पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ/शिकंदर
Appearance
पु रु ष श्रे ष्ठ
शिकंदर
इसवी सनापूर्वी ३५६ व्या वर्षी मॅसिडोनियातील पेला नावाच्या राजधानीच्या शहरीं शिकंदर याचा जन्म झाला. एकीकडून हर्क्यूलस व दुसरीकडून ऍकिला अशा शूर पुराणपुरुषांच्या कुळांत शिकंदर निपजला! खुद्द त्याचा बाप जो फिलिप तोही मोठा मसलती, साहसी व महत्त्वाकांक्षी असे. त्याचें राज्य म्हणजे डोंगरकठडीचा एक लहानसा टापू होता. पण फिलिपनें त्याचें मोठें राष्ट्र बनविलें. वास्तविक पाहातां फिलिपनें तें पहिलें लहानसें राज्यसुद्धां बळकाविलेलेंच होतें. पण तो येवढ्यावर थांबला नाहीं. कवाइती फौजेचें बळ काय असतें हें त्यानें ओळखलें होतें. आणि म्हणून हजारों जवान त्यानें आपल्या फौजेंत दाखल करून त्यांस कवाइत शिकवून भोवतालच्या लोकांच्या मुलुखांत पुंडावा मांडिला. होतां होतां त्याचें बळ इतकें वाढलें कीं, त्या लहान लहान ग्रीक संस्थानांनी त्याला मोठेपण देऊन आपल्या तोलाचा म्हणून कबूल केलें. दरम्यान उपस्थित झालेल्या शत्रूंवर धाडावयास हाच योग्य आहे असें पाहून त्यांनी त्याचीच योजना केली. त्यानेही होय म्हणून आपला उपयोग होऊं दिला. कारण त्यालाही आपले महत्त्व वाढवावयास हवेंच होते. त्याचें प्रस्थ माजूं देऊं नये म्हणून थीब्ज व अथेन्स येथील लोकांनी त्याच्याशी युद्ध सुरू केलें. पण फिलिपनें या दोघांही लोकांच्या फौजांचा शिरोनिया गांवीं सडकून पराभव केला. अर्थात् जे लोक अनुकूल होते ते होतेच; व जे प्रतिकूल होते ते पराभूत झाले. याप्रमाणें फिलिपचा जम उत्तमच बसला. पराभूत शत्रूंना त्यानें फार उदारपणानें वागविलें. लवकरच सर्व ग्रीक संस्थांची परिषद् भरली व तेथे सर्वानुमतें फिलिप याची "ग्रीस देशाचा सेनापति" म्हणून निवड झाली. लवकरच ग्रीक लोकांचें पर्शियन लोकांशी झुंज सुरू होणार होतें; त्याचें पुढारीपण घेण्याचीही त्याने तयारी दाखविली. पण इतक्यांत या हव्यासी व शूर शिपायाचा खून झाला आणि मोठा जेता होण्याची त्याची मनीषा तशीच राहून गेली.पण जें त्याला साधलें नाहीं तें त्याच्या मुलानें करून दाखविलें. शिकंदर लहानपणापासूनच मोठा तेजस्वी होता. आपल्या पाणीदार मुलाकडे पाहून फिलिपला मोठे समाधान वाटे. त्यानें त्याच्या शिक्षणाची फार उत्तम व्यवस्था केली होती. शिक्षकांनींही या वांड मुलाला शिस्त लावण्याची पराकाष्ठा केली. पण रोजच्या रोज बापाच्या पराक्रमाचीं वर्तमानें घरीं येत असल्यामुळें मुलाचें लक्ष मात्र अभ्यासापेक्षां युद्ध विषयाकडेच जास्त लागे. आपण बापासारखे कधीं होऊं असें त्यास होऊन जात असे. फिलिपनें नित्य नवीन विजय मिळवून आज हा परगणा, उद्यां तो परगणा जिंकल्याच्या कथा त्याने ऐकल्या म्हणजे हा अल्पवयी शिपाई म्हणे कीं, "मला हे कांहीं राहूं देणार कीं नाहीं? का आपणच सगळे जग जिंकून टाकणार?" पण ही त्याची चुळबूळ चालू असतांना शिक्षणाचा असा कांहीं क्रम चालूच होता. खुद ॲरिस्टॉटल हा त्याच्या अध्यापकांपैकी एक होता! होमरचें महाकाव्य या गुरूनेच शिकंदरास शिकविलें; पण गुरु कितीही मोठे असले आणि शिकवावयाचीं पुस्तकें फार नामी असली तरी शिष्य हा हटकून अभ्यासी असतो असें थोडेंच आहे! शिकंदरचें लक्ष वर सांगितल्या
पण हा बापलेकांच्या नात्याचा जम विसकटण्याचा प्रसंग लवकरच आला. फिलिप हा एरवी ठीक होता; पण बायका किती कराव्या याचा त्याला फारसा विधिनिषेध नव्हता. कोठें स्वारीवर फिरत असतां त्यानें क्लेओपाट्रा नांवाच्या एका रूपवती स्त्रीस झनानखान्यांत आणून ठेविलें. इजिप्तची राणी जी क्लेओपाट्रा ती ही नव्हे. ही झनान्यांत आल्याबरोबर शिकंदरची आई जी ऑलिंपिया तिच्या अंगाचा संताप झाला. मुलगाही आतां कांहीं लहान नव्हता. बापाने आपल्या आईला ही सवत करून आणली ही गोष्ट त्याच्या मनाला फार लागून राहिली. थोड्याच दिवसांत बातम्या उठू लागल्या कीं, या नव्या पट्टराणीच्या मुलाला गादी मिळावयाची आहे! लवकरच शिकंदरच्या बहिणीचे लग्न निघालें. ऑलिंपियेच्या माहेरचाच कोणी नवरदेव होता. सगळे वऱ्हाडी जमून लग्नाचे सोहाळे चालू असतां कोणा पोसेनिया नांवाच्या इसमानें एकाएकीं फिलिपच्या अंगांत खंजीर खुपसला. फिलिप ताबडतोब गतप्राण होऊन पडला. कोणी म्हणतात, फिलिपची व त्याची कांहीं खाजगी अदावत होती; पण दुसरे कोणी म्हणतात कीं, ऑलिंपिया व शिकंदर यांनींच त्या खुनी माणसाला चिथावणी देऊन फिलिपचा खून घडवून आणिला. खरें काय याचा निकाल अर्थातच होण्यासारखा नाहीं. पण इतकें खरें कीं, यामुळे शिकंदर राज्याचा मालक झाला.
