Jump to content

पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ/हॅनिबल

विकिस्रोत कडून




 हॅनिबल

प्रसिद्ध कार्थेजवाला सेनापति हॅनिबल हा इसवी सनापूर्वी २४७ व्या वर्षी जन्मला. युद्धाचे नियम जाणणारे इतिहासकार हॅनिबल याची गणना सगळ्या जगांत जे मोठमोठाले सेनापति होऊन गेले त्यांत करतात. पण हा जर केवळ सेनापति म्हणूनच मोठा होऊन गेला असता तर त्याचें महत्त्व इतिहासांत इतकेंसें शिल्लक राहिलें नसतें. त्याच्या नांवाशीं एका मोठ्या राष्ट्राचा व संस्कृतीचा इतिहास संलग्न झालेला आहे. त्याच्या अपयशाबरोबर तें राष्ट्र व ती संस्कृति हीं झपाट्यानें लयास गेलीं; व नामशेष शब्दाच्या खऱ्या अर्थानेच इतिहासाला त्यांची सध्यां ओळख आहे. हें राष्ट्र म्हणजे कार्थेजेनिअन लोकांचें होय, व ही संस्कृति म्हणजे फिनिशिअन लोकांची होय. हॅनिबलने यांच्या उत्कर्षासाठीं जें अचाट कृत्य केलें त्यांत जर त्याला यश मिळालें असतें तर तेथून पुढील इतिहासाची घडण खास निराळी झाली असती. हें कार्थेजेनिअन राष्ट्र व ही फिनिशिअन संस्कृति यांसंबंधानें थोडीशी ओळख प्रथम व्हावयास हवी.
 भूमध्यसमुद्राच्या पूर्वकिनाऱ्यावर जो एक सिरिआ नांवाचा देश आहे, त्याच्या पश्चिमेस असलेल्या उंच पर्वताच्या व समुद्राच्या मध्ये एक कोकणपट्टी आहे. ही सरासरी दीडशे मैल लांब व दहा पंधरा मैल रुंद अशी आहे. पाठीमागें डोंगरांच्या रांगांवर रांगा पसरलेल्या असल्यामुळे पूर्वेकडून या सखल प्रदेशांत फारसें कोणी उतरत नसे; आणि समोर अफाट समुद्र पसरला असल्यामुळे तिकडूनही येथें कोणी येत नसे. अशा या निवान्त प्रदेशांत जे लोक रहात त्यांस फिनिशिअन असें म्हणत. हे तरी तेथें कोठून आले याची वार्ता इतिहासाला नाहीं. कारण त्यांनी स्वतः एक स्वतंत्र लिपी उत्पन्न करून जरी ती जगांतील निरनिराळ्या राष्ट्रांस दिलेली असली तरी त्या लिपीनें सुद्धां स्वतःचा इतिहास लिहून ठेवण्याचें ते अगदींच विसरले. विद्येकडेही या लोकांचें

फारसें लक्ष नव्हतें. त्यांची सगळी जातच्या जात व्यापारी पेशाची असे. नवे नवे पदार्थ बनवावे, इतकेंच नव्हे तर जहाजांवर भरून ते इटली, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड किंबहुना आफ्रिकेचें खालचें टोंक व हिंदुस्थान येथपर्यंतसुद्धां नेऊन पोहोंचवावे हा त्यांचा क्रम असे. ही दर्यावरची मुशाफरी त्यांनी कित्येक शतके चालविलेली होती. त्यामुळे पृथ्वीचा नकाशा त्यांना प्रत्यक्षच फार बारकाईनें माहीत झाला होता. समुद्रकाठीं सांपडणारे कांहीं विशेष प्रकारचे मासे शिजवून त्यांच्या चरबीचा एक जांभळा रंग ते तयार करीत. तो लोकरीवर इतका सुंदर वठे कीं, त्याचीं उत्तम दोन पुटें दिलेली अच्छेर लोकर जवळपास पांचशे रुपयांला लोक आनंदाने विकत घेत. या लोकरीचे केलेले लहंगे असे तकतकीत दिसत कीं, अगदीं साधें सणंगसुद्धां हजार रुपयांपर्यंत जाई. युरोपांतील मोठमोठ्या राजेरजवाड्यांच्या व सरदारजहागिरदारांच्या झनान्यांत या रंगीत लोकरीला फार मोठी गि-हाइकी असे.
 प्रथम याच लोकांनी कांच तयार केली. पण नुसती कांच बनविण्यावरच ते खूष राहिले नाहीत. तर तिचे पुष्कळ प्रकारही ते बनवीत. एक कांच शुद्ध पारदर्शक, दुसरी रंगीत पट्ट्यापट्यांची व तिसरी हिरेमाणकांच्या जातीची. जर या तिसऱ्या कांचेचीं माणकें इत्यादि बनविलीं, तर खरें माणिक कोणचें आणि बनावट कोणचें याचा दर्दी जवाहिऱ्यालासुद्धां भ्रम पडे. रंगीत कांचेचीं ते हरतऱ्हेची भांडीही करीत. ह्या कांचेच्या सामानावर व रंगीत लोकरीवर जसे ते गबर झाले, तसेच शेजारी असलेल्या सायप्रस बेटांतील इमारतीच्या लांकडांवरही त्यांनीं अगणित पैका मिळविला. सध्या सायप्रस नांवानें माहीत असलेलें जें इमारतीचें लांकूड आहे त्याच्या नांवाचा आरंभ या फिनिशिअन लोकांच्या व्यापारांत सांपडेल. याच सायप्रस म्हणजे कायप्रस बेटांत त्यांनीं कॉपर (तांबें) धातूचा शोध लाविला व या वस्तु इतर देशांत नेऊन त्यांनी मानवी संस्कृति निःसंशय अधिक रम्य तऱ्हेची केली.
