प्रशासननामा/प्रशासनाची अनुदार पुरुषप्रवृत्ती/प्रशासनाचा विचका करणारा हातखंडा दुहेरी खेळ!

विकिस्रोत कडून



प्रशासनाचा विचका करणारा हातखंडा दुहेरी खेळ!



 “एकवेळ तुम्ही सहन कराल पण तुम्हाला कोण्या लुंग्यासुंग्यानं करप्ट, भ्रष्टाचारी म्हटलेलं मी नाही सहन करणार." घरात शिरता शिरता अश्विनीचा स्फोट झाला.

 आज तिला घरी यायला बराच उशीर झाला होता. तिचा उतरलेला चेहरा पाहून चंद्रकांतला वाटलं, आज काहीतरी मनस्ताप देणारं घडलं आहे. तोष्णीवाल वकिलांच्या कार्यालयात त्यांची ज्युनिअर वकील म्हणून रोज संध्याकाळी अभ्यासासाठी जात असे. वकिली सुरू करून पाच-सहा वर्षे झाली असली तरी त्या वातावरणाची सवय झाली नव्हती. म्हणून अनेकदा ती ते मनाला लावून घ्यायची. त्याचं ओझं मनावर घेत घरी यायची. आजही तसंच काही मनाला न पटणारं घडलं असणार, असं चंद्रकांतला वाटलं, पण त्यानं आपणहून तिला काहीच विचारलं नाही. काही वेळाने ती आपणहून सांगेल; ते त्याला माहीत होतं आणि झालंही तसंच.

 भोजनानंतर ती म्हणाली, “आज मी त्या माजी आमदाराची सरांच्या साक्षीनं चांगलीच खरडपट्टी काढली. चंद्रकांत, त्यानं तुझ्यावर केलेले आरोप मला सहन झाले नाहीत. मग स्वत:वर कंट्रोल ठेवता आला नाही.

 "तू आप्पासाहेब बलकवडे यांच्याबद्दल बोलते आहेस?"

 "हो, त्यांची रॉकेलची केस सरांकडेच होती ना?"

 चंद्रकांत गंभीर झाला. कारण कालच आप्पासाहेबांनी आयुक्तांकडे त्याच्याबद्दल तक्रार केली होती. ते गेल्यानंतर आयुक्तांनी त्याला बोलावून त्याबाबत विचारले असता, चंद्रकांतने अप्पासाहेबांची तक्रार तद्दन चुकीची आणि खोटी आहे असे सांगितले होते. त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून आणि कागदपत्रे, पुरावा पाहून आपण निकाल दिला, त्यांना तो मान्य नसेल तर पुरवठा मंत्र्याकडे अपील करू शकतात, असेही त्याने म्हटले होते.

 “आय ॲग्री वुईथ यू." म्हणून आयुक्तांनी अप्पर आयुक्तांना ही केस पाहायला सांगितले होते.

 आयुक्तांच्या भूमिकेने तो कमालीचा नाराज झाला. उपायुक्त पुरवठा म्हणून त्याला तहसीलदार व प्रांत यांच्या पुरवठाविषयक प्रकरणी केलेल्या केसेसमध्ये अपीलात निर्णय घ्यायचा अधिकार होता, त्यात आयुक्तांनाही कायद्यान्वये हस्तक्षेप करता येत नाही, पण हे आयुक्त दरमहा त्याने किती प्रकरणांचा निकाल दिला याचा अहवाल मागवत व काही कागदपत्रेही वाचत. त्यालाही चंद्रकांतचा आक्षेप नव्हता. पण ‘स्टे’बाबत आयुक्तांची मते वेगळी व नियमबाह्य होती. ते त्याला अनेकदा म्हणाले होते की, खालच्या अधिकाऱ्यानी केलेल्या कार्यवाहीला स्थगिती देऊ नये.

 “पण सर, कायद्यान्वये मागणी केली तर स्टे देता येतो. अर्थातच डिझर्विंग प्रकरणात मी मेरिट पाहून स्टे देतो किंवा नाकरतो. दोन्ही वेळेस कारणे सविस्तर नमूद करतो, तीही पार्टीसमक्ष."

 “ते मी नोट केलं आहे. पण आपल्या महसूल विभागात पुरवठा शाखेतील भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून कलेक्टरांनी मोहीम हाती घ्यावी असं मीच आदेशित केलं आहे. त्यानुसार कार्यवाही होत आहे. अशावेळी गैरप्रकाराबाबत रेशन दुकान किंवा परवाना रद्द वा निलंबित करण्यात आलेला असेल तर त्याबाबत स्टे दिल्याने चुकीचा सिग्नल त्या भागात जातो."