हा नवा राजा केवळ वीस वर्षांचा म्हणजे पोरसवदाच होता. लहानपणींसुद्धां जरी त्यानें पराक्रम दाखविला होता, तरी याच्या अंगी आटोप असेल व हा बापाचें राज्य आवरूं शकेल असें कोणास वाटत नव्हतें. लोकांस वाटलें बाप पाठीवर होता म्हणून याने थोडी टुरटूर केली; आतां उघडा पडल्यावर याच्या हातून काय होणार? म्हणून तो गादीवर येतांच बंडखोरांनीं आणि फिलिपनें ज्यांना दुखविलें होतें त्यांनीं माना वर केल्या. तसेंच गादीवर वारसा सांगणारेही कित्येक राजपुत्र उपस्थित झाले. शिकंदरच्या बापानें तरी गादी बळकावलेलीच असल्यामुळे हे नवे वारस उपस्थित होणें साहजिक होतें. शिकंदरनें प्रथम या हक्कदारांची वासलात लाविली. कोणास कैद केलें व कोणास अजिबातच नाहींसें केलें. नंतर तो बंडखोरांकडे वळला. पहिल्या सपाट्याला कॉरिंथ शहरला जाऊन या सर्वांकडून बापाची "ग्रीसचा सेनापति" ही पदवी आपल्याला घेतली; व मग तो उत्तरेकडे निघाला. एकामागून एक अशा अनेक पुंड जमाती त्यानें खिळखिळ्या करून टाकल्या. त्यांची रग साफ नाहींशी करून तो तसाच पुढे चालला; तों जातां जातां डॅन्यूब नदीपर्यंत सर्व मुलूख त्यानें पादाक्रान्त केला. या त्याच्या तडफेमुळे तिकडील बाजूला त्याचा विलक्षण वचक बसला. पण मुख्य राजधानीपासून कित्येक दिवस तो दूर राहिल्यामुळे तो मेला अशा कंड्या इकडे त्याच्या वैऱ्यांनीं उठविल्या. कारण त्यांना तो मरावयासच हवा होता. अथेन्स शहरांत डेमॉस्थिनीस यानें वक्तृत्वाचा सपाटा चालू ठेविला आणि या पोराला चिरडून टाकून आपले स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित करा असा सारखा घोष त्याने चालविला. थीब्ज शहरही पुन्हा उसळून उठले व तेथील लोकांनीं त्याच्या शिपाईप्याद्यांची कत्तल उडविली. ह्रीं वर्तमानें हळुहळू डॅन्यूब नदीवर जाऊन पोंचलीं. शिकंदरच्या ध्यानांत आलें कीं, येतां येतां आपण फारच दूर आलों. त्यानें लगेच परत कूच म्हणून नगारे केले आणि मजल दरमजल अवघ्या पंधरा दिवसांत तो थीब्ज शहराच्या दाराशीं येऊन थडकला. तो मेल्याच्या कथा खुळ्या लोकांनीं खऱ्या मानिल्या होत्या व शहाण्यांनीं असें ठरविलें होतें कीं, तो आला तरी वर्ष सहा महिन्यांत येत नाहीं. पण त्याच्या फौजेच्या गर्जना जेव्हां त्यांनीं शहरापलीकडेच उठलेल्या ऐकिल्या, तेव्हां त्यांची गाळण झाली. शिकंदरही थोड्या विचारानेंच वागला. त्याने लोकांस कळविलें कीं, अपराध कबूल करा व शरण या. जर आलांत तर तुमच्या जिवास धक्का नाहीं; पण त्यांना वाईट विचार आठवला आणि वाट न पाहातां त्यांनीं आपण होऊनच त्याजवर हल्ला चढविला. शिकंदरच्या भालाईत शिपायांनीं या लोकांना आपल्यासमोर क्षणभरही ठरूं दिलें नाहीं. हजारों प्रेतें आपल्या पायाशीं पाडीत हे भालाईत नगरच्या वेशीकडे चालले होते. पाठीवर शिकंदर स्वतः आरोळ्या ठोकीत चालला होता. वेस भंगली आणि हे योध्दे गांवांत शिरले. रस्त्यारस्त्यांतून कचाकची चालू झाली आणि सहा हजार थीबियन शिपाई कामास आले. शिकंदरही अगदीं बेभान होऊन गेला होता. त्याला रक्तपाताची धुंदी चढली. त्यानें हुकूम केला कीं, सगळा गांव, घर ना घर, खणून काढा. पण निशेतही एक उदारपणाची गोष्ट त्यानें केली. महाकवि जो पिंडार त्याच्या वंशजांचें घर मात्र त्यानें वगळले. उपाध्ये, पिंडार कवीचे वंशज व आपल्या बाजूचे लोक इतके सोडून बाकीचे तीस हजार लोक शिकंदरनें गुलाम म्हणून विकले. याप्रमाणे शत्रूंच्या या शहराचा त्यानें निःपात करून टाकला. हा कडाका पाहतांच अथीनियन लोकांनीं नमतें घेतलें, कॉरिंथ शहरी पुन्हा परिषद भरवून त्यास "ग्रीसचा सेनापति" हीपदवी त्यांनी अर्पण केली व नवीन उत्पन्न झालेल्या पर्शियन शत्रूशीं टक्कर देण्याची तयारी आपणच करावी असेंही त्यांस विनविलें.