 त्यांचा देश संपत्तीनें गडगंज भरला तो त्यांच्या कौशल्यामुळे व उद्योगशीलतेमुळें. पण शेजारच्या उचल्या लोकांना, कीं ज्यांना स्वतः कष्ट करावयास नको होते पण दुसऱ्यांचें लुबाडण्याची ताकद मात्र ज्यांच्या अंगांत होती, त्यांना हे त्यांचें वैभव खपेना. मोठमोठाल्या टोळ्या करून ते यांजवर चालून येत. ते आले म्हणजे यांनीं त्यांस पुरेसा मलिदा चारावा व वाटेस लावावें. असें कित्येक वर्षे चाललें होतें. ज्ञान आणि वाणिज्य यांच्या उत्पत्तीला आणि रक्षणाला क्षात्रधर्म समाजांत असावा लागतो हें त्यांस समजलें नव्हतें. शेवटीं त्यांच्या संपत्तीची वार्ता शिकंदर बादशहाच्या कानीं गेली. अवघी पृथ्वी पादाक्रान्त करावयास निघालेला हा वीसबावीस वर्षांचा अलेक्झॅन्डर त्यांच्या या समृद्ध देशाच्या हद्दीवर येऊन थडकला. त्याच्यापुढे अर्थात् त्यांचें कांहींएक चालेना. तेव्हांपासून साधारण मानानें या लोकांची पिछेहाटच सुरू झाली असे म्हणावयास हरकत नाहीं. या आपत्कालीं त्यांच्यांतील कित्येक लोक परागंदा झाले व आपल्या जहाजांच्या मुक्कामासाठी भूमध्यसमुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर ट्यूनिश शहराजवळ जो त्यांनीं एक टप्पा बनविला होता तेथें ते जाऊन राहिले. ज्ञानवाणिज्याबरोवर क्षात्रधर्मही त्यांनी आपल्या लोकांत उत्पन्न केला आणि भोवतालच्या अडाणी व रानवट लोकांवर आपली हुकमत चालू करून, त्यांच्या फौजा बनवून त्यांनीं कार्थेज नांवाचें एक बलाढ्य राष्ट्र बनविलें. हळुहळू भूमध्यसमुद्राच्या दक्षिण- किनाऱ्याची सर्व पट्टी त्यांनी व्यापून टाकली व भूमध्य समुद्र म्हणजे केवळ त्यांच्या पायाखालची वाट असल्यामुळे त्यांतील बहुतेक सर्व बेटे त्यांनी हस्तगत केलीं. शेवटीं त्यांच्या राज्यविस्ताराची हद्द पसरतां पसरतां प्रसरणशील असें जें रोमन साम्राज्य त्याच्या शिवेशीं यांची शीव जाऊन भिडली व दोन बलिष्ठांच्या गांठी पडल्यावर जें व्हावयाचें तें सुरू झालें.
 या कार्थेजवाल्यांनी वीस मैलांच्या आवारभर आपलें शहर वसविलें होतें व भोवतालीं भल्या भक्कम भिंती घालून मधून मधून दांडगे बुरूज उभारलेले होते. यांच्या आंतल्या अंगाला हत्तींचे व घोड्यांचे तबेले असत. समुद्रकांठीं मोठ्या बंदराच्या पोटांत लहान बंदर अशी त्यांनी दोन बंदरें बनविली होतीं. शहरांतील मोठमोठाले उंच प्रासाद आणि देवळें बांधलेलीं होतीं. लांकडावर व निरनिराळ्या धातूंच्या पत्र्यांवर सुंदर नक्षीचें काम करून त्यांनी इमारतीस पराकाष्ठेची शोभा आणिली होती. जागोजाग सुंदर बागा, मनोरे, फुलांचे ताटवे, मधून मधून लाल फुलांनीं शोभिवंत दिसणारी हिरवळीची मैदानें, पोंवळीं पसरलेल्या बागांतील पायवाटा, सोनेरी वण उठलेल्या संगमरवरी दगडांचे सुंदर खांब व त्यांवर पसरलेले सुरम्य सौध, वर पोचावयास बांधलेले शिसवीचे काळेभोर जिने, भोंवतालचीं फळांनी लकटलेलीं अंजिरांची झाडे अशा एक ना दोन, वैभवाच्या आणि विलासाच्या हजारों खुणा त्यांच्या शहरभर पसरल्या होत्या; पण वैभवाच्या निशेंत या लोकांचें मन मात्र पांगुळलें नव्हतें.
 त्यांची राज्यघटना म्हणजे शहाण्यानें सांगावें आणि इतरे जनांनी ऐकावे अशा तऱ्हेची असून सुफेती नांवाचे दोन राजासारखे अधिकारी ते नेमीत. ज्यास आपण धर्म म्हणतों त्याची कल्पना त्यांस बेताचीच होती. कांहीं क्रूर व अक्राळविक्राळ देवतांची पूजा ते करीत व त्यांच्यापुढे माणसांचे बळी देत. पण ही गोष्ट कांहीं त्यांनाच लागू होती असें नाहीं. सुधारलेले म्हणून ठरलेल्या तेव्हांच्या रोमन लोकांतही असली बलिदानाची पद्धत चालू होतीच. साध्या पातकासाठींसुद्धां माणसाला सुळावर चढवीत. असो. राष्ट्राच्या रक्षणासाठी त्यांनीं एक फार मोठें आरमार तयार केलें होतें व त्याच्या बळावर सर्व समुद्रभर ते आपली सत्ता गाजवीत आणि रोमन लोकांस केवळ कःपदार्थ लेखीत.
 रोमन लोकांशीं कटकटी सुरू झाल्यावर ख्रिस्तपूर्व २६५ साली पहिलें प्यूनिक युद्ध सुरू झालें. प्यूनिक शब्दाची व्युत्पत्तीही मनोरम आहे. फिनिशिअन या शब्दापैकीं फिनि म्हणजे पिनि अथवा प्यूनि एवढाच शब्द रोमन लोकांनीं त्या लोकांचा वाचक म्हणून ध्यानांत ठेवला व त्यापासून प्यूनिक असें विशेषण बनविलें. हें युद्ध सिसिली बेटांत झालें. कार्थेजवाल्यांचा पराभव झाला. समुद्र ओलांडून रोमन लोक कार्थेजवर आले. कार्थेजवाले त्यांना इतके कमकुवत वाटले कीं, त्यांनीं आपली निम्मी फौज घरी पाठवून दिली. हें पाहतांच कार्थेजवाले जोरानें उलटले व त्यांनी रोमन लोकांचा फन्ना उडविला. अशी यशापयशाची देवघेव होतां होता हॅमिलकर बार्का, कीं जो एक सुफेती होता, त्यानें मोठा पराक्रम करून रोमन लोकांस सिसिली बेटांतून परत हांकून लाविलें. इतक्यांत खुद्द कार्थेज शहरांत बंडे उपस्थित झाली. भाडोत्री फौजा आपल्या पगाराच्या थकलेल्या बाक्यांसाठीं राजद्वारीं धरणें धरून बसल्या. शेवटीं कंटाळून हा शूर हॅमिलकर स्पेन देशास निघून गेला. तेथे एक "नवें कार्थेज" नांवाचें शहर आगाऊच स्थापन झालें होतें. हॅमिलकर याचा हेतु असा होता कीं, तेथें राहून स्पेनच्या द्वीपकल्पांत आपली सत्ता कायम करावी; व तेथून रोमन लोकांच्या सत्तेस शह द्यावा. या हॅमिलकरच्या मनांत रोमन लोकांबद्दलचा द्वेष इतका बाणला होता कीं, एके दिवशीं, त्यानें अग्नीस साक्षी ठेवून आपल्या दहा वर्षांच्या मुलाला म्हणजेच हॅनिबलला अशी शपथ घ्यावयाला लाविली कीं, "मी मरेपर्यंत रोमन लोकांचा द्वेषच करीत राहीन." हॅमिलकरच्याने पुढे फारसें कांहीं झालें नाहीं; पण बापाची इच्छा मुलानें तृप्त केली.
