पुस्तक दुसरे -भाग १ ला-सामान्य विचार.

विकिस्रोत कडून

अर्थशाश्वाचीं मूलतत्वें.
पुस्तक दुसरें.

ܕܒܨ

भाग पहिला
.
सामान्य विचार.

 प्रास्ताविक पुस्तकाच्या शेवटल्या भागांत सांगितल्याप्रमाणें या पुस्तकांत राष्ट्रीय संपत्तीच्या उत्पत्तीच्या सर्व प्रश्नांचा विचार करावयाचा आहे. यांतला प्रमुख व अत्यंत वादग्रस्त प्रक्ष संपत्तीच्या उत्पत्तीच्या कारणांचा होय. कां कीं, समाजांत उत्पन्न होणारी संपत्ती ही किती तरी बहुविध असते. तेव्हां या अशा बहुविध पदार्थांना कांहीं एक सामान्य कारण-समुच्चय असेल हैं मकद्दर्शनीं खरेंच वाटत नाहीं. ज्याप्रमाणें संपत्ती या नांवाखालीं मोडणा-या हजारों वस्तूंमधील सामान्य गुण शोधून काढणें हें बरेंच कठीण काम आहे; त्याप्रमाणें संपत्तीचीं करणें शोधून काढणें हें तितकेंच किंबहुना जास्त कठीण काम आहे; व ज्याप्रमाणें संपत्तीचा अर्थ काय असें विचारल्याबरोबर सामान्य मनुष्य जमीनजुमला, कपडालत्ता, पैसाअडका, ही संपत्ती असें चटकन् उत्तर देतो, त्याप्रमाणें संपत्तीचीं कारणें काय असें विचारल्याबरोबर सामान्य मनुष्य असें उत्तर देईल कीं, देशांतील निरानराळे धंदे व कला हीं संपत्तीची कारणं आहेत. तेव्हां या सर्व कला व हे सर्व धंदे अर्थशास्त्रांतील संपत्तीच्या उत्पत्तीच्या कारणांमध्यें येतात किंवा काय ? नाही. या कला व हैं धंदे विशिष्ट स्वरूपाच्या संपत्तीचीं कारणें आहेत. कापड कसें उत्पन्न करावें हें विणकला सांगेल. परंतु अशा विशिष्ट कलांची माहिती देणें हें अर्थाश्स्त्राचें काम नाहीं, व असल्या प्रकारच्या विशिष्ट कारणांचा या पुस्तकांत आपल्याला विचार करावयाचा नाहीं, व असा विचार करणें शास्त्राला शक्यही नाहीं. अर्थशास्त्र संपत्तीच्या विशिष्ट स्वरुपाकडे लक्ष देतच नाहीं. कापड कसें होतें, धान्य कसें पिकतें, कांचेचें सामान कसें करतात किंवा पितळेचीं भांडीं कशीं तयार होतात, इत्यादि प्रश्नांचें उत्तर अर्थशास्त्र देऊं शकणार नाहीं. विशिष्ट संपत्ती कोणत्याही स्वरूपाची असो परंतु तिच्यांत कांहीं एक सामान्य गुण असतात. अशी सामान्य स्वरूपाची संपत्ती देशांतील कोणत्या परिस्थितींत समाजाच्या कोणत्या स्थानांनी व समाजाच्या कोणत्या स्वरूपामध्यें व कोणत्या सामाजिक उपायांनीं उत्पन्न होऊं शकते हें आपल्याला येथें पाहावयाचें आहे. अर्थांत् संपत्तीच्या सामाजिक व सामान्य कारणांचा या पुस्तकांत आपल्याला विचार करावयाचा आहे. हीं सामाजिक व सामान्य कारणें किती व कोणतीं असतात, त्यांचें यथार्थ स्वरूप काय,त्या कारणांच्या कोणत्या विशिष्ट गुणांवर व परिस्थितीवर संपत्तीची वाढ अवलंबून आहे; तसेंच संपत्ती वाढविणाच्या या कारणांची स्वतःची वाढ कोणत्या नियमांनुसार होते, इत्यादि पुष्कळ प्रश्नांचा येथें सविस्तर ऊहापोह करावयाचा आहे.