याप्रमाणें खुद्द ग्रीस निष्कंटक करून टाकल्यावर पर्शियाच्या साम्राज्यसत्तेवर आघात करण्याचे त्याने ठाम ठरविले. हें साम्राज्य फार अवाढव्य होतें. सध्यांचा एशियामायनर, ईजिप्त, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, मध्य एशियाचा कांहीं भाग येवढ्या मुलुखावर हे साम्राज्य विस्तारलेलें होतें. व हळुहळू हे सर्वभक्षक राज्य युरोपांत शिरून मॅसिडोनिया, ग्रीस इत्यादींचा ग्रास करील कीं काय, अशी भीति उत्पन्न झाली होती. दारियस हा सम्राट् पांच कोट प्रजेवर राज्य करीत होता! त्याचा दरबार मोठा भव्य असून साम्राज्य- वैभवाच्या सर्व खुणा तेथें दिसत असत. मोठमोठीं सुशोभित शहरें आणि कलाकौशल्याचीं आगरें सर्व साम्राज्यभर पसरलेलीं होतीं आणि प्रसंगच पडला तर दहापांच लाख फौज उभी करून संभाळणे ही गोष्ट त्याला सहजसाध्य होती. भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्यावर त्यानें थोडें आरमारही ठेविलें होतें. अशा या बलाढ्य सत्तेशीं शिकंदरला झुंजावयाचें होतें. दीडदोन वर्षे तयारी चालू होती. मधून मधून तो साधुसंतांचे आशीर्वाद घेण्यासाठीं आणि देवदर्शनासाठी इकडे तिकडे हिंडत असे. एकदां कॉरिंथ येथील प्रसिद्ध तापसी जो डायोजिनीस त्याच्या दर्शनासाठीं तो गेला. वेळ सकाळची होती, म्हणून तो तापसी ऊन खात बसला होता. हे शिकंदरच्या ध्यानांत न आल्यामुळे तो त्याचें ऊन धरूनच उभा राहिला व नम्रपणाने म्हणाला, "साधुमहाराजांचें मीं काय बरें करावें?" तो निस्पृह विरागी तुसड आवाजाने म्हणाला, "तेवढा उन्हांतून दूर हो म्हणजे झालें!" हा त्या तापशाचा निस्पृहपणा पाहून अलेक्झँडर मनांत ओशाळला. कां कीं, आपल्यासारखा एवढा राजा समोर उभा असतां हा बैरागी कांहीं आशा दाखवील असें त्यास वाटलें होतें. त्यानें तसें तर कांहीं केले नाहीच; पण आशा दाखविण्याच्या मिषाने त्याच्या तारतम्य-शून्यतेवर मात्र त्यानें टीका केली. पण शिकंदर रसिक होता. भोंवतालच्या लोकांकडे पाहून तो लागलीच उद्गारला, "मी जर शिकंदर नसतों तर डायोजिनीस होणेंच मला आवडलें असतें!" तेथून पुढें तो डेल्फी येथील मंदिराकडे गेला. तेथील पुजारी जोगतीण खरें भाकित करते असा प्रवाद होता. बराच वेळ ती कांहींच बोलेना. शेवटीं शिकंदर खिजला आणि त्यानें त्या जोगतिणीला फरपटत बाहेर आणिलें व विचारलें, "मी स्वारीवर निघणार आहें, काय होईल, बोल!" ती झटकन् उद्गारली, "तूं अजिंक्य आहेस!" राजालाही येवढे पुरेंसें होतें. तोच शकुन मानून तो परत फिरला व फौजेंत दाखल झाला. आपण यश घेऊन परत येणार ही त्याची बालंबाल खात्री होती. अँटिपेटर या नांवाच्या एका वयस्क व अनुभवी माणसास त्याने घरचा कारभार सांगितला व ऑलिंपियेची मर्जी राखून असत जा म्हणूनही बजाविलें. जवळ काय होतें तें त्यानें सर्व मित्रगणास देऊन टाकलें व "तुम्हीं आपल्याला काय ठेविलें आहे?" म्हणून कोणी विचारतांच त्यानें उत्तर केलें कीं, "मीं स्वतःसाठी फक्त 'आशा' शिल्लक ठेविली आहे!"
शिकंदरच्या चरित्रांतील फार मनोरंजक भाग येथून सुरू होतो. या वेळी तो अवघा बावीस वर्षांचा होता. तेवढ्यांतच स्वतःच्या देशांत तो अजिंक्य ठरला होता. पण आतां फार प्रचंड कामगिरी त्याच्या शिरावर येऊन पडली होती. पर्शियन साम्राज्य कधीं कासवाच्या तर कधीं सशाच्या पायानें पुढे पुढे येत होतें. त्यास थोपवून धरणें व जमल्यास त्याच्या लाटा परत वळविणें हें काम त्यास करावयाचें होतें. सर्व जमवाजमव होतांच त्यानें समुद्रकांठानें हेलेस्पांटच्या सामुद्रधुनीकडे कूच केलें. जेथें जावें तेथील लोकांना बरें वाटेल असें कांहीं कांहीं कराण्याचा त्याने प्रघात ठेविला होता. वाटेंत तें उध्वस्त झालेले ट्रॉय शहर लागलें. शिकंदरनें तेथें थोडा मुक्काम केला; कांहीं देवदेवतार्चन केलें, आक्किलाचें श्राद्ध केलें आणि त्या ओसाड नगरीचे पुनरुज्जीवन करावें असा हुकूम केला. यामुळे भोवतालच्या ग्रीक लोकांना फार हर्ष झाला. तेथून पुढे कूच करून तो ग्रॅनिकस नदीवर येऊन दाखल झाला. या ठिकाणीं पर्शियन फौजेशी त्याची पहिली चकमक झडली. उंच दरड पुढे ठेवून पर्शियन फौजा नदीच्या पलीकडे उभ्या होत्या. शिकंदरनें नदी उतरावयाचा बेत करून पाण्यांत घोडी घालण्याचा हुकूम केला. हें काम थोडें साहसाचेंच होतें. पलीकडे पोंचतांच निसरड्या दरडीवर त्याच्या घोडेस्वारांची थोडी कुचंबणा झाली. शिकंदर त्वेषानें पुढे शिरला आणि त्यानें पर्शियनांच्या मध्यावर हल्ला चढविला. चकमकींत त्याच्या चिलखतावर व शुभ्र तुऱ्यावर नेम धरून एका शत्रूने तलवार उगारिली. थोड्यांत चुकलें, नाहींतर येथेंच सर्व संपावयाचें. पण शिकंदरच्या मागे त्याचा मित्र क्लायटस उभा होता; त्यानें त्या शत्रूचा वर उगारलेला हात वरच्यावरच कापून टाकला. त्याची ही तुरमुंडी शत्रूंना आवरेना; ते मागें खचूं लागले. मध्यफौजा हटल्याशा पाहून बगलांनीही पळ काढला. आणि ही लहानशी लढाई गमावून पर्शियन सेनापति झपाट्याने निघून गेले. लढाई लहान खरी; पण शिकंदरला तिचें महत्त्व फार होतें. हीच लढाई जर का तो हरता तर त्याच्याविरुद्ध काहूर उठवावयास घरीं कांहीं लोक सिद्धच होते. पण या विजयामुळे त्या सर्वांची