 हॅमिलकर वारला तेव्हां हॅनिबल लहान होता. म्हणून हॅमिल्करचा जांवई हॅज्ड्रूबल हा कारभार पाहूं लागला आणि स्पेन देशांत कार्थेजेनिअन लोकांचें सामर्थ्य वाढविण्याची त्यानें पराकाष्ठा केली. थोड्याच दिवसांनी हॅज्ड्रुबलचा खून झाला आणि आतां वयांत आलेला हॅनिबल सर्व कार्थेजेनिअन फौजांचा सेनापति व त्या राष्ट्राचा पुढारी बनला. दरम्यान कार्थेजमध्यें या उलाढाली चालू असतां तिकडे रोमन लोकांनीं चांगलें आरमार तयार केलें आणि आसपासच्या समुद्रांत आपलें वर्चस्व प्रस्थापित केलें. हॅज्ड्रुबल आणि हॅनिबल यांनी चालविलेलें स्पेन देशाचें आक्रमण रोमन लोकांस खपेना. म्हणून त्यांनी हॅनिबल यांस ताकीद दिली कीं, एब्रो नदीपर्यंतच तुम्हाला उत्तरेकडे पाय पसरावयास आम्ही परवानगी देऊ. तुम्ही पुढे सरकल्यास कामास पडणार नाहीं. हॅनिबलला त्यांचें मन पहावयाचें होतें. म्हणून त्यानें एब्रो नदीच्या दक्षिणेसच असलेल्या, पण रोमन लोकांना हवें असलेल्या सागंटम शहरावर हल्ला केला व तें शहर त्यानें काबीज केलें. रोमचें सरकार संतापून गेलें व त्यांनीं कार्थेजला वकील धाडून तेथील सरकारास चमकाविलें कीं, 'तुमच्या सेनापतीनें आमचा अपमान केला; याची भरपाई म्हणून त्यास तुम्हीं आमच्या हवालीं करावें'. कार्थेजेनिअन सेनेटपुढे हा फार मोठाच प्रश्न येऊन पडला. फेबिअस नांवाचा जो रोमन वकील आला होता त्यानें विचारिलें कीं, 'तुम्ही ही अट पत्करतां कीं युद्धास उभे राहतां? एक काय तें बोला'. त्यावर सेनेटनें उत्तर केलें 'तुम्हांस काय हवें तें तुम्हीच सांगा'. त्यावर फेबिअसनें आविर्भावानें दर्शविलें कीं, आपणास युद्धच हवें. रोमन लोकांचें युद्धाचे आव्हान वायां गेलें नाहीं. सर्व सभासद गर्जून ओरडले, 'बेहेत्तर! तुम्हांस युद्ध हवें तर आम्हीही युद्धच करतों'. याप्रमाणें युद्धाचें शिंग फुंकलें गेलें हें दुसरें प्यूनिक युद्ध होय. हॅनिबल यानें मोठी मसलत रचण्याचें ठरविलें. ज्यांना ज्यांना रोमन राष्ट्रानें दुखविलें होतें त्या त्या सर्व लोकांना एकत्र करून त्याने मोठी फौज उभारली. रोमचें राष्ट्र गारद करून टाकण्याचा बेत त्याने ठरविला. कोणास फारशी वार्ता लागू न देतां त्यानें एक लाख शिपाई जमविले, व नव्या कार्थेजहून उत्तरेकडे कूच केलें.
 स्पेन, फ्रान्स, स्वित्झर्लंड व इटली या चार देशांचा नकाशा वाचकांनीं आपल्या डोळ्यांपुढे नीट कल्पिला तरच त्यांस पुढील हकीगत सोपी वाटेल. इटली देशाच्या उत्तरेस आल्प्स् पर्वताचें प्रचंड धूड पडलें आहे. ज्या कोणास उत्तरेकडून खालीं इटलींत यावयाचें असेल त्याला शेंकडों दऱ्याखोरीं आणि घाट हीं उतरावी लागतात. स्पेनमधून चाल करून जावयाचें म्हणजे एक जहाजांतून भूमध्य- समुद्रावरून जावयाचें, किंवा दुसरें, उत्तरेकडे जाऊन, पिरनीज पर्वत ओलांडून, तेव्हांच्या गॉल देशांतून चाल करून, आल्प्स पर्वतांत शिरावयाचें व तेथून दक्षिणेस इटलीच्या मैदानांत उतरावयाचें. पैक हॅनिबल यानें हा दुसरा मार्ग कायम केला. वास्तविक दोनही मार्ग दुर्घटच होते. परंतु समुद्रावरील स्वारीची अटकळ कोणासही करतां येण्यासारखी होती. कारण तेव्हांसुद्धां मोठाल्या फौजांची समुद्रावरून ने-आण लोकांनी पाहिली होती. पण हा दुसरा मार्ग म्हणजे कोणाच्या ध्यानीं ना मनीं असा होता. जी गोष्ट सांगितली तरी सुध्दा खरी वाटणार नाहीं ती प्रत्यक्ष करून दाखविण्याची ईर्षा हॅनिबल यानें धरिली, व शेंकडों संकटांस न जुमानतां तडीस नेली यांतच त्याचें मोठेपण आहे. आतांप्रमाणें तेव्हां वहातुकीचीं व बातमीचीं साधनें सुलभ आणि सोयीचीं नव्हतीं. वाटेंत शेंकडों अरण्यें होतीं. या अरण्यांतून अनेक रानवट व क्रूर जाती दबा धरुन बसलेल्या असत. आल्प्स पर्वत तर अस्मान उंच आहे आणि त्यावर पडलेले बर्फाचे खच कधीं वितळल्याचेंही कोणास माहीत नाहीं. हॅनिबल, त्याचे शिपाई लोक, व बरोबरचे हत्तीघोडे यांना उन्हाची संवय होती; कारण ते भूमध्यसमुद्राच्या दक्षिणेस राहणारे होते. पण फ्रान्स किंवा आल्प्स यांतील थंडी त्यांना सहन होण्यासारखी नव्हती. एब्रो नदी ओलांडून पलीकडे जातांच मारामारी सुरू करणें त्यास भागच पडलें. कॅटॅलन लोकांशी त्याचा खडाजंगी सामना झाला व पिरनीज पर्वत मागे टाकून तेथून तो झपाट्याने ऱ्होण नदीच्या खोऱ्यांत उतरला. तेथें इतिहासप्रसिद्ध जे गॉल नांवाचे लांडग्यासारखे रानटी लोक त्यांच्याशी त्याची गांठ पडली. ते त्याला ऱ्होण नदी उतरूं देईनात; म्हणून तो नदीकाठानें थोडा वर सरकला व तेथील कांहीं रानटांस त्यानें चुचकारून वश करून घेतले व तो ऱ्होणपार झाला. नंतर आल्प्स पर्वतांतील वांकणें आणि आडवाटा माहित व्हाव्या म्हणून कित्येक माहितगार वाटाडे त्यानें बरोबर घेतले. हॅनिबल नेमका कोणच्या खिंडींतून आंत घुसला हें निश्चित सांगतां येत नाहीं; पण कोणाच्याही खिंडींतून गेला असे मानले तरी या साहसी कृत्याचा अचाटपणा यत्किंचितही कमी होत नाहीं. सहा महिने तर येथपर्यंत पोहचावयासच लागले. वाटेंत येतांना ज्या अनेक मारामाऱ्या कराव्या लागल्या