 “प्रायमाफेसी जिथं निलंबनाचे रद्द होण्याचे आदेश योग्य व साधार आहेत तिथं मी स्टे दिलेला नाही. जिल्हा स्तरावरील मोहिमेबाबत एक सांगतो, एका जिल्ह्यात तलाठ्यांमार्फत प्रांताने केवळ रेकॉर्ड तपासून, प्रत्यक्ष गावी न जाता, अनेक दुकानं रद्द केली आहेत. दुकानाची कागदपत्रे अद्ययावत नाहीत म्हणून रेशन दुकान बंद करणं कितपत योग्य आहे? अशावेळी स्टे देणं उचित नाही का?"

 त्याचं म्हणणं आयुक्तांना पटलं नसावं. आपण स्पष्टपणे सूचित करूनही स्थगितीबाबत चंद्रकांत स्वतंत्रपणे निर्णय घेतो हे त्यांना रुचलं नव्हतं. चंद्रकांतला त्याची जाणीव होती, तरीही त्याच्या कार्यक्षेत्रात व अधिकार कक्षेत तो निष्पक्ष निर्णय घ्यायला स्वतंत्र होता आणि तो त्याचा अधिकार होता. आयुक्तांचे मत जर कायद्याला धरून नसेल, तर ते विचारात कसं घ्यायचं? हा त्याच्यापुढे प्रश्न होता. आपल्या सद्सदविवेकबुद्धीचा कौल प्रमाण मानून तो वागत होता. त्यामुळे आयुक्त त्याच्यावर काहीसे नाराज होते.

 अप्पासाहेब बलकवडे यांची फाईल आयुक्तांनी अप्पर आयुक्त ठोंबरे यांना तपासायला दिली, ही गोष्ट चंद्रकांतला अपमानास्पद वाटत होती. हा सरळसरळ त्याच्यावर अविश्वास होता.

 दुपारी केसवर्क झाल्यानंतर अप्पर आयुक्त ठोंबरे यांनी त्याला बोलावले तेव्हा चंद्रकांत आतून खदखदत होता. ठोंबरे यांच्याबद्दल त्याला आदर होता. कारण ते कर्तबगार अधिकारी होते. धुळ्याला जिल्हाधिकारी असताना त्यांनी तेथील केरोसिन किंगचं रॅकेट अत्यंत शिताफीनं उद्ध्वस्त केलं होतं.

 “मला अत्यंत अवघड, नव्हे अपमानास्पद वाटतंय, सर, सफाई देताना." चंद्रकांत त्यांना म्हणाला, “वुईथ रिगार्डस् टू यू... मला काही सांगायचं नाही. तुम्ही फाईल वाचून ठरवा काय ते आणि आपलं मत आयुक्तांना सांगा."

 “कम डाऊन चंद्रकांत, शांत हो." ठोंबरे म्हणाले. “मी सफाई वा खुलासा मागत नाही. फक्त काय घडलं ते मला जाणून घ्यायचं आहे... आणि सरांकडे तक्रार आल्यानंतर त्यांना तिच्यात लक्ष घालणं भागच आहे. अखेरीस, बलकवडे हे लोकप्रतिनिधी आहेत. आपणाला काही क्वासी ज्युडिशियल अधिकार असले तरी स्ट्रिक्टली स्पीकिंग, आपण काही कोर्ट नाही... त्यामुळे अशी तपासणी, अशी चौकशी करणे एकदमच गैर आहे, असं नाही. डोंट टेक इट इन देंट सेन्स."

 त्यांच्या आपुलकीने चंद्रकांत शांत झाला. त्यानं सारं सविस्तर कथन केलं. प्रथम केसच्या मेरिटबद्दल, मग अप्पासाहेबांच्या अनुचित वर्तनाबद्दल त्यानं सविस्तरपणे सांगितलं.

 “जिल्ह्याच्या त्या तालुका मुख्यालयी अप्पासाहेब बलकवडेंना पंधरा वर्षांपूर्वी केरोसिनच्या ठोक व किरकोळ विक्रीचे परवाने मिळाले आहेत व त्यांचं केरोसिन विक्रीचं दुकान भर बाजारपेठेत आहे. दोन महिन्यांपूर्वी तहसीलदारांनी बिदरभालकी रोडवर, शहरापासून पाच किलोमीटरवर असणाच्या त्यांच्या शेतावर धाड घालून, तेथून केरोसिनची वीस बॅरल्स जप्त केली. धाडीच्यावेळी त्यांचे नोकर रस्त्यावरून जाणाच्या वाहनांना, ट्रक्सना, मोटार, सायकल, स्कूटर्सना चढ्या दराने केरोसिन विकत होते. त्याचा तहसीलदारांनी पंचनामाही केला आहे. केरोसिन हे स्वयंपाक व दिवाबत्तीसाठी वापरायचं इंधन आहे. त्याची ऑटोमोबाईल वाहनांना विक्री करायला बंदी आहे. अप्पासाहेबांनी आपल्या अधिकृत दुकानात रेशन कॉर्डवर केरोसिन न विकता, ते गावाबाहेर अनधिकृतपणे व चढत्या भावानं विकलं. ते साधार सिद्ध झाल्यामुळे तहसीलदारांनी त्यांचा केरोसिन परवाना रद्द केला. अपीलात ते माझ्याकडे प्रकरण आलं. मी पुरावा पाहून व युक्तिवाद ऐकूत तहसीलदारांचा निर्णय कायम ठेवला. सर, एक गमतीची बाब सांगतो, आयुक्तांचा 'स्टे देऊ नये' हा आग्रह नियमबाह्य आहे. या प्रकरणी मी प्रायमाफेसी खालचा आदेश योग्य असल्यामुळे स्टे दिला नाही. म्हणून अप्पासाहेबांनी तक्रार केली आहे आणि त्याबाबत त्यांनी तुम्हाला मत द्यायला सांगितलं आहे."