तोंडें बंद झाली. शेंकडों कैदी व इतर लुटीचें सामान त्याने घरी पाठविलें व ज्या अथीनियन लोकांची त्याच्याविरुद्ध सारखी कुरकूर असे त्यांची समजूत करण्यासाठीं लुटीपैकीं तीनशें चांगलीं चांगलीं चिलखतें त्यानें अथेन्सला पाठवून दिली. या एका झुंजीनें बरेंच काम केलें. आशियामायनरचा पश्चिमभाग अगदीं मोकळा झाला. पुढे पूर्वेकडे सरून त्यानें बारीकसारीक शहरें काबीज केलीं व अनेक रानवट लोकांच्या विरोधाची पर्वा न करतां तो गॉर्डिअम गांवीं प्राप्त झाला. शिकंदरला शकुन, भाकितें, नवस- सायास इत्यादींचें बरेंच वेड होतें असें दिसतें. या गांवांत एका देवळापुढे एक गाडा होता; त्याच्या धुरीला एक गवताचा दोर अशा खुबीने बांधलेला होता कीं, त्याची गांठ कोठेही दिसत नसे. देऊळवाल्यांनी याच गोष्टीचें मोठें बंड माजविलें होतें. ते म्हणत, जो कोणी ही गांठ सोडवून दाखवील त्याला प्राची दिशेचें राज्य मिळेल. अलेक्झँडर खरोखरच प्राची दिशा जिंकावयास निघाला होता. दोराचा लौकिक ऐकून तो देवळाकडे गेला. ती गांठ सोडण्यासाठीं त्यानें थोडी धडपड केली, पण हे काम सोपें नाहीं हें त्याच्या ध्यानांत आलें. बरें, हरलों म्हणावें तर प्राची दिशेचें राज्य आपल्याला मिळणार नाहीं असें ठरावयाचें व लोकांत तोच प्रवाद चालू व्हावयाचा. त्याच्या मानी स्वभावाला हें मानवेना. म्हणून मागें डेल्फीच्या देवळांतील जोगतिणीला त्यानें जसें जबरीनें बोलावयास लाविलें तसाच कांहींसा प्रकार तेथेही त्यानें केला. गांठ सुटत नाहींसें पाहतांच त्यानें कमरेची समशेर काढली व "अलेक्झँडर असल्या गांठी या अशा सोडतो" असे म्हणून त्यानें तीं दोरांचीं एकमेकांवर चढलेली भेंडोळीं एकाच तडाक्यानें तोडून टाकिली! साध्या व बारकाईच्या इलाजांनीं एकादी गोष्ट निकालांत निघेना म्हणजे एखादा सपाट्याचा आसुरी उपाय करावा लागतो असा शिकंदरचा अभिप्राय. तेथून तो दक्षिणेकडे वळला.
तिकडे सम्राट् दारियसनें बाबिलन शहरीं पांच लाख फौज जमा केली व तो पश्चिमेच्या रोखाने निघाला. एकमेकांस थोड्या हुलकावण्या देतां देतां शेवटीं इस्सस गांवाजवळ त्यांची गांठ पडली. शिकंदरची फौज दारियसच्या पासंगालासुद्धां लागण्यासारखी नव्हती. मॉसिडोनियांतील शूर भालाइतांनीं दारियसच्या सैन्याच्या धुरेवर जोराचा हल्ला केला. पुष्कळ वेळ झटापट चालू राहूनही ही धुरा भंगतां येईल असें दिसेना. शिकंदरनें पाहिलें कीं, असाच प्रकार जर चालू राहूं दिला तर आपलीही फौज निराश होईल. या वेळीं त्याची तडफ आणि जिवाविषयींची बेफिकिरी उत्तम दिसून आली. शत्रूच्या फौजेचा नायक माघारा फिरला कीं, केवढीही फौज असली तरी परत फिरते हें त्यानें मागच्या लढाईंत पाहिलें होतें. आपल्या शूर शिपायांच्या पराक्रमानें जें त्याला साध्य दिसेना तें त्यानें स्वतःच्या हिंमतीवर करून दाखविलें. एक टोळी बरोबर घेऊन तो दारियसच्या रोखानें मारामारी करीत पुढें घुसला. मोठी खेचाखेंच झाली आणि त्याला वार लागला. तरी त्याची परवा न करतां रक्ताळलेल्या अंगानें तो तसाच तलवार चालवीत, शत्रूची फौज फाडीत फाडीत खुद्द दारियसच्या सन्मुख येऊन ठेपला. त्याबरोबर दारियसनें भय खाल्लें. घाबरटपणानें त्यानें आपले ठाण सोडलें आणि स्वार होऊन रणावरून पळ काढला! त्याहीपेक्षां आश्चर्य हें कीं, त्याचें हें पलायन पाहून लाखोंच्या लाखों मर्दासारखे मर्द शिपाई जीव घेऊन रानोमाळ पळत सुटले. सरासरी चाळीस हजार माणूसबळावर शिकंदरनें पांच लाख फौजेची धुळधाण उडविली. एकमेकाला चेंगरण्यानेंच हजारों लोक मरण पावले. शिकंदरच्या लोकांनी जवळपास एक लाख लोक कापून काढले. दारियस पळाला तो युफ्रेटिस नदीच्या पूर्वकांठावर येऊन थांबला. शिकंदरनें पाठलाग केला नाहीं. कारण या विजयानें त्याला मिळालेलें अपरंपार बक्षिस त्याच्याने टाकवेना. वैभवाच्या लुटीला कांहीं पारावार नाहींसा झाला. हत्यारें, चिलखतें, तंबू, उंची पोशाख अशांसारख्या वस्तु इतक्या पडल्या होत्या कीं, कोणी लुटावयासच भेटेना, अशी स्थिति झाली. पण यांत विशेष नाहीं. त्या गैदी सम्राटानें इतर वस्तूं- बरोबर आपली आई, राणी व मुलेबाळेसुद्धां तेथेंच सोडून दिलीं! शिकंदर जेव्हां त्यांच्यापुढें येऊन उभा राहिला तेव्हां त्यांना पराकाष्ठेची ओशाळगत झाली व त्यालाही फार अवघड झालें. तेव्हांच्या तिकडील रीतीप्रमाणें या स्त्रियांची लाज तरी गेली असती किंवा जीव तरी गेला असता; पण शिकंदरनें ही कोणचीच आपत्ति त्यांजवर आणिली नाहीं. त्यानें त्यांचा बहुमान करून त्यांस सोडून दिलें. ग्रीक फौज शूर खरी, पण भिकार; आणि म्हणून वैभवाला वखवखलेली. तिने जेव्हां ही इतकी लूट पाहिली तेव्हां तिला काय घेऊं आणि काय नको असें झालें. साम्राज्यवैभव म्हणजे काय हें या शिपायांनीं कधीं पूर्वी पाहिलेंच नव्हतें. शिपायांच्या मनाची अशी स्थिति झाली असेल यांत नवल नाहीं. खुद्द शिकंदरलासुद्धां राजवैभव म्हणजे काय याची ओळख येथेंच झाली. दारियसच्या तंबूशीं जेव्हां तो आला तेव्हां तो राजवाड्यासारखा भव्य व अलंकृत कापडी इमला पाहून त्याला विस्मय वाटला. आंत शिरल्यावर तेथील भरगच्च जरतारी पडदे, वस्त्रभूषणें, सुखासनें आणि सोन्याचीं ताटेवाट्या पाहून तो चकित