व डोंगर, नद्या ओलांडाव्या लागल्या, त्यामुळे त्याच्या फौजा अगदी दमून गेल्या होत्या; त्यांतच आल्प्सच्या बारींतून आंत शिरतांच कोठें उंच सुळके भेटावे, कोठें खोल कड्यावरून रांगेनें जावें लागावें असें सुरू झालें. थंडीचा कडाका तर सपाटून पडला आणि ज्या डोंगरकरी लोकांना या हॅनिबलच्या स्वारीचा अर्थ कळेना ते त्याच्या फौजांच्या अंगावर मोठमोठाल्या शिळा खालीं लोटून देऊं लागले. कांहीं कांहीं ठिकाण तर सुरुंग लावूनच वाटा कराव्या लागल्या. स्वदेशाशीं कांहींतरी संबंध रहावा म्हणून सर्व वाटभर त्याला माणसें पेरीत पेरीतच पुढे जावें लागलें. त्यांतच थंडी इत्यादिकांची भर पडून इटलीच्या उतरणीला लागल्यावर मोजून पाहातां आपल्यापाशीं अवघे पंचवीस हजार लोकच शिल्लक आहेत असें त्यास दिसून आलें!
 येवढी मोठी एक लाख लोकांची फौज डोंगरामागें डोंगर, आणि देशामागें देश ओलांडून आठनऊ महिने घोंघावत चालली असतां तिकडे इटलीत तिची कुणकूण सुद्धां लागली नाहीं. प्रसिद्ध रोमन सेनापति सिपिओ यांस मात्र ऱ्होणच्या आसपास कांहीं थोडी गडबड असल्याची शंका आली होती. पण हॅनिबल हा आल्प्स पर्वतांतून खालीं उतरेल असें त्यांस केव्हांही वाटलें नाहीं. इतक्यांत तो इटलीत उतरल्याची वार्ता हां हां म्हणतां सर्वत्र पसरली. सिपिओ शत्रूशीं गांठ घालण्यासाठी परत वळला आणि मोठ्या झपाट्याने पो नदीच्या खोऱ्यांत दाखल झाला. दुसरा रोमन सेनापति सिप्रोनिअस् यानेही त्वरेनें उत्तरेकडे कूच केलें. मैदानांत उतरल्यावर हॅनिबललासुद्धा आपल्या सामर्थ्याची खरी बेरीज करता आली. दाणावैरण नीट न मिळाल्यामुळे फौजेंतलीं घोडीं अगदीं चोपून गेलीं होतीं. त्यानें शेंकडों हत्ती बरोबर आणिले होते, अशासाठीं कीं, रोमनांच्या फौजा नुसत्या तुडवूनच माराव्या. पण उष्ण मुलुखांतले हे विलासी गजराज आल्प्समधील थंडीच्या कडाक्यांत इतके गारठून गेले कीं, त्यांतल्या बहुतेकांनीं वाटेवरच देह ठेविले. पण हॅनिबल दम सोडणारा माणूस नव्हता. तसेंच तो नुसता आडदांड शूर नव्हता; तर त्याच्या स्वभावांत हुन्नरही पुष्कळ होता. आसपासच्या ज्या लोकांवर रोमनांनी आपले वर्चस्व स्थापिलें होतें त्यांच्यांत त्यानें प्रथम अस्वस्थता व मग फितुरी उत्पन्न केली. त्यांनी त्याला दाणागोटा, गवतकाडी हीं तर पुरविलींच; पण इतर दृष्टीनेही त्याचा उपराळा केला. सिपिओशी त्याचा पहिला खटका आतांच्या ट्यूरिन शहरापाशीं उडाला. त्यांत त्याच्या घोडेस्वारांनी सिपिओच्या फौजा उधळून लावल्या. खुद्द सिपिओस मोठी जखम लागली. मग सिपिओ आंवळून उभा राहिला. हेतु इतकाच कीं, हॅनिबलची दक्षिणेकडील वाट अडवावी. हॅनिबल समोरासमोर सामना करण्याची तयारी दाखवी, पण सिपिओ लढाई पत्करीना. इतक्यांत सिंप्रोनिअस दक्षिणेकडून रणभूमीवर येऊन दाखल झाला. त्याचा दम ताजा होता म्हणून नवीन पाडव्याच्या आधीं एक चांगली लढाई ठोकून दाखवावी असा मनसुबा करून तो हॅनिबलवर तुटून पडला. ट्रेबिआ नदीच्या काठावर आणि थंडीच्या कडाक्यांत हा झगडा सुरू झाला. हॅनिबल हे काय प्रकरण आहे हे या ठिकाणी रोमन लोकांच्या चांगलें चरचरून ध्यानांत भरलें. सिंप्रोनिअस् ची निम्मी फौज ठार झाली आणि जर का दिशा धुंद करणारें सोसाट्याचे वादळ उठून दिसेनासें झालें, तें झालें नसतें, तर एकही रोमन शिपाई जिवानिशीं सुटताना. आल्प्स पर्वतांतून एखाद्या लोंढ्याप्रमाणें तो खाली आला ही बातमी कळली तेव्हांच त्याच्या नांवाचा धाक रोमन लोकांस बसला होता. त्यापुढे दोघांही सेनापतींच्या वेगवेगळ्या झालेल्या पराभवाचें वर्तमान जेव्हां रोम शहरीं पोंचलें तेव्हां तर ते गडबडून गेले. हॅनिबलचें पाणी काय आहे हें पाहतांच बलिष्ठाशी मैत्री करावी म्हणून गॉल लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्या फौजेत येऊन दाखल झाल्या. त्यानें त्या सर्वांस चाकरीस ठेवून पन्नाससाठ हजार फौज उभी केली. पण इतकें झालें तरी तो धूर्तपणाने वागत होता. आपण शत्रूच्या देशांत आहों, स्वदेशाशीं आपला संबंध पूर्ण तुटला आहे, रसद मिळविणे कठीण होणार आहे, आणि येऊं म्हणालेले ग्रीक लोक मदतीस येण्याचे मुळींच चिन्ह दिसत नाहीं; या सर्व बाबी त्याच्या ध्यानांत होत्या. खुद्द कार्थेजहूनही कांहींच मदत येईना. बरोबरच्या आफ्रिकी शिपायांना थंडी सहन होईना. उरलेसुरले हत्ती पटापट मरूं लागले. नवीन ठेवलेले रानटी शिपाई शिस्त पाळीनात. पण इतके झाले तरी या हाडवैरी आणि आपल्या जिवावर उठलेल्या राष्ट्राचा नाश करू अशी त्यास पुरी धमक होती. थोडी दिवसगत झाल्यावर त्यानें पुन्हा नवीन फौज बनविली. लवकरच हुलकावणी दाखवून त्यानें प्लेमिनिअस या नव्या रोमन सेनापतीस आपल्या कैचींत आणिलें आणि जोराच्या लढाईला तोंड लागलें. उभयपक्षांकडील शिपाई इतके बेहोष होऊन लढले की, लढाई चालू असतां बसलेला धरणीकम्पाचा एक जबर धक्का या बहादुरांच्या ध्यानांतही आला नाहीं. रोमन लोकांनीं शर्थ केली. पण हॅनिबलने सर्व फौजेचे तुकडे तुकडे केले. हैं भयानक वर्तमान रोम शहरों पोहोंचतांच जिकडे तिकडे हलकल्लोळ उडाला.