 “ओ. के.', आता त्यांच्या इतर तक्रारींबाबत तुला काय म्हणायचं आहे?"

 “सर, अप्पासाहेबांनी अपील दाखल केलं ते पेशकारांकडे. माझ्याकडे ते सांगायला आले होते. त्यावेळी प्रथम आपल्या कामाचं काही न बोलता, तालुक्यातील तहसीलदार व प्रांत यांच्या पुरवठाविषयक तक्रारी सांगू लागले. विभागाचा पुरवठा आयुक्त म्हणून मला ते ऐकणं भाग होतं. तशात, ते माजी आमदार. शिष्टाचार म्हणून चहाही मागवला. पण जेव्हा त्यांनी अपीलाचं सांगितलं, तेव्हा त्यांना रीतसरपणे सुनावणी होईल असं सांगितलं. ते त्यांना कदाचित खटकलं असावं. दुपारी त्यांचे वकील आले, त्यांनी युक्तिवाद केला, पण मी ‘स्टे' दिला नाही. त्याची कारणं आदेशातही नमूद केली आहेत. मागच्या आठवड्यात अंतिम आदेश देऊन त्यांचं अपील मी फेटाळले."

 “पण त्यांनी असं तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांचं दुकान बाजारपेठेत होतं. तिथं त्या रात्री झेड सिक्युरिटी असलेल्या एका मंत्र्याची जाहीर सभा होती म्हणून पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव स्फोटक पदार्थ असल्यामुळे केरोसिनची दुकानातील व समोर कंपाऊंड वॉलमध्ये ठेवलेली बॅरल्स हटवायची सूचना केली होती. म्हणून त्यांनी भालकी रस्त्यावरील आपल्या शेतात ती हलवली आणि दुसऱ्या दिवशी नेमकी तहसीलदारांची तेथे धाड पडली. ती त्यांनी मुद्दाम, अप्पासाहेबांनी त्यांच्या भ्रष्टाचारी कारभाराची कलेक्टर व कमिशनरकडे तक्रार केली म्हणून, टाकली होती. पण ते निर्दोष होते. त्यांनी केरोसिनचा काळा बाजार केला नव्हता असं ते म्हणतात. त्याचा निकाल देताना विचार केला नाहीस का?"

 “सर, हा युक्तिवाद माझ्यापुढेही त्यांच्या वकिलांनी केला होता. पण त्याबाबत कसलाही लेखी पुरावा दिला नाही." चंद्रकांत म्हणाला, “मी प्रांतामार्फत स्वतंत्रपणे पोलिसांचा अहवाल घेतला आहे. त्या झेड सिक्युरिटी असलेल्या मंत्र्यांची सभा तहसीलदार धाडीनंतर तीन दिवसांनी त्या गावी झाली होती. हा पुरावा त्यातला खोटेपणा सिद्ध करतो निर्विवाद!"

 “ओ.के.," फाईल वाचून संपविल्यानंतर त्याला आश्वस्त करीत ठोंबरे म्हणाले, “आय ॲम कनव्हिन्स्ड... तू या प्रकरणात चूक केली नाहीस. मी आयुक्तांना माझं मत कळवीन."

 ""पण तरीही मनात खंत राहतेच. कुणीतरी तक्रार केली म्हणून, मनात किंतु  बाळगून चौकशी करणं कससंच वाटतं. खास करून क्वासी ज्युडिशिअर प्रकरणात कायदेशीर कामकाजात. पुन्हा आयुक्तांना माझं मागील जिल्ह्यातलं आर.डी.सी. असतानाचं, आताचं पुरवठा आयुक्तांचंही काम माहीत आहेच की, तरीही..." चंद्रकांतनं त्यांचा निरोप घेताना मनातील खंत व्यक्त केली होतीच.