 वर सांगितलेंच आहे कीं, संपत्तीची कारणमीमांसा बरीच बिकट आहे. कारण ज्या मानानें एखादें कार्य हें संकीर्ण व बहुविध स्वरूपाचें असेल त्या मानानेंच त्यांचीं कारणें संकीर्ण व बहुविध असतात. जसजसें संपत्तीच्या संकीर्ण स्वरूपाचें यथार्थ ज्ञान लोकांस होऊँ लागतें तसतशीं त्याचीं बहुविध कारणेंही लोकांच्या नजरेस येऊँ लागतात, आभिमत पथांत प्रतिपादन केलेल्या कारणसमुच्चयाचा शोध अशाच त-हेनें लागला. उदीम पंथांचें लक्ष एका कारणाकडे गेलें वj संपत्तीच्या कारणांचें सारसर्वस्व त्यांत आहे असें त्यांनीं प्रतिपादन केलें. पैसा हें संपत्तीचे स्वरूप व व्यापार हें संपत्तीच्या उत्पत्तींचें साधन हें त्यांच्या मतांचें सार. म्हणजे उदीमपंथानें पैसा अगर भांडवल याचें संपत्तीच्या वाढीचे कामीं फार महत्व आहे असें शोधून काढले. परंतु हें मत एककल्ली असल्यामुळें जरी त्यांत सत्याचा अंश होता तरी त्या मताच्या अतिशयोक्तीनें तें मत खेटें असें वाटूं लागलें, व यामुळें उदीमपंथाच्या प्रतिस्पर्धी पंथानें शतकी अगर जमीन हें संपत्तीच्या कार णांचें सारसर्वस्व असें आपलें मत प्रस्थापित केलें. शेतकी हेंच संपत्तीच्या वाढीचें एकमेवाद्वितीय कारण आहे. व्यापार, भांडवल व कारखाने हे उपयोगी असले तरी अनुत्पादक आहेत. परंतु संपत्तीच्या उत्पत्तीची ही उपपत्ति उदीमपंथाच्या उपपत्तीप्रमाणें एकदेशीयच होती. उदीमपंथ व निसर्गपंथ यांच्या उपपत्तीमध्यें सत्याचा अंश नव्हता असें नाहीं. परंतु प्रत्येक पंथानें आपली उपपत्तिच सर्वास्वी खरी व दुस-याची उपपत्ति सर्वस्वी खोटी अशा त-हेचा एकदेशीय कोटिक्रम लढविल्यामुळे त्या उपपत्ति खोट्या व अतएव त्याज्य आहेत असें लोकांस वाटूं लागलें. परंतु अभिमत पंथाचा जनक अॅडम स्मिथ यानें दोन्ही मतांतील सत्याचा अंश कबूल केला व शिवाय संपत्तीच्या उत्पत्तीचें एक उपेक्षित कारण शोधून काढलें. तें कारण मानवी श्रम व श्रमविभागाचें तत्व हें होय. तेव्हांपासूनच अभिमत पंथांत व हल्लींच्या अर्थाश्स्त्रांतील बहुतेक पुस्तकांमध्यें जमीन, श्रम व भांडवल अशीं तीन संपत्तीचीं कारणें म्हणून सांगण्याचा सांप्रदाय पडला. परंतु पुढें या तीन कारणांच्या स्वरूपाबद्दल पुष्कळ वादविवाद वाढला व जेव्हां अभिमत पंथाच्या पुष्कळ मतांवर आक्षेप येऊं लागले, तेव्हां या कारणसमुच्चयाच्या पूर्णतेबद्दलही शंका उत्पन्न होऊं लागल्या; व आणखी कांहीं उपेक्षित कारणें दुस-या ग्रंथकारांनीं पुढें आणलीं. हीं कारणें पूर्वीच्या ग्रंथकारांनीं प्रमुखत्वेंकरून निर्दिष्ट केलीं नसलीं तरी तीं कारणें त्यांनीं गृहीत धरलीं होतीं. परंतु त्यांचा स्पष्ट्र उच्चार न झाल्यामुळे व अतएव तीं सर्वदा डोळ्यांपुढें न राहिल्यामुळें अभिमत अर्थशास्त्रकारांच्या विचारसरणीत कित्येक चुका झाल्या व या चुका दाखवितांना या कारणांचा प्रमुखत्वेंकरून निर्देश कांहीं अर्वाचीन ग्रंथकारांनीं केला. याप्रमाणें अभिमत पंथाच्या आक्षेपकांनीं संपत्तीच्या कारणांत भर घातली. परंतु प्रास्ताविक पुस्तकांत सांगितल्याप्रमाणें कांहीं ग्रंथकारांनीं आपण शोधून काढलेलीं कारणें म्हणजे संपत्तीच्या उत्पत्तीच्या मीमांसेचें खरें रहस्य व अभेमतपंथाची कारणमीमांसा हीं खोटीं व कुचकामाचीं अशा प्रकारची टीका केली. परंतु ही टीकाही कांहीं अंशी एककल्लीच आहे असें खालील विवेचनावरून दिसेल.
 या सर्व वादविवादाकडे जरा बारकाईनें पाहिलें तर असें दिसून येईल कीं, हा वादविवाद खरोखरी शुष्क आहे. आजपर्यंत संपत्तीच्या उत्पत्नीसंबंधीं ज्या ज्या उपपत्ति पुढें आल्या आहेत त्या वास्तविक एकमेकींना विरोधी नाहींत तर त्या एकमेकींच्या पूरक आहेत. ह्मणजे प्रत्येक उपपत्तीमध्यें संपत्नीच्या एकेक कारणाचा निर्देश केलला आहे.