 हॅनिबल शूर आणि हुन्नरी वीर खरा; पण रोम शहरही शूरांचीच खाण होतें. रोमन लोकांचा नवा सर्वसत्ताधिकारी क्विन्टस फेबिअस हा हॅनिबल यास तोंड देण्यास निघाला. ॲपिनाइन पर्वताच्या पश्चिमेस त्याला न येऊं देणें एवढेच काम त्याला प्रथम तरी करावयाचें होतें. त्यानें मैदानांत लढाईस उभे राहावे अशी हॅनिबलची फार इच्छा होती. पण फेबिअस कोठेंच लढाई पत्करीना. मात्र हनिबल जेथें जेथें जाई तेथें तेथें आजूबाजूस तो कोठें तरी त्यास पायबंद देऊन उभा राही. राजकारणांत स्पष्ट व कडक भाषा बोलणें धोक्याचे झाले म्हणजे ज्याप्रमाणे पुढाऱ्यांच्या भाषेत उपरोध उत्पन्न होतो, त्याप्रमाणेच समरांगणांत समोरून सामना करतां येईना, म्हणजे गनिमी कावा आपोआपच उत्पन्न होतो. फेबिअसने हॅनिबलला इतका त्रास दिला की, तो अगदीं चिडून गेला. हॅनिबलचें हें गंडांतर फेबअसनें कौशल्यानें थोपवून धरल्याने रोम शहरीं प्रथम प्रथम त्याची मोठी वाहवा झाली. पण त्याचा सावधपणा कधीं संपेचना व तो लढाई अशी कोठेंच करीना. लौकरच एमिलिअस आणि व्हॅरो हे दोघे नवे अधिकारी झाले. या दोघांनीं एक लाख फौज उभी केली आणि ते मोठ्या तडफेनें हॅनिबलवर चालून गेले. युद्धाच्या हालचाली सुरू झाल्यावर जरा सावधपणानेच वागले पाहिजे असें एमिलिअस ह्यास वाटू लागले; पण व्हॅरो मात्र केवळ आडदांडासारखा वागला. तेव्हांच्या चालीप्रमाणें हे दोघे एक दिवसाआड आलटून-पालटून सेनापतीपणा करीत. त्याचप्रमाणें आपली पाळी येतांच व्हॅरो हॅनिबलच्या अंगावर उसळून गेला. वास्तविक हॅनिबलच्या फौजेचे सध्यां हालच चाललेले होते. बोलूनचालून तो शत्रूच्या देशांत सांपडला होता; आणि त्याचा देश हजारों कोस दूर राहिला होता. पण सेनापतीचें चातुर्य, शिपायाची छाती, मुत्सद्दयाचे कसब आणि कार्यसाधकाचा सोशिकपणा हीं सर्व त्याजपाशीं होतीं. त्यानें व्हॅरो यांस चांगलें पुढें येऊं दिलें व लढाई पुरती अंगावर घेतली. क्षणभर रोमन लोकांना यशाचा देखावा दिसला. पण थोडयाच वेळांत रोमन फौजांच्या पिछाडीवर हॅनिबलच्या फौजेनें अचानक हल्ला चढविला. दोन्हीकडून कोंडमारा होतांच रोमनांची गाळण झाली. लढतां येईना आणि पळतां येईना अशी स्थिति झाली. हे शरण जाईनात व तो शरण येऊ देईना. पन्नास हजार रोमन शिपाई धारातीर्थी पतन पावले. आणि रोमन फौज साफ बुडाली. खुद्द एमिलिअस, त्याचा दुय्यम सर्व्हिलिअस, घोडदळाचा नायक मिनूलिअस, एकवीस बडे सरदार, व ऐशीं सेनेटर्स हे मृत्युमुखी पडले. रुपये आणि खुर्दा किती गमावला हें वर सांगितलेच आहे. खुद्द व्हॅरो मात्र पांचपन्नास स्वारांनिशीं पळून गेला. हॅनिबलने जी लूट जमा केलीं तींत एक पोतेंभर सोन्याच्या अंगठ्या होत्या! हॅनिबलच्या या तडाक्यामुळे रोमन लोकांची कंबरच मोडल्यासारखी झाली. या लढाईस कॅनीची लढाई असें म्हणतात.