झाला! आणि उद्गारला, "राजवैभव म्हणजे असें असतें अँ!" या यशामुळें ग्रीस देशांतील विरोधाची कुरबूर अगदीं बंद पडली. प्रसिद्ध वक्ता डेमॉस्थिनीस हा शिकंदरच्याविरुद्ध सारखा ओरडत असे व अथीनियन लोकांना त्याच्याविरुद्ध चिथवीत असे. पण आतां त्याला आपले सगळे वक्तृत्व गिळून बसावें लागलें. कॉरिंथ येथें ग्रीसमधील सर्व संस्थानांची परिषद भरून शिकंदरला एक सोन्याचा 'विजय- मुकुट' म्हणून देण्याचे ठरलें. याप्रमाणे आपल्याच देशांत आपल्या- विरुद्ध कोणी उचल करील कीं काय ही त्याची भीति कांहीं दिवस तरी नष्ट झाली. तिकडे दारियसनें बोलणें लावलें कीं, युफ्रेटिसच्या पश्चिमेकडील सर्व मुलूख मी आपणांस देतों; आपण तह करावा. शिवाय आपली मुलगीही अलेक्झँडरला देण्याचें त्यानें आश्वासन दिलें; व वरदक्षणा म्हणून आणखी क्रोडो रुपये देऊ केले! हे देऊ केलेले पाहतांच शिकंदरच्या सेनापतींना मोठा आनंद झाला. पारमेनिओ नामक एक लोभाळू सेनापति म्हणाला, "मी जर शिकंदर असतों तर असला देकार मी एकदम पत्करला असता." शिकंदरनें त्याची किंमत त्याला कळावी म्हणून उत्तर केलें, "होय, मी जर पारमेनिओ असतों तर मीही हा एकदम पत्करला असता!" शिकंदरला आहेराची किंवा लालुचीची कांहींच किंमत नव्हती. त्यानें दारियसला सडकून कळविलें कीं, "मला है नको. युफ्रेटिसच्या पश्चिमेचा नव्हे तर अखिल आशियाचा मी स्वामी आहें हें कबूल कर आणि जर होत नसेल तर पुन्हा युद्धाला उभा रहा. कोणचेंच न करतां पळून जाशील तर मी तुला चैन पडूं देणार नाहीं. दडशील तेथून हुसकून काढीन." दारियसने काय उत्तर केलें हें इतिहासाला आठवत नाहीं; पण इतकें खरें कीं, शिकंदर युफ्रेटिसकडे गेला नाहीं; तर दक्षिणेकडे वळला. असें करण्यांत त्याचा हेतु असा होता कीं, समुद्रकांठचा पर्शियन अंमल उठवावा व जमल्यास ईजिप्तवर जाऊन तेथें तेंच करावें. त्याप्रमाणें सायडोन, टायर इत्यादि व्यापाराचीं ठाणीं हस्तगत करून त्याने सगळा एशियामायनर व सीरिया खुला केला आणि तेथून तो खाली ईजिप्तकडे गेला. तेथील लोकांना पर्शियनांचें राज्य नकोसेंच होतें. यानेंही त्यांच्या राजधानीस जाऊन तेथील देवाची पूजाअर्चा केली व मी तुमच्यापैकीच आहे असें त्यांस भासविलें. तेथें आपली सत्ता प्रस्थापित करून तो पुन्हा वर वळला व दारियसची पुन्हा गांठ घालावी म्हणून युफ्रेटिसकडे निघाला. दरम्यान् मॅसिडोनियावर संकट उत्पन्न झालें होतें; पण त्यानें तिकडे लक्ष दिलें नाहीं. कांहीं रानटी टोळ्या ग्रीसला उपद्रव देऊं लागल्या होत्या; पण तो म्हणाला, "त्या उंदरांना मारावयास मी जाणार नाहीं." तसेंच स्पार्टा संस्थानानेही बंड केलें होतें. पण घरीं ठेविलेला कारभारी जो अँटिपिटर त्याने मोठी मर्दुमकी करून हे बंड साफ मोडून टाकलें. असो. मेसोपोटेमियांतून त्वरेनें कूच करून तो दारियसवर चाल करून आला. दरम्यान त्या बादशहानें दशलक्ष फौज उभी केली. कारण शिकंदरचा ससेमिरा एक वर्ष बंद पडून त्याला पुरेशी उसंत मिळाली होती. तायग्रीस नदीच्या पूर्वकिनाऱ्यावर लढाई देण्याचें त्याने ठरविलें व आपल्या घोडेस्वारांना सोपें जावें म्हणून अवघें रण-मैदान त्यानें सपाट करून ठेविलें. याप्रमाणें खंबिरी करून दारियस शत्रूची वाट पहात बसला होता. एवढी फौज व येवढे बळ हातीं होतें तर तो आपण होऊनच शिकंदरवर चाल करून कां गेला नाहीं हें कळत नाहीं. त्याची फौज तर पन्नास हजारांहून जास्त नव्हती, तरी येवढ्याशा फौजेनिशींच दारियसशीं पुन्हा गांठ घालण्याची ईर्षा धरून शिकंदर सन्मुख आला. दारियसचें हें बळ पाहातांच त्याला व त्याच्या शिपायांनाही थोडें संकटच वाटूं लागलें. शिकंदरनें पूर्वी कधीं न केलेली गोष्ट या वेळीं केली. ती ही की, सल्ला घेण्यासाठी हाताखालची चार मंडळी बोलाविली. पुष्कळांनीं मत दिलें कीं, आपण थोडे आहों, तेव्हां रात्रींचा छापा घालावा. पण शिकंदर म्हणाला, "मला असें चोरटें यश नको." बराच वेळ वाटाघाट होऊन काय करावयाचें तें मनाशी ठरवून तो खुशाल झोपीं गेला. दुसरे दिवशीं इसवी सनापूर्वी ३३१ च्या आक्टोबर महिन्यांत, हा दुसरा रणसंग्राम सुरू झाला. मागल्या लढाईचें वर्णन केलें आहे तेंच येथें थोड्याफार फरकानें लागू पडते. शिकंदरनें या फौजेच्या अवाढव्यपणाकडे लक्ष न देतां नेहमीप्रमाणें मध्यभागावर जोराचा हल्ला चढविला व मग व्हावयाचें तेंच झालें. मधली फळी फुटली. दारियस घाबरला, पळाला, व नायक पळाला म्हणून इतर फौजही पळाली! हीं युद्धवर्णने वाचलीं म्हणजे त्यांच्या खरेपणाविषयी शंका येते. दशलक्ष लोक उगाच पळतात म्हणजे काय? एक तर दारियसची फौज इतकी मोठी नसावी किंवा शिकंदरची तरी मोठी असावी. विशेष प्रकारच्या हत्यारपात्यारांचा, शिस्तीचा वगैरे उपयोग होतो हें खरें, पण याही बाबतींत दारियस अगदीं तोटका होता हे संभवतें तरी कसें? येवढें विशाल साम्राज्य कशाच्या बळावर चाललें होतें? साधारण अनुमान इतकेंच निघतें कीं, या युद्धाचीं वर्णनें फार थोड्या माहितीवर रचली असावी. पण तें कसेही असले तरी दारियसचा पराभव झाला हें खरेंच आहे. पुन्हा हतबल होऊन दारियस रणांगणावरून पळाला. या दुसऱ्या विजयानें शिकंदरनें पर्शियन साम्राज्य पार मोडून टाकलें.
