा ! नाहीं तर तो वेडा होऊन, कोठें तरी भडकेल ! ' अशी एकच जगाची हाकाटी सुरु होते ! मग काय ? खालीं जग, वर स्वर्ग, या उभयत्नांच्या जोरानें - अगदी निकरानें - चाललेल्या ओढाताणीमध्यें बिचार्‍या जिवाची - हाय ! - किती भयंकर दशा होते म्हणून सांगूं तुम्हांला ! - नको ! त्या दिवसाची - त्या स्थितीची आठवणसुद्धां नको ! अहो ! एके काळी धड असलेला हा फाटका पतंग, अशाच जगाच्या व स्वर्गाच्या ओंढाताणीमध्यें सांपडला होता बरें ! अहाहा ! किती सुखाचा - माझ्या पूर्ण भाग्याचा - दिवस होता तो ! ब्रह्मानंदाकडे न्यायला आलेला शीतल वायु कसा अगदी मिठी मारुन की हो मला घेऊन चालला होता ! जगाला मी पूर्ण विसरुन - पण होय ? जग कोठें मला विसरलें होतें ? माझी किंमत किती ? पण तिचासुद्धां जगाला कांही केल्या लोभ सुटत नाहीं ! शेवटीं ! जग मला खेंचूं लागलें - ' स्वर्ग जातो ! स्वर्ग जातो ! ' असें म्हणून मी मोठमोठ्यानें रडूं लागलों - अगदी सुचेनासें होऊन संतापाच्या - सोसाट्याच्या - वावटळींत सांपडून धाडकन् - या बाभळीच्या झाडावर येऊन आदळलो ! आतां हें फाटलेलें हदय कधीं तरी धड होईल का हो ! - नाहीं ! - नाहीं ! - नाही !! - उलट मी आतां दिवसानुदिवस अधिकाधिक असा विरतच जाणार ! - अहो ! माझ्या स्थितीबद्दल रडूं नका ! आधी ऐका ! एकदां धड असलेल्या पतंगाचें - या बाभळीच्या कांट्यांवर बसून अहोरात्र रडणारें - कण्हणारें - फाटत चाललेलें पिशाच्च ! - काय सांगतें तें ऐका ! गर्वानें भरार्‍या मारुं नकोस ! भरार्‍या मारुं नकोस ! नाहीं तर अस्सा फाटून - जन्मभर, जन्मभर - रडत बसशील !... <poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.