 एवढा मोठा विजय मिळाला तरी अजून हॅनिबलची इच्छा तृप्त होण्याचा संभव दिसेना. तरी त्यानें घाट तर मोठा घातला. कॅनीच्या लढाईची वार्ता ऐकून कार्थेजच्या सरकारानें फौज, पैसा, आणि शेंकडों हत्ती ही त्याजकडे पाठविलीं. मॅसिडोन देशाचा राजा फिलिप यानेंही मदतीस येण्याचें कबूल केलें. रोमन लोकांचे दक्षिणेकडील साथीदार त्यांजपासून तुटून निघाले. या नव्या रणगाजीच्या फौजेंत दाखल होण्यासाठी आल्प्स पर्वतांतून हजारों जवान बाहेर पडले आणि त्यांना थोपविण्यासाठीं आड झालेली रोमन फौज त्यांनी कापून काढली. पण तिकडे रोमन लोकांनीं आतां एक नवीनच डाव आरंभिला व सिपिओ याच्या हातांत फौज देऊन त्यांनी ही लढाई हॅनिबलच्या देशांत नेऊन घातली. स्पेन आणि सार्डिनिआ इकडे फौजा पाठवून त्यांनी त्याचे प्रान्त उध्वस्त केले. परंतु काय होतें तें पहात बसण्यापलीकडे आणि फौजफांटा संभाळून राहाण्यापलीकडे हॅनिबलला कांहीं करतां येईना. रोमन लोकांनी तिकडे फिलिपलासुद्धां पायबंद दिला आणि कार्थेजहून नव्या नव्या येणाऱ्या फौजा स्पेनच्या रक्षणासाठी हॅनिबल यास तिकडे धाडाव्या लागल्या. म्हणजे असें कीं, बाहेरून मदतीचा सारखा ओघ राहीना. तरी रोमन राष्ट्र बुडविण्याची ईर्षा धरून हॅनिबल कांहीं वर्षे दक्षिण इटलीत तसाच बसला. दरम्यान अनेक रोमन सेनापति त्याजवर चालून आले; पण त्या सर्वांचा त्याने पराभव केला. इकडे स्वदेशांत शिरलेला हॅनिबल काय वाटेल तें केलें तरी आटपत नाहीं हें पाहून रोमन लोकांनी आपला सर्व मारा त्याच्या देशाकडे वळविला आणि हॅनिबलच्या ताब्यांतील सर्व स्पेन देश काबीज केला; इतकेंच नव्हे, तर त्याची राजधानी जी नवें कार्थेज तीसुद्धां त्यांनी हस्तगत केली. हॅनिबल यास हॅज्ड्रूबल नांवाचा एक भाऊ होता. सर्वनाश झालेला पाहून आतां आपल्या भावास तरी सोडवावें म्हणून सिपिओच्या डोळ्यांदेखत हॅज्ड्रूबल एका मोठया फौजेनिशीं पिरनीजमधून निसटला आणि हॅनिबल ज्या मार्गानें इटलीत घुसला, त्याच मार्गानें तो इटलीकडे निघाला. हा शूर शिपाई हॅनिबलच्या तळापासून दोनशे मैलांवर येऊन ठेपला. तेव्हां मात्र रोमन लोकांची पुन्हा तारांबळ झाली. सिपिओनें स्पेन इत्यादि पादाक्रान्त केलें हें सर्व खरें; पण हॅज्ड्रूबल त्याच्या हातांतून निसटून पोक्त सरंजामासह आपल्या भावास येऊन मिळू पहातो हें पाहून त्यांना भय उत्पन्न झालें. शेवटी रोमन सत्ताधारी नीरो यानें या दोघांची गांठ पडण्यापूर्वीच हॅज्ड्रुबलचा निकाल लावण्याचे ठरविलें व हॅनिबलच्या तोंडावर नेहमीप्रमाणें कांहीं फौज कायम ठेवून तो हॅज्ड्रुबलवर झपाट्यानें चालून गेला. मेटॉरस नदीच्या कांठीं त्यानें हॅज्ड्रुबलचा पराभव करून त्यास ठार मारिलें. तितक्याच त्वरेनें तो दक्षिणेकडे वळला आणि बरोबर कापून आणलेले हॅज्ड्रुबलचें शिर त्याने हॅनिबलच्या शिबिरांत फेंकून दिलें. भाऊ येत आहे हें पाहून हॅनिबल यास फार आशा वाटत होती; पण हें त्याचें शिर पाहतांच हॅनिबल अतिशय खिन्न झाला आणि आतां रोम आपल्या हातून मरत नाहीं अशी त्याची पूर्ण खात्री झाली. त्यानंतर दोन वर्षांनीं त्याचा दुसरा भाऊ मँगो हाही त्याच रस्त्यानें वडील भावास सोडविण्यासाठीं म्हणून इटलीत उतरला; पण त्याचीही तीच अवस्था झाली. अर्थात् आतां त्याचें सर्व घराणें या कामांत खलास झालें. बारा वर्षे झालीं, तो इटलींत बसलेला होता. खुद्द रोमन लोकांनाही फारच जिगजिग झाली होती. फौजांच्या सारख्या येरजारांमुळे जमिनीची पायमली होऊन लागवड होईना आणि देशांत सर्वत्र दुष्काळ पडूं लागले. या पेंचांतून बाहेर कसें पडावें हें यांस किंवा त्यांस कोणासच सुचेना. तिकडे सिपिओनें मात्र हाती घेतलेले काम चिकाटीने चालविलें होतें. स्पेन हस्तगत करून, म्हणजे हॅनिबलची आशा समूळ खणून काढून तो आफ्रिका- खंडांत उतरला; अशासाठीं कीं, खुद्द कार्थेज राजधानीवरच जावें आणि कार्थेजचें राष्ट्रच मारून टाकावें. हॅनिबलने जसे आल्प्समधील रानटे नोकरीला ठेवले, तसे सिपिओनें तिकडील न्यूमिडिअन लोक चाकरीस ठेवून कार्थेजच्या आसपास धुमाकूळ माजविला. कार्थेजचा खुद्द सेनापति इटलीत अडकलेला; आणि त्याचे भाऊही ठार झालेले. अर्थात् राजधानीतले लोक गडबडून गेले व त्यांनीं सिपिओशीं तहाचे बोलणें लावलें; पण तहाला रोम शहराहून परवानगी येईपर्यंत या लोकांस पुन्हा थोडी आशा वाटू लागली आणि त्यांनीं निकडीचीं पत्रे धाडून हॅनिबल यास परत बोलाविलें, वीस हजार फौजेनिशीं हा योद्धा मोठ्या नाखुषीने स्वदेशास परत आला. त्यानें रोम राष्ट्रावर जी आपत्ति आणिली होती तीच सिपिओने खुद्द त्याच्याच राजधानीवर आणिली; पण तो येऊन दाखल झाल्याबरोबर सिपिओ यास मोठा धाक वाटू लागला. शेवटीं थोडीशी तहाची वाटाघाट होऊन कांहीं जमत नाहींसें पाहून दोघांनीं युद्धाचाच विचार मुक्रर केला. ख्रिस्तपूर्व २०२ सालीं ही जगांतील सुप्रसिद्ध लढायांपैकी झामा गांवची लढाई झाली. दोघांनाही तिचें महत्त्व चांगले कळत असल्यामुळे फौजांनी प्राणांतक युद्ध केलें. शेवटीं हॅनिबलचा पराभव झाला व तो कार्थेजकडे पळाला. सिपिओनें तहाच्या अटी फारच कडक घातल्या. त्यानें कार्थेजला आपले मांडलिक बनविलें, आफ्रिकेत आपलें साम्राज्य कायम केलें, कार्थेजचें सर्व आरमार इटलीला नेलें, कार्थेजच्या सर्व वसाहती आपल्या ताब्यांत घेतल्या, आपणास विचारल्याशिवाय कार्थेजनें इतरांशीं तह किंवा लढाई करू नये असेंही त्याने ठरविलें आणि शेवटीं जबरदस्त खंडणी घेऊन मोठ्या विजयोत्साहाने हा रोमन वीर घरीं परत गेला.