मग तो खालीं वळून फार दिवस गाजत असलेल्या त्या पुराण्या बाबिलोन शहराकडे गेला. तेथील वैभव पाहून तो हर्षभरित झाला. मग पुढें सरून त्याने दारियसच्या 'सुसा' नांवाच्या राजधानीत प्रवेश केला. तेथें त्यास अगणित संपत्ति मिळाली. पर्सिपोलीस नगरांतही त्याला अशीच लूट मिळाली. शेवटी ही लुटालूट शिपायांच्या व राजाच्या हातींपायीं आली. हे सर्व सुखावले. स्त्री, शराब आणि इतर सुखोपभोग यांत सर्वजण गर्क होऊन गेले. शिकंदरची नेकी आणि दिलदारपणा ही या निशेत कांहींशीं नष्ट झाली. दारूच्या अंमलांत असतां एका कसबिणीच्या आग्रहावरून त्याने तेथील परम सुंदर आणि भव्य प्रासाद मोठी शेकोटी व्हावी म्हणून पेटवून दिला. प्राप्त झालेल्या यशाने बेहोष न होण्याइतपत गंभीरपणा त्याला अजून प्राप्त झाला नव्हता. पण शिकंदरने ही विलासवासना फार वेळ टिकूं दिली नाहीं. दारियसचा पुरा निःपात त्याला करावयाचा होता. दारियसला पळता भुई थोडी झाली. सगळे राज्य मागें टाकून तो उत्तरेकडे आपल्या एका नातलगाकडे गेला. पण त्यानेंच त्याला कैदेत ठेविलें व त्याची हरतऱ्हेने मानखंडना केली. त्याच्या पाठीमागें शिकंदरही तेथें गेला. शिकंदर इकडेच येत आहे हे ऐकून तो भेकड नातेवाईक आपल्या कैद्यांसह पळत सुटला. शेवटीं पळत पळतां, आतां पळवत नाहींसें पाहून, दारियसनें जिवाची आशा सोडली व तो वाटेंतच पडून राहिला. त्याच्याबरोबरच्या लोकांना अजून पळावयाचे असल्यामुळे ते गेले. पण जातां जातां त्यांनी त्याला प्राणांतक जखम मात्र केली. दरम्यान शिकंदर तेथें आला; तों दारियसनें प्राण सोडला होता. कांहीं दिवसांनीं तो दारियसचा नातेवाईक त्याच्या हातीं लागला; तेव्हां त्याला शिकंदरनें हालहाल करून ठार मारलें. याप्रमाणें दोन वर्षांपूर्वी पर्शियन सम्राटावर शिकंदरनें उगारिलेल्या शस्त्राचें काम संपलें. सर्व राज्य बुडालें, कुलाची अब्रू गेली, वैभवें धुळींत मिसळलीं, व खुद्द राजा कुत्र्याच्या मरणानें मेला.
आतां मात्र शिकंदर पुन्हा बेफाम बनत चालला. हाताखालच्या लोकांशीं तो फार मगरुरीनें वागूं लागला. ज्याला त्याला टाफरून बोलूं लागला. व मन मानेल तसें वर्तन करूं लागला. आपला ग्रीक पोषाख घालावयाचें सोडून देऊन तो जित लोकांचा पोषाख करूं लागला. कोणी मित्रसुद्धा समजुतीच्या गोष्टी बोलूं लागले तर तें त्याला खपेना. एकदां पारमेनिओ हा आपल्या जिवाला इजा करण्याच्या खटपटीत आहे अशी त्याला शंका आली आणि एकदम त्यानें त्या वृद्ध सरदारास फांशीची शिक्षा दिली. ज्या क्लायटसनें त्याचा जीव वांचविला होता त्याला दारूच्या धुंदीत त्याने ठार मारलें. शिकारींत एक हुजऱ्या आपल्यापुढे धावला म्हणून त्यानें त्यास चाबकाखाली झोडपलें. ॲरिस्टॉटलच्या पुतण्यास एक विद्वान् म्हणून त्यानें बरोबर नेलें होतें; पण तो हवें त्याला मान डोलवीना व इतर लोकांसारखा साष्टांग नमस्कार करीना म्हणून त्याने त्याची निर्भर्त्सना केली. येवढ्यानेंच झालें नाहीं. रोशन नांवाच्या आपल्या राणीच्या सहवासांत दिवसचे दिवस तो घालवू लागला. दारू पिणें हें तर ग्रीक लोकांच्या पांचवीलाच पुजलेलें; त्याही व्यसनांत तो निपचित पडून राहू लागला. पण इतकें झालें तरी पृथ्वी जिंकण्याचा त्याचा हव्यास तिळप्रायही हटला नव्हता.