 तेव्हां या वादविवादांतील बराच घोटाळा व गोंधळ संपत्तींच्या कारणांचें वर्गीकरण करण्यापासून नाहींसा होणार आहे असें आह्मांस वाटतें व ह्मणून आम्हीं संपत्तीच्या कारणांचे दोन पोटभेद खालील विवेचनात केल आहेत.
 अर्वाचीन शास्त्रीयदृष्ट्या एखाद्या कार्याच्या उपपत्तीला ज्या ज्या गोष्टी अवश्य असतील ह्मणजे ज्यांचेवांचून कार्योत्पत्ति होणार नाहीं, त्या सर्वाचा एकाच 'कारण' या संज्ञेमध्यें अंतर्भाव होतो हें खरें आहे; तरी पण कांहीं कांहीं शास्त्रांच्या सोयीकारतां कारणांचें वर्गीकरण करण्याची पद्धति आहे. उदाहरणार्थ, वैद्यकशास्त्रांत रोगाचीं प्रत्यक्ष कारणें व रोगाकडे कल असणारीं कारण असा भेद करतात. तसेंच पुष्कळ ठिकाणीं अप्रत्यक्ष कारणें व प्रत्घक्ष कारणें असा भेद करतात; परंतु हा भेद शास्त्राला धरून नाहीं. कारण अप्रत्यक्ष कारणें ह्मणजे कारणांचीं कारणें होत: तरी पण एखादया विषयाच्या सोयीकरितां असा भेद करण्यास हरकत नाही. या न्यायानें येथें अर्थशाखाच्या विवेचनाच्या सोयीकरितां कारणांचे अमूर्त व मूर्त असे दोन वर्ग केले आहेत. मूर्त कारणें हीं चटकन् ध्यानांत येणारीं कारणें होत. कारण तीं जडस्वरूपी असल्यामुळें वरवर पहाणाराच्याही तेव्हांच लक्षांत येतात. अमूर्त कारणें हीं जडस्वरूपी नसल्यानें तितकीं चटदिशीं लक्षांत येत नाहींत. मूर्त कारणें हीं दृगोचर असतात; तर अमूर्त कारणें हीं दृश्या दर नसतात. ज्याप्रमाणें वृक्षाचा वरचा भाग स्पष्ट दिसतो; परंतु मुळें जमिनींत खोल असल्यामळें सहज दिसत नाहींतें; त्याप्रमाणें अमूर्त व मूर्त कारणांचाही संबंध आहे. या भेदांचें स्पष्टीकरण एक दोन दाखव्ल्यांवरून सहज होईल. वृक्षाच्या वाढीचीं मूर्त कारणें ह्मणजे पाणी,खत व माती हीं होत. हीं सहज दृश्य असून तेव्हांच ध्यानांत येतात. या वाढीचीं अमूर्त कारणें म्हणजे हवा व उष्णता हीं होत. र्ह पहिल्याइतकीं लौकर ध्यानांत येत नाहींत. ह्मणूनच या अमूर्त कारणांचा शोध मूर्त कारणांचे मागून लागला आहे. विस्तवाचें मृत कारण जळण होय; तर अमूर्त कारण हवा होय. पाणी वर काढण्याच्या पंपाच्या यंत्रामध्यें  पाणी वर येतें तें मनुष्याच्या शक्तिनें किंवा एंजिनाच्या शक्तिनें येतें. या ठिकाणीं मानवी शक्ति व एंजिनाची शक्ति हें त्याचें मूर्त कारण तर हवेचा दाब हें त्याचें अमूर्त कारण होय. आपण दगड हातांतून फेंकला म्हणजे तो जमिनीवर आपटतो. याचें मूर्त कारण आपण त्यास दिलेला गति होय, पण त्याचें अमूर्त कारण गुरुत्वाकर्षण होय. एखाद्या कार्याला अमूर्त कारणें मूर्त कारणांइतकींच अवश्यक असतात. अमूर्त व मूर्त यांमध्यें अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष कारणें असा परंपरेचा संबंध नसती. दोन्हीं कारणें त्या कायचिों प्रत्यक्ष कारणेंच असतात. परंतु अमूर्त कारणें त्याच कार्याला अनन्य सामान्य असतात असें मात्र नाहीं. त्या कारणापासून आणखीही पुष्कळ कार्ये होत असतात. तेव्हां अमूर्त व मूर्ती यांमध्यें सामान्य-विशेष असा संबंध असतो असें म्हणण्यास हरकत नाहीं. तेव्हां प्रथमतः संपत्तीच्या उत्पतीचीं अमूर्त कारणें कोणतीं याचा विचार पुढील भागांत करूं.