 अश्विनीनं आप्पासाहेबांचं नाव घेताच त्याला हे सारं आठवलं, ते व तोष्णीवाल एकाच तालुक्याचे असल्यामुळे त्यांच्याकडे अपीलाची केस दिली होती. चंद्रकांतपुढे तोष्णीवाल यांच्या ज्युनिअर वकिलाने युक्तिवाद केला होता.

 त्या ज्युनिअर वकिलाशी बोलताना आप्पासाहेबांनी चंद्रकांतच्या व एकूणच पुरवठा खात्याच्या अधिका-यांबद्दल भ्रष्टाचाराचा व हप्त्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे तेथे असेलीली अश्विनी चिडली होती. ती एकदम उसळून म्हणाली,

 "उगाच खोटेनोटे आरोप करू नका. पुरावा द्या. नाहीतर माफी मागा."

 तेव्हा ते एकदम ओशाळले. ॲड. तोष्णीवालांनी तिची समजूत काढली.

 “मॅडम, अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे असते."

 चंद्रकांतनं इनसायडरला हा प्रसंग सांगताना म्हटले, “मी 'न्यायाधीशांनी अल्टेरिअर मोटिव्हने भूसंपादन प्रकरणात भ्रष्टाचार करून वाढीव मोबदला दिल्याचा प्रसंग' मागे सांगितला होता. वरिष्ठ अधिकारी हे मोहवश होतात असा सवाल केला होता. या प्रसंगातून लोकप्रतिनिधींच्या भ्रष्टाचाराचं जे दर्शन घडतं तेही तेवढंच विदारक आहे."

 आपला हा विचार उलगडून दाखवत तो पुढे म्हणाला, “निवडणुकीच्या मार्गानं निवडून आलेले लोकप्रतिनिधी कायदा करतात, निर्णय घेतात व त्याची अंमलबजावणी नोकरशाही करीत असते. पण याखेरीज स्वयंघोषित स्वरूपाच्या लोकप्रतिनिधींचं पेवच फुटलं आहे. ते पक्षाचे वा कुठल्यातरी जाती, धर्म, पथाचे शहर, जिल्हा वा वॉर्ड अध्यक्ष असतात, उठसूट अधिका-यांविरुद्ध तक्रारी करत असतात. त्यामागे गैरप्रकार होऊ नयेत वा भ्रष्टाचार उघडकीस यावा असा प्रामाणिक हेतू असेल तर त्याने प्रशासनावर वचक बसायला मदत जरूर होते. पण दुर्दैवानं आज दहापैकी नऊ तक्रारी खोट्या, द्वेषमूलक असतात. तरीही त्याची दखल घ्यावी लागते. प्रशासनाचा महत्त्वाचा वेळ वाया जातो. ही स्थिती सरकारनं समजून घेण्याची वेळ आली आहे, असं मला वाटतं!"

 “पण अधिकारी-कर्मचारी पण तेवढेच भ्रष्ट आहेत, तेही काम करत नाहीत, हेही तेवढंच वास्तव आहे ना?"

 "मान्य! मी त्याला 'ट्रॅजिक आयरनी' म्हणेन, जे भ्रष्ट व काम न करणारे अधिकारी आहेत, ते अशा स्वंयभू पुढा-यांशी जुळवून घेतात. त्यांच्याविरुद्ध ते सहसा तक्रारी करत नाहीत. उलटपक्षी ते अपवादानं स्वच्छ असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध त्याचा वापर करतात. त्यांचे हितसंबंध सांभाळले जात नाहीत अशा प्रकरणात. त्यामुळे खोट्या तक्रारीचे तण माजले आहे. त्यामुळे प्रशासनात स्वच्छता यायला मदत होत नाही. उलटपक्षी चांगल्याचं खच्चीकरण होतं. ते नाऊमेद बनतात, सिनिक होतात. वाईट अधिकाऱ्यांना अभय व महत्त्वाची पदे मिळणं आणि चांगल्यांना नाऊमेद करीत खच्ची करणं हा प्रशासकीय खेळ देश व राज्याला महागात पडणार आहे."

 "नाही चंद्रकांत." अश्विनी म्हणाली, “ तुला, तुझ्यासारख्यांना नाऊमेद होऊन चालणार नाही. सोन्यालाच तप्त भट्टीतून आगीशी सामना करावा लागतो. त्यातूनच त्याचं तेज उजळतं!"

 "आणि वहिनी, दुसरंही एक सत्य आहे... सांच को आंच नाही!"

 इनसायडर चंद्रकांतच्या पाठीवर थाप मारीत म्हणाला, “म्हणून मित्रा! तुझ्या शब्दात तुलाच सांगतो, डू द बेस्ट अँड लीव्ह द रेस्ट टू दॅट फोर्स बियाँडवुईच वुई कॉल नेचर, डेस्टिनी ऑर ऑलमायटी गॉड...!"