त्याच्यापुढे काय आहे, त्याच्यापुढे काय आहे, हें पाहाण्याचा जें दिसेल तें जिंकण्याचा स्वतःचा हव्यास मात्र शिकंदरला जिंकतां येईना. वास्तविक पाहातां ग्रीक राष्ट्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणू पाहणाऱ्या पर्शियन साम्राज्यावर त्यानें उठावें हें जरी साहजिक असलें तरी आतां तें सर्व साम्राज्य व त्या साम्राज्याचा सम्राट् या सर्वांचा त्याने अगदीं चोळामोळा करून टाकला होता; आणि म्हणून त्यानें परत फिरावयास हवें होतें. पण पर्शियन साम्राज्याच्या पूर्वसीमेवर आल्यावर त्याच्या कानीं भारतवर्षांतील संपत्तीच्या, व वैभवाच्या कथा पोचल्या असाव्या आणि जें राज्य आपण जिंकिलें त्यासारखींच मोठमोठी राज्ये व जे मुलूख पाहिले त्याहून सहस्रपट परम सुंदर प्रदेश आपण पुढे गेलो असतां आपणांस भेटतील असें वाटून त्यानें सिंधुनदीच्या रोखाने निघावयाचे ठरविलें. त्यानें आजूबाजूच्या शूर लोकांतून शिपायांची नवी भरती केली; व जवळ जवळ एक लाख फौजेसह तो हिंदुकुश पर्वताच्या बारींतून इकडे येण्यास निघाला. बरोबर लुटीचें सामानसुमान इतकें जमा झालें होतें कीं, दिवसाच्या कांठीं मजल फार थोडी होऊं लागली. हे त्याला आवडेना, म्हणून सर्व फौजेंत त्यानें हुकूम सोडले कीं, अगदी जरूर तेवढेंच सामान प्रत्येकाने जवळ ठेवावें व बाकीचें जाळून टाकावें. कदाचित् शिपाई लोक कांकूं करतील हे ध्यानांत घेऊन त्यांना उदाहरण घालन देण्याच्या हेतूनें त्यानें आपल्या विलासाच्या व सुखोपभोगाच्या सर्व वस्तूंची शिपायांच्या समोर होळी केली. अर्थात् शिपायांनाही तसें करणें प्राप्तच झालें. मजल दरमजल करीत शिकंदर खैबर घाटांतून प्रत्यक्ष हिंदुस्थानांत उतरला.
तक्षशिलेस एक लहानसें राज्य होतें. तेथील राजानें गोडीगुलाबीनें वागून हे अरिष्ट पुढे लावून दिले; पण झेलम नदीच्या अलीकडे मात्र त्याची प्रगति इतकी सहजासहजी होण्यासारखी नव्हती. तेथून खालीं पोरसचें बलाढ्य राज्य पसरलें होतें. खुद्द पोरस एकाद्या राक्षसासारखा महाधिप्पाड माणूस होता. ह्या अरिष्टाची वर्दी लागतांच शत्रूला अडविण्यासाठीं नदी धरून तो बसला. नदीलाही पूर येऊन पाणी आसमंतात् पसरलें होतें. दोन्ही दळें नदीच्या दोन तीरांवर ठाण मांडून राहिली. पण पोरसला हुलकावण्या देण्याचें काम शिकंदरनें लवकरच चालू केलें. त्याच्या तोंडावर बरीच फौज ठेवून नदी उतरण्याचा डौल त्याने अनेक ठिकाणीं घातला. हें त्यानें इतक्या वेळां केलें कीं, याच्याने नदी उतरवत नाहीं अशी पोरसच्या लोकांची खात्री झाली. शेवटी एके दिवशीं रात्री नदीकांठानें बरेंच वर सरकून त्यानें एक उतार शोधून काढला; व तेथून सुमारें बारा हजार लोक झेलमच्या अलीकडे आणले. यांनी सकाळ होतांच पोरसच्या बगलेवर मारा करण्यास सुरुवात केली. बगलेवर हल्ला होतांच हिंदू फौजेनें आपला मोहोरा तिकडे वळविला. पण हे करतांना एक चूक झाली. तिचा नदीचा आसरा सुटला. नदीपासून पोरस दूर सरकलासें पाहून शिकंदरनें आपली मुख्य फौज झेलम उतरून अलीकडे आणिली आणि शत्रूच्या मध्यावर जोराचा तडाखा देण्याचा त्याचा नेहमींचा डाव त्याने सुरू केला. पोरसपाशीं तीनशे हत्ती होते; ते धुंद करून ठेविलेले होते. त्यांच्यापुढे शिकंदरच्या भालेकऱ्यांचे फारसें कांहीं चालेना. पण इतक्यांत ते मस्त झालेले हत्ती पोरसच्या फौजेकडे तोंडें करूनच धिंगाणा घालूं लागले. शत्रूवर सोडण्यासाठीं आणलेलें हें नागास्त्र पोरसच्या फौजेवरच वळलें व त्याने तिची दाणादाण केली. तसेंच पोरसचे मोठमोठाले युद्धरथ चिखलांत रुतूं लागले. शिवाय शिकंदरचें माणुसबळही पोरसच्यापेक्षां मोठें होतें. स्वतः पोरसनें बहुत शर्थीनें तलवार चालविली. त्यामुळे शिकंदरच्या मनांत त्याच्याविषयीं आदर उत्पन्न झाला. पण शेवटी पोरसचा पराभव झाला. "राजा म्हणून मला वागविशील तरच मी शस्त्र खालीं ठेवीन." असें बाणेदारपणाचें उत्तर त्यानें शिकंदरला केलें. त्यानें हें पोरसचें तेज पाहून त्याच्याशी सख्य केलें. तेथून खाली दक्षिणेकडे येऊन गंगेच्या खोऱ्यांतील उत्तमोत्तम प्रदेश काबीज करावे अशी शिकंदरची फार इच्छा होती; पण आतां त्याचे शिपाई कुरकूर करूं लागले. शेवटीं शिपायांची मर्जी पाहून त्यानें दक्षिणेकडील रोख सोडून सिंधूच्या कांठानें समुद्राकडे जाण्याचें ठरविलें. समुद्रापर्यंत पोंचावयास त्याला तब्बल वर्ष लागलें!