 तेथून पुढे वीस वर्षे हॅनिबल स्वदेशांतच होता. वास्तविक पहातां त्याचें चरित्र येथेंच संपलें, त्याचा हेतु तडीस गेला नाहीं, तरी त्याची योग्यता कोणच्याही रीतीनें कमी होत नाही. इतर मोठमोठाल्या सेनापतींशीं इतिहासकारांनीं त्याची तुलना केली आहे. कारण थोर सेनापतीचे सर्व गुण त्याचे अंगीं होते. त्याची हुकमत मोठी कडक असे; पण वरिष्ठांचे हुकूमही तो तितक्याच सक्तीने पाळी. अर्थात् फौजेवर त्याची मोठी कदर असे. लहानपणीं सुद्धां कोणचेही साहसाचें आणि कष्टाचे काम निघालें म्हणजे त्याच्या मेहुण्यानें त्यास हांक मारावी असा शिरस्ता होता. स्वतः विलक्षण धाडसी असल्यामुळे शिपायांचा त्याच्यावर फार विश्वास असे. संकटांत उडी घालण्यास तो भीत नसे, व संकटांत सांपडला असतां मन व बुद्धि केवळ शांत ठेवी. त्याचे मन व शरीर श्रमाला कधीही कंटाळत नसत. त्याला कधीं उन्हाळा बाधला नाहीं कीं थंडीनें हींव भरलें नाहीं. पानावर बसला म्हणजे भूक असेल तेवढेच खावें असा त्याचा शिरस्ता असे. त्याची निजण्याची वेळ मात्र केव्हांच ठरलेली नसे. रात्र झाली म्हणजे निजावयाचें, हा जो आपला नियम तो त्याला लागू नव्हता. काम संपलें म्हणजे मग तेव्हांपासून तो झोप घेई. मग दिवस असो कीं रात्र असो. गाद्यागिरद्या अंथरून व निर्मक्षिक करून निजावयाची चाल आहे; पण त्याला वाटेल तसल्या कल्ल्यांत व उघड्या मैदानावर झोप येत असे. अंगावरचा सरकोट एकदां तोंडावरून घेतला म्हणजे तो वाटेल तेथें डारडूर निजत असे. कपड्यालत्त्याचा त्याला मुळींच शोक नसे; पण बसावयाचा घोडा आणि हातांतील समशेर यांविषयीं मात्र तो फार खाराखिरी करो. रणांत शिरतांना पाऊल सर्वांच्या पुढे, आणि बाहेर पडतांना मात्र सर्वांच्या मागें अशी त्याची पद्धत होती. पण शत्रूंनीं लिहिलेल्या त्याच्या चरित्रावरून पहातां तो मोठ्या उरफाट्या काळजाचा, शपथा मोडणारा आणि देवाधर्माला न जुमानणारा असा होता. सुप्रसिद्ध फ्रेंच बादशहा नेपोलिअन याच्याशीं त्याची तुलना करण्यांत येते. आपल्या राष्ट्रासाठीं आरंभिलेल्या झगड्यांत दोघेही जन्मभर राबले; दोघांनाही सर्व- राष्ट्रसंघाशी लढावें लागलें. दोघांचाही पराभव केवळ एका लढाईंत झाला व तीच त्या दोघांचीही शेवटची लढाई ठरली. दोघांनाही विपरीत परिस्थितींत शेवटच्या लढाईंत लढावें लागलें आणि दोघांचेही पराभव त्यांच्याहून सर्वथा कमी दर्जाच्या सेनापतींकडून झाले. वेलिंग्टन आणि वाटर्लू ही जशीं नेपोलिअनला तशीं सिपिओ आणि झामा हीं हॅनिबल यास होत. दोघांनीही इटलीच्या मैदानांतच पहिल्यानें लष्करी कीर्ति मिळविली. दोघांनीही आल्प्स पर्वताच्या बरगड्या फोडून सृष्टीस तिरस्कारानें झिडकारिलें. दोघेही आपल्या फौजेस सारखेच आवडते असत. दोघेही नुसते वांझे सेनापतिच नव्हते, तर मुत्सद्दीही होते. नेपोलिअननें ज्याप्रमाणें फ्रान्सांतलें अराजक मोडून सुयन्त्र राज्यपद्धति स्थापन केली त्याप्रमाणेंच हॅनिबलनेही पदरीं अपेश आलें असतांही मरत असलेल्या कार्थिजेनिअन राष्ट्रांत नवें वारें भरलें.