सध्यांच्या बलुचिस्तानांतून तो फौजेसह पश्चिमेकडे निघाला. पण या डोंगराळ मुलुखाची त्याला बरोबर कल्पना नव्हती. वाटेनें त्याच्या फौजेचे भयंकर हाल झाले. उन्हाच्या तिरपीनें हजारों लोक होरपळून मेले. जे आजारी पडले त्यांस वाटेंतच टाकावें लागलें. ओझ्याचीं तट्टे मारून खाण्याचा प्रसंग आला! डोळ्यांस लावावयाससुद्धां पाणी मिळेना. एकदां कोठेंसें सांपडलेलें सुंदर पाणी शिपायांनी डोकीच्या टोपांतून त्याच्यासाठी म्हणून आणले; पण माझ्या फौजेची तहान भागेपर्यंत मी हें पिणार नाहीं असें म्हणून या दिलदार सेनापतीनें तें पाण्याचे भांडें दूर केलें! याप्रमाणे रखडत रखडत ते कसेबसे या रेताडांतून बाहेर पडले. पण हा वेळपर्यंत अर्धी-निम्मी फौज केवळ वाटचालीतच मरून गेली. शेवटीं एकदांचे ते इराणांत पोंचले. दारियसचें जिंकलेलें साम्राज्य त्यानें टाकून दिले नव्हते; तें त्यानें आपल्या ताब्यांत ठेविलें होतें व हिंदुस्थानाकडे जातांना तेथील कारभाराची व्यवस्था करून तो पुढे गेला होता. शिकंदर परत येत आहेसें पाहून अधिकाऱ्यांनी त्याच्या स्वागताची तयारी करून ठेविली व त्यामुळे हायसे होऊन शिकंदर व त्याचे शिपाई विश्रांति घेऊ लागले. सर्व तऱ्हेच्या सुखसोईंची व्यवस्था झालेली होती. हे वाळून गेलेले आणि वखवखलेले लोक इतके सुखावले कीं, कित्येक महिनेपर्यंत त्यांना दुसऱ्या कशाची आठवणच झाली नाहीं. या सुखनिद्रेतून जागा होतांच शिकंदर कारभाराच्या सुधारणेस लागला. दारियसची राजधानी जी सुसा तेथेंच त्यानें आपलीही राजधानी केली. आधी नेमून ठेवलेल्या अंमलदारांना दुर्बुद्धि आठवून त्यांनी कारभारांत बजबज माजविली होती; त्यांस त्याने कामावरून दूर केलें व जरूर तर कडक शासनही केलें. त्याच्या मनांत इकडेच राहून हिंदुकुशापासून डॅन्यूबपर्यंत साम्राज्य चालवावें असें येऊं लागलें. लोकांना स्वतःसंबंधानें आपलेपणा वाटावा म्हणून त्यानें त्यांचा पूर्वकालीन थोर सम्राट् जो कुरु त्याच्या समाधीची डागडुजी करावयास आरंभ केला. याप्रमाणें आठदहा वर्षे मनस्वी श्रम करून प्राप्त करून घेतलेलें हें विशाल साम्राज्य सुस्थिर करण्याची त्यानें शिकस्त केली. सर्व स्थिरस्थावर होऊन राज्याचा गाडा सुयंत्र चालू होतांच झोपी गेलेली त्याची पृथ्वी जिंकण्याची वासना पुन्हा खडबडून उठली.
पण त्याचें वासना-बळ जरी वाढत होतें तरी त्याचें शरीरबल क्षीण होत चाललें होतें. वास्तविक तो मोठ्या पिळदार बांध्याचा असून त्याची गर्दन, दंड, मांड्या पहिलवानासारख्या असत. त्याचे निळसर घारे डोळे अत्यंत पाणीदार असत. केस पिंगट भुरे असून ते त्याच्या वळीव मानेवर पडले म्हणजे तो एकाद्या सिंहासारखा दिसे. दाढीमिशा काढण्याचीच त्याची रीत होती. शरीरकष्ट असे त्याने कधीं जुमानिलेच नाहींत. लढाईच्या प्रसंगी शिपाई थोडे कचरत आहेत असें त्याला दिसलें तर तो क्षणभरही विचार न करतां ऐन खेंचाखेंचींत उडी फेंकीत असे. या त्याच्या उग्रपणाच्या आंतील भागांत मात्र मातृभक्तीची अशी एक नाजूक जागा होती. एरवीं लढाईच्या गर्जना चालू असल्या तरी आईच्या आठवणीनें तो विव्हळ होत असे. आणि तें साहजिकच होते. त्याच्या आईस बापानें अवमानिलें होतें, म्हणून त्याची मातृभक्ति अधिकच दृढ झाली होती. हा इकडे आल्यावर अँटिपेटरने तक्रार करून त्याला कळविलें कीं, आपल्या आईसाहेब कारभारांत उगाच ढवळाढवळ करीत असतात. हें पत्र वाचून शिकंदरनें त्याला चार समजुतीच्या गोष्टी लिहिल्या व कळविलें कीं, "माझ्या आईच्या डोळ्यांतून जर एक अश्रु निघाला तर माझें राज्य व माझा पराक्रम हीं केवळ मातीमोल होत." असो.
याप्रमाणे सर्व योजना चालू असतां त्याला थोडा थोडा ताप येऊं लागला. अगोदरच ग्रीक लोक भारी दारूबाज आणि त्यांत आतां तर तो इराणांत रहात असलेला! मग काय विचारावें? शिराजचें परम सुगंधित व मादक मद्य त्याला सोडीचना. त्यांतच ताप येऊं लागला. भोवतालच्या लोकांनी विचारलें, "आतां मागची व्यवस्था काय?" त्यानें सांगितलें, "जो समर्थ असेल त्याच्या हवालीं हें राज्य करा!" रोशन राणी गरोदर होती; पण अजून प्रत्यक्ष राजकुलीन संतान कांहींच नव्हतें. त्यामुळे तो तरी दुसरें काय सांगणार? हे वरील शब्द किती खरे होते. पण या त्याच्या उद्गारांनीं पुढे सर्व साम्राज्याची दाणादाण उडाली; कारण समर्थ कोण याविषयीं मतभेद सुरू झाले. हळुहळू त्याची प्रकृति बिघडत चालली. राजवैद्यांनी सर्व कांहीं केलें पण गुण वाटेना. या वेळी त्याला केवळ बत्तिसावें वर्ष होतें! पण येवढ्याशा वयांत त्यानें केवढे साम्राज्य पैदा केलें! पराभव असा त्याचा कधी झालाच नाहीं; पण रूपसंपदा, धनसंपदा, दिलदारी, आणि जयश्री यांनी कायमचें वरिलेल्या या शूर वीरास दारूने पोखरून टाकले आणि कोणच्याही औषधोपचाराचा उपयोग न होतां हा शिकंदर बादशहा, कीं ज्याचें नांव चांगल्या नशिबाचें विशेषण होऊन बसलें आहे- तो कालवश झाला! ही गोष्ट इ० सनपूर्व ३२३ व्या वर्षी घडली.