 कार्थिजेनिअन राष्ट्र केवळ मांडलिक कसें बनलें हें वर सांगितलेंच आहे. हॅनिबल आतां केवळ निर्माल्यवत् होऊन बसला. पण त्याचें मन विलक्षण महत्त्वाकांक्षी, बुद्धि तीव्र, आणि स्वभाव आशावादी होता. तो जिकडे पाही तिकडे सर्व पडापड झालेली त्याला दिसे. त्याच्या भोवतालची सर्व माणसें दुबळीं व मेंगीं आहेत असें त्यास वाटे. नवीन पोरेंसोरें काय करतील हे त्याच्या अजून ध्यानीं आलें नव्हते; परंतु 'चेंडू पडे आणि उठे तसाची' या न्यायास अनुसरून त्यानें स्वतःची निराशा झिंजाडून दिली. आणि तरुण पिढीस स्वदेश- भक्तीचा मंत्र तो देऊं लागला. आपल्या राष्ट्राचे पुनरुज्जीवन करावें, लोकांत नवा उत्साह उत्पन्न करावा, आपलें पूर्वीचें राष्ट्र कसे होतें याचे स्मरण त्यांना द्यावें व नेट धरून पुन्हा रोमन लोकांशीं गांठ घालावी ही खोल आकांक्षा त्यानें बाळगिली होती. आपण गप्प बसलों तर हें राष्ट्र रसातळास जाणार आणि जुन्या फिनिशिअन वंशाने प्रस्थापित केलेल्या एका प्रचंड राष्ट्राचा रोमन लोक पृथ्वीवरून निःपात करणार याचे स्वप्न त्यास खास पडलें असावें. म्हणून कुळांत अतिशय मरामर झाल्यावरसुद्धां उरल्यासुरल्या मुलांना हाताशीं धरून जसा एखादा कर्तबगार म्हातारा त्यांना शहाणे करतो आणि त्यांच्या मनांत नवीन वासना उद्दीपित करतो तसा शेकडों यशाची उंच उंच शिखरें मागें टाकून कोठें तरी खबदाडांत सांपडलेला हा स्वदेशभक्त वीरमणि नव्या पिढीला आपला मंत्र देऊ लागला. रोमन लोक त्याच्या राष्ट्रावर उठलेले होते म्हणून तर त्याच्या बापानें फार लहानपणी त्याला रोमनद्वेषाची शपथ दिली होती. तो एक विचाराचा बाण त्याच्या मनांत सारखा रुतून बसला होता. आणि परिस्थितीचे फेरे कसेही फिरले तरी बापाचा मंत्र तो स्वतः कधीं विसरला नाहीं; किंबहुना तेंच त्याच्या जीविताचें सूत्र होतें असें म्हणावयास हरकत नाहीं. ही त्याची नवी शिकवण नवीन पोरांच्या मनांत बळ धरूं लागली आणि कार्थेजमध्ये नव्या पिढीचा चांगला जम बसेल अशीं स्पष्ट चिन्हे दिसूं लागली. हॅनिबलच्या करपलेल्या आशेलासुद्धां पुन्हा अंकुर फुटूं लागले; पण सर्व जगावर साम्राज्य स्थापण्यास निघालेले रोमन लोक हॅनिबलची ही पाताळयंत्री शिकवण न्यहाळून पहात होते. हा एक नवीन राष्ट्र बनविणार हे त्यांस स्पष्ट दिसताच त्यांनी कार्थेज संस्थानास एकदम कळविलें कीं, हॅनिबल यास हद्दपार करावें, राजधानीत व दरबारांत बरीच भवति न भवति झाली. कोणी म्हणत, 'हॅनिबलबरोबर आम्ही सर्व मरूं!' कोणी म्हणत, 'एकामुळे सर्वांवर मरण आणूं नका!' अशा दुग्ध्यांत कांहीं वेळ गेल्यावर हॅनिबल स्वतःच स्वदेश सोडून निघून गेला. त्याचें जाणें म्हणजे कुडींतून प्राण जाण्यासारखेंच होतें. हॅनिबल गेला तरी लांब जाऊन तो तेथून कांहीतरी तेज उत्पन्न करील आणि रोमन लोकांच्या राज्य-विस्ताराला मारक होईल म्हणून ही उरलेली कुडीच जाळून टाकली पाहिजे असा आग्रह रोमन वक्ते धरून बसले. कार्थेज मारलेच पाहिजे हें पालुपद केटो नांवाचा सेनेटर आपल्या म्हातारपणी सारखे घोळीत बसला होता. शेवटी रोमन लोकांनीं स्वारी करून जाळपोळ करून कार्थेज शहर खणून काढलें. शहरांतील लोकांनी स्वार्थत्यागाची पराकाष्ठा केली. वाक नव्हता म्हणून, स्त्रियांनीं आपले केस कापून, त्यांचे दोर बनविले व तोफांचे गाडे ओढले. पण कार्थेज 'मारलेच पाहिजे' हे वाक्य रोमन विसरले नाहींत आणि त्यांनीं कार्थेजच्या साध्या खुणासुद्धां भुईच्या पाठीवर शिल्लक राहू दिल्या नाहीत!
 अर्थात् ही गोष्ट हॅनिबल मेल्यावर कांहीं वर्षांनी झाली; पण हें घडून येणार हे त्यानें ओळखिलेंच होतें. हद्दपारींत केवळ माशा मारीत बसावें ही गोष्ट त्यास पसंत पडण्यासारखी नव्हती. तो आश्रयासाठीं ग्रीस देशांत गेला आणि रोमन राष्ट्रावर तेथून कांहीं उठावणी करितां येते का हें पाहूं लागला. पण तेथील राजास रोमन लोकांनी चाप लावल्यावरून हॅनिबल आशिया मायनरमध्ये गेला व तेथील राजा अन्टिओकस याच्या पदरीं कांहीं दिवस राहिला. तो तिकडे असतांनाच त्याजवर विजय मिळविणारा जो सिपिओ ऑफ्रिकॅनस यालाही कृतन्न रोमन राष्ट्रानें हद्दपारीची शिक्षा सांगितली होती सिपिओ हद्दपारींत असतां त्यानें हॅनिबलची गांठ घेतली. उभयतां योद्धे बोलत बसले असतांना सिपिओनें विचारलें, "आजपर्यंत सर्वांत मोठे रणधुरंधर कोण झाले असे आपणांस वाटतें?" हॅनिबल थोडा मर्यादेनें म्हणाला, "अलेक्झॅन्डर, पीऱ्हस व तुम्ही स्वतः." त्यावर सिपिओनें विचारलें, "झामाच्या लढाईंत जर तुम्हीं मला जिंकलें असतें तर?" हॅनिबल म्हणाला, "तर अलेक्झॅन्डर, पीऱ्हस आणि जे कोणी असतील नसतील ते, या सर्वांहून मी मोठा ठरलो असतो." युद्धविशारदांचें हेंच मत आहे असो. ॲन्टिओकसला रोमन सरकाराकडून खडसावण्यांत आलें कीं, 'हॅनिबल यास आपल्या पदरीं आश्रय मिळतां कामा नये' अर्थात् हॅनिबल तेथूनही पळाला व पूर्वेकडे बिथिनिअसच्या राजाकडे आश्रय मागू लागला. पण त्यास नाहींसें केल्याशिवाय रोमन लोकांना हायसें होणें शक्य नव्हतें. म्हणून त्यांचा ससेमिरा तेथील राजाच्या दरबारासही पोहोंचला. याप्रमाणें आपलें बलाढ्य राष्ट्र डोळ्यांदेखत मरत चाललेले पाहून, आपणास पृथ्वीच्या पाठीवर आतां कोठेंही आश्रय उरलेला नाहीं हें ओळखून आणि म्हणून निर्माल्यवत् जगण्यांत कांहीं भूषण नाहीं असें वाटून ख्रिस्तपूर्व १८२ साली या थोर पुरुषाने विषप्राशन करून आत्महत्त्या केली.